विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे). Show all posts
Showing posts with label करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे). Show all posts

Sunday, 5 June 2022

कोल्हापूर प्रांताचा कारभार

 कोल्हापूर प्रांताचा कारभार

पोस्तसांभार ::इतिहास अभ्यासक मंडळ ( चेतन दादा )





राजधानी म्हणजे राज्याचे केंद्र, त्या त्या प्रदेशाचे संपूर्ण समाजकारण आणि राजकारण या राजधानी भोवती फिरत असते. महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज दुसरा यांनी आपली राजधानी प्रथम वाळव्यातून(वळीवडे) कोल्हापूरला आणली आणि मग काही वर्षातच ती शहरातून पुन्हा किल्ले पन्हाळ्यावर स्थापित केली. पुढच्या काळात राजसत्तेचे समीकरण आणि केंद्रस्थान बदलत गेली असली तरी कोल्हापूर प्रांताचा कारभार चालला तो पन्हाळ्यावरूनच.
राजधानी निवडताना त्या त्या राज्यांनी तत्कालीन राजकीय भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतल्याचं पाहायला मिळते. खेड शिवापुरच्या वाड्यातून आधी पुरंदर मग राजगड आणि शेवटी रायरीच्या भरभक्कम किल्ल्यावर स्थापन झालेल्या स्वराज्याच्या राजधानी निवडी मागे हीच कारणे होती. छत्रपतीं शाहूंनी(शंभू राजे पुत्र) यांनीही आधी अजिंक्यताऱ्यावर राजधानी वसवली आणि नंतर सातारा शहर वसवून राजधानी गडावरून खाली आणली. लढाईचे बदलले स्वरूप, सैन्याचा आणि कारभाराचा वाढलेला प्रचंड डोलारा ही त्या मागची काही कारणे.
कोल्हापूर शहरातून बाराव्या शतकात किल्ले पन्हाळ्यावर गेलेली राजधानी पुन्हा कोल्हापुरात आणली ती करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांनी. १७८८ साली एक घटना घडली आणि छत्रपतींनी राजधानी गडावरून शहरात आणायचे ठरवले.
सरकारी कामकाज पाहणारे रत्नाकरपंत म्हणजे करवीर दरबारातील एक मोठे प्रस्थ, चिकोडीच्या स्वारीत त्यांनी युद्धात केलेल्या पराक्रमावरून छत्रपतींनी त्यांना राजाज्ञा 'किताब दिला. पावसाळ्याच्या काळात पंतांचे चिरंजीव नारायणराव कोल्हापूरात आजारी पडले. त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून रत्नकरपंत गडावरून उतरून जात असता वडणगे जवळ घोड्याला अपघात होऊन पंत जखमी होतात. आणि तश्याच अवस्थेत पुत्राची भेट घेऊन पुन्हा गडावर रुजू होतात. ही गोष्ट छत्रपतींना कळताच ते पंतांची भेट घेतात.
गादीचा वाढता राज्यकारभार, गडावरील मर्यादित सोयी, प्रजेशी असलेले अंतर आणि सोबतच सरकारी अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय पाहता राजधानी प्रजेच्या जवळ म्हणजेच गडावरून खाली शहरात आणणे निकडीचे झाले होते. आणि म्हणूनच १७८८-८९ साली राजधानी कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आताच्या जुन्या राजवाड्यात आणण्यात आली. पुढे राजर्षी शाहूंच्या काळात राजदरबार नवीन राजवाड्यात आला.
पन्हाळ्यावरून कोल्हापूरात राजधानी स्थलांतरित झाल्याच्या घटनेचा उल्लेख करणारा संदर्भ मिळतो तो खालील प्रमाणे.
"रत्नाकरपंत राजाज्ञा यांचे चिरंजीव नारायणराव यांस वाखा होऊन करवीरी फार आजारी पडले. याजकरिता रत्नाकरपंत निरोप घेऊन समाचाराकरिता पन्हाळ्याहून करवीरास निघाले. मार्गी मनस्वी पर्जन्य लागला. त्यामुळे चिखल झाला होता. वडणगेनजीक घोडायचा पाय निसरून अप्पा पडले, आणि अंगाखाली पाय सापडून दुखावला. तरी तसेच करवीरी आले. हे वर्तमान समजताच समाचारासाठी स्वारी निघून करवीरी आली. काही दिवस उपाय केल्यावर पायाचे दुःख कमी झाले. याप्रमाणे पदरच्या कामगारास वगैरे वरचेवर करवीरी यावे लागते व गडावर सर्वांस राहण्याची अडचण यास्तव करवीरास राजधानी करून राहावे असा निश्चय करून महालच्या स्वाऱ्याही पन्हाळ्याहून आणविल्या"
वरील गोष्टी पाहता करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) हे सेवकांचे, प्रजेचे बारीक गोष्ट हेरून लोककल्याणासाठी लोकांजवळ येऊन राहिले.
संदर्भ ग्रंथ :-
करवीर रियास्त - भाग ४४

करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे)

 

करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे)
पोस्तसांभार ::इतिहास अभ्यासक मंडळ ( चेतन दादा )

 
करवीर संस्थानाचे तिसरे छत्रपती, शिवाजी राजे हे शरीफजींच्या वंशातील शाहजीराजे भोसले ह्यांचे पुत्र माणकोजी भोसले होत, हे खानवटकर घराण्यात इंदापूर परगण्यात जन्माला आले. करवीर छत्रपती संभाजी महाराजांना एक कन्या होती. त्यामुळे महाराणी जिजाबाई(छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी) ह्यांनी मानकोजींना दत्तक घेतले. माणकोजींना दत्तक घ्यावे अशी छत्रपती संभाजी महाराजांचीच इच्छा होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूवेळी (२० डिसेंबर १७६० रोजी) त्यांचा दुसऱ्या पत्नी राणी कुसाबाई गरोदर होत्या. त्यांचा पोटी कन्यारत्न जन्माला आले. नंतरच्या काळात गादीच्या वारसा संबंधी अनेक अडथळे आले पण महाराणी जिजाबाईंनी माणकोजींना २२ सप्टेंबर १७६२ रोजी दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण करून शिवाजी हे नामाभिधान ठेवले. त्यानंतर पाचच दिवसांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर सिंहासनारूढ केले.
कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर सुमारे पन्नास वर्षाचे संघर्षमय जीवन वाट्याला आले. ह्या कालखंडात पेशवे, पटवर्धन, सावंतवाडीचे भोसले, निपाणीचे देसाई, इचलकरंजीचे घोरपडे या सर्वांशी अनेकदा निकाराच्या लढाया झाल्या. सुरवातीची अकरा वर्ष त्यांना महाराणी जिजाबाई ह्यांचे मार्गदर्शन लाभले. महाराणी जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या(दुसरे) कारकिर्दीतच छत्रपती संभाजी महाराजांचे पंचगंगेच्या तीरी देवालय बांधले. ह्या देवलायासाठी ३० हजार रूपये खर्च झाला.
करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) ह्यांनी प्रत्यक्ष लढाईत सुद्धा सहभाग घेतला होता. महादजी शिंदे ह्यांचा बरोबरच्या युद्धप्रसंगी ते कोल्हापुरातच होते. ह्यांच्याच कारकिर्दीत इंग्रजां बरोबर एकूण तीन करार झाले पण इ.स. १८१२ रोजीच्या करारात करवीर राज्याला सार्वभौमत्व गमवावे लागले. करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) ह्यांनी पद्दाळे तलाव बांधून विस्तीर्ण केला.ह्याच कालखंडात राजधानी किल्ले पन्हाळ्याहून कोल्हापूर शहरात स्थलांतरित झाली
छत्रपतींची कारभारी मंडळी :-
१) आबाजीराव पंडित प्रतिनिधी.
२) भगवान पंडित - मुख्य प्रधान.
(प्रधान पदावर असे कोणी नव्हते पण केशवसुत भगवान पंडित असा शिक्का राजपत्रावर केला जात होता.)
३) सुब्बाराव पंडित अमात्य.
४) भास्करराव चिटणीस
५) रामचार्य पंडितराव मांगलेकर.
६) राणोजीराव घोरपडे सेनापती.
७) रत्नाकरराव राजाज्ञा.
वयक्तिक आयुष्य :-
करवीर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे चौदा विवाह झाले. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :-
१) सईबाई - तुळजोजीराव घाटगे सर्जेराव कागलकर यांची कन्या.
२) चिमाबाई - राणोजीराव शिंदे चावरेकर यांची कन्या.
३) अर्कवृक्ष
४) सकवारबाई - लक्ष्मणराव शिंदे सेनाखासकील तोरगलकर यांची कन्या.
५) उमाबाई - मुकुंदराव पवार देसाई जांबोटकर यांची कन्या
६) सुंदराबाई - रत्नोजीराव खानविलकर यांची कन्या
७) अहिल्याबाई - राणोजीराव घटक सर्जेराव यांची कन्या
८) आनंदीबाई - जानराव पाटणकर यांची कन्या
९) मैनाबाई - लक्ष्मणराव शिंदे सेनाखासकील तोरगलकर यांची कन्या.
१०) गंगाबाई - अथणीकर देसाई यांची कन्या.
११) दयाबाई - सयाजी घाटगे मुरगूढकार यांची कन्या.
१२) सकवारबाई - खंडेराव शिंदे कौलकर यांची कन्या.
१३) आनंदीबाई - धोंडजीराव पाटणकर यांची कन्या.
१४) कमळजाबाई - लिंबाजी नाईक - निंबाळकर वैरागकर यांची कन्या.
करवीर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे ह्यांना एकूण आठ अपत्ये होती.
१) युवराज संभाजी राजे उर्फ आबासाहेब - महाराणी सुंदराबाईंच्या पोटी जन्म
२)शहाजीराजे उर्फ बुवासाहेब -" राणी कमळजाबाईंच्या पोटी जन्म.
३) आऊबाई - यशवंतराव घाटगे सर्जेराव कागलकर यांचेशी विवाह.
४) बाळाबाई - सुलतान रावजी निंबाळकर खर्डेकर यांचेशी विवाह.
५) बायजाबाई - नारायणराव घाटगे बाजी नागपूरकर यांचेशी विवाह
६) येसूबाई - सिधोजीराव नाईक निंबाळकर निपणकार यांचेशी विवाह.
७) चिमाबाई - नागोजीराव पाटणकर यांचेशी विवाह.
८) आकूबाई - लक्ष्मणराव शिंदे यांचेशी विवाह.
सलग अर्धे शतक राज्य करून छत्रपतींनी दक्षिणी महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम किनारा इत्यादी प्रदेशात चांगला दरारा बसविला होता. शूर आणि धोरणी असून कर्त्या व पराक्रमी लोकांना संग्रही ठेवण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती. ह्याच कारणामुळे त्यांना बलाढ्य अशा साम्राज्याना टक्कर देता आली.
करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) ह्यांचे २४ एप्रिल १८१३ रोजी निधन पावले. त्यांचा पुण्यतिथीदिनी निमित्त विनम्र अभिवादन🙏💐
संदर्भ :-
कोल्हापूर छत्रपती घराण्याचे कागदपत्रे
करवीर रियास्त
फोटो साभार - गुगल

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...