महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती
पोस्तसांभार :: आदित्य गोखले
कोंढाण्याच्या वेढ्याच्या वेळी मोठी मोगली फौज वेढ्यात अडकून पडली आहे हे बघून महाराणींनी आपले सरनोबत धनाजी जाधव ह्यांना उत्तर कर्नाटकात पाठवले. विजापुरी कर्नाटकाचा मोगली सुभेदार चिंकीलीच खान ह्याला धनाजीच्या तलवारीचा चांगलाच तडाखा मिळाला व तो जीव वाचवत पळून गेला. कर्नाटकातल्या सुभ्यात धनाजी जाधवांचे तांडव बघून औरंगजेबाने जुल्फिकार खानाला त्यांच्या वर पाठवले. जशी ही खबर धनाजींना मिळाली तशी त्यांनी त्वरेने फौजेची दिशा बदलून गुलबर्ग्याकडे कूच केली. जुल्फिकारखानाच्या हाती त्यामुळे काहीच लागले नाही
कर्नाटकात असा धुमाकूळ चालला असताना ५० हजाराची एक मोठी फौजेची तुकडी घेऊन सरदार नेमाजी शिंदे माळव्यात घुसले. मराठा फौजेचा त्रिशूळ माळव्याच्या मोगली सुभ्याच्या छाताडात घुसला आणि उज्जैन, सिरोंज आणि बुऱ्हाणपूर वर हल्ला झाला. तिन्ही ठिकाणी लुटालूट करून भल्या मोठ्या खंडण्या वसूल करण्यात आल्या. बुऱ्हाणपूर ला तर वेढाच पडला होता. माळवा प्रांतात मराठा फौजेनी केलेल्या हल्ल्यांची खबर औरंगजेबाला कोंढाण्याच्या वेढ्यात मिळत होती. जुल्फिकारखान, शहजादा बेदरबाखत वगैरेंना लगेच त्यांनी तिकडे रवाना केले. पण असे मोगलांच्या हातात सापडतील ते स्वराज्याचे मावळे कसले - ते तर आपलं काम उरकून कधीच माळव्यातून पसार झाले होते. जुल्फिकारखानाची तर फारच दयनीय अवस्था झाली होती. औरंगाबादला त्याला बातमी मिळाली कि मराठा फौज नंदुरबार मध्ये हल्ला करते आहे. तो तिकडे वळाला तर मराठा सैन्य नंदुरबारहून नाशिक-बागलाण कडे निघून गेले. त्याने तिकडे रोख वळवला तर पुढची बातमी अशी आली कि मराठा फौज खाली खाली सरकून थेट औरंगजेबाच्या छावणीच्या दिशेने निघाली आहे. असे करून तो नुसताच चकवा लागल्या सारखा फिरत राहिला - मराठे काही त्याला सापडेना !!!!
१७०४ च्या सुरवातीला (मोगलांच्या राजगड मोहिमेच्या वेळी) ताराबाईंनी अशीच एक मोठी धूम उडवली. पन्नास हजार फौजेसह नर्मदा ओलांडून नेमाजी शिंदे, परसोजी भोसले आणि केसो त्रिमल ह्यांनी माळव्याच्या मोगली सुभेदार रुस्तमखानला कैद केली. माळव्यात पुर्ण हैदोस घालून सिरोंज ला वेढा पडला. नेहमीप्रमाणे मोठी लूट मिळाली आणि चौथ आकारण्यात आला. कालबाग पर्यंत पोचलेल्या मराठा फौजेला रोखण्यासाठी गाझीउद्दीन फिरोजजंगला धाडण्यात आले पण त्याच्या हातात कोणीच सापडलं नाही.
फेब्रुवारी १७०४ ला २० हजाराची एक मराठा फौज हैदराबाद आणि मछलीपटणम पर्यंत धडकली. ह्या पूर्ण प्रदेशातुन चौथ वसूल करण्यात आला. एवढच नाही तर गोवळकोंड्याच्या घाबरलेल्या मोगल सूभेदाराकडून प्रचंड मोठी खंडणी वसूल करण्यात आली. मनुची आणि भीमसेन सक्सेना दोघांनाही ह्या घटनेची नोंद केली आहे.
हैदराबाद आणि आसपास असा हल्ला चालू असताना त्याच सुमारास सरनोबत धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर आणि बहिर्जी घोरपडे ह्यांच्या बरोबर ५०-६० हजार सैन्य देऊन महाराणी ताराबाईंनी त्यांना कर्नाटकात धाडले. मराठ्यांच्या धडाक्या समोर मोगली ठाणी पटापट शरण येऊ लागली. खंडणी उकळून पुढे कूच करत ह्या फौजेचा एक भाग त्रिचनापल्ली पर्यंत पोचला होता. कर्नाटकचा मोगल सुभेदार दाऊदखान घाबरून अरकटच्या किल्ल्यात लपून बसला होता. पण मराठा फौजेनी त्याला शोधून काढले आणि त्याच्या कडून वर्षातून २ वेळा मिळून १२ लाखाची जबर खंडणी वसूल करण्यात आली

No comments:
Post a Comment