विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 2 August 2025

कोंडे देशमुख घराण्याचा खेड शिवापूर येथील एकमेव शिलालेख

 कोंडे देशमुख घराण्याचा खेड शिवापूर येथील एकमेव शिलालेख आणि कोंडे देशमुख यांचा साधनातून आलेल्या इतिहासातील नोंदी.!!!!!

post :anil dudhane







===================================
खेड-शिवापूर येथील कोंडे देशमुख यांचा कमरअली दर्ग्याच्या बाह्य भिंतीवरील शिलालेख.......
उपलब्धी व स्थळ:- हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील पुणे बंगलोर हायवे लगत कात्रज घाटाच्या पुढे खेड शिवापूर गावात असलेल्या कमरअली दर्ग्याच्या बाह्य भिंतीवर पायऱ्या चढताना डाव्या बाजूला कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून चार ओळींचा आहे .वातावरणाचा परिणाम व रंगरंगोटी यामुळे शिलालेखाची अक्षरे झिजली असून अस्पष्ट झाली आहेत .
गावचे नाव,:- खेड शिवापूर ता.हवेली .जिल्हा पुणे.
===================================
शिलालेख वाचन:-
१.बीबाजी नाईक बीन
२.सुभानजी नाईक को
३.डे देशमुख तरफ खेडेबारे
४.सीका धाकटा शक १६०४
१. अर्थ:- शालिवाहन शकाच्या १६०४व्या वर्षी दुदुभीनाम संवत्सरात बिंबाजी सुभानजी नाईक कोंडे देशमुख तर्फ खेडेबारे धाकटा शिक्केकरी आहे.
==================================
. २. स्थान : गावाच्या दुसच्या बाजूस नदीच्या काठी असलेल्या मुसलमानी कमर अली दर्ग्याच्या ओट्यावर पायऱ्यांपाशी कोरलेला आहे
३. अक्षरपद्धती : कोरीव
४. भाषा :- मराठी.
५. प्रयोजन : बहुधा खेड-शिवापूर येथील दर्ग्याच्या पायऱ्यांच्या बांधकामाशी संबंधित असावा.
६. मिती / वर्ष : शके १६०४ [दुंदुभीनाम संवत्सर].
७. इंग्रजी साल / तारीख इ.स. १६८२-८३
८. काळ : अठरावे शतक.
९. कारकीर्द ,:-छत्रपती संभाजी महाराज
१०. व्यक्तिनाम : बिंबाजी सुभानजी नाईक कोंडे देशमुख.
११. स्थलनाम:- खेडेबारे
१२. शिलालेखाचा वाचक.:- श्री. पां. मा. चांदोरकर.
१३. प्रकाशन : ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ४, पृष्ठ ११६
===================================
१४. शिलालेखाचे महत्त्व : गावाच्या दोन्ही बाजूस दोन ओढे असून गायमुखे बांधलेली कुंडे आहेत. त्यांपैकी एक ओढा म्हणजे सिंहगडाच्या डोंगरापासून निघून खेडेबारे या खोऱ्यात वाहणारी शिवगंगा नदी होय. या शिलालेखात कोरणाऱ्याने अनुस्वार कोरलेले नाहीत किंवा ते कोरायचे राहून गेले असतील, शिलालेखातील कोंडे डे देशमुख हे खेडेबारे व सिंहगडचे देशमुख होत. दादाजी कोंडदेव यांनी सिंहगड आपल्या ताब्यात घेण्यापूर्वी तो कोंडे देशमुखांकडे होता अशा अर्थाची व त्यांच्या इतर हक्कांबद्दलची काही पत्रे आहेत. १९४३ पर्यंत तरी कोंडे देशमुखांची घरे खेडजवळील शिवरे व केळवडे वगैरे गावी होती, शिलालेखातील बिंबाजी नाईक याचा वंश त्या वेळी शिवऱ्यास नांदत होता डॉ. मोरेश्वर गंगाधर दीक्षित यांनी संपादित केलेल्या 'मराठेशाहीतील शिलालेख' या पुस्तकात पृष्ठ ३३ वर हा शिलालेख प्रकाशित केला असून तो श्री. गो. का. चांदोरकर यांनी वाचल्याचे नमूद केले आहे. .
ज्या अर्थी वरील शिलालेख खेड-शिवापूरच्या प्रसिद्ध दर्ग्याच्या ओट्यावर पायऱ्यांपाशी लावलेला आहे, त्या अर्थी तो त्यांच्या (ओटा व पायऱ्या) बांधकामाशी संबंधित असावा, असे वाटते.
=================================
कोंडे देशमुख यांचे इतिहासातील आलेले उल्लेख
१.शिलालेखातील बिंबाजी कोंडे देशमुखांचा उल्लेख मौजे केळवडेच्या देशमुखीसंबंधित असलेल्या एका कागदपत्रात आला असून तो कागद भा. इ. सं. मंडळाचे इतिवृत्त शके १८३४ मध्ये लेखांक ७०, पृष्ठ ७५ वर प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या रोजनिशीत दि. १६ ऑगस्ट १७४०, शनिवार रोजीच्या लेखांक ११४ मध्ये पृष्ठ ५१ वर देखील आलेला आहे.
२.खेडेबाऱ्याचे कोंडे देशमुख ("इतबारराव")खेडेबाऱ्याचे कोडे देशमुख घराणे चौदाव्या शतकापासून प्रसिध्द आहे. या घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर, शौर्याने खेडेबारे मावळातील बेचाळीस गावाची देशमुखी वतनदारी मिळविली. त्यांच्या पराक्रमाबद्दल विजापूरच्या आदिलशहा बादशहाने त्यांना 'इतबारराव (विश्वासराव)' तसेच 'सरनाईक' 'आणि 'इसापदार' या पदव्या बहाल केल्या. (संदर्भ : पुणे पुरालेखागार दफ्तर व कोंडे देशमुख यांच्याकडील संग्रहित कागदपत्रानुसार.)
३.शहाजीराजेंच्या काळात या घराण्यातील रायाजी सरनाईक इतबारराव कोंडे यांचे पुत्र बाबाजी रायाजी कोंडे व शहाजीराजे भोसले यांच्यात घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. यामुळे शहाजीराजेंनी बंगळूरमध्ये असताना स्वराज्य स्थापनेसाठी आपले धाकटे चिरंजीव बाल शिवाजीराजे आणि जिजाऊंना पुणे प्रांती पाठविल्यानंतर, पुण्यातील लाल महाल बांधून पूर्ण होईपर्यंत खेड शिवापूरला बाबाजी कोंडे यांच्याकडे विश्वासाने पाठविले (संदर्भ: पुणे पुरालेखागार दफ्तर)
४. पुणे परगण्यात आल्यावर बारामावळाचा पूर जिजाई व बालशिवाजी खेड-शिवापूर (खेडेबारे) येथूनच करत असत. राजमाता जिजाऊंचा दैनंदिन खर्च तीन गावांचे महसुली उत्पन्न देण्याची व्यवस्थ डेतील कामथडी, नसरापूर आणि कापूरहोळ या ली होती संदर्भ : पुणे पुरालेखागार दफ्तर)
५.खेड-शिवापूरमध्ये बाबाजी कोंडे यांच्याकडून जागा विकत घेवून जिजाऊनी प्रशस्त वाडा बांधला. शिवकालीन पत्रसार खंड १, पृष्ठ ६०९). खेड शिवापूर वास्तव्याच्या दरम्यान सुभेदार कोंडे यांनी खेड-शिवापूर जवळून वाहणाऱ्या आंबील ओढ्याच्या काठावरील शेरी नावाच्या जमिनीवर आंब्याची बाग व सवून या बागेस शहाबाग हे नाव दिले. त्याचबरोबर कावाजी रायाजी कोंडे देशमुख यांनी बाल शिवाजीच्या नावे शिवापूर पेठ (खेडशिवापूर नजीकचे शिवापूर) तसेच शाहजी राजेचे थोरले पुत्र संभाजी राजे यांचे नावे संभापूर ऊर्फ मांडकी पेठ (खेडशिवापूर नजीकचे श्रीराम नगर) वसविले (संदर्भ : मराठ्यांच्या इति दि. का. राजवाडे, खंड १८, पृष्ठ १०७).
६.कमर अली दुर्वेश बाबांच्या दर्ग्यास शिवाजी महाराजांचे इनाम
शिवाजीराजेंनी खेडशिवापूर येथील कमरअली दुर्वेश बाबा यांच्या दर्ग्यासाठी दिवाबत्तीची सोय करू दिली. त्यासाठी त्यांनी येथील इनामदार हिंदू व मुस्लीम यांना इनामी जमीन व रोजमुरे रोषणाई करिता सालाना इनाम दिले. याबाबतचे इ. स. १३ ऑगस्ट १६५७ चे उपलब्ध पत्र पुढीलप्रमाणे आहे,
"अजरक्तखाने सिवाजी राजे देशमुख व कारकुन तपे खेडेबारे
इनामदार ता. मा। हुजुर... जे आपणांस तपे मजकुरी इनाम हिंदू मुसलमान जमीन चावर व रोजमुरे व रोषनाई आहे. यांस साहेबाचे कारकून महालास आले आहेत ते साहेबांचे खुर्दखत देविवले पाहिजे म्हणून तपे मजकुरी इनामदार हिंदू व मुसलमान यांस ता. मा जमिन चावर व रोजमुरे रोषनाई जे असेल ते जैसे काही सालुगा । चालिले असेल तेणे प्रो सालाना मारीहि चालविणे उजूर न करणे इत्यादी (संदर्भ : शिवकालीन पत्रसार संग्रह, पृष्ट १६०). "
७..सुभेदार बाबाजी कोंडे देशमुख यांनी खेड शिवापूरच्या दर्ग्याचा जीर्णोध्दार केला असल्याचा शिलालेख
या दर्ग्याच्या भिंतीवर आहे. त्यातील उल्लेख पुढीलप्रमाणे आहे, "बीबाजी बिन सुभानजी नाईक कोंडे देशमुख
खेडेबारे शके १६०४
(हजरत कमर अली दुर्वेश बाबा दर्ग्याचा जीर्णोध्दार, ")
पुरंदर बेलसर लढाईत कान्होजी कोंडे देशमुख, जावळी व प्रतापगड युद्ध या प्रसंगात कोंडे देशमुखांचा उल्लेख येतो.प्रतापराव गुजर यांचे बरोबर गांगाजी इतबारराव नाईक कोंडे,यांनी न्याय निवड्याचे काम केले आहे.बापूजी नाईक कोंडे व कान्होजी नाईक कोंडे हे शिवरायांच्या मंत्रिमंडळात न्याय दानाचे काम करीत होते (संदर्भ:- शिळीमकर देशमुख यांचा 1657 मजहर)
८.कोंडे घराण्याचे कुलदैवत शिरवळ येथील मांड ओढ्याच्या काठची कोंडाईमाता आहे. देवीची मूर्ती दक्षिणमुखी आहे कोंडाई देवीच्या शेजारी मारणे देशमुखांचे कुलदैवत मंडाई माता आहे. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे. मंदिरात स्वयंभू शंक कोडे घराण्याचे कुलदैवत शिरवळ येथील मांड ओढ्याच्या काठची कोंडाईमाता आहे. देवीची मूर्ती दक्षिणमुखी हे कोडाई देवीच्या शेजारी मारणे देशमुखांचे कुलदैवत मंडाई माता आहे. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे. मंदिरात स्वयंभू शंकराची पिंड असून श्री गणेशाची मूर्ती विश्रांतीच्या स्वरुपात आहे. गणेशाच्या मूर्तीच्या कमरेवर नागदेवता आहेत. खूपच सुंदर प्राचीन बांधकाम आणि देखण्या मूर्ती हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिर परिसरात पाण्याचे टाके असून ते कधीही आटत नाही, वीर धरणाच्या फुगवट्यामुळे पावसाळ्याच्या काळात सदर मंदिर पाण्याखाली असते. इतर कालखंडात ते पाण्याबाहेर असते. अक्षयतृतीयेच्या काळात येथे मोठी यात्रा भरते.
संदर्भ:-
१.मराठेशाहीतील शिलालेख . मो ग . दिक्षित
२. शिलालेखाच्या विश्वात:-महेश तेंडुलकर
३. स्वराज्याचे शूर सेनानी .- दामोदर मगदूम
टीप.; सदर शिलालेख पूर्वीच प्रकाशित आहे .वरील माहितीत तफावत असू शकते . इथे पूर्वीच्या साधनात आणि विविध पुस्तकात आलेले मांडले आहे .जाणकारांनी त्यात सुधारणा करावी किंवा नवीन माहितीची भर घालावी.

No comments:

Post a Comment

कोंडे देशमुख घराण्याचा खेड शिवापूर येथील एकमेव शिलालेख

  कोंडे देशमुख घराण्याचा खेड शिवापूर येथील एकमेव शिलालेख आणि कोंडे देशमुख यांचा साधनातून आलेल्या इतिहासातील नोंदी.!!!!! post :anil dudhane =...