मराठा वीर रायाजी शेलार
भाग १
लेखक - संदीप किसन शेलार
नवलाई प्रतिष्ठान खावली
*********************
तप्त सूर्याच्या ज्वाळा अंगाची लाही- लाही करत
होत्या. अशात केंजळगडावरचे पहारेकरी डोक्याचा घाम टिपत- टीपत येरझाऱ्या घालत होते. येवढयात
एक पहारेकरी दुसऱ्याला म्हणाला "आर ये हरबा
त्यो कोण हाय रं बिगीनं धापा टाकत गडावर येतोया "
"व्हय रं कोण म्हणावं एढूळा इतक्या तावा -तावाण गडाकड येतोया, "
"मताजी लेका, त्यो माचीचा जानोजी वाडकर तर नव्ह?"
" नव्ह ! त्यो गडी लय धिप्पाट आन ह्यो तर अंगाकाठीन पाप्याच -पितर दिसतोया "
" मग हरबा, गडकऱ्यासनी वर्दी देऊ का? "
"नग, नग आताच नग ! काय भानगड हाय ते पहिलं बघू "
इतक्यात ती व्यक्ती गडाच्या पाहिऱ्या चढून पहारेकऱ्याजवळ धापा टाकत आली आणि
म्हणून लागली.
"गडकरी, गडकरी कुठं हायती मला त्यासंनी तातडीने भेटायचा हाय "
मधीच हरबा म्हणाला " आर हो !हो जरा उसासा घे,
हे पाणी पिऊन घे, एवढ्या उन्हात गड चढून आलासा जीवबीव जाईल, जरा दमान घे की "
इतक्यात ती व्यक्ति तोंडाला पाण्याची आखी घागर लावत बोलू लागली " तसा पण आता समदयांचा जीव जाणार हाय लेकांनू , बिगीनं बोलवा गडकऱ्यासनी, येळ नाय आपल्याकड ती गोरी माकड निघाली
हायती "
"हरबाने मताजीस इशारा केला. तसाच मताजी गडकऱ्यास बोलवून आणण्यास निघून गेला "
हरबा म्हणूं लागला "आता हाय का? जरा उमजल
अस बोला की राव, तुमचं असं हे कोड्यात बोलणं काय भी समजत न्हाय, हे घ्या आलच गडकरी "
ताच पहारेकरी आन ती व्यक्ती झुकून मुजरा घालू लागलं. गडकरी उदगारल,
" आपण कोण म्हणायच आणि एवढया घाईन बोलवलं "
ती व्यक्ति म्हणाली "आपणच गडकरी 'रायाजी शेलार' नव्ह "
" व्हय म्याच ! "
" म्या चांदजी हाय ! श्रीमंत छ्त्रपती प्रतापसिहं महाराजांचा सेवक, त्यांनी मुलूखातील सर्व गडकऱ्यांना सांगावा धाडला हाय, प्रसंग जोखमीचा गुदरला राव, सातारा गोऱ्या साहेबांच्या हाती लागला , पुण्यातून नुकतीच खबर मिळाली , बाळाजी पंत नातू या हरामखोरांन शनिवारवाड्यावर गोऱ्याचा युनियन
जॅक फडकवला हाय, मराठशाही डुबली व्ह !
पेशवा बाजीराव दुसरा 'पुण ' सोडून रानी-वनी भटकतो हाय. छत्रपती प्रतापसिहं महाराजांवर गोऱ्यांचा सक्त्त पहारा हाय. गोऱ्या ' डफ ' साहेबाची महाराजांवर करडी नजर हाय. म्या कसाबसा निसटलो. आणि ह्यो असा केंजळगड जवळ केला."
''बरं चांदजी हे एक बेस केलंस बघ, पण महाराजांचा
मनसुबा तरी काय हाय? "
" मनसुबा? मनसुबा जीवात जीव हाय आन गडावर रसद हाय तोवर परतिक गड अन गड झुंजवायचा हाय
हिच प्रतापसिंह महाराजांची गडकऱ्यासनी आज्ञा हाय"
"बरं - बरं चांदजी, उमगलं सर्व आम्हांसनी, परसंग लयच जोखमीचा हाय र "
गडकरी रायाजी शेलारांनी हरबा आन मताजी यांना आज्ञा दिली.
" हरबा गडावरच्या सर्व मावळ्यांना गोळा कर. येळ लय कमी हाय, जा बिगीनं, मताजी जा तू धान्यकोठार बघून अंदाज घे किती पायल्या धान्य शिल्लक हाय त्याचा मागपूस घे "
'कोण हाय र तिकडं ' मध्ये गडकरी रायाजी उदगारलं.
''व्हय म्या हाय सिदोजी नाईक चिकणा "
"कोण सिदोजी काका तुम्ही व्हय, बरं हिकडं या सांज झाली हाय, केंजळाईच्या राऊळात जाऊन दिवाबत्ती करा "
"व्हय धनी "
एव्हाना खबर घेऊन आलेला चांदजी पायाच अवसान गळल्यागत तीतच घुटमळत राहिला . न राहून गडकऱ्यांनी त्यासनी इचारलं "चांदजीराव काय भानगड हाय, तुम्ही अस्वस्थ कशा पाय दिसताय "
"काय सांगू रायाजीराव, काय अवदसा आठवली पेशव्यासनी त्या गोऱ्या माकडांची तैनाती फौज घेतली आणि मराठशाहीला उतरती कळा लागली आज आपल्याच मुलखात हे इंग्रज आपलं गडकोट
जिकंत चालल्यात आणि आपण अस हातावर हात ठेवून बसलो हाय. पेशवे, शिंदे , होळकर, पवार, भोसले, विंचूरकर, पुरंदऱ्यासारखे मातबर सरदार असून ही मराठाशाहीचा अंत होईल अस वाटलं नव्हतं. तो पेशव्यांचा हुजऱ्या 'त्रिंबकजी डेंगळे' याला कळल ते या मातबर सरदारांसनी कळलं नाही बघा. नाना फडणवीस होत तोवर कुणाची टाप नव्हती मराठयांच्या कारभारात नाक खुपसण्याची पण सत्ता दुसऱ्या बाजीरावांकडे गेली आणि संपल सार, छत्रपती प्रतापसिंग आणि पेशवा दुसरा बाजीरावामध्ये मनभेद आलं आणि इंग्रजांनी उचल खाली, तो गोरा 'डफ ' साहेब माणूस वावगा नाय, महाराजांसनी नेहमी चांगलाच सल्ला देतोया, प्रतापसिंगाच आण त्याच संबंध आपलूकीच हायती, पण परका तो परकाच म्हणा की "
" व्हय अगदी खरं बोलास बघ चांदजी, आपण पडलो
चाकर माणसं आपल्याला काय भी हे राजकाराणांतल कळतं नाय बघ, धन्याची नेकीन चाकरी करणं एवढच ठाव हाय आम्हा शेलारांस, माझा खापर पंजा नवलोजीबाबांन अफजलखानाच्या वेळी पराक्रम गाजवला अन शिवाजी राजांनी जातीने त्यांना नावाजलं, त्यां नंतर माझा पंजा राणोजी शेलार संभाजी महाराजांच्या या खांद्याला खांदा लावून लढल, पुढ संताजी बरोबर मराठ्यांशाहीला जिवंत ठेवण्यात सारी हयात घालवली, माझ्या बापालाच म्हणजे राघोजीलाच काय ते शौर्य गाजवण्याची संधी कधी मिळाली नाय बघ, आता 'आई नवलाई' च्या कृपेनें ती संधी मला मिळाली हाय आण त्याच सोन केल्या बिगार हा 'रायाजी ' स्वस्थ बसणार नाही, हा ' 'केंजळगड ' सहजासहजी गोऱ्या माकडांच्या हाती जाऊन देणार नाही "
इतक्यात 'मताजी' धापा टाकत आला आन म्हणून लागला " गडकरी सात दिस पुरलं इतका धान्यसाठा हाय कोठारात आता कस करायचं? "
"सात दिस, बरं लय झालं, पण अगदी सहज गड ताब्यात द्यायचा नाही, आर ये कोण हाय तिकडं "
"जी म्या हाय गणोजी सणस "
"आर गणोजी, तुझा बा कृष्णाजी सणस कुठं हाय "
"जी धनी दोन दिस झालं खाली गावात रेनावळ्याला गेलं हायती आज येत्याल "
"बरं ठीक हाय, जसं येतील तस माजी गाठ घ्यायला सांग त्यासनी " गणोजीने मान डोलवली आणि तो निघून गेला.
"चांदजी यां सर्व हालचाली न्याहाळू लागला आणि न राहून म्हणाला गडकरी अवघ सात दिवस गड तग धरू शकतो एवढाच धान्यसाठा हाय तुमच्याकड तरी ही निवांत "
लेखक - संदीप किसन शेलार