विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label ग्वाल्हेरकर सरदार घराणे. Show all posts
Showing posts with label ग्वाल्हेरकर सरदार घराणे. Show all posts

Monday, 13 March 2023

६ जानेवारी १६६५ - #सुवर्णतुला....


 ६ जानेवारी १६६५ - #सुवर्णतुला....

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते.
या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला.

स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा ! केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा !
उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर. तेथे ते प्राचीन शिवमंदिर. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत.

ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !

जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.
ही आमची संस्कृती आहे. "मदर्स डे" ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो. आमचे आवघे आयुष्य आई-वडिलांना समर्पित आहे. अभाग्या हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला नमस्कार तरी करावा !

सोनोपंतांचे नाव आज खर्या अर्थाने सार्थ झाले. दोनिही तूळा पार पडल्या. सोनोपंत यावेळी खूप थकले होते..

☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳

कर्तबगार घराणे श्रीमंत फाळके सरदार.


कर्तबगार घराणे श्रीमंत फाळके सरदार.
पोस्तसांभार :: Prasad Shinde
----------------------------------------------------
सातारा जिल्ह्यात अनेक कर्तबगार मराठा घराणी होऊन गेली, त्यांनी आपल्या पराक्रमाने इतिहासात ठसा उमटविला,असेच एक घराण म्हणजे फाळके घराणे,या घराण्याचा खूप दैदिप्यमान इतिहास आहे पण काळाच्या अघोत तो काळा आड पडत चालला आहे,या ऐतिहासिक वारश्याला उभारी देण्याचे काम काही इतिहासकारांणी केले आहे,तवारीख ए शिंदे शाही शोध ग्रंथाचे लेखक पंडित निलेश करकरे यांनी आपल्या या शोध ग्रंथात या घराण्याचा व शिंदे शाहीतील सरदार घराण्यांचा चांगल्या प्रकारे इतिहास मांडला आहे,त्या मधील सारांश
फाळके घराणे खऱ्या अर्थाने राणोजीराव शिंद्यांच्या काळात नावारुपास आले,तद नंतर उत्तरेत फाळके घराण्याचा संचार सुरु झाला,आज ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात हे घराणं विस्तारल असलं जरी त्यांच मूळ ठिकाण पाडळी गाव आहे, या गावाची पाटीलकी या घराण्याकडे होती, पुढे राणोजीराव शिंदे आणि निंबाजीराव फाळके यांनी उत्तरे आपली समशेर तळपवली,आज ही ग्वाल्हेर मध्ये हे घराणं आपला रुतबा कायम राखून आहे,या घराण्याचा इतिहासात मोगावा घेऊ या,
फाळके घराण्याची कैफियत या मध्ये "आपला जुना मित्र निंबाजीराव फाळके यांस पाडळी हुन आणून आपल्या हाताखाली पागेवर अधिकारी नेमले" अस उल्लेख आढळतो,याचा अर्थ निंबाजीराव हे राणोजीराव शिंदे यांचे जुने मित्र होत,राणोजीराव शिंदे यांच्या सोबत अनेक ठिकाणी निंबाजीराव यांचा उल्लेख येतो,पालखेडच्या मोहिमेध्ये तसेच माळव्यात राहतगडाच्या मोहीम मध्ये निंबाजीरावांनी अतुल्य कामगिरी बजावली म्हणून ६०० घोडदळाची स्वतंत्र तुकडी दिली, सोबत चवरी,छत्री,नौबती,तोफ,शिंदेशाही निशाण, आदी व राव हा किताब दिला.
वसईच्या मोहिमेध्ये मराठेशाहीचे मोठे मोठे सरदार उपस्थित होते यावेळी राणोजीराव शिंदे आपल्या पतका सोबत हाजर होते, मराठ्यांनी पोर्तुगीजांची रसद तोडून, नाका बंदी केली,निंबाजीराव फाळके यांनी सुरुंगाला आग लावली,पोर्तुगीज मराठा यांच्यात तुंबळ युद्ध झाले शेवटी १६ मे १७३९ ला किल्ला पडला,
पेशवा बखर- कृष्णाजी विनायक सोहनी यात या मोहिमेबातचे वर्णन *"माहीम,तारापूर,वसई या तिन्ही प्रसिद्ध वेढ्यात राणोजीने एक दिलाने सह्याकेल शीर पडले तरी वसई काबीज करावयाची ही अप्पासाहेबांची मनीषा राणोजी शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी,जीवाची शर्थकरून सिद्धीस नेली,
या मोहीमे नंतर निंबाजीरावांना सम्मानित करण्यात आले,शिंदेशाही सवाई निशाण,शाही वस्त्र,कंठी,शिरपेच देऊन सरदार घोषित करण्यात आले व शिंदे दरबारात राणोजीरावांच्या उजव्या हाताला बसण्याचा मान दिला,
पुढे महादजी शिंदे,दौलतराव शिंदेच्या काळात देखील हे घराणं अग्रगण्य राहिले,व शिंदे दौलतीला आपली सेवा अर्पण केली,श्रीमंत कै सरदार आनंदराव फाळके यांनी शिंदेघराण्याची पत्रे प्रकाशित करून शिंदे शाहीइतिहासाची साधने खंड ४ प्रसिद्ध करून शिंदेशाहीला पुन्हा उजाळा देण्याचे अतुलनीय काम केले..!
------------------------------------------------------
•संदर्भ:-तवारीख-ए-शिंदेशाही
©शेखर शिंदे सरकार

 

ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे.



 ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे.
--------------------------------------------------
पाटणकर उर्फ साळुंखे घराणे हे स्वराज्यस्थापनेच्या पूर्वीपासूनच एक पराक्रमी घराणं म्हणून नावारुपास होते.साळुंखे हे त्यांचे पूर्वीचे आडनाव. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील या घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर पाटण परगण्याची जहागिरी मिळवली.पुढे याच पाटण वरून त्यांना पाटणकर नाव पडले.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याच्या सेवेसाठी पिढ्यानपिढ्या मोलाचे योगदान दिले.
सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार सरदार नागोजीराव साळुंखे उर्फ पाटणकर,सरदार ज्योत्याजीराव साळुंखे,सरदार बहिरजीराव साळुंखे या मुळपुरुषांपासुन झालेला आपल्याला पहायला मिळतो. पुढे यांच्याच वंशातील सरदार हिरोजीराव पाटणकर, सरदार चांदजीराव पाटणकर,सरदार हणमंतराव पाटणकर,सरदार रामराव पाटणकर यांनी स्वराज्याची सेवा केली.वंशविस्तारामुळे सरदार पाटणकरांच्या शिक्केकरी वाडा पाटण, बीबी, केर, रामपूर,दिवशी बुद्रुक व खुर्द शाखा, सावंतवाडी, सातभाई(भाऊ) पाटणकर शाखा जांभूळवन, मनदुरे, वाजेगाव,ग्वाल्हेर या शाखा उदयास आल्या.
रामपूर शाखा हि ग्वाल्हेरकर सरदार पाटणकरांची पितृशाखा होय.रामपूर शाखेचे मुळपुरुष सरदार हणमंतराव पाटणकर हे सरदार चांदजीराव पाटणकरांचे कनिष्ठ बंधू.चांदजीराव व हणमंतराव हे दोन्हीही बंधु मोठे तलवारबहाद्दर.सरदार चांदजीराव यांनी 1692 मध्ये जिंजी मोहिमेत मोठा पराक्रम गाजवला यावर खुष होऊन छत्रपती राजाराम यांनी त्यांना संपूर्ण पाटण परगण्याची सनद दिली.अनेक मोहिमेत व उत्तरेकडील मुलुखांचा बंदोबस्त करण्यासाठी चांदजीराव हे आघाडीवर होते.आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच सरदार हणमंतराव पाटणकर हे आपल्या तलवारीची धार दाखविण्यात मागे नव्हते.सरदार हणमंतराव यांच्या शौर्यावर खुष होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना समशेरबहादूर हा किताब दिला.याच हणमंतरावांनी रामपूर शाखेची स्थापना केली.या ठिकाणी पाटणकरांचा वाडा आहे.रामपूर शाखेला सरदार पाटणकर घराण्याची धाकटी पाती म्हणून ओळखले जाते.याच रामपूर शाखेतील वंशज सरदार मानसिंगराव पाटणकर यांचे पुत्र श्रीमंत सरदार रामचंद्रराव उर्फ आप्पासाहेब पाटणकर यांनी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या पदरी राहून आपली कर्तबगारी बजावली.
श्रीमंत रामचंद्रराव यांच्या पराक्रम आणि मुत्सद्देगिरीमुळे शिंदे सरकारांची त्यांच्यावर विशेष मर्जी संपादन झाली.शिंदे दरबारातील एक बडे प्रस्थ म्हणून सरदार पाटणकरांचा नावलौकिक होता.सरदार पाटणकरांच्या कार्य कर्तृत्वावर खुश होऊन श्रीमंत महाराजा दौलतराव शिंदे व महाराणी बायजाबाईसाहेब यांच्या कन्या चिमणाबाईराजे साहेब यांचा विवाह श्रीमंत रामचंद्रराव पाटणकर यांच्याशी 1816 मध्ये लावून देण्यात आला.या विवाहानंतर श्रीमंत रामचंद्रराव पाटणकर यांना ग्वाल्हेर संस्थानकडून दरसाल सव्वा लक्ष रुपयांची जहागिरी मिळाली होती.तसेच संस्थानाकडून सरदार पाटणकरांना बरेच मान मरातब प्राप्त झाले. आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी श्रीमंत रामचंद्रराव उर्फ अप्पासाहेब पाटणकर यांनी ग्वाल्हेरमध्येच आपले वास्तव केले.यांच्यापासूनच पुढे ग्वाल्हेरमध्ये सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार झाला.
------------------------------------------------------------
#ग्वाल्हेर_सरदार_घराणी
#सरदार_पाटणकर_घराणे
The Great Maratha-श्रीमंत महादजी शिंदे सरकार
©️प्रसाद शिंदे

ग्वाल्हेरचे सरदार इंगळे घराणे

 



ग्वाल्हेरचे सरदार इंगळे घराणे
---------------------------------------------
सरदार इंगळे घराणे शिवपूर्व काळापासूनच एक मातब्बर घराणे म्हणून प्रसिद्ध होते.सरदार इंगळे घराणे हे मूळचे बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातील करवंड गावचे.करवंड गावी इंगळे घराण्याची भव्य गढी असून सध्या भग्नावस्थेत आहे.इंगळे घराण्याचे नातेसंबंध थेट भोसले घराण्याशी होते.इंगळे घराण्यातील गुणवंताबाईसाहेब या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राणीसरकार होत्या तसेच तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांचा विवाह इंगळे घराण्यातील दिपाबाईसाहेब यांच्याशी झाला होता.आदिलशाही दरबारातील एक वजनदार घराणे म्हणून सरदार इंगळेंची कीर्ती सर्वदूर होती.इंगळे घराण्याला जंगबहाद्दर हा किताब आहे.स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या सोबत राहून या घराण्याने बरीच तलवार गाजवली.
सरदार शिवाजीराव इंगळे,सरदार बहिरजी नाईक इंगळे हे प्रमुख सरदार स्वराज्यसेवेत होते.प्रतापगडच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाशी भेट घेण्याचे ठरविले तेव्हा काही निवडक मातब्बर मंडळींसोबत सरदार कात्याजीराव इंगळे यांना आपल्यासोबत घेतले.
छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या कालखंडात स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर झाले.स्वराज्य विस्तारासाठी हि इंगळे मंडळी महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपल्या तलवारीच्या जोरावर सरंजाम मिळवून स्थायिक झाली.दक्षिणेत तंजावर या ठिकाणी स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसलें सोबत सरदार इंगळेंची एक शाखा होती.तसेच पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे-इंगळे,बेलसर नजीक निळुंज-वाळुंज परिसर,कोल्हापूर,ग्वाल्हेर,उज्जैन मध्ये सरदार इंगळे घराण्याच्या शाखा सध्या वास्तव्यास आहेत.
मराठा साम्राज्याचा उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणाऱ्या शिंदे सरकार घराण्याच्या पदरी राहून इंगळेंनी मोठी कीर्ती मिळवली.शिंदेशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे यांच्या समवेत राहून सरदार सुभानजीराव इंगळे,सरदार त्रिंबकजीराव इंगळे हे अनेक मोहिमेत सहभागी होते.सरदार त्रिंबकराव इंगळे यांना त्यांचे पराक्रमी पुत्र सरदार अंबुजीराव इंगळे यांची बहुमूल्य साथ मिळाली.
महापराक्रमी श्रीमंत सुभेदार जयाप्पाराव शिंदे व वडील सरदार त्रिंबकजीराव इंगळे यांच्या सावलीत राहून राजश्री अंबूजीबाबा चांगलेच तरबेज झाले होते.पानिपत युद्धानंतर श्रीमंत महादजीबाबांनी सैन्याचे मजबूत संघटन केले व सरदार अंबुजीराव इंगळे यांच्यावर सेनापती पदाची जबाबदारी टाकली.राजश्री अंबुजीबाबा यांनी श्रीमंत पाटीलबाबांच्या मागे सरदार इंगळे घराण्यातील मातब्बर वीरांची फौज एखाद्या मजबूत तटबंदी सारखी उभी केली.यामध्ये सरदार खंडोजीराव इंगळे,बाळोजीराव इंगळे,मालोजीराव इंगळे,पांडोजीराव उर्फ विठोजीराव इंगळे या सख्या बंधुसोबत बाबाजीराव इंगळे,तिलकराव इंगळे,शामराव इंगळे,शक्तीराव इंगळे,जीवजीराव इंगळे,लक्ष्मणराव इंगळे यांचा समावेश होता.
सरदार अंबुजीराव इंगळे यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले.गोहदवर विजय मिळविल्यानंतर या राज्याची व्यवस्था अंबुजीरावांनी योग्यरितीने लावून दिली. राघोगढ,करोली संस्थान चौथ देण्यास मनाई करत असताना आपल्या दराऱ्याच्या जोरावर चौथवसुली केली.राघोगढच्या राजावर जाता-येता चांगलीच वचक ठेवली.अंबुजीरावांचा धसका घेऊन राघोगढवाल्यांनी पुढे चौथ वेळेवर देण्याचे मान्य केले.श्रीमंत महादजीबाबांनी दिल्लीच्या बादशहासोबत मसलत करण्याची जबाबदारी अंबुजीरावांवर सोपल्यावर त्यांनी आपल्या हुशारीची चुणूक दाखवून मराठ्यांचा मनसुबा बादशहाच्या चांगलाच गळी उतरवला.
मराठा व शिख यांच्यात झालेल्या तहाची अंबलबजावणी करण्याची जबाबदारी जंगबहाद्दर अंबुजीरावांच्या खांद्यावर सोपवली.सोबतच शिखांच्या राज्याला लागून असलेल्या सोनपतच्या २८ महालांवर फौजदार म्हणून नियुक्त केले.याच मोहिमेदरम्यान अंबुजीरावांची धाडसी व आक्रमकवृत्ती त्यांनी पाटीलबाबांना लिहलेल्या एका पत्रातून दिसून येते त्यापत्रातील मजकूर थोडक्यात असा की,"शिखांचा जमाव भरपूर आहे परंतु सगळ्यांचे काही एकमत नाही त्यात बरेच फितुर लोकही आहेत.लाहोरकडील शिख व पानिपत कडील शिख हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत.पानिपतकडील शिखांनी लाहोरच्या शिखांचे मिळून पारिपत्य करण्याचा प्रस्ताव पाठविला असून आम्ही त्यांचा बंदोबस्त करू."यावर पाटीलबाबांनी दगाबाजीची शक्यता वर्तवून संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.
शिखांच्या अफाट जमावात शिरून त्यांचा बिमोड करण्याचे धाडस अंबूजीरावांसारखा रणबहाद्दरच करू शकतो.पुढे अंबुजीरावांनी आपल्या मुत्सद्देगिरीने शिखांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले याचा फायदा पुढे मराठा साम्राज्याला चांगलाच झाला.
श्रीमंत महादजीबाबाबांनी पुण्यात येण्याअगोदर राजपुतान्याची जबाबदारी अंबूजीरावांवर सोपवली. शिंद्याची राजधानी असलेल्या उज्जैन,ग्वाल्हेरच्या संरक्षणाची जबाबदारी वेळोवेळी चोख बजावली. राजपुतान्यातून चौथ वसुली असो वा उत्तरेतील महत्त्वाचे राजकारण असो अंबूजीराव सदैव अग्रस्थानी राहिले. श्रीमंत महादजीबाबांचा उजवा हात अंबूजीरावांना म्हंटल तर काही अतिशयोक्ती होणार नाही.शिंदे सरकारांच्या पत्रव्यवहारात अंबुजीरावांच्या बद्दल असे लिहले आहे की,"अंबुजी माणूस फार कामाचा,सेवेयोग्य आहे.स्वरूप जवळ असल्यासच ध्यानात येईल."या दोन ओळीच अंबूजीरावांचे शिंदेशाहीतील महत्व अधोरेखित करतात.
उत्तरेतील राजकारणात व्यस्त असून सुद्धा अंबूजीरावांची आपल्या पुण्यातील चाकण जवळील म्हाळुंगे या गावाशी नाळ तुटली नाही.गावशीवेचा व कुरणाचा वाद लवकरात लवकर निकालात काढावा यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.अंबुजीरावांनी मौजे देहू गावाची पाटीलकी विकत घेतली होती.
श्रीमंत दौलतराव शिंदे यांच्या कार्यकाळात ८०-८५ वय असताना सुद्धा अंबूजीरावांनी मराठा साम्राज्याची सेवा केली.१८०९ साली श्रीमंत महादजीबाबांच्या या निष्ठावंत सहकाऱ्याने अखेरचा श्वास घेतला.पुढे त्यांचे पुत्र त्रिंबकराव व बंधूनी शिंदे सरकारांची निष्ठेने सेवा केली.
ग्वाल्हेर व उज्जैन या ठिकाणी अंबुजीरावांचे वंशज हल्ली वास्तव्यास आहेत.ग्वाल्हेर या ठिकाणी अंबुजीरावांचे बंधु बाळोजीराव इंगळे यांचा वंशविस्तार झाला असून त्यांना राई हा महाल इनाम असल्यामुळे राईवाले इंगळे म्हणून ओळख आहे.श्रीमंत महाराजा दौलतराव शिंदे यांनी ग्वाल्हेरमध्ये लष्कर म्हणून एक नगर वसवले तेव्हा आपल्या निवासासाठी गोरखीमहाल म्हणून एक महाल बांधला.त्याची पुढे ओळख महाराजावाडा म्हणुन झाली.त्याच कडेने पुढे ग्वाल्हेरच्या सरदारांनी आपले वाडे बांधले.सरदार इंगळे यांनी दालबाजार या ठिकाणी आपला वाडा बांधला.पुढे वंशविस्तारामुळे ग्वाल्हेरमधील अनेक ठिकाणी सध्या इंगळे मंडळी वाडे बांधून वास्तव्यास आहेत.
मराठा साम्राज्याची अविरतपणे सेवा करणाऱ्या शिंदेशाहीतील निष्ठावंत सरदार इंगळे घराण्याच्या चरणी सदैव नतमस्तक.🙏
---------------------------------------------
•संदर्भ-१)Historical papers
Related to Gwalior
State.
२)तवारीख-ए-शिंदेशाही.
३)शिंदेशाही इतिहासाची साधने
✍️प्रसाद शिंदे.
•©दि ग्रेट मराठा श्रीमंत महादजी शिंदे
सरकार फेसबुक ग्रुप.

ग्वाल्हेरकर सरदार मांढरे घराण्याची कुलस्वामिनी (ग्वाल्हेर,मध्यप्रदेश)

 





ग्वाल्हेरकर सरदार मांढरे घराण्याची कुलस्वामिनी (ग्वाल्हेर,मध्यप्रदेश)
----------------------------------------------------------------
ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांसोबत सातारा जिल्ह्यातील अनेक घराणी उत्तरहिंदुस्थानात गेली.त्यापैकी एक सरदार मांढरे घराणे हे मराठा साम्राज्याच्या सेवेसाठी शिंदे सरकारांच्या नेतृत्वाखाली उत्तरेत दाखल झाले. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या आई काळुबाईच्या मांढरगडच्या पायथ्याला राहणारे हे पराक्रमी मांढरे घराणे.ग्वाल्हेर येथील सरदार मांढरेंच्या गावांची माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु याच मांढरगडाच्या परिसरात मांढरदेव,अभेपुरी,धावडी या गावात मांढरे मंडळी राहतात याच परिसरातून मांढरे घराणे ग्वाल्हेर येथे स्थयिक झाले असावे.
ग्वाल्हेरच्या सरदार मांढरे घराण्याने ग्वाल्हेरमध्ये देवीचे मंदिर बांधले.या मंदिरामागील इतिहास असा सांगितला जातो की,श्रीमंत महाराजा जयाजीराव शिंदे यांच्या कार्यकाळात मांढरे घराण्यातील सरदार आनंदराव शिंदे यांना आई जगदंबेने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. आनंदराव मांढरे यांनी याकडे दुर्लक्ष केले.आनंदरावांना पुन्हा स्वप्नात देवीचे दर्शन घडले.यानंतर सरदार मांढरेंनी महाराजांना हि गोष्ट सांगितली.महाराजांनी त्वरित मंदिर बांधकामाचे आदेश देऊन देवीच्या मंदिर बांधकामाची जबाबदारी सरदार आनंदराव मांढरे यांच्यावर सोपवली. ग्वाल्हेर मधील लष्कर म्हणून भाग आहे या ठिकाणी एका टेकडीवर देवीचे मंदिर बांधण्यात आले.२९ एप्रिल १८७३ साली महाराजांच्या हस्ते देवीची पूजा-अर्चना,अन्नदान करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
निलेश करकरे लिखित तवारीख-ए-शिंदेशाही या पुस्तकामध्ये देवीच्या दृष्टांतासंबंधी सांगितले आहे हे खरे असेलच परंतु शिंदे राजघराण्याची कुलदेवता आई तुळजाभवानीचेच रूप असणारी मांढरगडनिवासी आई काळुबाई हि सरदार मांढरे घराण्याची कुलस्वामिनी. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपल्या मातीला व आपल्या आईला कधीही विसरत नाही.याच भावनेतुन सरदार मांढरेंनी आपली कुलस्वामिनी जिच्या कृपाशीर्वादाने आपल्याला वैभव प्राप्त झाले तिची सेवा आपण व आपल्या पिढी-दरपिढीने नित्य करावी म्हणुन ग्वाल्हेर याठिकाणी आपल्या कुलस्वामिनीचे मंदिर बांधले असावे.
आज हि या मंदिराची देखरेख आणि पुजा सरदार मांढरे घराण्याकडून केली जाते.सिंधिया देवस्थान ट्रस्ट कडून मंदिराची देखभाल व नैवेद्य वैगेरे दिला जातो. दरवर्षी दसऱ्याच्या सणाला महाराज ज्योतिरादित्य शिंदे सरकार देवीच्या दर्शनाला येतात.याठिकाणी महाराज आपट्याच्या पानांचे पूजन करून दसरा साजरा करतात.
नवरात्र व इतर सण या ठिकाणी भक्तिभावाने साजरे करून सरदार मांढरे घराणे आपल्या कुलस्वामिनीची मोठ्या श्रद्धेने सेवा करतात.
-----------------------------------------------------------
©प्रसाद शिंदे

गिरवीकर सरदार कदम घराणे

 






गिरवीकर सरदार कदम घराणे
----------------------------------------------
कदम घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठा नावलौकिक मिळवला.महाराष्ट्रात कदम घराण्याचा अनेक शाखा आहेत.त्यापैकी फलटण तालुक्यातील गिरवीच्या कदम घराण्याची शाखा इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे.
गिरवी गावी या कदम घराण्याच्या गढी-वाड्यांचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात.या वाड्यांची भव्यता पाहुन आपल्याला कदम घराण्याच्या त्याकाळी असणाऱ्या वैभवाची,ऐश्वर्याची प्रचिती येते.
सवाई माधवराव पेशवा यांच्या रोजनिशीमध्ये सरदार कदम यांच्या आपल्या गिरवी गावच्या पाटीलकीच्या वडीलपणा संबंधी १७७४-७५ सालाचे एक निवाडापत्र आहे.या निवाडापत्राद्वारे अशी माहिती मिळते की,बहिरजी बिन द्वारकोजी बिन कृष्णाजी पाटील कदम मोकादम व आप्पाजीराव बिन भगवंतराव बिन कृष्णाजी पाटील कदम यांच्याकडे वडीलकीचा मान होता.
१७६४ साली गिरवी गावच्या पाटीलकीच्या वडीलपणा संबंधी भावकीत थोडे वाद होते त्याचा निवाडा मुधोजी नाईक निंबाळकर,फलटण परगण्याच्या देशपांडे यांनी दफ्तरी असणारी जुनी कागदपत्रे पाहून व गिरवी गावच्या बारा बलुतेदारांची साक्ष घेऊन केला.यामध्ये द्वारकोजी बिन कृष्णाजी कदम पाटील यांचा वडीलपणा सिद्ध झाला व भिकाजी बिन सुभानजी कदम पाटील व सखोजी बिन द्वारकोजी कदम पाटील यांनी धाकटेपणाने राहून निमे मोकादम करावे असा निवाडा झाला.
पुढे काही वर्षे सुरळीत चालु होते परंतु भिकाजी पाटील कदम यांच्या घरातील आनंदराव कदम म्हणून एक घरभाऊ हुजूर चाकरीस होता त्यांनी थोरल्या घरातील बहिरजी पाटील कदम यांचा भाऊ संताजी पाटील कदम यांना काही कागदपत्रे व मौजे विडणी गावासंबंधी झालेला मजहर दाखवुन वडीलपणासंबंधी दावा केला.
थोड्या काळाकरता भिकाजी पाटील कदम यांच्या वडिलांनी पाटीलकीचा कारभार केला होता.त्यामुळे काही मजहर,कागदपत्रांवर त्यांचे नाव मोकादम म्हणून होते.परंतु जुनी मोकादमी बहिरजी पाटील कदम यांच्या घराची सांगून मुधोजी नाईक निंबाळकर यांनी करून दिलेल्या मजहराप्रमाणे निकाल देण्यात आला.
निवाडापत्रात उल्लेख असलेले"भगवंतराव कृष्णाजी पाटील कदम"गिरवीकर हे शिंदे सरकारांच्या सोबत राहून उत्तरेत मराठा साम्राज्याची सेवा करीत होते.शिंदे सरकार यांच्या पदरी राहुन गिरवीकर कदम घराण्याने बराच पराक्रम गाजविला.सरदार भगवानराव कदम यांनी उत्तरेत अनेक लढायांमध्ये भाग घेऊन महत्वपूर्ण कामगिरी बजावली.सरदार भगवानराव कदम यांना आप्पाजीराव कदम आणि मानाजीराव कदम हि दोन मुले होती.आप्पाजीराव व मानाजीराव यांनी आपल्या वडिलांना प्रत्येक मोहिमेत मोलाची साथ दिली.
सरदार भगवानराव कदम यांच्यानंतर आप्पाजीराव कदम यांनी आपल्या घराण्याचा पराक्रमाचा वारसा अविरतपणे चालु ठेवला.शिंदे सरकारांनी या गिरवीकर कदम घराण्याला हत्ती,पालखी देऊन मोठा मानसन्मान केला.त्यामुळे गिरवीकर कदम घराण्याला ग्वाल्हेरमध्ये "हत्तीवाले कदम"म्हणुन ओळख आहे.या प्रमाणे गिरवीकर कदम यांची माहिती मिळते.
----------------------------------------------
©प्रसाद शिंदे
•फोटो साभार-शेखर शिंदे

अपरिचित सरदार गाढवे देशमुख घराणे.

 


अपरिचित सरदार गाढवे देशमुख घराणे.
-----------------------------------------------
शिवपूर्वकाळापासून आणि त्यांनतर बरीच घराणी हि आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रसिद्धीस आली. त्यापैकीच एक हे सरदार गाढवे देशमुख घराणे.आपली समशेर रणांगणात गाजवून या घराण्याने अनेक किताब, पदव्या मिळविल्या.आपल्या हिमतीवर पाटीलकी देशमुखी मिरविलेल्या गाढवे घराण्याला आढळराव हा किताब होता.पुढे स्वराज्य जसे वाढू लागले तसे या घराण्यातील वीरपुरुषांचे घोडे हिंदुस्थानभर दौड मारू लागले.
गाढवे देशमुख घराण्याचा इतिहास खूप कमी प्रमाणात प्रकाशित झाला आहे.अनेक कागदपत्रांत त्यांच्या मूळ गावांची माहिती मिळते.प्रामुख्याने सातारा जिल्हा तसेच सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यात गाढवे देशमुखांची गावे आहेत.साताऱ्याकडे जाताना आपल्याला जो खंबाटकी घाट लागतो त्याच्या अलीकडेच खंडाळा हे हायवे लगत असणारे गाव तालुक्याचे ठिकाण आहे.ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचे आणि अनेक घटनांचे साक्षीदार असणाऱ्या खंडाळा गावची पाटीलकी सरदार गाढवेंकडे होती.
छत्रपती श्री राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात गाढवे व खंडागळे यांच्यात पाटीलकी वरून वाद झाला होता त्याचा निवाडा महाराजांच्या निधनानंतर काही दिवसांनी झाला.'सीवाजी बीन संभाजी पाटील गाढवे यांनी तकरीर लिहून दिली होती ती पुढीलप्रमाणे,
"खंडागळे पाटील यांच्यावर कर्ज झाल्यामुळे त्यांनी आपली पाटीलकी आमचे मुळपुरुष बाळाजी पाटील गाढवे यांना विकली.खंडागळे पाटील यांच्याकडून पाटीलकी खरेदी करून बाळाजी पाटील गाढवे पाटीलकी करू लागले त्याच्यानंतर त्यांचा मुलगा कायकोजी पाटील गाढवे पुढे त्यांचा मुलगा नाईकजी पाटील गाढवे पाटीलकी करत होते यांना दोन मुले झाली,थोरले बाबाजी व धाकटे येकाजी पाटील गाढवे.
पुढे बाबाजी पाटील यांचा लेक मिलोजी पाटील त्यांचा लेक संभाजी यांनी पाटीलकी उपभोगली.खंडागळे यांनी आपल्या वडिलांच्या कारकिर्दीत कधी पाटीलकीवरून वाद घातले नाहीत.एवढेच काय तर आदिलशाहीपासून ते आता छत्रपती राजाराम महाराजांनापर्यंत एवढा मोठा काळ लोटला तरी खंडागळे यांनी कधी व्यवहार लावून धरला नाही म्हणजेच कधी पाटीलकी वरून वाद घातला नाही.बाळाजी पाटील गाढवे यांच्यापासून सातपिढी आम्ही पाटीलकी खात आलो आहे,न्याय मिळावा अशी तकरीर सीवाजी पाटील गाढवे यांनी केली होती."
खंडाळा या गावी गाढवे घराणे खूप पूर्वीपासून वास्तव्यास असल्याचे वरील तकरीर वरून समजते.ग्वाल्हेरचे सरदार गाढवे घराणे हे मूळचे खंडाळा या गावचे असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत परंतु हे घराणे नक्कीच वाई-खंडाळा या भागातले असावे.
ग्वाल्हेरकर शिंदे सरकारांच्या दरबारात सरदार गाढवे घराण्याला महत्वाचे स्थान होते.सरदार गाढवे घराण्याचे नातेसंबंध ग्वाल्हेरकर शिंदे सरकार या मातब्बर घराण्याशी होते,त्यामुळे गाढवे घराण्याचा त्याकाळी असणारा दबदबा आणि वजन यावरून स्पष्ट होते.श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे यांनी उत्तरेत मराठा साम्राज्य मजबूत केले तेव्हा गाढवे घराण्यातील वीरपुरुषांनी शिंदे सरकारांच्या पदरी राहून स्वराज्य सेवा केली.
सरदार लिंगोजीराव गाढवे हे सुभेदार राणोजीरावांचे मुख्य साह्यकर्ते होते,त्यांनी राणोजीबाबांची सावली बणून महत्वपूर्ण लढायांमध्ये आपला पराक्रम गाजवला. सरदार लिंगोजीराव गाढवे यांची मुलगी सखुबाईसाहेब शिंदे यांचा विवाह सुभेदार जयाप्पाराव शिंदे यांच्याशी झाला होता.त्यामुळे या दोन्ही घराण्याचे नातेसंबंध अधिकच घट्ट झाले.पुढे सखुबाईसाहेब यांचे बंधु सरदार सखोजीराव(मामासाहेब) गाढवे यांनी श्रीमंत जयाप्पाराव यांना भक्कमपणे साथ दिली.आपले भाचे जनकोजीराव शिंदे यांच्या पाठीशी आपली तलवार निष्ठेने धरली. पानिपतच्या रणांगणात जनकोजीरावांच्या पाठीवरील वार आपल्या छातीवर घेऊन धारातीर्थी पडले. पानिपतनंतर यांचा उल्लेख शिंदे सरकारांच्या राजकारणात किंवा पत्रव्यवहारात मिळत नाही.पानिपतच्या युद्धात सरदार तुकोजीराव गाढवे धारातीर्थी पडले.
कोटे संस्थानचे कमावीसदार लालाजी बल्लाळ यांना लिहिलेल्या पत्रात सरदार कुमाजीराव गाढवे यांचा उल्लेख आढळतो.शिंदे सरकारांचा पत्रव्यवहार प्रकाशित करणारे सरदार फाळके घराण्याचे वंशज लेखक आनंदराव फाळके यांनी सरदार कुमाजीराव गाढवे यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती दिली आहे.ती पुढीलप्रमाणे,
"कुमाजी गाढवे हा शिंदेशाहीत शिलेदार होता परंतु हुजरातपैकी शिलेदार असल्यामुळे तो कोणी साधारण शिलेदार नसावा." कुमाजीराव गाढवे सोबतच सरदार सिधोजीराव गाढवे हे शिंदे सरकारांच्या सेवेत होते.
श्रीमंत महादजी शिंदे यांचे प्रमुख सहकारी सरदार खंडोजीराव गाढवे,रघोजीराव गाढवे यांनी शिंदे सरकारांच्या पदरी राहून निष्ठेने स्वराज्यसेवा केली.
सरदार फकीरजी गाढवे यांनी श्रीमंत महादजीबाबांच्या निधनानंतर श्रीमंत दौलतराव शिंदे सरकार यांच्या कार्यकाळात महत्वपूर्ण भूमिका निभावली.आपल्या मुत्सद्देगिरी व पराक्रमामुळे सरदार फकिरजी गाढवे यांना शिंदे सरकारांच्या दरबारात महत्वाचे स्थान प्राप्त झाले.राजस्थानकडील भाग फकिरजींनी कायम आपल्या तलवारीच्या धाकात ठेवुन चोख बंदोबस्त लावला.सरदार फकिरजी गाढवे यांना महाराणी बायजाबाईसाहेब यांनी खाजगीपागेतुन 200 घोड्यांचे पथक देऊन त्यांचा दरबारात मोठा सन्मान केला. फकिरजी गाढवे यांनी अविरतपणे शिंदे राजघराण्याची सेवा केली.पुढे हा वारसा त्यांचे पुत्र सरदार नानासाहेब गाढवे यांनी चालविला.
सरदार कुमाजीराव गाढवे यांची माहिती देताना आनंदराव फाळके यांनी गाढवे घराण्याची कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे या घराण्याची इतर माहिती व इतिहास मिळण्याची शक्यता कमी असल्याची खंत व्यक्त केली आहे.दुर्लक्षित राहिलेल्या सरदार गाढवे घराण्याची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असुन यातुन नवीन माहिती हाती लागेल.
-----------------------------------------------
✍️प्रसाद शिंदे
संदर्भ-शिवचरित्र साहित्य खंड-१.
शिंदेशाही इतिहासाची साधने.
मराठी रियासत उत्तर विभाग-३.
तवारीख-ए-शिंदेशाही.

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...