विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

चालुक्य घराणे भाग ७

 चालुक्य घराणे :

पोस्त सांभार :मराठी विश्वकोश






भाग ७
कल्याण (णी)चे चालुक्य :-------२
जयसिंहाला परमार भोज, कलचुरी, गांगेयदेव आणि चोल राजेंद्र या तीन बलाढ्य राजांच्या संघाशी झगडावे लागले. या तिघांनीही भिन्न भिन्न दिशांकडून त्याच्या राज्यावर आक्रमण केले. त्यांना आरंभी काही विजय मिळाले पण शेवटी जयसिंहाने त्या सर्वांचा पुरा मोड केला. तसेच त्याने आपल्या मांडलिकांवरही जरब बसविली.
जयसिंहानंतर त्याचा पुत्र प्रथम सोमेश्वर आहवमल्ल हा गादीवर आला. त्याचे लेख १०४२ ते १०६८ पर्यंतचे सापडले आहेत. त्यावरुन याने सु. वीस वर्षे राज्य केले असावे. याच्याही कारकीर्दीत चोलांशी युद्ध चालू राहिले. चोल नृपती राजाधिराज याने अनेकवार चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण करून त्यांची कल्याण राजधानी लुटून उद्‌ध्वस्त केली पण १०५३-५४ मध्ये कोप्पम्‌ येथे झालेल्या युद्धात तो मारला गेला. तथापि त्याचा भाऊ राजेंद्रदेव याने मोठ्या धैर्याने लढून सोमेश्वराचा पराभव केला आणि स्वतःला त्याच रणभूमीवर अभिषेक करवून घेतला. सोमेश्वरानेही अनेकवार चोलांच्या प्रदेशावर स्वारी करून यापराजयाचा वचपा काढला. हे युद्ध दीर्घकाल चालले. १०६२ मध्ये कुडलसंगम येथे घनघोर लढाई होऊन सोमेश्वराचा पराजय झाला आणि त्याला रणांगणातून पळ काढावा लागला.
१०५५ च्या सुमारास धाराधिपती भोजाच्या राज्यावर पश्चिमेकडून गुजरातचा भीम आणि पूर्वेकडून कलचुरी कर्ण यांनी एकदम केले. याचवेळी अकस्मात भोजाचा मृत्यू झाल्यामुळे परमारांच्या राज्यावर भयंकर गंडांतर आले होते. भोजाचा नातेवाईक (पुत्र ?) जयसिंह याने या बिकट प्रसंगी सोमेश्वराकडे साहाय्याची याचना केली. त्यानेही पूर्वापार वैमनस्य लक्षात न घेता आपला पुत्र षष्ठ ⇨विक्रमादित्य यास जयसिंहाच्या साहाय्यास पाठविले, विक्रमादित्याने आक्रमकांना पिटाळून जयसिंहाला पुन्हा गादी मिळवून दिली.
कुडलसंगम येथे झालेल्या आपल्या पराभवाचा कलंक धुवून काढण्याकरिता सोमेश्वराने चोल नृपती वीरराजेंद्र यास पुन्हा तेथेच युद्धाचे आव्हान दिले पण ऐन वेळी सोमेश्वर आजारी पडल्यामुळे त्याची खंत वाटून त्याने कुरुवति येथे तुंगभद्रेत १०६८ मध्ये परमयोगाकरिता जलसमाधी घेतली.
सोमेश्वर आहवमल्लाला द्वितीय सोमेश्वर, षष्ठ विक्रमादित्य आणि जयसिंह असे तीन पुत्र होते. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र द्वितीय सोमेश्वर हा १०६८ मध्ये गादीवर बसला. त्याचा धाकटा भाऊ विक्रमादित्य ह्याला चोल नृपती वीरराजेंद्र याची मुलगी दिली होती. वीरराजेंद्राने आपल्या जामाताला गादी मिळवून देण्याकरिता सोमेश्वरावर स्वारी केली, पण त्याचा पराभव होऊन त्याला परत जावे लागले.
परमार नृपती जयसिंह याचे विक्रमादित्याशी सख्य झाले होते. विक्रमादित्य हा मोठा महत्त्वाकांक्षी व पराक्रमी असल्यामुळे पुढे मागे तो परमारांच्या साहाय्याने आपला प्रबळ शत्रू होईल असे वाटून द्वितीय सोमेश्वराने कलचुरी कर्ण आणि गंग उदयादित्य यांशी संधान बांधून माळव्यावर स्वारी केली. त्या युद्धात जयसिंह मारला गेला आणि माळव्यावर चालुक्यांचा अमल बसला पण भोजाचा बंधू उदयादित्य याने मोठ्या पराक्रमाने शत्रूचा पाडाव करून मालव भूमीला मुक्त केले.
विक्रमादित्य हा आपल्या वडील भावाच्या वतीने दक्षिणेच्या प्रदेशावर राज्य करीत होता. त्या दोघांमध्ये वैमनस्य वाढून त्याचे पर्यवसान युद्धात झाले. १०७६ मध्ये विक्रमादित्याने सोमेश्वराचा पराभव करून गादी बळकाविली. त्याने त्रिभुवनमल्ल ही पदवी धारण करून आपल्या नावे विक्रम संवत्‌ स्थापला. तो सु. शंभर वर्षे दक्षिणेत चालू होता.
राज्यारोहणानंतर काही काळ विक्रमादित्याचे जयसिंहनामक धाकट्या भावाशी सख्य होते. पण १०८३ मध्ये जयसिंहाने आपल्या भावाविरुद्ध बंड केले आणि कृष्णा नदीपर्यंत मोठ्या सैन्यासह चाल केली. तेव्हा विक्रमादित्याने त्याचा पाडाव करून त्याला कैद केले.
विक्रमादित्याने होयसळ, कदंब, शिलाहार, यादव यांवर विजय मिळविले. चोलांशीही त्याचे युद्ध चालूच होते. त्यात त्याने एकदा कांचीपर्यंत विजययात्रा नेली होती. वेंगीच्या चालुक्यांच्या राज्याकरिता त्याच्या चोल नृपती कुलोत्तुंग याशी अनेक चकमकी झडल्या. त्यामुळे काही काळ त्या राज्याच्या काही भाग विक्रमादित्याच्या ताब्यात आला असावा कारण त्याच्या संवताचे काही लेख त्या राज्यात सापडले आहेत.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...