संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न का झाले नाहीत
भाग ३
पोस्तसांभार : आदित्य गोखले
राजेंना कैद केल्यानंतर मोगल सैन्याच्या हालचाली
संभाजी महाराजांना कैद केल्यावर पुढची नोंद आढळते कि त्यांना वर घाटावर आणून बहादूरगड ला नेण्यात आले. साहजिक वाटते की आल्या वाटेने - आंबा घाटाने - मुकर्रब खान परतला असणार. सध्याचा कोयनानगर - चिपळूण च्या घाटरस्त्यांनी वर येण्याची हिम्मत त्याला झाली नसावी - ह्याचे कारण प्रचितगड व साताराच्या डोंगराळ प्रदेशातील मराठा फौज. त्यांना ह्या घटनेची माहिती कळताच त्यांनी नक्कीच छत्रपतींची सुटका केली असती त्यामुळे हा धोका मुकर्रब खानाने पत्करला नाही. पकडलेल्या लोकांची ओळख पटू नये म्हणून त्याचे वेषांतर करण्यात आल्याबद्दल काही गोष्टी ऐकिवात येतात. काही असो मुकर्रब खानाने त्याच्या परतीच्या मार्गावर प्रचितगड आणि मलकापूरची स्वराज्याची पागा ह्या दोन्ही पासून चार हात अंतर ठेऊनच मार्गक्रमण केले हे नक्की. अजून एक प्रश्न असा येऊ शकतो कि जे लोक संगमेश्वरच्या चकमकीमधून निसटले त्यांनी कुठून कुमक आणून सुटकेचे प्रयत्न का केले नाहीत ? पण तसे प्रयत्न केले असते तरी सगळ्यात जवळची कुमक यायची शक्यता होती ती तळकोकण, चिपळूण किंवा घाटावर मलकापूर\विशाळगड इथून - आणि ह्या सगळ्या ठिकाणहून वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या मुकर्रब खानाच्या तुकडीला गाठायला किमान १ दिवस लागला असता.
असे दिसते कि पन्हाळा मोहिमेतली बरीचशी फौज मुकर्रब खानाने पन्हाळा जवळ ठेवली होती - हे मुद्दामून केले असावे ज्यामुळे पन्हाळा वरच्या मराठा फौजेला संभाजी महाराजांना सोडवायचा मोकाच मिळू नये म्हणून. आंबाघाट चढून कोल्हापूर - कराड मार्गे पकडलेल्या लोकांना बहादूरगडला आणण्यात आले. औरंगजेबाने पण ह्या अटकेची बातमी ऐकून स्वतःचा तळ आधी म्हणलेल्या अकलूजहून हलवून बहादूरगडनजीक आणला होता. पकडलेल्या महारथी लोकांना सुरक्षित बहादूरगड पर्यंत आणायला त्याने हमीदुद्दीन खानाला धाडले होते. त्यामुळे मुकर्रब खानाचा कोल्हापूर ते बहादूरगड हा प्रवास हमीदुद्दीन खानाच्या सैन्याच्या भक्कम संरक्षणाखाली झाला.
ह्या सर्व परिस्थितीमुळे कराड भागातल्या खुल्या मैदानी प्रदेशात मराठा फौजेनी आक्रमण करून सुटकेचे प्रयत्न करणे हि बाब जवळजवळ अशक्यप्राय होऊन बसली.
No comments:
Post a Comment