विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

सरसेनापती संताजीराव घोरपडे

 साधारण सांगली कोल्हापूर भागातली मोठासा भाग संताजी घोरपडे यांच्या कडे देशमुखी म्हणून होते. खालील पत्र १६९२ मधील छत्रपती राजाराम महाराजांचे आहे.हे पत्र संताजी घोरपडे ने यांनी १६८९ पासून १६९२मध्ये गाजवलेल्या पराक्रम च आहे. जेंव्हा छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाली तेंव्हा मराठे संपले अशी संपूर्ण भारताची धारणा झालेली असताना संताजी ने एकहाती मुघल वार भीषण हल्ले केले. लक्षात घ्या यावेळी धनाजी त्यामानाने थोडे वयाने लहान होते. सांगली जिल्ह्यातील विटा मध्ये भालवणी नावाच्या गावात त्यांचा वाडा होता.त्यांच्या मानस पुत्र नारो महादेव जोशी या कडे इचलकरंजी ची जहागिरदार गेली तिथेच बाजीराव पहिल्या यांची बहीण अनुबई याना घोरपडे कुटुंबात दिली. (पुढे नारो महादेव जोशी यांनी आपले आडनाव घोरपडे केले ते संताजी साठी, तपण मूळ ते ब्राम्हणच) कापाशिकर घोरपडे सुद्धा त्यांचाच जहागिरदार च भाग.


सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या सोयराबाई दुसर्या द्वारकाबाई होय. सोयराबाई यांना राणोजी तर द्वारकाबाई यांना पिराजी हे पुत्र होय. तारिख दिलकुशा मध्ये भीमसेन सक्सेना लिहिते की, "संताजीच्या निधनानंतर पुढे ५ -६ वर्ष राणोजीने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी निकराची झुंज दिली. शिपाईगिरीत तो आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे होता. त्यावरुन १७०१ ते१७०२ हे वर्षे राणोजी घोरपडे यांनी गाजवून सोडलीे होती.
सन १७०२ मध्ये कनार्टकतील वाकीनखेड्याच्या लढाईत चंदनगढीला मराठ्यांच्या वेढा घातला असता बेडरविरूध्दच्या लढाईत राणोजींना बंदुकीच्या गोळी लागून वीर मरण प्राप्त झाले. राणोजींना पुत्र संतती नव्हंती. त्यांच्या मृत्यूनंतर आई सोयराबाई या आपल्या दिराकडे म्हणजे बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांच्याकडे गजेंद्रगड येथे राहत होत्या.त्यांच्या नेमणुकीस बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांनी मौज गंगावती प्रांत हुक्केरी व आणखी काही गावे लावून दिली होती. राणोजींच्या पत्नी संतूबाई होत. त्या राणोजींच्या निधनानंतर त्यांना कसबा कापशी सुभा आजरे हा गाव व इतर आणखी उत्पन्न नेमून दिले होते. त्या संताजीची द्वितीय पत्नी द्वारकाबाई जवळ राहत होत्या. राणोजीच्या अकाली निधनानंतर सेनापती घोरपडेच्या घराण्यावर आलेलेल्या संकटातून बाहेर काढले ते सरसेनापती संताजींच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई साहेब यांनी.अशा अवघड प्रसंगी त्यांना साथ दिलीे ती संताजींचे मानसपुत्र नारो महादेव घोरपडे (जोशी) यांनी होय. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राजपुत्र शिवाजी (दुसरे) यांना रणराणी, महाराणी ताराबाई साहेब यांनी गादीवर बसवून स्वतः महाराणी ताराबाई साहेब यांनी राज्यकारभार व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली वर सेनापती पद अनुभवी व पराक्रमी धनाजीराव जाधवराव यांना दिले. ते योग्य सुध्दा होते. सेनापती राणोजींचा, सेनापती धाकटा भाऊ पिराजी यास द्या हि मागणी द्वारकाबाई साहेब यांनी केली पण पिराजी हा लहान होता म्हणून शक्य झाले नाही परंतु महाराणी ताराबाई साहेब यांनी इ. सन १७०३ मध्ये पिराजीच्या नावे वडिलोपार्जित सरंजामदार चालु ठेवण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी द्धारकाबाई साहेब घोरपडे यांनी करुन घेतला. पण त्यांना सेनापती पद दिलो नाही. याची रुखरुख द्वारकाबाई साहेब यांना लागून राहिली. पण या काळात औरंगजेब बादशहा इरेला पेटला होता व मराठ्यांच्या अंत्यत आणीबाणीच्या कालावधीत द्वारकाबाई साहेब यांनी सेनापती पदाचा विचार सोडून मानसपुत्र नारो महादेव जोशी यांच्याकडे सैन्य देऊन औरंगजेब विरोधात महाराणी ताराबाईसाहेब यांना साथ दिली. व सरंजामाचा कारभार आपल्या हातात घेऊन योग्य उत्पन्न मिळत ठेवले कारण सैन्यात पगार वगैरे वेळेवर देऊन औरंगजेब विरोधात जोरदार लढाईत पुढाकार घेतला. तसेच बहिर्जी घोरपडे याच्याशी समजूतशीर भूमिका घेतली. महाराणी ताराबाई साहेब यांना भेटून छत्रपती घराण्यावर निष्ठा कायम ठेवत असे आशिर्वाद घेतले. १७१० नंतर छत्रपतीच्या दोन गादी निर्माण झाल्या. सातारा व कोल्हापूर. महाराणी ताराबाई साहेब यांना पिराजी घोरपडे हे ११ - १२ वर्षेचा आहेत म्हणून सेनापती पदी बहिर्जी घोरपडे गजेदगडकर यांचा पुत्र शिदोजीराव घोरपडे यांच्या कडे दिले.
कापशीकर घराण्यातील सेनापती पद घोरपडेंच्या दुसऱ्या शाखेकडे गेल्यामुळे मोताश्री द्वारकाबाई साहेब या नाराज झाल्या. पण पुढे १५ जुन १७२१ मध्ये शाहू महाराजांनी पिराजी घोरपडे यांच्या नावाने सनद दिली . ती सनद दिली खालीलप्रमाणे
असून त्यात पिराजी सेनापती असा उल्लेख आहे पुढे १७२८ ला मौजे नागनूर कर्योत नूल येथील छत्रपतींना पाळेगराचा त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी गेलावर तेथील देशमुखशी लढाईत पिराजी मृत्यू झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा राणोजी (२)यांस सेनापतीपदी नियुक्त केले

Sunday, 10 May 2026

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी




 राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्रांतात आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली होती. राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या एकत्रित हालचालींमुळे शत्रूवर मोठा वचक बसला होता. या दोन सरदारांनी मिळून केलेल्या एका मोहिमेचा उल्लेख पिलाजी जाधवराव यांनी चिमाजी अप्पांना पाठवलेल्या पत्रात येतो.
​बडवाई प्रांतात शिंदे आणि होळकर यांनी शत्रूला चहुबाजूंनी घेरून त्यांना जेर केले. शत्रूला नमवल्यानंतर तिथून मराठा दौलतीसाठी खंडणी वसूल करण्यात आली. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या सरदारांनी तिथे मोर्चे लावून शत्रूवर दबाव निर्माण केला होता, ज्यामुळे शत्रूला शरणागती पत्करावी लागली.
​पेशवे दप्तर नोंद-
"राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री सिंदे याजकडील वर्तमान आले कीं बडवाई प्रांत मालवा येथे मोर्चे देऊन जेर करून खंडणी घेतली म्हणऊन आले."

सरकार शिक्का आणि राणोजी शिंदे

 


सरकार शिक्का आणि राणोजी शिंदे

मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये पराक्रमासोबतच प्रशासकीय विश्वासाला किती महत्त्व होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राणोजी शिंदे. छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाजीराव यांनी ज्या सरदारांवर स्वराज्याची मोठी जबाबदारी सोपवली, त्यामध्ये राणोजींचे स्थान अग्रक्रमी होते. त्यांच्या कर्तृत्वावर आणि निष्ठेवर राज्यकर्त्यांचा किती गाढा विश्वास होता, हे एका ऐतिहासिक पत्रावरून स्पष्ट होते.
राज्याचा अधिकृत कारभार चालवण्यासाठी लागणारे सरकारी शिक्के थेट राणोजींच्या स्वाधीन करणे, ही त्यांच्या विश्वासार्हतेवर झालेली मोठी मोहोर होती.
पेशवे दप्तर नोंद-
"राजश्री राणोजी शिंदे यांजपाशी सरकारचे शिक्के देऊन रवाना केले आहेत. याणी आपले जवळ शिक्के ठेवून सरकारचा कारभार करावा. अथवा यांस योग्य वाटेल तर मल्हारजी होळकर यांजपाशी देऊन किंवा आपले जवळ ठेवून शिक्के मारण्याचे काम चालवावे."
याचा सरळ अर्थ असा की, सरकारी कामकाजाचे सर्वात महत्त्वाचे साधन असलेले शिक्के राणोजींकडे सोपवण्यात आले होते. ते स्वतःजवळ ठेवून कारभार करण्याची किंवा प्रसंगी मल्हारराव होळकर यांच्याकडे देण्याची पूर्ण मुभा त्यांना दिली होती.
कारभार सुरळीत चालणे हाच यामागचा मुख्य हेतू होता.
एखाद्या सरदाराकडे राज्याचे शिक्के असणे, याचा अर्थ त्यांना प्रशासकीय निर्णयांचे सर्वाधिकार देणे असा होतो. राणोजींनी केवळ तलवारीच्या जोरावर साम्राज्य वाढवले नाही, तर आपल्या चोख आणि प्रामाणिक वर्तनाने राज्याचा विश्वासही संपादन केला.त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे.
संदर्भ: पेशवे दप्तर, भाग ३०, पान २०६

छत्रपती शाहू महाराजांचे न्यायविषयक धोरण

 


छत्रपती शाहू महाराजांचे न्यायविषयक धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात प्रजेच्या कल्याणासोबतच न्यायव्यवस्थेला अत्यंत महत्त्व दिले होते. हाच न्यायाचा आणि नि:पक्षपाती प्रशासनाचा आदर्श छत्रपती शाहू महाराजांनीही कसा प्राणपणाने जपला होता, हे एका ऐतिहासिक पत्रावरून अत्यंत स्पष्ट होते. राज्याचा कारभार चालवताना न्यायाच्या बाबतीत कोणतीही तडजोड महाराजांना मान्य नव्हती. राज्याचे सर्वोच्च अधिकारी असलेल्या पेशव्यांकडून न्यायाच्या बाबतीत पैशांची अपेक्षा धरली जात असल्याची कुणकूण लागताच, शाहू महाराजांनी आपला प्रतिनिधी महादोबा पुरंदरे याला बोलावून घेऊन पेशवे बाजीराव यांच्यासाठी अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दांत निरोप दिला-
"आजकाल ईस्वरइछेने राजश्री प्रधानपंताच्या सर्व गोस्टी सर्वोत्कर्ष आहेत. याची कीर्ति भूमंडली बहुत दिवस राहील... परंतु येक गोस्टी अनुचित करितात कीं, द्रव्याची अश्या धरून... अर्जिले कीर्तीस किंचित कलंक सांभाळावा."
सध्या बाजीरावांचा सर्वत्र उत्कर्ष होत आहे आणि त्यांची कीर्ती अनेक दिवस टिकून राहील. पण ते पैशांची आशा धरून न्यायाच्या बाबतीत जी अनुचित गोष्ट करत आहेत, त्यामुळे त्यांच्या मिळवलेल्या या महान कीर्तीला कलंक लागेल, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. यानंतर महाराजांनी न्यायदानाचे महत्त्व सांगताना थेट दादाजी कोंडदेव आणि औरंगजेब बादशहाचा दाखला देत न्यायाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले-
"मागे दादाजी कोंडदेव लाहानसाच ब्राह्मण झाला; परंतु त्याणे जे इनसाफ केले ते अवरंगजेब पातशाहासहि बंद्य जाहले."
म्हणजेच, दादाजी कोंडदेव हे सामान्य असले तरी त्यांनी जो नि:पक्षपाती न्याय केला, तो थेट औरंगजेब बादशहालाही वंद्य (आदरणीय) वाटला. यातून महाराजांनी हे स्पष्ट केले की, राज्याच्या तिजोरीत द्रव्य नसले तरी चालेल, पण न्याय हा नेहमी खरा आणि नि:पक्षपातीच असला पाहिजे. खऱ्याकडून किंवा खोट्याकडून पैसा घेऊन न्याय विकण्याचा अधिकार कोणालाही नाही. लष्करी मोहिमांबरोबरच प्रशासनात न्यायाचे पारडे जड ठेवल्यानेच मराठा साम्राज्य खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य म्हणून उभे राहिले.
संदर्भ: पेशवे दप्तर, भाग १७, पत्र क्रमांक ५२

Monday, 27 April 2026

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!


 खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे सरकारचा मोठा प्रभाव होता. १७९३ सालापासून खिळचीपूरचे संस्थान शिंदे सरकारचे मांडलिक बनले होते आणि त्यांना नियमितपणे खंडणी भरावी लागत होती.
पुढे १८१९ मध्ये खिळचीपूरचे दिवाण दुर्जन साल यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काचा वाद निर्माण झाला, तेव्हा शिंदे सरकारच्या सांगण्यावरूनच ब्रिटिशांनी यात मध्यस्थी करून हा वाद सोडवला होता. खिळचीपूर संस्थानाकडून शिंदे सरकारला बुंदी चलनात दरसाल १३,५०० रुपये टंका म्हणजेच खंडणी देणे बंधनकारक होते.
हा टंका अनेक वर्षे थेट ग्वाल्हेरच्या खजिन्यात जमा होत असे. मात्र नंतर १८४४ साली महाराज जयाजीराव शिंदे यांच्या काळात शिंदे सरकारने हा १३,५०० रुपयांचा टंका ग्वाल्हेर लष्कराच्या देखभालीसाठी ब्रिटिशांकडे वर्ग केला. १८४४ च्या सनदेनुसार जयाजीराव शिंदेंनी खिळचीपूरचे दिवाण शेर सिंग यांना हा टंका यापुढे भोपाळच्या पोलिटिकल एजंटकडे जमा करण्याचे थेट आदेश दिले होते.
यावरून हे दिसून येते की, माळवा प्रांतातील अनेक छोटी-मोठी संस्थाने मराठशाहीच्या वर्चस्वाखाली होती आणि त्यांच्या राजकीय तसेच आर्थिक घडामोडींवर शिंदे सरकारचे थेट नियंत्रण होते.
संदर्भ-
१. सी. यू. अचिसन (C. U. Aitchison), A Collection of Treaties, Engagements and Sanads, खंड ४ (Volume IV).
२. खिळचीपूर संस्थानाची माहिती आणि सनद क्रमांक XXXV, पृष्ठ क्रमांक १०५ आणि १४८.

श्रीमंत महादजी महाराजांचे साह्यकर्ते


 श्रीमंत महादजी महाराजांचे साह्यकर्ते

------------------------------------------------------------------------------
महादजींच्या कार्याचा व्यापच एवढा मोठा होता की,त्यास जिवास जीव देणारे शेंकडों साह्यकर्ते निर्माण करावे लागले. राणेखानभाई , त्यांचा जावई साहेबखान टोका,अंबुजी इंगळे व त्याचे कनिष्ठ बंधु विठूजी,व बाळोजी इंगळे वगैरे,खंडेराव हरि व त्यांचा मुलगा,बाळोजी व भगीरथ सिंदे, रवळोजी व देवजी गौळी,हैबतराव फाळके,लालाजी बल्लाळ कोटेकर पंडित, रायाजी पाटील सिंदे,बाळाराव गोविंद, व त्याचा आप्त बाळाजी जनार्दन जांबगावकर, रामजी पाटील जाधव,लाडोजी देशमुख शितोळे,जावई बहिरजी ताकपीर,बळवंतराव धोंडदेव, आबा चिटणीस व बंधू गोपाळराव व कृष्णोबा,
शिवाजी विठ्ठल विंचुरकर,माधवराव गंगाधर चंद्रचूड,जिवाजी बल्लाळ बक्षी व बंधु शिवबानाना आणि मुलगे,नारायण जिवाजी व यशवंत जिवाजी,तसेंच जीवबादादाचे तिघे चुलत बंधु जगनाथ राम उर्फ जगोबा बापू,व बाळाजीराम आणि राघोराम,सदाशिव मल्हार उर्फ भाऊ दिवाण आणि बंधु राघो मल्हार व बापूजी मल्हार,बाळाजी अनंत पिंगे उर्फ बाळोबा तात्या पागनीस,लक्ष्मण अनंत लाड उर्फ लखबादादा, तसेच अनुपगीर व उमरावगीर गोसावी,इत्यादि अनेक नांवें महादजींच्या मंडळींत येतात,त्यांच्या हकीकती इतिहासोपयोगी बनल्या आहेत,
या यादींतील सारस्वत वीर व मुत्सद्दी यांचा पराक्रम विशेष आहे.महादजींच्या हस्तकांची नुसती नावानिशी व संख्या भनांत आणिली तरी पेशव्यांच्या सरदारांप्रमाणेच महादजींचा व्याप केवढा मोठा होता हे दिसून येते. त्यांच्या फौजेतील युरोपियन अंमलदारांची यादीच दोनशेची असून जीवबा बक्षीच्या चरित्रांत पृ . २८२ वर सुमारे अडीचशे हिंदी सरदारांची नावांनिशी दिलेली आहे. बाळाराव गोविंद हा पुष्कळ दिवस महादजींचा कारभारी व सल्लागार असून मोठया नेकीनें काम करणारा हुशार असा गणला जात असे.त्यास प्रचारात रावजी असे म्हणत, प्रथम त्याचा वडील बंधु चिमणाजी गोविंद यास पेशव्यांनी पाटण ( राजपुताना ) येथे कमवीसदार नेमिले, त्याच्या वेळीं लालजी बल्लाळ यास कोट्यास नेमीलें
रायाजी पाटील सिंदे हा महादजींचा अत्यंत विश्वासांतला शूर योद्धा असून त्याच्याच पागेत रामजी पाटील जाधव हा आरंभीं बारगीर आणि पुढे महादजींच्या तर्फे पुण्यास वकील असे. ही दोन नांवें भिन्न व्यक्तींचीं होत,
मराठ्यांनी व मुख्यतः सिंदे घराण्याने उत्तर हिंदच्या विस्तृत क्षेत्रांत कारभार केला त्याची दृश्य स्रारकें ठिकठिकाणी नजरेस पडतात,अजमेरच्या भुईकोटाजवळ सिद्यांच्या कोणी सरदाराने एक शिवालय बांधिलेले आहे,नागोरजवळ ताउस सरोवराच्या काठी जयाप्पांची छत्री त्यांच्या दहनभूमीवर बांधलेली असून,शिवाय त्यांच्या अस्थि पुष्करास आणिल्या तेथेही त्यांची एक छत्री व त्यास लागून एक विस्तीर्ण घांट दक्षिणी पद्धतीचा आहे.
पुष्कर गावांत शिरतांनाच एक मोठा घाट लागतो,त्यावर अहल्याबाईंचे अन्नछत्र असून त्यास लागूनच सर्जेराव घाटग्याची बायजाबाईंने बांधलेली छत्री आहे..छत्रीच्या खर्चास दोन गांव इनाम आहेत. पुष्करास ब्रह्मदेवाचे मंदिर आहे, त्याचा जीर्णोद्धार गोकळ पारख म्हणून सिंद्याचा एक सावकार होता त्याच्या करवी केला,
गौघांटावर एक संगमरवरी छत्री आहे ती संतूजी वाबळे याची असून,या वाबळे घराण्याचा सिंद्यांचे पदरी उदय झाला.इस्माईल बेग गंगाराम भंडारी, खुशालीराम बोहरा, जयपुरचे कारभारी भीमसिंग हळदया वगैरे पुरुष,रणजितसिंग जाठ,गोहदकर राणे,राघवगडकर चव्हाण,काशी नरेश चेतसिंग,हिंमतबहादर गोसावी व त्याचा परिवार,प्रतापसिंग माचेडीवार , जयपुर,जोधपुर,उदेपुर,कोटा,बूंदी वगैरे ठिकठिकाणचे राजे व कारभारी यांचे उद्योग त्या त्या भाषांत उपलब्ध असतील उदेपुरचे कारस्थान मुख्यतः जालीमसिंग कटेकराच्या हातचे असून, तो व लालाजी बल्लाळ यांनी जी कारस्थाने केली,
त्यांचे उल्लेख गुलगुले पंडितांच्या दप्तरात सापडतात,मेडता पाटनच्या लढाया, अजमीरचा वेढा व रजपुतांशी झालेले महादजींचा तह,या सर्व गोष्टी सिनद्यांचे स्मरण ताजे ठेवतील,बुल्यम टोन व ब्राउटन यांच्यासारख्यांनी लिहुन ठेवलेल्या हाकिकती मराठेशाहीच्या निकृष्टावस्थेतल्या होत्या त्यांची दुसरी उज्ज्वल बाजू आपणांस मराठी कागदात मिळते,शिंदे घराण्याने व एकंदर मराठ्यांनी उत्तरेत चांगल्या गोष्टी काय केल्या,देवस्थानांची व धर्माची स्थापना कशी केली,अन्याय व अंदाधुंदी मोडून राज्याची व्यवस्था व लोकांची नीतिमत्ता कशी सुधारली,या गोष्टी बाहेर येऊन इतिहासाची पूर्तता झाली पाहिजे,अभ्यासकांस अद्यापि विपुल क्षेत्र आहे
संदर्भ-मराठी रियासत खंड ७ सरदेसाई.

#उत्तरेतील_मराठ्यांचा_दरारा #पाटीलबुवा

 पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठ्यांची सत्ता थोडीशी कमकुवत झालेली होती, उत्तरेतील काही सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांचे वर्चस्व जुगारून स्वतंत्र होण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक होते आणि हे कार्य महादजी शिंदे यांनी केले हे प्रकर्षाने जाणवते. उत्तरेतील या मोहिमेत महादजी शिंदे यांच्याबरोबर अनेक मराठा सरदार होते पण विशेषतः महादजी शिंदे यांनी उत्तरेत आपले अस्तित्व आणि कर्तबगारी सिद्ध केलेले दिसून येते..

महादजी शिंदे यांनी उत्तरेत प्रवेश करताच प्रथम मराठा अंमलाखाली असलेल्या प्रदेशातून खंडणी वसूल करण्याचे काम केले. पानिपत युद्धानंतर काही राजांनी खंडणी दिलेली नव्हती ती महादजी शिंदे यांनी वसूल करून पहिल्यांदा मराठ्यांचा वचक निर्माण केला ( १७६९-१७७०)
पानिपतच्या युद्धानंतर नजीबखान हा दिल्लीत वजीर म्हणून काम करत होता पण काही कारणाने त्याने आपल्या मुलाला म्हणजे झबेताखान यास ही जबाबदारी सोपवून तो नजीबाबाद येथे राहण्यासाठी गेला होता. मराठ्यांनी उत्तरेत प्रवेश केलेला समजतास नजीबखान हा चिंतेत पडला, कारण त्याच्या मदतीस आता अब्दाली पुन्हा येऊ शकत नव्हता आणि त्यातच नजीबखानाचा ह्याचा मृत्यू झाला.( १७७० )
मराठ्यांनी आता दिल्लीवर आक्रमण करण्याचे ठरवले, त्याचवेळी महादजी शिंदे यांनी इटावा भाग जिंकला. मराठे वरचढ होत आहेत हे दिसताच झबेताखान याने दिल्लीतून पळ काढलेला होता आणि तो आता मराठ्यांच्यावर आक्रमण करण्याचा विचार करू लागला. दुसरीकडे महादजी शिंदे यांनी अहमदखान बंगश यास वटणीवर आणले, बंगश हा मराठयांना विरोध करू शकत नव्हता त्याने पानिपतनंतर जिंकलेला भाग मराठ्यांना परत केला. अशाप्रकारे दाओबमधील प्रदेश मराठयांनी पुन्हा काबीज केला आणि आपली सत्ता पुन्हा स्थापन केली.( १७७०- १७७१ )
१७७२ मध्ये मराठयांनी शुक्रताल काबीज केले, शुक्रताल येथे महादजी शिंदे यांचे बंधू दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू झाला होता त्याचा बदला महादजी शिंदे यांनी घेतला, या युद्धातून झबेताखान याने पळ काढला. त्यानंतर महादजी शिंदे यांनी नजीबखान याच्या अंमलात असलेले शुक्रताल, फत्तरगढ व घोसगड हे बळकट किल्ले देखील काबीज केले. अशाप्रकारे मराठ्यांनी पुन्हा एकदा उत्तरेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

#उत्तरेतील_मराठ्यांचा_दरारा
-राज जाधव

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...