राजाराम महाराज म्हणाले, "संताजीराव, रायगड पडल्यावर तेथील अपारंपार संपत्ती आणि जडजवाहिर मोगलांच्या हाती पडली. छत्रपती जवळजवळ कफल्लक झाले होते."
"छत्रपती ?आणि कफल्लक? कोण विश्वास ठेवेल? राणी सरकार, माफ करा. या जिंजीच्या किल्ल्यात अंमल पाणी आणि नाच गाण्याच्या मजलिशी रोज रंगवल्या जातात. नव्या खुरसुरत....."
"खबरदारऽऽ", महाराज भडकले. "खबरदारऽऽ घोरपडे. त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही."
"संबंध कसा नाही?" संताजी म्हणाले, "महाराज, मुलुख जिंकण्यासाठी सैनिकानं प्राणांची बाजी लावून लढत लढत मरावं आणि तो मुलूख प्रधानांनी लाचलुचपत खाऊन फिरंग्यांना कवडी मोलाने विकावं आणि खुद्द महाराजांनी चैन करावी...."
खंडो बल्लाळांना राहवलं नाही. "संताजीराव, तुम्ही सेनापती आहात. निदान छत्रपतींच्या गादीचा तरी मान ठेवा."
ताराराणी हतबल झाल्या. संताजी गंभीर स्वरात म्हणाले, "खंडोजीराव, नुसती याद आली तरी मस्तक झुकेल असे एकच छत्रपती होऊन गेले. ज्या शिवाजी महाराजांनी मी आणि माझ्यासारखी शेकडो पोरं त्यांच्या छत्र छायेखाली घडवली, त्यांच्याच नजरेखाली वाढलो. या मनगटात त्यांनीच बळ दिले. एकेकाळी त्यांच्याबरोबर खानदेशाच्या स्वारीवर गेलो असता, आमच्याकडून थोडीशी हयगय झाली तर, छत्रपतींनी मुजऱ्याला न येण्याची शिक्षा फर्मावली होती. महाराणीजी, आज ते हयात असते तर आम्हाला आमची जागा दाखवली असतीच, पण बरोबर जागा दाखवायला पोटच्या पोराचीही गय केली नसती."
राजाराम महाराज संतापाने थरथरत उभे राहत गरजले, "घोरपडे, तुमची इतकी मजल जाईल असे वाटले नव्हते. आज मला वैयक्तिक नव्हे तर, छत्रपतीला दुषणे देत आहात.
यापुढे तुमचे तोंड देखील बघायचे नाही. या क्षणापासून तुम्हाला सरसेनापती पदावरून बडतर्फ करण्यात येत आहे. चालते व्हा."
संताजीराव किंचितही विचलित न होता म्हणाले, "बडतर्फीचा हुकूम मी राजमहालात स्वीकारत नाही महाराज."
तशा ताराराणी म्हणाल्या, "छत्रपती ठरवतील तिथे हुकूम बजावला जाईल. तुम्ही आता घरी जाऊन तुमचा शिक्का नीट पहा. खंडोजीराव, घोरपडेंच्या शिक्यावर काय शब्द आहेत?"
"राजाराम चरणी तत्पर। संताजी घोरपडे निरंतर।।"
ताराऊ म्हणाल्या, "संताजीराव, या शब्दाचा शांतपणे विचार करा."
संताजी घोरपडे राजमहालातून बाहेर पडले .
छत्रपतींनी संताजी घोरपडेचे सरसेनापती पद रद्द केले असते तरी, त्यांच्या हातातील तलवार जप्त केली नव्हती. घोरपड्यांचा मुख्य उद्देश होता, मराठेशाहीचे रक्षण. सेनापतीपद मिळाल्यावर त्यांनी मराठा फौजा सतत मोगलांपाठी फिरवून मोगलांना दे माय धरणी ठाय केले होते. त्याचबरोबर मोगल साम्राज्यातील लूट आणून छत्रपतींचा खजिनाही समृद्ध केला होता. जेव्हा निराजीची करामत आणि राजाराम महाराज व्यसनाधीन होऊन मुलूख विक्रीला काढणे, राजमहालात छत्रपती पदाला न शोभणारे छंद चाळे करून सैनिकांनी जीव धोक्यात घालून मिळवलेल्या दौलतीचा मुक्तहस्ताने केलेली उधळपट्टी लक्षात आली तेव्हा संताजीला ते सहन करणे शक्य नव्हते. खुद्द छत्रपतींना दोन शब्द सुनावून राजमहालात सेनापतीपद त्यांच्या स्वाधीन न करता रणांगणावर उतरून शौर्याने हिसकावून घ्यायचे आव्हान फक्त संताजीस करू शकले.
संताजीरावांनी किती मेहनतीने आणि उत्साहाने जिंजीच्या पायथ्याशी येऊन मोगलांची अन्नान्न दशा केली होती. त्यांच्या जरबेमुळे मोगल सैन्याची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली होती. या मोहिमेवर बादशहाने नामांकित सरदार पाठवले. त्या सर्वांच्या नाकी दम आला. बादशहाचे सारे लक्ष जिंजीकडे असल्याचे पाहून मोका साधून मराठ्यांनी पन्हाळा काबीज केला. प्रजेला सुद्धा वाटू लागले आता मराठ्यांचा उज्वल काळ जवळ आला. मोगली सत्ता लयाला जाणार असं वातावरण निर्माण व्हायला लागलं होतं. बादशहाचाचा अंत आणि मोगलाईचा शेवट कोणत्याही क्षणी होणार अशी स्थिती दृष्टिक्षेपात आली होती. अशी सरशी होत असताना, मराठेशाहीला जिंजी किल्लास तडा गेला. संताजी घोरपडे अतिशय संतापाने गड उतरले. त्यांच्या डोक्यात विचारांचे काहून उठलं होतं.....
त्याचवेळी सेनापती संताजीला भेटण्यासाठी एक गुप्त पत्र घेऊन, बादशहाच्या छावणीवरून एक सांडणीस्वार आला. सेनापती गडावर गेले असल्याने धनाजी स्वाराला समोरे गेले. चौकशी केल्यावर स्वार म्हणाला, बादशहाच्या आज्ञेवरून संताजी घोरपडें साठी गुप्त खलिता घेऊन आलो. धनाजीच्या सर्वांनाला मुंग्या आल्या. बादशहा आणि संताजी घोरपडे यांच्यात गुप्त खलबत? स्वतःला सावरुन धनाजीने युक्तीने तो खलिता हस्तगत केला. धनाजीने तो खलिता वाचला आणि त्यांचा डोकं सुन्न झालं. मराठ्यांचा सेनापती मोगलांना सामील? हे कसं शक्य आहे? नाही... नाही…संताजी नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. ते इथे येण्याआधीच महाराजांना हा साक्षात पुरवा सादर करावा. धनाजीने घाईने जिंजीचा मार्ग धरला...
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment