विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 28 November 2022

महाराष्ट्रावर शकांचे राज्य

 

महाराष्ट्रावर शकांचे राज्य

आपण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे प्राचीन भारत हा आज जसा आपल्याला माहित आहे तसा नव्हता. भारत हे नाव, हिंदू तसेच इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शिख हे सगठित धर्म म्हणून अस्तितवात नव्हते. प्राचीन इतिहास समजून घेतांना या गोष्टी लक्षात ठेवल्या की इतिहास समजायला सोपा जातो.
आता तुमचा पहिला प्रश्न की शक कोण होते? कुठुन आले होते?
शक ही मध्य आशियातील (इराण) एक भटकी जमात होती. ते स्वतःला श्कूदत म्हणत, शक भाषेत याचा अर्थ धनुर्धारी असा होतो. शक अतिशय तरबेज असे धनुर्धारी होते. विषारी आणि काटेरी बाणांचा उपयोग सर्वप्रथम यांनी केला. ग्रीक लोकं यांना स्कायताई म्हणायचे, इंग्लिशमध्ये यांना स्किथीयन तर संस्कतमध्ये यांना शक म्हणत. दळणवळणासाठी घोडे हे त्यांचे प्रमुख साधन होते.
भारताचा उत्तर पश्चिम भाग (वायव्य) जेथून भारतात सर्वाधिक आक्रमणं झाली.हा खुष्कीचा मार्ग असल्याने ग्रीस, इराण, तुर्की, अफगाण, मध्यपूर्व या भागातील टोळ्या यामार्गाने वेळोवेळी भारताच्या उत्तर पश्चिम भागात आल्या आणि तिथे स्थिरावल्या. या सर्व टोळ्यांना आपल्या राहत्या भागातून पळ काढावा लागला किंवा युद्धात पराभव झाल्याने आपला राहता भाग सोडावा लागला. कारण या सर्व भागात टोळ्यांचे आपापासात वर्चस्वासाठी युद्ध व्हायचे प्रकार वारंवार होत असत.
मौर्य साम्राज्य लयाला गेल्यानंतर भारताच्या उत्तर पश्चिम भागात मध्य आणि पश्चिम आशियातील लोकांचे राज्य होते. ख्रिस्तपूर्व १८०बीसी ते ५५बीसी या काळात इंडोग्रीक यांचे राज्य या भागात होते. ख्रिस्तपूर्व १ल्या शतकात इंडो स्किथीयन अर्थात शकांनी या भागावर ताबा मिळवला आणि शक साम्राज्याची सुरुवात झाली.
  • मॉइस वा मोगा हा त्यांचा पहिला शासक, तो गांधारचा राजा होता. त्याची राजधानी सिरकप होती (आजचे पंजाब, पाकिस्तान). त्याने आजूबाजुचा इंडोग्रीक परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. याने पाडलेल्या अनेक नाण्यांवर बौद्ध आणि हिंदू चिन्हं होती. तसेच ग्रीक आणि खरोश्ती भाषेचा वापर केलेला होता.
  • याचाच वंशज चास्तना किंवा चेस्तनने शकांचे राज्य उजैनपर्यंत वाढवले. यालाच पश्चिम क्षत्रप म्हणूनही ओळखले जाते. ख्रिस्ताच्या अंतानंतर ७८व्या शतकापासून शक कालगणना सुरु झाली असावी असा अंदाज आहे. चास्तनाने भद्रमुख म्हणून शक क्षत्रप साम्राज्याची उभारणी केली.
  • शक साम्राज्याची दुसरी शाखा क्षहरता म्हणून ओळखली जाते, जिचा शासक नहापना हा होता. याचाच पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणीने पराभव केला.
  • रुद्रदमन हा श्रेष्ठ शक शासक म्हणून ओळखला जातो. हा चास्तनाचा नातू होता. याने आपल्या काळात कोकण, नर्मदेचं खोरं, काठियावाड, माळवा आणि गुजरातच्या इतर भागात आपले राज्य वाढवले. काठियावाडमधील सुदर्शन तळ्याची डागडुजी केली. याने हिंदु मुलीशी लग्न केलं आणि तो हिंदु धर्म मानू लागला. संस्कृत भाषेचं संवर्धन करण्यातही याचा सहभाग होता. तो स्वतःला महाक्षत्रप म्हणत असे. आपली मुलगी याने सातवाहन कुळात दिली होती. याच्या काळात ग्रीक लेखक यवनेश्वर भारतात राहिला होता, त्याने यवनजातक या ग्रंथाचे ग्रीकमधून संस्कृतमध्ये भाषांतर केले.
  • कालांतराने सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणी याने शक साम्राज्याचा पराभव केला. ख्रिस्ताच्या अंतानंतर ४थ्या शतकात शक राजा रुद्रसिंह तिसरा याचा चंद्रगुप्त दुसरा याने पराभव केला आणि भारतातील मध्य आणि पश्चिमेतील शक साम्राज्य संपुष्टात आले.
वर सांगितल्याप्रमाणे प्राचीन काळात आजच्यासारखे धर्म संगठित नव्हते. नवीन शासक आपल्या नवीन कल्पना, परंपरा घेऊन यायचे. इथल्या आधीपासून अस्तितवात असलेल्या परंपरा, चालीरीती यात आपल्या चालीरीती परंपरा मिसळून टाकायचे. इथल्या स्थानिक लोकांशी लग्न झाल्याने त्यांची वंशपरपरा नक्कीच सुरु राहिली असेल. पण त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचं आहे.
पश्चिम आणि मध्य भारतात शकांचे राज्य असल्याने त्यांचा प्रभाव नक्कीच होता. शक कालगणना आपण आजही मानतो. प्राचीन भारतातील ज्योतिष ग्रंथात शक संवतचा उपयोग केलेला आहे. शक संवतलाच शालिवाहन शक म्हणूनही ओळखले जाते.
पोस्त सांभार :वैशाली भिडे


Friday, 25 November 2022

।। छत्रपती शाहु महाराजांची शेतीवरील शेतसारा कराची पुनर्रआकारणी. शेतकऱ्यांना रयतेला उत्तेजन देण्यासाठीच्या तरतुदा. ।।

 


।। छत्रपती शाहु महाराजांची शेतीवरील शेतसारा कराची पुनर्रआकारणी. शेतकऱ्यांना रयतेला उत्तेजन देण्यासाठीच्या तरतुदा. ।।
छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा कार्यकाळ हा स्वराज्यासाठी मोलाचा ठरला. महाराष्ट्रातील एका अतिशय भक्कम, छोट्या पण ज्याची मुळे सबंध भारतावर राज्य करणाऱ्या मोगलांना हि हलवता आली नाहीत. अस्या राज्याच मराठा साम्राज्यात रुपांतर केल ते छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी. शाहू महाराजांच्या कारभारात शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व पडीक जमिन लागवडी खाली आनने यावर हि चांगला भर दिला गेला. तो देत असताना अगोदरच शेती कसणारा शेतकरी याकडे दुर्लक्ष मात्र केले नाही. दुष्काळात शेती पिकली नाही किंवा अतिवृष्टीत शेतीच नुकसान झाले किंवा शत्रु सैन्याने गावे लुटली, घरे जाळली, पिकांची नासाडी केली तर अस्या परस्तिथीत शाहू महाराज व पुढिल काळात पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण स्वीकारतात व सारा माफी देतात. सारामाफी देत असताना पेशव्यांकडून त्या गावची, परगण्याची, पाहणी करुन सारामाफी ठरवली जात असे. किती नुकसान झाले यावर सारा माफी ठरली जात. दोन वर्षे तिन वर्षे, चार वर्षे असी सारा माफी असे तर काही गावात साऱ्यात काहि प्रमाणात सवलत दिली जात व उरलेली साऱ्याचा वसुल भरणा करण्यासाठी दोन हप्ते चार हप्ते असी सवलत दिली जात. याने रयतेवर बोजा पडत नसे व राज्याच्या खजिन्यावर हि अतिरिक्त भार पडत नसे. शिवाजी महाराजांनी राजकारभाराची घालुन दिलेली पद्धत पुढील काळात तसीच पुढे संभाजी महाराजांनी त्यांच्या नंतर राजाराम महाराज व पुढे महाराणी ताराराणी यांनी त्याच सूत्राने राज्यकारभार चालवला.
शाहू महाराजांच्या काळात १७४५ मध्ये 'नाणे' तर्फ मधील 'कानू' हे गाव जाळले गेले, त्या वेळी एक खंडी बारा मण सारा माफ करण्यात आला होता. नंतर १७४७ मध्ये परगणा बकवाडा व जलालाबाद परगण्यांचा अधिकारी रामचंद्र बल्लाळ याने हुजूर कळविले की सर्व जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे, तगाई देऊन लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु आधीच अन्नावाचून अनेक लोक बळी गेले. त्या वेळेस हुजूरातुन चार वर्षपर्यंत त्यांना सारा माफी देण्यात आली. पुढे शाहू महाराजांचे देहावसान झाल्या नंतर एका वर्षानी १७५०-५१ मध्ये 'वाण परगण्यातील पाचोरा गावचे' गावकरी पुण्यास गेल्याने पिके बुडाली, म्हणून सारामाफीसाठी विनंती केली. त्यांचा सारा रु. २,६१३ पैकी रु. १३१३ माफ करण्यात आले. उरलेला शेतसारा त्यांना रु. १३०० चार प्रतिवर्षी हप्त्यात भरण्यासंबंधी परवानगी दिली. थोरल्या माधवराव पेशव्याच्या काळात १७७०-७१ मध्ये जुन्नर प्रांतातील चाकण तर्फ मधील आळंदी हा गाव मोगलांनी जाळला लुटला. म्हणून येथिल देशमुख शेशपांडे यांनी हुजूर येऊन विनंती केली त्या मुळे आळंदि चा दोन वर्षाचा शेतसारा पुर्ण माफ केला.
१७६३ साली पेशवेकाळात 'भिकाजी विश्वनाथ' हवालदार तर्फ खेड चाकण व देशमुख देशपांडे परगणे जुन्नर यांनी हुजूर येऊन विदीत केले, प्रांत जुन्नरचे गाव मोगलांच्या दंग्यामुळे जळाले व लुटले, त्यास सुभा जाऊन कौल करार घेऊन लावणी करावयाची आज्ञा करावी म्हणोन विनंती केली. त्यावरून मनास आणून आबदानीवर नजर देऊन कौल द्यावयाची कलमे करार करून दिली बितपशील. कलमे पुढिल प्रमाने- दरोबस्त गाव जळाले, दाणादुणा, वैरण, गुरेढोरे दरोबस्त लुटून नेली, त्यास साल मजकूर दरोबस्त महसूल माफ. काही घरे जळाली, काही लुटले गेले त्या गावापासून साल मजकूरी निमे वसूल घ्यावा. घरे जळाली नाही, वस्तभाव लुटली गेली त्यापासून साल मजकूरी एक साला तिजाई आकाराची घ्यावी. खंडणी देऊन गाव वाचले असेल त्यापासून साल मजकूरी निमे वसूल घ्यावा. अगदी दरोबस्त गाव वाचले असतील त्याची चौकशी करून वाजवी आकाराप्रमाणे पैका वसूल करावा. पुढे पीकपाणी पाहून जीवन माफक घ्यावे याप्रमाणे करार. यावरुन एक गोष्ट लक्षात येते कि दुष्काळात, अतिवृष्टीत, शत्रुसेन्या कडून गावचे झालेल्या नुकसानावर स्वराज्यात सारा माफी देऊन रयतेला बळ देण्याचे धोरण अवलंबले जात. तर पडिक जमिन लागवडी खाली आनुण उत्पन्न वाढीवर हि भर दिला जात असे.
संदर्भ:-
¤ पेशवे दप्तर खंड ६ पृ. २२४, २४२ - २४७, खंड ३,- पृष्ठ. २३१,
¤ Administrative System of Maratha- डाॅ. सुरेंद्रनाथ सेन,
संकलन:-
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

Wednesday, 16 November 2022

।। इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात झालेला तह.।।

 

।। इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात झालेला तह.।।


।। इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात झालेला तह.।। शिवछत्रपतींचे आरमार- ग.भा.मेहेंदळे, शिवछत्रपतींची पत्रे- डाॅ.सौ.अ.गो. कुलकर्णी यांच्या प्रकाशित साधनांच्या आधारे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेऊन पुढे आरमार बांधले, त्यासाठी पोर्तुगीज नवशिल्यांची मदत घेतली होती. महाराजांचे आरमार समुद्रात उतरे व कमी काळात ते सक्षम हि झाले. मग आरमारी सत्ता पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांना स्वताच्या आरमारी सत्तेला सुरुंग लागतो कि काय असी भिती निर्माण होऊ लागली. त्या जंजिरेकर सिद्धी हे शिवाजी महाराजांच्या मुलखात कागाळ्या तर करतच होता पण अदिलशाही मुलखातील हिंदु रयतेवर हि अन्याय अत्याचार करत होताच. यातुन सिद्धीला आळा घालण्यासाठी महाराजांनी मोहिमा उभारल्या. अन सिद्धीना हे पोर्तुगीज लोक गुप्त पणे मदत करुन लागले. या कारणावरून शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या पोर्तुगीज आरमाराशी काही झटापटी झाल्या. शिवाजी महाराजांच्या आरमाराने पोर्तुगिजांच्या काही नौका पकडल्या आणि पोर्तुगिजांनी इराणच्या आखातातून येत असलेले शिवाजी महाराजांच्या मुलखातले एक तरांडे धरले यानंतर लवकरच, डिसेंबर १६६९ मध्ये, शिवाजी महाराजांचे मुघलांशी पुन्हा युद्ध सुरू झाले. " बहुधा म्हणूनच त्यांनी पोर्तुगिजांशी तह करण्याकरिता आपला वकील विठ्ठल पंडित याला गोव्याला पाठविले. तर ६ डिसेंबर १६६७ रोजी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज गव्हर्नर विजरई कोंदी यास पत्र पाठवले ते पत्र उपलब्ध आहे. त्यातून पोर्तुगीजांच्या या कागाळ्या उघडकीस येतात. पोर्तुगीजांनी १९ नोव्हें. १६६७ रोजी शिवाजी महाराजांच्या मुलखातील कोळी लोक लहान मुले महिला पुरुष यांना धरुन लुटून घेऊन गेले. त्यांच्या बळजबरीने धर्मांतरण करु लागले. लखम सावंत, केशव नाईक देसाई या शिवाजी महाराजांच्या मुलखात उपद्रव करणारे यांना पोर्तुगीजांनी आश्रय दिला होता. मग शिवाजी महाराजांनी पत्र पाठवून हि पोर्तुगीज ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर स्वारी करुन पोर्तुगीजाना झटका दाखवला. या नंतर मग पोर्तुगीजांच्या भिती पोटी शिवाजी महाराजांसोबत तहासाठी तयार झाले. व गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नरने फेब्रुवारी १६७० रोजी अटी थोडक्यात अशा होत्या-
१)पोर्तुगिजांच्या दोन प्रजाजनांकडून जबरदस्तीने घेण्यात आलेले तीन हजार होन शिवाजीराजांनी दोन महिन्यांच्या आत परत करावेत. २)पूर्वीच्या रिवाजानुसार जकात दिल्यावर गोवा आणि मुख्य भूमी यांतील व्यापारी वाहतूक अडथळा न करता, चालू द्यावी. शिवाजीराजे आणि आदिलशाह यांच्यात युद्ध सुरू झाले तरीही ती चाहतूक, दोन्ही बाजूंच्या म्हिणजे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्या हिताच्या दृष्टीने व्यापारात भरभराट व्हावी म्हणून,चालू द्यावी. ३) पोर्तुगिजांच्या प्रजाजनांची शिवाजीराजांच्या आरमाराने धरलेली जहाजे परत करावीत. ४)पोर्तुगिजांच्या शेजारचा जो मुलूख शिवाजीराजांनी काबीज केला आहे त्याच्या - पोर्तुगीज मुलखाला लागून असलेल्या हद्दीवर शिवाजीराजांनी किल्ला बांधू नये, ५) दोन्ही बाजूंमध्ये मैत्रीचे संबंध राहावेत.
पोर्तुगीज गव्हर्नरांनी त्यांच्या बाबतीत खालील शर्ती मान्य केल्या होत्या: (१) शिवाजीराजे (अथवा त्यांचे प्रजाजन) यांची पोर्तुगिजांनी धरलेली जहाजे ते परत करतील. २) शिवाजीराजांच्या प्रजाजनांनी त्यांच्या जहाजांकरिता पोर्तुगिजांच्या शत्रूची बंदरे वगळून इतर कोणत्याही बंदराला जाण्यासाठी मागितलेले परवाने (कार्ताझ), मुघल बादशाहाच्या प्रजाजनांकडून जसे शुल्क घेतले जाते तसे शुल्क घेऊन, देण्यात येतील. ३) करंजाहून गोव्याला अन्नधान्य घेऊन येणाऱ्या लहान नौकांना परवाने (कार्ताझ) घ्यावे लागणार नाहीत. अशा लहान नौकांना पोर्तुगीज जहाजे अडवणार नाहीत.४) शिवाजीराजे आणि पोर्तुगीज परस्परांच्या जहाजांना आपापल्या बंदरात येऊ देतील आणि कोणताही माल खरेदी करू देतील. ५) दंड्याचा सिद्दी पोर्तुगालच्या राजाचा मांडलिक आहे. म्हणून त्याला मदत करण्याची व त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी गव्हर्नरांवर आहे. पण तसे करण्याने शिवाजीराजांशी असलेल्या मैत्रीत बिघाड होईल म्हणून सिद्दी व शिवाजीराजे यांच्यात दोघांनाही समाधानकारक असा समझोता घडवून आणण्याचा गव्हर्नर प्रयत्न करतील. शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या हद्दीवर किल्ला बांधू नये अशी हमी पोर्तुगीज मागत होते, पण आपण सिद्दीला मदत करणार नाही अशी हमी मात्र ते देत नव्हते. याउलट पोर्तुगिजांनी मराठ्यांच्या शत्रूंना मदत करू नये आणि समुद्रसंचाराकरिता पोर्तुगिजांचे परवाने घेण्याचे बंधन आपल्या प्रजाजनांवर असू नये अशी शिवाजी महाराजांची अपेक्षा होती. पोर्तुगिजांच्या भूमिकेत बदल घडवून आणण्याकरिता कोणते दडपण आणले पाहिजे हे महाराज ओळखून होते. महाराजांचा प्रतिनिधी विठ्ठल पंडित याने तहाकरिता गव्हर्नरांना सुचविलेली कलमे अशी होती.
१) शिवाजीराजांच्या जहाजांना समुद्रसंचाराकरिता पोर्तुगीज प्रतिबंध करणार नाहीत. २) सिध्यांना पोर्तुगीज आश्रय देणार नाहीत आणि कोणताही पुरवठा करणार नाहीत. ३) शिवाजीराजांच्या प्रजाजनांची पोर्तुगिजांनी धरलेली जहाजे, त्यांतील मालमत्तेसह, ते परत करतील. ४) शिवाजीराजांच्या सुभेदारांशी सलोख्याने राहावे अशी पत्रे देऊन गव्हर्नरांनी त्यांचा प्रतिनिधी शिवाजीराजांच्या वकिलाबरोबर पोर्तुगिजांच्या सर्व ठाण्यांच्या अधिकाऱ्यांकडे पाठवावा. ५) मस्कतच्या इमामाच्या जहाजांना आश्रयाकरिता व पाणी घेण्याकरिता आमची बंदरे, आम्ही ठरवू ते शुल्क घेऊन, वापरू द्यावीत असा प्रस्ताव इमामाने आमच्याकडे मांडला आहे. आमच्या आरमाराची मदत द्यावी अशीही विनंती त्याने केली आहे. पण आम्ही पोर्तुगिजांचे मित्र आहोत आणि म्हणून आम्ही त्याला कोणतीही मदत करणार नाही असा जबाब आम्ही त्याला दिला आहे. आमच्या या धोरणाचा प्रतिसाद म्हणून पोर्तुगिजांनीही आम्हाला आमचे त्याच्याशी युद्ध झाल्यास मदत करावी. आम्हीही पोर्तुगिजांचे इमामाशी युद्ध झाल्यास पोर्तुगिजांना मदत करू. त्या मदतीचा खर्च त्यांनी द्यावा. ६) आमचे मुघलांशी युद्ध सुरू आहे. म्हणून पोर्तुगिजांनी व आम्ही एकजुटीने राहावे. मुघलांच्या माणसांना पोर्तुगिजांनी त्यांच्या मुलखात आश्रय देऊ नये आणि आमच्याशी स्नेहाने वागावे. ७) पूर्वीच्या गोष्टी विचारात घेऊ नयेत. आम्हीही त्या विचारात घेणार नाही. या प्रस्तावाच्या ५ व्या कलमातील मेख अशी होती की पोर्तुगीज आणि मस्कतचा इमाम यांच्यात शत्रुत्व होते. जरी शिवाजी महाराजांनी आतापर्यंत आपल्या बंदरांमध्ये इमामाच्या आरमाराला सुविधा पुरविल्या नसल्या किंवा सक्रीय नाविक मदत केलेली नसली तरी ते भविष्यात तसे करू शकतील अशी गर्भित धमकीच त्या कलमात दिलेली होती. ही मात्रा बऱ्याच अंशी लागू पडली. झालेला तह असा होता:-
१) शिवाजीराजांच्या प्रजाजनांच्या लहान नौका समुद्रात मुक्तपणे संचार करू शकतील. मोठ्या जहाजांना मात्र समुद्रसंचाराकरिता परवाने घ्यावे लागतील. मुघल बादशाहाच्या प्रजाजनांना ज्या शर्तीवर परवाने दिले जातात त्याच शर्तीवर शिवाजीराजांच्या प्रजाजनांना दिले जातील. २) मान्य आहे. [म्हणजे शिवाजी महाराजांच्या वकिलाने दिलेल्या प्रस्तावातील दुसरे कलम मान्य आहे; म्हणजेच सिद्द्यांना पोर्तुगीज आश्रय देणार नाहीत आणि कोणताही पुरवठा करणार नाहीत.] ३) आमच्या प्रजाजनांची जहाजे त्यांतील मालमत्तेसह परत केल्यावर आम्हीही शिवाजीराजांची व त्यांच्या प्रजाजनांची पकडलेली जहाजे परत करू. ४) शिवाजीराजांच्या सुभेदारांशी व मंत्र्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत अशी पत्रे पोर्तुगीज किल्लेदारांना पाठविण्यात येतील. ५) जर शिवाजीराजांचे मस्कतच्या इमामाशी युद्ध सुरू झाले तर शिवाजीराजांनी आमची मदत मागितल्यास ती दिली जाईल; मात्र शिवाजीराजांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंदरांमधून इमामाला अन्नधान्याचा व पाण्याचा पुरवठा करता कामा नये. ६) हे {पोर्तुगीज} राज्य आणि मुघल बादशाह यांच्यात दीर्घ काळ सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्याच्या प्रजाजनांना संकटकाळात आम्ही आमच्या मुलखात आश्रय देण्याचे नाकारू शकत नाही. शिवाजीराजे आणि त्यांचे अधिकारी यांनाही गरज भासल्यास आम्ही तसेच साहाय्य करू. ७) दोन्ही बाजूंनी परस्परांशी सलोख्याने राहावे आणि पूर्वीच्या [परस्परवितुष्टाच्या] घटना विसरून जाव्यात.
या तहावर 'आंतोनियु द मेलु द काशत्रु व मानुयल कोर्ति रियाल द सांपायु यांच्या सह्या आहेत' आणि शिवाजी महाराजांची मुद्रा उमटविलेली आहे. शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या सरहद्दीवर किल्ला बांधू नये आणि गोवा व मुख्य भूमी यांच्यात, शिवाजी महाराज व आदिलशाह यांच्यात युद्ध चालू असेल तेव्हाही, व्यापारी वाहतूक चालू द्यावी या मागण्यांचा या तहात उल्लेख नाही, म्हणजेच पोर्तुगिजांना त्या सोडून द्याव्या लागल्या. शिवाय, पोर्तुगिजांनी सिद्दीला मदत करू नये ही शिवाजी महाराजांची मागणी पोर्तुगिजांना मान्य करावी लागली आणि शिवाजी महाराजांच्या लहान नौकांना तरी समुद्रसंचार करण्याकरिता पोर्तुगिजांचे परवाने घ्यावे लागणार नाहीत ही एक सवलत महाराजांनी पदरात पाडून घेतली. पोर्तुगिजांच्या सागरी स्वामित्वाच्या आतापर्यंतच्या अभेद्य तटाला पडलेले हे लहानसे छिद्र होते. या तहामुळे सिद्दीला पोर्तुगिजांकडून उघडपणे मदत मिळण्याची शक्यता संपली.
संदर्भ:-
¤ शिवछत्रपतींचे आरमार- ग.भा.मेहेंदळे, सं.प्र.शिंत्रे
¤ शिवछत्रपतींची पत्रे खंड १ पत्र क्र. २९, डाॅ.सौ.अ.गो.कुलकर्णी
¤ द पोर्तुगीज अँड द मराठाज- पृष्ठ ३१ ते ३३ (The Portuguese and the marathas:- page - 31 to 36)
संकलन:-
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

'असईची लढाई'

 'असईची लढाई' 

पोस्तसांभार ::एकनाथ वाघ 

 

असईची लढाई'

असई लढाई ही आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य अधोरेखित करणारी आहे. भारतीयांच्या दृष्टीने या लढाईचे महत्त्व म्हणजे मराठे ही लढाई प्रादेशिक वर्चस्वासाठी नाही, तर परकीयांचे वर्चस्व व मुजोरी उखडून फेकण्यासाठी लढत होते. मराठवाड्यात इतिहासाच्या अशा अनेक पाऊलखुणा आहेत, पण कधी इतिहासाच्या पुस्तकांतून सर्वसामान्यांपर्यंत ही सगळी माहिती जात नाही.

23 सप्टेंबर 1803 ची दुपार. जालना जिल्ह्यातील पूर्णापूर (जाफ्राबाद) तालुक्यातील असई गावाचा परिसर. एका बाजूला केळणा, तर दुसर्‍या बाजूला जुई नदी भरून वाहताहेत. असईच्या पुढे या दोन्ही नद्यांचा संगम. मागे दोआबात घनघोर लढाई चाललेली. इंग्रज आणि मराठे यांच्यातील हे युद्ध ‘असईची लढाई’ नावाने ओळखले जाते. या युद्धात इंग्रजांचा लेफ्टनंट कर्नल पॅट्रीक मॅक्सवेल हा कामी आला. याची कबर बांधली असुन तेथे त्याचे नातेवाईक आज पण भेट देण्यासाठी येतात.

दुसऱ्या बाजीरावाचा होळकरांनी ऑक्टोबर २५, १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभव केला. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली. हा तह वसईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले.

मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली याने केले.

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेलेले होते. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्यांच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले.

इंग्रजांनी युद्धात उतरायचे ठरवल्या वर त्यांना मराठ्यावर आक्रमण करणे भाग होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम नागपूरच्या भोसल्यांवर प्रथम आक्रमण करावयाचे ठरवले. शिंद्यानी पण आपली सेना शत्रूला शक्यतो लवकर संपवावे यासाठी भोसल्यांच्या मदतीला आणली. मराठे व इंग्रज हे दोन्ही फौजा चांगले स्थळ व वेळेच्या शोधात होत्या.

मराठ्याचे ४०-५० हजार नियमित सैनिक होते व बराच मोठा तोफखाना होता. मोठे संख्याबळ व तोफखान्याच्या जोरावर इंग्रजांवर मात करु असा विश्वास मराठ्यांच्या सरदारांना होता तर वेलस्लीला त्याच्या शिस्त बद्द इंग्रज लष्करावर विश्वास होता. इंग्रज मराठ्याच्या फौजेला गाठून हरवायच्या बेतात होती तर मराठ्याना अजूनही पारंपारिक गनिमी काव्याच्या पद्धतीवर विश्वास होता.

इंग्रजांचे सैन्य दोन मुख्य पलटणीत विभागले होते. एक पलटण घेऊन कर्नल स्टीवनसनने पश्विमेकडून चाल केली तर वेलस्लीने दुसरी पलटण घेउन दुसऱ्या बाजूने चाल करायचे व दोन्ही बाजूंनी मराठ्यांना गाठून कोंडीत पकडायचे ठरविले. परंतु वेलस्लीला मराठ्यांची गाठ लवकर पडली. सप्टेंबर २३ १८०३ रोजी दोन्ही सेना आमने सामने आल्या.

मराठ्यांची सेना केळणा व जुई नदीच्या संगमापाशी स्थित होती. मराठे सेनापतींच्या अंदाजानुसार वेलस्लीला नदी ओलांडावी लागेल व त्याचा फायदा आपण घेऊ असा विश्वास होता. युद्धनीतीच्या दृष्टीने मराठे स्थिती वरचढ होती. वेलस्लीकडे सेना कमी होती तसेच कुमक येण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागली असती. परंतु वेलस्लीने आक्रमणाचा निर्णय घेतला. त्याने कैतना नदीच्या कडे कडेने नदी कुठे पार करता येईल याचा अंदाज घेतला.

स्थानिक वाटाड्यांनुसार जवळ कुठेही नदी उथळ नव्हती, परंतु आष्टीजवळ त्याला उथळ जागा सापडली. परंतु मराठ्यांनीपण वेलस्लीचे भारतीयांबाबतीत शिस्तीचे अंदाज चुकवले, वेलस्लीच्या फौजेला मराठ्याशी आमने सामने युद्ध करावे लागले. त्यामुळे ब्रिटीश फौजही अंदाजापेक्षा जास्त मारली गेली परंतु ७४ व्या व ७८ व्या हायलॅंडर तुकडीने मराठ्यांच्या सेनेचे कंबरडे मोडून काढले मराठ्यांची सेनेने पळ काढला. साधारणपणे ६००० मराठे सैनिक कामी आले. ब्रिटीशांचे १५०० सैनिक मारले गेले. वेलस्लीच्या वेलस्लीच्या मते त्याच्या कारकिर्दीतील त्याने लढलेले सर्वोत्तम युद्द होय.

मराठ्यांचे संख्याबळ अधिक असूनही मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे १,२०० जण ठार झाले तर इंग्रजांचे ४२८ जण. इंग्रजांची उच्च दर्जाची शस्त्रे व युद्धपद्धती यात कितीतरी पटीने इंग्रज वरचढ होते. तसेच मराठ्यांचे गनीमी काव्याचे तंत्र युरोपीयन आमने सामनेच्या युद्धतंत्रापुढे काम करु शकले नाही. मराठ्यांच्याकडे महादजी शिंद्यानंतर त्यांच्या तोडीचा सेनापती नव्हता त्याचे नुकसान मराठ्यांना झाले.

पालखेडच्या लढाईत पहिले बाजीराव यांनी मराठा साम्राज्याचा पाया भक्कम केला होता, ते एक अद्वितीय युद्ध म्हणून इतिहासाच्या पानावर कोरले गेले आहे.. या युद्धामुळे मात्र मराठा साम्राज्य संपुष्टात येऊन मराठी सत्तेस उतरती कळा लागली आणि इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानात दृढमूल झाली.

स्त्रोत :

मराठवाड्यातील इतिहासाच्या पाऊलखुणा

इतिहास बदलवणारी असईची लढाई

Sunday, 13 November 2022

मराठा संस्थानिक घराणे – अलिबागचे आंग्रे

 

तत्कालीन कुलाबा जिल्हा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील मराठा संस्थानिक घराणे – अलिबागचे आंग्रे

 

दर्यावर्दी सरखेल आंग्रे कुटुंबाचे मूळ घराणे संकपाळ यांचे होय. याचा उल्लेख शिवकालीन पोवाड्यात येतो. सुपे चाकणजवळच्या काळोसे या पुणे जिल्ह्यातील भागास ‘आंगरवाडी’ असे ओळखले जाते. हेच आंग्रे संस्थानिकांचे मूळ स्थान. प्रत्येक घराण्याची ओळख असणारी एक जबरदस्त व्यक्ती असते. तद्वत या कुलाबा जिल्ह्यातील आंग्रे यांची ओळखही पराक्रमी, शूर सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे, असे म्हटले तर ते नक्कीच गौरवास्पद आहे.

या घराण्याचे मूळ पुरुष म्हणता येतील ते सेखोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या तटबंदीचे काम केले होते, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत नमूद आहे. या सेखोजींचे पुत्र आणि कान्होजीराजे यांचे वडील तुकोजी आंग्रे हे इ. स. 1640 मध्ये सरलष्कर महाराजसाहेब शहाजीराजेंच्या समवेत कोकणच्या स्वारीत होते. शहाजीराजेंच्या सोबत चौल येथील समुद्रावरील लढाईत मर्दुमकी गाजवणार्‍या तुकोजी आंग्रे यांजकडे सुरुवातीला अवघी 25 सैनिकांची मुखत्यारी होती. तिथपासून इ. स. 1659 पर्यंत शिवाजी महाराजांच्या पदरी आपल्या पराक्रमाने अन् कर्तबगारीने तुकोजींनी सरनौबत या हुद्द्यापर्यंत भरारी मारली. शिवरायांच्या आरमारात 20 संगमेश्वरी जहाजांचा पहिला ताफा दाखल झाला तेव्हा तुकोजी आंग्रे महाराजांच्या आरमारात दाखल झाले. हर्णे बंदरालगतचा सुवर्णदुर्ग शिवरायांनी 1660 मध्ये जिंकून घेतला. या सुवर्णदुर्गवर आंग्रे यांचे कुटुंब राहत होते. 1669 मध्ये गोकूळाष्टमीच्या आदल्या दिवशी याच सुवर्णदुर्गावर कान्होजींचा जन्म झाला. तुकोजीराव यांच्या पत्नी बिंबाबाई यांनी ‘कान्होबा’ या जागृत दैवतास नवस बोलले असल्याने या नवजात पुत्राचे नाव ‘कान्होजी’ ठेवण्यात आले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या सुमुहूर्तावर (इसवी सन 1674) छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर जो राज्याभिषेक झाला त्यासमयी कान्होजींचे वय हे अवघे पाच वर्षांचे होते. याच वर्षी महाराजांनी सुवर्णदुर्गाची बळकटी करून घेतली.

दक्षिण दिग्विजयाहून परतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1678 मध्ये मुंबईकर इंग्रजांना वचक बसावा म्हणून खांदेरी हा जलदुर्ग बांधवून घेतला. तसेच 1680 मध्ये अलिबागच्या किनार्‍यालगत समुद्रात अजून एक बळकट जलदुर्ग ‘कुलाबा’ही बांधून घेतला. खुद्द छत्रपतींनी त्याचे कुलाबा हे नाव ठेवले होते, असे इतिहास सांगतो. त्याच वर्षी दुसरा पुत्र राजाराम याच्या विवाहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे हनुमान जयंतीला रायगडावर अनपेक्षितपणे दुःखद निधन झाले. कान्होजींचे वडील तुकोजी आणि काका रायाजी हे सिद्दी आणि जलचर फिरंगी शत्रूंच्या बंदोबस्तासाठी सातत्याने घराबाहेर असत. म्हणून तुकोजींनी कान्होजीस शिक्षणासाठी हर्णे येथील जोशी नामक विद्वान ब्रम्हवृंदांकडे ठेवले होते. सदैव समुद्राच्या सानिध्यात असल्यामुळे कान्होजी यांस समुद्राचे भय काहीच उरले नव्हते. दर्यावर लाटांसोबत वरखाली होत फिरणारी जहाजे आणि जलविहार यास ते अवगत झाले होते. लेखन, वाचन आणि अन्य शिक्षणासह जोशी गुरुजींकडे गुरेही कान्होजी राखत असत. एका प्रसंगी कान्होजी दुपारी रानात विश्रांती घेत असता त्यांच्यावर पडणारी उन्हाची तिरीप एका नागाने अडवल्याचे अन्य गुराख्यांनी बघितले व ही आश्चर्यकारक घटना नंतर जोशी गुरुजींना कथन केली गेली. ज्योतिष जाणकार असलेल्या जोशींना यामागचा कार्यभाव समजून हे राजयोगाचे लक्षण आहे, हे समजले आणि त्यांनी ताबडतोब कान्होजींना बाकीच्या शिक्षणासोबत राजनीतीचे व्यवहार ज्ञान देण्यास सुरुवात केली. कान्होजींच्या भावी पत्रव्यवहारातून याची प्रचिती आपणांस येते.

1690 पासून छत्रपती राजाराम महाराजांच्या आरमारात दुय्यम अधिकारी असलेले कान्होजी पुढे अर्थातच ताराराणीसाहेब यांच्या पक्षात होते. मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या कैदेतील शंभुपुत्र शाहू महाराज स्वराज्यात परतले आणि मराठ्यांच्या गादीचा खरा हक्कदार कोण, यास्तव शाहू महाराज आणि ताराराणीसाहेब यांत संघर्ष सुरू झाला. या वेळी शाहूंकडे असलेले मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांनी हरउपायेकरून करून सरखेल कान्होजीस शाहू छत्रपतींकडे वळवले. नंतर एक एक पराक्रम गाजवून कान्होजीराजे मराठा आरमाराचे तसेच सुवर्णदुर्गाचेही अधिपती झाले. बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी हे दोघेही कोकणातील असल्याने हा मनसुबा बराचसा सहजपणे प्रत्यक्षात आला. आता कान्होजीराजांची सत्ता मनरंजन ( मांडवा – रेवस ) पासून विजयदुर्गपर्यंत पश्चिम किनार्‍यावर बळकट झाली. छत्रपतींच्या अनुज्ञेने कान्होजींना 10 जंजिरे (जलदुर्ग) मिळाले होते तसेच ‘सरखेल’ आणि ‘वजारतमाव’ हे किताब, 16 महालांतील मुलुख धरून तब्बल 34 लक्षांचा मुलुख प्राप्त झाला. यामुळे एका अर्थाने कान्होजी आंग्रे हे पश्चिम किनारपट्टीचे अधिपती झाले होते. त्यांच्या सागरी सामर्थ्यामुळे शिवछत्रपतींनी स्थापलेल्या मराठा आरमाराचा दबदबा आणि वचक इंग्रज, पोर्तुगीज आदी फिरंगी तसेच एतद्देशीय सत्तांना जाणवू लागला. ज्या पोर्तुगिजांचे दस्तक म्हणजे सागरावर संचारासाठी परवाने खुद्द आलमगीर औरंगजेबाला घ्यावे लागत असत त्यांना आता कान्होजी राजांच्या अनुज्ञेची कास धरावी लागत होती, इतका पराक्रम कान्होजींनी आपल्या कारकीर्दीत दाखवला. कान्होजींच्या बलाढ्य आरमाराचा पराभव तर सोडा बरेचदा विरोधही करता येत नसे, या कारणास्तव इंग्रज, पोर्तुगिजादी मंडळी कान्होजींना सागरी चाचा म्हणत असत. पण एका अर्थाने कान्होजीराजे त्यांचे ‘चाचा’ तर सोडा खर्‍या अर्थाने सागरी पराक्रमात ‘बाप’ होऊन राहिले होते. त्यांच्या असामान्य आरमारी पराक्रमामुळे त्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असेही अभिमानाने म्हटले जाई. शौर्य आणि धाडस यासोबत विवेकीपणादेखील त्यांचे अंगी भिनलेला होता. सरखेल कान्होजींचे 4 जुलै, 1729 रोजी निधन झाले. अशा या कर्तबगार कान्होजींच्या वारसांनी पुढे अनेक वर्षे ही सागरी शौर्याची परंपरा सुरू ठेवलेली आढळते. मात्र दुर्दैवाने उत्तरकालात पंतप्रधान पेशव्यांसोबत झालेल्या काही मतभेदांमुळे पेशवे आणि इंग्रज यांची युती होऊन हे परदेशीय जलचर सत्तांवर दबदबा असलेले आंग्य्रांचे बलाढ्य आरमार बुडविण्याची अप्रिय घटना पुढे घडली. हे खरोखरीच मराठेशाहीचे अन् मराठा आरमाराचे दुर्दैव म्हणावे लागेल.

आंग्रे यांनी चांदीची स्वतंत्र नाणी पाडली होती, असे प्रतिपादन नामवंत अभ्यासक प्रिन्सेप आणि क्लून्सदेखील करीत आहेत. अलिबागच्या टांकसाळीत ही नाणी पाडली गेली असावीत, असा अंदाज बांधता येतो. यात पेशव्यांनी मुहियाबाद उर्फ पुणे येथे पाडलेल्या अंकुशी रुपयाबरहुकूम नाणकशास्त्रातील तज्ञांनी मान्य केलेला अलिबागच्या अंकुशाचे विशिष्ट वळण असलेला ‘अंकुशी रुपया’ तसेच 1/4 रुपया , 1/2 रुपया पण आढळतो. अलिबागचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण रुपया म्हणजे दोन्ही बाजूस देवनागरीत फक्त ‘श्री’ अक्षर छापलेला रुपयाही आढळून आला आहे. यात चांदीचे प्रमाण कमी असल्याने हा व्यवहारात तितकासा प्रचलित होऊ शकला नव्हता. कारण त्या वेळी धातूच्या शुद्धतेवर नाणी जोखली आणि स्वीकारली जात असत. या रुपयाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा गोल तसेच चौकोनी आकारात पाडला गेला होता. याचा अर्धा रुपयादेखील पाडला गेला होता व तो काही नाणीसंग्राहकांच्या संग्रहात आहे. या ‘श्री’ रुपयाची मुंबई गझेटियरमध्ये ‘जंजिरा कुलाबा रुपया किंवा छशु अश्रळलरस रुपया’ अशी नोंद केलेली आहे. हा रुपया आंग्रे यांचे दिवाण / कारभारी म्हणजेच उहळशष जषषळलशी विनायक परशुराम बिवलकर यांनी सुमारे 1829 च्या आसपास पाडला होता, अशा काही नोंदी आढळतात. मात्र तो लोकमानसात न रुजल्याने पुढच्या दहा वर्षांतच चलनातून काढला गेला. आंग्रे यांच्या राजवटीत तांब्याची नाणी पाडल्याची नोंद आढळून येत नाही. पुढे इसवी सन 1844 मध्ये आंग्रे यांना ब्रिटिशांनी दत्तकविधानाची अनुमती नाकारल्याने त्यांचे स्वतंत्र संस्थान अखेर ब्रिटिशांच्या अधीन झाले. तरीही आंग्रे या मराठा संस्थानिकांनी स्वतंत्र नाणी पाडली होती, हा इतिहास मात्र पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.

पेशवेकालीन हिंदवीस्वराज्याचे आधारस्तंभ बडोदा येथील गायकवाड घराणे - 5 .

 

पेशवेकालीन हिंदवीस्वराज्याचे आधारस्तंभ

बडोदा येथील गायकवाड घराणे - 5 .

 

शिवछत्रपतींच्या काळातील वर्चस्वाची लढाई संपुष्टात येऊन दुर्दैवाने आता ब्रिटिशांच्या देशव्यापी वरवंट्यामुळे अनेक संस्थानिकांना अस्तित्वाची लढाई करणे भाग होते. आपापसातील बरेचसे ताणले गेलेले परस्परसंबंध, दुबळी झालेली मध्यवर्ती सत्ता आणि हतबल होऊन शरणागती पत्करलेली पेशवाई या परिस्थितीत या विविध सत्ताधीशांना नाइलाजास्तव का होईना इंग्रज सत्तेचाच काय तो भलाबुरा आधार शिल्लक राहिला होता, हे मात्र नाकारता येत नाही.
मल्हारराव गायकवाड!

मल्हाररावांचा जन्म इसवी सन 1831 मध्ये झाला होता. बडोद्याचे 11 वे महाराज म्हणून बंधू खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हारराव गायकवाड हे वयाच्या 39 व्या वर्षी बडोदा संस्थानच्या राजगादीचे सर्वाधिकारी झाले. त्यांची कारकीर्द ही अवघी 5 वर्षांची म्हणजे 1870 – 1875 इतकीच होती. मात्र ही अल्पशी कारकीर्द हीदेखील बव्हंशी वादग्रस्त ठरली, असे इतिहास सांगतो. त्यांनी सोन्याच्या तोफा आणि मोत्यांचा गालिचा बनविण्यासाठी बडोदा संस्थानचा खजिना रिता केला. संस्थानावर पकड मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी जुलूम, जबरदस्ती केली असेही इतिहासात नमूद आहे. आधीचे महाराज खंडेराव यांच्याशी एकनिष्ठ असणारे आणि आपल्या छळाला कारणीभूत असतील असे वाटून ज्यांच्याबद्दल मल्हाररावांना संशय होता, त्या सर्वांना त्यांनी धारेवर धरले. खंडेरावांच्या महाराणी जमनाबाई साहेब यादेखील खुद्द मल्हाररावांची भीती वाटत असल्याकारणे प्रसूतीसमयी रेसिडेन्सी भागात वास्तव्यास गेल्या होत्या व तिथेच त्यांना खंडेरावांच्या मृत्यूनंतर कन्यारत्न झाले. त्यानंतर त्यांनी बडोदा शहराच्या बाहेर राहणे पसंत केले होते.

खंडेरावांचा दिवाण भाऊ शिंदे हादेखील तुरुंगात संशयास्पद अवस्थेत मृत्यू पावला. खंडेरावांच्या मर्जीतील अनेक लोकांना पदभ्रष्ट तरी करण्यात आले होते किंवा त्यांची मालमत्ता तरी सरकारजमा करण्यात आली होती. या सगळ्याची खबर अखेर ब्रिटिश रेसिडेंटपर्यंत पोहोचलीच. यावेळपावेतो (1673) महाराजांच्या दुर्दैवाने सुखासीन वृत्तीने कारभार बघणारा रेसिडेंट कर्नल बार हा जाऊन त्याच्या जागी कर्नल रॉबर्ट फेयर हा बडोद्याचा गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेला होता. फेयर हा उत्साही पण राजकीय हस्तक्षेप करण्यास उत्सुक असा माणूस होता. याचमुळे लवकरच फेयर आणि मल्हाररावांचे राजनैतिक संबंध ताणले गेले तसेच वादग्रस्त राहिले. या रेसिडेंटने बडोदा संस्थानच्या पर्यायाने मल्हाररावांच्या गैरकारभाराची बातमी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. परंतु का कोणास ठाऊक तत्कालीन भारताचे ब्रिटिश व्हॉइसरॉय रॉबर्ट बारिंज (ठेलशीीं इरीळपस ) यांनी मल्हाररावांना केवळ ‘समज’ दिली. यामुळे तर रॉबर्ट फेयर आणि मल्हारराव महाराज यांच्यातील वितुष्ट दिवसेंदिवस वाढतच चालले.

1874 मध्ये परिस्थिती इतकी विकोपाला गेली की ज्या दिवशी रॉबर्ट फेयरनी व्हॉइसरॉयना महाराजांच्या गैरकारभारांची जंत्री सादर केली. योगायोगाने त्याच दिवशी मल्हारराव महाराजांनी या ब्रिटिश रेसिडेंटला बदला अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली. पण तेव्हाचे व्हॉइसरॉय नॉर्थब्रूक हे मल्हाररावांच्या बाजूचे असल्याने त्यांनी 12 नोव्हेंबरला मुंबई इलाख्याला (इेालरू झीशीळवशपलू जषषळलश) ला चक्क रॉबर्ट फेयर यांचीच बदली करावी, अशी शिफारस केली. पण या गोष्टीस तरीही उशीरच झाला. मात्र दैवगतीच्या विचित्र खेळीमुळे त्याआधीच 9 नोव्हेंबर रोजी मल्हारराव महाराजांकडून (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) रेसिडेंट रॉबर्ट यास भेटीस बोलवून त्यांस दिलेल्या सरबतात हिर्‍याची पूड आणि रीीशपळल मिसळून विषप्रयोग करण्यात आला होता, असा आरोप फेयर याने मल्हाररावांवर केला. यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरुद्ध कडक पावले उचलली. पोलिसांद्वारे केलेल्या चौकशीत सदर आरोप सिद्ध झाल्याचे दाखवून फेयरने मल्हारराव महाराजांना अटक ही केली व कारभार स्वतःच्या हाती घेतला. या वेळी बडोद्याच्या दिवाण पदावर असलेले दादाभाई नौरोजी व त्यांचे चार विश्वासू सहकारी हेदेखील या प्रकरणात मल्हाररावांना काहीही मदत करू शकले नाहीत. यातील एक सहकारी शहाबुद्दीन काझी हे पुढे सयाजीराव महाराज तिसरे यांचे दिवाण झाले. मल्हारराव महाराजांच्या हेतूविषयी कोणतीही शंका मनात न ठेवता केवळ प्रशासकीय कारभारात सुधारणेच्या हेतूने दादाभाई बडोद्यात आले होते. मात्र मल्हारराव महाराज आणि ब्रिटिश रेसिडेंट हे दोघेही आपल्या मार्गातले अडथळे आहेत, हे त्यांना लवकरच कळून आले. अखेर दादाभाईंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

ब्रिटिश सरकारने नेमलेल्या चौकशी समितीत तीन इंग्रज आणि तीन भारतीय सदस्य होते. चौकशीअंती तीनही भारतीय ज्युरींनी मल्हाररावांना निर्दोष ठरविले होते. पण इंग्रज ज्युरींनी मात्र महाराजांच्या विरोधात मत नोंदले होते. रेसिडेंट फेयरची बदली होणार हे नक्की असताना महाराज असे का करतील, हा भारतीय ज्यूरींचा बचाव होता. अर्थातच याला कोणाकडे उत्तर नव्हते. अखेरीस अपरिहार्यपणे जे घडणार असे वाटले होते तेच घडले. सेक्रेटरी ऑफ द बडोदा स्टेट – भारतमंत्री लॉर्डस सॅलीसबरी यांच्या हुकूमानुसार ‘महाराजांत सुधारणा होणे अशक्य‘ आहे असे दर्शवून मल्हारराव महाराजांना एका जाहीरनाम्यानुसार राजगादीवरून पदच्युत करून 19 एप्रिल, 1875 रोजी याच जाहिरनाम्यातील एका कलमानुसार वार्षिक दीड लक्ष रुपयांच्या निवृत्तीवेतनावर मद्रास येथे रवाना करण्यात आले. या पदच्युतीनंतर महाराजांच्या अनुयायांनी छोटे उठावही केले तसेच शहरात हरताळही पाळला गेला होता. रेसिडेंट लुई पेली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे झालेल्या निवृत्तीनंतर त्या जागी आलेले सर रिचर्ड मीड यांनी चातुर्याने व सक्षमपणे परिस्थिती हाताळून कौशल्याने प्रशासनावर आपला (ब्रिटिशांचा) अंमल कायम राखला. मात्र मल्हारराव महाराज यानंतर बडोद्याच्या राजगादीवर पुनश्च आसनस्थ होऊ शकले नाहीत.

मल्हाररावांचे बंधू खंडेराव हे राजगादीवर असताना मल्हाररावांनी त्यांनाही वारसाहक्काच्या भांडणात जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना नाइलाजास्तव राजमहालाच्या बाहेर काढून कैदेत ठेवण्यात आले होते. खंडेराव हेदेखील फारसे सक्षम नसले तरी ब्रिटिशांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले होते आणि याच कारणास्तव ब्रिटिश सरकार त्यांच्या हिरे, जडजवाहीर इत्यादी खरेदी करण्याच्या आवडींना विशेष असा विरोध करत नव्हते. खंडेराव यांनी पुढे जाऊन चक्क चांदीच्या तोफा ओतून घेतल्या होत्या. मात्र 1870 मधील खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हारराव बंधमुक्त होऊन दैव बलवत्तर असल्याने बडोद्याच्या राजगादीवर विराजमान झाले होते. आता तर त्यांनी चांदीऐवजी थेट सोन्याच्या दोन तोफा बनवून घेतल्या. मल्हाररावांच्या कारकीर्दीत बडोदा संस्थानची आवक प्रचंड घटून वारेमाप खर्च होऊ लागले होते. खंडेरावांच्या कालखंडात वाईट असलेली स्थिती आता तर ‘फारच वाइट’ म्हणावी लागली इतपत वेळ आली. 1874 मध्ये संस्थानचे वार्षिक उत्पन्न 94 लाख रुपये आणि खर्च मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे 171 लाख रुपये, अशी अवस्था होती. मल्हाररावांच्या मर्जीतील निकटवर्तीयांवर सुमारे 40 लाख खर्च झाले होते तसेच राजमहालावर तब्बल 30 लाख इतकी मोठी रक्कम कामास आली होती. यानंतर दरबारी ब्रिटिश रेसिडेंटने खजिन्याची तपासणी केली असता त्यात अवघे 2000 रुपये शिल्लक आढळले. सैन्याला वेतन देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे ते बंडाच्या पायरीवर उभे होते. राजदरबारातील मुत्सद्दी तसेच अन्य सभासदांची मल्हाररावांच्या मर्जीतील निकटवर्ती यांकडून पिळवणूक सुरू असल्याने तेही हतबल झालेले होते, अशा नोंदी आहेत. राज्यातील महिलावर्ग सुरक्षित नव्हता. दैवदुर्विलास टाळण्यासाठी काहींनी मंदिराचा आसरा घेतला होता. महिलांना राजमहालात काम करण्याची सक्ती केली जात होती, अशाही तक्रारी ब्रिटिश सरकारकडे नमूद आहेत. इतकेच नव्हे तर खुद्द मल्हाररावांच्या मुलीनेदेखील राजधानी त्यागली, असेही इतिहास मूकपणे सांगतो.

या आपल्या पाच वर्षांच्या वादग्रस्त कार्यकाळात मल्हारराव महाराजांनी तांब्याची तसेच चांदीची नाणी पाडली आहेत, पण फारच थोडी. त्यांनी स्वतंत्र राज्यकर्त्याच्या अधिकारात नाणी पाडली असली तरी त्यांच्या नाण्यांमध्ये कोणतेही वैविध्य आढळून येत नाही. तांब्याच्या नाण्यांमध्ये अर्धा पैसा, एक पैसा आणि डबल पैसा पाडलेला दिसून येतो, ज्यांचे मूल्य वजनानुसार ग्राह्य धरले जात असे. या नाण्यांवर वर मध्यभागी शेडेड बॉल अथवा कनॉन बॉल (तोफगोळा) त्याच्या खाली तलवार आणि तोफगोळ्याच्या वर मल्हारराव महाराजांची आद्याक्षरे ‘मा आणि गा’ आढळतात. काही सुस्पष्ट नाण्यांवर हिजरी सनदेखील बघता येते. चांदीच्या नाण्यांत एक अष्टमांश रुपया, एकचतुर्थांश रुपया, अर्धा रुपया आणि एक रुपया या मूल्याची नाणी पाडलेली आहेत. यावर ‘मा, गा‘ या आद्याक्षरांसह उजवीकडे वळलेली तलवार छापलेली आहे. यातील काहींवर 1288 हे हिजरी सन पण आढळते. या दोनच प्रकारची नाणी मल्हाररावांच्या नावावर जमा आहेत. अखेर मद्रास येथेच इसवी सन 1882 मध्ये बडोद्याच्या या मल्हारराव गायकवाड महाराजांचे वयाच्या एक्कावन्नव्या वर्षी संदिग्धावस्थेत निधन झाले.


हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांची नाणी

 

हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांची नाणी

 

प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठी नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | ‘नाणे’घाट

राजकीय घडामोडींच्या अपरिहार्यतेपायी दुर्दैवाने बालपण ते ऐन तारुण्य मुघलांच्या तुरुंगवासात घालवलेला शंभुपुत्र युवराज म्हणजे शाहू महाराज. 18 मे 1682 रोजी जन्मलेले शाहू हे शंभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईसाहेबांचे द्वितीय अपत्य. त्या काळच्या परंपरेनुसार त्यांचेही नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. कालांतराने परिस्थिती बदलल्यावर शाहू हे छत्रपती शिवराय स्थापित हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती जाहले!

राजधानी दुर्गदुर्गोत्तम रायगडाच्या परिसरात असलेल्या माणगावजवळील गांगवली / गांगोली या गावात शंभाजीराजे व शिर्केकुलोत्पन्न महाराणी येसूबाईसाहेबांच्या पोटी वैशाख वद्य 7, शके 1604 म्हणजे दिनांक 18 मे 1682 रोजी या शिवाजी ऊर्फ शाहू यांचा जन्म झाला. प्रथम अपत्य कन्या भवानीबाईसाहेब यांच्यानंतर शंभाजी महाराजांना झालेले हे दुसरे पुत्ररत्न. पूर्वसूरींप्रमाणे त्या काळच्या प्रथेनुसार आपल्या पराक्रमी पित्याचे अथवा काकांचे / घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव पुत्रास देण्याच्या परंपरेने याचे नावही शिवाजी असेच ठेवण्यात आले होते. स्वराज्यात तशीही मुघलांची धामधूम सुरू होतीच. आणि …..

बालपणी राजपुत्रांना देण्यात येणारे राजशिक्षण सुरू असतानाच ती अक्षरशः वज्राघात करणारी बातमी अवघ्या सात वर्षांच्या लहानग्या शाहूंना कळली. खरंतर कितपत समजली असेल हे पण सांगणे अवघड आहे, इतकं ते अजाण वय होतं.

वडील आणि छत्रपती शंभाजी महाराज यांचा औरंगजेबाने अनन्वित हालहाल करून निर्घृण हत्या केली होती. ही ती दुःखद अन् संतापजनक बातमी होती. सारा सह्याद्री हादरला, डळमळला, हेलावला अन् क्षणकाल भांबावलाही. हिंदवी स्वराज्याचा छत्रपती, शिवपुत्र शंभाजी यवनाधमाच्या हाती मारला गेला होता.

जाणत्यांची मतीसुद्धा काहीकाळ गुंग झाली, इतका मोठा आघात होता तो. पण रायगडावर असलेल्या महाराणी येसूबाईसाहेबांनी पती निधनाचे आणि न झालेल्या अंत्यदर्शनाचे दुःख बाजूला ठेवून मंत्र्यांशी व ज्येष्ठांशी विचारविनिमय, सल्लामसलत करून व आपल्या पुत्राचे लहान वय लक्षात घेऊन मोठ्या मनाने व धोरणीपणाने नजरकैदेतील राजाराम महाराजसाहेबांना बंधमुक्त करून मंचकी / सिंहासनावर बसविले. स्वराज्याला पुन्हा छत्रपती प्राप्त झाले. पण तरीही प्रसंग मोठा बाकाच होता. कारण शंभुछत्रपतींचा हत्या केल्याने स्वराज्य बुडवायला आतुरलेल्या औरंगजेबाने तातडीने मुघल फौजा राजधानी रायगडासहित अन्य शिवदुर्ग जिंकण्यास रवाना केल्या होत्या. झुल्फिकारखानाने तर जलदीने रायगडास मोर्चे लावलेसुद्धा. वेढा आवळत आणला. आता तर सारेच राजकुटुंबीय राजधानीत जणू बंदी झाले, अशी परिस्थिती ओढवली. संकटांची माळ अखंडपणे स्वराज्याभोवती आपले पाश विणत होती. शाहू तर लहानच होते, पण शंभुपत्नी शिवस्नुषा येसूबाईसाहेबही काही फार अनुभवी, वयाने थोरल्या नव्हत्या. पण तरीही शिवरायांच्या या ज्येष्ठ सुनेने अत्यंत धीरोदात्तपणे, धोरणीपणाने निर्णय घेऊन छत्रपती राजाराम महाराजांना वेढ्यातून रायगडाबाहेर काढले. यासमयी राजाराम महाराज रायगडाच्या वाघ दरवाजाने गडाबाहेर उतरते झाले, असे म्हणतात. ज्यांनी रायगडाचा हा वाघ दरवाजा बघितला असेल, त्यांनाच या धाडसाची अंशतः का होईना कल्पना येईल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमोघ शब्दांत सांगायचे झाले तर येथून उतरण्याची हिंमत फक्त पाण्याच्या धारेलाच तसेच वर चढण्याची हिंमत वार्‍याच्या झोतालाच होऊ शकते आणि अर्थातच मराठ्यांना. अखेर अभेद्य, अजिंक्य, बेलाग, पूर्वेकडील जिब्राल्टर मानला जाणारा शिवछत्रपतींचा प्राणप्रिय रायगड झुल्फिकारखानाने जिंकला. यावेळी झालेल्या समझोत्यानुसार महाराणी येसूबाईसाहेब, राजपुत्र शाहू व शिवरायांचा अन्य कुटुंबकबिला ‘राजबंदी’ म्हणून औरंगजेबाच्या कैदेत गेला.

रायगडावर, हिंदवी स्वराज्यावर जणू किर्र काळोख पसरला. शाहू महाराजांचे शैशव हे आता औरंगजेबाच्या कैदेत व्यतीत होऊ लागले. स्वातंत्र्यसूर्याची ही किरणे अंधारात जणू बंदिस्त झाली होती. पण, जरी औरंगजेबाने शंभाजीराजांची क्रूरपणे हत्या केली असली तरी त्याने येसूबाईसाहेब आणि राजपुत्र शाहू यांना बर्‍याच ममतेने वागविले, असे दाखले आहे. या राजबंद्यांचा तंबू हा त्याच्या शाही तंबूशेजारीच – गुलालबार – असायचा. मध्येच एकदा आपल्या लहरी अन् धर्मवेड्या स्वभावानुसार त्याने शाहूंचे धर्मांतर करण्याचा आदेशही दिला होता. पण काही वजनदार मध्यस्थांच्या रदबदलीमुळे तो त्याने नाइलाजास्तव मागेही घेतला खरा. पण आदेशाचे पालन व्हायलाच हवे म्हणून स्वराज्याचे दिवंगत सरनौबत प्रतापराव गुजर यांचे दोन पुत्र जगजीवन आणि खंडेराव हे शाहूंच्या ऐवजी धर्मांतरित करण्यात आले. या सगळ्या उलथापालथीनंतर शाहू महाराज कैदेतून कधी सुटले व राज्यारोहणानंतर त्यांनी छत्रपती म्हणून आपली स्वतंत्र नाणी कधी व कोणती पाडली, हे आपण पुढील भागात पाहूया.


॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥ मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 3

 

॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥

मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 3

 

शककर्त्या शिवछत्रपती स्थापित चढते वाढते हिंदवीस्वराज्य हे आता शिवोत्तर कालखंडात खरोखरच संपूर्ण हिंदुस्थानात आपला आब राखून होते. मराठ्यांच्या बुलंद फौजांचा मुघलांच्यासकट सर्वच एतद्देशीय तसेच परदेशीय सत्ताधीशांनी मनोमन धसका घेतला होता. बंगाल, ओरिसा, कटक प्रांतात तर आया आपल्या लहान मुलांना झोपवण्यासाठी ‘बाळा झोप लवकर, नाहीतर मराठे येतील’ असे सांगायच्या असेही ऐकिवात आहे. इतका दबदबा मराठेशाहीच्या सत्तेचा सर्वदूर दुमदुमत होता.

औरंगजेबाच्या आधीपासून दख्खन मुलखाला जशी सातत्याने मुघल आणि अन्य आक्रमकांच्या स्वार्‍यांची धास्ती असायची तीच दहशत आता पेशवे काल खंडात हिंदुस्थानातील सर्व सत्ताधीशांना मराठ्यांच्या स्वार्‍यांची वाटत असे. वीजेच्या लोळाप्रमाणे मराठे कुठून, कसे आणि कोणावर कोसळतील याचा नेम नव्हता. थोरल्या बाजीरावराऊस्वामींनी अत्यंत चपळ, जलद हालचाली करून अनेक धुरिणांना हा हा म्हणता नामोहरम केले होते. मराठ्यांच्या फौजा अमुक एका ठिकाणी आहेत ही खबर पोहोचेपर्यंत त्या विद्युतगतीने अक्षरशः शत्रूच्या समोर जाऊन उभ्या ठाकलेल्या असायच्या. मग शत्रू असा काही भांबावून जायचा की त्याला मराठ्यांचा कसा प्रतिकार करावा हेच अनेकदा सुचत नसे. मराठा फौजा या प्रांतात शिरल्या आहेत हे त्यांचे नजरबाज येऊन सांगेपर्यंत अनेकदा ती मराठा फौज अथवा तुकडी तो प्रांत यथेच्छ साफ करून आणखी दुसरीकडे रवाना झालेली असायची.

औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला लागलेल्या उतरत्या कळेत अशी वेळ मुघल सम्राटांवर आली की, तख्त टिकविण्यासाठी त्यांना बरेचदा मराठ्यांच्या वाढलेल्या सामर्थ्याचा सहारा घ्यावा लागत होता. आतापावेतो आलम हिंदुस्थानात स्थिरस्थावर झालेले शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, नागपूरकर भोसले आदी मराठा संस्थानिक वेळप्रसंग बघून मुघल, निजाम, राजपूत, रोहिले, जाट यांना मदत करायची का नाही याचा निर्णय घेत असत इतके सामर्थ्य, दबदबा मराठेशाहीचा निर्माण झालेला होता. याचमुळे एक मोहिम आटोपून फौजा परत येईपर्यंत बरेचदा दुसरी मोहीम जारी झालेली असायची. असे उल्लेख आढळतात की जन्मजात सेनानी असलेले थोरले बाजीरावराऊस्वामी आपल्या फौजेसह अनेकदा मजल दरमजल करीत असताना घोड्यावर बसल्या बसल्याच हातात कणसाचे दाणे खात असत. पंतप्रधानपेशव्यांनी छत्रपतींच्याच्या नावे चलनात आणलेले पुणे टांकसाळीचे ‘अंकुश’ तसेच नागफणी चिन्हांकित रुपये, पैसे हे त्या काळात बहुतांशी हिंदुस्थानात एक नामांकित, विश्वसनीय चलन म्हणून मान्यता पावले होते. विघ्नहर्त्या शीगणरायाच्या हातात असणारा किंवा मदमस्त हत्तीला ताब्यात राखण्यासाठी माहूताकडून वापरला जाणारा अंकुश/एश्रशहिरपीं ॠेरव हे चिन्ह, नागराजाच्या फण्यावर ‘10’ आकड्यासदृष दिसणारा फणा/ नागफणी/ ीलळीीेीी हे देखील एक महत्त्वाचे चिन्ह आपणांस या नाण्यांवर बघता येते. अंकुश चिन्हाचे विविध प्रकार या रुपयांवर छापलेले आढळतात. याचसोबत अंकुश चिन्हाखाली तसेच बाजूला आढळणारे वेीं अथवा पूर्णविराम चिन्ह देखील या नाण्यांच्या टांकसाळ बाबत उलगडा करू शकते. या अंकुश चिन्हाचे तत्कालीन महत्व इतके होते की जंजिरा संस्थानाधिपती सिद्दी यांनी देखील या अंकुशी रुपयांवर चक्क देवनागरीत संस्थानचे आद्याक्षर ‘ज’ छापले होते असे नाणकतज्ञांचे एकमत आहे. जेणेकरून मराठेशाहीच्या या मजबूत चलना प्रमाणे त्यांच्या चलनाला ही सर्वमान्यता मिळेल, इतके हे अंकुशी चलन लोकमानसात सुपरिचित ठरले होते.

यापुढे जाऊन सांगायचे झाले तर इ.स. 1818 मध्ये संपुष्टात आलेल्या पेशवाई नंतर ब्रिटिश ईस्ट कंपनीची सत्ता एकएक संस्थाने खालसा करत सर्वदूर संपूर्ण हिंदुस्थानवर बळावली. व्यापाराच्या निमित्ताने देशात शिरलेले हे परकीय व्यापारी आता देशाचेच अधिपती होऊन बसले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचे चलन नवनिर्मित हिंदवी स्वराज्यात चालावे असा राज्याभिषेक समयी आलेला त्यांचा प्रस्ताव वेळीच धोका ओळखून नाकारला होता मात्र आता तेच इंग्रज बलवत्तर ठरून संपूर्ण देशाचे स्वामी होऊन बसले होते. मात्र अशा परिस्थितीत ही नाईलाजास्तव का होईना पेशव्यांनी पाडलेले आणि संपूर्ण देशात मान्यता पावलेले ‘अंकुशी व नागफणी’ चिन्हांकित मराठेशाहीचे चलन त्यांना मराठेशाही गिळंकृत केल्यानंतरही तब्बल 14 वर्षे वापरावे लागले यातच एका अर्थाने त्यांची अपरिहार्यता आणि आपल्या चलनाची परिणामकारकता ठळकपणे दिसून येते असे मानले तर ते गैरलागू ठरू नये. कारण ईस्ट इंडिया कंपनीला अंकुशी आणि नागफणी रुपयांवर देवनागरीतील अंक/आकडे टाकून रयतेला एका अर्थाने सांगावे लागले, की जरी आमची नवीन सत्ता असली तरी आम्ही तुमचेच चलन वापरत (किमानपक्षी सुरुवातीची काही वर्षे तरी) असल्याने तुमच्यापेक्षा वेगळे नाही आहोत हे तुम्हीही समजून घ्या. इतका जबरदस्त पगडा सर्वमान्य चलनाचा लोकमानसावर तसेच राज्यकर्त्यांवर पडत असतो. जसा शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या होनाचा आणि तांब्याच्या शिवरायी पैशाचा 350 वर्षांनंतर आजही आपणा सगळ्यांवर आहे.

अशाच प्रकारे पुणे उर्फ मुहियाबाद, गणेशपूर चिंचवड (चिंचूर), चांदोर उर्फ जाफराबाद, चाकण उर्फ मोमिनाबाद, नाशिक उर्फ गुलशनाबाद, धारवाड उर्फ नसीराबाद, मुल्हेर उर्फ औरंगनगर, गोकाक उर्फ आझमनगर, मिरज उर्फ मूर्तजाबाद, दार-उस-सरूर बुर्‍हाणपूर, दार-ऊल-खिलाफत शाहजहानाबाद उर्फ बागलकोट अशा नावाने मिंटची नावे नाण्यांवर आपणास बघावयास मिळतात. ही नावे मुळातच इतकी लांबलचक असायची की ती सहसा ( 99.99%) एकाच नाण्यावर उमटलेली आढळून येत नाहीत .असे आढळून आले आहे की , एखाद्या नाण्यावर ‘जाफराबाद’ हा शब्द, दुसर्‍या नाण्यावर ‘उर्फ’ हा शब्द तर तिसर्‍या नाण्यावर ‘चांदोर’ हा शब्द छापलेला आढळून आलेला आहे. या मराठेशाहीच्या नाण्यांवर मात्र अतिशय सुबक, ठसठशीत अशी धनुष्यबाण, परशु, अंकुश, तलवार, शी आदीकरून चिन्हे उत्कृष्टरित्या कोरलेली असायची जेणेकरून मराठा नाण्यांचे वेगळे अस्तित्व सहज लक्षात यावे. या पश्चिम भारतातील 75 टांकसाळीपैकी काही ठिकाणची नाणी आजही उजेडात आलेली नाहीत. कदाचित अतिशय अल्पस्वल्प प्रमाणात तेथे नाणी पाडली गेली असावीत असा तर्क मांडता येईल. दुर्गदुर्गोत्तम राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांनी सोन्याचे होन (सेश्रव हेप – िीशलर्ळेीी ाशींरश्र) पाडले होते परंतु त्यांनी तांब्याची नाणी (ीशाळ िीशलर्ळेीी ाशींरश्र) ही गडाच्या तत्कालीन मध्यवर्ती भागात म्हणजे पाचाड येथे पाडली असावीत असा अभ्यासपूर्व निष्कर्ष नक्कीच काढता येतो. सालसेट उर्फ साष्टी प्रांतात देखील मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पाडाव केल्यानंतर जो काही काळ हा भूभाग ताब्यात असताना येथे ही देवनागरीत एका बाजूला ‘प्रांत साष्टी’ व दुसर्‍या बाजूला “शके (16)96” इ.स. 1774? लिहिलेली तांब्याची नाणी पाडलेली आहेत जी आजही उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे बलिष्ठ अशा मुघल सत्तेचे वर्चस्व झुगारून मराठ्यांनी ही आज खरोखर स्वप्नवत वाटावीत अशी बहुसंख्येने नाणी पाडलेली आहेत ही आपणास एक फारच अभिमानास्पद बाब आहे असे नक्कीच गौरवाने म्हणता येईल. मराठ्यांच्या हिंदुस्थानातील इतर प्रांतातील टांकसाळीचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.


॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥ मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 2

 

॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥

मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 2

 

सरलष्कर महाराज साहेब शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ माँसाहेबांनी संकल्पिलेले आणि शककर्त्या शिवछत्रपतींनी प्रत्यक्षात उतरवलेले, एका अलौकिक स्वप्नाचे, स्वराज्याचे बीज या राकट कणखर सह्याद्रीमध्ये रुजले होते.नव्हे तर ते आता नर्मदापार जाऊन मुघलांच्या विशाल वृक्षाला टक्कर देण्यास आणि वेळप्रसंगी त्यांचेच संरक्षण करण्यासही सक्षम झालेले होते. शाहूनृपकृपाशीर्वादेकरून हिंदवी स्वराज्यविस्तारक थोरल्या बाजीरावांसमवेत मराठा फौजांच्या दमदार टापा आणि टांकसाळी पण संपूर्ण हिंदुस्थानात पसरल्या होत्या.

शंभुपुत्र शाहू छत्रपती औरंगजेबाच्या 1707 मधील मृत्यूनंतर मुघलांच्या कैदेतून सुटून येऊन आपले आसन आणि विभागल्या गेलेल्या स्वराज्यावरील आपली पकड बळकट करण्याच्या प्रयत्नात होते.तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला यशस्वी प्रतिकार करणार्‍या शिवस्नुषा आणि राजाराम महाराज यांची पत्नी महाराणी ताराबाईसाहेब यांनी करवीर संस्थानची स्थापना केलेली होती. अशा विपरीत परिस्थितीत प्रसंगी शाहू महाराजांनी त्यांच्याशीही युद्ध केलेले आहे. हा लढा वारणेच्या सुप्रसिद्ध तहानंतर प्रदेशाची विभागणी होऊन बव्हंशी थांबला. यानंतर बरेचसे स्थिरस्थावर झालेले शाहू छत्रपती आणि यशाचा लोलक चातुर्याने त्यांच्या पारड्यात झुकवणारे त्यांचे विश्वासू पंतप्रधान पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि नंतर थोरले बाजीराव यांनी थेट मुघल साम्राज्याला आव्हान देऊन मराठ्यांची दमदार घोडदौड नर्मदा ओलांडून दिल्लीच्या तख्ताकडे केली. थोरले बाजीराव राऊस्वामी म्हणजे प्रत्यक्ष मराठ्यांच्या शाहू छत्रपतीची दिल्लीच्या सिंहासनावर रोखलेली बुलंद समशेर होती जणू. थोरल्या बाजीरावांनी अथक पराक्रम गाजवून, युद्धकौशल्याची चातुर्याच्या परिसीमा गाठून मराठा तख्ताचे एक एक शत्रू नामोहरम करीत आणले. बाजीरावांनी आपले लक्ष्मणासारखे पाठराखे बंधू चिमाजीअप्पा आणि शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले, जगताप, पटवर्धन आदी छत्रपतींच्या अनेक निष्ठावंतांच्या मजबूत साथ सहकार्‍यासह अवघ्या हिंदुस्थानातील सत्तांना तोंडात बोट घालायला लागेल असा पराकाष्ठेचा यशवंत पराक्रम केला. बाजीरावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर मुघलांकडून समृद्ध असा माळवा प्रांतही खेचून घेऊन स्वराज्यास जोडला. पुढे चिमाजीअप्पा, गंगाजी नाईक अणजूरकर, बाजी भिवराव रेठरेकर अशांच्या साहाय्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसईचा किल्लादेखील भीमपराक्रम करून जिंकला. शाहू छत्रपतींच्या कारकीर्दीत मराठा फौजांना, त्यांच्या वेगवान अश्वदळाला पाय स्थिर राखण्यासाठी जणू ही हिंदुस्थानची भूमी कमी पडत होती, असेच चित्र दिसत होते.

माळवा, बुंदेलखंड, राजपुतांना, निजाम, मुघल अशा सत्तांना नमवून ते प्रांत ताब्यात आणून थेट बंगाल आणि उत्तरेकडे मराठ्यांची जबरदस्त घोडदौड सुरू होतीच. वरचेवर सुरू असलेल्या स्वार्‍यांमुळे बरेचदा पंतप्रधान पेशव्यांना कर्जही होत होते, परंतु हिंदवी स्वराज्य विस्ताराच्या या दमदार प्रयत्नात त्यामुळे खंड मात्र खचितच पडलेला नव्हता. सैन्याला चाल करण्यासाठी रसद – अन्नाची आणि अर्थातच पैशांचीही निकड लागतेच. मग अशा खडतर परिस्थितीत मध्यवर्ती सत्ताकेंद्र राजधानी सातारा आणि पंतप्रधान पेशव्यांचे वास्तव्य असलेले बलस्थान पुणे येथून उत्तरेकडे ग्वाल्हेर, दिल्ली, मथुरा, वृंदावन आदी ठिकाणी तळ ठोकून असलेल्या आपल्या फौजांच्या खर्चाला पैसेही वेळेवर मिळायला हवेत, या वस्तुस्थितीमुळे तेथे उभारल्या गेलेल्या मराठ्यांच्या असंख्य टांकसाळी आपल्याला आज अभ्यासता येत आहेत. फक्त पश्चिम भारतात मराठ्यांच्या तब्बल 75 एक टांकसाळी होत्या अशी नोंद आहे. यात अहमदनगर, अहमदाबाद, अलिबाग, अथणी, बागलकोट, बंकापूर, बारामती, (गगन) बावडा, बेलापूर, बेळगाव-शहापूर, भातोडी, भोर, भिवंडी, विजापूर, बुर्‍हाणपूर, चाकण, चांभारगोंदा, चांदोर, चिकोडी, चिंचवड, चोपडा-एरंडोल-पारोळा, धारवाड, घोटवडे (आझम नगर) गोकाक, हुक्केरी, कागल, कापशी, खानापूर, कित्तूर, कोल्हापूर, कमळगढ, लक्ष्मीश्वर, मैंदरगी, मलकापूर, मानोली, मिरज-सांगली-जमखिंडी, मुधोळ, मुल्हेर, मुरगोड, नागोठणे, नरगुंद, नाशिक, नवलगुंद, निपाणी, पन्हाळा, पेडगाव, फलटण, फुलगाव, पुणे, रहिमतपूर, रायगड, राजापूर, रामदुर्ग, रासिन, रेवदंडा, साष्टी (सालसेट), सातारा, सोलापूर, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, तळेगाव इंदुरी, तारळी, तासगाव, टेंभुर्णी, (सरकार)तोरगळ, वाफगाव, विशाळगड, (सावंत)वाडी, वाई, वाठार आणि यादवाड या नावांची नोंद ‘मराठा कॉइनेज आणि कटलाग’ या पुस्तकात स्पष्टपणे आढळते. यासोबत अजूनही काही नवीन मिंट्स कालपरत्वे उजेडात आलेल्या आहेत, हे पण येथे नमूद करण्याजोगे आहे. उदा. सावनूर पेठ, सरहिंद, शाहजहानाबाद इत्यादी. मात्र तरीही काही ज्येष्ठ अभ्यासक, तज्ज्ञ मंडळी यातील काही मिंट्स मराठ्यांच्या नसाव्यात, असे तेथील उपलब्ध नाण्यांच्या अथवा उपलब्ध चित्रांच्या आधारे वेळोवेळी अधोरेखित करीत आहेत.

यातील प्रत्येक नाण्यावर मराठ्यांनी आपले एखादे वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह छापून त्या नाण्याची वेगळी ओळख ही नाण्यांवरील लिपी जरी पुन्हा एकदा पर्शियन असली तरी अबाधित राखली आहे, हे फार महत्त्वाचे आहे. ही नाणी बरेचदा मुघल पद्धतीच्या नाण्यांशी साधर्म्य राखून असली तरी त्यावरील लिखावट ही मुघलांच्या नाण्यांच्या तुलनेत बरीचशी क्रूड (जाड्याभरड्या पद्धतीची) असायची. मात्र मराठा नाण्यांवरील चिन्हांमुळे/तसेच टांकसाळीच्या नावामुळे (हे टांकसाळीचे नाव बरेचदा नाणी पाडताना नाण्याच्या बाहेर/ ेषष ींहश षश्ररप गेलेले असते) ही नाणी सुस्पष्टपणे ‘मराठा नाणी’ म्हणून ओळखता येतात. या विविध ठिकाणच्या नाण्यांवर हत्तीला काबूत राखण्यासाठी वापरण्यात येणारे दोन- तीन प्रकारचे अंकुश (एश्रशहिरपीं सेरव), वेगवेगळ्या आकाराचे परशू (लरीींंश्रश रुश), नागफणी, ‘श्री, ज, क्र, रा, ग, स, मु, मो, धु, प्र, आदी अक्षरं ’, राम, सूर्य, चंद्र, मराठा धोप पद्धतीची तलवार, भाळी रेखल्या जाणार्‍या गंधाचे वेगवेगळे प्रकार, देवनागरी अंक/आकडे, कडं, फिरत्या भुईचक्रागत चिन्ह, विविध प्रकारचा जरीपटका, उभे आडवे तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे शिवलिंग, शिव शंकराचा डमरू, वैविध्यपूर्ण आकाराचे, प्रकारचे त्रिशूळ, पंचकोनी, अष्टकोनी तारा, फुलांचे विविध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारची पाने, कमळाच्या कळीचे, फुलांचे अनेक प्रकार, विविध प्रकारचा तुरा, विविध प्रकारची राजछत्र, काही भौमितिक आकार, असंख्य प्रकार/आकाराच्या तलवार, कट्यारी, जरीपटक्यासह अंकुश, धनुष्यबाण, ठासणीची बंदूक, माशाचे (षळीह) विविध आकार/प्रकार, अश्व/घोडा, बिल्वपत्र अथवा बेलाचे त्रिदल पान, बोटीच्या नांगरागत भासणारे चिन्ह, विंचू वाटावा अशी काही चिन्हे, झाडांच्या फांद्या (ीींशश श्रशरष), शुभचिन्ह ‘स्वस्तिक’, लहानमोठ्या आकाराच्या बिंदूंची वर्तुळाकार नक्षी अशी अनेक असंख्य चिन्हे आपणांस अभ्यास करताना मराठा नाण्यांवर आढळून येतात.

चिन्हांची इतकी विविधता तथा समृद्धी अन्य कोणत्याही नाण्यांवर आढळून येत नाही हे विशेष. त्यावेळी त्या त्या प्रसंगानुरूप, विभाग/शहरानुरूप आणि गरजेनुसार ही सगळी चिन्हे छापली गेली असावीत, असा निष्कर्ष मात्र आपण नक्कीच काढू शकतो. ही सगळीच चिन्हे अतिशय ठसठशीत आणि रेखीव आहेत, जी मराठा नाण्यांचे वेगळेपण, दिमाख सहजपणे सिद्ध करतात. चांदीच्या तसेच तांब्याच्या नाण्यांवरील ही चिन्हांची कलाकुसर बघणार्‍याला नक्की मोहात पाडते, हे मात्र खरं. जसं मी याआधीही उद्धृत केलेले आहे की, मराठा नाण्यांचे सौंदर्य हे सह्याद्रीच्या रूपानुसार त्याच्या रांगड्या, राकट, बेलाग, कणखर पण तरीही मोहवणार्‍या, प्रेमात पाडणार्‍या स्वभावाप्रमाणेच आहे. मराठा नाण्यांच्या पश्चिम विभागातील महत्त्वाच्या आणि लोकमानसात सुपरिचित असलेल्या टांकसाळी कोणकोणत्या होत्या याचा आढावा आपण यापुढील लेखात घेऊ या.


॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥ मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 1

 

॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥

मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 1

 

हिंदुस्थानच्या इतिहासात गेली अनेक शतके असंख्य राजेरजवाडे, राजघराणी, संस्थाने उदयास आली आणि त्यातील अनेक कालांतराने अस्त पावली तर बरीचशी टिकूनही राहिली. बहुतांशी राजवटींनी आपली स्वतंत्र नाणीही पाडली होती, ज्यापैकी अनेक आजही उपलब्ध आहेत, तर कालौघात काही नष्टही झाली. सतराव्या आणि अठराव्या शतकात शिवछत्रपतींनी दख्खनमध्ये स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची आणि पुढे आलम हिंदुस्थानात पसरलेल्या मराठेशाहीच्या नाण्यांची आणि मराठा टांकसाळींची ही कहाणी.

अनेक एतद्देशीय आणि परकीय आक्रमकांनी राज्य केलेली ही हिंदुस्थानची भूमी. येथे गुप्त, मौर्य, चालुक्य, वाकाटक, शिलाहार, सातवाहन, क्षत्रप, कदंब, यादव आणि परकीय आक्रमक सुरी, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच, सिद्दी इत्यादी सत्ता राज्य करून गेल्या होत्या, तर काही राज्य करीत होत्या. अशा या सत्ताधीशांबरोबर राकट, बेलाग, दर्गम अशा सह्याद्रीच्या मुलुखात अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या शहाजीपुत्र जिजाऊसुत शिवरायांनी स्वतंत्रतेचा न भूतो न भविष्यति उद्घोष करून आपले स्वतंत्र सिंहासन दुर्गदुर्गोत्तम रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या सुमुहूर्तावर स्वतःला राज्याभिषेक करवून निर्माण केले. अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतर ही तेजस्वी शिवसूर्याची स्वातंत्र्य किरणे सह्याद्रीच्या कडेकपारीत अलौकिक तेजाने पोहोचली. मग अर्थातच स्वतंत्र सार्वभौम राजाच्या अधिकारात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली नूतन हिंदवी स्वराज्याची स्वतंत्र नाणीदेखील पाडली. ती होती – सोन्याचे होन आणि तांब्याचा पैसा ‘रुका.’ रुका हे कागदोपत्री नाव आढळत असले तरी हा पैसा या शककर्त्या शिवरायांच्या नावामुळे ‘शिवरायी’ या नावानेच मान्यता पावला, ओळखला जाऊ लागला. तत्कालीन वापरात असलेल्या बहुतांशी नाण्यांवर फारसी भाषेचा प्रभाव असल्याने जवळपास सर्वच नाणी ही पर्शियन लिखावट असलेली असायची. मात्र ‘स्वत्व’ जपणार्‍या शिवछत्रपतींनी आपली मराठेशाहीचा पाया घालणारी ही नाणी देवनागरी लिपीत लिखावट असलेली पाडली होती. ‘श्री राजा शिव’/ ‘छत्र पती’, ‘श्री राजा शंभु’ / ‘छत्र पती’, ‘श्री राजा राम’ / ‘छत्र पती, ‘श्री राजा शाऊ / सावु / शाहु / साव’ / ‘छत्र पती’ अशी लिखावट मराठ्यांच्या या चार पहिल्या छत्रपतींच्या नाण्यांवर दिसून येते. शाहू छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांनीदेखील सुरुवातीला देवनागरीतील नाणी छत्रपतींसाठी पाडली होती. ज्यांना ‘दुदांडी’ नाणी अथवा ‘शिवरायी’ म्हणून ओळखले जाते. शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते मराठा साम्राज्य आसेतू हिमालय अहद तंजावर ते तहत पेशावर, रुमशाम (रूम = रोम, शाम = शामल म्हणजे हबशी = थेट अफ्रिका) पावेतो विस्तारायला हवे. शाहू छत्रपतींच्या कालखंडात त्यांचे पंतप्रधान पेशवे आणि मराठ्यांच्या बुलंद फौजांच्या मांदियाळीने सुरुवातीला हिंदवी स्वराज्यविस्तारक थोरल्या बाजीरावराऊस्वामींच्या समवेत नर्मदेपार घोडी घालून शिवछत्रपतींचे स्वप्न साकार करायला तसेच उत्तर हिंदुस्थान ताब्यात आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. मराठेशाहीच्या, हिंदवी स्वराज्य विस्तारासाठी पुढे तर अफगाणिस्तानाजवळील ‘अटक’ या किल्ल्यावर स्वारी करून मराठ्यांचा भगवा जरीपटकाही डौलाने फडकवला होता. या प्राप्त परिस्थितीत वेळोवेळी लागणारा खर्च, चलन हेदेखील तेवढेच महत्त्वपूर्ण होते. त्यामुळे देवनागरीतील मराठ्यांची नाणी अन्य प्रदेशांत सुलभपणे स्वीकारली जावीत, (षीशश रललशिींरपलश ) याकरिता कालांतराने मराठेशाहीच्या नाण्यांवर पर्शियन लिपीचा वापर होऊ लागला असावा, असे नक्कीच म्हणता येईल. तसेच मध्यवर्ती सत्ताकेंद्र सातारा (शाहू छत्रपती हयात असेपर्यंत, तदनंतर पुणे ) येथून खजिना / रक्कम / पैसे पोहोचवणे तसे अवघड होते. या कारणास्तव मराठ्यांनी हिंदुस्थानात जागोजाग आपल्या मिंट / टांकसाळी स्थापन केल्या होत्या, असाही निष्कर्ष काढता येईल.

नाणकशास्त्र अभ्यासकांच्या सोयीसाठी या मराठा टांकसाळींची सर्वसाधारणपणे चार विभागांत वर्गवारी केली गेलेली आहे – पश्चिम भारत, मध्य भारत, उत्तर भारत आणि दक्षिण भारत. चरीरींहर चळपीीं उेळपरसश या महत्त्वपूर्ण पुस्तकातील नोंदीनुसार पश्चिम भारतातील सुमारे 75 मिंट्सची नावे आपल्याला आढळून येतात. एका धारणेनुसार काही लेखकांनी असा उल्लेख केलेला आहे की, मराठा नाण्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपले नाणे वडील महाराज साहेब शहाजीराजांच्या मृत्यूनंतर म्हणजेच इ. स. 1664 मध्ये ‘राजा’ ही पदवी धारण करून पाडले. मात्र अजूनही त्यावेळी पाडलेले एकही नाणे अभ्यासकांना उपलब्ध झालेले नाही तसेच कोणताही विश्वसनीय कागद तपासायला उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे विचारांती असाच निष्कर्ष काढावा लागतो की, सर्वमान्यतेप्रमाणे शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकासमयी सोन्याचे होन तसेच तांब्याचा रुका / शिवरायी ही दोन नाणी पाडली होती. छत्रपतींनंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी पण आपली स्वतंत्र नाणी पाडली. शाहू छत्रपतींच्या काळात बहुतांशी सत्ताकेंद्र हे पंतप्रधान पेशव्यांच्या हाती आले होते. पंतप्रधान पेशव्यांनी मात्र कधीही आपली स्वतंत्र नाणी पाडली नाहीत, तर छत्रपतींच्या नावानेच पाडली. साधारणतः असे दिसून येते की 1750 नंतर मध्यवर्ती सत्तेचा लोलक हा पुण्याकडे झुकला होता. यावेळी दिल्लीला शाह अली गौहर हा मुघल बादशाह होता. 1759 पासून पुणे तसेच अन्य ठिकाणी मराठ्यांच्या टांकसाळींची सुरुवात होऊ लागली. यावेळपावेतो मराठे उत्तरेकडे वारंवार आपल्या फौजा घेऊन आक्रमण करीत होतेच. पानिपत, दिल्ली, बंगाल, कटक, अफगाणिस्तान येथील अटक येथपावेतो त्यांच्या भीमथडी घोड्यांच्या टापांचे खूर पायास तेथील माती लावून आलेले आढळून येतात. अशावेळी दूरवर पुणे येथील मध्यवर्ती केंद्राकडून फौजांचा खर्च, रसद, वेतन आणि अन्य उद्भवणार्‍या खर्चाकरिता पैसे मागवणे हे अवघड असल्याकारणाने स्थानिक ठिकाणी टांकसाळ उभारणे गरजेचे वाटत असणार. या प्राप्त परिस्थितीमुळे आलम हिंदुस्थानात मराठ्यांच्या इतक्या टांकसाळी स्थापन झालेल्या आपल्याला आढळून येत. पश्चिम भारतातील महत्त्वाच्या टांकसाळीत पुणे, चिंचवड, अहमदाबाद, चाकण, अथणी, बागलकोट, भातोडी, बुर्‍हाणपूर, मुल्हेर, नाशिक, वाफगाव, चांदोर, वाई आदी ठिकाणच्या टांकसाळींची नावे आपल्याला नक्कीच घेता येतील.

याव्यतिरिक्त असलेल्या अन्य ठिकाणच्या टांकसाळींच्या नावांची पण आपण नोंद घेणार आहोतच. या विविध टांकसाळींतून मराठ्यांनी पाडलेल्या नाण्यांवर जरी एका बाजूला (शाहू छत्रपतींच्या वेळी झालेल्या करारामुळे) मुघल बादशहाचे नाव आढळून येत असले तरी आपल्या स्वतंत्र राजवटीच्या नाण्यांची ओळख ही मराठ्यांनी विविध नाण्यांवर विविध चिन्हे छापून अबाधित राखली होती, हेही फार महत्त्वपूर्ण होते. मात्र मराठ्यांच्या चलनाची स्वीकारार्हता असावी, याकरिता देवनागरीऐवजी तेथील स्थानिक प्रचलित पर्शियन लिखावटीत पाडली होती, असेही आपणास दिसून येते. या वैशिष्ट्य पूर्ण चिन्हांमुळे मराठेशाहीच्या नाण्यांनी आपली स्वतंत्र आणि वेगळी ओळख अबाधित राखली होती, हेही तेवढेच खरे. कारण नाणे हे देवाणघेवाण, दैनंदिन व्यवहारात वापरले जात असते. जर त्यावरील मजकूर घेणार्‍याला समजण्याजोगा नसेल तर ते नाणे स्वीकारले जाणार नाही, हा मुद्दा लक्षात आल्यामुळेदेखील पुन्हा एकदा देवनागरीऐवजी पर्शियन लिखावटीचा आधार मराठ्यांना घ्यावा लागला असावा, असे मानण्यास प्रत्यवाय आहे. या काही महत्त्वाच्या टांकसाळींशिवाय अन्य कोणत्या टांकसाळी पश्चिम भारतात होत्या व नाण्यांची वैशिष्ट्ये चिन्ह कोणकोणती होती, हे आपण पुढील लेखात पाहू या.


पेशवेकालीन हिंदवी स्वराज्यातील मराठा संस्थानिक घराणे पटवर्धन

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्यातील मराठा संस्थानिक घराणे पटवर्धन

 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन पुढे अनेक घराण्यांनी हिंदवी स्वराज्य विस्ताराचा वसा स्वीकारला. शाहू छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांच्यासमवेत अनेक घराण्यांनी या कार्यात झोकून देऊन मराठेशाहीचा दबदबा हिंदुस्थानच नव्हे तर थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवला होता. समर्थ रामदास स्वामींचे बोल – ‘मराठा तितुका मेळवावा, अवघा महाराष्ट्रधर्म वाढवावा’ सार्थ करण्यात मिरज, सांगली, जमखिंडी, कुरुंदवाड, तासगाव येथील हे पटवर्धन घराणे देखील सहभागी होते.)

पेशवाई कालखंडात जी अनेक कर्तबगार घराणी हिंदवी स्वराज्याच्या पटलावर उदयास आली त्यातील एक म्हणजे हे पटवर्धन घराणे होय. यांचे मूळ रत्नागिरी येथील कोतवड गावचे. या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात त्या हरिभट पटवर्धन यांच्या सात अपत्यांपैकी त्रिंबक, गोविंद आणि रामचंद्र हे प्रसिद्धीस आले. कारणपरत्वे हरिभट बहिरेवाडी येथे आले असताना तेथे त्यांचा इचलकरंजीकर घराण्याचे संस्थापक नारो महादेव जोशी (घोरपडे) यांच्याशी कुलोपाध्यायांच्या नात्याने संबंध आला. इचलकरंजीकर आणि पेशवे पंतप्रधान यांच्यात नातेसंबंध असल्याने यांचा पुढे बाळाजी विश्वनाथांशी संपर्क झाला. गोविंदराव पटवर्धन यांना पेशव्यांनी पुढे त्यांच्या निष्ठा पाहून महत्त्वाची पदे दिली. भाऊ रामचंद्रराव यांनी देखील वसईच्या सुप्रसिद्ध रणसंग्रामात मराठ्यांच्या वतीने पराक्रम गाजवला होता. आता गोविंदरावांच्या पराक्रमावर आणि स्वामीनिष्ठेवर पेशव्यांचा विश्वास बसला असल्यामुळे बाळाजी बाजीरावांनी गोविंदराव यांना पाच हजार सैन्याच्या पथकाचे


अधिपती केले आणि त्यांच्यावर जबाबदार्‍या सोपवल्या. आता त्यांचे दोन भाऊ त्रिंबक आणि भास्कर हे ही पेशव्यांकडे रुजू झाले तसेच पटवर्धनांचा बराचसा आप्तपरिवार ही स्वराज्याच्या कार्यात, चाकरीत दाखल झाला. पटवर्धन कुटुंबातील अनेक पुरुषांनी सावनूरचे नबाब, हैदर अली, टिपू सुलतान यांच्याशी लढताना युद्धात शौर्य गाजवले असल्याकारणाने पेशव्यांनी गोविंदरावांस इ.स. 1755 मध्ये नगार्‍याचा मान दिला होता. मात्र सदाशिवरावभाऊ आणि पटवर्धन यांचे फारसे सख्य नव्हते असे इतिहास सांगतो. तसेच पटवर्धन घराण्यातील अनेक कर्तबगार पुरुषांनी मराठेशाहीच्या, हिंदवी स्वराज्यविस्ताराच्या या लढ्यात प्राणार्पण करूनही आपले योगदान दिलेले आहे असेही इतिहासात नमूद आहे. मात्र पानिपतच्या रणसंग्रामात पटवर्धनांपैकी विशेषत्वाने कोणीही उपस्थित नव्हते कारण खुद्द गोविंदराव हे दक्षिणेत गुंतलेले होते. पुढे रघुनाथराव उर्फ राघोबादादा आणि थोरले माधवराव यांच्यातील अंतर्गत संघर्षात पटवर्धन हे माधवरावांच्या बाजूने असल्यामुळे राघोबादादांनी थेट त्यांच्या मुख्य जहागिरीवर म्हणजे मिरजेवरच हल्ला केला. याकारणाने गोविंदराव यांचे सुपुत्र गोपाळराव पटवर्धन हे तात्पुरते निजामास जाऊन मिळाले होते. मात्र माधवराव पेशव्यांनी त्यांना पुन्हा आपल्याकडे आणवले व राक्षसभुवन येथील लढाईत निजामाचा पराभव ही केला. माधवरावांनी त्यांना 8000 तैनाती घोडदळ, 25 लाखांचा सरंजाम तसेच कृष्णा व तुंगभद्रा यामधला प्रांत इनाम दिला. गोविंदरावांचे सुपुत्र गोपाळराव आणि रामचंद्ररावांचे सुपुत्र परशुरामभाऊ हे दोघेही आपापल्या वडिलांंसारखेच पराक्रमी आणि कर्तबगार होते.

पटवर्धनांना पंतप्रधान पेशव्यांकडून मोठा सरंजाम मिळाल्याने त्यांचे राजकीय महत्व वाढले होते. हैदरअली आणि टिपू यांच्याशी झुंज देऊन कर्नाटक त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. मात्र अनपेक्षितपणे 1771 मध्ये गोपाळराव हे हैदरअली विरुद्धच्या लढ्यात मृत्यूमुखी पडले व काही काळाने गोविंदराव हे देखील निधन पावले.

पेशवे नारायणराव यांच्या खुनानंतर पटवर्धनांनी सवाई माधवराव पेशवे यांचा पक्ष घेतला होता. गुजरातवरील स्वारीत सेनानी हरिपंत फडके यांच्यासमवेत गोविंदराव यांचा दुसरा पुत्र वामनराव हा देखील 1775 मध्ये मरण पावला. पुढे इ.स. 1777 मध्ये हैदर शी लढताना तिसरा मुलगा लढाईत जखमी झाला तर कुरुंदवाड संस्थानचे कोन्हेरराव पटवर्धन हे मृत्यू पावले तसेच पांडुरंगराव, श्रीपतराव आणि वासुदेवराव पटवर्धन यांना कैद ही झाली. मराठेशाहीच्या विस्ताराकरीता चाललेल्या युद्धप्रसंगात 1740 ते 1800 या साठ वर्षांंच्या काळात पटवर्धनांच्या घराण्यातील तब्बल तीस कर्ते पुरुष कामी आले अशी स्पष्ट नोंद आहे. मराठा साम्राज्यासाठी लढत असताना दस्तुरखुद्द दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी मात्र पटवर्धनांवर खप्पा मर्जी राखली होती हे आश्चर्यकारक आहे. दुसर्‍या बाजीरावानी तर परशुरामभाऊंनाही अटकेत टाकले होते असे इतिहास सांगतो.

पांडुरंगरावांचा मुलगा चिंतामणराव यांना 1783 मध्ये सरंजाम दिला गेला. 1795च्या खर्ड्याच्या लढाईत परशुरामभाऊ, चिंतामणराव आदींनी समशेर गाजवली होती. पटवर्धन घराण्याने इंग्रजांविरुद्धच्या खडकी, कोरेगाव, आष्टी च्या लढायांत ही कोणतीही कसूर ठेवता पराक्रमाची शर्थ केली होती. पुढे अंतर्गत कौटुंबिक कलहामुळे जहागिरीचं विभाजन तसेच नवनिर्माण होऊ लागले. कुरुंदवाड थोरली आणि धाकली पाती (डशपळेी रपव र्क्षीपळेी लीरपलह), मिरज थोरली आणि धाकली पाती, सांगली, तासगाव, जमखिंडी अशा पटवर्धन संस्थानिकांच्या जहागिरी होत्या. सालबाईच्या मराठा इंग्रज तहानंतर पटवर्धनांनी टिपूविरुद्धच्या लढायांत इंग्रजांना दमदार मदत केली होती. याचमुळे इंग्रज त्यांना आपले जवळचे स्नेही मानत असत. 1818 मधील पेशवाईच्या अस्तानंतर पटवर्धनांची संस्थाने देखील नाईलाजास्तव ब्रिटिशांची मांडलिक झाली होती.

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ म. गो. रानडे यांच्या पुष्टीनुसार मिरज, सांगली येथे पटवर्धनांनी आपली नाणी पाडली होती. त्यांच्या रुपयांवर देवनागरीत ‘ग’ हे अक्षरे छापलेले होते, जे पटवर्धन घराण्याचे आराध्यदैवत गणपतीच्या नावाने सुरू होणारे आहे. अभ्यासक क्लून्स् पटवर्धनांच्या या रुपयांना ‘मिरजी हुकेरी’ रुपये संबोधतो. सांगली येथे तसेच जमखिंडी येथेही पटवर्धन संस्थानिकांनी आपली नाणी पाडली होती. मिरजच्या रुपयावर देवनागरीतील ‘ग’ हे अक्षर येतं तसंच त्या ‘ग’ अक्षराखाली चार टिंबांची वेगवेगळी नक्षी पण येते. याव्यतिरिक्त मिरजेचे ‘ग’ या अक्षराशिवायचे रुपये पण छापलेले आढळतात. मिरजेच्या रुपयावर 7 पाकळ्यांचे बिंदूमय वर्तुळाकार फुल/नक्षी ही दिसून येते. यातील बिंदूंच्या आकारात असलेला लहान-मोठेपणा ही दिसून येतो. मात्र संग्राहकांसाठी बहुमोल असा, एका बाजूस पर्शियन लिखावटीसह देवनागरीत ‘श्री गणपती’ आणि दुसर्‍या बाजूला देखील ’श्री पंतप्रधान’ असे देवनागरीत छापलेला नजराणा रुपया देखील आहे. अत्यंत देखणा, सुबक अन् बघताक्षणीच मनात ठसणारा असा हा गणपती पंतप्रधान रुपया आहे यात शंका नाही. यामध्ये अर्धा तसेच पाव रुपया ही पाडलेला आढळून येतो. पटवर्धन घराण्यातील कर्तबगार अशा गोपाळराव यांनी ‘श्री गोपाळराव पुनःप्रतापी’ असा देवनागरीत मजकूर असलेला तांब्याचा पैसादेखील पाडला आहे. हा बराचसा र्लीीवश पद्धतीचा आहे. हे नाणे रहिमतपूर या ठिकाणी/टांकसाळीत पाडले होते. याव्यतिरिक्त पटवर्धनांच्या टांकसाळीत पाडला गेलेला ‘अर्काट’ रुपयाच्या धर्तीवर (िीर्शीवे -ीलेीं ाळपीं) असलेला आणि अतिशय रेखीव असे ‘त्रिशूळ’ चिन्ह छापलेला रुपया पण आहे, मात्र नाणकशास्त्रातील तज्ञांमध्ये या त्रिशूळी रुपयाबाबत अजूनही एकवाक्यता आढळून येत नाहीये असे नक्कीच म्हणता येईल. या त्रिशूळी रुपयास दक्षिणी मराठा रुपया (ऊशललरप चरीरींहर र्ठीशिश) असे ही ओळखले जाते. नाणकतज्ञ प्रिन्सेप आणि क्लून्स् यांच्या म्हणण्यानुसार सांगली आणि मिरज या रुपयात फारच थोडा तपशीलातील फरक आढळतो. जमखिंडीचा रुपया हा देखील सहसा पटकन आढळून येत नाही. पाच संस्थानांचे अधिपती असणार्‍या या पटवर्धन घराण्याचे नाव मराठेशाहीच्या नाणी पाडणार्‍या संस्थानिकांसोबत आदराने नक्कीच घेतले जाईल.

स्वराज्याच्या पंतप्रधान पेशव्यांनी छत्रपतींच्यावतीने पाडलेली नाणी १

 

स्वराज्याच्या पंतप्रधान पेशव्यांनी छत्रपतींच्यावतीने पाडलेली नाणी १

 

प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | ‘नाणे’घाट

शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे चौथे अभिषिक्त छत्रपती शंभुपुत्र थोरले शाहू महाराज यांनी पंतप्रधानपदाबरोबर विश्वासाने बरेचसे अधिकार श्रीवर्धन येथील भट कुलोत्पन्न बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे सोपविले. पेशव्यांनीही अखेरपर्यंत छत्रपतींच्या सार्वभौम गादीसोबत निष्ठा राखून कधीही स्वतःची नाणी पाडली नाहीत, हे विशेष.

पंतप्रधान या शब्दाचा फारसी अर्थ पेशवा. छत्रपती शाहू महाराजांनी आपले पंतप्रधान म्हणून कोकणातील श्रीवर्धन येथील ‘भट’ घराण्यातील बाळाजी विश्वनाथ यांस यापदी नियुक्त केले. याआधी शाहू छत्रपतींनी 16 मार्च 1713 रोजी परशुरामपंत पंतप्रतिनिधीस प्रथम पेशवाईचे पद दिले होते. परंतु ते काढून 19 जून 1713 ला त्यांस पुन्हा ‘प्रतिनिधी’ हे पद दिले. मग 17 नोव्हेंबर 1713 रोजी शाहू महाराजांनी बाळाजीपंतांना पेशवाईची वस्त्रे दिली. पुढे या भट कुलोत्पन्न पेशव्यांनी शिवछत्रपती स्थापित हिंदवी स्वराज्याचे नगारे आलम हिंदुस्थानात तर वाजवलेच आणि नंतर निधड्या छातीच्या मराठा सैन्याच्या जोरावर थेट अफगाणिस्तानातील ‘अटक’ या किल्ल्यावरही मोठ्या दिमाखात, डौलाने शिवसाम्राज्याचा भगवा ध्वज फडकवला, हा इतिहास आहे. कोकण किनारपट्टीवर जरबेचा अंमल पूर्वापार राखून असलेले क्रूर हबशी राज्यकर्ते यांच्याशी पटेना, म्हणून बाळाजीपंत देशावर सासवड येथील अंबाजीपंत पुरंदरे यांच्या आश्रयाने सरसेनापती चंद्रसेन जाधवराव यांजकडे चाकरीस आले. पुढे एका प्रसंगोत्पात सरसेनापती चंद्रसेन जाधवराव आणि बाळाजीपंत यांच्यामध्ये वितुष्ट आले. त्यात बाळाजीपंतांना दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराजांनी साथ दिल्याने चंद्रसेन जाधवराव अधिकच आक्रमक झाले. सारासार विवेक सोडून त्यांनी प्रत्यक्ष छत्रपतींविरुद्ध शस्त्र हाती धरले. परंतु शाहू महाराजांनी त्यांचा पाडाव करून त्यांचे सेनापतीपद त्यांचेच बंधू संताजी जाधव यांस दिले.
शाहू महाराजांनी या प्रकारे हरप्रसंगी बाळाजीपंतांवर दाखविलेला विश्वास त्यांनी वेळोवेळी निष्ठेने पार पाडत नेला. पुढे शाहू छत्रपतींनी दमाजी थोरात यांस बंड न करता श्रीपाशी (देवांजवळ) बेलभंडारा उचलून आम्हांसी एकनिष्ठ राहावे, असे सांगितले असता, दमाजीने बेलभंडार कशास पाहिजे? भंडार म्हणजे आमची नित्य खावयाची हळद आणि बेल तरी झाडाचा पाला, असे उद्दाम प्रत्युत्तर केले. अखेर छत्रपतींनी बाळाजीपंतांस दमाजी थोरातांचे पारिपात्य करण्यास धाडले. बाळाजीपंतांनी दमाजीचे तसेच खटावकर ब्राम्हण राजांचेही पारिपात्य केले. अलिबाग येथील सरखेल दर्यासारंग कान्होजीराजे आंग्रे हे सुरुवातीला शाहूंच्या पक्षाचे नव्हते. त्यांनाही बाळाजीपंत यांनी हरउपाये करून थोरल्या महाराजांची – शिवछत्रपतींची आण- शपथ देऊन शाहू महाराजांकडे वळविले. शिमगी पौर्णिमेस (होळी) दर्यासारंग कान्होजीराजे आंग्रे यांनी बाळाजीपंतांच्या, खंडोबल्लाळ यांच्या मध्यस्तीवरून जेजुरीगडावर स्वामीनिष्ठेच्या आण-शपथा घेऊन छत्रपतींस उत्तमोत्तम जिन्नस, पदार्थ, खजिना नजर केला. मनमोकळेपणेसमवेत रंगोत्सव साजरा केला. दिवस होता 25 मार्च 1715. अशाप्रकारे बाळाजीपंतांनी एकएक लोक स्वामीकार्यात जोडत आणले. बाळाजीपंतांची ही चौफेर कामगिरी, स्वामीनिष्ठा, कर्तृत्व पाहून व शिवछत्रपतींचे निकटवर्तीय पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांचे उत्तराधिकारी बहिरोपंत पेशवे यांचा तोळामासा कर्तेपणा जोखून शाहू महाराजांनी पुण्याच्या दक्षिणेस असलेल्या मांजरी या स्थानी बाळाजीपंत भट यांस सुमुहूर्त पाहून भरजरी वस्त्रे, जवाहीर, शिरपेच, तुरा, कंठी, चौकडा, ढाल-तलवार, शिक्केकट्यार तसेच चौघड्याचा मान, साहेबनौबत, हत्ती-घोडे, जरीपटका देऊन इतमामाने 17 नोव्हेंबर 1713 रोजी मुख्य प्रधान (पंतप्रधान पेशवे) म्हणून नेमणूक केली. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी छत्रपतींसाठी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहून सेवा केली. ते सदैव स्वराज्यरक्षण व राज्यहितार्थ दक्ष राहिले. दिल्लीपतीशी करारमदार करून राजधानी रायगडाच्या पाडावापासून मुघलांच्या कैदेत असलेल्या शंभुपत्नी आणि शाहू छत्रपतींच्या मातोश्री वज्रचुडेमंडित महाराणी येसूबाईसाहेब तसेच शिवछत्रपतींचा अन्य कुटुंबकबिला यांस सन्मानाने मुक्त करवून स्वराज्यात आणणे हे अतिशय जोखमीचे, महत्त्वाचे अन् नाजूक काम बाळाजीपंतांनी मोठ्याच जबाबदारीने पार पाडले. पुढे बाळाजीपंत पेशवे मातोश्री येसूबाईसाहेबांसमवेत दिल्लीहून कूच करून काशीयात्रा करून दिनांक 4 जुलै 1719 रोजी राजधानी सातारा येथे आले. सोबत स्वराज्यासाठी चौथाईच्या सनदा, खजिना/रोख रक्कम तसेच जयपूर, जोधपूर, उदयपूर यांच्याशी समझोते करून छत्रपतींसाठी भेटी, नजराने, बहुमानाची वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे व उत्तम पदार्थ आणवले. मातोश्रींच्या भेटीसाठी आतुरलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी सामोरे जाऊन, आदरपूर्वक भेट घेऊन बाळाजीपंत पेशव्यांचा बहुत सन्मान, सरफराजी केली. मातोश्रींच्या भेटीमुळे व दिगंत राजनैतिक पराक्रमामुळे छत्रपती संतोष पावून त्यांनी करंडे, रांजणगाव आदी पाच गावांचे वतन पंतप्रधान पेशवे यांसी दिले.
मात्र अनपेक्षितपणे येथपावेतो सासवड येथील दुर्ग पुरंदर तसेच प्रसंगी राजधानी सातारा येथे राहणारे बाळाजीपंत पेशवे यांस व्यथा निर्माण होऊन ते 2 एप्रिल 1720 रोजी सासवडास मृत्यू पावले. शाहू महाराजांनी लगोलग त्यांचे ज्येष्ठ पुत्र (थोरले) बाजीराव बल्लाळ यांस 17 एप्रिल 1720 रोजी कराडजवळील मसूर मुक्कामी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी पंतप्रधान पेशवे म्हणून नेमले. आधी बाळाजीपंतांनी तसेच समस्त पेशवे कुलोत्पन्न पराक्रमी पुरुषांनी बहुतांशी सर्वाधिकार हाती असताना कधीही स्वतःच्या नावे नाणी पाडली नाहीत, तर सदैव एकनिष्ठ राहून छत्रपतींसाठीच नाणी पाडली. त्यांनी पाडलेल्या या तांब्याच्या नाण्यांना दुदांडी नाणी/शिवरायी असे संबोधले जाते. हे द्विज कुलोत्पन्न (ब्राम्हण) असल्याकारणाने भाळी रेखल्या जाणार्‍या दुबोटी गंधाप्रमाणे या नाण्यांवर श्री आणि राजा या शब्दांच्या मध्ये दोन आडव्या रेषा बघावयास मिळतात, असा एक विचारप्रवाह नाणकशास्त्र अभ्यासक तसेच तज्ञांमध्ये प्रचलित आहे.


ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – भाग 8

 

ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – भाग 8

 रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठी नानी संग्राहक,लेखक, व्याख्याते | ‘नाणे’ घाट

इंग्रज राज्यकर्त्यांचे म्हणजेच व्हिक्टोरिया सम्राज्ञी आणि हिंदुस्थानातील त्यांच्या फौजांचे सामर्थ्य आणि ब्रिटिशांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढतच होते. बलशाली आणि प्रदीर्घ काळ सत्ताधीश म्हणून राहिलेले मुघल साम्राज्य आता तर त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. मात्र मराठेशाहीची ज्योत अजूनही ग्वाल्हेर संस्थानात तेवत राहिली होती.

महाराजा जनकोजीरावांचे वारस आणि आधुनिक ग्वाल्हेरचा पाया रचणारे महाराजा जयाजीराव शिंदे यांचे इसवी सन 1886 मध्ये निधन झाले. यासमयी त्यांचे शिंदे घराण्यात तीन पिढ्यांनंतर झालेले औरसपुत्र माधवराव तथा माधोराव महाराज हे अवघे 10 वर्षांचे होते. माधवरावांच्या आईचे नाव गजराराणीसाहेब असे होते. राजकुमार माधवराव यांचे राजशिक्षण ब्रिटिश अधिकार्‍यांच्या कडक आणि सुनियंत्रित मार्गदर्शनाखाली झाले होते. याच कारणामुळे कदाचित माधवराव आधुनिक ग्वाल्हेर संस्थानचे सर्वोत्तम शासक गणले जातात आणि त्यांची राजवट ही ग्वाल्हेरचा सुवर्णकाळ मानला जातो. माधवरावांना मोडी लिपी, संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच इत्यादी भाषा उत्तमरीत्या अवगत होत्या. मात्र ब्रिटिश रेसिडेंटद्वारे त्या वेळी माधवराव अल्पवयीन असल्यामुळे राज्यकारभार हाकण्यासाठी कौन्सिल ऑफ रिजन्सीची स्थापना करण्यात आली. याच काळात 1887 मध्ये पहिल्यांदा ग्वाल्हेर नगरपालिका स्थापण्यात आली तसेच 1912 या वर्षी प्रथमच पंचायत स्थापन करण्यात आली. माधवराव महाराजांकडे इसवी सन 1894 मध्ये संपूर्णपणे सत्ता देण्यात आली होती. माधवराव शिंदेंच्या कारकीर्दीत विविध उद्योग, व्यापार-उदिमांची स्थापना झाली. अतिशय दूरदृष्टीने माधवरावांनी ग्वाल्हेर राज्याला उपयुक्त ठरणार्‍या, लागणार्‍या वस्तू, सामग्री हे राज्यातच निर्माण होईल याकडे लक्ष दिले. याच महत्त्वाच्या कारणामुळे राज्याची आयात करण्याची गरज कमीत कमी होऊन निर्यात मात्र वाढली आणि ग्वाल्हेर संस्थान येणार्‍या प्रत्येक वर्षी समृद्धीकडे वाटचाल करू लागले.
असे म्हणतात की महाराजसाहेब माधवराव हे दिवसातील 18 – 18 तास राज्यकारभार व्यवस्थितरीत्या चालावा म्हणून काम करीत असत. वर उल्लेखल्यानुसार त्यांच्या काळात ग्वाल्हेरची खूपच भरभराट झाली. त्यांनी ग्वाल्हेरात शाळा, महाविद्यालये, रेल्वे, व्यापार केंद्रे, भाजी मार्केट, रस्तेनिर्मिती, दवाखाने, इस्पितळ (हॉस्पिटल), शेतीच्या समृद्धीसाठी कालवे, वाहतुकीच्या साधनांचे निर्माण व्यवस्थेकरिता लक्ष घालून, निर्मिती करून ग्वाल्हेर संस्थान अतिशय समृद्ध बनवले.

माधवराव महाराजांनी टांकसाळींचे यांत्रिकीकरण करून त्या अत्याधुनिक बनवल्या. आवश्यकता नसलेल्या टांकसाळी त्यांनी जवळपास बंद केल्या. त्यांनी विदिशा, जावद, लष्कर, उज्जैन इत्यादी टांकसाळींत आपली नाणी पाडलेली आढळून येतात. जयाजीरावांच्या कारकीर्दीत लष्कर मिंटमध्ये आयात केलेल्या आणि आणवलेल्या यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात नाणी पाडायला सुरुवात झालेली होतीच. पण ती पैसा या मूल्याची नाणी होती. मात्र माधवरावांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर येथून सोने, चांदी, तांबे या धातूंची नाणी पाडायचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिशांनी या बाबीस जोरदार हरकत घेऊन सोन्याची तसेच चांदीची नाणी पाडण्यास आडकाठी आणायचा प्रयत्न केला; जेणेकरून त्यांचा या व्यवहारातील फायदा अबाधित राहील. अशा नोंदी आहेत की, इसवी सन 1900 च्या आसपास ब्रिटिशांनी छापलेल्या चांदीच्या रुपयांतून त्यांना 6 हजार कोटींचा वार्षिक नफा मिळत होता. माधवराव महाराजांनी विक्रम संवत 1944 म्हणजे इसवी सन 1887 मध्ये एक वेगळ्याच ढंगाचे ‘श्रीमंत माधवराव शिंदे सरकार’ असे देवनागरीत लिहिलेले तसेच सूर्य आणि सर्प चिन्हांकित तांब्याचे पाव आणा हे नाणे चलनात आणले होते. याच धर्तीवर कालांतराने अर्धा आणा हे नाणेदेखील छापून चलनात आणले होते. या नाण्यांमध्ये डाय / साचा याची व्हरायटी बघायला मिळते. मात्र ही नाणी कमी छापली गेली होती का? त्यामुळे लोकमानसात रुजली नाहीत, हे सांगणे जरा अवघड आहे. काही कारणांमुळे ही नाणी छापण्याची प्रक्रिया मात्र थांबवण्यात आली, अशा नोंदी आहेत. पण काहीही असले तरी ही नाणी फारच अल्प प्रमाणात आता उपलब्ध आहेत.

यानंतरच्या नाण्यांमधील मोठा बदल बघावयास मिळतो तो म्हणजे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी – उदाहरणार्थ विल्यम चौथा, व्हिक्टोरिया तरुणपणातील चेहरा ( young bust), राणी असताना (Queen), आणि सम्राज्ञी (Empress) असतानाची छबी / प्रतिमा / फोटो जसा छापला होता तसाच स्वतःचा फोटो/चेहरा माधवराव महाराजांनी प्रथमतःच नाण्यांवर छापला होता. यावर मराठेशाहीची निशाणी असलेली शिंदेशाही पगडी घातलेला चेहरा तसेच आलिजाबहाद्दर हा किताबदेखील छापलेला बघावयास मिळतो. याचेच अनुकरण करीत पुढे त्यांचे वारस सुपुत्र जिवाजीराव शिंदे महाराजांनी पण छापलेले आढळते. ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये ही व्हिक्टोरियानंतर किंग एडवर्ड सातवा (केईएम हॉस्पिटलचे नाव – किंग एडवर्ड मेमोरियल), जॉर्ज पाचवा आणि जॉर्ज सहावा यांनी आपापल्या प्रतिमाही अंकित केल्या होत्या. माधवराव महाराजांनी स्वतःची प्रतिमा असलेल्या सोन्याच्या मोहरादेखील पाडल्या होत्या. तसेच चांदीचा रिीींंशीप रुपयादेखील छापला होता. माधवरावांच्या चांदीच्या रुपयांवर तसेच तांब्याच्या नाण्यांवर धनुष्यबाण, तलवार, त्रिशूळ, नाग / सर्प, भाला, ग्वाल्हेर संस्थानचा मोनोग्राम किंवा रॉयल एम्ब्लेम तसेच मा हे आद्याक्षरदेखील छापलेले आढळते. ग्वाल्हेरच्या या सर्वोत्तम शासकाचे निधन मात्र ते विदेश दौर्‍यावर असताना इसवी सन 1925 मध्ये फ्रान्स ची राजधानी परिस या शहरात झाले.

– प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
(मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते )


“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...