विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 March 2022

महाराष्ट्राची भूमी प्राचीन काळात 'दक्षिणापथ' मधील 'दंडकारण्य' या नावाने ओळखली जात होती. भाग १

 

महाराष्ट्राची भूमी प्राचीन काळात 'दक्षिणापथ' मधील 'दंडकारण्य' या नावाने ओळखली जात होती.
पोस्त सांभार :सतीश राजगुरे

भाग १
हो. हे खरं आहे की प्राचीन दंडकारण्यामध्ये आजच्या महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशाचा समावेश होता. महाराष्ट्राची भूमी प्राचीन काळात 'दक्षिणापथ' मधील 'दंडकारण्य' या नावाने ओळखली जात होती.
महाराष्ट्राचे रामायणकालीन नाव म्हणजे 'दंडकारण्य' होय. 'दंडकारण्य' हा दक्षिणपथातील एक दाट आणि विस्तीर्ण असा 'अरण्यमय प्रदेश' होता. हे अरण्य विंध्य पर्वतापासून कृष्णेच्या तिरापर्यंत पसरले होते.
महाराष्ट्राच्या महान भूमीचा इतिहास पडताळून पाहताना लक्षात येतं की, महाराष्ट्राचा इतिहास जवळपास चारेक हजार वर्षांचा आहे. रामायणात ‘दंडकारण्य’ या नावाने उल्लेख असलेली महाराष्ट्राची भूमी नंतरही बराच मोठा काळ ‘महाकांतार’ म्हणजे अनेक घनदाट वनांचा प्रदेश म्हणून ओळखली जात असे.
'मत्स्य व मार्कंडेय पुराण' महाराष्ट्राबद्दल खालील माहिती देते-
सह्याद्रीच्या उत्तर भागात जिथे 'गोदावरी' नदी आहे व 'गोवर्धन' नावाचे नगर आहे, तेथे संपूर्ण पृथ्वीतलावरील अतिशय सुंदर असा प्रदेश आहे. त्याठिकाणी दिव्य वनस्पतींनी युक्त असे सुंदर उद्यान राम व सीता यांच्यासाठी भारद्वाज ऋषींनी निर्माण केले आहे.
रामायणात देखील दंडकारण्याची कितीतरी वर्णने आढळतात. अत्रि ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील घनदाट जंगलात काही काळ आश्रय घेतला होता. हे वन म्हणजे दंडकारण्यच होते. या प्रदेशातील नद्या, सरोवरे, डोंगर, गुहा याठिकाणी ठायी ठायी श्रीरामांच्या वास्तव्याचे पुरावे सापडतात.
दंडकारण्यात श्रीरामांनी वनवासातील बराच काळ व्यतीत केला. चौदापैकी १० वर्षे ते या प्रदेशात वास्तव्यास होते. राम, सीता व लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासातील बहुतांश काळ पूर्वेला बस्तर व पश्चिमेस नाशिकपर्यंत पसरलेल्या दंडकारण्यात घालवला, असे म्हटले जाते.
येथील अरण्यात अगस्ती व इतर अनेक ऋषींचे आश्रम होते. राक्षसांचाही येथे संचार असे. ते ऋषींना उपद्रव करत असत. याच अरण्यात लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक-कान कापले. राम-लक्ष्मणाने चौदा हजार राक्षसांचा संहार केला. हे अरण्य गोदावरीच्या मुखापर्यंत पसरले होते, असे महाभारतात देखील म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...