महाराष्ट्राची भूमी प्राचीन काळात 'दक्षिणापथ' मधील 'दंडकारण्य' या नावाने ओळखली जात होती.
पोस्त सांभार :सतीश राजगुरे
वाल्मिकी
रामायणानुसार इक्ष्वाकू कुळातील 'दंडक' नावाचा राजा दक्षिणापथात राज्य
करीत होता. त्याच्या नावावरूनच या प्रदेशाला 'दंडकारण्य’ हे नाव पडले, असं
म्हटलं जातं.
'दंडकारण्य' शब्दाची व्युत्पत्ती काहीही असली तरी महाराष्ट्राचा व त्याचा संबंध आजही इतका दृढ आहे की कोणत्याही वैदिक कर्माचा संकल्प सांगताना आपण राहतो, त्या प्रदेशाचा उल्लेख 'दंडकारण्य’ असाच केला जातो.मध्ययुगीन दानपत्रांमधून दान दिलेल्या भूमीच्या वर्णनात 'दंडकारण्या'चा उल्लेख अनेकदा येतो. उदा. डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या “शोधमुद्रा’ (खंड १) मध्ये प्रसिद्ध झालेल्या वसमतजवळील रांजणा येथील नृसिंह मंदिरातील शके ११३९ मधील आमणदेवाचा शिलालेख! या लेखातील स्थलाचा उल्लेख “भारत वर्षे जंबुद्वीपे दंडकारण्ये’ असा झाला आहे.
◆ दंडकाचे राज्य विंध्य आणि शैवल पर्वताच्या मध्ये असल्याचे रामायणाच्या उत्तर कांडातील एका श्लोकात म्हटले आहे.
◆
महाराष्ट्रातील 'विदर्भ' हा दक्षिणापथ (नर्मदेच्या दक्षिणेकडील) व
उत्तरापथ (नर्मदेच्या उत्तरेकडील) या दोन भूभागांच्यामधील दुवा असणारा
अतिशय प्राचीन प्रदेश होता. या प्रदेशात पूर्वी अतिशय घनदाट अरण्ये होती.
म्हणून या जंगलाला 'दंडकारण्य' म्हणून संबोधले गेले असल्याचे अनेक उल्लेख
पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतात.
◆
महाराष्ट्रातील 'वाशीम' शहरास प्राचीन काळी 'वत्सगुल्म' या नावाने
संबोधले जात असे. 'वत्सगुल्म' नामक प्राचीन प्रदेशाच्या भौगोलिक स्थितीचे
वर्णन संस्कृत वाङ्मयात खालीलप्रमाणे आढळते.
गोदावरीस्य उत्तरेतीरे दंडकारण्य: ।सह्यद्रि खंड: दंडकारण्यस्थितम्सह्यवत्सगुल्मक्षेत्रं महत् ।
◆
एफ.ई. पार्जिटर यांच्या मते 'दंडकारण्य' उत्तरेला बुंदेलखंडापासून
दक्षिणेला गोदावरीपर्यंत पसरलेल्या मध्य भारतातील अरण्यमय प्रदेशास म्हटले
जात होते. परंतु जसजसे आर्यांच्या वसाहती वाढू लागल्या व जंगलाची कटाई होऊ
लागली, तसतसे 'दंडकारण्य' संकुचित होऊ लागले आणि शेवटी तापी नदीच्या
दक्षिणेस गोदावरीच्या उगमापर्यंत दंडकारण्य सिमीत झाले!
◆ लेखक वा.कृ.भावे यांनी 'मुसलमान पूर्व महाराष्ट्र' या पुस्तकात महाराष्ट्राला 'दंडकारण्य' व 'दक्षिणापथ' या नावाने संबोधले आहे.
No comments:
Post a Comment