विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

राजे फत्तेसिंह भोसले भुईकोट अक्कलकोट जि. सोलापूर

 राजे फत्तेसिंह भोसले भुईकोट

अक्कलकोट जि. सोलापूर

स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील समाधी मंदिरामुळे महाराष्ट्रातील नव्हेच तर कर्नाटक आंध्र येथून भक्तांची नेहमी नित्य वर्दळ असते. याच ठिकाणी इतिहासात लखलखणारा भोसले घराण्याचा प्रचंड भुईकोट इतिहासाची साक्ष देत उभा आहे. इथे जाणारा प्रत्येकजण येथील जुन्या आणि नव्या राजवाड्यात पावले ऊमटवल्याशिवाय राहणार नाही. या कोटाच्या समोर येताच कोटाचे प्रंचंड बुरुज, तट व पायऱ्यांपुढचे प्रवेशद्वार उभे राहते. या बुरुजाचा एकही दगड कोठेही ढळला नाही, फूटला नाही, दुभंगला नाही. घडीव घट्ट बांधणीचे हे पाषाण लक्ष खिळवून ठेवतात. या पाषाणाचे बांधकाम देखील तितक्याच कुशल कामगारांनी केल्याचे लक्षात येते.

कोटाच्या पायऱ्या चढून दरवाजावरील गणेश पट्टीला वंदन करुन या नगारखान्यात प्रवेश होतो. कोटाचा दरवाजा जरी मध्यम स्वरुपाचा असला तरी त्याच्यावर डौलात उभा असलेला नगारखाना जणू ऐरावतावरील अंबारीसारखा ! हा नगारखाना छप्परहीन असला तरी त्यातील नगाऱ्यांचा ध्वनी मात्र कोटात घुमत असल्याचा भास झाल्यावाचून राहत नाही.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. १७०७-०८ दरम्यान कैदेतून मुक्त झाल्यावर परत येताना वाटेवर काही सरदार त्यांना येऊन मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवणी परगण्यातील 'पारद' या गावचा बाबाजी लोखंडे पाटील याने शाहूराजांकडे येण्याचे नाकारले व गढीचा दरवाजा बंद केला. शाहूराजांच्या सैन्याने गढीवर हल्ला चढवला. लोखंडे पाटील मारला गेला. बाबाजी पाटलांची सून अहिल्याबाई हिने आपले मूल शाहूराजांच्या पालखीत टाकले. शाहूराजांनी त्याचे फत्तेसिंह नामकरण करुन त्याचे पालकत्त्व स्विकारले. फत्तेसिंह पुढे मोठा झाला. त्याने काही मोहिमांत (कर्नाटक, जंजिरा) पराक्रम गाजवला. छत्रपती शाहू महाराजांकडून त्यास 'अक्कलकोट' परगणा मिळाला! (दोन लाख पन्नास हजारांचा) जहागीरदार फत्तेसिंह भोसले यांनी राममंदीर बांधले आणि वरील कोटात काही सुधारणा केल्या. त्याच्यानंतर शहाजीराजे यांच्याकडे वारसा आला. त्यांचे पुत्र फत्तेसिंह (दुसरे) नंतर जहागिरीवर आले. त्यांचे बंधू तुळाजी यांच्याशी बखेडा झाल्यावर तुळाजींची स्वतंत्र सोय करण्यात आली. १८१८ ला मराठेशाही संपल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने अक्कलकोट संस्थान निर्माण केले.
कोटाचा विस्तार मोठा असून तो दोन भागात विभागलेला वाटतो. मागील भागात श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला, अक्कलकोट येथील परिसरातील नरसिंहाचे शिल्प आढळते. याशिवाय रतीमदन व नंदी यांचे शिल्प पाहावयास मिळतात.
शहाजी दुसरे गादीवर आले. ते अल्पवयी ठरले. त्यानंतर थोडासा गोंधळ होऊन बोरगावच्या शंकरराव देशमुखाने गढीचा ताबा घेतला. त्या वेळी ब्रिटिश आणि भोसले यांचे संयुक्त सेनेने लढा दिला. त्यात स्पॕरो, कर्नल राॕबर्ट हे लढले. राॕबर्ट मरण पावला.
कॕप्टन जाॕन्सन हे संस्थानचा कारभार काही दिवस पाहत होते. त्यानंतर तिसरे शहाजीराजे सत्तेवर आले. त्यांच्यानंतर त्यांचे दत्तकपुत्र फत्तेसिंह (तिसरे) हे सत्तेवर आले. त्यांचेही अल्पवयात निधन झाले. पुढे ब्रिटिश प्रशासक आणि ताराबाई भोसले हे कारभार करीत होते. या संस्थानाचा राज्यकारभार लोकाभिमुख होता.
(महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे-२)
-फत्तेसिंह भोसले भुईकोट
अक्कलकोट जि. सोलापूर
team - पुढची मोहिम

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...