विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

घड्याळे : मराठा इतिहासातील एक रंजक किस्सा


 घड्याळे : मराठा इतिहासातील एक रंजक किस्सा

इतिहास म्हटला की युद्धे, किल्ले, राजकारण आणि पराक्रम यांचीच चर्चा होते. पण इतिहासात काही अशा गोष्टीही सापडतात, ज्या त्या काळातील दैनंदिन जीवनाची झलक दाखवतात. त्यापैकीच एक म्हणजे घड्याळे.
थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठा दरबारात आजच्या हातघड्याळांसारखी लहान घड्याळे तसेच किल्ली फिरवून चालणारी यांत्रिक घड्याळे वापरात होती, याचे अनेक उल्लेख उपलब्ध आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा प्रकारची घड्याळे वापरात होती का, याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.
प्रवासी निकोलाओ मनुची याने आपल्या पुस्तकात औरंगजेबाला एक घड्याळ भेट दिल्याचा उल्लेख केला आहे. मात्र ते घड्याळ आधुनिक यांत्रिक स्वरूपाचे नसून, सावलीच्या आधारे वेळ दाखवणारे सूर्यघड्याळ (Sundial) असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
सन १७३५ मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांचे बिघडलेले घड्याळ कॅप्टन वॉकर यांनी दुरुस्त केल्याची माहिती एका पत्रातून मिळते. यावरून त्या काळात मराठा दरबारात यांत्रिक घड्याळांचा वापर होत असल्याचे स्पष्ट होते.
इतकेच नव्हे, तर पेशव्यांनी स्वतःसाठी २,७७० रुपयांना तीन घड्याळे विकत घेतल्याची नोंदही उपलब्ध आहे. त्यापैकी एका घड्याळाची किंमत ६३५ रुपये, तर दुसऱ्याची १,६९१ रुपये ८ आणे (अंदाजे १,६९१.५० रुपये) इतकी होती.
६३५ रुपयांच्या घड्याळाची नोंद अशी आढळते—
«"हात घड्याळ, तीन काट्याचे, साखळी चार पदरी, शेवटास घंटा एक, उत्तरदाणीचे घर एक, किल्ली तांब्याची, विलायती. किंमत – ६३५ रुपये."»
यावरून हे घड्याळ परदेशातून (विलायत) आणलेले, तीन काटे असलेले, साखळी व किल्लीसह वापरले जाणारे होते, हे स्पष्ट होते.
पुण्याच्या पेशवे दफ्तरातील चिटणिशी दफ्तराच्या नवव्या रुमालात फत्तेसिंग भोसले यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात आणखी एक रंजक उल्लेख आढळतो.
या पत्रावरून समजते की बाजीरावांनी फत्तेसिंग भोसल्यांना एक घड्याळ पाठवले होते. ते घड्याळ नेमके किती मोठे होते, याची माहिती मिळत नाही; मात्र ते फार मोठे नसावे. भोसले लिहितात की त्यांच्या ठिकाणी आधीपासूनच एक-दोन घड्याळे दुरुस्तीसाठी होती. पण बाजीरावांनी पाठवलेले हे नवीन घड्याळ वेगळ्या प्रकारचे होते. त्याला दोन किल्ल्या होत्या. त्यांपैकी आधी कोणती आणि नंतर कोणती फिरवायची, तसेच घड्याळ सुरू करण्याची योग्य पद्धत कोणती, हे समजत नसल्याने त्यांनी थेट बाजीरावांनाच पत्र लिहून मार्गदर्शन मागितले.
या पत्रव्यवहारावरून त्या काळात महाराष्ट्रात घड्याळे वापरली जात होती, ती दुरुस्त करणारे कारागीरही होते आणि नवीन प्रकारच्या युरोपीय यांत्रिक घड्याळांची ओळख मराठा दरबाराला झाली होती, हे स्पष्ट होते.
निष्कर्ष
उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवरून असे म्हणता येते की थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात महाराष्ट्रात हातघड्याळे तसेच किल्ली फिरवून चालणारी यांत्रिक घड्याळे वापरात होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा घड्याळांच्या वापराचा ठोस पुरावा उपलब्ध नाही.
इतिहासातील अशा छोट्या नोंदी त्या काळातील जीवनशैली, तांत्रिक प्रगती आणि मराठा दरबाराचे जागतिक संपर्क यांची मौल्यवान माहिती देतात.
धन्यवाद!

छत्रपती शिवाजी महाराजांचे ७ घोडे!

 


छत्रपती शिवाजी महाराजांचे ७ घोडे!

इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक उत्कृष्ट अश्व असल्याचे उल्लेख आढळतात. त्यापैकी प्रसिद्ध घोड्यांची नावे पुढीलप्रमाणे सांगितली जातात:
🐎 मोती
🐎 विश्वास
🐎 तुरंगी
🐎 इंद्रायणी
🐎 गाझर
🐎 रणभीर
🐎 कृष्णा
महाराज प्रत्येक घोड्याचा वापर त्याच्या वेग, सहनशक्ती आणि मोहिमेच्या गरजेनुसार करत असत. त्यांच्या अश्वदलामुळे स्वराज्याच्या अनेक धाडसी मोहिमा यशस्वी झाल्या.
जय भवानी! जय शिवराय!

शिवजन्मतिथी : १९ फेब्रुवारी १६३० (शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया)

 


शिवजन्मतिथी : १९ फेब्रुवारी १६३० (शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत अनेक वर्षे वाद होता. एक मत महाराजांचा जन्म शके १५४९, वैशाख शुद्ध द्वितीया (इ.स. १६२७) असा मांडत होते, तर दुसरे मत शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया (१९ फेब्रुवारी १६३०) हे योग्य असल्याचे प्रतिपादन करत होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दादासाहेब जेधे यांच्याकडून जेधे शकावली मिळवली होती. मात्र त्यांना मंडाले (ब्रह्मदेश) येथे कारावास भोगावा लागल्यामुळे त्या शकावलीचा अभ्यास तत्काळ प्रकाशित होऊ शकला नाही. पुढे १९१६ मध्ये पटवर्धन यांनी जेधे शकावली प्रसिद्ध केली. या शकावलीत शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया ही जन्मतिथी स्पष्टपणे नमूद असून, त्यासोबत घटक, पळ, नक्षत्र यांचाही उल्लेख आढळतो.
त्यानंतर १९२५ मध्ये प्रकाशित झालेल्या शिवचरित्र प्रदीप या ग्रंथातही विविध शकावल्यांच्या आधारे हीच जन्मतिथी ग्राह्य धरली गेली.
याशिवाय राजस्थानात शिवराम ज्योतिषी यांनी तयार केलेली शिवाजी महाराजांची समकालीन कुंडली उपलब्ध झाली. तसेच उदयपूर संस्थानातील बानेड आणि बिकानेर फोर्ट ग्रंथालयात आणखी दोन कुंडल्या सापडल्या. या तिन्ही कुंडल्यांमधील ग्रहस्थिती शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया या तिथीशी सुसंगत असल्याचे दिसून येते.
या सर्व पुराव्यांवरून १६३० सालाची जन्मतिथी अधिक बळकट होत असली, तरी इतिहासकारांमध्ये मतभेद कायम राहिले. दत्तोपंत आपटे, चिंतामणी वैद्य, करंदीकर, दिवेकर, बेंद्रे, शंकर जोशी, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, जदुनाथ सरकार, गौरीशंकर ओझा, वेणीप्रसाद, गद्रे, वाकसकर इत्यादी विद्वानांनी या विषयाचा अभ्यास केला; मात्र त्यांच्यामध्येही दोन भिन्न मतप्रवाह होते.
या वादाचा निकाल लावण्यासाठी १९६६ मध्ये महाराष्ट्र शासनाने इतिहासतज्ज्ञांची समिती नेमली. या समितीत द. वा. पोतदार, न. र. फाटक, पवार, खरे, बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे आणि दीक्षित यांचा समावेश होता. समितीमध्ये एकमत झाले नाही. फाटक व पवार यांनी १६२७ या मताचे समर्थन केले, तर इतर सदस्यांनी १६३० या मताला पाठिंबा दिला. त्यामुळे ठोस निष्कर्ष निघेपर्यंत शासनाने परंपरेने साजरी होणारी शके १५४९, वैशाख शुद्ध द्वितीया ही तिथी कायम ठेवली.
दरम्यान, शिवदिग्विजय बखर मध्ये शिवजन्मतिथीविषयी तीन संस्कृत श्लोक दिलेले आहेत. हे श्लोक, उपलब्ध तिन्ही कुंडल्या आणि जेधे शकावली यांचा परस्पर मेळ शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया याच तिथीशी जुळतो.
तसेच गागाभट्टांनी रचलेल्या शिवराज्याभिषेकप्रयोग या ग्रंथात राज्याभिषेकाचा मुहूर्त निश्चित करताना शिवाजी महाराजांची जन्मकुंडली आधारभूत मानल्याचे दिसून येते. त्या कुंडलीचाही मेळ १६३० सालाशीच बसतो.
अखेर महाराष्ट्र शासनाने इतिहासकारांच्या संशोधनाचा पुनर्विचार करून २००१ मध्ये १९ फेब्रुवारी १६३० (शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया) हीच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख अधिकृतपणे स्वीकारली. त्यानंतर १९ फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती म्हणून शासकीय सुट्टीसह अधिकृतरीत्या साजरा केला जाऊ लागला.
तळटीप :
१) विजय देशमुख, शककर्ते शिवराय, पृ. १४१–१५४.

सरसेनापती संताजीराव घोरपडे

 साधारण सांगली कोल्हापूर भागातली मोठासा भाग संताजी घोरपडे यांच्या कडे देशमुखी म्हणून होते. खालील पत्र १६९२ मधील छत्रपती राजाराम महाराजांचे आहे.हे पत्र संताजी घोरपडे ने यांनी १६८९ पासून १६९२मध्ये गाजवलेल्या पराक्रम च आहे. जेंव्हा छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाली तेंव्हा मराठे संपले अशी संपूर्ण भारताची धारणा झालेली असताना संताजी ने एकहाती मुघल वार भीषण हल्ले केले. लक्षात घ्या यावेळी धनाजी त्यामानाने थोडे वयाने लहान होते. सांगली जिल्ह्यातील विटा मध्ये भालवणी नावाच्या गावात त्यांचा वाडा होता.त्यांच्या मानस पुत्र नारो महादेव जोशी या कडे इचलकरंजी ची जहागिरदार गेली तिथेच बाजीराव पहिल्या यांची बहीण अनुबई याना घोरपडे कुटुंबात दिली. (पुढे नारो महादेव जोशी यांनी आपले आडनाव घोरपडे केले ते संताजी साठी, तपण मूळ ते ब्राम्हणच) कापाशिकर घोरपडे सुद्धा त्यांचाच जहागिरदार च भाग.


सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या सोयराबाई दुसर्या द्वारकाबाई होय. सोयराबाई यांना राणोजी तर द्वारकाबाई यांना पिराजी हे पुत्र होय. तारिख दिलकुशा मध्ये भीमसेन सक्सेना लिहिते की, "संताजीच्या निधनानंतर पुढे ५ -६ वर्ष राणोजीने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी निकराची झुंज दिली. शिपाईगिरीत तो आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे होता. त्यावरुन १७०१ ते१७०२ हे वर्षे राणोजी घोरपडे यांनी गाजवून सोडलीे होती.
सन १७०२ मध्ये कनार्टकतील वाकीनखेड्याच्या लढाईत चंदनगढीला मराठ्यांच्या वेढा घातला असता बेडरविरूध्दच्या लढाईत राणोजींना बंदुकीच्या गोळी लागून वीर मरण प्राप्त झाले. राणोजींना पुत्र संतती नव्हंती. त्यांच्या मृत्यूनंतर आई सोयराबाई या आपल्या दिराकडे म्हणजे बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांच्याकडे गजेंद्रगड येथे राहत होत्या.त्यांच्या नेमणुकीस बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांनी मौज गंगावती प्रांत हुक्केरी व आणखी काही गावे लावून दिली होती. राणोजींच्या पत्नी संतूबाई होत. त्या राणोजींच्या निधनानंतर त्यांना कसबा कापशी सुभा आजरे हा गाव व इतर आणखी उत्पन्न नेमून दिले होते. त्या संताजीची द्वितीय पत्नी द्वारकाबाई जवळ राहत होत्या. राणोजीच्या अकाली निधनानंतर सेनापती घोरपडेच्या घराण्यावर आलेलेल्या संकटातून बाहेर काढले ते सरसेनापती संताजींच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई साहेब यांनी.अशा अवघड प्रसंगी त्यांना साथ दिलीे ती संताजींचे मानसपुत्र नारो महादेव घोरपडे (जोशी) यांनी होय. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राजपुत्र शिवाजी (दुसरे) यांना रणराणी, महाराणी ताराबाई साहेब यांनी गादीवर बसवून स्वतः महाराणी ताराबाई साहेब यांनी राज्यकारभार व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली वर सेनापती पद अनुभवी व पराक्रमी धनाजीराव जाधवराव यांना दिले. ते योग्य सुध्दा होते. सेनापती राणोजींचा, सेनापती धाकटा भाऊ पिराजी यास द्या हि मागणी द्वारकाबाई साहेब यांनी केली पण पिराजी हा लहान होता म्हणून शक्य झाले नाही परंतु महाराणी ताराबाई साहेब यांनी इ. सन १७०३ मध्ये पिराजीच्या नावे वडिलोपार्जित सरंजामदार चालु ठेवण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी द्धारकाबाई साहेब घोरपडे यांनी करुन घेतला. पण त्यांना सेनापती पद दिलो नाही. याची रुखरुख द्वारकाबाई साहेब यांना लागून राहिली. पण या काळात औरंगजेब बादशहा इरेला पेटला होता व मराठ्यांच्या अंत्यत आणीबाणीच्या कालावधीत द्वारकाबाई साहेब यांनी सेनापती पदाचा विचार सोडून मानसपुत्र नारो महादेव जोशी यांच्याकडे सैन्य देऊन औरंगजेब विरोधात महाराणी ताराबाईसाहेब यांना साथ दिली. व सरंजामाचा कारभार आपल्या हातात घेऊन योग्य उत्पन्न मिळत ठेवले कारण सैन्यात पगार वगैरे वेळेवर देऊन औरंगजेब विरोधात जोरदार लढाईत पुढाकार घेतला. तसेच बहिर्जी घोरपडे याच्याशी समजूतशीर भूमिका घेतली. महाराणी ताराबाई साहेब यांना भेटून छत्रपती घराण्यावर निष्ठा कायम ठेवत असे आशिर्वाद घेतले. १७१० नंतर छत्रपतीच्या दोन गादी निर्माण झाल्या. सातारा व कोल्हापूर. महाराणी ताराबाई साहेब यांना पिराजी घोरपडे हे ११ - १२ वर्षेचा आहेत म्हणून सेनापती पदी बहिर्जी घोरपडे गजेदगडकर यांचा पुत्र शिदोजीराव घोरपडे यांच्या कडे दिले.
कापशीकर घराण्यातील सेनापती पद घोरपडेंच्या दुसऱ्या शाखेकडे गेल्यामुळे मोताश्री द्वारकाबाई साहेब या नाराज झाल्या. पण पुढे १५ जुन १७२१ मध्ये शाहू महाराजांनी पिराजी घोरपडे यांच्या नावाने सनद दिली . ती सनद दिली खालीलप्रमाणे
असून त्यात पिराजी सेनापती असा उल्लेख आहे पुढे १७२८ ला मौजे नागनूर कर्योत नूल येथील छत्रपतींना पाळेगराचा त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी गेलावर तेथील देशमुखशी लढाईत पिराजी मृत्यू झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा राणोजी (२)यांस सेनापतीपदी नियुक्त केले

Sunday, 10 May 2026

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी




 राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्रांतात आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली होती. राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या एकत्रित हालचालींमुळे शत्रूवर मोठा वचक बसला होता. या दोन सरदारांनी मिळून केलेल्या एका मोहिमेचा उल्लेख पिलाजी जाधवराव यांनी चिमाजी अप्पांना पाठवलेल्या पत्रात येतो.
​बडवाई प्रांतात शिंदे आणि होळकर यांनी शत्रूला चहुबाजूंनी घेरून त्यांना जेर केले. शत्रूला नमवल्यानंतर तिथून मराठा दौलतीसाठी खंडणी वसूल करण्यात आली. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या सरदारांनी तिथे मोर्चे लावून शत्रूवर दबाव निर्माण केला होता, ज्यामुळे शत्रूला शरणागती पत्करावी लागली.
​पेशवे दप्तर नोंद-
"राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री सिंदे याजकडील वर्तमान आले कीं बडवाई प्रांत मालवा येथे मोर्चे देऊन जेर करून खंडणी घेतली म्हणऊन आले."

सरकार शिक्का आणि राणोजी शिंदे

 


सरकार शिक्का आणि राणोजी शिंदे

मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये पराक्रमासोबतच प्रशासकीय विश्वासाला किती महत्त्व होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राणोजी शिंदे. छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाजीराव यांनी ज्या सरदारांवर स्वराज्याची मोठी जबाबदारी सोपवली, त्यामध्ये राणोजींचे स्थान अग्रक्रमी होते. त्यांच्या कर्तृत्वावर आणि निष्ठेवर राज्यकर्त्यांचा किती गाढा विश्वास होता, हे एका ऐतिहासिक पत्रावरून स्पष्ट होते.
राज्याचा अधिकृत कारभार चालवण्यासाठी लागणारे सरकारी शिक्के थेट राणोजींच्या स्वाधीन करणे, ही त्यांच्या विश्वासार्हतेवर झालेली मोठी मोहोर होती.
पेशवे दप्तर नोंद-
"राजश्री राणोजी शिंदे यांजपाशी सरकारचे शिक्के देऊन रवाना केले आहेत. याणी आपले जवळ शिक्के ठेवून सरकारचा कारभार करावा. अथवा यांस योग्य वाटेल तर मल्हारजी होळकर यांजपाशी देऊन किंवा आपले जवळ ठेवून शिक्के मारण्याचे काम चालवावे."
याचा सरळ अर्थ असा की, सरकारी कामकाजाचे सर्वात महत्त्वाचे साधन असलेले शिक्के राणोजींकडे सोपवण्यात आले होते. ते स्वतःजवळ ठेवून कारभार करण्याची किंवा प्रसंगी मल्हारराव होळकर यांच्याकडे देण्याची पूर्ण मुभा त्यांना दिली होती.
कारभार सुरळीत चालणे हाच यामागचा मुख्य हेतू होता.
एखाद्या सरदाराकडे राज्याचे शिक्के असणे, याचा अर्थ त्यांना प्रशासकीय निर्णयांचे सर्वाधिकार देणे असा होतो. राणोजींनी केवळ तलवारीच्या जोरावर साम्राज्य वाढवले नाही, तर आपल्या चोख आणि प्रामाणिक वर्तनाने राज्याचा विश्वासही संपादन केला.त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे.
संदर्भ: पेशवे दप्तर, भाग ३०, पान २०६

छत्रपती शाहू महाराजांचे न्यायविषयक धोरण

 


छत्रपती शाहू महाराजांचे न्यायविषयक धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात प्रजेच्या कल्याणासोबतच न्यायव्यवस्थेला अत्यंत महत्त्व दिले होते. हाच न्यायाचा आणि नि:पक्षपाती प्रशासनाचा आदर्श छत्रपती शाहू महाराजांनीही कसा प्राणपणाने जपला होता, हे एका ऐतिहासिक पत्रावरून अत्यंत स्पष्ट होते. राज्याचा कारभार चालवताना न्यायाच्या बाबतीत कोणतीही तडजोड महाराजांना मान्य नव्हती. राज्याचे सर्वोच्च अधिकारी असलेल्या पेशव्यांकडून न्यायाच्या बाबतीत पैशांची अपेक्षा धरली जात असल्याची कुणकूण लागताच, शाहू महाराजांनी आपला प्रतिनिधी महादोबा पुरंदरे याला बोलावून घेऊन पेशवे बाजीराव यांच्यासाठी अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दांत निरोप दिला-
"आजकाल ईस्वरइछेने राजश्री प्रधानपंताच्या सर्व गोस्टी सर्वोत्कर्ष आहेत. याची कीर्ति भूमंडली बहुत दिवस राहील... परंतु येक गोस्टी अनुचित करितात कीं, द्रव्याची अश्या धरून... अर्जिले कीर्तीस किंचित कलंक सांभाळावा."
सध्या बाजीरावांचा सर्वत्र उत्कर्ष होत आहे आणि त्यांची कीर्ती अनेक दिवस टिकून राहील. पण ते पैशांची आशा धरून न्यायाच्या बाबतीत जी अनुचित गोष्ट करत आहेत, त्यामुळे त्यांच्या मिळवलेल्या या महान कीर्तीला कलंक लागेल, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. यानंतर महाराजांनी न्यायदानाचे महत्त्व सांगताना थेट दादाजी कोंडदेव आणि औरंगजेब बादशहाचा दाखला देत न्यायाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले-
"मागे दादाजी कोंडदेव लाहानसाच ब्राह्मण झाला; परंतु त्याणे जे इनसाफ केले ते अवरंगजेब पातशाहासहि बंद्य जाहले."
म्हणजेच, दादाजी कोंडदेव हे सामान्य असले तरी त्यांनी जो नि:पक्षपाती न्याय केला, तो थेट औरंगजेब बादशहालाही वंद्य (आदरणीय) वाटला. यातून महाराजांनी हे स्पष्ट केले की, राज्याच्या तिजोरीत द्रव्य नसले तरी चालेल, पण न्याय हा नेहमी खरा आणि नि:पक्षपातीच असला पाहिजे. खऱ्याकडून किंवा खोट्याकडून पैसा घेऊन न्याय विकण्याचा अधिकार कोणालाही नाही. लष्करी मोहिमांबरोबरच प्रशासनात न्यायाचे पारडे जड ठेवल्यानेच मराठा साम्राज्य खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य म्हणून उभे राहिले.
संदर्भ: पेशवे दप्तर, भाग १७, पत्र क्रमांक ५२

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...