विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 27 April 2023

जुन्नर : सातवाहन काळातील बाधकामातील " विट" ...

 






जुन्नर : सातवाहन काळातील बाधकामातील " विट" ...
------------------------------------------------------------
जुन्नर मधील सातवाहन काळात बांधकामासाठी वापरत असलेल्या ' विटा' पक्क्या भाजलेल्या असून त्या बांधकामासाठी वापरत असताना .त्या बांधकामातील भीतींच्या 'विटा ' एका वर एक जोड येणार नाही अशा साधा - मोड पद्धतीने ठेवत असत या शिवाय खालच्या 'विटा ' आडव्या तर वरच्या 'विटा उभ्या या पद्धतीने उभारल्यामुळे बांधकामातील भिंत भक्कम तयार होत असायची.
जुन्नर येथील सातवाहन काळातील लोकवस्ती च्या स्थळातील उत्खननात आढळून येणाऱ्या विटा २१इंच लांब, ११ इंच रुंद व ३ इंच जाड असून काही ठिकाणी त्या आकाराने खूप मोठ्या म्हणजे ४२ इंच लांब, २० इंच रुंद आणि ७ इंच जाडीच्या तर काही विटा त्याहूनही मोठ्या आकाराच्या आढळून येतात.
काही शंकाकृती लहान - मोठ्या विटा जुन्नर परिसरातील सातवाहनकालीन लोक वस्तीस्थानाच्या भागातून अभ्यासक - संशोधक यांना अभ्यासक करण्यासाठी आढळलेल्या आहे. त्या गोलाकार अवशेषांच्या बांधकामासाठी अशा प्रकारच्या विटा चा वापर केल्याने गोलाकार भाग तयार होत असल्याने त्याकामासाठी अशा विटा बनविल्या जात असत . त्याचे पुरावी आजही जुन्नर परिसरातू दिसून येतात.
कुकडी नदीच्या काठावरील आगरगाव , दिल्ली पेठ, सुसरबाग, लेण्याद्री जवळील गोळेगाव , खालचा माळीवाडा येथील उत्खनात सातवाहन कालीन थरात अशा पक्क्या भाजलेल्या स्वरूपातील ' विटा' ह्या मानवी वस्तीस्थानाचा मोठ पुरावा म्हणून ओळखला जातो.
अशा प्रकारच्या विटा पैठण , कराड , नाशिक ,नेवासा, भोकरदन ,तेर इत्यादि ठिकाणच्या सातवाहन कालीन थरात मिळालेल्या आहे
जुन्नर येथील आगर गावात सन २००८ -२००९ मध्ये डेक्कन कॉलेज , पुणे पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खनामध्ये घराच्या भीतीची रचना बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सातवाहनकालीन विटांचे अवशेष पांढरी टेकडीच्या जमिनीत आढळून आले. त्यात ओबड- धोबड दगड बसून तयार केलेल्या एका घराचा ३ थराचा पाया आढळला. त्या विटांची भिंत २२ फूट लांब असलेली आढळली ही भिंत उभारताना विटांचे जोड एकावर एक येऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचे पुरावे येथील उत्खननात जुन्नर चे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांना पाहाण्यासाठी संधी मिळाली होती.तो उत्खनन चालू असलेला क्षण आजही मला आठवतो.
जुन्नर येथील दिल्ली पेठ येथे सन २०११ मध्ये केलेल्या उत्खनात भाजल्या विटांचा वापर करून एका शेजारी एक असलेली बांधकामे येथे आढळून आली असून चौरस आकाराचे उंच हौद असे वर्णन करता येईल अशी ही विटांची तीन बांधकामे असून उभ्या भिंती मध्ये त्यांना कोठेही दार नाही .मातीने सपाट केलेला तळ असलेल्या या एका हौद सदृश्य ' विट' बांधकामाची लांबी २.५ मीटर तर रुंदी १.५ मीटर , उंची ३.१५ मीटर असल्याचे आढळून आले . हि सर्व पुरातत्व उत्खनने कशी केली जातात ति मि स्वःता पाहिलेली असल्याने माझ्या सातवाहन काळातील लोकसंस्कृती अभ्यासासाठी ति उत्खनने मला महत्वपूर्ण ठरली आहे.
आगरगांव , गोळेगाव मध्ये राहणाऱ्या गृहस्थाने आपल्या घराच्या बांधकामात आधुनिक विटा व दगड यांच्या वापरा बरोबर सातवाहन काळातील विटांचाही वापर केल्याची दिसून येते. नदीकाठाची माती भात साळीच्या भुश्शात तसेच गवतात मिसळून त्यापासून विटा बनवून त्या विटा भट्टीत भाजून पक्की वीट निर्माण करून त्या विटांचा वापर स्थापत्य निर्मिती साठी केला जात असत.
----- बापूजी ताम्हाणे, जुन्नर
जिल्हा : पुणे ( महाराष्ट्र )
मों. नं. 9730862068

लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथील आण्णासाहेब पाटील यांची सात बुरुजांची आणि सात दरवाजे असणारी दमदार गढी.

 





लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथील आण्णासाहेब पाटील यांची सात बुरुजांची आणि सात दरवाजे असणारी दमदार गढी..
प्रत्येक देशाचा, राज्याचा , गावाचा एक वारसा असतो. हा वारसा टिकवणे, जतन करणे आणि पुढील पिढीसाठी तो व्यवस्थित राहिला याकडे लक्ष देणे आवश्यक असते. जगात हिंदूस्थानातील संस्कृती, येथील वारसा श्रेष्ठ समजला जातो. महाराष्ट्रातील गड, किल्ले, ऐतिहासिक घटना, स्थळांचा वारसा श्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रातील गढी आणि चिरेबंदी वाडे यांचा वारसा दैदिप्यमान असा आहे. पण काळाच्या ओघात आता तो लुप्त होत चालला आहे. तो जतन करणे वैयक्तिक स्तरावर कोणालाही शक्य नाही.
गावागावात चिरेबंदी वाडे होते असे सांगितले जाते. पंचक्रोशी मध्ये एकतरी गढी असायचीच. महसूल वसुली करणे, तो सुरक्षित ठेवणे आणि इच्छीत ठिकाणी पोहंचवणे यासाठी केलेली ती व्यवस्था होती. त्यामुळे चिरेबंदी वाडा आणि बुरुजांची दमदार गढी यांची सुरक्षा व्यवस्था ही एखाद्या किल्ल्याच्या तोडीची असायची.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील आण्णासाहेब बापूसाहेब पाटील यांची गढी पंचक्रोशी मध्येच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी एक गढी आहे. पाटील यांची आठवी पिढी सध्या या गढीमध्ये राहतेय, म्हणजेच किमान साडेचारशे वर्षापुर्वीची ही गढी असावी असे सांगितले जाते. तब्बल दहा एकरांवर उभारलेली ही गढी आहे. सात मजबूत बुरुज आणि सात दरवाजे हे या गढीचे वैशिष्ट्य आहे. राहण्यासाठी ही गढी नव्हती तर परिसरातील गावांमधून जमा केलेला महसूल या ठिकाणी ठेवला जायचा आणि नंतर निजामशाही मधील जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बिदरच्या किल्ल्यात पाठवला जायचा. त्यामुळे महसूल सुरक्षेसाठी अतिशय कडक सुरक्षा या ठिकाणी केलेली पाहण्यास मिळते. एखाद्या किल्ल्याच्या तोडीची सुरक्षा व्यवस्था या गढीमध्ये होती.
पुर्वाभिमुख पहिल्या प्रवेश द्वाराला हत्ती बांधण्यासाठी साखळदंडाची व्यवस्था होती. आजही प्रवेशद्वारावर साखळदंड पाहण्यास मिळतात. तटबंदीची माञ पडझड झालेली असल्याने ती दिसत नाही. दाराचा पट गायब झाला असला तरी पट अडकवण्याची दगडी व्यवस्था, आगळ व्यवस्था दिसून येते. मला मोठा दरवाजा गढीच्या भव्यतेची साक्ष देत उभा आहे.
या मुख्य प्रवेक्ष द्वारापासून आत गेल्यावर मोकळी जागा, जनावरे, घोडे बांधण्याची व्यवस्था होती. सध्या दक्षिण बाजूस शाळेची इमारत आहे. दुसरे प्रवेशद्वार ही भक्कम सुरक्षेसह असलेले दिसून येते. सध्या यांचाही लाकडीपट खराब झालेला असल्याने काढलेला आहे. या दाराच्या बाजूला पहारेकरी यांच्या साठीची बैठक, निवास व्यवस्था होती. या दारातून थोडेसे उत्तर दिशेला जाऊन पुन्हा पुर्वाभिमूख असणारे प्रवेशद्वार आहे. ते आजही सुस्थितीत आहे. दार बंद करुन आगळं टाकली की बाहेरुन आत येते नाही.
दारामधून आत गेले की बैठक व्यवस्था, ढाळज आणि वरच्या बाजूस पहारेकरी, बैठक व्यवस्था. सरळ गेले की थोडी दगडी चोप चढून गेल्यावर पुन्हा एक पश्चिम मुखी दरवाजा. हा दरवाजा एकदम सुस्थितीत आहे. दाराला आगळ आहे. तीथेही बैठक व्यवस्था आहे. पुन्हा उत्तर मुखी दरवाजा आहे. यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला धान्य कोठारे, लावणी, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या, पुढे आणखी एक उत्तर मुखी दरवाजा आहे. आत प्रशस्त माळवद, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी व्यवस्था आहे.
*आगळ व्यवस्था अप्रतिम आहे*
या गढीला सात दरवाजे होते पण सध्या सहाच शिल्लक आहेत. प्रत्येक दाराला मजबूत आगळ आहेत. चार क्रमांकाच्या दाराला असणारी आगळ व्यवस्था जबरदस्त आहे. दार बंद करून आगळ लावल्या नंतर बाजूच्या भिंतीला एक आगळं दिलेली आहे. माञ त्याच्या मुखाला घडवलेला दगड बसवलेला आहे. त्याच्या मागे एक आगळ आहे ती पाठीमागे सरकवली आणि दगड लाऊन टाकला की दाराची आगळ लाॅक होऊन जाते. जोपर्यंत तो दगड काढून आगळ बाहेर काढली जात नाही तो पर्यंत मुख्य दाराची आगळ इंचभरही मागेपुढे सरकत नाही. विशेष म्हणजे दगडापाठीमागे असणारी आगळ पुर्ण बाहेर काढण्याची गरज नाही. सुमारे दीड ते दोन फुटापर्यंत ही आगळ पाठीमागे सरकवली जाते व पुढे ओढता येते. घडवलेला दगड अशा पध्दतीने बसतो की भिंतीमध्ये तो वेगळा दिसतच नाही.
या गढी मधून भुयारी मार्गाने गढीच्या बाहेर निघता येते. त्यातही आणखी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे या गढीमध्येच लपून बसण्यासाठी च्या अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या जागी लपून बसले तर संपूर्ण गढी ताब्यात घेऊन शोधून काढली तरी गुप्त ठिकाणी बसलेल्या व्यक्ती कोणालाच सापडून येत नाही.
pc - पञकार Abhay Mirajkar

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं? भाग ६

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी


भाग ६
कागलच्या राजाचा दिल्लीत राजवाडा
बायजाबाई शिंदे यांचे भाऊ हिंदुराव घाटगे यांचे ग्वाल्हेर दरबारात विशेष वजन होतं. मात्र जनकोजी शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे त्यांनाही ग्वाल्हेर सोडावं लागलं आणि 1835 साली ते दिल्लीला इंग्रजांचं पेन्शन घेऊन राहू लागले.
हिंदुराव यांचा दिल्लीतला वाडा. या वाड्याचं 1857 च्या बंडाच्या काळात मोठं नुकसान झालं होतं. आता तिथं हिंदुराव हॉस्पिटल आहे.
दिल्लीला त्यांचा स्वतःचा वाडा होता. इंग्रजांशी मिळून मिसळून राहाण्याचं धोरण त्यांनी ठेवलं होतं. 1856 साली त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी 1857 चं बंड झालं. या बंडात या वाड्याचं मोठं नुकसान झालं. परंतु आजही या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत.
राजा हिंदुराव घाटगे
आज इथं दिल्लीतलं प्रसिद्ध हिंदुराव हॉस्पिटल आहे. 19 व्या शतकात झालेल्या घडामोडींमुळे कोल्हापूर आणि कागलचं नाव उत्तर भारतात गेलं ते कायमचंच.
शिंदे घराणे आणि ज्योतिबा देवस्थान
कोल्हापूर जवळचं ज्योतिबा देवस्थान हे शिंदे घराण्याचं कुलदैवत आहे. 1730 साली राणोजी शिंदे यांनी ज्योतिबाचं सध्याच्या मंदिराचं बांधकाम आणि डागडुजी केली, अशी माहिती मिळते. तसंच दौलतराव शिंदे यांनीही 1808 साली मदत केल्याचा उल्लेख सापडतो. अशा प्रकारे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कोल्हापूरशी आणखी संबंध दिसून येतो.
संदर्भ आणि अधिक वाचनासाठी
1) महाराणी बायजाबाई शिंदे ह्यांचे चरित्र- द. बा. पारसनीस- बाबाजी सखाराम आणि कंपनी.
2) माझा प्रवास- विष्णूभट गोडसे- प्रतिभा प्रतिष्ठान
3) झाशीची राणी लक्ष्मीबाई- प्रतिभा रानडे- राजहंस प्रकाशन
4) पुण्याचे पेशवे- अ. रा. कुलकर्णी- राजहंस प्रकाशन
5) ट्रॅवेल्स ऑफ इंडिया- सुखमणी रॉय- रोहन प्रिंट्स

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं? भाग ५

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी


भाग ५
1857 चे बंड
1857 साली उत्तर हिंदुस्तानात बंडाचं वारं आल्यानंतर बंडवाल्या सैनिकांनी बायजाबाईंना ग्वाल्हेरचं संपूर्ण संस्थान देऊन आपल्या बाजूने येण्याची विनंती केल्याचं सांगण्यात येतं. मात्र बायजाबाईंनी बंडवाल्या सैनिकांबरोबर जाणं टाळलं.
1858च्या मे महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, बांद्याच्या नवाबांनी ग्वाल्हेरवर हल्ला करून ग्वाल्हेर ताब्यात घेतलं. त्यामुळे सर्व राजस्त्रियांना बाहेर पडावं लागलं. साक्षात जयाजीराव शिंदे आणि त्यांचे दिवाण दिनकरराव राजवाडे यांना आग्र्याला पळून जावं लागलं होतं.
ब्रिटिश सैनिकांच्या गराड्यात झाशीच्या राणीचे सैनिक
या वेळेस सर्व खजिना पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला हे सर्व वर्णन विष्णूभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकात केलं आहे. बायजाबाई शिंदे सर्वतोमुख यज्ञ करणार आहेत असं पत्र मिळाल्यामुळेच त्यांनी कोकणातील वरसई गावातून उत्तर भारतात भ्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पुस्तकात बायजाबाई शिंदे यांचा उल्लेख अनेकदा आढळतो.
पेशव्यांनी आणि बंड करणाऱ्या फौजेने ग्वाल्हेर ताब्यात घेतल्याचं समजताच ब्रिटिश सैन्याधिकारी ह्यू रोजने ग्वाल्हेरवर स्वारी केली. या युद्धात झाशीच्या राणीचा मृत्यू झाला आणि पेशवे, तात्या टोपे, बांद्याचे नवाब यांना ग्वाल्हेर सोडून निघून जावं लागलं. अखेर ग्वाल्हेरमध्ये इंग्रजांच्या मदतीने पुन्हा एकदा शिंदे यांचं सरकार स्थापन झालं.
बंड शमल्यानंतर बायजाबाई ग्वाल्हेरला जयाजीराव शिंदे यांच्याबरोबरच राहू लागल्या. अखेर वृद्धापकाळातील आजारांमुळे त्याचं 27 जून 1863 साली निधन झालं. ग्वाल्हेर संस्थानाच्या कारभाराच्या, वाटचालीच्या त्या सहा दशकांहून अधिक काळ साक्षीदार होत्या.

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं? भाग ४

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी


भाग ४
बायजाबाई यांच्या राज्यकारभाराचं कौतुक अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. 1 जुलै 1832 साली इंडिया गॅझेटमध्ये त्यांच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे, "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of late Maharaja" रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे, असं त्यात छापण्यात आलं होतं.
तर मिल्स हिस्ट्रीमध्ये बायजाबाई शिंदे या तेजस्वी, सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असं म्हटलं आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहाता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजतं. त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या", अशा आशयाचं वर्णन 1833 साली प्रसिद्ध केलं आहे. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही बायजाबाईंना ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचं वर्णन लिहिलं आहे.
जनकोजी शिंदे आणि बायजाबाई शिंदे यांच्या बेबनाव
काही वर्षांनी दत्तकपुत्र जनकोजी आणि बायजाबाई यांच्यात राजकारभार कोण चालवणार यावरून वितुष्ट येऊ लागलं. या दोघांमधील कलह मिटवण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. साक्षात गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक यांनीही 1832 साली ग्वाल्हेरमध्ये आल्यावर मसलत केली होती.
बायजाबाईंच्या नशिबी वनवास
1833 साली जनकोजी यांनी उघड बंड केले. बायजाबाई यांना अटक करण्याच्या हालचाली होत असतानाच बायजाबाई राजवाड्यातून निसटल्या आणि त्या हिंदुराव यांच्या वाड्यात आश्रयाला गेल्या आणि त्यांनी ब्रिटिश रेसिडेंट कॅव्हेंडिश यांच्याकडे मदत मागितली. परंतु या सर्व खटाटोपात जनकोजी शिंदे यांचं पारडं जड ठरलं आणि बायजाबाईंना ग्वाल्हेर सोडावं लागलं.
त्यांना धोलपूर, फत्तेगड, अलाहाबाद, बनारस असं फिरत राहावं लागलं. त्यांच्या हालअपेष्टांचं वर्णन तेव्हा 'दिल्ली अखबार', 'मुसफल आखबार' या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालं होतं.
अखेर 1840 ते 1845 अशी पाच वर्षं त्यांना नाशिकला काढावी लागली. 1844 साली जनकोजी शिंदे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी ताराबाई हिने जयाजीराव शिंदे यांना दत्तक घेऊन राज्यकारभार सुरु केला. त्यानंतर बायजाबाई पुन्हा ग्वाल्हेरला आल्या.

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं? भाग ३

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

भाग ३
दक्षिणेची सौंदर्यलतिका
बायजाबाई शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असं वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलं आहे. इंग्रज लेखकांनी तिला ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असं म्हटलं आहे.
बायजाबाई शिंदे ग्वाल्हेरला गेल्यावर त्यांचा सर्व कारभारात वावर असे. शिकारीमध्येही त्या सहभागी होत. भाला फेकणे, बंदुकीने शिकार करणे, घोडेस्वारी अशा सर्व कलांमध्ये त्या निपुण होत्या.
दौलतराव शिंदे यांचा 1827 साली मृत्यू झाला. तत्पुर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई शिंदे यांनीच सांभाळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बायजाबाई शिंदे यांच्याकडे ग्वाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रं आली.
राज्यकारभार आणि हिंदुराव घाटगे
1810 साली सर्जेराव घाटगे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजा हिंदुराव (मूळ नाव जयसिंगराव) ग्वाल्हेरला येऊन राहिला. हे हिंदुराव दौलतराव शिंदे यांच्याबरोबर काम करू लागले. हिंदुराव घाटगे यांचं ग्वाल्हेरच्या दरबारात मोठं प्रस्थ तयार झालं.
दौलतराव शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर बायजाबाईंनी शिंदे घराण्यातील मुकुटराव नावाच्या पुत्रास दत्तक घेऊन राजगादीवर बसवलं आणि त्यांचं नाव जनकोजी असं ठेवण्यात आलं.
त्यानंतर बायजाबाई यांनी आपला भाऊ हिंदुराव, बापूजी रघुनाथ, यशवंतराव दाभाडे, यशवंतरावभाऊ बक्षी, लालाभाऊ, फकीरजी गाढवे, माधवरावपंत ब्रह्माजी, लक्ष्मणराव विठ्ठल, रामराव फाळके, मणिराम शेट, दाजीबा पोतनीस, आत्माराम वाकडे या सरदारांच्या मदतीने आणि काही इंग्रज सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.
द. बा. पारसनीस यांनी लिहिलेलं बायजाबाई यांचं चरित्र

Sunday 23 April 2023

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?भाग २

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी


भाग २
सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि मार्च 1798 मध्ये बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.
शिंद्यांच्या दरबारातील वाढत्या वजनामुळे अप्रिय झालेल्या सर्जेराव घाटग्यांची आनंदराव नावाच्या एका सरदारांनी आणि मानाजी फाकडे यांच्या मुलाने 1810 साली हत्या केली.
दत्तात्रय बळवंत पारसनिस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे या नावाने 1902 साली एक चरित्र प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात या सर्व घडामोडींचे वर्णन केलं आहे. पारसनिसांचं पुस्तक मुंबईच्या बाबाजी सखाराम आणि कंपनीने प्रकाशित केलं होतं.
दक्षिणेची सौंदर्यलतिका
बायजाबाई शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असं वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलं आहे. इंग्रज लेखकांनी तिला ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असं म्हटलं आहे.
बायजाबाई शिंदे आणि ग्वाल्हेरचा किल्ला

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं? भाग १

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?

  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

भाग १
आताच्या काळामध्ये ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याची राणी असं म्हटलं की डोळ्यासमोर राजमाता विजयाराजे सिंदिया यांचं नाव आणि प्रतिमा येते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राजकारणात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं. 'राजमाता' या त्यांच्या ओळखीमुळे त्यांची ग्वाल्हेरची राणी ही प्रतिमा आपल्या डोळ्यात येते.
पण आपण इथं ग्वाल्हेरच्या एका वेगळ्या राणीची माहिती घेणार आहोत. ती राणी म्हणजे बायजाबाई शिंदे.
या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागलच्या या मुलीने केवळ शिंदे घराण्याची सून म्हणून नाव कमावलं नाही तर अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार पाहिला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केलं आहे.
घाटगे घराण्याचा ग्वाल्हेरशी संबंध कसा आला?
कागल येथिल देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले.
सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.
हिंदुराव घाटगे आणि बायजाबाई शिंदे

सरदार बाणाजी शेटेंची ‘सोनई’

 





सरदार बाणाजी शेटेंची ‘सोनई’
सोनई म्हणजे नगर जिल्ह्यातलं मोठं गाव. सध्या नेवासे तालुक्यात आहे. राहुरीहून शनीशिंगणापूरला जाताना हे गाव लागतं. नगरचे खासदार राहिलेले, ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख याच गावचे. त्यांचे पुत्र शंकरराव हे मागच्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मृद व जलसंधारण मंत्री होते.
1802 साली यशवंतराव होळकरांनी गंगाथडी भागात केलेल्या लूटीविषयी मी अभ्यास करत होतो. गंगाथडी म्हणजे गोदावरीच्या खोऱ्यात असणारा नाशिकपासून पैठणपर्यंतचा प्रदेश. प्रामुख्यानं आमचा उत्तर नगर जिल्हा. इथली काही गावं ग्वाल्हेरकर शिंदे व त्यांच्या सरदारांच्या जहागिरीतली होती. शिंदे आणि होळकरांचं वैर असल्यानं ही गावं यशवंतरावांच्या निशाण्यावर होती. त्यांनी रायाजी पाटील शिंदे, रामजी पाटील जाधव व बाणाजी शेटे या शिंद्यांच्या सरदारांची गावं लूटली असं वाचनात आलं. यापैकी रायाजी हे कोपरगाव तालुक्यातील वारीचे तर रामजी संगमनेर तालुक्यातील पानोडीचे, हे माहीत होतं. दोघांवर त्यांच्या घराण्यातील अनुक्रमे रमेशराव शिंदे (नाशिक) व विलासराव जाधव (संगमनेर) हे संशोधन करत आहेत. त्यांची चरित्रे आगामी काळात समोर येतीलच. बाणाजी नेमके कुठले वगैरे काही माहिती नव्हतं. तशी शेटे आडनावाची मंडळी सोनई, शनिशिंगणापूर भागात असल्याचं ऐकिवात होतं. पण बाणाजींचं नाव किंवा ते ठराविक घराणं बिलकुल लौकिकात नव्हतं. कदाचित वंश ग्वाल्हेरला असावा, असंच मी गृहीत धरलं होतं.
काही दिवसांपूर्वी सोनईला गेलो. गावातलं यादवकालीन महादेवाचं मंदिर आणि बालाजी मंदिर आम्हाला पहायचं होतं. माझ्यासोबत राहात्याचे इतिहास अभ्यासक अविनाश हजारे होते. बालाजी मंदिराजवळ एका बाईंशी बोलत होतो. ‘गावात शेटेंचा वाडा आहे का’ असं मधूनच मी त्यांना विचारलं. त्यांनी गावच्या पेठेत वाडा असल्याचं सांगितलं. सोनईची पेठ मोठी आहे. पेठेत गेल्यावर एक वाडा दिसला. वाडा पाहताच मी थक्क झालो. हा वाडा कुणा सामान्य वतनदाराचा नसणार हे निश्चित होतं. तो शेटेंचाच वाडा होता. आतून पडलेला. वाड्यात कुणीही राहत नव्हतं. त्याचे मालक सचिन शेटे पाटील गावात राहतात असं कळलं. मग विचारत विचारत त्यांच्या घरी गेलो. सचिनजी व त्यांच्या पत्नी वैशाली भेटल्या. ती मंडळी तर आश्चर्यचकितच झाली. त्यांनी आम्हाला जेव्हढी ऐकीव माहिती होती तेव्हढी सांगितली. इतर भाऊबंदांशी फोनवर वगैरे बोलणं झालं. त्यांच्या घराण्याचं पूर्वीचं मोठेपण व वाडा कसा होता हे त्यांनी सांगितलं. मग त्यांच्याकडे असलेली काही मोजकी कागदपत्रं दाखवली. बाणाजींचं नाव त्यात दिसलं नी बऱ्याच दिवसांपासून डोक्यात घोळत असलेल्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला. अलिजाबहाद्दर दौलतराव शिंद्यांनी जहागीर दिल्याचं त्यात धडधडीत म्हंटलं होतं.
माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, कृष्णाजी व बाणाजी हे दोन बंधू होते. सुरुवातीला ते शिंदेशाहीत (महादजींच्या काळात) साधे नोकर होते. कर्तृत्वाच्या जोरावर शिंद्यांचे सरदार झाले. पुढे दौलतराव शिंदेंच्या काळात त्यांचं स्थान खूप उंचावलं. मोठे कृष्णाजी वारले. तर बाणाजी उत्तरोत्तर सर्जेराव घाटगे आणि बाळोबा पागनीस यांच्यासारखे दौलतरावांचे निकटवर्तीय बनले. शिंद्यांचे कारभारी झाले. अहमदनगरच्या किल्ल्याचे ते किल्लेदार देखील होते.
बाणाजींवर संशोधनाला वाव आहे. असो. एखाद्या ऐतिहासिक घराण्याला भेट देणारे आपण पहिलेच इतिहास अभ्यासक असलो, काहीतरी नवं हुडकून काढलं, ऐकीव माहितीला भक्कम लिखित संदर्भ सापडला, सगळं काही आपल्या कल्पनेच्या साच्यात फिट्ट बसलं की होणारा आनंद काही वेगळाच असतो, हे मात्र खरं.
सुमित अनिल डेंगळे
With thanks
Sumeet Dengle

मराठ्यांनी भोजपुरच्या आणि धरेमौ च्या गढीवर हल्ला केला

 


मराठ्यांनी भोजपुरच्या आणि धरेमौ च्या गढीवर हल्ला केला
1760 च्या डिसेंबर अखेरीस गोविंद पंत बुंदेला अब्दालीची रसद मारण्यासाठी रोहिलखंडात शिरले. पानिपत येथे मराठा सैंन्याची अन्न पाण्यावाचून वाताहात झाली होती. अन्न विकत घेण्यासाठी हातात पैसा सुद्धा नव्हता. भाऊ सतत मामलेदारांकडे पैशासाठी तगादा लावत होते. त्याच वेळी उत्तरेतला एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे दहा हजारांचे अनअनुभवी सैन्य घेऊन शुजाच्या मुलखात घुसला. गोपाळरावांच्या मराठा शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते. पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा काही टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयाला गेले. मराठ्यांनी आता या गढीस वेढा घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पुर्ण ताकतीने मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पुर्ण बिमोड झाला. त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्धबंदी झाले. मराठ्यांनी शुजाच्या मुलुखाची वाताहात केली आणि ते तसेच पुढे अलाहाबाद प्रांतात सरकले अलाहाबाद जवळ असलेल्या नबाबगंज या समृद्ध पेठेवर मराठ्यांनी हल्ला केला आणि ही पेठ लुटुन फस्त केली. मराठे तसेच पुढे फुलार्यास गेले आणि तिथे सुद्धा हाच प्रकार केला. गंगेच्या तीरावर मराठ्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला.
मराठ्यांनी भोजपुरच्या आणि धरेमौ च्या गढीवर हल्ला केला ती तारीख होती - 30 डिसेंबर 1760.
🙏🚩🚩

*श्रीमंत सरदार पाटणकर वाडा*🚩 *पाटण*

 


















*श्रीमंत सरदार पाटणकर वाडा*🚩
*पाटण*
*श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचा थोडासा इतिहास*
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात तसेच ते स्वराज्य आपल्या पराक्रमाने रक्षिण्याच्या कार्यात अनेक मराठा घराण्यांनी पिढ्यांनपिढ्या मोलाचे योगदान दिलेले आहे. या योगदानात चालुक्यवंशीय पाटणकर घराण्याचे योगदान उल्लेखनीय आहे.
सरदार पाटणकर घराण्यातील वंशजांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात शत्रू सैन्याविरुध्द लढताना ते शौर्यगाजवले, शर्थीचे पराक्रम केले, प्रसंगी रक्त सांडून स्वराज्याचे रक्षण केले त्याबद्दल छत्रपतीनी सरदार पाटणकरांचा उचित गौरव केल्याची ऐतिहासिक साक्ष म्हणजे ही शिवकलीन पत्रे होत.
या ऐतिहासिक पत्रावरुन ध्यानात येते की, सरदार पाटणकरांना एतिहासात आपले नाव अजरामर करुन महाराष्ट्रधर्म व स्वामीनिष्ठा सांभाळली. आपल्या पराक्रमाने आणि स्वामीनिष्ठेने अनेक मान- सन्मान, किताब, जहागिरी वतने आणि सरदारकिचा बहुमान मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार पाटणकरांना सन १६७८ मध्ये लिहिलेले एकमेव पत्र उपलब्ध आहे. पाटणकर घराण्यातील यशवंतराव लढाईत मारले गेले म्हणून महाराजांनी बाळाजीराव व चांदजीराव पाटणकरांचे सांत्वन करणारे हे पत्र लिहल आहे.या पत्रात महाराज म्हणतात, *'' तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहांत ''* या पत्रातील 'जकुरावरुन शिवशाहीतमध्ये सरदार पाटणकरांना मोठा मान सन्मान होता, वतनदार देशमुख म्हणून मोठी प्रतिष्ठा होती हे लक्षात येते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्त्येनंतर अनेक वतनदार सरदार लोक स्वार्थापोटी मोगलांना जाऊन मिळाले. पण स्वराज्याच्या या बिकट परिस्थितीत सरदार पाटणकर मात्र छत्रपतींच्या सेवेसाठी एकनिष्ठ राहिल्याची साक्ष या ऐतिहासिक दस्तऐवजावरून लक्षात येते. सरदार पाटणकर घराण्यातील कोणतीहीती वंशज वतनच्या आशेने मोगलांना मिळालेला नाही हे या घराण्याचे नमूद करण्यासारखेमोठे वैशिष्ट्य आहे.
छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात मराठा दौलतिची एक निर्णयकी म्हणजेच ' ना राजा ना राज्य ' आशीच अवस्था निर्माण झाली होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात तर या घराण्याणे उल्लेखनीय स्वामीसेवा व स्वराज्य रक्षणाची कामगिरी केली. त्या बद्दल छत्रपतींनी सेनापतीच्या खालोखाल असणारे पद हे चांदजीराव पाटणकरांना बहाल केल्याचे घ्यानात येते . संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सेनापतींन बरोबर राहुन खुप उल्लेखनीय काम त्यानी केले. रामराव पाटणकर व पदाजीराव पाटणकर यांच्याकडे शिलेदाराची पंचसहस्त्री होती. संताजी व धनाजी या मात्तबर सेनानीत वितुष्ट निर्माण झले त्यावेळी या उभय सेनानींत दिलजमाई घडवून आणण्याचे प्रयत्न चांदजीरावानी केला.
छत्रपती राजाराम महाराजांनी पाटणकरांना लिहलेला १६९० एका पत्ररात १२ गावे इनाम दिल्याचा उल्लेखही आढळतो. १० नोव्हेंबर १६८१एका पत्रात पाटणकरांनी स्वामीकार्य केल्याबद्दल त्यांना एक हत्ती बक्षीस दिल्याचे समजते
इ.स.१६९२ मध्ये संताजी घोरपडे यांच्या फौजांनी कर्नाटकात जुल्फिकारखानाचा जिंजीचा वेढा उठवला. या मोहिमेत चांदजीराव पाटणकरांनी आपल्या जमावासह शर्तीचा पराक्रम केला. या शौर्याबद्दल संपुष्ट होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना संपूर्ण पाटण परगण्याची इनामाची सनद १४ ते १६९३ दिली.
यातून आपल्याला आजुन एक समजते की कोल्हापूर करवीर संस्थान चे श्री छत्रपती राजाराम महारा(फ्लॉरेन्सला निधन झालेले ) करवीर संस्थान हे ( नागोजीराव पाटणकर )पाटणकर घराण्यातून दत्तक आहेत.
बहामनी सुल्तानाकडून ज्योत्याजीराव पाटणकर यांना दातेगड व गुणवंतगड ची देशमुखी भेटली नंतर विजापूर च्या बादशाहकडून त्यांना पाटण ची ६० गावांची देशमुखी भेटली . १५७२ च्या वेळेस ज्योत्याजीरावणी पोर्तुगीजचा बिमोड समुद्रकिनारी केला होता . शिवकाळात जे देशमुख घराणी स्वराज्यात सामील झाली त्यापैकी पाटणकर हे एक घराणे होते , राजाराम महाराजांच्या काळात या घराण्याला पाटण मधील वाडा व ६० गावांची सनद देण्यात आली.
वाचनामध्ये असा आढळतो की त्या काळात सरदार पाटणकर वाडा हा ६० हजार रुपयात बांधून झाला होता.
श्री गगनगिरी महाराज गगनगड हे पण पाटणकर घराण्यातील आहेत.
●लेखन :- सिध्देश पवार
सरदार पाटणकर घराण्याचे वंशज श्री.विक्रमसिंह पाटणकर (माजी सार्वजनीक बांधकाम व पर्यटनमंत्री,महाराष्ट्र राज्य ) यांनी मला त्यांचे दोन पुस्तके भेट दिली.या बद्दल मी त्यांचा शतशः आभारी.
●संदर्भ :-
१ )छत्रपतींचा पत्रव्यवहार सरदार पाटणकर घराण्याचे दस्तऐवज, *संपादक - प्रा.दादासाहेब डी चव्हाण
2) क्षत्रिय कुलावंत चालुक्य - सोळंखी - साळुंखे उर्फ श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचा इतिहास
3) श्रीमंत सरदार पाटणकर हुजूरवाडेकर (चालुक्य उर्फ साळुंके) क्षत्रिय कुळाचा इतिहास व ऐतिहासिक कागदपत्रे ,*लेखक - सुनील दापुरकर
शेवटी पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🚩
आपला सिध्देश पवार
gad_durganchya_dharkari_007

Saturday 22 April 2023

*एक गड आला पण एक गड गेला त्याची ही कहाणी*

 


*एक गड आला पण एक गड गेला त्याची ही कहाणी*
आज ४ फेब्रुवारी.. *३५३ वर्षांपूर्वी म्हणजे ४ फेब्रुवारी १६७० ह्या दिवशी तानाजी मालुसरे हिंदवी स्वराज्याच्या अद्वितीय कार्यात किल्ले सिंहगड मोगलांच्या ताब्यातुन घेताना धारतीर्थी पडले..!!* 🌸😞🙏🏻
अचाट धाडस, अतुलनीय शौर्य आणि बळकट स्वराज्यनिष्ठा असलेले सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करून गेले..!!
स्वराज्यसेवेत असलेल्या नरवीरांच्या मांदीयाळीतले तानाजीराव आणी सूर्याजीराव हे दोघेही मालुसरे बंधू मुळचे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडीच, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले.
तानाजी हे हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत शिवाजी महाराजांबरोबर होते. सन १६५९ च्या आदिलशाही सरदार अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनीही ह्या सैन्याच्या बरोबरीने प्रतापगडाच्या जंगलात खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती.
सन १६६१ मध्ये महाराजांनी कोकण प्रांतातील स्वारीत दाभोळ, संगमेश्वर काबीज करून तानाजी मालुसरे, त्र्यंबक भास्कर, पिलाजी निळकंठराव सरनाईक ह्यांना तेथे ठेवले होते. त्यावेळी दाभोळचे जहागिरदार जसवंतराव दळवी आणि शृंगारपुरचे सूर्यराव सुर्व्यांनी तानाजीच्या फौजेवर अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी सरनाईक पळत होते. परंतु तानाजींनी न डगमगता अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून त्यांच्या फौजेचा पराभव करून त्याना पळवून लावले आणि मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजींवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना पुढे त्यांनी स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाही सहभाग होता.
सन १६७० मध्ये स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी राजगडावर आलेले असताना फक्त जिजाऊ साहेबांच्या इच्छेखातर, जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला.
एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते.
त्यांच्याबरोबर बंधू सुर्याजीरावही साथीला होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा मागच्या बाजूला असलेला प्रचंड असा डोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे चिवट मावळ्यांबरोबर हा कडा चढून जाऊन त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या डाव्या हातात असलेली त्यांची ढाल तुटली. पण क्षणातच त्यांनी डाव्या हाताला शेला गुंडाळून तशाच परिस्थितीत उदयभानवर पुन्हा हल्ला केला. पण शेला गुंडाळलेल्या हातावर दुधारी तलवारीचे किती घाव सोसावणार..?? तानाजीरावांचा हात काकडी चोचवावी तसा चोचवला गेला.
उदयभानचे वार तानाजीरावांच्या वर्मी लागत होते पण तरीही शेवटच्या ही क्षणात उदयभानाला निपचित पाडूनच तानाजींनी प्राण सोडले. ही घटना माघ वद्य ९, शुक्रवारी ४ फेब्रुवारी १६७० रोजीच्या मध्यरात्री घडली.
तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.
अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे.
कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात परत आणताना नरवीर तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
*नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्यासह स्वराज्यकामी धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात वीरांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम..!!!*
© विवेक जोशी
ऐतिहासिक लेख वाचण्यासाठी आमच्या whats app group ला जॉइन करा..!
इतिहास विषय app download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...