विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 September 2023

करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०)

 करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) 

lekhak ::

Pradnyesh Shailaja Dnyaneshwar Molak Florence, तोस्काना















करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) यांच्या इटली येथील फ्लोरेन्सच्या समाधी स्मारकाला मी नुकतीच भेट दिली. यापूर्वी भारतातून अनेक लोकं तिथं वंदन करण्यासाठी गेले आहेत. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांसाठी ही वास्तू अपरिचित आहे किंबहुना त्याचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवलाच गेला नाही हे जरी खरं असलं तरीही आपल्याला इतिहासात किती खोल जायला आवडतं हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे.
कोल्हापूरचे युवराज Sambhajiraje Chhatrapati हे तिथे २/३ महिन्यांपूर्वी राजाराम छत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी सहकुटुंब गेले होते. त्यांनी तेव्हा यथोचित अशी पूजा करुन लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवली होती. जेव्हा त्यांना समजलं मी युरोप दौऱ्यावर असताना इटलीला जात आहे तर त्यांनी आवर्जून मला त्या समाधी स्थळास भेट द्यायला सांगितलं. एवढंच नाही तर फ्लोरेन्समधील अजून काही ठिकाणं अन् गोष्टी सुचवल्या. छत्रपती घराण्यातील बऱ्याच लोकांनी तिथे भेट दिली आहे.
तर मित्रांनो, मी तिथे ५ किलोमीटर सायकल करुन पोहोचलो. निळं - पांढरं आभाळ, नदीकाठचा रस्ता, १६० हेक्टरचे भव्य असे गार्डन अशा प्रसन्न वातावरणात राजाराम छत्रपती महाराजांची समाधी आहे. अशा ठिकाणी मी व्हिडिओ करतच पोहोचलो. जशी सायकल पार्क केली तिथे जवळपास ७०/८० विद्यार्थी मला दिसले. मी विचार केला की इथं का आले असतील? तर फ्लोरेन्सच्या विविध मॅप्स् मध्ये या समाधीचा उल्लेख आहे. तसेच Lonely Planet या माध्यमाद्वारे देखील याची माहिती मिळते. या संपूर्ण परिसराचा Monumento all’Indiano असा उल्लेख सगळीकडे आढळतो. थोडक्यात काय तर पार्क, Indiana Palace Cafe, Indiano Bridge आणि Monument to the Maratha Maharajah of Kolhapur, Rajaram Chhatrapati असा हा फ्लोरेन्समधील भव्य व सुंदर भाग!
छत्रपती घराण्यातील राजाराम छत्रपती महाराज हे पहिले राजे होते जे की परदेशात गेले होते. त्यांचं मूळ नाव नागोजीराव पाटणकर. त्यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तर होतच शिवाय त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी ते छत्रपती म्हणून विराजमान झाले. १८ ऑगस्ट १८६६ ते ३० नोव्हेंबर १८७० हा त्यांचा कार्यकाळ अतिशय यशस्वी राहिला. तब्बल १५० वर्षांपूर्वी १९ व्या शतकात १८७० साली राजाराम छत्रपती महाराज त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत युरोपात जातात ही गोष्टच भारी वाटते. खरं तर त्यांना लंडन येथे व्हिक्टोरिया राणीला भेटायची इच्छा होती. परंतु राणी तेव्हा लंडनमध्ये नसल्यामुळे तेथील तत्कालीन पंतप्रधान विल्यम इवॉर्ट ग्लॅडस्टोन यांनी त्यांचं आदरातिथ्य करुन योग्य तो मान-सन्मान केला. त्यांच्या भारताच्या परतीच्या प्रवासात त्यांनी युरोपचा काही भाग पहावा असं विल्यम यांनी सुचवलं. त्याप्रमाणे राजाराम छत्रपती महाराजांनी पुढील आखणी केली.
मग राजाराम महाराजांनी फ्रांस, बेल्जियम, जर्मनी व उत्तर इटली असा परिसर पाहिला. याचा संपूर्ण इतिवृतांत महाराज रोज लिहायचे. ‘Diary of the late Rajah of Kolhapoor, during his visit to Europe in 1870,’ या नावानी हे पुस्तक पुढे प्रकाशित करण्यात आलं. आजही ते वाचण्यासाठी उपलब्ध आहे. मी ही या डायरीची पानं शांतपणे व सविस्तर चाळली व त्यातून बरीच नवी माहिती मिळाली. जर्मनीतील आल्प्सच्या पर्वतरांगातून उत्तर इटलीतील बोलझानो येथे प्रवास करत असताना राजाराम छत्रपती महाराजांना संधिवाताचा त्रास सुरु झाला. या घातक आजारामुळे त्यांना फ्लोरेन्स येथे आणण्यात आलं. २/३ डॉक्टरांनी तपासलं, उपचार केले परंतु त्यांच्या तब्येतीने साथ दिली नाही. आणि, दुर्दैवाने राजाराम छत्रपती महाराजांचे निधन झालं. एका प्रभावशाली, हुशार व तेजस्वी राजाचा असा शेवट होणं मनाला आजही चटका लावून जातं…
पुढे त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू रितीरिवाजात पार पाडले जावेत असा त्यांच्या सहकाऱ्यांनी आग्रह धरला. त्यावर तिथे वादविवाद झाला. परंतु महाराजा असल्यामुळे अंत्यविधीसाठी विशेष परवानगी मिळाली. अर्नो व मुगनॉन या नद्यांच्या पवित्र संगमावर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. इटलीमध्ये अशा पद्धतीचा विधी कधीच घडला नव्हता. स्थानिक लोकांमध्ये त्याविषयी कुतुहल निर्माण झाले व बघण्यासाठी गर्दी देखील झाली. या संपूर्ण प्रसंगाचा इतिवृतांत तेथून कोल्हापूरला पाठवण्यात आला.
राजाराम छत्रपती महाराजांचे इटलीतील फ्लोरेन्स येथे समाधी स्मारक बांधण्याची चर्चा सुरु झाली. काही प्रमाणात पत्रव्यवहार झाला. कोल्हापूरहून आर्किटेक्ट क्यापटन चार्ल्स मॉंट यांनी या छत्रीची Indo-Saracenic Style ची डिझाईन तयार करुन पाठवली व चार्ल्स फ्रान्सिस फुलर यांनी अतिशय उत्तमरित्या मार्बल मटेरियलचा बस्ट पुतळा साकारला. १८७४ साली हे समाधी स्मारक तयार झालं व सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पुतळ्याच्या खालील बाजूस इटालियन, इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषेत महाराजांचे नाव, मृत्यूची तारीख व स्मारकाची योजना असे उल्लेख आहेत. तसेच ‘Maharaja of Kolhapur’ असा लोगोही आहे.
१९०२ साली छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे या समाधीस्थळी अभिवादन करण्यास गेले. आजतागायत भरपूर लोकांनी तिथे भेट दिली आहे. या समाधीचे नुतनीकरण काही वर्षांपूर्वी झाले. इटालियन सरकार १५० वर्षांनंतरही या स्मारकाचे योग्यरित्या जतन करत आहे याचं समाधान वाटतं. परंतु राजाराम छत्रपती महाराजांबद्दल तिथे माहितीफलक असणं किंवा त्यांचा जीवनपट मांडणं तसंच छत्रपतींचा आणि स्वराज्याचा लेखाजोखा चित्र व माहिती स्वरुपात मांडणं आवश्यक वाटतं. कारण या साऱ्या गोष्टी तिथे नाहीत अन् जगभरातील पर्यटकांना तिथं आल्यावर काहीच समजत नाही याची खंत वाटते. त्यासाठी कोल्हापूर छत्रपती घराणं, महाराष्ट्र व भारत सरकारने काही ना काही पुढाकार घेऊन योग्य पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं.
या समाधी स्मारकातून प्रेरणा घेऊन कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक हे इंद्रजीत सावंतांच्या संकल्पनेतून, यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून, स्थानिक प्रशासनाकडून व लोकसहभागातून २०१९ ला उभं करण्यात आलं. तिथे शाहू महाराजांची चार म्युरल्स् आपल्याला पहायला मिळतात व अतिशय सुंदर छत्री देखील केली आहे. परिसर स्वच्छ असून पर्यटकांना फार प्रेरणादायी आहे. फ्लोरेन्स येथील समाधीबद्दल अधिक माहिती इतिहास संशोधक Indrajit Sawant, Malojirao JagdaleChandrakant Patil यांनी दिली.
राजाराम छत्रपती महाराजांचे समाधी स्मारकाजवळ जवळपास ४/५ तास घालवले. ‘I come from the land of Marathas & I am very proud to say that. Even today it feels immensely grateful to visit this monument of Rajaram Chhatrapati, here in Florence, Italy,’ असं म्हणत इतर बरीच माहिती तेथील काही परदेशी पर्यटकांना दिली याचा आनंद व समाधान वाटतं.
या लेखाचा शेवट मला थोडा वेगळा करायचाय… आपण २१ व्या शतकात एका आधुनिक युगात जगत असताना काही भारतीयांना परकीय राजांच्या समाधी किंवा स्मारकं नको आहेत. सतत औरंगजेब अथवा टिपू सुलतान यांच्या समाधीस्थळांवर टिका करायची व त्यानिमित्ताने दंगल घडवून आणायचा प्रयत्न गेल्या काही वर्षात होताना दिसतोय. असंच जर का इटालियन लोकांनी व सरकारने राजाराम छत्रपती महाराजांबद्दल विचार केला तर त्यांचं ही स्मारकाबद्दल वाद निर्माण होऊ शकतो. पण इटालियन लोकं व सरकार तसं करत नाहीत. उलट भारतातील एक मोठा राजा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं व त्यांच्या स्मारकाचं जतन वर्षांनुवर्षे ते करत आहेत. आणि मग कुठलाही महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेव्हा फ्लोरेन्सला जाऊन ती समाधी बघतो तर त्याला/तिला गर्व वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर भारतीयांनी इतिहासाकडे इतिहास म्हणूनच पाहिलं पाहिजे. भविष्यातले वादविवाद जर टाळायचे असतील तर ही गोष्ट जनमानसात अन् पुढील पिढीत रुजवली पाहिजे असं मला वाटतं.
तर आज फ्लोरेन्स येथे राजाराम छत्रपती महाराजांचे समाधी स्मारक दिमाखात उभं आहे याचा अभिमान वाटतो. जन्मस्थळापेक्षा मला समाधीस्थळं अधिक प्रेरणादायी वाटतात. कारण एखाद्या महान व्यक्तीचा शेवट तिथे झालेला असतो. जन्मापासून मृत्यू पर्यंत त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची शौर्यगाथा त्या समाधीस्थळी जाऊन कळते. आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी इतिहासातून प्रेरणा घेत वर्तमानात जगायचं कसं हे शिकावं आणि मग भविष्याचा वेध घ्यावा. मी एवढंच म्हणेल या समाधी स्मारकाच्या रुपानं राजाराम छत्रपती महाराज सातासमुद्रापार आजही जीवंत असून तिथे गेल्यावर जेव्हा मराठमोळ्या इतिहासाचे स्मरण केले तेव्हा ‘Italy in India & India in Italy’ असंच काहीसं मला वाटलं…!
जय हिंद… जय महाराष्ट्र!
- साकू, २३ सप्टेंबर २०२२, फ्लोरेन्स

क्षत्रिय_मराठा_निकुंभ_राजवंश

 

#



क्षत्रिय_मराठा_निकुंभ_राजवंश
----------–----------------------------
राजा निकुंभ यांच्यापासून निकुंभ राजवंशाची सुरुवात झाली. राजा निकुंभ हे आयोध्याचे सूर्यवंशी राजा इक्ष्वाकु यांचे 13 वे वंशज होते. निकुंभ वंशी राजा #बाहुमान आणि मध्य भारतात नर्मदा नदी किनारी राज्य करत असलेल्या हैहैय वंशी राजा #तालजंग यांच्यात घनघोर युद्ध झाले या युद्धात राजा बाहुमान यांचा पराभव होऊन मृत्यू झाला. त्यानंतर राजा बाहुमान यांचे पुत्र राजा #सगर यांनी आपल्या पित्याच्या पराभवाचा बदला घेतला व राजा तालजंग यांचा पराभव केला. याचवेळी निकुंभ वंशी राजांचा राज्यविस्तार दक्षिण भारतामध्ये झाला. त्यानंतर भगवान श्रीराम यांचे छोटे बंधू राजा शत्रुघ्न यांचे द्वितीय पुत्र #सुबाहु यांना देखील दक्षिण भारताचे राज्य मिळाले. त्यानंतर राजा सुबाहु यांचे वंशज देखील निकुंभ वंशीय क्षत्रियांमध्ये मिसळले व एकाच वंशाचे असल्यामुळे राजा सुबाहु यांचे वंशज देखील स्वतःला निकुंभवंशीय म्हणू लागले. तर हा झाला निकुंभ वंशाचा अयोध्ये वरून दक्षिण भारतापर्यंतच्या राज्य विस्ताराचा पौराणिक इतिहास.
ऐतिहासिक इतिहासाचा विचार केला तर निकुंभ राजवंशाचे राज्य उत्तरी महाराष्ट्रात म्हणजेच आत्ताच्या #कान्हादेश (खानदेश) मध्ये होते. कान्हादेशामध्ये आजच्या महाराष्ट्राचे जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे व नाशिक जिल्ह्याचा उत्तरी भाग येतो. कान्हादेशात निकुंभ राजवंशाचा शासन काळ निश्चितपणे सांगता येत नाही पण इसवी सन 500 ते 700 पासून इसवी सन 1200 पर्यंत कान्हादेशावर निकुंभ राजवंशाचे राज्य होते. याचा पुरावा म्हणजे कान्हादेशात निकुंभ राजांचे शिलालेख मिळाले आहेत त्याचप्रमाणे निकुंभ राजवंशाची संपूर्ण वंशावळ तर मिळत नाही पण जे काही शिलालेख मिळाले त्यावरून निकुंभ राजांनी मंदिर बांधले, ब्राह्मणांना भूमी दान दिली याची माहिती मिळते. त्या शिलालेखांच्या आधारावर काही निकुंभ राजांचे नाव मिळतात ते पुढे देत आहे.
●आलाशक्ति
●जयशक्ती
●देवशक्ती
●वैरदेव
●सोयदेव
●हेमादिदेव
●कृष्ण
या सर्व निकुंभ राजांचे नाव शिलालेखातून मिळतात पण यामध्ये कोण कोणाचे पिता व कोण कोणाचे पुत्र आहेत हे सांगू शकत नाही कारण या सर्व राजांचा शासन काळ देखील वेगवेगळा आहे. त्याचप्रमाणे निकुंभ साम्राज्याची राजधानी निश्चितपणे सांगता येत नाही पण निकुंभ राजांचे सर्वाधिक शिलालेख हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये मिळालेले आहेत तर या आधारे निकुंभ साम्राज्याची राजधानी चाळीसगाव ला आपण मानू शकतो.
चाळीसगाव मधले प्रसिद्ध पाटणादेवी मंदिर हे देखील निकुंभ राजांनी 12 व्या शतकात बांधले होते हे देवीच्या शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ देखील आहे. सरसेनापती येसाजी कंक यांचे कंक घराणे देखील निकुंभ म्हणजे निकम कुळाची शाखा आहे. आजच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील #निकम कुळातील लोक निकुंभ राजवंशाचे वंशज आहेत. निकम कुळाचा वंश #सूर्य आहे व गोत्र #पराशर आणि #मानव्य आहे.
लेखक :- आशिष इंगळे पाटील
इकडे तेच निकम पुढे देवगिरी यादव यांचेकडे चाकरी करून राहिले... सम्राट अकबर याला महाराष्ट्र मध्ये प्रथम भिडणारे म्हणजे निकम देशमुख आहेत.. पाश्चिम महाराष्ट्रात विशेषता सातारा प्रांतात त्यांनाच बर्गे, खलाटे, पन्हाळे , साबळे, तावरे या आडनावाने ओळखतात...लढाऊ वृत्ती असलेल्या निकम यांच्या घोडदळ प्रमुख याला बर्गे हा किताब मिळाला.

Wednesday 27 September 2023

पार्वतीबाई सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा स्मृतिदिन

 

२५ सप्टेंबर इ.स.१७८३
पार्वतीबाई सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा स्मृतिदिन
आपले पती भाऊसाहेब हे कधीतरी पाणीपतावरून परत येतील या भाबड्या आशेवर विधवा आणि सधवेच्या सीमारेषेवर पार्वतीबाईंची चातकी होरपळ आयुष्यभर मनाचा ठाव घेणारी ठरली.
पार्वतीबाईंनी मराठा साम्राज्यात अनेक चढ-उतार पाहिले .न्युमोनिया मुळे २५ सप्टेंबर १७८३ मधे पार्वती बाईंचे निधन झाले. सदाशिवराव भाऊंची सती म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदाशिवराव भाऊंच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या, पानिपतच्या कोलाहलात शत्रूच्या हाती लागू नये म्हणून व जर लागलोच तर स्वतःची शाखा करू पाहण्यासाठी जवळ जंबिया बाळगणार्या पार्वतीबाई आपल्या पतीला म्हणते," एकदा क्षत्रिय व्रत स्वीकारले की शाका नाकारण्यात काही अर्थ?.... मी तुमची सांगातीन होईन." असे वचन देणारी पार्वती, पानिपतच्या युद्धानंतरही संपूर्ण आयुष्यभर भाऊसाहेबांची वाट पाहत बसल्या होत्या .त्यांना तोतयाच्या बंडालाही सामोरे जावे लागले.
अशा या अत्यंत प्रेमळ ,भाबड्या, भावनाशील , करारी,क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या पार्वतीबाई पेशवीन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

इंग्रजांच्या पत्रात "अत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख

 

२५ सप्टेंबर इ.स.१६७१
इंग्रजांच्या पत्रात "अत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख
पत्रासारसंग्रहातील एकुण तीन पत्रे वाचनाच्या सोयीकरीता एकाखाली एक दिली आहेत. पत्रांचा कालावधी हा सन १६७१ मधील एप्रिल ते सप्टेंबर असा सहा महिन्यांचा आहे. अवघ्या सहा महिन्यात शिवाजी माहाराजांच्या संबधी धुर्त इंग्रजांची तीन वेगवेगळी मते बदललेली दिसतात.
दिनांक ८ एप्रिल सन १६७१ रोजीच्या पहिल्या पत्रात इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध मोठे मोगल सैन्य येत असल्यामुळे आनंदात आहेत.
दिनांक १ मे सन १६७१ रोजीच्या दुसर्या पत्रात इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांचा "दरोडेखोर शिवाजी" असा उल्लेख करत आहेत.
दिनांक २५ सप्टेंबर सन १६७१ रोजीच्या तीसर्या पत्रात इंग्रज शिवाजीचा " पूर्वेकडीलअत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख करत आहेत.
अवघ्या चार महिन्यापूर्वी दरोडेखोर म्हणणार्या इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराज "अत्यंत धोरणी राजा" भासू लागले. यातच दडले आहे शिवछत्रपतींच्या कुटनिती, राजनिती, शौर्य, धैर्य, पराक्रम, राज्यव्यवस्था, न्याय आणि दूरदृष्टीचे सार..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

बाकाजी फर्जंद यांना सनद

 

२५ सप्टेंबर इ.स.१६७५
( अश्विन शुद्ध द्वितीया, शके १५९७, संवत्सर राक्षस, शनिवार )
बाकाजी फर्जंद यांना सनद :-
बकाजी फर्जद यास पाटीलकी बहाल शिवरायांचे ज्ञात अज्ञात कष्टकरी मावळे बकाजी फर्जद शिवरायांची प्रामाणिकपणाने सेवा करुन त्यांना कठीण प्रसंगी साथ देणार्या हिरोजी फर्जद प्रमाणे त्यांचा मुलगा बकाजी फर्जद यांनीही शिवरायांची एकनिष्ठेने सेवा केली. राज्याभिषेक प्रसंगी सेनापती, अष्टप्रधान, सुभेदार, किल्लेदार, नोकर चाकर, ब्राह्मण, पाहुणे प्रजेला शिवरायांनी बक्षिस म्हणून इनामवतनाचा लोभ न करता आयुष्यभर आपली सेवा करण्याची संधी मिळावी अशी ईच्छा व्यक्त केली. स्वराज्याला भरभराटी आली. वैभव प्राप्त झाले. जगभर शिव रायांचा नावलौकिक वाढला. मान सन्मानाची अभिलाषा न बाळगणार्य़ा या दोन निष्ठावंत सेवकांच्या मुलाबाळांना काहीतरी मान द्यावा महाराजांना मनोमन वाटत होते. त्यांनी हिरोजी फर्जद यांचा मुलगा बकाजी फर्जद याला खामगाव मावळ येथील कायमस्वरूपी पाटीलकी दिली.

जंजिरेकर सिद्धी व मराठे यांच्यात ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम

 

२५ सप्टेंबर इ.स.१७३६
जंजिरेकर सिद्धी व मराठे यांच्यात ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली
मराठी फौजा १७३१-३२ पर्यंत विविध कारणास्तव विविध ठिकाणी अडकलेल्या मराठी फौजा इ.स.१७३२-३३ मध्ये मोकळ्या झाल्या. थोरल्या बाजीरावने फेब्रुवारी १७३२ ला कुलाब्याला जाऊन सेखोजी आन्ग्रेशी बोलणी केली. ब्रह्मेंद्र स्वामींच्या सततच्या टोचणीमुळे शेवटी इ.स.१७३३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धीस शासन करण्यासाठी कारवाई करण्याचे ठरविले. त्याच दरम्यान फेब्रुवारी १७३३ मध्ये याकुत्खान मरण पावला व त्याचा मोठा मुलगा अब्दुर रहमान मराठ्यांच्या आश्रयाला आला. उन्हाळा सुरु असताना छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्याच्या हाताखाली एक फौज राजपुरी, जंजिऱ्यावर तर प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली दुसरी फौज राजगड व आसपासचा भाग काबीज करण्यासाठी रवाना केली. मराठी लष्कर अचानक चालून आल्यामुळे त्याला फारसा प्रतिकार झाला नाही व सिद्धीचे सरदार किल्ल्यात पळून गेले.पेशव्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा नव्हत्या तसेच सिद्धीची रसद तोडण्यासाठी तो सर्वस्वी सेखोजी आंग्रे वर अवलंबून होता ज्याला छत्रपतींनी आपल्या मुलखात हस्तक्षेप करणे आवडले नव्हते. परिणामी तो ताबडतोब पेशव्याच्या मदतीस आला नाही. इकडे सिद्धी सरदारांनी मुंबईकर इंग्रजांशी संधान बांधून इंग्रजी आरमार जंजिऱ्यात आणले. पावसाळा पण जवळ आला होता.पेशव्याने जंजिरा सर करणे अवघड असल्याचे छत्रपतीना कळविले व रायगड तेथील किल्लेदाराला लाच देऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण बातमी फुटून दिलेले पैसे वाया गेले.पुन्हा साताऱ्याहून पैसे मागवि पर्यंत प्रतिनिधीच्या फौजा २५ मे ला रायगडला पोहचल्या व त्यांनी ८ जून ला किल्ला सर केला. प्रतिनिधी व पेश्व्यातील परस्पर स्पर्धा, आकस इ.मुळे त्यांच्या फौजात परस्पर सहकार्य कठीण झाले. पेशव्याने छत्रपतीना पत्र लिहून इंग्रजांच्या मध्यस्थीने युद्धबंदी घडवून आणली व बाजीराव ११ डिसेम्बर १७३३ ला जंजिर्याचा वेढा उठवून निघून गेला. पेशवा परतताच सिद्धीच्या सरदाराना चेव येऊन त्यांनी मराठ्यांनी जिंकलेल्या ठिकाणांवर, रायगडावर हल्ले सुरु केले. छत्रपतींनी धावाधाव करून फौज जमवून कोंकणात रवाना केली. पाचाड जवळ १० जानेवारी १७३४ ला सिद्धी लष्कराला मराठ्यांनी घेरून त्यांचा धुव्वा उडवला, प्रमुख सरदार सिद्धी अंबर अफवानी त्यात मारला गेला. सेखोजी आंग्रे १७३३ मध्ये मृत्यू पावला. त्याच्या नंतर सरखेल झालेला संभाजी पेशवे व सातारा दरबार बरोबर फटकून वागायचा. त्यामुळे अलिबागला पेशव्याने मानाजी अंग्रेस नेमले होते. चिमाजी अप्पा १८ एप्रिल १७३६ ला रेवस जवळ फौज घेऊन दाखल झाला. ह्या फौजेने सिद्धी सात, सिद्धी याकुब, सुभानजी घाटगे आदी सिद्धी सरदाराना ठार केले व सिद्धी चा शेवट केला. शेवटी २५ सप्टेंबर १७३६ ला पूर्वी ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली
‘’युद्धाचे वर्तमान तपशीलवार श्रवण करून राजश्री स्वामी ( छत्रपती शाहू महाराज ) बहुत संतोष पावले.भांडी मारिली,नौबत वाजविली,खुशाली केली.सिद्धी साता सारखा गनीम मारिला,हे कर्म सामान्य ण केले ऐसा स्तुतिवाद वारंवार केला.आप्पास वस्त्रे व पदक व तलवार बहुमान पाठवला.तसाच मानाजी आंग्रे यांचाही बहुमान केला.’’

छत्रपती प्रतापसिंह महाराज व इंग्रजांच्यात अकरा कलमी तह

 

छत्रपती प्रतापसिंह महाराज व इंग्रजांच्यात अकरा कलमी तह
१८०८ मध्ये धाकटे शाहू महाराज मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह याला राज्याभिषेक करण्यात आला. प्रताप सिंह अल्पवयीन असल्याने प्रारंभीची काही वर्षे कारभार मातोश्री माईसाहेब बघत असत. १८११-१२ पर्यंत तरी छत्रपती आणि बाजीराव यांचे संबंध चांगले होते. त्यानंतर हे संबंध उत्तरोत्तर बिघडत गेले,पुणे दरबार कडून छत्रपतींच्या खर्चासाठी देण्यात येणाऱ्या रकमा कमी पडत गेल्या, छत्रपती न साठीचे नजराणे पण साताऱ्या ऐवजी पुण्यात वळवले जात, वगैरे बऱ्याच तक्रारी, गाऱ्हाणी छत्रपतींनी बाजीरावाकडे केल्या होत्या.
छत्रपती असूनही कैद्या सारखी अवस्था, पारतंत्र्य, बाजीरावच्या स्वतःच्या स्थानाचा पण भरोसा नाही, अशा स्थितीत प्रतापसिंह महाराजांनी नरसू काकडे व बळवंत मल्हार चिटणीस ह्या विश्वासू लोकांमार्फत इंग्रजांशी-एलफिस्टन -बरोबर बोलणी सुरु केली. हे बाजीरावास कळताच त्याने 'आम्हास अनुकूल असावे' अशी छत्रपती प्रतापसिंह न माहुली मुक्कामी विनंती केली, छत्रपतींचे लढाई च्या काळात महत्व जाणून बाजीरावाने महाराजांना इंग्रजां बरोबरच्या संघर्षात आपल्या सोबतच ठेवले होते. परंतु छत्रपती व इंग्रज ह्यांच्यात आधी ठरल्या प्रमाणे आष्टी मुक्कामी जनरल स्मिथ ने बाजीराव वर छापा टाकला, जनरल स्मिथच्या फौजेत प्रतापसिंह, मातोश्री व अन्य कुटुंबीय मिसळले. यापूर्वीच इंग्रजांनी सातारा शहर व किल्ला काबीज केला होता पण राजा अध्याप हाती आला नव्हता. एल्फिनसटन व प्रतापसिंह यांची प्रथम भेट ४ मार्च १८१८ रोजी बेलसर( सातारा) येथे जनरल स्मिथच्या तळावर झाली. १० एप्रिल १८१८ ला प्रताप सिंह महाराजांनी सातार्यात प्रवेश केला, याच दिवशी इंग्रजांनी त्यांची 'राजा'म्हणून पुनःस्थापना केली. जेम्स ग्रांट डफ ची पोलिटिकल agent म्हणून नेमणूक झाली. छत्रपती प्रतापसिंह गादीवर आरूढ जरी एप्रिल १८१८ मध्ये झाले होते तरी इंग्रजांबरोबर तह होण्यास सप्टेंबर १८१९ उजाडावा लागला कारण तोपर्यंत बाजीराव पूर्णपणे शरण आला नव्हता. कंपनी सरकार व प्रतापसिंह महाराज ह्यांचात २५ सप्टेंबर १८१९ ला अकरा कलमी तह झाला.
राज्यकारभारा मध्ये प्रतापसिंह तयार झाल्यावर राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण असे सातारा राज्य प्रतापसिंह ह्यांना ग्रांट डफ ने सोपविले.

देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय)

 


देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय)

1795 च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाला मराठ्यांनी गुडघे टेकायला लावले, या लढाईत निजामाच्या फौजेचा मोड करणाऱ्या आघाडीवर एक कोवळा मराठा वीर ज्याचे वय होते फक्त अकरा वर्ष... दौलतराव शिंदे यांच्या लष्करातील जिवबादादा बक्षी यांच्याबरोबर आघाडीवर जाऊन अतुलनीय पराक्रम गाजवला होता आणि निजामाच्या सैन्याला आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते त्या वीर अभिमन्यू चे नाव होते सेनासप्तसहस्री श्रीमंत तुकोजीराव पवार महाराज (द्वितीय) .....
देवासचे दुसरे राजे श्रीमंत कृष्णाजीराव पवार महाराज यांनी त्यांना अपत्य नसल्याने रानोजीराव पवार (विश्वासराव) यांचे पुत्र विठ्ठलराव यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव तुकोजीराव पवार असे ठेवले.
श्रीमंत तुकोजीराव यांनी आपल्या उभ्या आयुष्यात महादजी शिंदे बरोबर अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवला.अठराव्या शतकात मराठेशाहीचे वर्चस्व कमी होण्यास सुरुवात झाली, तेव्हा तुकोजीराव महाजांवर अनेक संकटे आली , पेंढार्यांनी त्यांच्या मुलखात उपद्रव करणू सुरू केले होते .तसेच जयसिंग राजा खेचीने ग्वाल्हेर प्रांतात बंड उभारून मुलखात लुटालूट जाळपोळ केली सुरू केली होती. तेव्हा शिंदे यांच्या फौजी ची लढाई होऊन त्यात शिंदेच्या फौजेचा पराभव झाला ,हे एकूण तुकोजीराव महाराजांनी खेचीवर हल्ला करून त्याला पळवून लावले.
पुढे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांशी तह झाल्यानंतर श्रीमंत तुकोजीराव यांनी आपल्या प्रजेच्या सुखसोयींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. राज्याचा मुलुख उद्ध्वस्त झाल्यामुळे लोक गाव सोडून गेली होती . त्यांना दिलासा देऊन खेड्यांमध्ये पुन्हा लोकवस्ती वाढवली संस्थानचे उत्पन्न वाढवले. देवासामध्ये जुन्या राजवाड्यातील जामदारखान्याच्या भाग बांधला .
मराठेशाहीच्या चढत्या काळात पराक्रमी , दृढनिश्चयी व धोरणि असलेल्या तुकोजीराव महाराजांनी मराठेशाहीच्या रक्षणासाठी व विस्तारासाठी पठाण, राजपूत व निजाम वगैरे शत्रूंना टक्कर देऊन विजय मिळविला तर पुढे मराठ्यांच्या पडत्या काळात देखील त्यांनी त्यांचा संयम ढळू न देता मोठ्या धैर्याने पेंढारी व बंडखोरांचे परीपात्य करण्याचे प्रयत्न कायम सुरू ठेवले होते.
तुकोजीराव महाराजांवर सुरुवातीपासून जितकी संकटे आली की पूर्वी त्यांच्या घराण्यातील कोणाच्याच वाट्याला आली नव्हती.
तुकोजीराव महाराजां ची तीन लग्ने झाली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाबाई असून दुसऱ्या पत्नीचे नाव सावित्रीबाई होते सावित्रीबाई ह्या संगमनेरकर यांच्या घराण्यातील होत्या आणि तिसऱ्या पत्नी भवानीबाई हे होत्या , खानदेशातील चाळीसगाव येथील राजाजीराव देशमुख यांच्या त्या कन्या होत्या. तुकोजीराव महाराजांना फक्त भवानीबाई पासूनच अपत्ये झाली , दोन पुत्र व तीन कन्या अशी एकंदर पाच अपत्ये झाली होती.
अशा या पराक्रमी,दृढनिश्चयी, धोरणी व संयमी महाराजांचे दिनांक 28 सप्टेंबर 1827 मध्ये देवास येथे निधन झाले.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!
महेश पवार
7350288953

तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यासाठी महाराजांनी पुण्यात गोतसभा भरवली

 

तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यासाठी महाराजांनी पुण्यात गोतसभा भरवली
२८ सप्टेंबर १६५७ (आश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, सोमवार)
तिमाजी खंडेराव हा सुपे परगण्यातील मौजे कोल्हाळ येथील रहिवासी होता अन् कुलकर्णीदेखील होता. सुमारे ३५ वर्षांपूर्वी दुष्काळात रखमाजी व अंताजी उंडे पणदरकर यांची कोल्हाळ येथील कुलकर्ण व ज्योतिषवृत्ती २० होनास तिमाजीने विकत घेतली. कारण दुष्काळामुळे उंडे बंधू अन्नपाण्याविना मरणासन्न झाले होते. त्यामुळे गावचे पाटील लुखोजी यांच्या सल्ल्यावरून स्वेच्छेने उंडे बंधूंनी २० होनास आपले कुलकर्णपद तिमाजीस विकले!
साधारणत: ३५ वर्षांनी उंडे बंधू मृत्यू पावल्यावर रखमाजी उंडेंचे पुत्र विसाजी व रामाजी १६५५ साली संभाजी मोहिते मामांच्याकडे जाऊन त्यांना १ घोडी व १७४ रुपये लाच देऊन, मौजे कोल्हाळ येथील कुलकर्ण वतन तिमाजीकडून परत देववण्यासाठी; म्हाताच्या चिमाजीस चामडी लोळेपर्यंत मारवला... मोहिते मामांनी तर तिमाजीची पाठ अक्षरश: सोलून काढली. आणि जबरदस्तीने कुलकर्ण वतन हिसकावून घेतले... पुढे हा तिमाजी कर्नाटकात शहाजी राजांकडे गेला... आणि तिमाजीच्या अन्यायाची कहाणी ऐकून सुपे परगण्याच्या देशमुखांना ७ डिसेंबर १६५५ रोजी पत्र पाठवून न्यायमनसुभा करण्याची आज्ञा केली! सदर पत्र घेऊन तिमाजी परतला असता तोवर शिवाजी महाराजांनी संभाजी मोहितेंना अटक करून उचलबांगडी केल्याचे त्याला समजले. त्यानंतर तिमाजीने सदर शहाजीराजांचे पत्र शिवाजी महराजांना दाखवले...
शिवरायांनीही २८ सप्टेंबर १६५७ रोजी गोतसभा बोलावली आणि या गोतसभेत उंडे बंधूंसह तिमाजीस बोलावून, शिवरायांनी आणि गोतसभेने सर्वांचे म्हणणे ऐकून शिवाजी महाराजांनी स्पष्ट निर्णय दिला की “३५ वर्षांपूर्वी जर तिमाजी खंडेरायाने २० होन दिले नसते तर तुमचे कुटुंब दुष्काळातून वाचले नसते... यावर बोभाटा न करणे... अशा प्रकारे महाराजांनी तिमाजीस न्याय मिळवून दिला. तिमाजी प्रकरणावरून मोहितेमामांच्या कारभारावर जसा प्रकाश पडतो तसाच शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्वही निखालसपणे डोळ्यासमोर येते! अन्यायाची चीड, डोळस व्यवहारी धोरण. दुर्जनांना जरब बसेल असे व्यक्तिमत्त्व राजांनी स्वराज्यात निर्माण केले होते!

सरसेनापती_खंडेराव_दाभाडे

 

दाभाडे घराण्याचा मूळ पुरूष बजाजीराव दाभाडे. त्यांचा मुलगा हे येसाजीराव दाभाडे. येसाजीरावांचा थोरला मुलगा हे हिंदवी स्वराज्याचे “सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे”. येसाजीराव हे “श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज” यांचे विश्वासू अंगरक्षक होते. दाभाडे घराणे हे क्षत्रिय (सूर्यवंशी) असून, गोत्र : शौनल्य व देवक : सूर्यफूल आहे.
स. 1691 च्या अखेर छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीस जाताना खंडेराव त्यांच्या बरोबर होते. यांनी महाराजांना खूप मदत केली. स.1696 च्या सुमारास राजाराम महाराज हे जिंजीस असताना खंडेराव याना तळेगांव दाभाडे जवळील ‘इंदुरी’ गांव इनाम मिळाले व पुढे स.1698 मध्ये जुन्नर प्रांताची सरपाटीलकी मिळाली.
जिंजीहून परत आल्यावर राजाराम महाराज यांनी खंडेरावांना “सेनाधुरंधर” हे पद देऊन गुजरात व बागलाणकडे मुलूखगिरीवर पाठविले आणि वस्त्रे व पोशाख देऊन निशाण आणि जरीपटका हवाली केला. शिवाय पुणे वगैरे प्रांताची तसेच अकोले व जावळे या महालांची सरपाटीलकी व काही प्रांताची सरदेशमुखी दिली.
थोरले शाहू छत्रपती महाराज सुटून आल्यावर खंडेराव हे छत्रपती महाराणी ताराराणी यांचा पक्ष सोडून शाहू महाराज यांच्या पक्षात मिळाले. मध्यंतरी चंद्रसेन जाधव यांनी खंडेराव यांना छत्रपती महाराणी ताराराणी यांचा पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.
शाहू महाराज यांनी खंडेराव यास 11 जानेवारी 1717 ला “सरसेनापती” पद दिले. ते पुढे खंडेरावांच्या घराण्यात कायम झाले. याच वेळी दिल्लीच्या बादशाहने दख्खनचा सुभेदार सय्यद बंधूंपैकी हुसेनअलीच्या विरुद्ध उठण्यास शाहू महाराज यास कळविले असता, शाहू महाराज यांनी ते काम खंडेरावांवर सोपविले. खंडेरावांनी खानदेश – गुजरातवर स्वार्या करून हुसेनचा रस्ता अडविला. तेव्हा हुसेनने फौज पाठविली, ती सुद्धा खंडेरावांनी अडचणीत गाठून कापून काढली.
पुढे हुसेनने परत मोठी फौज पाठविली म्हणून खंडेरावांनी, सुलतानजी निंबाळकर व दावलजी सोमवंशी यांच्या मदतीने मोगलांचा पुरता मोड केला (24 एप्रिल 1717). यानंतर शाहू महाराज यांनी गुजरात व काठेवाडकडे मराठ्यांचा अंमल बसवावा, असा हूकुम केला व अशा आशयाचे एक पत्र पाठिवले :
“दरमहा हुजूर खर्चास ऐवज देत जावा. थोरले महाराज धान्य व नक्त, श्रावणमासी धर्मदाय देत असत. तो सेनापती यांनी आपल्या तालुकापेकी, होन चार लाख रूपये खर्च करून, कोटी लिंगे ब्राह्मणांकडून करवीत जावी.”
बाळाजी विश्वनाथाने जी सरंजामी पध्दत निर्माण केली (स.1719) तीत खंडेरावास खानदेश देऊन गुजरात काबीज केल्यास तीही जहागिरी देऊन टाकू म्हणून आश्वासन दिले.
सय्यदांचा हस्तक अमलअली व निजाम यांच्यात स.1720 मध्ये बाळापूरची लढाई झाली तीत सैय्यदच्या विनंतीवरून खंडेरावास लढण्यासाठी म्हणून शाहू महाराज यांनी पाठिवले होते. त्यानंतर फत्तेसिंग भोसलेंच्या आधिपत्याखाली कर्नाटकात (स. 1725-26) झालेल्या स्वारीत खंडेराव हजर होते.
खंडेरावांनी वसई ते सूरतपर्यंतचे कोकण काबीज केले होते. तेव्हा शाहू महाराजांनी उद्गार काढले. “बडे सरदार मातबर, कामगिरी हुषार होते” असा उल्लेख आहे.
छत्रपती शाहू महाराज यांची मर्जी खंडेरावांवर खूप होती कारण एकदा खंडेराव पोटशूळाने आजारी असताना शाहू महाराजांनी खंडेरावांचा समाचार मुद्दाम घेतला. थोरल्या बाजीरावांच्या वेळेस खंडेराव वयोवृद्ध झाले होते. अखेर स. 27 सप्टेंबर 1729 ला मुतखड्याच्या विकाराने खंडेराव तळेगांव दाभाडे येथे मरण पावले. तळेगांव दाभाडे गावात खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे.
इतिहासप्रसिद्ध ‘सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे’ ह्या खंडेरावांच्या पत्नी होत. खंडेरावांना तीन पुत्र होते. (त्रिंबकराव, यशवंतराव व सवाई बाबूराव). त्रिंबकराव हे सुद्धा वडिलांसारखे शूर होते.
मराठाशाहीतील आपत् प्रसंगी जी नररत्ने महाराष्ट्रात चमकली त्यात खंडेराव दाभाडे यांची प्रामुख्याने गणना करण्यास हरकत नाही. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, परशराम त्र्यंबक यांच्यापेक्षा राजाराम महाराजांनी खंडेराव यांना जास्त उत्पन्न दिले. न जाणे खंडेरावांची कामगिरी सर्वांपेक्षा जास्त किमतीची असेल. तीनशे पंचाण्णव गावांची सरपाटीलकी म्हणजे जवळजवळ सातशे गावांची देशमुखी खंडेरावांस मिळाली असल्यामुळे खंडेराव हे सर्व वतनदारांचे मुकुटमणी ठरतात. भरीव कामगिरीवाचून असली भरीव देणगी मिळणे शक्य नाही.
– सरदार सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे
(राजेसाहेब – तळेगांव दाभाडे).

Saturday 23 September 2023

रघूनाथ हरी नेवाळकर

 


रघूनाथ हरी नेवाळकर
नेवाळकर यांचेही मूळ महाराष्ट्राच्या रत्नागिरीचेच. पेशवा बाळाजी रावच्या वेळेस नेवाळकर घराण्यात हरि राव होते. त्याला तीन मुलं झाली. त्यापैकी रघुनाथराव सर्वात मोठा, त्याचे दोन भाऊ लक्ष्मणराव आणि शिवराव असे. रघुनाथरावला उत्तरेत झाशीमध्ये मराठी राज्याची सेवा करण्यास पाठविले होते. ते श्रीनाथ महादजी शिन्दे, महायोद्धा यांचेही विश्वस्त झाले. ई. सन १७९६ मध्ये रघुनाथरावांना तब्येतीमुळे राज्याचा सर्वाधिकार आपल्या सर्वात धाकट्या भावाकडे दिला. त्यानंतर झाशीचे राजकाज शिवराव हरि बघू लागला. इंग्रजांनी त्याला पेशवे आणि शिन्दे यांच्या प्रभावातून काढून आपले मित्र बनविले. नेवाळकर तेव्हापासून इंग्रजांच्या सांगण्यावरून झाशीचा कारभार पाहू लागले.
शिवरावला तीन मुलं झाली, मोठा मुलगा कृष्णाजी, मधला रघुनाथ (द्वितीय) आणि धाकटा गंगाधर. शिवराव हयातीत असता त्याचा मोठा मुलगा कृष्णाजी वारला. कृष्णाजीला रामचन्द्र नावाचा मुलगा होता. तो लहान होता पण कृष्णाजीच्यानंतर शिवराव ला झाशीच्या राज्यकारभारत रूची उरली नाही त्यामुळे तो बिठूरला गेला आणि तिकडेच वास्तव्य केले. सन १८२५ मध्ये बुन्देलखंडात नानापंत म्हणून फार मोठा क्रान्तिकारी झाला. त्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.
नानापंतला इंग्रज कधीच पकडू शकले नसते. जर झाशीच्या रामचन्द्रराव नेवाळकरांनी इंग्रजांची मदत केली नसती. गवर्नर जनरल विलियम बेंटिक याविषयी लिहितो, ” If the army of Jhansi had not helped us, our victory was impossible ” १८३२ मध्ये विलियम बेंटिकनी झाशीच्या रामचन्द्रराव नेवाळकरला “महाराज” पद दिले । १८३५ मध्ये रामचन्द्र नेवाळकरांना देवाज्ञा झाली, त्यावेळेस त्याचा दत्तकपुत्र कृष्णाजी (द्वितीय) ला गादीवर बसविले. पण त्याच वेळेस शिवरावच्या मधल्या मुलाने म्हणजे रघुनाथ (द्वितीय) ने विरोध केला. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रघुनाथराव (द्वितीय)ला नेवाळकर घराण्याचे प्रमुख बनविले आणि त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. काही वर्षानंतर रघुनाथ द्वितीय पण वारला. आता गादीवर कोणाला बसवायचे हा प्रश्न उभा राहिला. कृष्णाजी द्वितीयने पुन्हा आपली गादी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केला. पण तो गादीवर बसू शकला नाही कारण शिवरावच्या धाकट्या मुलाला म्हणजे गंगाधर रावला नेवाळकर घराण्याचे प्रमुख बनविले गेले आणि त्यांना गादीवर बसविण्यात आले. गंगाधररावांबरोबर मणिकर्णिका तांबेचे लग्न झाले आणि तिचे नाव लक्ष्मीबाई नेवाळकर झाले……

झाशीच्या राणीला स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारी धनगर राणी भीमाबाई होळकर

 


झाशीच्या राणीला स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारी धनगर राणी भीमाबाई होळकर
झाशीच्या राणीला स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारी धनगर राणी भीमाबाई होळकर असल्या तरी इंदौरमध्ये इंग्रज सैन्याची छावणी भीमाबाईने पडू दिली नाही. भीमाबाईच्या शौर्य पराक्रमाची किर्ती भारतभर झाली आणि १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात पाठीवर मुल बांधून रणांगणात उतरण्याची प्रेरणा झाशीची राणी लक्ष्मीबाईला भीमाबाईकडून मिळाली.
भीमाबाईंचा जन्म १७ सप्टेंबर १७९५ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खून केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला की नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ ऑक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करून शिंदे व पेशव्यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर झाली.
तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षणाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. ब्रिटिश विदुषी मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घटना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वतः शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोणी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करून महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरून रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.
भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरू केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अस्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या.
इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे.
त्यांनी इंग्रजी तळांना अचानक हल्ले करून लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करून घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पडला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले.
भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे २८ नोव्हेंबर १८५८ मध्ये भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले.
स्त्रोत :

भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर… भाग ३

 


भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर…
भाग ३
1804 च्या सुरुवातीला कर्नल fawcett ला बुंदेलखंडात हरवले.नंतर कर्नल मांसोन आणि लेऊकें ला बुंदी आणि कोटा मध्ये हरवले.
1804 मध्य ब्रिटिशनी शाह आलम 2 ला देखील कैदेत ठेवले त्यावर हल्ला करून बादशहा ला सोडवले.नंतर मेजर फ्राझेर ला यशेत राव नि हरवले.टेंव mason या ब्रिटिश योद्ध पळून गेला फरुखाबाद येथे यशवंतरावा आणि लेक, मानसीओन ,कर्नल मरे ,कर्नल दोन, जनेरल स्मिथ,कर्नल जेटलांड,जनेरल जॉन, सेटन यांच्यात तीन महिने युद्ध चालले .या युद्धाने पूर्ण भारत मध्ये यशेत राव चे कौतुक झाले त्यात एक वेळी तर यशवंतराव नि 300 ब्रिटिश सैनिकांचे नाक कापले.पण इंग्रजनी एक खेळी खेळली त्यांनी होळकर समाजाच्या तुकडे करून जो इंग्रजांना मदत करेल त्याला देण्याचे जाहीर केले.मीर पंढरी नि भवानी शंकर ने होळकर ची साथ सोडून इंग्रजांना सामील झाले.आमिर खान ला टोंक ची जहागीरदार दिल्ली तर भवानी शंकर ला दिल्ली चा काही भाग दिला…आज पण भवानी शंकर च्या दिल्ली मधील हवेली ला नमक हराम की हवेली असे ओळखतात .सररॉबर्ट लिहितात की होळकर हे युद्ध जिंकत असताना अचानकपणे जाट राजा रंजितसिंग ने इंग्रजांशी करार केला त्यामयले होलकर तिथून निघून गेले
होते.यशेतरावणी ऍक्टरोनी आणि बेरने यावर हल्ला केला.
त्यांच्या मागणीला – दोआब आणि बुंदेलखंडमधील प्रदेश द्यावा यास – ब्रिटिशांनी नकार दिला तेव्हा होळकरांच्या सैन्याने पुष्कर आणि अजमीर (अजमेर) लुटले. तसेच यशवंतरावांनी आपल्या सैन्यातील तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना( व्हिकर्स, डॉड व रियन) कंठस्नान घातले (१८०४). ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव केला. यशवंतरावांनी गनिमी युद्धतंत्राने इंग्रजांना हैराण केले. त्यांच्याकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. त्यांचा सेनापती हरनाथ सिंग याने दिल्लीवर हल्ला केला. ). त्यानुसार त्यांस बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश व टोंक, रामपुरा व इंदूर मिळाले. स्थिरस्थावर झाल्यावर यशवंत-रावांनी सैन्यात सुधारणा करून निरुपयोगी फौज काढून टाकली. बाणपुरा येथे तोफा ओतविण्याचा कारखाना काढला (१८०७).1806 मध्ये खंडेराव(द्वितुय)आणि काशीराव होळकर चे 1808 मधील निधन, सततचे युद्ध, अपेक्षा-भंग, तापट स्वभाव यांमुळे यशवंतरवांचा ब्रेन स्ट्रोक झाला. या व्याधीतच भानपुरा येथे त्यांचे निधन झाले. त्या काळात (१८०९–११) त्यांची उपस्त्री तुळसाबाई हीच सर्व राज्य चालवीत असे मात्र राज्य-कारभारात अनागोंदी माजली तेव्हा तिने यशवंतरावाचा औरस पुत्र तिसरे मल्हारराव (कार. १८११–३३) यांच्या नावे राज्य केले.
तळ टिपा:
1]त्याशिवाय ब्रिटिशांची अनेक पत्र आहेत
2]मराठी मध्ये ना स इनामदार यांनी त्यांच्या जीवनानावर झुंज आणि संजय सोनवणी यांनी पण सुंदर कादंबरी लिहली आहे

भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर… भाग २

 


भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर…
भाग २
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले.
पण मराठ्या आणि पेशवाई मधील कर्तृत्वान पुरुष म्हणजे शिवाजी महाराज ,संभाजी महाराज, पहिला बाजीराव ,माधवराव, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस कडे पहाताना आपण या होळकर च्या महान योद्धकडे दुर्लक्ष केले आहे यात वाद नाही.
यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ साली झाला.यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. .यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव भांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर (१४ सप्टेंबर १७९७) यशवंतराव व विठोजी हे पुण्यातून उत्तरेकडे पळून गेले. दुसरे मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.याशवंतरे हे क्रूर, धाडसी व शूर होते. त्यांस दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता.पण त्यांची ही समृद्धी काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होती. गवाल्हेर चे शासक त्यावेळी दौलतराव शिंदे हे देखील होते. होळकर साम्राज्याची ही समृद्धी त्यांना बघवत नव्हती.

भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर… भाग १

 


भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर…
भाग १
भारताचा नेपोलियन म्हणून ज्याकडे पाहतात ते म्हणजे यशवंतराव होळकर…1803 पासून 18 युद्धात त्यांनी इंग्रजांना सतत परभुतच केले.रियासतकारांच्या मते मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले, भले ते विक्षिप्त, धाडसी आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध असले तरी.यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन.
दौलतराव शिंदे आणि दुसरे बाजीराव यांनी मिळून यशवंतराव चे सख्खे भाऊ विठोजी होळकर यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. विठोजीच्या हत्येची बातमी यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला. बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव पुण्यावर चालून आले. दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या लढायांत शिंदेव पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि मराठ्यांची राजधानी पुणे लुटली. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले.दुसऱ्या बाजीराव नें केलेली चुकीचे फळे आपण आजपण भोगत आहोत .त्यांनी 1803 नंतर एकही लढाई आपल्या माणसांच्या विरुद्ध लढली नाही

भारतीय इतिहासातील एक झंझावती व्यक्तिमत्त्व यशवंतराव होळकर

 


भारतीय इतिहासातील एक झंझावती व्यक्तिमत्त्व यशवंतराव होळकर
भारतीय इतिहासात होवून गेलेले एक झंझावाती व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव होळकर. पेशव्यांनी जप्त केलेले आणि दौलतराव शिंदेंनी बळकावलेले होळकरांचे राज्य महाराजा यशवंतराव होळकर यांनी अनेक लढाया करीत डिसेंबर 1798 मध्ये जिंकून घेतले आणि त्यानंतर पुढे काही दिवसात म्हणजे 6 जानेवारी 1799 रोजी यशवंतरावांनी आपला वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतला. रविवारी (ता. 6 जानेवारी) या घटनेला 220 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला आहे इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी….
यशवंतराव होळकरांचा (3-12-1776 ते 28-10-1811) जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा, साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सैन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटणींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी शिंदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण शिंद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला इंदुरी गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
यशवंतरावांत एक अद्भुत चैतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मैदानात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यांनी 1803 नंतर ज्याही लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशीयांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे. यशवंतराव हिंदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्य धर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजेरजवाड्यांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबार्इंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.
यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी 6 जानेवारी 1799 मध्ये करवून घेतलेला वैदिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.
यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गव्हर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणा-या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. 1797 ते 1811 असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. 1797 ते 1803 हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावा लागला. 1803 पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध सर्वंकष अथक लढा उभारला आणि बलाढ्य इंग्रज सेनांना एकामागून एक 18 युद्धांत पराजित केले. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कोलकात्यावर आक्रमण करून एकट्याच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते,
कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही हे आपले दुर्भाग्य आहे. खर तर आपण भारतीयांनी त्यांच्या वीरश्रीचे, स्वातंत्र्यप्रेमाचे पोवाडे मुक्तकंठाने गाऊ शकलो तर ती या महान स्वातंत्र्ययोद्ध्याला खरी आदरांजली असेल.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...