नशीबाचे खेळ शाहू छत्रपती प्रमाणे दुसऱ्या कोणी कधी पाहिले नाहीत.
पहिल्या 25 वर्षातील त्यांच्या यातना जगजाहीर आहेत.
त्या संकटसमयी ते कधी डगमगले नाहीत.
धैर्य धरून त्यांनी भावी उन्नतीचा मार्ग स्वतः च्या बुद्धी प्रभावाने निर्माण केला.
पुढील भाग्य काळात उन्माद व उपभोग टाकून अर्ध्या शतकापर्यंत स्वराष्ट्रधुरा त्यांनी सांभाळली.
स्वकीयां प्रमाणे परप्रांतीय लोक देखिल त्यांची आद्न्या झेलू लागले.
शत्रूंना त्यांच्या नावाचा दरारा वाटू लागला.
कायम कोणत्या ना कोणत्या तरी नवीन विजयाची बातमी येऊन त्यांचे अंत:करण आनंदाने खुलून जात होते.
आपल्या दिर्घ कारकिर्दीत त्यांनी स्वकीय परकीयांचा परामर्श उदार अंत:करणाने .
प्रत्येकाच्या कामगिरीचा मोबदला देऊन जनतेचे सुख तेच आपले जीवितसुख मानले.
सदैव कारभारात मग्न , स्वहस्ताने असंख्य पत्रे लिहिणारा , राज्याचा वाढता व्याप सांभाळणारा , लोकांच्या सुख दुःखात समरस होणारा असा राजकर्ता सामान्यत दुर्मिळच होय . त्यांच्या प्रचंड व्यापाची कल्पना तत्कालीन कागदात स्पष्ट दिसते . तंटे , भांडणे , मारामार्या , चोरी , दरोडे , खून , अपघात इत्यादि प्रकार तर त्यांना उलगडावे लागतच. शिकार हा त्यांचा आवडीचा छंद . त्या शिवाय खेळ , बिदाग्या , मेजवान्या , दरबार , सरदारांचे रूसवे , समजुती व पाठवण्या , विवाह समारंभ , बाया पुरूषांचे सत्कार , परराज्यातील वकिलांच्या व पाहुण्यांच्या भेटी व जबाब , आप्त स्वकीयांचे जन्म मृत्यु , जय पराजयाची वर्तमाने अशी कितीतरी प्रकारचे प्रकरणे रोजच्या रोज त्यांना विल्हेवाट लावावी लागत . त्याची कल्पना त्या वेळच्या पत्रव्यवहारात आढळते . सरदारांना पैसा व फौजा पुरवणे , त्यांचे अंतर्गत द्वेष मिटवणे , कर्जे काढणे व ती वारणे असले व्यवहारही रोजच्या रोज शाहू महाराजांना पहावे लागत . व्याप व कामे दिवसेंदिवस वाढत गेली . ज्याला जे काम सांगावे ते त्याने फत्ते करुन यावे असा प्रत्यय नोकरवर्गाकडून येत गेल्याने शाहू महाराजांच्या योजकतेची चहूकडे वाखाणणी होऊन हा राजा पुण्यवान आहे अशी भावना उत्पन्न झाली .
शाहू महाराजांचा स्मरणीय गुण परहितासाठी झटणे हा होय . लाखांनी मोजण्या सारखे पुष्कळ सरदार पदरी बाळगणारा हा राजा , घासभर अन्न व पोटभर पाणी एवढ्यातच त्यांनी स्वतः चे समाधान मानले . पेशव्यांप्रमाणे इतर कुटुंबाना त्यांनी पुढे आणले . त्यांच्या बुद्धीत जातीभेद , धर्मभेद वगैरे संकुचीत भावना बिलकूल नव्हती . त्यांची बुद्धी निर्मळ जला प्रमाणे निष्पाप होती . समता व बंधुता ही आजकालची उच्च तत्वे शाहू महाराजांच्या इतकी दुसऱ्या कोणी पुर्वी कारभारात पाळलेली आढळणार नाहीत . म्हणुनच पुण्यश्लोक , अजातशत्रु अशा उपाध्यांनी त्यांचे वर्णन केले जाते .
शाहू महाराजां सारखा उदार , धोरणी पर दुःखाने विव्हळणारा राज्यकर्ता मराठा राज्यास लाभला म्हणुनच राज्याची वृद्धी होऊन आजचा अभिमानास्पद इतिहास बनला असे दिसून येते . अशा ऐतिहासिक व्यक्तीचे स्वभावचित्र व कर्तबगारी सर्व जगापुढे यथायोग्य मांडले गेले पाहिजे . बापाचा क्रुर मृत्यु , बादशहाची 17 वर्षे कैद , त्याने चालवलेले प्रचंड युध्द , त्यात देशाची उडालेली भयंकर दैना आणि खुद्द शाहू महाराजांच्या वर आलेले विविध संकट प्रसंग , हे जे जीवनाचे अनुभव फारच थोड्यांच्या वाट्यास येऊ शकतात . त्यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यात निराळीच कलाटणी दिली . राज्यपद प्राप्त होताच भूतदया हे त्यांचे वर्तनसुत्र बनले . आणि अंतसमयी कृतार्थतेचा अपरमित आनंद त्यांना लाभला . मराठा राज्याचे ध्येय व ते साधण्याचे मार्ग शाहू महाराजांनीच आपल्या दिर्घ कारकिर्दीत ठरविले . त्यांची छाप शेवटी पर्यंत देशावर बसली . हे ध्येय त्यांनी स्वयंस्फुर्तीने व अंत:करण प्रवृत्तीने ठरवून राष्ट्रास सौजन्याचा धडा घालुन दिला . विशिष्ट धर्मबंधनांनी त्यांच्या भावना बनलेल्या नसून त्यांची वृत्ती सर्व धर्मांना समान आदर दाखविण्याकडे होती . शाहू महाराजांच्या अहिंसा वृत्तीची उदाहरणे अनेक आहेत . सुड व प्रतिकार या भावना शाहू महाराजांनी कशा दाबुन टाकल्या याचीही उदाहरणे त्यांच्या वागणुकीत भरपूर व्यक्त झाली आहेत . म्हणूनच राष्ट्रपिता ही पदवी शाहू महाराजांना कोणी दिली तरी ती योग्यच ठरेल .
500 वर्षे ही भारत भुमी हताश होऊन त्राता म्हणून कोणी उरला नव्हता , ही आपत्ती निवारण करण्याचे कार्य प्रथम शिवाजी महाराजांनी सुरू केले त्याची सांगता शाहू महाराजांनी केली . महाराष्ट्राला पुन्हा उर्जित काळ उद्भवला .
भीमथडीच्या तट्टांनी पंचनद्यावर व अटकेपार जलपान करुन तहान भागवली . हा पन्नास पाऊनशे वर्षाचा खेळ इतिहासात आज गाजतो आहे त्याचे श्रेय छत्रपती शाहू महाराजांना आहे .
संदर्भ - मराठी रियासत - सरदेसाई
औरंगजेब - यदुनाथ सरकार
मंगळवेढा ब्रम्हपुरी चा इतिहास - गोपाळराव देशमुख
संकलन :- रवि पार्वती शिवाजी मोरे
No comments:
Post a Comment