विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संंताजी घोरपडे : भाग - २७

 संंताजी घोरपडे : भाग - २७

महाराणींच्या शब्दाने संताजीच्या क्रोधाचा भडका उडाला. म्हणाले, "महाराणीजी, तुम्ही हा मजवर कसला आरोप करताहात?"

मध्येच महाराज म्हणाले, "धनाजीराव आम्हाला सांगत होते की,...."

संताजींनी त्यांना पुढे बोलू न देता म्हणाले, "महाराज, मला पक्कं ठाऊक आहे, तेच आपलं कान भरतात व चुकीचा सल्ला देतात. माझ्या बहादुरीपेक्षा त्यांचे गोड बोलणे महाराजांना जास्त आवडते हे मला कळून चुकले आहे."

महाराज म्हणाले, "संताजीराव, हा तुमचा गैरसमज आहे. आमच्या मनात असे काहीही नाही आणि धनाजीबद्दल तुम्ही द्वेष करावा हे ही बरोबर नाही."

संताजींनी कमरेचा लखोटा काढून महाराजांकडे देऊन म्हणाले, "आपल्याकडून आलेल्या या फर्मानाचा काय अर्थ समजायचा? युद्ध जिंकण्याची वेळ आली असताना आपण त्यांच्या सल्ल्यानुसार युद्ध तहकुबीचा हुकुम देता...."

महाराज म्हणाले, "संताजी, या प्रकरणाशी धनाजीचा काही एक संबंध नाही. झुल्फिकारखानाशी युद्ध तहकुबीचा निर्णय खुद्द आमचा आहे. काय मसलत आहे ते तुम्हाला सांगतो. बसा निश्चिंत"

"निश्चित बसायला मला सवड नाही. झुल्फिकारखानावर हमला करायची मोर्चाबांधणी करून आलोय. केवळ छत्रपतींचा हुकूम झाला म्हणून भेटीस आलो."

"तर मग आम्ही तुम्हाला हुकूम फर्मावतो खानावरील मोहीम तुम्ही तात्काळ मागे घ्या."

"म्हणजे?" बुचकाळात पडून संताजींनी विचारले.

महाराज शांतपणे म्हणाले, "मोहीम रद्द करावी."

"पण का? कशासाठी? खानाची आम्ही पुरती दमछाक केली आहे. त्याला फौजेसकट बरबाद करायची संधी आली आहे. आमचे सैनिक रायगडाचा बदला घेण्यास पेटून उठले आहेत. आणि नेमक्या याचवेळी आपण मला युद्धतहकुबीचा हुकूम फर्मावता? का म्हणून?"

संताजींच्या बोलण्याची पद्धत न आवडल्याने खंडो बल्लाळ म्हणाले, "सरसेनापती, आपण छत्रपतींशी बोलत आहात याचे भान ठेवा . तोलून मापून बोला."

संताजीराव खंडो बल्लाळावरच उखडले. "खंडोजीराव, तोलून मापून बोलण्याचा हा वक्त नाही. आमचे शेकडो, हजारो सैनिक या युद्धात गारद झालेत. प्रत्येक ठार झालेल्या सैनिकाचा जबाब द्यावा लागतो सरसेनापतीला. छत्रपती किंवा राजमंडळाला नाही .कोणत्या तोंडाने सैनिकांसमोर जाऊन त्यांना हे फर्मान दाखवू?"

सौम्यपणे ताराबाई म्हणाल्या, "संताजीराव, सध्या तुम्ही रागावला आहात."

"का रागवू नये मातोश्री?"

"तेच ऐकण्यासाठी तुम्ही थोडे शांत होऊन बसा."

संताजीराव आसनस्थ झाल्यावर म्हणाल्या, "संताजीराव, ही युद्धतहकुबी एक राजकीय डाव आहे. त्याचा तुमच्या फौजेशी काही एक संबंध नाही."

"महाराणी, आपण असं कसं म्हणू शकता? आमचे सैनिक नुसते पोट भरण्यासाठी सैन्यात दाखल झाले नाहीत. त्यांच्या निष्ठा आहेत छत्रपतींच्या गादीशी.".

महाराज म्हणाले, "आम्ही जाणतो. आम्ही ही युद्ध तहकुबी का केली हे जाणून घ्या. तहाच्या शर्ती तुम्ही ऐकाल तर....."

"महाराज, आम्हाला सगळं माहित आहे. खानाने आपल्याला नजराणा म्हणून एक लाख होन किमतीचे सोने नाणे आणि साठ हजार पागोट्याचे जडजवाहीर पाठवले. तेवढ्यावर आपण हुरळला आहात. खान गोवळकोंडाच्या पातशाहीसाठी पागल झालेला आहे. पण महाराज, आज गोवळकोंड्याच्या पातशाहीसकट विजापूरचे अवघं राज्य आपल्या मुठीत आहे. ऐन वक्ताला मोगल सैन्याला विश्रांती देऊन ताजेतवाने होण्याची संधी देणारी ही तहकुबी म्हणजे आपल्या सैन्याच्या पाठीत खंजीर खूपसणे आहे."

महाराणी म्हणाल्या, "संताजी, तुम्ही शूर सेनानी असला तरी, तुम्हाला तुमच्या मर्यादा कधी समजल्या नाहीत. तुमचे अंदाज उतावळे, बेहिशोबी असतात. दूरदृष्टीची तुमच्यात कमतरता आहे. यावेळी तुम्ही खानाला बुडवाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण पुढे काय? एवढ्याने औरंगजेब संपणार आहे का? उलट तो दुप्पट तिप्पट फौज घेऊन जिंजीवर कोसळेल. त्यावेळी तुम्ही त्याच्या पासंगालाही पुरणार नाही. औरंगजेबचे मोहोळ आपल्या अंगावर उठून घेण्यापरीस, खानाशी तूर्त आपल्याला हव्या असणाऱ्या अटीवर तह करणे हिताचे ठरेल."

"संताजीराव, ही नुसती युद्ध तहकुबी आहे. युद्धसमाप्ती नाही. औरंगजेब आज ना उद्या मरणार आहे, नव्हे मरू घातला आहे. तो मेल्याबरोबर सर्व मोगल फौजा व त्याचे सेनानी उत्तरेकडे निघून जातील. म्हणून तो मरेपर्यंत तरी हे नाटक खानाला व आम्हाला चालू ठेवणे भाग आहे. शिवाय या तहामुळे आपली पैशाची चणचण दूर झाली. पैशाच्या तंगीमुळे तग्नापट्टणचा गड, कुडाळ शहर आणि किनारपट्टी वरील खेडी फिरंग्याना विकावी लागली हे तुम्हाला ठाऊक नाही का?"

"महाराज, प्रल्हाद निराजी पंतांनी लाच घेऊन हा मुलूख फिरंग्यांना कसा कवडी मोलाने विकला हे सुद्धा समजलं."

"त्याबद्दल पंतांना शासन मिळालं."

संताजी म्हणाले, "आपला मुलूख फिरंग्यांना विकायची खरंच गरज होती का?"

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...