विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ३३

 संताजी घोरपडे : भाग - ३३

धनाजी जाधवांना मिळालेले सेनापतीपद परत करायला ते तयार झाले तसे विठ्ठल निळकंठांनी संताजीला साताराला बोलावले. संताजी धनाजी समोरासमोर आले. त्यांच्यात आता प्रेम, आदर नव्हता. होता फक्त द्वेष आणि सूड. प्रसंग बाका होता. मुत्सद्दीत मुरलेले विठ्ठल निळकंठ व परशुराम त्र्यंबक यांनी बोलण्याच्या ओघात अशी काही कलाटणी दिली की, संताजी जागच्याजागी गोठले. म्हणाले, "माझ्या निष्ठा फक्त छत्रपतींच्या गादीशी आहेत.''

"संताजी, झालं गेलं विसरून जा. जिंजी दरबारात जे घडले त्याबद्दल महाराजांनाही दुःख आहे. हिंमत खान सतत तुमच्या पाठीला गळू लागल्यासारखा चिकटला म्हणून त्यांनाही चिंता आहे. महाराजांनी तुमचं सेनापतीपद तुम्हाला बहाल केलं आहे."

'पण ज्यांच्याकडे आहे, त्यांची अनुमती.....?"

आतापर्यंत चूप बसलेले धनाजी म्हणाले, "छत्रपतींच्या आदेशाने स्वखुशीने द्यायला तयार आहे. पण शाश्वती काय तुमच्या छत्रपतीच्या गादीशी असलेल्या निष्ठेची!"

निळकंठ पुढे म्हणाले, "मी छत्रपतींचा आदेश घेऊन इथवर आलो ते फक्त सेनापती ₹पद बहाल करायला नव्हे तर, इथून पुढे संताजी धनाजी एका झाडाच्या दोन फांद्या आहेत यावर शंका नको, एवढी तुमच्यात एकी येऊ द्यात. यासाठी तुम्ही दोघेही आपापले पूर्वग्रह बाजूला सारायला हवेत."

परशुराम त्रिंबक म्हणाले, 'मोगलांचा पूर्ण बिमोड होऊन स्वराज्याचे सुराज्य होईपर्यंत तुमच्या दोघात बिलकुल बिघाड होता कामा नये. या मोडकळीस आलेल्या मराठेशाहीचे तुम्ही दोघे आधारस्तंभ आहात. भगव्या निशाणाची जाण ठेवा. अहंकाराला मुठमाती द्या. सध्याच्या मराठेशाहीच्या पडत्या काळात तुमच्या दोघात एकजूट राहिली तर पुढील पिढ्या तुम्हाला दुवा देतील.'

संताजींच्या डोळ्यात कधी नव्हे ते अश्रू चमकले. म्हणाले, "छत्रपतींच्या गादीशी निष्ठा वाहिलेला हा संताजी घोरपडे तुम्हाला वचन देतो की, मराठेशाही अखंड राहावी, यासाठी शत्रूशीच काय पण दगा फटका करणाऱ्या स्वकीयांचीही मी गैर करणार नाही."

परशुराम त्रिंबकच्या आदेशावरून संताजींनी आपल्या फौजेत धनाजींना सामील करून घेतले. विठ्ठल निळकंठांना साताऱ्याची आपली मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद झाला. हिम्मत खानला खडे चारण्यासाठी संताजी धनाजी आपापल्या घोड्यावर स्वार झाले.

काही काळ संताजी धनाजी या जोडगोळीने मोगलांची ठाणे उध्वस्त करून आपला धाक जमवला. नंतर दोघांनी विचार विनिमय केला की, दोघे एकत्र राहिलो आणि मोगलांनी हल्ला केला तर त्यांचे जवळ असलेल्या अद्ययावत तोफखान्याला आपण पुरे पडणार नाही. सारासार विचार करून संताजी धनाजींनी आपापल्या फौजा विभागून घेतल्या आणि पुन्हा स्वतंत्रपणे मोगलांवर त्यांचे छापे सुरू झाले.

संताजींची घोडदौड इतकी वेगवान होती की, अक्कलकोट, ऐनपुर, परळी, नरगुंद, सावळगाव, महादेवाचा डोंगर एवढा परिसर केवळ दीड महिन्यात पिंजून काढला. यावरून त्यांच्या वायुगतीच्या घोडदौडीची कल्पना येते.

कर्नाटकाकडे निघालेला बादशहा आपल्या छावणीत ह्या बातम्या ऐकून बेचैन होत होता. प्रत्येक मोगली ठाण्यावरून बातम्या येत होत्या... छावणीत अन्नधान्याचा तुटवडा आहे. संताजी घोरपडे रसद मारतो. वगैरे वगैरे....

संताजी घोरपडेंनी आपल्या लढाईचे तंत्र बदलले. मोगल छावणीवर अचानक हल्ले चढवणे, त्यांची रसद मारणे, अधिकारी कैदीत टाकणे, त्यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करून, कफल्लक करून सोडून देणे अशी पद्धत सुरू केली.

यादगार बेगमने कुमक पाठवण्यासाठी बादशहाकडे कैफियत धाडली. यादगार बेगमला कुमक मिळाली खरी पण, मराठ्यांनी त्यांची दैना उडवली. जानखानचा मुलगा महंमद मुबारक किल्लेदार होता. संताजींनी त्यालाच पकडून ताब्यात घेतले. मोगलांचे शिपाई, सरदार ,ठाणेदार यांनी संताजींची एवढी धास्ती घेतली की, प्रत्यक्षात संताजींनी लढाई केली नसली तरी मोगल दरबारात खोट्या बातम्या पोहोचू लागल्या. धारवाडचा किल्लेदार महमद इस्माईल बेगने खबर पाठवली की, खुदापूरला असलेल्या मराठ्यांच्या छावणीवर हल्ला केला. मराठ्यांचा पराभव झाला. त्यात ३६ मराठे सैनिकांसह संताजी ठार झाले.

औरंगजेबला कळेना की विश्वास कसा आणि कुणावर ठेवायचा? खरेच संताजी जिवंत आहे की धारवाडच्या धारणीवर आडवा झाला....?

इकडे संताजी घोरपडेंच्या पाठलागावर असलेल्या हिम्मत खानच्या तोंडाला फेस आला. मग त्याने आपला मोर्चा अमात्य रामचंद्र पंताकडे वळवला. पंतच संताजींचे गुरु. प्रथम त्यांचाच बिमोड करावा या उद्देशाने हिंमत खानने भालवणी वरून सैन्याची तुकडी मागून घेतली. एकंदरीत परिस्थिती पाहून रामचंद्रपंत वरुड गडाकडे निघाले. याच दरम्यान संताजी घोरपडे सुद्धा गरुड गडावर होते.

दोघांची भेट अनेक घडामोडीनंतर होत होती. गरुडगडावर त्यांची आणि संताजीची अनेक महत्त्वाची खलबते झाली. दोघांनी मिळून गडावरून काही मोहिमा देखील केल्या. हिंमत खानला रोखण्यासाठी संताजींनी आपल्या सैन्याचे विभाजन केले आणि महिमान गडाला वेढा दिला. उद्देश एवढाच की खान चालून आला तर वेढा उठवून मागून हल्ला करायचा. खान महिमानगडाकडे गेला तर पंतासहित खानावर चालून जायचे.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...