विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label करविर गादी). Show all posts
Showing posts with label करविर गादी). Show all posts

Saturday, 1 January 2022

#छत्रपती_संभाजी_महाराज (व्दितीय, करविर गादी)

 #छत्रपती_संभाजी_महाराज (व्दितीय, करविर गादी)

postsaambhar :mahesh pawar


छत्रपती संभाजी महाराज करवीर भोसले घराण्यातील १७१४ ते १७६० या काळातील एक कर्तबगार छत्रपती. छत्रपती थोरले राजारामांचे राजसबाईपासून विशाळगड (कोल्हापूर) येथे जन्मलेले कनिष्ठ पुत्र. त्यांचे बहुतेक बालपण महाराणी ताराबाई यांच्या नजरकैदेत व्यतीत झाले. राजसबाई व संभाजींनी अवचित सत्तांतराव्दारे १७१४ मध्ये करवीरची गादी मिळवून महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र छ. शिवाजी यांना पन्हाळ्यात कैदेत टाकले.
अधिकारगहणसमयी त्यांचे वय सोळा होते. त्यांनी प्रदीर्घ काळ (सु. सेहेचाळीस वर्षे) राज्य केले. लहान असल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता पण रामचंद्रपंत अमात्य, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण अशा मातब्बरांच्या पाठिंब्याने व राजसबाईंच्या छत्राखाली त्यांनी राज्यकारभार केला. या सुमारास साताऱ्यात त्यांचे चुलत बंधू छ. शाहू हळूहळू सत्ता बळकट करण्यात व्यस्त होते.
संभाजींनी निजामाशी प्रथम मैत्री संपादिली, तसेच गोव्याचे पोर्तुगीज यांच्याबरोबर १७१६ साली दारूगोळा, तोफा, बंदुका वगैरे सामान विकत घेण्याचा करार केला. शाहू महाराजांनी संभाजींच्या सरदारांविरूद्ध जशी मोहीम आखली, तशीच संभाजींनी सातारापक्षीय सरदारांविरूद्ध आघाडी उघडली. त्यांपैकीच १७१८ मधील सावंतवाडीची मोहीम होती. यासंदर्भात दोघांमधील वडगावच्या लढाईत शाहूंची सरशी झाली तथापि मिरज, कराड इ. ठाणी घेण्यासाठी त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. २० मार्च १७२० च्या उरूणबहे लढाईत (इस्लामपूर जवळचे कृष्णेकाठचे गाव) बाळाजी विश्वनाथांनी त्यांचा पूर्ण पराभव केला, तेव्हा संभाजींना माघार घेऊन पन्हाळ्याला जावे लागले. छत्रपतींच्या दोन घराण्यांत राज्याची विभागणी व्हावी, अशी त्यांची सुरूवातीपासून इच्छा होती. त्यानुसार ३० डिसेंबर १७२५ मध्ये उभयतांत एक करार झाला. त्यानुसार दक्षिणेकडील सर्व ठाणी व किल्ले संभाजींकडे आणि मिरज व विजापूर प्रांत हे शाहूंकडे असे ठरले आणि एकविचारे राज्याभिवृद्धी करावी, असे ठरले परंतु यानंतरही दोन्ही बाजूंनी चढाईचे धोरण चालू होते. संभाजींनी निजामाबरोबर संबंध अधिक दृढतर केले. दरम्यान पहिल्या बाजीरावांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत (१७२८) पराभव केला. दरम्यान संभाजी १७२५ ते १७२८ कोल्हापूरबाहेर मोहिमांत गुंतले होते. ते पन्हाळ्याला परतले. यानंतर पुन्हा वारणाकाठची लढाई झाली. तीत (१७३०) श्रीनिवासराव प्रतिनिधी यांनी छ. संभाजींचा पूर्ण पाडाव करून त्यांचा सर्व सरंजाम लुटून नेला पण प्रतिनिधींनी राजसबाई व संभाजीराजे यांच्या इतर राण्या यांना सन्मानाने पन्हाळ्यावर पोहोचविले. महाराणी ताराबाई यांनी मात्र साताऱ्यात राहण्याची इच्छा व्यक्त केली. याच सुमारास छ. शाहूंच्या सैन्याने त्यांच्या राज्यातील अनेक स्थळांवर चढाई केली. अखेर वारणेचा इतिहासप्रसिद्ध तह होऊन (१७३१) करवीरच्या स्वतंत्र राज्यास शाहूंनी संमती दिली. दोघांनी राज्याच्या निश्चित सीमा ठरविल्या. या तहात त्यांच्या पत्नी जिजाबाई, बाबाजी पारसनीस तसेच चुलती महाराणी ताराबाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तहानंतर काही वर्षांनी छ. संभाजींनी डच व्यापारी कंपनीशी तह केला (१७३६). या करारामुळे डचांना मालवण बंदरानजीक वखार बांधण्याची परवानगी मिळाली. तत्कालीन पत्रव्यवहार पाहता छ. संभाजींनी हा तह घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता, हे स्पष्ट होते.
संभाजीराजे यांना आनंदीबाई, उमाबाई, सकवारबाई, जिजाबाई, सुंदराबाई, दुर्गाबाई व कुसाबाई अशा एकूण सात राण्या होत्या. त्यांपैकी जिजाबाईंशी त्यांचा १७२७ मध्ये विवाह झाला. त्या सुस्वरूप असून हुशार व चाणाक्ष होत्या. त्यामुळे त्या राज्यकारभारात जातीने लक्ष घालीत व त्यांचे राणीवसात वर्चस्व होते आणि संभाजीराजेही त्यांचे ऐकत असत मात्र संभाजींना कोणत्याच राणीपासून पुत्र-संतती झाली नाही. मरतेसमयी त्यांची राणी कुसाबाई गरोदर होती. तिला कन्या झाली. त्यामुळे जिजाबाईंनी दत्तक मुलगा घेतला. जिजाबाई व छ. संभाजींना पहिला बाजीराव आणि पुढे नानासाहेब पेशवा यांच्या मुत्सद्देगिरी व लष्करी सामर्थ्य यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, याची कल्पना होती म्हणून त्यांनी वारणेच्या तहानंतर सबुरीचे धोरण अवलंबिले. नानासाहेब पेशव्यांनी १७४० मध्ये संभाजीं- बरोबर दोन्ही गादया शाहूंच्या मृत्यूनंतर एकत्र करण्याचा गुप्त करार केला होता पण शाहूंच्या मृत्यूनंतर (१७४९) प्रत्यक्षात तो कार्यवाहीत आला नाही तेव्हा छ. संभाजीराजांनी सातारकडे फौजा वळविल्या होत्या, पण जिजाबाईंच्या सल्ल्यावरून त्यांनी माघार घेतली. कारण मरतेसमयी शाहू महाराजांनी नानासाहेबांना दिलेल्या दोन सनदांमुळे त्यांनी या कराराकडे दुर्लक्ष केले. शिवाय या सनदांत एक महत्त्वाची अट होती, दत्तकाच्या बाबतीत ‘ कोल्हापूरचे करू नये ’, त्यामुळे संभाजींनी १७५०-५१ दरम्यान राज्यकारभारातून लक्ष काढून घेतले असावे कारण त्यानंतरच्या पत्रव्यवहारांत जिजाबाईंना उद्देशून लिहिलेली पत्रे अधिक आहेत. सदाशिवरावभाऊस लिहिलेल्या एका पत्रात संभाजीराजे म्हणतात, ‘ विनंती पत्री सविस्तर अर्थ लिहीत जाणे. वरकड कित्येक राणीवास वाडा चौथा याजपाशी जे सांगणे ते सांगितले आहे. सविस्तर पत्रे त्या लिहीतील, त्यावरून कळेल ’. या सुमारास त्यांनी सदाशिवरावास पेशवेपद मिळावे, म्हणूनही खटपट करून नानासाहेबांना प्रतिस्पर्धी निर्माण केला पण नानासाहेबांनी ते प्रकरण मुत्सद्दीगिरीने हाताळले. अखेर छत्रपती संभाजींचा काहीशा निराश अवस्थेत अल्पशा आजाराने टोप संभापूर (हातकणंगले तालुका, कोल्हापूर जिल्हा) येथे मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राणी जिजाबाई यांनी दत्तकाच्या नावे इ. स. १७७३ पर्यंत अत्यंत कार्यक्षम रीत्या राज्यकारभार केला.
संभाजीराजे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी मंदिरांना व साधुसंतांना दिलेल्या सनदापत्रांवरून हे स्पष्ट होते. त्यांनी आंबेजोगाई येथील कवी दासोपंत यांच्या समाधीसाठी इनाम दिले, तसेच देवदत्त परमानंद कवींद्र या धर्मनिष्ठ विद्वानाला गाव इनाम दिला होता. हिंदू मंदिरांप्रमाणे मुसलमान मशिदींनाही त्यांनी इनाम दिल्याची नोंद आढळते. संभाजीराजांनी करवीरवासिनी महालक्ष्मीची पुनःस्थापना केल्याचा महत्त्वाचा उल्लेख मिळतो. औरंगजेबाच्या दक्षिणेकडील स्वारीच्या वेळी तेथील मूर्ती सुरक्षित स्थळी हलविली होती. त्यानंतर त्यांनी पूजेअर्चेसाठी व उत्सवासाठी सावगाव इनाम दिला होता (८ नोव्हेंबर १७२३). त्यांनी शंकराजी गोसावी तोरगलकर यांना तोरगल येथे मठ बांधण्यासाठी आणि राजश्री चतुर्थगिरी महंत यांना पाटगाव येथे मौनी महाराजांच्या मठासाठी इनामे दिली होती. तसेच संत तुकारामांच्या वंशजांनाही त्यांनी देहू व किन्ही गावच्या सनदा दिल्या होत्या. त्यांनी १७३१ मध्ये छ. राजारामांच्या सिंहगडावरील समाधीवर छत्री बांधली.
संदर्भ : १. गर्गे, स. मा. करवीर रियासत, पुणे, १९६८.
२. देशपांडे, सु. र. मराठेशाहीतील मनस्विनी, पुणे, २००६.
देशपांडे, सु. र.

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...