विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ३२

 संताजी घोरपडे : भाग - ३२

रामचंद्र पंतांनी संताजींना महिमानगडकडे जाण्याची व शंकराजींची भेट घेण्याची सूचना केली. पंतांच्या सूचनेनुसार संताजी महिमानगडाकडे निघाले. जाता जाता आपल्या फौजांना कर्नाटकाऐवजी महाराष्ट्रात परत फिरण्याचे आदेश धाडले. संताजी जिंजीत असताना पंत आणि संताजी दरम्यान अनेक गैरसमज पसरले होते. त्यात किती सत्य आहे हे पण त्यांना जाणून घ्यायचे होते.

संताजी शंकराजी नारायणांना भेटायला आले त्यावेळी शंकराजी व धनाजी महिमागड व वरुडगडाच्या स्वारीचे बेत रचत होते. संताजी आल्यावर थोडे औचारीक बोलणे झाल्यावर, शंकराजींनी त्यांना उपदेशपर काही बोध दिला व स्वराज्यासाठी आपली एकजूट किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले.

त्याच दरम्यान महिमान गडाच्या किल्लेदाराने बादशहास कळवले की, संताजी, धनाजीची फौज मेहमानगड, वरूडगडाला वेढा घालण्यास आली आहे. किल्ल्यांचे सर्व रस्ते अडवून धरले आहेत, तरी त्वरेने कुमक पाठवावी. बादशहाने बक्षी उल्मुल्क मुखालीस खानाची नेमणूक करून त्वरेने कुमक रवाना केली.

याच सुमारास सातारा सीमावर्ती प्रदेशातील अकलूजला मोगल सरदार हिम्मत खानची छावणी होती. मराठ्यांचा जोर वाढलेला पाहून त्याने बादशहाकडे ज्यादा लष्कर तुकड्यांची मागणी केल्यावर बादशहाने ताबडतोब तुकड्या रवाना केल्या.

संताजी, धनाजीच्या फौजा एकत्र झाल्याने मराठ्यांची ताकद वाढली. शंकराजी नारायणांनी हिंमतखान महिमानगड, अकलुज वर एकाच वेळी हल्ला केला. तिन्ही ठिकाणी मोगलांचा पडाव झाला. हिंमत खान कसाबसा जीव वाचवून निसटला. पराभवाच्या बातम्यांनी औरंगजेबची झोप उडाली. त्याच्या डोक्यात संताजीराव खुपत होते. संताजीला मृत किंवा जिवंत पकडून देणाऱ्यास मोठे बक्षीस जाहीर केले.

बादशहाच्या आदेशानुसार सुभेदार हिम्मतखान सातत्याने संताजीच्या पाठलागावर होता. त्याने विक्रम हळ्ळीला संताजींची फौज अडवली. लढाईची धुमश्चचक्री सुरू झाली. जवळ जवळ ३०० मराठे शिपाई गारद झाल्याचे पाहून, आणखी शिपायांना न गमावता, हिंमतखानला झुकांडी देऊन संताजी सैन्यासह विक्रमहळ्ळी वरून निसटले. मोगलांच्या दुर्दैवाने तिन्ही खानात भांडणे सुरू झाली. हमीउद्दीनखान व खाजाखान गुलबर्गाकडे निघून गेले. हिंमतखानने मात्र संताजींचा पाठलाग सुरूच ठेवला. संताजीच्या सोबतीला ४००० फौजेनिशी सरदार अमृतराव निंबाळकर होते.

हिंमतखानला चुकवण्याबाबत संताजी व सरदारांबरोबर बराच वेळ खलबत्ते चालू होती. पण ठोस निर्णय होत नव्हता. पुन्हा रात्री मसलत बसली. महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. संताजींनी अमृतराव निंबाळकर यांना वर्‍हाडकडे पाठवले. उरलेले सैन्य घेऊन संताजी नारोसहित कर्नाटकातील मालखेडला पोहोचले. बादशहाचे हेर खाते इतके जबरदस्त होते की, संताजीच्या मोहिमेची खबर त्याला पोहोचली.

बादशहाने हमीदऊद्दीनखान व खाजाखानला अमृतरावचा पाठलाग करण्याचा हुकूम दिला आणि लष्करखान नावाचा नवीन सरदार संताजींना अटकाव करण्यास धाडला. हिंम्मतखान तर होताच. तो सतत पाळतीवर राहून संताजींना पकडू पाहत होता. हिम्मतखानला हुलकावणी देऊन संताजी पुन्हा मालखेड जवळ येऊन अकलूजच्या गढीत तळ ठोकला. हिंमतखानने गढीला वेढा दिला.

संताजी पुरता आपल्या खोड्यात अडकला, असे वाटून भालखेडच्या जमीनदारांकडून खंडणी वसूल करण्यात मशगूल झालेला पाहून, संताजी कधी निसटले त्याला कळलेही नाही. ते तडक गोवळकोंडाला भिडले. तिथे धुमाकुळ माजवून दिला. तोच जिंजीकडे तोफा व रसद घेऊन जात असलेल्या छत्रसाल राठोडची तोफा सहित रसद लुटली. ही लुटालूट चालू असतानाच राठोडला आणखी कुमक मिळाली. संताजीने सरळ महादेवाच्या डोंगराकडे प्रयाण केले.

धनाजी देखील सातारा भागातच होते. मराठेशाहीला दुहीचा शाप भोवला. दोघांमध्ये तणाव वाढतच होता. त्याची झळ राजसिंहासनापर्यत पोहोचायला वेळ लागला नाही. सध्या तरी घोरपडे जाधवातील वितुष्ट स्वराज्यासाठी घातक होते. छत्रपतींसह सर्वजण अस्वस्थ होते. संताजी घोरपडेंचा रुसवा काढून त्यांची समजूत घालण्यासाठी व धनाजी संताजींची दिल जमाई करण्यासाठी महाराजांनी आपला खास दूत विठ्ठल निळकंठास महाराष्ट्रात पाठवले. परशुराम त्रिंबकही त्यांचे बरोबर होते.

संताजी म्हणजे धगधगीत अंगार होते. प्रत्यक्ष छत्रपतींनाही बोल लावलेला तो सेनानी होता. त्यांना आवरणे महाकठीण होते. त्यांची मान फक्त एकाच ठिकाणी झुकत होती ते म्हणजे छत्रपतींचे सिंहासन. परशुराम त्रिंबक व निळकंठ यांच्यात मंत्रणा झाली. धनाजीला बोलावणे धाडले. धनाजीचा बोलावता धनी नागोजी माने सध्या तरी कुठे परांगदा होता.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...