पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध
18 वं शतक. छ. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं साताऱ्यात तर कोल्हापूरमध्ये ताराराणी यांचं राज्य होतं. याच शतकात पेशव्यांचा उदय, पानिपतचं युद्ध, निजामाविरुद्ध लढाया, दिल्ली, अटकेपर्यंत स्वाऱ्या झाल्या.
बहुतांश कामकाजासाठी पुण्याला महत्त्व येत गेलं आणि एखाद्या राजधानीसारखं महत्त्व या शहराला प्राप्त झालं. वेगवेगळ्या लोकांचा, विविध जाती-धर्मातील लोकांचा या काळात पुण्यात वावर आणि वस्ती वाढली. व्यापारी आले लोकसंख्याही वाढली.
पण पुण्याच्या पेशव्यांचा आणि पोर्तुगीज धर्मगुरूंचा संबंध कसा आला याची कहाणी एकदम रंजक आहे. तसं पाहायला गेलं तर पेशव्यांचा सर्व धर्मिय लोकांचा आणि त्या धर्मातील देवस्थानांचा संबंध आलेला दिसून येतो.
सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये पोर्तुगीजांनी भारतात कोचीनमध्ये आपले पाय घट्ट रोवले, मग त्या पाठोपाठ ते गोव्यात आले. त्याच्यानंतर वसई, दमण, मुंबई असे एकेक भाग त्यांनी आधी व्यापार म्हणून मग नंतर प्रशासन म्हणून काबिज केले.
सोळाव्या शतकातच वसईमध्ये, गोव्यात धर्मांतर होण्यास सुरुवात झाली होती. व्यापारासाठी पोर्तुगीजांनी वेगवेगळ्या राजवटी, संस्थानं आणि शहरांशी संपर्क ठेवला होता. त्यामुळे या शहरांशी त्यांचा संपर्क येईच आणि पाठोपाठ ख्रिश्चन धर्मही तेथे जाई.
पुणे शहरात सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, पंचहौद चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट इग्नेशिय चर्चसारखी जुनी चर्च आहेत.
पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध आलेला दिसून येतो. सैनिकी, व्यापारी आणि इतर राजकीय संबंध दोघांत असल्याचे दिसते. एकमेकांचे वकील परस्परांकडे जाणं, पत्रव्यवहार तसेच एकमेकांसदर्भातील घडामोडींवर दोघांचीही बारीक नजर असल्याचं दिसतं.
पेशवाईतील महत्त्वाचा आणि मोठा काळ नाना फडणवीसांद्वारे कारभार चालवला गेला. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांच्याशी असलेल्या संबंधांत त्यांचा मोठा वाटा होता.
डॉम मिंगेल दी नोरोन्हा हे पोर्तुगीज अधिकारी पेशव्यांच्या सैन्यात काम करत होते. गोवा आणि पोर्तुगीज प्रांतातील सैनिक या सैन्यात होते असं सांगितलं जातं.
या ख्रिस्ती सैनिकांच्या धार्मिक गरजांसाठी फादर विन्सेंट जोआकिम मेनेझिस यांची नेमणूक करण्यात आली होती.
नोरोन्हा यांनी आपल्या ख्रिस्तीबांधवांना धार्मिक कार्यासाठी आणि प्रार्थनेसाठी चर्चची गरज असल्याची मागणी केली. त्यानुसार तेव्हा कारभार सांभाळणाऱ्या सवाई माधवरावांनी नाना पेठेतील एक भूखंड या चर्चसाठी दिला.
हे चर्च नाना पेठेत आहे. ही पेठ नाना फडणवीसांनी विकसित केली होती. तिचं मूळ नाव हनुमंत पेठ असं होतं.
'पेशवेकालीन पुणे' या पुस्तकाचे लेखक अ. रा कुलकर्णी लिहितात, ‘1789 च्या सुमारास फिरंगोजी खाडे याच्याकडे या पेठेचे शेटेपण होते. या पेठेत प्रामुख्याने ठोक व्यापाऱ्यांची घरं होती, कंपनी सरकारच्या सुरुवातीच्या काळात या पेठेची वस्ती काहीशी घटली. 1819 साली या पेठेत 2742 लोक राहात होते, पण पुढच्याच वर्षी 1820मध्ये ही संख्या हजाराने कमी झाली.
कुणबी, ब्राह्मण आणि चांभार समाज यांची वस्ती येथे अधिक होती. या पेठेतील देवळांची संख्या 11 होती. मुसलमानांची घोडेपीर नावाची मशीद नथुखान या नाना फडणिसाच्या विश्वासू सेवकाने बांधली होती. नानाच्या स्मरणार्थ या पेठेतून एक ताबूतही निघत असे.’



No comments:
Post a Comment