छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडदळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करात घोडदळाचे दोन विभाग होते. १) पागा - बारगीर २) शिलेदार
पागा किंवा बारगीर म्हणजे सरकारी नोकर असलेला घोडेस्वार. यांना सरकार घोडा व हत्यारे तसेच दारुगोळा पुरवित असे. मात्र याउलट शिलेदाराचा घोडा व हत्यारे त्याच्या स्वतःच्या मालकीची असत. काही काळाकरिता त्याने सरकारी नोकरी पत्करलेली असे, व तेवढ्यापुरता त्याला ठरलेला पगार मिळत असे. तो केव्हाही नोकरी सोडून जाऊ शकत असे. बारगीर हा सरकारचा कायमचा नोकर होता. बारगीर यांचा दर्जा हा शिलेदारांपेक्षा श्रेष्ठ असे. पागेचा अधिकार शिलेदारावर चालत असे.
२५ शिपायांवर (बारगिरांवर) एक मराठा हवालदार, ५ हजारांवर एक जुमलेदार, १० जुमलेदारांवर एक हजारी, अशा पाच हजारींवर एक पंच हजारी, आणि सर्व पंच हजारींवर सरनौबत. अशा चढत्या श्रेणीने घोडदळाची रचना केली होती. सरनौबत हाच सर्व सैन्याचा सेनापती (Commander in Chief) असे म्हणत. हजारीस त्यच्या पथकाच्या लिखाणची व इतर व्यवस्था बघण्याकरिता एक मुजूमदार, एक मराठा कारभारी, एक जमनिस, व कायस्थ प्रभू व इतर मंडळी दिली जात असे. (एम.एन.उदगावकर)
पागेचे महत्त्व विशद करताना आज्ञापत्रकार (रामचंद्र पंत अमात्य) म्हणतो, “ज्यास अश्वदळ, त्याची पृथ्वी प्रजा आहे” सरनोबत, पंचहजारी, हजारी, जुमलेदार, हवालदार हे पागेचे प्रमुख अधिकारी. त्यांच्या हाताखाली मुजूमदार, कारभारी, जमेनिस, हेर पखालजी, नालबंद इत्यादी नोकर असत.
‘बरी भाकरी त्यावरी एक कांदा ।
नसे अन्य काही शिदोरीस बांधा ।।’
असे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकाचे एका आधुनिक कवीने वर्णन केले ते यथार्थ आहे असे अबे कॅरे या पाश्चात्य लेखकाच्या वर्णनावरून सिद्ध होते. या सैन्यासमोर साधेपणाच्या संबंधात स्वतः महाराजांचाच आदर्श होता, असे दिसून येते.
अबे कॅरे याने म्हटले आहे,
“शिवाजीराजाचे आपल्या अधिकाऱ्यांवर प्रेम होते. तो त्यांना भावाप्रमाणे किंवा मित्राप्रमाणे वागवित असे. त्यांच्याशी त्याची वागणूक घरोब्याची असे. त्यांच्या वैयक्तिक गरजांकडे तो लक्ष पुरवित असे. त्यांच्याहून स्वतःसाठी वेगळे असे काहीच घेत नसे. त्याच्या अंगची कर्तबगारी विलक्षण होती. तो नेहमी आपल्या सैन्याच्या पुढे असे सुखासिनता कशी ती त्यास माहीत नव्हती.”
@maratha_riyasat ©
No comments:
Post a Comment