विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

जाटांचा पराभव आणि ६५ लाखांची युद्धखंडणी

 




जाटांचा पराभव आणि ६५ लाखांची युद्धखंडणी

पानिपत युद्ध झाले मराठ्यांची एक पिढी जागीच कामी आली,समस्त हिंदुस्थानात ऐतिहासिक घडा मोडी झाली,मराठ्यांची सत्ता अस्ताला जाती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, उत्तरेतील मराठ्यांची ही स्थिती पाहून लहान मोठ्या हिंदू मुस्लिम सत्तांनी मुंडकी वर काढायला सुरुवात केली,
इकडे दक्षिणेत पुणे दरबारात सत्तेसाठी चढा ओढ सुरू होती,याच राजकारणाचा फटका महादजी शिंदे या नव्या दमाच्या सरदाराला बसला,राघोबाने शिंदेशाहीची वस्त्रे देण्यास विलंब केला,राघोबाला भविष्यात महादजी शिंदे डोईजड होतील म्हणून त्यांनी कुरघोड्या करण्यास सुरू केल्या,अखेर महादजींना शिंदेशाहीची वस्त्रे मिळाली,
१७६९ साली पानिपतचा पराभवाचा कलंक,उत्तरेरील मराठ्यांची शानशौकत व उत्तर हिंदुस्थानात सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मोहीम आखली गेली, दक्षिणेतून रामचंद्र गणेश कानडे, विसाजीकृष्ण बिनवले आपल्या फौजीनिशी आले उत्तरेत शिंदे होळकर पवार यांच्या फौजा येऊन मिळाल्या,
उत्तरेत उभ्या ठाकलेल्या या मराठ्यांच्या फौजेचा पहिला सामना भरतपुरच्या जाटाशी झाला, भरतपुरचा राजा जवाहरसिंगच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला, रणजितसिंहाने लष्करी सह्ययतासाठी मराठ्यांच्याकडे धाव घेतली,संधी चालून आलेली पाहून मराठ्यांनी उचल खाऊन नवलसिंग जाटाचा निर्णयक पराभव केला,सलामीलाच उत्तर मोहिमेतील मराठ्यांनी यश प्राप्त केले यामुळे अनेकांचे धाबे दणानले,मराठ्यांच्या फौजेत वीरश्री संचारु लागली लढण्याची नवीचेतना मिळू लागले,पानिपतचा बदला घेईला मराठ्यांनी सुरू केला,बेईमानी केलेल्या प्रत्येकाचा समाचार घेण्यास मराठ्यांनी प्रारंभ केला,
लागलीच जाटांची आग्रा व मथुरा ही शहरे जिंकून घेतली पुढे मथुरा येथे महादजी शिंदे यांनी दारू गोळ्याच्या कारखान्याची निर्मिती केली,
जाटांच्या प्रदेशात मराठ्यांनी धुमाकूळ घालून नवलसिंगला घायकुतीला आणला शेवट जाट राजा नवलसिंग याने शरणागती पत्करली व सप्टेंबर १७७० मध्ये मराठ्यांशी तह केला. या तहाचे मुद्दे
१)२०लाखांची जहागीर स्वीकारून जाटांनी मराठ्यांचे मांडलिकत्व पत्करले
२)युद्धखंडणी म्हणून ६५ लाख रुपये देण्याचे मान्य केले
३)वार्षिक ११ लक्ष रुपये खंडणी देण्याचे कबूल केले,
भरतपुरच्या जाटांना मराठ्यांनी नमवताच उत्तरेत मराठ्यांची दहशत दरारा पुन्हा प्रस्थापित झाली,आज नाही तर उद्या या दख्खनी मराठ्यांना आपण नर्मदेपार पिटाळून लावू या भ्रमक समजुतीत खुशीची गाजरे खाणाऱ्या उत्तरेतील हिंदू मुस्लिम राज्यकर्त्यांची झोपच उडाली!
पानिपतची भळ भळती जखम पचवून मराठे हिंदुस्थानात पुन्हा सिद्ध झाल्याची जानवी स्वकीय सत्ता आणि परकीय बंगालच्या ब्रिटिश सत्तेलाही झाली!
#हर हर महादेव
#संदर्भ-महादजी शिंदे आणि नाना फडणवीस
#श्रीनाथ माधवराव शिंदे
#शिंदे घराण्याचा इतिहास
#दौलतराव शिंदे कार्य आणि कर्तृत्वकाळ

चाफाजी शिंदे

 स्वराज्य उभे राहिले ते चाफाजी शिंदे यांच्यासारख्या अनेक अपरिचित सरदारांच्या कष्टावर. इतिहास वाचताना अनेकदा मोठी नावे समोर येतात, पण त्यांच्यासोबतच अनेक निष्ठावान सरदार पडद्यामागे राहून लढत होते.






चाफाजी शिंदे हे अशाच पैकी एक पराक्रमी नाव. त्यांच्याकडे पाच हजार पायदळ सैन्याचे नेतृत्व होते, ज्याला पदात पंचहजारी असे म्हटले जात असे.

सन १७०४ च्या सुमारास लोहगड किल्ला जिंकण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. हा काळ मराठ्यांच्या संघर्षाचा होता. लोहगडसारखा बळकट किल्ला पुन्हा स्वराज्यात आणणे सोपे नव्हते. चाफाजी शिंदे यांनी या मोहिमेसाठी स्वतः मेहनत घेऊन मोठी फौज जमवली आणि जिद्दीने ही लढाई लढली. त्यांच्या या कष्टाचे आणि एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना स्वराज्यातून सन्मान मिळाला.
पेशवे दप्तरातील पत्र
श्री
मशरूल अनाम चाफाजी सिंदे पदात पंच हजारी यासी बहिरी मोरेश्वर प्रधान आशीर्वाद सुहूर सन खमस मया व अलफ. तुम्ही या राज्यांत कस्ट मेहणत एकनिष्टपणे केली च हाठी लोहगडचे प्रसंगी जमावणसी श्रम केला, यावद्दल तुम्हास वक्षीस घोडा वा तुपटा पेदस्त किले लोहगड पौौ किमत रुशा ७५ पचाहतरीत नदर यास खडून दिली असे. यास कोन्ही कृथला करावयास प्रयोजन नाहीं.. छ २४ रमजान. लखनसीमा.
चाफाजी शिंदे यांनी स्वराज्यासाठी जे कष्ट घेतले आणि लोहगडच्या मोहिमेत सैन्य जमवण्यासाठी जी मेहनत केली, त्याबद्दल त्यांना ७५ रुपये किमतीचा एक घोडा आणि एक दुपटा बक्षीस म्हणून दिला. ही घटना छत्रपती शाहू महाराज गादीवर येण्यापूर्वीची आहे. चाफाजी शिंदे यांच्यासारख्या अपरिचित सरदारांनी आपल्या रक्ताचे पाणी करून किल्ले जिंकले आणि स्वराज्य टिकवले, हेच या पत्रातून दिसून येते.
संदर्भ: पेशवे दप्तर, पत्र क्रमांक ८७ (१२ डिसेंबर १७०४).

जयपूरची गादी आणि मराठ्यांचे वर्चस्व..!!

 



जयपूरची गादी आणि मराठ्यांचे वर्चस्व..!!

१७५१ साली जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर आपली मोठी फौज घेऊन जयपूरवर चालून गेले. मराठ्यांची ही फौज पाहून जयपूरचा राजा ईश्वरसिंग इतका घाबरला की त्याने स्वतःच आत्महत्या केली.
ईश्वरसिंगाच्या मृत्यूनंतर आता जयपूरसारख्या मोठ्या राज्याच्या गादीवर कोण बसणार, याचा निर्णय पूर्णपणे मराठ्यांच्या हातात आला. शिंदे आणि होळकरांनी जयपूरच्या राजकारणाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आणि आपल्या मर्जीतील माधवसिंगाला जयपूरच्या गादीवर बसवले. एवढेच नाही, तर राजा बनवल्याच्या बदल्यात त्यांनी माधवसिंगाकडून मागची सगळी थकीत बाकी आणि नवी खंडणी वसूल केली.
पेशवे दप्तरातील नोंद-
"जैपुरास मुकाम आलियावर ईश्वरसिंग लयातें पावले. माधोसिंग याची राज्यस्थापना झाली. खंडणीचा व गुदस्ताची बाकी सुधा करार जाला ते वृत शेवेसी लिहून पाठविले आहे... प्रस्तुत राजे माधोसिंग यानीं पैगाम करून पूर्ववतप्रमाणे सलूख राखिला."
ज्या सवाई माधवसिंगाने पुढे मराठ्यांशी गद्दारी केली, त्याला त्याच जयपूरचा राजा बनवणारे खुद्द जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर होते. राजपुतान्यात कोणाला राजा करायचे, ही ताकद मराठ्यांच्या तलवारीत होती!
संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ४०, पृष्ठ क्रमांक ३८ (१२ फेब्रुवारी १७५१)

इंग्रज अधिकारी महादजींबद्दल लिहितात

 


इंग्रज अधिकारी महादजींबद्दल लिहितात

​महादजींच्या सहवासात दीर्घकाळ राहिलेला इंग्रज वकील अँडरसन, गव्हर्नर जनरल (ग.ज.) हेस्टिंग्जला लिहितो
​"शांत व न्याय्य वृत्ती कायम ठेवून महादजींनी जी कामगिरी केली (साल्बाईचा तह), त्याबद्दल माझ्या मनात मोठा आदरभाव आहे. तो होता म्हणूनच बारभाईंच्या शंका दूर झाल्या. अशा थोर पुरुषांचा स्नेह आपण कधीही तोडू नये. युद्धात बाजू अंगावर आली तर त्यांचा हुरूप व शांती कधी भंग पावत नाही, तसेच विजय मिळाला असता ते हर्षाने फुगून जात नाहीत."
​हा अँडरसन काही काळ शिंद्यांच्या दरबारात इंग्रज वकील होता,
​आता प्रत्यक्ष ग.ज. वॉरन हेस्टिंग्ज काय लिहितो ते पाहूया —
​"महादजी कपटी व पाताळयंत्री आहेत, ते इंग्रज व अर्काटच्या नबाबाचा अत्यंत द्वेष करतात (हा नबाब इंग्रजांचा मित्र होता) असे पुष्कळ लोक मला सांगतात. पण मला ते बिलकूल खरे वाटत नाही. माझा त्यांचा इतक्या वर्षांचा संबंध आहे, त्यात लबाडीचे एकही उदाहरण नाही. गोहदच्या राण्याचे उदाहरण वारंवार दिले जाते; पण त्या राणाने आमच्याशी इतकी लबाडी केली आहे की, महादजी जे करत आहेत ते योग्यच वाटते."
​(राणाला योग्य धडा शिकवून श्रीमंतांनी त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले, तेव्हा त्याच्या पत्नीने गोहदच्या किल्ल्यात स्फोट घडवून आत्महत्या केली होती. प्रत्यक्ष ती त्यात मृत्युमुखी पडली होती).
​हेस्टिंग्ज पुढे म्हणतो, "उगाच अविश्वास दाखवून शिंद्यांना आपण दुखवू नये, नाहीतर आपल्या सत्तेस धोका निर्माण होईल."
​या गव्हर्नर जनरलवर असा आरोप होता की, मुगल बादशहाला महादजींनी इंग्रजांच्या ताब्यातून सोडवून आपल्या नियंत्रणात ठेवले. तसेच इंग्रज-मराठा पहिल्या युद्धाबद्दल हेस्टिंग्जला ब्रिटिश पार्लमेंटसमोर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यावेळी त्याने महादजींचे ठाम समर्थन केले होते.
संदर्भ-अलिजाह बहाद्दूर महादजी शिंदे
​ डॉ.पी एन शिंदे

"कोपर्डेतील ऐतिहासिक वाडे- पानिपतकर शिंद्यांचा पराक्रम"

 








"कोपर्डेतील ऐतिहासिक वाडे- पानिपतकर शिंद्यांचा पराक्रम"

__________________________________________
सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात कोपर्डे नावाचं एक जुने आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. लोणंद-खंडाळा रस्त्यालगत वसलेल्या या गावात शिरताच भूतकाळाची आठवण करून देणारे अनेक अवशेष दिसून येतात. गावात आजही दगडी दरवाजे, तटबंदी, नगारखाने, आणि वाड्यांच्या खुणा टिकून आहेत.मराठा शैलीतील हे वाडे आणि रक्षणासाठी बांधलेली तटबंदी आजही गावाचं वैशिष्ट्य जपून आहेत..!!
ग्वाल्हेरमध्ये आजही “पानिपत्ते की गोठ” “पानिपतकर शिंदे यांची गोठ” म्हणून ओळख असलेलं त्यांच्या वसाहतीच ठिकाण आहे, पानिपताच्या तिसऱ्या रणसंग्रामात कोपर्डे गावातील शिंदे घराण्याने भाग घेतला होता. या युद्धात त्यांच्या घराण्यातील अनेक पुरुष धारातीर्थी पडले. एका अर्थाने एक संपूर्ण पिढीच या युद्धात गारद झाली. त्यामुळे गावाला 'पानिपतकर शिंदे' असं नाव पडले..!!
या घराण्याने केवळ पानिपतच्या युद्धातच नव्हे, तर संपूर्ण मराठेशाहीच्या काळात आपल्या शौर्याचं उदाहरण दिलं.शौर्य,स्वामीनिष्ठ,त्याग बलिदान यासाठी हे घराणं ओळखलं जातं..!!
गावात प्रवेश करताच स्वागताला एक भक्कम दगडी प्रवेशद्वार दिसतं. त्याच्या मागे गावाचं जुना किल्ल्यासारखा रक्षण केलेला परिसर दिसतो. नगारखाने, उंच भिंती, आणि तटबंदी यामुळे गावाचं पूर्वीचं सामर्थ्य आजही लक्षात येतं. गावात काही वाडे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.काळे पाषाण दगडी रचना, खोल अंगणं आणि मजबूत पाया असलेले हे वाडे कोपर्ड्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात..!!
गावात मंदिराच्या शेजारी समाधीस्थळं आहेत, जी पानिपत मोहिमेतील बलिदानाची आठवण करून देतात. तसंच गावात जुन्या वीरगळी आहेत. ही सगळी ठिकाणं गावाच्या समृद्ध परंपरेचं आणि बलिदानाचे प्रतीक आहेत..!!
कोपर्डे हे गाव फक्त एक वस्ती नाही, तर एका संपूर्ण इतिहासाची साक्ष आहे. येथे आले की, प्रत्येक वाडा, प्रत्येक दगड, आणि प्रत्येक वास्तू काहीतरी सांगत असते. पानिपताच्या रणभूमीत लढलेलं हे गाव आजही आपल्या पराक्रमाची आणि बलिदानाची गाथा शांतपणे सांगत उभं आहे..!!

#उमाबाई_दाभाडे (Umabai Dabhade) # #मराठा_साम्राज्यातील_पहिली_आणि_एकमेव_महिला_सरसेनापती (Commander-in-Chief)

 #शाहूपर्व


#उमाबाई_दाभाडे
(Umabai Dabhade) #छत्रपती_थोरले_शाहू_महाराज यांच्या वेळी ही #मराठा_साम्राज्यातील_पहिली_आणि_एकमेव_महिला_सरसेनापती (Commander-in-Chief) होती. त्या मराठा इतिहासातील एक अत्यंत शूर, कर्तबगार आणि जिद्दी स्त्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पुरुषप्रधान लष्करी आणि राजकीय क्षेत्रात मोठे पराक्रम दाखवले आणि दाभाडे घराण्याचे नेतृत्व सांभाळले.
मुख्य माहिती:
#जन्म: खानदेशातील अभोणा (Abhona, नाशिक जिल्हा) येथे. त्या देवराव ठोके (अभोनकर देशमुख) यांच्या कन्या होत्या. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवारबाजी आणि इतर योद्धा कौशल्ये शिकल्या होत्या.
विवाह: खंडेराव दाभाडे (सरसेनापती) यांच्याशी. खंडेराव हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे पुत्र होते.
#मृत्यू: २८ नोव्हेंबर १७५३ (वृद्धापकाळाने). त्यांची समाधी तळेगाव दाभाडे (पुणे जिल्हा) येथील श्री बनेश्वर मंदिराजवळ आहे.
लष्करी आणि राजकीय कारकीर्द:
खंडेराव दाभाडे यांचा मृत्यू २७ सप्टेंबर १७२९ रोजी झाल्यानंतर, त्यांचा थोरला मुलगा त्रिंबकराव दाभाडे सरसेनापती झाला. पण १७३१ मध्ये बाजीराव पेशवा यांच्याविरुद्ध बिल्हापूरची लढाई (Battle of Bilhapur) झाली, ज्यात त्रिंबकराव मारले गेले.
त्रिंबकराव यांच्यानंतर दुसरा मुलगा यशवंतराव दाभाडे लहान असल्याने, उमाबाई यांनी दाभाडे घराण्याचे मुख्य नेतृत्व सांभाळले. सुमारे १७३२ मध्ये त्यांना सरसेनापती पद मिळाले. त्या मराठा सैन्याच्या इतिहासातील पहिल्या महिला सरसेनापती ठरल्या.02f5d3
त्यांनी गुजरात प्रांतातील मोहिमा यशस्वीपणे हाताळल्या. दाभाडे घराण्याला गुजरातमधील चौथ आणि सरदेशमुखी वसुलीचे हक्क होते. बाजीराव पेशव्यांशी मतभेद झाल्याने (गुजरातच्या महसुलावरून) उमाबाईंनी पेशव्यांच्या विरोधात बंड केले.
बाजीराव प्रथम यांच्यानंतर बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांच्या काळातही मतभेद कायम राहिले.
उमाबाईंनी दामाजी गायकवाड यांच्यासोबत युती करून १७५० च्या आसपास पेशव्यांविरुद्ध मोठे बंड केले. त्यात महाराणी ताराबाई यांचाही सहभाग होता.
पेशव्यांनी या बंडाला चिरडले. उमाबाईंना मोठा दंड (इंडेम्निटी) भरण्यास सांगितले गेले, पण त्या पूर्णपणे शरण गेल्या नाहीत. तरीही दाभाडे घराण्याचा प्रभाव कमी झाला.
उमाबाईंनी सुरुवातीला पेशव्यांशी समझोता दाखवला, पण आपल्या मुलाच्या मृत्यूचा राग मनात ठेवला आणि पूर्ण सहकार्य केले नाही.
कुटुंब:
#पती: खंडेराव दाभाडे (सरसेनापती).
मुलगे:
त्रिंबकराव दाभाडे (सरसेनापती, १७३१ मध्ये मारले गेले).
यशवंतराव दाभाडे (नंतर सरसेनापती पद मिळाले, पण लहानपणी उमाबाईंच्या देखरेखीत).
#दाभाडे_घराणे_शिवाजी_महाराजांपासून_निष्ठावंत_होते, पण पेशवाईच्या उदयानंतर त्यांच्यात सत्तासंघर्ष झाला.
उमाबाई दाभाडे यांना "भद्रकाली" सारखे उपनाम मिळाले कारण त्या रणांगणात भयंकर आणि शूर होत्या. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने लष्करी निर्णय घेतले, जहागिरी सांभाळल्या आणि घराण्याचे रक्षण केले. मराठा इतिहासात त्यांचे योगदान "लढवय्या स्त्रिया" म्हणून महत्त्वाचे आहे, जसे की अहिल्यादेवी होळकर किंवा अन्य योद्ध्या स्त्रियांप्रमाणे.
आजही त्यांचा चरित्रपट "भद्रकाली" सारखे प्रयत्न झाले आहेत, ज्यात त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आला आहे.

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...