विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

दीडवानाचा रणसंग्राम आणि जणकोजी शिंदेंचा गनिमी कावा..!!


 दीडवानाचा रणसंग्राम आणि जणकोजी शिंदेंचा गनिमी कावा..!!

मारवाड मोहिमेत मराठ्यांनी तलवारीसोबतच गनिमी काव्याचा अत्यंत अचूक वापर केला. जयपूरचा सेनापती अनिरुद्धसिंग मोठी फौज घेऊन मराठ्यांवर चालून आला. पण जनकोजी शिंदे आणि मराठा फौजेने त्यांचा धुव्वा उडवला आणि राजपुतांची दाणादाण उडाली.
​मराठ्यांच्या हल्ल्यात शेकडो राजपूत मारले गेले. त्यांच्या तोफा, घोडे आणि उंट मराठ्यांनी लुटले. जीव वाचवण्यासाठी राजपुतांची फौज दीडवानाच्या दिशेने पळू लागली. इथेच जनकोजी शिंद्यांनी शत्रूची कोंडी केली. शत्रू पळत असलेल्या वाटेवरच्या सगळ्या विहिरी मराठ्यांनी माती टाकून बुजवून टाकल्या आणि पाण्याचे साठे अडवून धरले.
​पाण्याविना शत्रूची कशी अवस्था झाली, हे खुद्द जनकोजींनी पेशव्यांना पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे
​पेशवे दप्तरातील नोंद-
"आम्हाकडील लोकांनी मार्गातील विहिरी बुजवून जागोजागची तली रोखून उभे राहिले. लोकांनी बहुतच निकड करून कछव्याचे राजपूत तीनसे चारशे मारले... प्रातकालपासून दोन प्रहर रात्रपर्यंत तीन कोस चालला. मार्गामध्ये पाण्यावाचून त्याचे लष्करचे राजपूत व माणसे व घोडी उंटे बैले वगैरे बहुत मृत्यू पावले. तेणेकरून बहुतच सिकिंदा जाला. कछव्याच्या लोकांची दीडवाण्याहून पुढें यावयाची हिंमत न जाली."
​पाण्याविना शत्रूचे सैन्य आणि जनावरे तडफडून मेली. मोठ्या फौजेचा गर्व असलेल्या राजपुतांना पुढे एक पाऊलही टाकता आले नाही. शत्रूची रसद आणि पाणी तोडून त्याला संपवण्याची जनकोजींची ही युद्धनीती राजपुतांना नामोहरम करणारी ठरली.
​संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ७७, पृष्ठ क्रमांक ८४-८५.

महादजी शिंदे यांचे विविध पैलू..

 


महादजी शिंदे यांचे विविध पैलू..

​१) स्वभाव: महादजी हे मोकळ्या स्वभावाचे होते, त्यामुळे ते सर्वांना आवडत. त्यांच्याकडे अमाप संपत्ती असूनही त्यांची राहणी साधी होती.
​२) धार्मिक सहिष्णुता: महादजी हे धार्मिक सहिष्णू वृत्तीचे असून ते परम कृष्णभक्त होते. ते ईश्वर भक्तीत बराच वेळ घालवत. कपाळावर मुद्रा लावत आणि हातात जपमाळ धरत. मथुरा, गोकुळ, वृंदावन, पुष्कर इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी मोठा खर्च केला. महादजींचे गुरू केवळ हिंदूच नव्हते, तर मुस्लीम पीर आणि साधू-संतही होते. वारकरी संप्रदायातील संत मल्लाप्पा वास्कर हे त्यांचे मुख्य गुरू होते. वास्कर महाराजांनीच महादजींना दीक्षा देऊन त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली होती. तीच माळ हातात घेऊन फावल्या वेळी 'पाटीलबाबा' भगवंताच्या नामाचा जप करत.
​३) शिक्षण: महादजी सुशिक्षित होते. त्यांनी मराठीसोबतच फारशी आणि उर्दू या भाषांवरही प्रभुत्व मिळवले होते.
​४) लेखन: महादजी शिंदे हे उत्तम कवी होते. जेव्हा जेव्हा त्यांना सवड मिळे, तेव्हा ते पदांची रचना करत. त्यांनी 'माधव' या टोपणनावाने अनेक अभंग रचले आहेत. त्यांनी 'माधवविलास' नावाचा ग्रंथही लिहिल्याचे आढळते.
​५) प्रशासन: महादजी एखादे राज्य जिंकल्यानंतर तिथे तत्काळ चोख व्यवस्था लावत. राज्यात शांतता राखण्यासाठी योग्य उपाययोजना करून प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष देत. राज्याच्या हिशोबाबाबत ते अत्यंत दक्ष असत.
​६) युद्धनीती: पानिपतच्या युद्धात महादजींना अपंगत्व आले होते, तरीही त्यांचा उत्साह कमी झाला नाही. ते पूर्ण तयारीनेच शत्रूवर आक्रमण करत. युद्धनीतीमध्ये ते नेहमी नवनवीन प्रयोग करत. सर्वांशी एकाच वेळी शत्रुत्व न घेता, 'एकाशी मैत्री आणि दुसऱ्याशी विरोध' यानुसार आपले डावपेच आखत.
​७) सैन्यव्यवस्था: महादजींनी डी-बॉय (De Boigne) या फ्रेंच अधिकाऱ्याच्या साहाय्याने कवायती लष्करी फलटणी तयार केल्या. डी-बॉय, राणेखान, आंबुजी इंगळे, खंडेराव रायाजी पाटील यांसारख्या विश्वासू सरदारांच्या नियंत्रणाखाली त्यांनी फौज तैनात ठेवली. लष्कराचा मुख्य तळ उज्जैन आणि आग्रा येथे असे. महादजींनी आग्रा येथे दारुगोळा आणि तोफा तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता, ज्यावर संगस्टर (Sangster) नावाचा परदेशी तज्ज्ञ अधिकारी नेमला होता.
​८) परकीय धोरण: वॉरन हेस्टिंग्स असेपर्यंत महादजींनी इंग्रजांना मर्यादित ठेवले होते. नंतर मात्र त्यांनी इंग्रजांना भारतातून घालवून देण्यासाठी प्रयत्न केले. टिपू सुलतानसारख्या इंग्रजांच्या प्रबळ शत्रूचा नाश होऊ नये, असे त्यांना वाटत असे.
​९)गुणग्राहकता: महादजी हे गुणांचे चाहते होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक कर्तबगार अधिकाऱ्यांचा उदय झाला. डी-बॉय, लखबा दादा, राणेखान, जगूबापू, आप्पा खंडेराव, जिवबा दादा आणि अंबुजी इंगळे यांच्यातील कतृत्व ओळखून महादजींनी त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या.
​१०) संगीताची आवड: महादजींना संगीताची विशेष आवड होती. त्यांच्या दरबारी बीनकार मोहम्मद जमान यांच्यासारखे निष्णात संगीतकार होते.
#तलवार बहाद्दर, मुत्सद्दी राजकारणी आणि संवेदनशील कवी अशा बहुआयामी गुणांचा संगम म्हणजे महादजी शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व होय.

दिल्लीची पातशाही पालथी घालणारे मराठे

 





दिल्लीची पातशाही पालथी घालणारे मराठे

​एक काळ असा होता की दिल्ली मराठ्यांचे राज्य संपवण्याचे स्वप्न पाहत होती, पण आता त्याच दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार, हे मराठे ठरवत होते..
​१७५४ मध्ये मुघल बादशहाने मराठ्यांशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी मुघलांचा हा डाव उधळून लावला. मराठ्यांच्या भीतीने बादशहा आणि वजीर आपली संपत्ती आणि बेगमांना सोडून पळून गेले.
​मराठ्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला आणि बादशहा अहमदशहा याला कैद केले. त्याच्या जागी त्यांनी आजुजिदीन नावाच्या शाहजाद्याला गादीवर बसवले. विशेष म्हणजे, मराठ्यांनीच त्याचे #आलमगीर असे नामकरण करून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवले. दिल्लीचा बादशहा कोण असावा आणि त्याचे नाव काय असावे, हे ठरवण्याइतकी मोठी ताकद मराठ्यांनी निर्माण केली होती.
​पेशवे दप्तरातील नोंद-
"अहमदशाह कैंद करून आजुजिदीन नामे शाहजादा होता त्यास तख्तावर बसविले. आलमगीर नाव ठेविले... साडेब्यायंशी लक्ष रुपये वजिरानी यांसी करार केले आहेत."
​दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांनी बसवलेला आणि स्वतः नाव दिलेला बादशहा ही मराठा राज्याच्या वाढत्या वचकाची सर्वात मोठी साक्ष आहे.
​संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ६०, पृष्ठ क्रमांक ६९ (१७ जुलै १७५४).

मुघलांच्या २२ सुभ्यांचा अधिकार मराठ्यांकडे..

 


मुघलांच्या २२ सुभ्यांचा अधिकार मराठ्यांकडे..

​१७५३ मध्ये अहमदशहा अब्दाली फौज घेऊन चालून आला. त्याने आपला वकील दिल्लीला पाठवला आणि मुघल बादशहाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली.
​त्यावर दिल्लीच्या दरबाराने अब्दालीच्या वकिलाला स्पष्ट उत्तर दिले. बादशहा आणि वजीराने त्याला सांगितले की, "आता दिल्लीचे रक्षण मराठे करणार आहेत. बादशहाने मराठ्यांना आग्रा आणि अजमेर हे सुभे दिले आहेत. तसेच, मुघलांच्या पूर्ण २२ सुभ्यांची चौथाई वसूल करायचा अधिकार फक्त मराठ्यांना दिला आहे. त्यामुळे आता सर्व अधिकार मराठ्यांकडे आहेत!"
​अब्दालीला रोखण्यासाठी दिल्लीचा बादशहा पूर्णपणे मराठ्यांवर अवलंबून होता. याची नोंद अंताजी माणकेश्वरांच्या पत्रात मिळते
"हजरत आबदालीची मोहीम महाठियानी कबूल केली. हजरतनी त्यास आजमेर आकबराबाद दोंन सुमें नामांकित दिल्हे व दरोबस्त बाविसा सुभियांची चौथ दिल्ही व पैका देऊन सर्व येख्तार मराठियांचा ठेविला."
​संपूर्ण २२ सुभ्यांचा अधिकार मराठ्यांच्या हातात होता, हे या पत्रावरून स्पष्ट होते.
​संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ५३, पृष्ठ क्रमांक ६६
(८ फेब्रुवारी १७५३).

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१


 संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दाखवून शत्रूच्या रुधीराचा अभिषेक आपल्या मातृभूमीला केला, त्या संताजींना आज भूमिगत होऊन वावरावे लागत आहे. तरी आपल्या ब्रिदाला कलंक लागू दिला नाही. आज त्यांच्या मागावर परकीय व स्वकीयही होते.

नागोजी माने जळभावी घाट ओलांडून पूर्वेला उतरला आणि कारखेल गावातून संताजींबद्दल विचारपूस करू लागला. पण गावकऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. मग पर्यंती गावाजवळील डोंगरावर चढला. त्याच्याबरोबर सात-आठ माणसे होती. संपूर्ण डोंगर चिक्कार वृक्षांनी व्यापला होता. मोक्याची जागा पाहून प्राण डोळ्यात आणून सावज टिपण्यासाठी बसला.

कारखेलच्या परिसरात पर्यंती गावाजवळ एक जलौघ खळखळ वाहत होता. नागोजीने विचार केला, संताजी जंगलात कुठेही असला तरी, पाण्यासाठी ओढ्यावर त्याला यावंच लागेल. नागोजीने पूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन काढली. दुसरा दिवस उजाडला. बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली, तसा नागोजी माने सावध होऊन कान टवकारले. एक मानवाकृती दबकत दबकत कानोसा घेत पुढे पुढे जात होती. तसा नागोजीही आकृतीच्या मागे अंतर ठेवून सावधतेने जाऊ लागला.

ती मानवाकृती ओढ्याच्या काठावर आली. इकडे तिकडे पाहत कपडे काढले. नागोजीने ओळखले, ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपली शिकार संताजी घोरपडेच आहे.

संताजींनी मेरु स्वामींचा अनुग्रह घेतल्यापासून सूर्योदयाची अंघोळ कधी चुकवली नव्हती. एवढे संकटे, एवढा वनवास पदरी आलात तरी मेरु स्वामींच्या महामंत्रानेच आपल्याला आधार दिला ही त्यांची पक्की धारणा होती. संताजी पाण्यात उतरले. त्याचवेळी नागोजी माने ओढ्या काठी येऊन लपून बसला. आंघोळ झाल्यावर संताजी नेहमीप्रमाणे ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पूर्वाभिमुख उभे राहिले. ओठातून आपोआप मंत्राचे शब्द उमटले.... ॐ नमो... संताजी देहभान विसरले. मंत्राचे शब्द आपोआप ओठातून बाहेर पडत होते. संताजी बाह्य जगाचे भान विसरले. आणि हीच संधी साधून नागोजी माने पुढे झाला आणि संताजीच्या मानेवर तलवारीचा प्रहार केला. पाण्यात उष्ण रक्ताची धार मिसळली. आत्मा परमात्मात विलिन झाला.

लाख वेळा तलवारीच्या वारांना सामोरी गेलेली पहाडी छाती शेवटपर्यंत अभंगच राहिली. "लढून मरावं, मरून जगावं" ही वडिल म्हाळोजींची शिकवण! संताजी आयुष्यभर लढले आणि परमेश्वराची आराधना करत या शूरवीराचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला... कायमचा...

संताजीच्या हत्येचा वृत्तांत जिंजी दरबारात कळला मात्र! महाराणी ताराबाईंचा कंठ्ठ दाटून आला. महाराजांनी संताजींना एकाकी पाडले नसते तर हा मराठ्यांचा मोहरा असा स्वकीयांनीच लयाला धाडला नसता.

सदरेवर छत्रपती महाराज सुन्न मनाने एकटक महाद्वाराकडे पाहत होते. महाराजांचं मन व्याकूळ झाले. त्यांना खरं काय ते कळून चुकलं. संताजी मोगलांना फितूर झाला नव्हता. तसे असते तर बादशहाने नागोजीला हाताशी धरून खुन करायला लावलेच नसते. बादशहाला नागोजी सारख्यांची गरज नव्हती. त्याला शूर सरदार हवे होते. संताजी त्याला मिळाले असते तर, औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी नक्की बहाल केली असती आणि त्याने तसे प्रयत्नही केले होते. पण संताजी लोभाला बळी पडले नव्हते.

संताजींनी एवढी लूट केली की ते आपली कोठारे भरू शकला असते. पण जे काही मिळाले ते त्यांनी रायगड, पन्हाळा, जिंजीच्या सरकारी खजिन्यात जमा करून, स्वराज्य उभारणीस हातभार लावला. संताजीने तन मन धन खर्च करुन अपूर्व मराठेशाही रुजवली, जगवली. एवढेच नाही तर, आणीबाणीच्या वेळेस छत्रपतींना परांगदा होण्याची वेळ आली तेव्हा, त्यांनी आपली समशेर पाजळून स्वराज्याचे रक्षण केले. राजाराम महाराजांचा कंठ दाटून आला. डोळे अश्रूंनी भरले. त्यांना आपली चूक उमगली.. पण वेळ निघून गेली होती.

कारखेलच्या घाटात संताजीचा वध केल्यावर काही अंतरापर्यंत नागोजीने त्यांच धड आणून तेथेच टाकले आणि त्या शूरवीराचे शिर बादशहाला नजर करण्यासाठी मोठ्या दिमाखात मिरवत घेऊन गेला.

देशाभिमानी मराठ मावळ्यांना संताजींच्या हत्येची खबर मिळताच त्यांनी कारखेलचे जंगल धुंडाळून संताजी घोरपडेंचं धड शोधून कुरुंदवाडला आणले आणि कृष्णा-पंचगंगेच्या पवित्र संगमावर संताजींच्या पार्थिवावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले.

तिकडे बादशहाच्या छावणीत भाल्याच्या टोकावर संताजीचे शिर घेऊन धिंड निघत होती.

ज्यांच्या हयातीत नुसत्या धसक्याने त्यांच्या आजूबाजूलाही फिकायला कोणी धजावत नव्हते, तेच त्यांचे निस्तेज शिराची टिंगल टवाळी करू लागले. मानोजी माने, गाजीउद्दीन फिरोजजंग संताजीच्या हत्येचे श्रेय आपल्या पदरात घ्यायला बादशहाच्या दरबारात धडपडत होते. पण नियतीने ते कोणालाही लाभू दिले नव्हते.....

खरं म्हणजे नागोजीच्या तलवारीचा घाव पडायच्या आधीच मेरु स्वामींनी दिलेला महामंत्र आळवीत परमात्म्याशी एकरूप झाले होते.

अशा या महान कर्तुत्वान पराक्रमी व शेवटी एकाकी पडल्यालेल्या वीराला कोटी कोटी प्रणाम!!

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग- ४०


 संताजी घोरपडे : भाग- ४०

धनाजी जाधव यांनी छत्रपती राजाराम महाराजांना बरोबर पटवून दिले. एखाद्या बंडखोर सेनानीकडे एवढे मोठे सैन्य ठेवणे छत्रपतीच्या गादीला धोकादायक आहे, असे भासवून त्यांनी संताजीच्या फौजेतील बहुसंख्य सरदार, सैन्य आपल्याकडे घेतले.

संताजीच्या सैन्याला गळती लागली आणि दिवसेंदिवस सैन्य कमी होऊ लागले. तरी या ही परिस्थितीत त्यांनी स्वराज्याचा शत्रू झुल्फिकारखानला कर्नाटकात अप्रतिम झुंज दिली. त्यामुळेच झुल्फिकार खान जिंजीचा वेढा उठवून मद्रासकडील सागर पट्टीवरील वेल्लोर, बंदीवश, अर्काट इथे मोठ्या बंदोबस्ताने राहू लागला. तो अर्काटला असताना संताजी त्याच्यावर चालून गेले. खानला खबर मिळताच अर्काट मधून हळूच बाहेर पडला. पण वाटेत त्याला संताजींनी अडवून त्याची कोंडी केली. खानाच्या सैन्याची उपासमार होऊ लागली शेवटी त्यांनी आपल्याला अर्काटकडे जाऊ देण्याची दिनवाणी विनंती केली. संताजीला आपले पाठबळ कमी झाल्यामुळे जास्त ताणून धरले नाही. त्यांनी खानाला जाऊ दिले.

संताजींच्या सैन्याला लागलेली गळती थांबलेली नव्हती. इतक्या कमी सेनेनिशी कर्नाटकात राहणे धोक्याचे म्हणून, ते महाराष्ट्राकडे वळले. बरेच सहकारी सोडून गेले तरी अजून उमेद कमी झाली नव्हती. उमेद बाळगूनच त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. पण धनाजी त्यांचे मागावरच होते. त्यांनी हिंमतराव निंबाळकराला पुढे करून दहिगावजवळ संताजीवर हल्ला चढविला. सैन्याचे पाठबळ नसतानाही संताजींनी माळशीच्या परिसरात दहिगाव जवळ हनुमंतरावास रोखून धरले. तोच धनाजीने निंबाळकरांच्या मदतीला फौज धाडली. लढाईच्या धुमचक्रीत संताजीचे कैक सैन्य त्यांना सोडून पसार झाले. काही हनुमंतास जाऊन मिळाले. आणि वीस हजार फौजेचा मराठ्याचा सरसेनापती संताजी घोरपडे एकाकी... अगदी निवळ एकाकी राहिले.

ज्याने औरंगजेबाच्या बलाढ्य सत्तेला शह देऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आणलेल्या मराठेशाहीला वाचवले, त्याच मराठेशाहीच्या म्होरक्यांनी संताजीला एकाकी पाडले. शिखर शिंगणापूरच्या डोंगराळ भागात हा मराठ्यांचा अंजिक्य वीर शत्रूपासून, स्वकीयांपासून स्वतःचे रक्षण करत रानोमाळ भटकू लागला. फक्त आत्मबळ आणि मेरू स्वामींनी दिलेला अमोल मंत्राच्या जोरावर....

धनाजी-संताजीच्या शिगेला पोहोचलेल्या वैमनस्याची खबर बादशहाला कळल्यावर, या आयत्याच चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले. संताजी दुर्दैवाच्या फेर्‍यात पुरते अडकले होते. त्यातून बाहेर पडण्याऐवजी अधिकाधिक गुरफटत गेले. त्याला कारण धनाजीचे पूर्वग्रह दूषित असलेले डावपेच कारणीभूत ठरले. मराठ्यांच्या महाराष्ट्रात एकेकाळचा सरसेनापती मोगल शत्रू आणि स्वकीयांच्या कात्रीत भरडला गेला.

बादशाहच्या छावणीत घोरपडेचा निःपात कसा करावा यावर मसलती होऊ लागल्या. संताजीला नेस्तनाबूत करण्यासाठी बादशहाने गाझीउद्दीन फिरोजगांची नेमणूक केली. इकडे धनाजीने संताजीचा पाठलाग सोडला नव्हताच. दोघांनी संतांजीची कोंडी केली. हनुमंत निंबाळकरने महादेवाचा डोंगर पिंजून काढला. सर्वांचं एकच लक्ष होते.. संताजी घोरपडे! संताजींनी प्रत्येकाला आपल्या तलवारीची चुणूक दाखवली होती. ते सर्वजण एकवटून ह्या एकाकी पडलेल्या अजिंक्य वीराच्या परिपत्यासाठी रात्रंदिवस भटकत होते.

वैरद्वेष माणसाला कोणत्या थराला नेऊन पोहोचवतो याचा अनुभव महादेवाच्या डोंगरावर दिसू लागला. शंभू महादेवाच्या डोंगरावर संताजी विपन्नावस्थेत भूमिगत वावरत होते. ते अजून तरी कोणाच्या दृष्टीस पडले नव्हते.

संताजी कारखेडच्या परिसरात वावरत असल्याची पक्की बातमी मसवडच्या नागोजी मानेच्या वाड्यावर पोहोचली. नागोजी मानेच्या पत्नीने नवऱ्याच्या मागे संताजीचा वध करण्याचा तगादा लावला. नागोजी म्हणाले, मी बादशहाच्या दरबारात विडा उचलून आलोय....

ते काही मला ठाऊक नाही. वैरी उंबऱ्यावर येऊन ठेपलाय. संताजी कारखेडच्या डोंगरात हमखास आहे. चारही दिशांनी त्याला मराठे व मोगलांनी घेरले आहे. अन्न मिळेना तरी, झाडाचा पाला खाऊन गुजरान करत आहे. आता तरी तुमची तलवार बाहेर काढा.

माझ्या भावाचा त्याने मुडदा पडल्यापासून माझ्या अंगाची नुसती लाहीलाही होतेय. कधी एकदा त्याचा नरडीचा घोट घेईन असं झालंय. नागोजी म्हणाला, मलाही अपमानाचा बदला घ्यायचा आहे. त्याने त्याच्या वाड्यातून मला घालवले ते विसरलो नाही. आता बघच, मी संताजीचा वध करूनच परत येईल. असे म्हणून नागोजी माने दख्खनचा वाघ कारखेलच्या जंगलात असण्याची पक्की खात्री घेऊन संताजींच्या मागावर राहिला.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

संताजी घोरपडे : भाग - ३९

 संताजी घोरपडे : भाग - ३९

संताजी पुढे म्हणाले, "आम्हाला दुःख, खंत एकच आहे की, महाराजांना कैद करावे लागले, हे आमचे दुर्भाग्य!"

ताराऊ म्हणाल्या, "महाराज, ऐकलंत?"

राजाराम महाराज म्हणाले, "राणी सरकार, राजकारण बायकांचा विषय नाही. प्रत्येक वेळी ओंजळीने पाणी पिण्यास अजून आमची बुद्धी भ्रष्ट झाली नाही. ठीक! ठीक! आम्ही सावध झालो. उठा संताजीराव...

आणि आम्हाला मिळालेल्या राजमंडळाच्या अध्यक्षपदाचा वापर करून बोलतोय, संताजी, तुम्ही तुमच्या मुलाखत जा. घरी दारी फार शत्रू निर्माण करून ठेवलेत. आम्ही वातावरण निवळल्यावर तुम्हाला बोलावून घेऊ."

"येतो मातोश्री!"

संताजी जायला निघाले तोच, ताराबाई म्हणाल्या, "संताजी एक शपथ घेऊन जायचंय!"

"कोणती शपथ मातोश्री?"

"आतापर्यंत या दरबारातील बेबनावाची खबर बादशहाला मिळाली असेल. तो या बिघाडाचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न करेल. तुम्हाला दख्खनची सुभेदारी देतो म्हणेल."

"मातोश्री, देतो म्हणेल नाही, देतोच म्हणाला. तुमच्या या लबाड झुल्फीकारखान बरोबर कित्येक वेळा निरोप पाठवले. पण हा संताजी विकाऊ नाही. त्याने मोठमोठ्या रकमा, सनदा, वतने देण्याचे अमिष दाखवले. पण मी बधलो नाही."

महाराणी म्हणाल्या, "संताजीराव तुम्ही आज जरी घोरपडे नाव लावत असलात तरी, तुमचे पूर्वज भोसलेच होते. आमच्याच घराण्यातले."

"मातोश्री! हे मी जाणतो. म्हणूनच माझा जीव तिळ तिळ तुटतो." गदगदल्या आवाजात संताजी म्हणाले.

"या सावध रहा. स्वतःला सांभाळा."

दोघांनाही मुजरा करून संताजी घोरपडे निघून गेले.

महाराज म्हणाले, "ताराऊ, तुम्ही त्याला शब्द देऊन चुकलात. पण मी संताजीची गय करणार नाही. त्याच्या उर्मट, बेशिस्त वर्तनाबद्दल आम्ही त्याला शिक्षा देणारच. त्याला दोन वेळा माफ केले. आता त्याला दरबारात जागा मिळणार नाही."

गंभीर स्वरात ताराबाई म्हणाल्या, "आपण छत्रपती आहात. काहीही ठरवायला आणि करायला मुख्त्यार आहात. पण एक इशारा देऊन ठेवते, औरंगजेबाला धडकी भरवणारा हा असा हा एकच मोहरा आपल्या दरबारात आहे. तो नुसता पराक्रमीच नाही तर आपल्या गादीबद्दल तितकीच कडवी निष्ठा बाळगणारा सुद्धा! म्हणून प्रसंगी त्याचे शंभर अपराध पोटात घालून सांभाळले पाहिजे."

कैवारकुटीच्या पराभवामुळे महाराज आणि धनाजी जाधव यांच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे संताजींचा समोरासमोर सरळ सरळ पराभव करणे सोपे नाही. म्हणूनच धनाजीने संताजीच्या सैन्यात फितुरी करण्याचे ठरवले. तसेही संताजींच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्या सैन्यात, सरदारात असंतोष होताच. धनाजीने आपले जाळे पद्धतशीर पसरवले. धनाजीने पूर्वीचे तंत्र अमलात आणून राजाराम महाराजांना भरीस घालणे सुरू केले.

महाराजांना मुजरा करीत धनाजी म्हणाले, "महाराज, संताजीचे बळ त्याच्या सैन्यात आहे. तीच काढून घ्यायची पक्की तजविज करून आलोय. २०००० फौजेचा टेंभा मिळवणाऱ्या संताजी जवळ ५०० देखील स्वार उरणार नाही. संताजी पुढे निघाला की, माझी फौज त्याच्या पाठीवर कोसळणार. पुढून मोगल सरदार गाझीउद्दीन फिरजजंग आणि लल्फुल्ला खान दहा-बारा हजार फौजेनिशी चाल करून येतील. आमच्या दोघांच्या फौजा मिळून संताजी व त्याच्या सैन्याच्या पार बिमोड करून त्याला रानावनात पळायला लावतो. मोगल आणि मराठे एकत्र येऊन त्याला बरबाद करायला टपले आहेत. शिवाय नागोजी माने त्याच्या पाळतीवर आहेतच. त्याची बायको राधा वहिनीने तर आपला भाऊ अमृतराव निंबाळकर याच्या बदल्यात संताजीला ठार करण्याची शपथ घेतली आहे."

राजाराम म्हणाले नाही, "धनाजीराव' संताजींना ठार करावे अशी आमची इच्छा नाही. फक्त त्यांची मग्रुरी उतरेपर्यंत कैदेत ठेवावे."

"महाराज, आता ते आपल्या हाती राहिले नाही. तो खतरनाक लढवय्या व भडक माथ्याचा आहे. लढाईत तो जिवंत गवसणे कठीण आहे. तो बेसावध असतानाच हल्ला केला तरच..."

"नाही धनाजीराव. असं घडतं कामा नये. संताजींबद्दल आमच्या मनात राग जरूर आहे. पण त्याचा अद्भुत पराक्रम आणि कडवी निष्ठेची यावेळी आम्हाला गरज आहे."

"महाराज, आता आपल्या हाती काहीच राहिले नाही. लल्फुल्लाला सांगू शकत नाही. शिवाय नागोजी माने कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. आपण चिंता करू नये. फक्त दुरुन पाहत रहा."

संताजी घोरपडे हे शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले महाराजांचे शिष्य होते. संभाजी राजेंच्या क्रूर हत्येनंतर संताजींनी औरंगजेबच्या छावणीचे कळस कापून त्याला दाखवून दिले की मराठ्यांचा राजा मारला तरी, तो मराठ्यांचा पराक्रम, शौर्य आणि धाडस मारू शकणार नाही. पण दुर्दैव की, या सेनापती संताजीना खुद्द स्वतः छत्रपती राजाराम महाराजांशी लढाई करावी लागली.

नमोस्तुते!

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...