पंत सचिवांचा वाडा-
शिरवळ जि. सातारा
शिरवळ येथे सुभानमंगळ नावाचा भुईकोट आहे. १६४६ मध्ये आदिलशाही सरदार मियाँ रहीम महंमद हा सुभेदार होता. छ. शिवाजीमहाराजांनी कोंढाणा किल्ला घेतल्यावर शिरवळचे ठाणे पण जिंकले ते परत फत्तेखानाने आपला मराठा सरदार बाळाजी हैबतराव याच्यामार्फत ताब्यात आणले. या बाळाजीचा काटा काढून पुन्हा सुभानमंगळ किल्ला ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी आपले शूर सैनिक गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे,भिकाजी चोर, कावजी मल्हार यांना पाठवले व बाळाजीला ठार करुन शिरवळचे ठाणे जिंकले. या लढाईचे सुरस वर्णन कवींद्र परमानंद यांनी 'शिवभारत' या काव्यग्रंथातील १३ व्या अध्यायात केले आहे. छ. महाराजांची ही पहिली लढाई! पुढे छ. संभाजीमहाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव पदावर असलेल्या शंकराजी नारायण यांच्या पुढील पिढीत भोर संस्थान निर्माण झाले. या संस्थानातील विभागाची प्रशासकीय कचेरी शिरवळ येथे होती. त्यासाठी भोरकरांनी एक मोठा वाडा येथे बांधला. त्या वाड्याशेजारीच तेथील अधिकाऱ्यांसाठी एक स्वतंत्र वाडाही बांधला.
"धनी नानासाहेबांचे ध्यान | हिऱ्याची खाण | धैर्यवान |
नाही गुमान पैशाचा | नित्य हा नेमधर्माचा | जसा अवतार कर्णाचा
शिरवळचा वाडा नानासाहेब यांच्या कारकिर्दीत झाला असावा. भोरची व्यापारी पेठ त्यांनी सुधारली. त्यांचा कारभार अतिशय दक्ष होता. त्यांच्या ठायी उदारता, कनवाळूपणा हे गुण होते. यानंतर शंकरराव उर्फ रावसाहेब हे पंतसचिव झाले. (१८७१-१९२२) यांच्या मातोश्री अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. भोर गावास त्यांनी अंबाडखिंडीतून पाणी आणले. धर्मशाळा, अन्नछत्र काढले. वाई येथे विठ्ठल मंदिर, श्रीक्षेत्र माहूली येथे राधाशंकर मंदिर बांधले. विश्रामघाट बांधला. रावसाहेबांनी पांडवगड, पवनमावळ, सुधागड तालुक्यांची तपासणी केली. कारभारात सुधारणा केल्या. खर्चाच्या सनदा दिल्या. रयतेस सारासूट दिली. यांच्या कारकिर्दीत prince of wells यांनी संस्थानला भेट दिली. त्या वेळी अपूर्व दिपोत्सव व समारंभ सुरु केला. भाटघर धरणाच्या कामाची तपासणी केली. सन १९०३ मध्ये ९ तोफांच्या सलामीचा मान दिल्ली दरबारात ब्रिटिश सरकारने या अधिपतींना दिला. यानंतर रघुनाथराव पंतसचिव (१९२३-१९४८) गादीवर आले. यांनी लोकप्रतिनिधीत्वाचा कायदा १९२८ करुन संस्थानाच्या कारभारात जनतेचे प्रतिनिधी घेतले. स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या. ब्रिटिश सत्तेशी नाईलाजाने एकनिष्ठ राहावे लागत असले तरी स्वातंत्र्य चळवळीस नकळत लपून-झपून मदतही केली.


No comments:
Post a Comment