विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 May 2021

संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न का झाले नाहीत भाग ४

 


संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न का झाले नाहीत

भाग ४
पोस्तसांभार : आदित्य गोखले
महाराज बहादूरगडला अटकेत
बहादूरगड हा महाराष्ट्रातल्या पेडगाव तालुक्यातला भीमा नदीच्या काठावर वसलेला एक भुईकोट किल्ला. किल्ला भुईकोट असल्याने आणि जवळपास कुठेच डोंगर-टेकड्या नसल्याने हेतुपुरस्सर संभाजी महाराजांना ह्या किल्ल्यात बंदी म्हणून ठेवण्यात आले. औरंगजेबाची संपूर्ण छावणी आणि मोगल सैन्यसमूद्र बहादूरगडचे संरक्षण करत होता. अशा वेळी महाराजांना इथून सोडवायचे प्रयत्न म्हणजे जाणूनबुजून अजून जीव धोक्यात घालणे असं झालं असतं. काही असे किस्से ऐकिवात आहेत कि खंडो बल्लाळ, रायप्पा ह्यांनी सुटकेचे प्रयत्न करून बघितले - पण ह्या गोष्टींना कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. मोगल सैन्याचे सोडून इतर लोकांचे जे काही घोडे होते त्यांना बहादूरगड पासून कित्येक मैल लांब रोखले जात होते - त्यांना छावणीत प्रवेश नव्हता. तसेच एकूणच पूर्ण भागात अहोरात्र अतिशय चोख गस्त होती. अशा प्रकारे संभाजी महाराजांना मोगली फौजेला अनुकूल आणि मराठा सैन्याला प्रतिकूल अशा खुल्या सपाट प्रदेशात अडकवून ठेवण्यात औरंजेबाला यश आलं
अशा रीतीने आपणास लक्षात येईल की बरीच कारणं होती जेणेकरून मराठा सैन्याला छत्रपतींची सुटका करायची संधीच मिळाली नाही. सैन्य अनेक आघाड्यांवर लढा देत होतं. सैन्याचे सरनोबत धारातीर्थी पडले आणि छत्रपतींना फितुरीने अटक झाली होती. ह्या अनपेक्षित घटनांमुळे आणि खंबीर नेता न राहिल्यामुळे फौजेत नक्कीच थोडा विस्कळीतपणा आला असणार. आधी म्हणल्याप्रमाणे बहादूरगड व तुळापूर भागातून सुटकेचे प्रयत्न करणे म्हणजे जाणूनबुजून अजून बर्याच जीवांना मृत्यूच्या दरीत ढकलणे ठरले असते. खुल्या प्रदेशातून कोणाचीही सुटका करणे हे फार अवघड कार्य होतं - जवळपास अशक्यच. अजून एक महत्वाची बाब म्हणजे रयतेचं मोगल आक्रमणापासून संरक्षण - ह्या घटनेनंतर मोगलांचे आक्रमण बळावणार होतं आणि त्याच्या विरुद्ध लढणे आणि त्याचा प्रतिकार करणे हे खूप महत्वाचं होतं. ह्या सर्व परिस्थितीच्या परिणामी मराठा सैन्य संभाजी महाराजांचा अत्यंत दुर्दैवी अंत टाळू शकले नाही. पण ह्या तेजस्वी बलिदानानी स्वराज्याला एवढी मोठी प्रेरणा दिली की परिणामी स्वराज्याने उठून पलटवार करत मोगल साम्राज्य थोडे वर्षांनी पार मोडकळीस आणले.

No comments:

Post a Comment

कोंडे देशमुख घराण्याचा खेड शिवापूर येथील एकमेव शिलालेख

  कोंडे देशमुख घराण्याचा खेड शिवापूर येथील एकमेव शिलालेख आणि कोंडे देशमुख यांचा साधनातून आलेल्या इतिहासातील नोंदी.!!!!! post :anil dudhane =...