चाळुक्य अर्थात साळुंखे राजाने बांधलेले
औन्ढा येथील नागनाथाचे हेमाडपंथी मंदिर..
----------------------
@
हिंगोली जिल्हयातील औन्ढा नागनाथ या आमर्दक तीर्थाच्या ठिकाणी नागनाथ महादेवाच्या भव्य हेमाडपंथी मंदिराचे निर्माण मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे या राजाने केले आहे. या शैव जैन पंथीय एकत्रित मांडणीतल्या मंदिराचे निर्माण राजा विक्रमादित्य सोळंके (सहावा) या राजाने इ.सनाच्या बाराव्या शतकात केलेले असून, हे मंदिर म्हणजे विक्रमादित्य राजाच्या अप्रतिम स्थापत्य कलेतून साकारलेला एक अद्भुत असा नमुना आहे. या हेमाडपंथी मंदिराचे मोठमोठ्या दगडी शिळांनी केलेल्या मंदिर बांधकामामुळे आणि मंदिराच्या आतील आणि बाहेरील सभोवताली चौफेर बाजूंनी कोरीवकाम केलेल्या हर तर्हेच्या शेकडो, हजारों शिल्पांमुळे मंदिराचे आकर्षण टोकावरचे वाटते.
औन्ढा नागनाथ येथील नागनाथाचे हेमाडपंथी मंदिर त्रिकुठपंथी रचना प्रकारातील शैव जैन पंथीय अशा एकत्रित मांडणी प्रकारातील मंदिर आहे. हे मंदिर निर्माण मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे/सोळंके (सहावा) या राजाने त्यांच्या शेवटच्या कार्यकालात म्हणजे बाराव्या शतकाच्या प्रारंभी निर्मिलेले मंदिर आहे. या मंदिराचे निर्माण चाळुक्य राजांनी त्यांच्या नेहमीच्या स्थापत्य शैलीनुसार केलेले आहे. पश्चिम मुखी असलेल्या नागनाथ मंदिराच्या उंच अधिष्ठित ज्योत्यावरील मांडणीच्या समोर सर्वप्रथम नंदी मंडप, त्यापुढे गणेश आणि इतर देवतांचा मंडप, मंदिराचा बाहेरील प्रवेश मंडप, आतील प्रवेश मंडप, सभामंडप (नवरंगमंडप), दर्शन मंडप गर्भगृह आणि त्याखाली गुप्त गर्भगृह अशा भागांत चाळुक्यांनी मंदिराचे विभाजन केलेले आहे.
औन्ढा नागनाथ येथील नागनाथाचे हेमाडपंथी ज्योतिर्लिंग मंदिर आणि त्या परिसरातील भागात असलेली इतर प्राचिन मंदिरे नेमके कोणत्या राजवंशाच्या स्थापत्य शैलीत तयार झालेली मंदिरे असतील, हे पाहण्याची माझी देखील खूप दिवसांची इच्छा होती. माझा मुख्य व्यवसाय LIC (एजंट) असल्याने आमचे येहळेगाव सोळंके, ता.औन्ढा येथील मोठे बंधू आणि औन्ढा पं.समीतीतील ग्राम विकास अधिकारी गंगाधर सोळंके यांनी खूप दिवसांपासून मंदिर अभ्यास आणि LIC आशा दोन्हीही कामानिमित्ताने बोलावले होते. त्यामुळे अखेर वेळ काढून मी दि.२१ जानेवारी २०१८ रोजी माझा मोर्चा औन्ढा नागनाथ या गावाच्या दिशेने ओळवला. औन्ढा नागनाथ या ऐतिहासिक गांवात पोहोचल्यावर सर्वप्रथम श्री. नागनाथ महादेव मंदिर नजरेखालून घालायचे ठरवून, त्यानुसार मी गावातून मार्ग काढत नागनाथ महादेवाच्या मंदिरात पोहोचलो.
शंकराने दारूका दैत्याचा वध केला म्हणून दारूकावन असे नामाभिधान पावलेल्या आमर्दक अर्थात औन्ढा नागनाथ या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे (सहावा) या राजाने निर्मिलेले हे मंदिर काळ्या कातळाच्या मोठमोठ्या घडीव-जोडीव दगडी शिळांना एकमेकांच्या खाच्यात खाचे अडकवून बनवलेले मंदिर आहे. मंदीरांवरील विविध शिल्पांचे सुंदर रेखीव कोरीवकाम केलेले नागनाथ मंदिर बघतच राहावे असे आहे. हे मंदिर निर्माण चाळुक्यांच्या अफलातून स्थापत्य शैलींचे एक अद्भुत प्रदर्शन असून, नागनाथ मंदिराचे निर्माण चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी स्टार फिश आकार आणि त्रिकुठपंथीय रचनेत केलेले आहे.
मंदिराच्या आतील आणि बाहेरील सभोवार बाजूंनी दगडी कातळ शिळांवरील कोरलेल्या विविध मनमोही शिल्पांवरून नजर फिरवतच राहावे, अशा कैक नेत्रदीपक शिल्पांची चाळुक्यांनी येथे अगदीच रेलचेल करून ठेवली आहे. येथील विविध शिल्पांची असलेली रेलचेल पुरातन वास्तूप्रेमींसाठी अगदीच पर्वणी ठरली आहे. हे मंदिर सद्यस्थितीत तरी औन्ढा गावच्या बस स्थानका समोर आणि नगर पंचायत इमारती शेजारी गावाच्या दक्षिणि बाजूला स्थित असून, चाळुक्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी ऐसपैस जागेची निवड केलेली आहे. मंदिराच्या पाठीमागे पूर्वेकडील भागात चाळुक्यांनी खास त्यांच्या शैलीत पुष्करणी बारवेची निर्मिती केली आहे.
पूर्वीच्या काळी बहुतेक औन्ढा नागनाथ येथे पाणी समस्या असू शकते? कारण चाळुक्यांनी निर्मिलेल्या पुष्करणी बारवेत त्यांनी बारवेचे दोन भाग केलेले आहेत. एका जागी पिण्याचे, तर दुसऱ्या जागी सांडपाणी आणि हात पाय धुता यावेत अशा उद्देशाने त्यांनी या बारवेचे दोन भागात वर्गीकरण केले आहे. भाविकांची सोय म्हणून चाळुक्यांनी दोन भागात निर्मिलेल्या या पुष्करणी बारवेचे पुढील काळात विडंबन होऊन, ती सासू -सुनेची बारव म्हणून प्रसिद्धिस पावली आहे. नागनाथ महादेव मंदिराची मांडणी चाळुक्यांनी त्यांच्या नित्याच्या सप्तस्तरीय रचना पद्धतीत आणि त्यावर तोरण टोप टाकून केली आहे. विक्रमादित्य साळुंखे राजाने मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूला विविध देव-देवतांची शिल्पे कोरून मंदिराला अगदीच मनमोही बनवले आहे.
साळुंखे राजांनी मंदिरावर त्यांचे राजचिन्ह वराह अवतार शिल्प कोरलेले असून मंदिरावर त्यांच्या आराध्य देवी सप्तमातृकांची पट्टी देखील कोरलेली आहे. शिवाय मंदिरावर त्यांनी त्यांचे टोटेम नरसिंह अवतार देखील कोरलेला असून, मंदिरावर त्यांनी त्यांचे गजलक्ष्मी हे देखील एक टोटेम कोरलेले आहे. अजून एका ठिकाणी साळुंखे राजांनी त्यांचे राजचिन्ह घुंगरमाळा घातलेल्या वराह सोबत दोन युवती खेळतानाचे शिल्प कोरलेले पाहावयास मिळते. चाळुक्य हे मल्लवंशीय राजे असल्याने त्यांनी मंदिरावर अनेक ठिकाणी मल्लयुद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. चाळुक्यांचे अजून एक टोटेम (स्थापत्य चिन्ह) कार्तिकेय, डान्सिन्ग गणपती, शरभ, वीरभद्र,
कैलाश उचलणाऱ्या रावणाची फजीती झालेले शिल्प, आणि दुसरीकडे फजीती झालेला रावण हात जोडून महादेवाची माफी मागत असलेले शिल्प, अशी कितीतरी शिल्पे चाळुक्यांनी त्यांच्या खास शैलीत नागनाथ मंदिरावरून कोरलेली दिसून येतात. शिवाय निम्म्याधिक भारतातून बांधलेल्या शेकडो मंदिरात चाळुक्यांनी त्यांच्या खास चाळुक्यीय स्टाईलने कोरलेली कीर्तीमुख शिल्पे, रांगोळी शिल्पे, विविध डिझाइन्स शिल्पे, मातृ शिल्प, मैथुन शिल्पे, प्रणय शिल्पे, ऋषि शिल्प, विश्वामित्र तपश्चर्या भंग शिल्प, तपश्चर्या भंग झाल्यावर खिन्न बसलेले विश्वामित्र शिल्प, स्त्री घोडेस्वार शिल्प, विविध जैन शिल्पे, तीर्थंकर शिल्प, अर्धनारी नटेश्वर शिल्प, उड़ते गंधर्व शिल्प, भारवाहक शिल्पे,
गण हात जोडून उभे असलेले महादेव शिल्प, विष कन्या शिल्प, राधा-कॄष्ण शिल्प, विष्णू -लक्ष्मी शिल्प, गंगा देवी शिल्प, महिषासुरमर्दिनी शिल्प, सीता-राम- लक्ष्मण शिल्प, स्तनपान करणारे मातृशिल्प, शेष शिल्प, शेष शय्येवर निजलेले विष्णू शिल्प, ब्रह्मा -विष्णू -महेश शिल्प, नृसिंह शिल्प, भैरव शिल्प, चामुण्डदेवी शिल्प, वराहीदेवी शिल्प, वैष्णवीदेवी शिल्प, इंद्रायणीदेवी शिल्प, कौमारीदेवी शिल्प, ब्रह्माणीदेवी शिल्प, माहेश्वरीदेवी शिल्प, इत्यादी शिल्पे पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालावे लागतील असेच कोरलेले आहेत. नृत्य करणाऱ्या शंकराचे शिल्प, द्यूतात हरलेली पार्वती नाराज झालेले शिल्प, नाराज झालेल्या पार्वतीची समजूत काढणारे महादेवाचे शिल्प, पार्वती शापाने हाडाचा सापळा झालेले भिरंगि शिल्प, सुंदरी शिल्प बलरामाचे मुष्ठीयुध्द शिल्प,
वाली सुग्रीव द्वंद्व युद्ध शिल्प, वाद्यांच्या गजरातील नर्तन शिल्प, नाग शिल्पे, उड़ते गंधर्व शिल्प, कीर्तीमुख शिल्पे, रांगोळी शिल्पे, हंस शिल्पे, कमळ शिल्पे, कलश शिल्पे, नृत्य शिल्पे, युद्ध शिल्पे, त्रिनेत्र महादेाची विशाल शिल्पे, श्री गणेश व इतर देवतांची शिल्पे, मंदिरावर गोकुळातल्या अर्थाचे सुद्धा चित्रण शिल्प असून, त्यात गाई, गोपिका आणि बासरी वादक कॄष्ण रेखाटलेला दिसत आहे. रामायण, महाभारतातील अनेक युध्द आणि प्रसंग शिल्पे त्यांनी अगदी जशास तशी औन्ढा नागनाथ येथील मंदिरावर देखील ठळकपणे कोरलेली दिसून येतात. याशिवाय इतरही अनेक शिल्पांची चाळुक्यांनी येथे अगदीच रेलचेल केलेली असून, मंदिरात आलेल्या कोणाला देखील खिळवून ठेवतील एवढा जिवंतपना चाळुक्यांनी या शिल्पातून कोरला आहे.
मंदिराची सप्त स्तरीय रचना आणि त्याच्या वरच्या बाजूला पूर्ण मंदीरांवर टाकलेला तोरण शिल्प टोप अप्रतिम वाटतो. मंदिर रचनेतील खालचे तीन जोडीव घडीव दगडी स्तर (थर) मांडल्यावर चाळुक्यांनी त्यावरील चौथ्या दगडी स्तरावर कीर्तीमुख पट्टी कोरली आहे. पाचवा स्तर गज शिल्प पट्टीचा असून सहावा स्तर घोडदळ शिल्प पट्टीचा आहे. सातव्या स्तरावर चाळुक्यांनी पायदळ, युद्ध, प्रणय, मैथुन, वाद्य गजरातील नर्तन, मल्ल युद्धाचे प्रसंग आदी शिल्पे कोरली आहेत. आठवा स्तर अर्ध चक्रे कोरलेल्या शिल्पांचा आहे. त्यावर चाळुक्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने सप्त स्तरीय बांधकाम करून त्यावर तोरण टोप टाकून नेहमीच्या शैलीत त्यावर दगदाचा एक स्तर टाकून समतल श्रेणीत मंदिराचे कामं पूर्ण केले आहे.
दारूका वनांत स्थित असलेल्या अमर्दक तीर्थाच्या या ठिकाणाला औन्ढा नागनाथ हे नाव कसे पडले असेल, यांबाबत सर्वत्र कन्फ्यूजन पहायला मिळाले. दूरदूरवरून आलेल्या भाविक अथवा पर्यटक म्हणून आलेल्या लोकांना मार्गदर्शक (काही मुआबजा घेत) म्हणून भूमिका निभावणारे मंदिरातिल गाईड याबद्दल माहिती देतांना सांगतात, की मंदिराच्या खांबावर मंदिर निर्माण करणाऱ्या राजाने नागाची फणा असलेली शिल्पे उलटी कोरली आहेत. नागाचा फणा उलटा असलेल्या शिल्पांना फारशी भाषेत औन्ढा म्हटले जाते; त्यामुळे या गावाचे नामाभिदान नंतरच्या काळात औन्ढा असे झाले. पण या सांगण्यात दम नसावा असे वाटते. कारण अशी उलटी फणा असलेली नागशिल्पे चाळुक्यांनी सिन्नर, अंजनेरी आणि सातारा भागातील अनेक मंदिरावरून कोरलेली दिसून येतात.
नागनाथ मंदिराच्या उंच जोत्यावर प्रवेश करायचा झाला तर मंदिराच्या बाहेरील दर्शनी साडेपाच दगडी पायऱ्यांना चढून वरती चढून जावे लागते. चाळुक्यांनी नागनाथ मंदिराचे निर्माण अनेक कोनी घडीव मोठमोठ्या दगडी शिळा वापरून या प्रशस्त भक्कम दगडी जोत्यावर केलेले आहे. मात्र मंदिर प्रदक्षिणा मार्ग जमिनीवरूनच ठेवलेला आहे. मंदिराच्या सभामंडपात आणि मंदिराच्या दर्शन मंडप अर्थात अंतरकक्षेतून देवाच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी वेगवेगळे तीन दरवाजे आहेत. त्रिकुटपंथी मंदिराच्या सभागृहाचे तीन आणि गर्भगृहाचा एक अशा चारही दगडी दरवाजांचे निर्माण मात्र चाळुक्यांनी एकसारखेच ठेवले आहे.
मंदिर दरवाजाच्या चौकटिच्या वरती चाळुक्यांनी त्यांच्या स्टाईलने गणेश पट्टी कोरलेली असून, या गणेश पट्टीच्या वरती चाळुक्यांनी अजूनच चार वेगवेगळ्या शिल्प पट्ट्या निर्मिल्या आहेत. ज्यात विविध देवता पट्टी, मैथुन शिल्प पट्टी आणि सर्वात वरती चाळुक्यांनी त्यांच्या आराध्य देवता सप्तमातृका पट्टीतील सात देवी आणि त्यांचे दोन गार्डियन अशा नऊ देवतातांच्या नऊ मंदिरांची प्रतिकात्मक मंदिरपट्टी कोरली आहे. दरवाजाच्या खालच्या उंबऱ्यावर कीर्तीमुख कोरलेले असून, चौकटिच्या खालच्या बाजुला कीर्तीमुखाच्या दोन्ही बाजूंना द्वाररक्षक (रखवालदार पट्टी) कोरलेली आहे. या द्वाररक्षक पट्टिकांवर दोन्ही बाजुला जय विजय, वीरभद्रासह चाळुक्यांनी विशेष अशी लुभावणी नर्तकांची पट्टी देखील कोरलेली आहे.
नागनाथ मंदिराच्या बाहेरील प्रवेश मंडपातून मंदिराचा दगडी दरवाजा पार केल्यावर आपला प्रवेश मंदिराच्या आतील प्रवेश मंडपात होतो. प्रवेश मंडपाच्या समोर नागनाथाचे भव्य सभागृह असून, हे सभागृह चाळुक्यांनी प्रशस्त आणि चक्राकार आकारातील निर्मिले आहे. सभामंडपातील कैलाश मंडप भव्य आणि प्रशस्त असून, त्याखाली चाळुक्यांनी कासव चबूतरा ठेवलेला आहे. सभामंडप वीस रेखीव दगडी खांबावर टेकलेले असून, देवाच्या सभामंडपातील कैलाश मंडपात आकाशमार्गाने चर्चा करत उडतानाचे कोरलेले उड़ते गंधर्व शिल्पे कोनाचेही लक्ष वेधून घेतील असेच आहेत. नागनाथ महादेव मंदिराच्या अशा या प्रशस्त सभामंडपातून आपला प्रवेश देवाच्या दर्शनमंडपात (अंतरंग मंडप) होतो.
देवाचा दर्शनमंडप चार रेखीव दगडी खांबावर उभा केलेला असून, देवाच्या दर्शन मंडपाचे रुपांतर देखील चाळुक्यांनी खास त्यांच्या शैलीने कैलाश मंडपात केलेले आहे. दर्शन मंडपात चाळुक्यांनी त्यांच्या आराध्य देवतांना ठेवता यावे, म्हणून दक्षिणी आणि उत्तरी बाजूला खास त्यांच्या स्थापत्य शैलीनुसार दोन देवड्यांची देखील निर्मिती केली आहे. चाळुक्यांनी त्यांच्या आराध्य देवतांना ठेवता यावे, म्हणून मंदिरात अशा एकूण आठ देवड्यांची निर्मिती केली आहे. दर्शनमंडपाच्या वरच्या कैलाश मंडपाला (घुमट) वरती चाळुक्यांनी काही पौराणिक दृश्य कोरलेली पहावयास मिळतात. देवाच्या दर्शनमंडपातून गर्भगृहात होणारा आपला प्रवेश एका सुंदर रेखीव आणि नक्षीदार अशा दगडी दरवाजातून होंतो.
नागनाथ महादेव मंदिराच्या गर्भगृहाला असलेल्या दरवाजाला चाळुक्यांनी सभामंडपाच्या तिन्हीही दरवाजाप्रमाणेच रेखीव बनवले आहे. मंदिराच्या या दगडी दरवाजातून थोडे वाकूनच आत जावे लागते. गर्भगृहात गेल्यावर सर्वप्रथम आपल्या दॄष्टीस एक शिवलिंग पडते. त्यालाच नागनाथ महादेवाचे शिवलिंग समजून बरेच भाविक नतमस्तक झालेले दिसतात. समोर पुरातन कालीन तोडफोड झालेली आणि एक चांगली श्री विष्णुची मूर्ती आपल्या दॄष्टीस पडते. दोन्हीही मूर्त्यान्चा काळ एकच असला, तरी नविन वाटते ती मूर्ती अलीकडच्या काळात तलावात सापडलेली मूर्ती आहे. या मुर्तीवर चाळुक्यांनी विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. या मुर्त्यांना नतमस्तक होऊन देवाची दर्शन बारी गर्भगृहातील भुयारी मार्गात जाते.
गर्भगृहाखाली नागनाथ महादेवाचे दुसरे भुयारी गर्भगृह असून, त्यात भगवान नागेश्वराची प्राचिन भव्य साळुंखा ठेवलेली आहे. ही साळुंखा चाळुक्यांनी उत्तर दिशेला जलवाहिणी असलेली ठेवलेली आहे. नागनाथ महादेवाचे गर्भगृह चाळुक्यांनी प्रशस्त ठेवलेले असून, सदरिल गर्भगृह देखील त्यांनी त्यांच्या नित्याच्या शैलीनुसार नवरंग मंडपात कन्व्हर्ट केले आहे. नागनाथ महादेव मंदिराच्या गर्भगृहातील मुख्य कैलाश मंडप (गर्भगृहाच्या वरील घुमट) चाळुक्यांनी खूप सुंदर आणि सुरेख पद्धतीने निर्माण केलेला आहे. त्यांनी तो खडकातिल मोठमोठ्या लंबकोनीय दगडी शिळा वापरून बनवला आहे. नागनाथ महादेवाच्या कैलाश मंडपाच्या लंबकोनीय दगडी शिळांना रेखीव बनवण्यात आलेले आहे. हा कैलाश मंडप अतिशय सुंदर आणि मनाला मोहहून ठेवणारा असाच आहे.
प्राचिन काळी औन्ढा नागनाथ परिसरात दारूक दैत्याच्या संचार होता. या उन्मत्त दारूक दैत्याचा वध महादेवांनी केला. दारूक दैत्याच्या नावावरून हा भाग दारूकावन अशा नामाभिदानाने प्रशिद्धिस पावलेला भाग आहे. या वनांत पुढे बाराव्या शतकात महान पराक्रमी मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे या राजाने नागनाथ महादेवाचे सुन्दर आणि भव्य हेमाडपंथी मंदिर बांधून पूर्ण केले. हे मंदिर महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग समजले जाते. याचा संदर्भ "द्वादश्ज्योतिर्लिन्ग्स्तोत्रं, कोटिरुद्रसंहिता" या श्री. शिव महापुराणातील २९ व्या अध्यायातील आठव्या श्लौकात आलेला आहे. या मध्ये "ज्योतिर्लिंग नागेशं दारुकावने” म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांतील नागेश ज्योतिर्लिंग दारूकावनात स्थित आहे, असे म्हटले आहे.
राजा विक्रमादित्य यांनी या मंदिराचे निर्माण खूप वेळ देवून बनविलेल्या मंदिर प्रकारातील आहे. काळ्या कातळातील भल्या मोठाल्या घडीव -जोडीव दगडी शिळांवर कोरीवकाम केलेल्या विविध शिल्पांच्या रेलचेलीने मंदिराचे बांधकाम नजरेस भरेल असेच आहे. चाळुक्यीय स्थापत्य शैलीत तयार झालेले औन्ढा नागनाथ येथील नागनाथ महादेवाचे हेमाडपंथी मंदिर बघतच राहावे अशा अफलातून कारागीरीने साकारलेले मंदिर आहे. नागनाथ महादेव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने येथे नेहमीच भक्तांचा रातबा आसतो. श्रावण महीन्यात तर येथे भक्तांची मोठीच रेलचेल बघायला मिळते. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंनी चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी अनेक छोटेछोटे मंदिर निर्मिले आहेत.
मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात् साळुंखे (सोळंके) सहावा या राजाने त्यांच्या काराकीर्दित पश्चिम बंगाल पासून केरळपर्यंत जेवढी मंदिरे बांधली त्यापैकी नागनाथ महादेवाचे हे हेमाडपंथी ज्योतिर्लिंग मंदिर जास्तीचा वेळ देवून बांधलेल्या प्रकारात मोडत असले, तरी हे मंदिर विक्रमादित्य राजाच्या वयाच्या ८२ व्या वर्षी वार्धक्याने झालेल्या मॄत्यूमुळे अपूर्ण राहिलेले मंदिर असावे असे वाटते. कारण हे मंदिर बांधताना चाळुक्यांनी मंदिरातील आणि बाहेरील फिनिशींगवर विशेष लक्ष दिलेले दिसते. शिवाय मंदिरात आणि बाहेरून त्यांनी असंख्ये शिल्पे कोरलेली आहेत. मात्र तरी सुद्धा मंदिराकडे पाहिल्यावर हे मंदिर अपूर्णावस्थेत राहिलेले मंदिर असावे असे वाटते.
चाळुक्यांनी त्यांच्या नित्याच्या शैलीनुसार नागनाथ महादेवाचे या हेमाडपंथी ज्योतिर्लिंग मंदिराचे छत समतल प्रकारातील ठेवलेले असले, तरी पुढील काळात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर शिखराचे नागर शैलीत निर्माण केले आहे. त्यामुळे औन्ढा नागनाथ येथील नागनाथ महादेवाच्या हेमाडपंथी ज्योतिर्लिंग मंदिराच्या शिखराचे नागर आणि समतल या दोन्हीही शैलीतले कॉन्बिनेशन येथे पहायला मिळते. औन्ढा नागनाथ येथील या मंदिरांना नजरेखालून घातल्यानंतर बघणाऱ्याला या सर्वच मंदिरांचे निर्माण चाळुक्यांच्या अफलातून स्थापत्य शैलींचे एक अद्भुत प्रदर्शनच असल्यागतच वाटते.
जुना नागनाथ -एक रहस्यच !
------------------------------------
औन्ढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरा अगोदर साळुंखे नरेश विक्रमादित्य षष्ठ या राजाने नागनाथ मंदिराचे निर्माण अंजनवाडा या गाव परिसरात करण्यास हाती घेतल्याचे सांगितले जाते. हे ठिकाण अतिशय दुर्गम ठिकाणी असून, येथे जाण्यासाठी औन्ढा येथून हिंगोली रस्त्यावर सहा किलोमीटर जावून सिद्धेश्वर देऊळ फाट्यावरून पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर अंजनवाडा या गावी जावे लागते. या गावातून पायी रस्त्याने दक्षिणेला दोन ते अडीच कि.मी. अंतर चालून गेल्यावर आपण जुन्या नागनाथ मंदिरात पोहोचतो. हा नागनाथ म्हणजे परिसरातील चार दोन शेतकऱ्यांचा देव बनून राहिला आहे. इथे अजूनही पुरातत्त्व विभाग पोहोचला नाही, याबद्दलही विशेष वाटते.
डोंगर पायथ्याला भग्न अवस्थेतील नागनाथ मंदिर आज देखील उन्ह, वारा आणि पावसाला झेलत दिमाखात उभे आहे. या मंदिराचे निर्माण कार्य साळुंखे राजांनी विस्तारितपणे हाती घेतले होते. नंदी मंडप, प्रवेश मंडप, सभामंडप, दर्शन मंडप आणि गर्भगृह अशा रचना प्रकारातील हे मंदिर होते. मंदिर नंदी मंडपासह २२+४=२६ खांबी (त्रिकुटपंथी असेल तर संख्या जास्त असू शकते) रचना प्रकारातील होते, मात्र सध्या मंदिराचे फक्त नऊ दगडी खांब उभे आहेत. मंदिर दगडी शिळांवर चाळुक्य राजांनी विविध शिल्पे कोरून या खांबाची मांडणी केली आहे. मात्र चाळुक्यांनी या मंदिरासाठी वापरलेला दगड काळ्या कातळ प्रकारातील असतानाही ठिसूळ (कडक) प्रकारांत मोडत असल्याने त्यास तडे जाऊन जावून फुटू लागला. दगड फुटण्याचा प्रकार सर्रासपणे वाढल्यामुळे चाळुक्यांनी या मंदिराचे सुरू कामं थांबवले असण्याची शक्यता अधिक वाटते.
कारण चाळुक्यांनी मंदिराची मांडणी करताना फक्त नऊ खांब उभे करून त्यावर ज्या आडव्या शिळा टाकल्या आहेत, त्यातील महत्वाच्या जागेवरील शिळा तडकल्या आहेत. जिथे शिळा तडकल्या त्या जागी साळुंखे राजांनी दुसरे पर्यायी खांब टाकून शिळांचे तडकने थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे साळुंखे राजांनी सदरिल मंदिराचे बांधकाम थांबवल्याचा संभव आहे. मंदिर परिसरात घडीव दगडी शिलांचा आणि शिल्पांचा मोठाच खच पडलेला आहे. मंदिर परिसरात लहान काटेरी झाडे आणि मोठ्याच गवताचा उच्छाद वाढलेला आहे. हे ठिकाण म्हणजे सध्या सर्प आणि नागांचे आनंदवन बनले आहे. श्रावणात येणारे परिसरातील त्रोटक भक्तगण सोडले, तर एरव्हीच्या दिवशी भाविकांनी इकडे कायम पाठ फिरविलेली असल्याचेच लक्षात येते.
अकराव्या, बाराव्या शतकात विस्तीर्ण भागावर दीर्घ काळ आणि स्थिर शासन केलेला एक महान पराक्रमी मराठा चक्रवर्ती राजा म्हणून विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे या राजाची इतिहासाला ओळख आहे. "समस्त भुवनाश्रय, परमभट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर, सत्त्याश्रयकुलतिलक, चालुक्याभरण, सम्राट राजा विक्रमादित्य" अशी बिरूदे लावून या राजाला त्याकाळी ओळखले जायचे. विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे (सहावा) या राजाने पन्नास वर्षाहून अधिक काळ निम्म्याधिक भारतावर स्थिर शासन करताना अनेक इतिहास रचले. या कार्यकाळात त्यांनी मरू (राजस्थान), माळवा, चेर (केरळ), चोळ, कलिंग आणि बंग आदी कित्येक राजांचा पराभव करत त्यांनी चाळुक्य साम्राज्याच्या सीमा दक्षिणेत कन्याकुमारी पासून उत्तरेत बंगालपर्यंत विस्तारलेल्या होत्या.
@........✍
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉094 222 41 339,
👉099 222 41 339,
👉086 05 68 3333,
👉088 05 68 3333.

No comments:
Post a Comment