विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 June 2021

राजेचाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी पालीत खंडोबाचे मंदिर बांधले

 


राजेचाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी पालीत खंडोबाचे मंदिर बांधले

---------
@
सातारा जिल्हयातील पाल या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या खंडेरायांच्या हेमाडपंथी मंदिराचे निर्माण मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे या राजाने केलेले असून
कराड तालुक्यात स्थित असलेल्या पाली येथील खंडोबाच्या हेमाडपंथी मंदिराचे निर्माण राजा विक्रमादित्य साळुंखे याने इ.सनाच्या बाराव्या शतकाचा पूर्वार्धात केलेले आहे. हे मंदिर म्हणजे विक्रमादित्य राजाच्या अप्रतिम स्थापत्य कलेतून साकारलेला एक अद्भुत असा नमुना आहे. या हेमाडपंथी मंदिराच्या मोठमोठ्या दगडी शिळांनी केलेल्या मंदिर बांधकामामुळे आणि मंदिराच्या सभोवताली चौफेर बाजूंनी केलेल्या भव्य तटबंदीमुळे मंदिराचे आकर्षण टोकावरचे वाटते. यावरून या मंदिराचे निर्माण करतांना चाळुक्य अर्थात साळुंखे राजांना पुरेसा अवधी मिळाला असावा असे वाटते.
इस्लामपूर ते सातारा प्रवासा दरम्यान कराडच्या पुढे निघाल्यावर माझे भाग्यच म्हणून की काय, 'श्री क्षेत्र पाल 6 किमी' अशी पाटी पाहून माझी कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. लोकांना रस्ता विचारून मी हायवेवरील पुलाखालून कारची स्टेअरिन्ग पालच्या दिशेने ओळवली आणि सातारा जिल्हयातील या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आकस्मिकपणेच पोहोचलो. चाळुक्य अर्थात साळुंखे कुळातील पूर्वज राजांनी बांधलेल्या खंडेरावांच्या चरणी या कुळातील एक वंशज म्हणून नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले. साळुंखे राजांची पाल येथील श्री खंडोबाच्या हेमाडपंथी मंदिराची निर्माण स्थापत्य कला पाहून कोणीही हरखून जाइल अशीच आहे. या मंदिराच्या स्थापत्य शैलीचे देखणे लोभस रुपडे पाहून, माझी सुद्धा अगदी तशीच गत झाली.
भगवान शिवाची देशात जशी बारा ज्योतिर्लिंगे आहेत, अगदी तशीच मल्हारी मार्तंड खंडेरायांची देखील देशात बारा मूळ शक्तिपीठे आहेत. या शक्ति पीठातील एक पीठ म्हणून पाल येथील खंडेरायांचे तीर्थक्षेत्र मान्यता पावलेले आहे. सातारा जिल्हयातील पाल येथील खंडेरायांच्या मंदिराचे निर्माण राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे (सहावा) या राजाने त्यांच्या शेवटच्या कार्यकालात म्हणजे बाराव्या शतकात पूर्ण केलेले आहे. त्यांनी या मंदिराच्या कामाला चांगलाच वेळ देवून निर्मिलेले असावे, असे वाटते. या मंदिराचे निर्माण चाळुक्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्थापत्य शैलीनुसार केलेले जाणवते. प्रवेश मंडप, सभामंडप (नवरंगमंडप), दर्शन मंडप आणि देवाचे गर्भगृह (अंतराळ) अशा भागांत चाळुक्यांनी मंदिराचे विभाजन केलेले आहे.
पाल या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राजा विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे (सहावा) या राजाने निर्मिलेले हे मंदिर काळ्या कातळाच्या घडीव-जोडीव दगडी शिळांना एकमेकांच्या खाच्यात खाचे अडकवून आणि ते एकमेकांवर मांडून हे मंदिर बनवलेले आहे. मंदीरांवरील विविध रांगोळी शिल्पांचे सुंदर रेखीव कोरीवकाम केलेले खंडेराय मंदिर बघतच राहावे असे आहे. हे मंदिर निर्माण चाळुक्यांच्या अफलातून स्थापत्य शैलींचे एक अद्भुत असेच प्रदर्शन म्हणावे लागेल. या मंदिराचे निर्माण चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी स्टार फिश आकारात केलेले असून, मंदिराच्या बाहेरील सभोवार बाजूंनी एकावर एक मांडलेल्या मोठमोठ्या घडीव दगडी कातळ शिळांवरून नजर फिरवतच राहावे असे हे कामं आहे.
पाल येथील हे मंदिर सद्यस्थितीत तरी पाल गावाच्या ईशान्य बाजूवर स्थित असून, चाळुक्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी ऐसपैस जागेची निवड केलेली आहे. सातारा जिल्हयातील पाल या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले खंडेरायांचे भव्य आणि सुंदर हेमाडपंथी मंदिर म्हणजे चाळुक्यीय वास्तू रचनेच्या खास शैलीतील एक अजोड नमुना मानला जातो. मनाला भुरळ पाडणाऱ्या या देखण्या लुभावण्या मंदिराचे निर्माण विक्रमादित्य राजाने त्यांच्या राजवटीच्या काळात म्हणजेच, अकराव्या, बाराव्या शतकात केलेले आहे. चाळुक्यांनी केलेले हे मंदिर निर्माण खूपच विशालकाय पद्धतीचे असून, सम्पूर्ण मंदिराला चौफेर भव्य तटबंदीने वेढलेले आहे.
खंडेरावांच्या ग्रंथांतून आलेल्या माहितीनुसार पालाई गवळणीमुळे मल्हारी मार्तंड येथे प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. पालाईच्या भक्तिखातर खंडेरावांनी म्हाळसा सोबतचे विवाह कार्य याच ठिकाणी पार पाडले होते. अगदी त्याच जागेला हुडकुन (शोधून) काढून त्या जागेवर पुढे बाराव्या शतकात विक्रमादित्य चाळुक्य अर्थात साळुंखे या राजाने खंडेरावांच्या मंदिराचे खास आपल्या चाळुक्यीयन स्थापत्य शैलीनुसार बांधकाम केलेले आहे. या मंदिराचे निर्माण चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी काळगंगा (अर्वाचीन तारळी) नदीच्या काठावर केलेले असून, भक्तांच्या सोईसाठी नदी काठावर अनेक दगडी घाट देखील बांधलेले आहेत. या खेरीज काळगंगा नदीच्या पात्रात चाळुक्यांनी एकवीस कुंड बांधल्याचेही सांगितले जाते.
मंदिराच्या अग्नैय कोपऱ्यातून काळाच्या ओघात नष्ट झालेल्या तटबंदीला ओलांडल्या नंतर आपला प्रवेश देवाच्या मुख्य प्रवेशद्वारात होतो. मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर आवारात प्रवेश करताच, देवाच्या दीपमाळा जणू भक्तांच्या स्वागतासाठीच उभ्या आहेत की काय, असा भास झाल्यावाचून राहात नाही ! मंदिर आवारात प्रवेश करतानाच समोरच उभ्या असलेल्या तीन दगडी दीपमाळा आपले चटकन लक्ष्य वेधून घेतात. या दीपमाळा पाहता क्षणीच ही चाळुक्यांची स्थापत्य शैलीतील कलाकृती असल्याचे लक्षात येते. मंदिर परिसरात अशा मोठ्या चार आणि लहान तीन अशा सात दीपमाळा आहेत. या सात दीपमाळा जणू काय चालुक्यांच्या आराध्यदेवी असलेल्या सप्तमातृकांची प्रतीके असल्याचाच भास होतो.
मंदिरातील दीपमाळा, नंदी मंदिर, यज्ञमंडप आणि पहुडलेले भव्य कच्छप (कासव) इत्यादीला बघत बघतच आपला देवाच्या मंदिरातील सभामंडपात प्रवेश होतो. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असला, तरी पुरातन वास्तू प्रेमींचा हिरमोड करणारा असाच आहे. कारण म्हणजे, चाळुक्यांनी सभामंडपातील सम्पूर्ण दगडी खाम्बांना त्यांच्या बांधकाम शैलिनुसार जी सुंदर शिल्पे कोरली होती, ती अलीकडील लोकांच्या काही (घोड)चुकांमुळे झाकोळली गेली आहेत. मंदिरातील सम्पूर्ण दगडी खाम्बांना अलीकडच्या काळातील ग्रॅनाइट लावून या लोकांनी त्याची डागडुजी केल्याने, खाम्बावरील कोरलेली सर्व शिल्पे त्याखाली दबली गेली आहेत.
मंदिरात सर्वत्र दगडी खांबांना ग्रॅनाइट लावल्याने कोरलेली शिल्पे दृष्टीस पडत नसल्याने पुरातन वास्तूप्रेमिंची येथे घोर निराशा झाल्या शिवाय राहात नाही. सभामंडपातून देवाच्या गर्भगृहात प्रवेश करताना छोट्या दगडी दरवाजातूनच आत जावे लागते. या दगडी दरवाजाच्या वरती चाळुक्यांनी त्यांच्या स्थापत्य शैलीनूरूप गणेश पट्टी कोरलेली आहे. शिवाय खालच्या उंबऱ्यावर कीर्तिमुख सुद्धा कोरलेले असावे, पण अलीकडच्या काळात या उंबऱ्यावर धातूंचा पत्रा लावल्याने, ते दिसून येत नाही. मात्र उंबऱ्यावर धातु पत्रा लावणारांनी धातूंची पालाई गवळण तयार करून त्याजागी बसवलेली दृष्टीस पड़ते.
या पालाई गवळणीला धातु काम करणारानी सपोर्ट म्हणून पाठीमागे जे आवरण लावले आहे, त्यामुळे ही गवळण म्हणजे गरुडाची तर मूर्ति नसावी, अशी देखील काही इतिहास संशोधक मंडळीमधून शंका उपस्थितीत केली जाऊ शकते. छोट्या दगडी दरवाजातून आत प्रवेश केल्यावर बारा स्वयम्भू खंडेरावांच्या लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र पाल खंडोबाचे लिंग आपल्या द्रुष्टीस पड़ते. तिथेच असलेले खन्डेराय, म्हाळसाई, बानाई यांचे ठेवलेले सुंदर मुखवटे मनाला मोहहून जातात. गर्भगृहात लिंगाच्या (देवाच्या) डाव्या बाजुला दूसरे एक गर्भगृह असून, देवाचा कौल मिळत नसल्याने ते कायम बंद असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या तटबंदीला पाच टेहळणी बुरूज आहेत.
बहुतेक त्यावर जुन्या काळात तोफा वगैरे ठेवण्याची सोय असू शकते. मंदिराच्या पूर्व उत्तर कोपऱ्यात एक मंदिर आहे. ही नेमकी कोणती देवता आहे हे माहीत नसले, तरी तिला देवाच्या भक्तगणात राखनदार असे सम्बोधले जाते. तटबंदीच्या पश्चिम उत्तर कोपऱ्यात देवाच्या म्हसोबाचे मंदिर असून, पूर्व दक्षिणी कोपऱ्यात काळ भैरवनाथाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे, खंडोबा तटबंदीच्या दक्षिणी पश्चिम कोपऱ्यात कोणत्याही देवतेचे मंदिर नसले, तरी नदी पलीकडे बांधलेल्या घाटातला शनि आणि गाव चौकातला दक्षिणमुखी मारोती हेच देवाचे रखवालदार असल्याची श्रद्धा भाविकांत आहे.
खन्डेराय मंदिराच्या आवारामध्ये उत्तरमुखी मारोतीची देखील एक विशालकाय मूर्ति असून, भविकात त्याबद्दल कुतुहल तर आहेच, पण त्याचबरोबरच श्रद्धा देखील आहे. श्री क्षेत्र पाल येथील खंडेरावांच्या मंदिर निर्मितिच्या सर्व खुणा या बाराव्या शतकातील चाळुक्य अर्थात साळुंखे यांच्या स्थापत्य शैलीनुसार आहेत. चाळुक्यांनी या मंदिराचे निर्माण अगदीच प्रशस्त जागेवर केलेले असून, ते त्यांनी त्यांच्या खास बांधकाम शैलीनुसारच या मंदिराचे निर्माण केलेले आहे. मंदिरात गणेश पट्टी, दीपमाळा, कीर्तिमुख, गौमुख, नाग शिल्पे, साळुंखेे घराण्याचे राजचिन्ह असलेले वराह शिल्प, पुष्करणी बारव आदी सर्व बाबी चाळुक्यांनी खास त्यांच्या architecture style (स्थापत्य शैली) नुसार कोरलेल्या अथवा बनवलेल्या आहेत.
नंतरच्या काळात अठराव्या शतकाच्या प्रारंभी मराठा सरदार धनाजी जाधव यांनी देखील या मंदिराची डागडुजी केलेली आहे. मंदिराच्या पश्चिम बाजुला सह्याद्री रान्जीतला जो डोंगर आहे, त्याच्या शिखरावर देखील चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी ज्या इंजाई देवीचे मंदिर बांधलेले आहे, त्या देवीला भाविकांत देवाची बहीण अशी श्रद्धा आहे. याच देवीला भाविकात विंध्यवाशिनी अशा दुसऱ्या नावाने देखील सम्बोधण्यात येतेे. देवाच्या मंदिराच्या पूर्व दिशेला जो डोंगर आहे, त्याला पिराचा डोंगर अशी ओळख असली, तरीही या डोंगरावर देखील महादेवाचे मंदिर होते, अशी भाविकांत आज देखील श्रद्धा आहे.
पिराच्या डोंगरावर दोन गुहा आहेत, तिथे पांढरा चाफा, बेलाची झाडे आणि महादेवाचे लिंग देखील असल्याचे सांगण्यात येते. पाल येथील खंडोबा मंदिराच्या पश्चिमी दिशेला असलेला विंध्यवाशिनी इंजाई देवी डोंगर आणि पूर्व बाजूला असलेला पिराचा डोंगर या दोन्ही डोंगरावर निघण्यासाठी मंदिरातून भुयारी मार्ग असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. भुयारी मार्गाबद्दल ठामपणे सांगणारे भक्तगण येथे अधिक संख्येने दिसले, मात्र तशी जागा कोणी दाखवली नाही, हे सुद्धा विशेष आहे. मात्र देवाच्या गर्भगृहातील डाव्या बाजूला जी बंद असलेली जागा आहे, बहुतेक करून त्याच जागेवरुन हा भुयारी मार्ग असू शकतो अशी शक्यता आहे.
देशात भगवान शिवाची बारा ज्योतिर्लिंगे आहेत. अगदी तशीच मल्हारी मार्तंड खंडेरायांची देखील देशात बारा शक्तिपीठे आहेत. ही बाराही शक्तिपीठे देशातील करोडॊ लोकांची कुळदेवता आहेत. खंडोबाच्या बारा शक्तिपीठांमध्ये १) देवरगुट्टा २) नळदुर्ग ३) माळेगाव ४) मैलार ५) जेजुरी ६) पालपेँबर ७) बिदर ८) .. ९) दावडी निमगाव १०) शेगुड ११) मैलारसिंग १२) पाली सातारा अशी ही भारतातील खंडेरायांची बारा मूळ शक्तिपीठे आहेत. खंडोबा हे भगवान शिवाचेच एक रूप असल्याने आणि शेजारी म्हाळसा अन् बानू विराजमान असल्याने मल्हारी मार्तंड खंडेराय हे उभ्या महाराष्ट्रातील लाखों कुटुबान्चे कूलदेव आहेत.
मंदिराच्या सभोवताली चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी केलेली मज़बूत तटबंदी मंदिराची शोभा वाढवणारी असली, तरी यातील बहुतेक तटबंदी अतिक्रमण धारकांच्या कचाट्यात सापडून जमीनदोस्त झाली आहे. जी काही थोडीबहुत शिल्लक राहिलेली तटबंदी असेल, तिची देखील जमीनदोस्त होण्यासठिचि शेवटची घरघर सुरू आहे. जी काही थोडीबहुत तटबंदी शाबूत आहे, तिला अतिक्रमण धारकांच्या कचाट्यातून सोडवने गरजेचे असल्याचे भाविकांचे मत आहे. मात्र महाराष्ट्रात जर खरोखरच पुरातत्व खाते अस्तित्वात (!) असेलच, तर त्यांनी उर्वरीत तटबंदीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटऊन, या तटबंदीला काळाच्या ओघात नष्ट होण्यापासून वाचवायला हवे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
@....✍
👉सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्वीमा सल्लागार LIC.
👉मेँबर ऑफ..
ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉मेँबर ऑफ..
एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉मोबाईल : -
९४ २२२ ४१ ३३९;
९९ २२२ ४१ ३३९;
८६ ०५ ६८ ३३३३;
८८ ०५ ६८ ३३३३.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...