विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

★★★ शिवरायरुपी शाहू ★★★

 


★★★ शिवरायरुपी शाहू ★★★
======================
शिवरायांनी मराठ्यांचे राज्य उभे केले ज्याला हिंदवी स्वराज्य असे म्हणले गेले. शिवरायांनी हे राज्य कशाच्या जोरावर उभे केले? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना शाहू महाराज सूद्धा डोळ्यासमोर येतील, अर्थात त्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे जे गुण होते त्यामध्ये “प्रशासन व्यवस्था” आणि ”माणसांची योग्य निवडणूक” हे दोन गुण मला जास्त आवडतात. राजकारण, अर्थकारण, चतुराई, धूर्तपणा अशा अनेक अंगानी शिवराय पहिले जातात. तर अशा अनेक प्रभावी गुणवत्तेच्या जोरावर शिवरायांनी हे स्वराज्य उभे केले. आणि शिवराय हे संपूर्ण राष्ट्रनिष्ट होते कारण त्यांना स्वतःच्या स्वार्थापेक्षा राष्ट्रनिर्मिती महत्वाची होती.
यानंतर संभाजी महाराजांनी ९ वर्षे सतत झुंज देऊन हेच राज्य पुढे चालवले पण त्यांना जास्त वेळ राज्य कारभार करण्याची संधी या नियतीने दिली नाही.
रायगड पडला, नऊ वर्षांचे शाहू आणि एकोणवीस वर्षांचे राजाराम महाराज आणि येसूबाई, अर्थात या राज्याचे भविष्य यांच्यावर आभाळ कोसळले. जर औरंगजेबाच्या तावडीत सापडलो तर काय होईल याची कल्पना येसूबाई साहेबांना होतीच आणि औरंगजेबाच्या हातात संपूर्ण कुटुंब सापडले तर संपूर्ण नाश होणार याची जाणीव त्यांना होती आणि त्यांनी राजाराम महाराजांनी गड सोडावा हा निर्णय घेतला. औरंगजेबाला एकाच वेळी संपूर्ण भोसले परिवाराला पकडून मोहीम फत्ते करायची होती. पण येसूबाईसाहेबांच्या या निर्णयामुळे औरंगजेबाला सैन्य विभागायला लागले आणि लाखभर सैन्य जिंजीच्या दिशेला पाठवावे लागले. याचा परिणाम म्हणजे येसूबाईसाहेबांनी सहा महिन्यात आटोपणारी मोहीम पुढे २०-२५ वर्षे लांबवत ठेवली.
ज्या स्त्रीने शिवाजी महाराजांचं राजकीय धोरण आणि मुत्त्सदीपना व संभाजी महाराजांचा पराक्रम पहिला होता त्या स्त्रीला अशा नाजूक क्षणी कसे निर्णय घ्यायचे हे माहित असणे स्वभाविक आहे. आणि कैदेत असताना हीच शिकवण त्यांनी शाहूंना दिली. शिवरायांचे हरएक गुण हे शाहू महाराजांमध्ये दिसतात.
========================================
■ अष्टप्रधान मंडळ:
जसे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते तसेच शाहू महाराजांचे होते. माळव्यातुन निघाल्यावर अवघ्या आठ महिन्यात शाहूंनी सातारा ताब्यात घेतले , स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. आणि लगेच अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली.
सेनापती : धनाजीराव जाधव
प्रधान: बहिरोपंत पिंगळे
अमात्य: बाबुराव
सुरनिस: नारो शंकर
मंत्री: नारो राम शेणवई
सुमंत: आनंदराव
न्यायाधीश: होणाजीपंत
पंडितराव: मुग्दलभट
राज्याभिषेकावेळच्या नेमणूकी तात्पुरत्या होत्या. काळानुसार नेमणुका होत गेल्या. पुढे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद मिळाले व इतर पदांच्या नेमणुकाही कायम झाल्या.
■ राज्ययंत्रणा:
शिवरायांप्रमाणेच शाहू महाराज आपल्या अधिकार क्षेत्रात एवढी जबर ठेवली होती की, ते कुणाचाही मुलाहिजा ठेवीत नसत. त्यांचा शब्द अखेरचा असे. आपल्या शब्दाबाहेर जाणाऱ्यांची ते गय करीत नसत. याच भावनेतून पुरंदऱ्यांनी वेळोवेळी पत्र पाठवून महाराजांशी संपर्क साधित जावा अशी सक्त ताकीत बाजीरावांना दिली होती. ही कसली दौर्बल्याची उर्मी नव्हती. ही होती शिवरायांच्या प्रशाषण व्यवस्थेची परंपरा. शाहू महाराजांच्या याच करारी स्वभावामुळे कोणत्याही एका सरदाराला आणि पेशव्यांना आपली मनमानी करता आली नाही.
राज्याची यंत्रांना बसवताना स्नेह-सलोखा राखून माणसांची मर्जी राखणे हे अतिशय महत्वाच असते. किल्ले बांधण्या आगोदर माणसे बांधावी लागतात आणि किल्ले जिंकण्या आगोदर माणसे जिंकणे गरजेचे असते. जशी शिवरायांनी बारा मावळात स्नेह-सलोखा ठेवून नव्या दमाची माणसे जमा केली तसेच शाहू महाराजांनी नव्या दमाची व विचारांची माणसे गोळा केली. जी जुनी माणसे बाजूला पडली होती त्यांना अनुकूल करून मानाची पदे दिली. विश्वास टाकण्याजोगे जे होते त्यांच्यावर विश्वास टाकला. दारूबाजांना दूर ठेवले. योग्यतेप्रमाणे पदेे देऊन शिपाईगिरीने कामाला ठेवले. उत्तरेत सेना पाठवून त्याचा बंदोबस्त करणे व खंडणीचा अंमल चढवून त्याला आपल्या सेवकांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी आपल्या अधिपत्याखाली फौजा पाठवून केला. खंडणी, पैका आणून आज्ञेत चालावे, अशी पेशवे व इतर सरदारांना जबर बसवली.
शिवाजी महाराजांनी चौथ व सरदेशमुखी कर वसुल करणे चालु केले, त्याबदल्यात तेथील जनतेचे परशत्रुपासुन सरंक्षण करत. हाच शिरस्ता छत्रपती शाहु महाराजांनी चालु केला आणी ते चौथ व सरदेशमुखी कुलबाबे अधिकाराने (वंशपरंपरागत अधिकार) वसुल करण्यास सुरुवातीपासुन चालु केले
■ स्वभाव:
जसे शिवराय शांत आणि वौचारिक स्वभावाचे होते तसेच शाहू होते, कारण शांत आणि वैचारिक मनुष्यचं समर्थपणे संकटांचा मुकाबला करू शकतो. राज्य चालवत असताना कधी-कधी माघार घ्यावी लागते. शिवरायांनीसूद्धा अनेक ठिकाणी माघार घेतली आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणाचे महत्व लक्षात घेता शाहू महाराज आपल्या विचारांशी तडजोड करून माघार घेत असतं. परंतु शब्दांचा अव्हेर त्यांना कधी खपला नाही. शिवरायांनी केलेला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे पारंपारिक पद्धतीने युद्ध पद्धती महाराजांनी बंद केली. दीर्घ काळ चालणाऱ्या लढाया, तह, उलाढाली, उगाचच वेढा देवून बसणं यात ना कधी शिवराय आग्रही होते ना कधी शाहू महाराज आग्रही होते. एक नेता कधीही शांत आणि स्वस्त बसत नाही. बंदुकी ओतण्याबद्दल ध्यासही महाराजांना लागलेले दिसतो, त्याचा तगादा ते बाजीराव व चीमाजीकडे लावताना आढळतात. “पावसाळा आला आहे तेव्हा तोफेचे काय झाले आहे ?” असेही पत्र साताऱ्याहून बाजीरावांना रवाना होते.
राज्यपद उपभोगीत असताना शाहू महाराज लौकिक व्यवहार आणि शिष्टाचार नियमित पाळत. बाजीरावांना ते तिळगुळ पाठवतात त्याचप्रमाणे चिमाजी अप्पाचा मुलगा सदाशिवराव यांच्या मुंजीच्या वेळी आशीर्वाद पाठवण्यास ते चुकत नाहीत.
१७१८ मध्ये अहमदनगरच्या दर्ग्यास देणगी दिली होती, ते हिंदू असूनही इतर धर्मांच्या श्रद्धास्थानास ते मदत करीत असत.
छत्रपती शाहू महाराजांचे शनिवारवाड्याच्या कोटास मनाई केल्याचे पत्र आहे, यावरून त्यांची दूरदृष्टी, समान राजनीती धोरण दिसून येते व कोणताही सरदार, अधिकारी बलीष्ट होऊन त्रासदायक होवू नये म्हणून शाहू महाराज किती जागरूक असत यातून त्यांचे कर्तुत्व दिसून येते.
शिवरायांप्रमाणे शाहू महाराज सूद्धा लोकसंग्रहकर्ते राजे होते शिवरायांप्रमाणे शाहूंनी राष्ट्रात हजारो कर्तबगार माणसे निर्माण केली व त्यांचा राष्ट्रकार्यास व प्रशासनास योग्य ठिकाणी वापर केला. शिवरायांप्रमाणे शाहू सूद्धा उत्तम “मनुष्य पारखी” होते. त्यांच्या या गुणामुळेच हजारो कर्तबगार माणसे मराठा राज्यास मिळाली व मराठा राज्याचे रुपांतर मराठा साम्रज्यात करून त्याचे आयुष्यमान वाढवले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
“राज्य चालवायचे असेल तर एका दिशेची आवश्यकता असते, आणि शाहू महाराजांची दिशा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते जी दाखवली महाराणी येसूबाईसाहेब यांनी”.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
हेरवाडकर म्हणतात, शिवाजी महाराज यांनी “पुनः शिव नामे करुन (राजा) जन्म घेऊन उत्तर दिग्विजय राहिला तो होईल” !!!
साभार:- प्रशांत लवटे पाटील

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...