चालुक्य घराणे :
हे आपणास बादामीच्या चालुक्यांचे वंशज समजत. बादामीच्या चालुक्य वंशातील शेवटचा राजा द्वितीय कीर्तिवर्मा हा शक ६७९ (७५७) मध्ये राज्य करीत होता. कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा मूळ पुरुष तैलप ह्याचा आरंभीचा लेख ९५७ चा आहे. या दोनशे वर्षांच्या काळात चालुक्यांच्या सहा पिढ्या झाल्या, असे मिरज ताम्रपटात म्हटले आहे. पण या दोन चालुक्य वंशांच्या वर्णनात व त्यांनी धारण केलेल्या बिरुदांत साम्य नाही. त्यामुळे तैलप बादामीच्या चालुक्यांचा वंशज होता काय, याविषयी संशय आहे तथापि सामान्यतः हे दोन राजवंश परस्परसंबंद्ध असल्याचे समजतात.
या राजवंशाचाही इतिहास मुख्यत्वेकरून कोरीव लेखांवरच आधारित आहे. काही राजांची नाणी सापडली आहेत. बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात यातील काही राजांविषयी माहिती मिळते. तिचाही उपयोग तारतम्याने केला पाहिजे.
बादामीच्या चालुक्यानंतर मान्यखेटच्या राष्ट्रकूटांचे साम्राज्य महाराष्ट्र व कर्नाटक प्रदेशात स्थापन झाले. ते सु. दोनशे वर्षे टिकले. या काळात हे चालुक्य घराणे कोठे राज्य करीत होते, याची निश्चित माहिती नाही तथापि यांचे राष्ट्रकूटांशी मधूनमधून वैवाहिक संबंध झाल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आढळतात. तेव्हा दरम्यानच्या काळात हे राष्ट्रकूटांचे मांडलिक बनले असावे.
या काळात यांच्या ५ पिढ्या झाल्यावर या वंशातील चतुर्थ विक्रमादित्य याचा विवाह चेदी देशाचा कलचुरी नृपती लक्षणराज याच्या बोंथादेवीनामक कन्येशी झाला. त्याचा पुत्र द्वितीय तैलप ह्याने या राजवंशाला साम्राज्यपद मिळवून दिले. हा आरंभी राष्ट्रकूट सम्राट तृतीय कृष्ण याचा मांडलिक म्हणून विजापूर जिल्ह्यात राज्य करीत होता. याचे ९५७ व ९६५ चे दोन लेख सापडले आहेत. त्यांपैकी नंतरच्या लेखात त्याचा महासामंताधिपती म्हणून उल्लेख आला आहे. त्याला तृतीय कृष्णाकडून अणुगजीवित (सरंजाम) म्हणून तर्द्रवाडी १००० हा प्रदेश मिळाला होता. यानंतरच्या नऊ दहा वर्षांत राष्ट्रकूटांची सत्ता डळमळीत झाली. तृतीय कृष्णानंतर गादीवर आलेल्या खोट्टिगाचा पराभव करुन राष्ट्रकूटांचा पूर्वीचा मांडलिक परमार सीयक (श्रीहर्ष) याने मालखेड राजधानीवर चाल केली आणि ते नगर लुटले. त्यायोगे राष्ट्रकूटांच्या प्रतिष्ठेला मोठाच धक्का बसला. महत्त्वाकांक्षी तैलप याने या संधीचा पूर्ण फायदा घेऊन ९७३ मध्ये खोट्टिगाचा वारस द्वितीय कर्क यावर स्वारी केली. त्या युद्धात कर्क मारला जाऊन तैलपाला साम्राज्यश्रीने माळ घातली.
यानंतर तैलपाने हळूहळू राष्ट्रकूटांच्या मांडलिकांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. याने प्रथम गंग नृपती पांचालदेव याचा युद्धात पराभव करून त्याला कंठस्नान घातले. यानंतर उत्तर कोकणचे शिलाहार व सेऊणदेश (खानदेश)चे यादव यांनी याचे स्वामित्व मान्य केले. नंतर त्याने दक्षिण गुजरात जिंकून तेथे आपल्या सेनापतीची स्थापना केली. परमार नृपती मुंज याच्याशी त्याचे युद्ध दीर्घकाल चालले. मेरुतुंगाच्या प्रबंध-चिंतामणीत म्हटले आहे की, मुंजाने तैलपाचा सहा वेळा पराभव केला पण सातव्या खेपेस त्याने आपला प्रधान मंत्री रुद्रादित्य याच्या सूचनेविरुद्ध गोदावरी पार करून तैलपाच्या प्रदेशावर स्वारी केली असता, त्याचा पराभव होऊन तो पकडला गेला. बंदीत असता त्याचे प्रेम तैलपाची विधवा भगिनी मृणालवती हिच्यावर बसले. मुंजाच्या अधिकाऱ्यांनी त्याची एका भुयारातून सुटका करण्याचा व्यूह रचला होता पण मृणालवतीने याची वार्ता तैलपास सांगताच त्याने मुंजास आपल्या राजधानीत भिक्षा मागावयास लावून त्याचा शिरच्छेद केला, अशी दंतकथा प्रचलित आहे.
तैलपानंतर त्याचा पुत्र सत्याश्रय ९९७ मध्ये गादीवर आला. परमार सिंधुराज याने त्याच्याशी युद्ध करून गेलेला प्रदेश परत मिळविला पण सत्याश्रयाने कोकणच्या अपराजित शिलाहार नृपतीचा पुरा मोड करून त्याला आपले स्वामित्व मान्य करावयास लावले. राष्ट्रकूटांचे चोल राजांशी दीर्घकाल युद्ध चालले होते. राष्ट्रकूटांचे उत्तराधिकारी चालुक्य यांनी तो वारसा पुढे चालवून चोलांशी अनेक पिढ्या कलह चालू ठेवला. चोल नृपती राजराज याने नऊ लाख सैन्यानिशी चालुक्यांच्या राज्यावर स्वारी केली आणि बराचसा प्रदेश उद्ध्वस्त केला पण शेवटी त्याचा पराभव होऊन त्याला परत जावे लागले.
सत्याश्रयानंतर त्याचे तीन पुत्र पाचवा विक्रमादित्य, अय्यणा आणि द्वितीय जयसिंह हे एकामागून एक गादीवर आले. पहिल्या दोघांची कारकीर्द अल्पकाल टिकली पण जयसिंह याने मात्र सु. १०१५ पासून १०४२ पर्यंत दीर्घकाल राज्य केले. आतापर्यंत हे उत्तराकालीन चालुक्य पूर्वीच्या मान्यखेट राजधानीतून राज्य करीत होते पण जयसिंहाच्या कारकीर्दीत ती त्यांनी बीदर जिल्ह्यातील कल्याण (सध्याची कल्याणी) येथे नेली.



No comments:
Post a Comment