विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label पन्हाळगड ते विशाळगड. Show all posts
Showing posts with label पन्हाळगड ते विशाळगड. Show all posts

Wednesday, 20 May 2020

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_आठवा

पन्हाळगड ते विशाळगड

#रक्तरंजित_रणसंग्राम :-
रात्रीचा दुसरा प्रहर, काळोखी रात्र, घनदाट
वनराई, मिट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर अन सोबत
पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. वाटा निसरड्या
झालेल्या होत्या. नाईकांच्या हेरांनी आधीच निश्चित
केलेल्या वाटेवरून मार्गक्रमण चालू होते. ठीक ठिकाणी
आधीच हेर पेरून ठेवलेले होते. शिवाय, ठरवलेल्या ।
वाटेवर थांबलेले मावळे हातात मशाली घेऊन उभे होते.
जसे बाजी अन त्यांचे सोबती येताना दिसतील तेव्हाच
मशाली पेटवायचे अन सगळे त्या वाटेवरून गेले की
लगेच विझवून टाकायचे. त्यामुळे गडाखाली असलेल्या
शत्रूच्या पाहरेकऱ्यांना कशाची चाहूल लागायला नको.
हेरांनी आणलेल्या खबरीनुसार सिद्दी मसूद हा खिंडीच्या बाजूने छावणी मध्ये तळ ठोकून होता, त्याच बाजूने हल्ला करायचं नक्की झालं होतं. तो दिवस होता पळण्याचा अन
आज होता पळवण्याचा. त्या दिवशी बाजी मसुदला
पाठीवर घेऊन पळत होते, आज मात्र छातीवर घेणार
होते. छावणी मधे ठीक ठिकाणी पडलेल्या डेऱ्यांच्या
आजूबाजूला ठेवलेल्या मशालींच्या ज्वाळा आता
दृष्टिपथात येऊ लागल्या होत्या.
इशारा होताच मावळ्यांनी एकाच वेळी जोरजोरात
कर्णे फुकायला सुरुवात केली. त्यातच 'हर हर महादेव'
अन 'जय भवानी' चा जयघोषही घुमू लागला. अचानक
कर्त्यांच्या अन अन आरोळ्यांच्या आवाजाने शत्रू सैन्य
भयभीत झालं. अन त्याच वेळी मावळ्यांनी हल्लाबोल
केला. समोर येणारे पांढऱ्या कपड्यांतील मावळे म्हणजे
जंगली भुतचं भासत होती. मावळ्यांचा आवेश एवढा
जबरदस्त होत कि, तिथं पडलेला तळ पूर्णपणे उध्वस्त
झाला.
"शैतान आये..शैतान आये..." ।
"मरहट्टे आये.. मरहट्टे आये .."
"भागो... भागो...", म्हणत आदिलशाही सैन्य वाट
फुटे तिकडं सैरावैरा धावू लागलं. काही तर मागच्या
मागे जंगलात पळत सुटले. बाजी अन काही निवडक
मावळे सिद्दी मसूदच्या डेऱ्याकडे सरकत होते. तोपर्यंत
सगळीकडे बोभाटा झाला होता. सिद्दी मसूद झोपेतून
कसाबसा जागा झाला.
"या अल्ला ... चैन से सोने भी नहीं देते ये मरहट्टे ।"
अन हुजऱ्यावर ओरडला, "जाओ.... बाकी सैनिकोंको
आगा कर दो । और वो दळवी और सुर्वे सरदारोंको भी
जल्दी से जगाव । जा ssss व ।"
डेऱ्या बाहेर घोडा तयार होता. घाई घाईत मसूद बाहेर
पडला. हळू हळू आदिलशाही सैन्य जमा होऊ लागलं.
सिद्दी मसूदचा डेरा जवळ येऊ लागला होता.
बाजींनी दोन्ही हातात तलवार पेलली होती. समोर जर
चुकून एखादा गनीम आलाच तर बाजींच्या ताकतवर
वाराने जागीच कापला जात होता. तोच डेऱ्याच्या
बाहेर सिद्दी मसूद घोड्यावर चढताना बाजींच्या नजरेस
पडला.
बाजींनी "हर हर महादेव" म्हणत त्याच्या दिशेने धाव
घेतली. मावळेही बाजींच्या साथीनं पळत होते. एवढ्या
वेळात शत्रूच्या पलीकडच्या छावणीत असलेल्या
सैनिकांना खबर पोहोचली होती. सैन्य गोळा होऊ
लागलं होतं. काही क्षणांत बाजींनी मसूदला गाठलं.
"आ ही गये ये मरहट्टे । जलद से जल्द सैनिक भेजो
जाओ।" मसूद आजूबाजूला जमलेल्या सैन्यावर ओरडू
लागला.
"आरं... बगताय काय? हाणा.. मारा ...", बाजींनी
आरोळी ठोकली.
मसूद बरोबरच्या तुकडीची अन बाजींच्या पथकाची
गाठ पडली. हाणा मारी चालू झाली. मसूद घोड्यावरून
तलवार फिरवत होता. तर बाजींसमोर येणारा सपासप
कापला जात होता. ज्यांनी ज्यांनी खिंडीत बाजींचा रुद्रावतार पहिला होता ते तर "शैतान आया.. शैतान
आया.. " म्हणत, दूर पळू लागले. . आता सिद्दी मसूद
अन बाजी समोर समोर होते. मसूदचा घोडा कधीच
गारद झाला होता. एका हातात ढाल अन दुसऱ्या हाती
तलवार घेऊन मसूद बाजींसमोर उभा ठाकला होता.
पहिला वार बाजींनी केला. वार एवढा जबरदस्त होता
कि, मसूद एक दोन पावलं मागेच सरकला.
"काफर कि *** | जैसे तेरे भाई तो जहन्नुम ने भेजा था
। वैसे, तू भी जायेगा।"
"आरं जा रं कुत्रीच्या... आज तर तुला जित्ताच
सोडत न्हाय. यमच दावतु तुला.."
खण खण आवाज घुमू लागले. मसुदही बाजींच्या
वाराला प्रत्युत्तर देत होता. बाजींचा दुसरा वार ढालीवर
झेलत होता. पण बाजींसमोर मसूदच्या निभाव लागेना.
बाजींच्या एका एका वारसरशी मसूद मागे मागे हटत
होता. पलीकडे "दीन दीन" म्हणत मसूदचे पलीकडच्या
छावणीतले सैन्य जमा होऊ लागलं होत. मसूद हसत
हसत बाजींचे वार झेलत होता. तोच एका ताकतवर
वाराने मसूदची तलवार खाली पडली. अन दुसरा वार
मसूदच्या छाताडावरच झाला. .
"या अल्ला ssss", म्हणत सिद्दी मसूद मागे कोसळला.
मागच्या मागे मसूदला त्याच्या सैन्याने पकडलं अन
दूर घेऊन जाऊ लागले. तोच शे दोनशे शत्रू सैन्य
मावळ्यांच्या सामोरं आलं. तुंबळ लढाई चालू झाली.
बाजींसोबत फक्त पन्नास साठ मावळा होता. बाजी
आज पुन्हा एकदा गरगर तलवार फिरवत होते. जखमी
मसूदला घोड्यावर टाकून दुसऱ्या छावणीकडे नेण्यात
आलं.
बाजी तलवारी फिरवतच होते. सामोरा येणारा गनीम जखमी होऊन पडत होता.
'आज पळणे नाही. जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटने
नाही.'
तोच एक मावळा बाजींच्या जवळ येऊन म्हणाला,
"बाजी, गनीम लय हाय. आणि समोरून आणखी
येत्यात. चला बाजी.. चला.."
पण बाजी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज
पुन्हा एकदा रुद्र संचारला होता अंगात. लढता लढता
बाजी शत्रूच्या गराड्यात जाऊन पोहोचले. त्यांच्यात
अन मावळ्यांच्यात अंतर पडू लागलं. शत्रूची संख्या
वाढू लागली. बरेचसे मावळे धारातीर्थी पडले होते. उरलेले पंचवीस तीस कसे बसे अंतःकरणाच्या प्राण पणाला लावून लढत होते. बाजी माघार घ्यायला तयार नव्हते. एव्हाना आता बाजींना माघारी परतणं अशक्य झालं होतं. आजूबाजूला सारा आदिलशाही सेनासागर जमला होता. फिरवून फिरवून तरी किती वेळ तलवार फिरवणार? बाजींच्या हालचाली मंद होऊ लागल्या. कुणी संधीचा फायदा घ्यायचं, अन सपकन
बाजींच्या पाठीत वार करायचं. जखमी झालेलं अन
दमलेलं शरीरं पेलणं आता बाजींना शक्य होईना.
तलवारीच्या वारासह बाजी भेलकांडू लागले. संधी
मिळताच बाजींवर वार होत होते.
"मारो.. काटो... काफर कि ***.. " गोंधळ चालू होता.
महादरवाजाकडे तोंड करत बाजींनी गुडघे टेकले.
"राज...
माफ करा या बाजीला...
पर जातु आता...
आमची येळ भरली राजं...
दादा बी वाट बगत आसलं आता...
आमच्या हातानं एवढीच स्वराज्याची सेवा झाली...
पर तुमी हाय ना राजं...
सांभाळा स्वराज्य..."
महादरवाजाच्या बुरुजाकडे बघत बाजी म्हणाले,
"राजं... ह्यो बाजीचा शेवटचा मुजरा.'
तलवार खाली पडली. डोळे मिटले, अश्रू चिखलात मिसळून गेले. उजवा हात कपाळाला टेकला. राजांना मुजरा झाला. तोच समोरून एक गनीम ओरडत तलवार उगारत बाजींवर धावला. दुसऱ्या क्षणी बाजींची डाव्या हातातली तलवार सपकन घुमली. समोरच्या हशमाचं मुंडकं उंच उडालं. एवढा वेळ आजूबाजूला चाललेला गोंधळ अचानक थांबला.
तलवार पडली... श्वास थंडावला... देह कोसळला...
बाजीप्रभू देशपांडे नावाचं वादळ आखेर शांत झालं.
बाजीं रक्ताच्या थारोळ्यात पडले. अन् बाजीचा श्वास थंडावला... आखेरच्या श्वास सुटला... माती उचं उडाली... उडालेली माती गजापूरची खिंड पावन करीत विलीन झाली.
बाजींच्या रक्तान विशाळगडाचा पायथा पावन झाला.
बाजी गेला! फक्त मातीत नाही मेला तर माती साठी मेला...
- समाप्त -
पुढे...
बाजी फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत विधीगत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच,
पन्हाळगडावर बाजीप्रभूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे...
स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या शिवा काशिद, बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्‍यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.
‘रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।’
महत्वपूर्ण :-
बाजीप्रभुंचा जन्म ३०, ऑगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि.पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते.
शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे देशमुख रायाजी वयाने लहान होते. अन् बाजी त्याचे "सरनोबत" होते. परंतु, बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू
व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.
पन्हाळागड ते खेळणागड मोहिमे मध्ये बाजी सह
रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते त्याचे नेतृत्व बाजीप्रभू करत होते.
बाजी व फुलाजी हे दोघे 'बंधू' होते.
सतत २१ तास ६४ किलोमीटर चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने विशाळगड घाटला.
एकूण सात प्रहारांमध्ये राजे विशाळगडाला पोहचले.
एक प्रहर म्हणजे ३ किलो मीटर
ही घटना दिनांक १२ जुलै, १६६० रोजी घडली.
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि
बाजीं फुलाजीसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने गजापूरखिंड पावन झाली
ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात
गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ
म्हणून उभे राहिले.
(माहिती - वाचकांनी नोंद घ्यावी. ही कथा, निनाद
बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू
देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग
काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब
वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती.)
संदर्भ :-
श्रीमानयोगी, पावनखिंड - रणजित देसाई,
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
शिवचरित्र - निनाद बेडेकर
(https://youtu.be/_jEj6YYAOJQ)
शिवराय - नामदेवराव जाधव,
शिवरायांच्या स्फूर्तिकथा - शांताराम कर्णिक
ऐतिहासिक कथा शिवरायांच्या - कादंबरी
शिवभारत ग्रंथ
कथालेखक :-
- ईश्वर आगम
सांभर :-
- नवनाथ येवले
आभार :-
महाराष्ट्रातील गड किल्ले आणि इतिहास पेजमुळे इतिहासाची देवाण-घेवाण होण्यास खूप मोलाची कामगिरी होत आहे. हे अग्निकुंड चिरंतर चालू राहो!
|| महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ||
|| एकच आवाज ||
|| जय जिजाऊ जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||
धन्यवाद!
🙏🚩
टीप :-
इतिहासात काय घडलं हे सागणारी आपली माणसं आपल्यात नाय फक्त गेले ३५० वर्ष मराठ्यांची गाथा उघड्या डोळ्यांनी पाहणार कोण आहे तर तो उंच उंच सह्याद्री, दर्या-कपारी, गडकोट, खिंडी, झाडे-झुडुपे इ. व बखरीतील काही काव्यपागतीना आणि सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन इतिहास रेखाटला गेला जातो. त्यामुळे प्राचीन भूतकाळ वाचताना संवादकाच्या मत्तावर कधी कोणी ठाम राहू नये, आपण पण इतिहास खोलवर वाचत चला त्यामुळे आपल्याला कितपत कळलं त्यावर आपून सर्वांनी भूतकाळ अभिप्राय करावे! पण लढाई असेल हे, ही फक्त गाथा आहे.पन्हाळगड ते विशाळगड

न्हाळगड ते विशाळगड भाग ७ #भाग_सातवा

न्हाळगड ते विशाळगड
भाग ७
#भाग_सातवा :-
#वेदना :-
रात्रीचा पहिला प्रहर. सगळीकडे काळोख पसरला
होता. पाऊसही थांबला होता. गार वारा सुटलेला होता.
गडावर ठीक ठिकाणी असलेल्या मशाली फुरफुरत
होत्या. सतत सात प्रहरांची पळापळ अन लढून दमलेले
मावळे विश्राम गृहांमध्ये आराम घेत होते. राजेही त्यांच्या
दालनात विश्राम करत होते. डोळ्यांची उघडझाप
चालू होती, झोप मात्र येत नव्हती. बाजींच्या दालनात
बाजी आपल्या पलंगावर तक्क्या गिरद्यांना रेलून बसले
होते. पलंगाच्या डावीकडे असलेल्या झरोक्यातून
येणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांच्या दालनातील समयी डुलत
होत्या, एखादी मधूनच विझून जायची अन दुसऱ्या
क्षणी पेट घ्यायची. डोक्यात नाना त-हेचे विचार चालू
होते. फुलाजी अन त्याच्या मावळ्यांची अजूनही काही
खबर नव्हती. मधूनच डोळ्यांच्या कडा अधूंच्या गर्दीनं
भरून जायच्या अन पापण्या मिटल्या कि ते गालांवर
ओघळायचे. थकलेलं शरीर कधी झोपेच्या अधीन झालं
कळलंच नाही.
दिवसाचा दुसरा प्रहर. आकाश ढगाळलेलं होतं.
अजूनही गडावर तुरळक ठिकाणी धुकं पसरलेलं
दिसत होतं. मावळे आळोखेपिळोखे देत हालचाल
करत होते. गडावर असलेल्या तलावाजवळ दहा पंधरा
मोठमोठ्या भांड्यांमध्ये पाणी उकळत होतं. गरमागरम
पाण्यानं अंघोळ करण्यासाठी अन थकलेल्या शरीराला
आराम मिळण्यासाठी मावळ्यांची लगबग चालू होती.
महाद्वाराच्या बुरुंजांवर मावळ्यांची गर्दी दाटली होती.
काहीच वेळात राजे अन बाजीही तिथे पोहोचले.
गडाखाली सिद्दी मसूदने सुर्वे अन दळवी यांच्या
उरलेल्या हजार सैन्यासह गडाला वेढा घातला होता.
यायच्या जायच्या सगळ्या वाटा बंद करून टाकल्या
होत्या. पाच हजारांच्या आसपास शत्रू सेना असेल.
आकाराने विशाल, बेलाग, दुर्गम, आजूबाजूला घनदाट
अरण्य अन दऱ्या खोऱ्यांनी वेढलेल्या अशा अजिंक्य
विशालगडाला वेढा घालणं सोपं नव्हतं. त्यामुळे संपूर्ण
गड वेढणे अशक्यच. तरीही सिद्दी मसुदने चिकाटीने
गडाला मोर्चे लावले होते. राजे, बाजी अन किल्लेदार
तटबंदीवरून शत्रू सैन्याचे ठीक ठिकाणी पडलेले तळ
पाहत होते.
राजे किल्लेदारांना उद्देशून म्हणाले, "गडावरून तोफा
कधी डागल्या आहेत का?"
"न्हाय जी... कवा परसंगच न्हाई आला. आन, तुम्ही
येणार म्हून खबर मिळाली, मंग तर काय सवालच
नव्हता."
राजांनी दिर्घ श्वास घेतला अन, "हम्" म्हणाले.
तटबंदीवरून खाली चाललेली सगळी हालचाल स्पष्ट
दिसत होती. राजांनी एकदा सगळा परिसर नजरेखालून
घातला. सिद्दी मसुदने गडाला टाकलेला वेढा संपूर्णपणे
तोफांच्या टप्प्यात होता.
राजांनी बाजींकडे पाहत विचारले, "बाजी, तुम्हाला काय
वाटतं? उडवावेत काय तोफांचे बार.?"
"व्हय राज, म्या तर म्हणतो एकदमच द्या बत्ती सगळ्या
तोफांना."
राजांनी काही विचार करून "हम्" म्हटलं.
दुसऱ्या दिवशी राजांनी जखम दरबारामध्ये
मावळ्यांचा यथोचित सन्मान केला. सावजीला राजांनी
स्वतः सोन्याचं कडं घातलं. बाजींना मानाची वस्त्र
अन तलवार राजांनी स्वतः बहाल केली. मात्र, बाजी
वेगळ्याच विचारत होते. राजांच्या चाणाक्ष नजरेनं हे केव्हाच ताडलं होतं.
फुलाजी खिंडीत पडल्याची खबर रात्री उशिरा गडावर कळाली. गडावर शोककळा पसरली होती. खिंडीतून वाचलेल्या काही मावळ्यांनी गजापूर गावात आसरा घेतला होता. त्यांनीच नंतर खिंडीतून फुलाजींच्या देहाला गजापूर गावमध्ये आणुन अंत्यसंस्कार केला. राजांना अन बाजींना अतीव दुःख वेदना झाल्या.
राजे गडावर येऊन आता आठवडा उलटला होता. मावळ्यांच्या जखमा भरल्या होत्या. वैद्यांचे नियमित
उपचार अन आराम करून आता मावळे तंदुरुस्त झाले
होते. सदरेवर मसलती झडत होत्या. गडाला वेढा घालून
बसलेल्या शत्रूवर कसा वार करायचा? योजना आखल्या
जात होत्या. राजे, बाजी, किल्लेदार अन काही सरदार
यांची चर्चा चालू होती. सदरेच्या मध्यभागी बाजी हात
वरच्या दिशेने उगारून त्वेषाने राजांशी बोलत होते. राजे
त्यांच्या आसनावर धीरगंभीर मुद्रा करून बसलेले होते.
बाकीचे सरदार दोघांचं बोलणं चकित होऊन ऐकत
होते. राजांनी त्यांचा उजवा हात कपाळाजवळ आणत
बाजींचा दिशेने फेकत हलकेच हाताला झटका दिला.
अन जरा त्रस्त स्वरात म्हणाले,
"बाजी... कशाला हे वेड धाडस? गडावर मुबलक
दारुगोळा आहे. तोफांना बत्ती द्यायला अवकाश, तो
मसूद दे माय धरणी ठाय करत बसेल."
बाजी मात्र हट्टालाच पेटलेले होते.
"न्हाय राजं... ह्या मसुदच्या नरडीचा घोट घेतल्याबिगर
माझा आत्मा थंड न्हाय व्हनार."
काही केल्या बाजी ऐकेनात. शेवटी राजांना त्यांच्या
मोठेपणाचा मान ठेवावा लागला.
"ठीक आहे बाजी. पण सांभाळून. जीव राखावा."
अन बाजींच्या या धाडसी योजनेला राजांना परवानगी
द्यावी लागली.
"जी राजं... तुम्ही बिनघोर असा. आज त्या मसुदच
मुंडकं उडवल्याबिगर राहणार न्हाय..", बाजींनी राजांना
मुजरा केला अन राजांचा निरोप घेऊन सदरेवरून
चालते झाले.
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_सहावा

पन्हाळगड ते विशाळगड

#चक्रव्यूह_भेदले :-
अन अचानक समोरील झाड झुडपांतून येणाऱ्या
घोड्यांच्या खिंकाळयांनी आणि हर हर महावेदच्या
आरोळ्यांनी शत्रूची घोडी जागेवरच थबकली.
क्षणभर बांदलही गोंधळले. मागे शत्रू अन समोर हे
सिद्दी मसूदचे सैन्य आले कि काय? म्हणून राजांच्या
मनात क्षणभर भीती दाटली. पण दुसऱ्याच क्षणी
समोरून भरधाव येणाऱ्या घोड्यावर आरूढ असलेल्या
बाजींना पाहून राजांच्या चेहरा आनंदानं फुलून गेला.
पाठोपाठ घोड्यांवर स्वार असलेल्या बांदलांनी डावी
अन उजवी कडून एकाच वेळी शत्रूवर हल्ला केला.
मावळ्यांपाठोपाठ आलेले दळव्यांच्या घोडेस्वारांना
अचानक आलेल्या टोळधाडीने पुन्हा माघारी वळून
पळायलाही संधी मिळाली नाही. अन येणाऱ्या बांदल
स्वारांनी क्षणात त्यांची खांडोळी केली. शे दीडशे बांदल
मावळे घोड्यांवर आल्याने मावळ्यांनी पुन्हा फिरून
जोराचा हल्ला केला. समोर येणारा शत्रू बाजींच्या
मावळ्यांनी पळता भुई थोडा केला. सुर्वे दळवींच्या
सैन्याची दाणादाण उडाली, वेढा फुटला. बाजींनी
राजांची भेट घेतली. मुजरे झाले.
बाजी म्हणाले, "राजं... आता लवकरात लवकर गड
गाठा अन तोफेचं तीन बार करा. फुलाजी दादा खिंडीत
वाट बगत आसल."
राजांनी एक भुवई हलकेच वर केली अन म्हणाले,
_ "तुम्ही नाही येणार?"
"तुम्ही आधी वर पोहोचा राजं... आम्ही आलोच
मागोमाग."
राजांनी निवडक मावळ्यांना सोबत घेऊन गड
गाठला. राजे सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. तोफची
आधीच तयारीत होते. राजे महाद्वारापाशी पोहोचते न
पोहोचते तोच, तोफेचे बार उडाले.
"धडाडंम् धूम... धडाड्म धूम.. धडाड्म धूम..."
दूर घोडखिंडीत फुलाजींनी तोफेचे बार ऐकले अन
राजांना शेवटचा मुजरा केला. तोफेच्या आवाज ऐकताच
मावळ्यांनी आजूबाजूच्या जंगलात धूम ठोकली अन
नाहीसे झाले. सिद्दी मसूदने उरलेले जखमी अन पळणारे
मावळे कापून काढले. सोबत शिल्लक असलेल्या तीन
चार हजार सैन्याला घेऊन विशाळगडाकडे दौडू लागला.
*****
गडावर पोहोचताच राजांनी शिव शंभुचे दर्शन
घेतले. अन राजे आपल्या विश्राम गृहाकडे निघाले.
लगोलग सदरेवर मुख्य सरदारांना उपस्थित राहण्याचे
निरोप मिळाले. घटका दोन घटका होतो न होतोच राजे
अन काही निवडक सरदार सदरेवर हजर झाले.
राजांनी किल्लेदारांकडे कटाक्ष टाकला, "किल्लेदार...
सर्व मावळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. अन लागलीच
जखमी मावळ्यांवर उपचार करण्याची घाई करा."
"जी राजं...", म्हणत किल्लेदार राजांना मुजरा करुन
निघणार तेवढ्यात राजे म्हणाले, "एक महत्त्वाचं,
लढाईत कामी आलेल्या मावळ्यांची यादी करा. अन हो
सावजीला पाठवून द्या."
"जी राजे...", म्हणत किल्लेदार सदरेहून निघाले.
जखमींना तुपाच्या विहिरीतील जुने तूप जखमांवर
लावले जात असे. अन ते लावल्यावर होणारी आग,
तगमग त्या जखमेपेक्षाही खूप वेदनादायक होती. पण
त्यामुळे जखम चिघळत व पु धरत नसे अन लवकर
खपली धरून भरून येत असे. पण या इलाजासाठी
मावळे नेहमी का कु करत. राजांनी सर्वांना यासाठी सक्त
ताकीत दिली होती अन जो नाही करणार त्याला स्वतः
राजे येऊन लावतील म्हणूनही बजावून ठेवले होते.
सदरेवरच्या गवाक्षातून राजे दूरवर पसरलेल्या
सह्याद्रीकडे पाहत विचारात गुंग होऊन गेले होते. रात्र
झाली होती. सदरेवर समयीतील वातींचा मंद प्रकाश
पसरला होता. गडावर येताच बाजींना ताबडतोब
भेटण्यासाठी सांगावा गेला होता. जीवावर बेतलेला
केवढा मोठा प्रसंग टळला म्हणून, राजे आई जगदंबेचे
मनोमन आभार मानत होते. घोडखिंडीत लढत
असलेल्या फुलाजींचा विचारही मनात घोळत होता.
थोड्याच अवधीत बाजीही काही बांदल सैनिकांसह गड
चढून वर आले. जखमींसाठी उपचार चालू असलेल्या
वाड्यात बाजी दाखल झाले. तोवर सावजी आपल्या
जखमांवर उपचार करून सदरेवर हजर झाला. सदर
रिकामीच होती, आसनाच्या मागे पाठमोरे उभे असलेले
राजे गवाक्षातून बाहेर पाहत होते.
सदरेच्या मध्यभागी येऊन सावजीने, "मुजरा राजं"
म्हणत उजवा हात छातीशी नेला. राजांची विचार तंद्री
भंगली. वळून राजांनी सावजीकडे पहिले अन हलकेच हसले. सावजी समोर येत राजांनी सावजीचे खांदे दोन्ही
हातांनी धरले अन म्हणाले, "तुझ्यासारखे मर्द मावळे
आमच्या पाठीशी आहेत, म्हणून आम्ही आज सुखरूप
आहोत."
सावजी म्हणाला, "राजं तुम्ही आमच्यासाठी
सवराज्यासाठी एवढं करता मंग तुमच्यासाठी आमी
एवढं बी कराय नगं.", अन झटकन सावजीने राजांचे
चरण स्पर्श केले.
राजे सावजीला धरत त्याला उठवत म्हणाले "अरे...! हे
काय करतोयस?"
सावजीचे डोळे अधूंनी भरले होते.
"राज... आजवर बाजींसंगट व्हतो पर कवा तुमास्नी
भेटायचा योग न्हाय आला. आन, आज तुम्ही सवता
मला बलिवलत, म्हणून उर भरून आला... राजं...
तुमच्यासाठी, तुमच्या संगट लढलो जीवाचं सार्थक झालं
बगा.."
"पथकातील जखमी झालेल्या मावळ्यांची यादी करा
अन जे जे मावळे कामी आले त्यांचीही."
काही वेळ राजे सावजीशी बोलले. बाजी गडावर आलेले
आहेत कळताच बाजींना त्यांच्या दालनात पाठवून
देण्यासाठी सांगितले अन राजांनी सावजीला निरोप
दिला.
बाजींना आपल्या दालनात आलेले पाहताच
राजांचे डोळे पाणावले. राजांनी बाजींना आलिंगन दिले.
अन घोडखिंडीत घडलेल्या प्रसंगाची विचारपूस केली.
बाजींनी सगळा प्रसंग राजांना कथन केला. राज्यांच्या
नेत्रकडांतून अश्रृंनी दाटी केली होती. ऐकता ऐकता
आलेला हुंदका राजांनी कसाबसा आवरला. आपला
उजवा हात छातीवर टेकवला, डोळे बंद केले अन
"जगदंब...जगदंब.." स्वतःशीच पुट पुटले. भावनेचा
पूर ओसरल्यावर. बाजींना एकत्रच थाळा घेऊ म्हणून
विचारले. बाजींनी थाळा घेण्यास नकार दिला अन
म्हणाले,
"राजं... दादाची अजून काय खबर न्हाय आली. आन
म्या कसा घास खाऊ?"
राजे, "ठीक. आम्हीही थांबू मग."
बाजी, "नगं राज... आमच्यासाठी तुम्ही नका थांबू."
"नाही बाजी. तुम्ही आमच्यासाठी आपल्या प्राणांची
बाजी लावता. तिकडे फुलाजी, संभाजी ,सिद्दी हिलाल
यांच्यासारखे असंख्य मावळे आमच्यासाठी थकलेला
भागलेला जीव घेऊन, उपाशी पोटाने छातीचा कोट
करून खिंड लढवता. मग आमच्या गळ्याखाली तरी
कसा घास उतरेल?"
बाजींनी खूप सांगूनही राजे काही केल्या ऐकेनात शेवटी
राजांसोबत कसाबसा थाळा संपवून बाजी त्यांच्या
विश्राम गृहाकडे निघून गेले.
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_पाचवा

पन्हाळगड ते विशाळगड

#धडक :-
घोडखिंडीतून निघून राजांना आता एक दिड
प्रहर लोटला होता . लवकरात लवकर राजांना कुमक
करण्यासाठी विशाळगडाचा पायथा गाठणं गरजेचं होतं .
बाजी अन त्यांच्या सोबत असलेले शंभर दीडशे मावळे
भरधाव घोडा दौडवत होते . घोडीही जीव खाऊन दौडत
होती . जंगलातील खाचखळग्यांच्या वाटेवरून दौडताना
घोड्यांची दमछाक होत होती . धावून धावून तोंडाला
फेस आला होता . आता कोस दोन कोसांचा अंतर बाकी
होतं . विशाळगड नजरेस पडू लागला होता . पण आधीच
आदिलशाही मराठी सरदार सूर्यराव सुर्वे आणि जसवंत
दळवी यांचा हजार दीड हजार सैन्याचा विशालगडाला
वेढा पडलेला होता . एवढ्या मोठ्या गडासाठी हजार
दीड हजार सैन्याचा वेढा अगदीच तुटपुंजा होता . तरीही
वेढा फोडून गड गाठणं आवश्यक होतं .
राजांनी पूर्ण अंगावर योद्धयाचा वेश परिधान
केलेला होता . चिलखतही चढवलेले होते . शिरस्त्राण
घालून पूर्ण डोकंही झाकलं होत . फक्त डोळे दिसत
होते . राजांनी दोन्ही हातात दांडपट्टा पेललेला होता .
ज्या बाजूला शत्रूचे कमी सैन्य होते . त्या बाजूने
निकराचा हल्ला चढवायचा बेत नक्की झाला होता .
विशाळगडावर किल्लेदाराला इशारा मिळताच
मावळ्यांची कुमक घेऊन राजांच्या मदतीला येण्याचा
सांगावा पोहोचलेला होता . गडावरून खाली पाहिलं
तर राजांचे सैन्य झाडाझुडपांमध्ये दबा धरून
बसलेलं दिसत होत . तर अलीकडे सुर्त्यांचा सैन्याचा
तटक राबता दिसत होता . बाजलाच काही अंतरावर
गडाच्या बाजू बाजूने दळव्यांचे मोर्चे लागलेले होते .
सुर्त्यांचे सैन्य ज्या बाजूने कमकुवत वेढा लावून होते
त्याच बाजूने किल्लेदार सोबत दीड दोनशे मावळे
घेऊन झाडाझुडपांच्या आसरा घेऊन खाली उतरलेले
होते . खालून हर हर महादेवचा गजर होताच वरच्या
मावळ्यांनीही एकाच वेळी हल्ला करायचा होता .
गडावर तोफा होत्या पण खाली खुद्द राजे अन मावळे
असल्याने त्या उडवणे धोक्याचे होते . राजांनीच तोफा न
उडवण्याबाबत सक्त ताकीत दिलेली होती .
पलीकडच्या झुडपात हात दोन हातांच्या अंतरावर
लपलेल्या सावजीला राजांनी प्रश्न केला , " सावजी ,
गडावर निरोप पोहोचला ? "
आपले नाव राजांना कसे माहित ? अन राजांनी अचानक
केलेल्या प्रश्नाने सावजी जरा चपापलाच .
स्वतःला सावरून सावजीने गडाच्या पायथ्याच्या थोडं
वरच्या दिशेने बोट दाखवून राजांना सांगितलं , " जी राजं ,
त्ये बगा त्ये आपलं मावळं . भगवी निशाणं घेऊन दबा
धरून बसल्यात . आपला इशारा मिळताच ते वरून
हल्ला करत्याल . "
" ठीक . . सावजी आता घाई करा अन इशारा द्या
मावळ्यांना लढण्यासाठी . आपल्याला लवकरात लवकर
गड गाठायचा आहे . तिकडे घोड खिंडीत बाजी फुलाजी
आपल्या इशारतीची वाट बघत असतील . "
" जी राजं . " , म्हणत सावजी बाजूला झाला .
हातातली तलवार वर उगारली . अन मावळ्यांना हर हर
महादेव च्या गजरात शत्रूच्या दिशेने तलवार दाखवत
हल्ला करण्याचा इशारा दिला . सोबत आणलेले कर्णे
जोरजोरात कुंकत अन " हर हर महादेव " , " जय भवानी "
अशा आरोळ्या ठोकत मावळे सुर्त्यांवर चालून जाऊ
लागले . तीनशे साडे तीनशे बांदल एकाच वेळी सुर्त्यांच्या
सैन्यावर तुटून पडले . अचानक आलेल्या शिवाजी
राजेंच्या मावळ्यांच्या वावटळीने सर्त्यांच्या सैन्याची
त्रेधा तिरपीट उडाली . काहींना तर हातात शस्त्रही
घेण्याची संधी मिळाली नाही . सावध असलेल्या काही
सैनिकांनी फळी उभारून निकराचा लढा चालू केला .
तलवारीवर तलवारी खणाणू लागल्या . सुर्त्यांचं सैन्यही
याच मराठी मातीतलं , राकट अन चिवटही . काही केल्या
मागे हटेनात . राजे दोन्ही दांडपट्टा गरगर फिरवत पुढे
पुढे सरकत होते . स्वतःभोवती जणू हात दोन हाताचं
सुरक्षा कवचच उभं केलं होतं , अशा सफाईदारपणे
दांडपट्टा फिरवत होते . समोर येणार शत्रू अंगावर वार
होऊन बाजूला पडत होता . राजांच्या आजूबाजूलाही
अंतर ठेऊन दहा पंधरा मावळ्यांचं पथक राजांना साथ
देत होतं . अन तेवढ्यात समोरून झाडाझुडपांतून हर
हर महादेव अशा आरोळ्या ठोकत गडावरचे मावळे
सुर्त्यांच्या सैन्यावर तुटून पडले . दोन्ही बाजूने होणारा
हल्ला पाहून सुर्त्यांचे सैन्य बिथरले . अन सैरावैरा वाट
मिळेल तसे धाव लागले . पण जवळच असलेल्या
दळव्यांच्या सरदाराने सैनिकांची जमवजमाव केली
अन तीन चारशे सैन्य घेऊन लढाईचं मैदान गाठलं.
आलेल्या कुमकेने सुर्त्यांच्या सैन्याचे मनोबल वाढले
अन ते पुन्हा निकराने लढू लागले. आता आमने सामने
ची लढाई चालू झाली होती. जो जिंकेल त्याची सरशी.
नव्या दमाच्या आलेल्या शत्रू सैन्याने केलेल्या जोराच्या
हल्ल्याने मावळ्यांची पीछेहाट होऊ लागली.
दुपार टळून संध्याकाळ होऊ लागली होती. पळून
पळून दमलेले उपाशी तापाशी देह, त्यात ना धड
विश्रांती अन लगेच हातघाईची लढाई. शरीरं थकली
होती, रेटा कमी पडू लागला होता, सपासप वार होतं
होते. तलवारींचा खणखणाट, आरडा ओरडा, अन
हल्लकल्लोळ माजला होता.
'हाना मारा'
'हर हर महादेव'
'जय भवानी'
अशा आरोळ्यांनी सावजी आपल्या बांदल मावळ्यांना
प्रोत्साहन देत नेटानं एक बाजू लढवत होता. काहीही
झालं तरी राजांना सुखरूप गडावर पोहोचवणं महत्वाचं
होतं. आता मावळ्यांची शक्ती कमी पडू लागली
होती. दळव्यांची सेना कडवा प्रतिकार करत होती.
राजेही आता बराच वेळ दांडपट्टा चालवून दमले होते.
गडावरून अजून कुमक येण्याची शक्यता नव्हती.
तोफा उडवूनही आपल्याच जीवितास धोका होता.
अन मागूनही कोणी मदतीला येईल म्हणून आशा
मावळल्या होत्या. घाई एवढ्यासाठी होती कि, सिद्दी
मसूद ने जर गाठले तर मात्र पुन्हा पलायनाशिवाय पर्याय
नव्हता. आणि आता पुन्हा माघारी पळणं शक्य नव्हतं.
मावळ्यांच्या संरक्षणात राजे थोडा वेळ एका दगडावर
विश्रांती साठी थांबले होते. विचारचक्र चालू होती. आता
काय पावित्रा घ्यावा? आपल्या जीवाला जीव देणाऱ्या
मावळ्यांचा जीव असा हकनाक शत्रूच्या पुढ्यात ठेऊन
चालणार नव्हतं. वेळ दवडणे धोक्याचे होते.
राजांनी एका मावळ्याला बोलावून सांगितले, 'सावजीला
सांगा तूर्तास माघार घ्या. जंगलाचा आसरा घ्या. नाहीतर
उगाच सगळ्यांना जीव गमवावा लागेल. चला घाई करा.'
राजे काही बांदल सैनिकांसोबत हळू हळू रण मैदान
सोडून मागे हटू लागले. सावजीला निरोप मिळताच
त्याने मावळ्यांना माघारी वळण्यास सांगितले.
'आरं.. चला... फिरा माघारी.. पळा...'.
तोच माघारी पळणाऱ्या मावळ्यांना पाहताच शत्रू
सैन्याला आणखीच चेव आला. जे जे घोड्यावर स्वार
होते त्यांनी पळणाऱ्या मावळ्यांचा पाठलाग करायला
सुरुवात केली. दळवींच्या सरदाराने राजांच्या दिशेने
घोडी वळवली. अन अचानक समोरील झाड झुडपांतून
येणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळयांनी शत्रूची घोडी
जागेवरच थबकली.
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_चौथा :-

पन्हाळगड ते विशाळगड

#शर्थ :-
खिंडीत घुसलेल्या चारशे सैनिकांचा धुव्वा
उडाला होता . पन्नास एक कसेबसे जीव वाचवून पळून
जाऊ लागले . तोवर मावळ्यांनी खिंडीत जखमी अन
मेलेल्या मसुदच्या सैनिकांची हत्यारे अन घोडी गोळा
करून आणले होते . शे दीडशे घोडी मिळाली होती .
धावत जाऊन बाजींनी फुलाजीचा मिठी मारली .
" आरं , दादा कुठं व्हता एवढा येळ . "
" राजं . . ? ? राजं , कुठं हाईत ? ? " , फुलाजी इकडे तिकडे बघत म्हणाला .
" त्यांना खेळणा गडावं फूडं पाठवून दिलंय . तीन साडे
तीनशे मावळा हाय संग . "
" क्क क्काय ? ? ? ? ? ? घात झाला बाजी . खेळणा
गडाला सुर्वे अन दळवी आधीच वेढा देऊन बसल्यात .
राजांकडे मावळ बी कमी हायीत . राजं संकटात हायीत .
कुमक पाठवाया पायजे . "
हे ऐकताच बाजीही चिंतातुर झाले . " आता रं दादा ? ?
म्या तर राजांना सांगितलंय कि जसं गडावं पोहोचताल
तसं तोफचं बार उडवा . तोवर आम्ही खिंड लढवतो . "
" आता एक काम करा . बाजी तुम्ही घोड्यावर शे दीडशे
मावळा घेऊन निघा . खिंड म्या लढवतो . जोवर तोफेचं
आवाज होत नाही तोवर एकही गनीम सुटू द्यायचो नाय
म्या . निघा तुम्ही . "
बाजींनी पुन्हा फुलाजीचा मिठी मारली अन शे दीडशे
मावळा घेऊन खेळणा गडाकडे घौडदौड करू
लागले . फुलाजी त्याच्या शे दीडशे ताज्या दमाच्या
साथीदारांसोबत आला पण बाजी तेवढ्याच मावळ्यांना
घेऊन गेला होता . पन्नासेक मावळे कामी आले
होते . तिनशेच्या आसपास बांदल मावळे उरले होते .
सिद्दी इब्राहिम जखमी होऊन पडला होता . फुलाजी
आल्यामुळे मावळ्यांना पुन्हा एकदा जोश आला होता .
बराच वेळ झाला हल्ला झाला नाही . तोवर मावळ्यांनी
पुन्हा होत नव्हतं ते खाण्याचं सामान खाऊन घेतलं .
काही वेळची विश्रांती अन पुन्हा लढाईसाठी सज्ज
झाले .
राजे निघून आता प्रहर दोन प्रहर उलटून
गेले होते . संध्याकाळ होत आली होती . एव्हाना राजे
खेळणा गडावर पोहोचून तोफांची इशारत व्हायला हवी
होती . फुलाजी चिंतेत होते की , ' अजून राजे गडावर
कसे पोहोचले नाहीत . ' इकडे सिद्दी मसुदची ताज्या
दमाची फौज येतच होती . मारा थांबायचं नाव घेईना .
सततच्या हातघाईच्या लढाईमुळे मावळेही आता दमून
गेले होते . फुलाजी दोन्ही हातात तलवार पेलून गरगर
फिरवत होते . समोर येणारा एक एक हशम होणाऱ्या
वाराने जखमी होऊन तर कोण जागीच गतप्राण
होऊन पडत होता . लढाई करत करत फुलाजी कधी
गनिमांच्या गराड्यात जाऊन पोहोचले कळलंही नाही .
आजूबाजूला पाहावं तर सगळीकडे काळ्या हिरव्या
पेहरावातील आदिलशाही यवनी सेना . फुलाजी एकटेच
प्रतिकार करत होते . वार होत होते , जखमा होत होत्या .
संभाजी जाधव अन त्याच्या पाच सात मावळ्यांनी
त्यांना पाहिलं पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे
पन्नास एक हशमांना पार करून जावं लागणार होतं .
संभाजी त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन त्या दिशेने
सरकू लागला . वाटेत येणारा एक एक गनीम संभाजीच्या
ताकतवर वाराने सपासप कापला जात होता . फलाजी
आता दमून गेले होते . त्यांच्या हालचाली मंद होऊ
लागल्या होत्या . त्यांच्या शरीरावर अशी एकही जागा
नव्हती जिथे वार झाला नसेल . एवढा वेळ दुरून लढाई
पाहणारा सिद्दी मसूद घोड्यावर खिंडीत घुसला होता .
फुलाजीला पाहताच त्याने आपला घोडा त्या दिशेने
वळवला . अन त्यांच्यावर वार करायला सरसावला .
संभाजीने हे पाहिलं अन तोही घाई करू लागला . पण
तोवर मसुदचा एक वार फुलाजीचा छातीवर झाला .
प्राणांतिक वेदनेने फुलाजी ओरडले , हातातील तलवारी
खाली पडल्या अन शुद्ध हरपून खाली कोसळले .
समोरून येणाऱ्या संभाजी अन सात आठ मावळ्यांना
पाहून मसुदने त्याचा घोडा वळवला अन माघारी दौडू
लागला . मावळ्यांनी फुलाजीचा उचलून घेतले , संभाजी
अन मावळ्यांनी त्यांना संरक्षण देत मागे हटू लागले .
फुलजींना मागे दगडाला टेकून बसवण्यात आले .
तोंडावर पाणी मारले , त्यांना पाणी पाजलं . इकडे
संभाजी अन त्याचे साथीदार आता आघाडी सांभाळत
होते .
फुलाजींनी शुद्ध हरपू लागली होती . डोळ्यांची
झापडं जड झाली होती . चेहऱ्यावरचं रक्त सुकून गेलं
होतं . सारं अंग जखमांनी भरून गेलं होतं . वेदनांनी
शरीरातील एक न एक अवयव ठणकत होता . चार पाच
मावळे फुलाजींच्या आजूबाजूला जमले होते . शत्रूच्या
रेट्याला संभाजी अन उरले सुरले बांदल प्रतिकार करत
होते . अन अचानक . . . .
" धडाड धूम . . . धडाड धूम . . . "
तोफांचे लागोपाठ तीन चार बार ऐकू येऊ लागले .
मावळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले . होती नव्हती
तेवढी शक्ती एकवटून , सगळे प्राण आपल्या जिभेत
आणून फुलाजी अस्पष्ट पुटपुटले ,
" राजं . . . पोहोचलासा नव्ह . . . "
फुलाजींनी राजांना मुजऱ्या साठी आपला हात
उंचावला अन म्हणाले , " राजं . . ह्यो फुलाजीचा अखेरचा
मुजरा . . . . . . . . "
अर्धवट वर आलेला हात तसाच खाली कोसळला अन
फुलाजींचे प्राण खिंडीला पावन करून अनंतात विलीन झाले .
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_तिसरा :

पन्हाळगड ते विशाळगड

#गजाखिंड_रणकंदन
सकाळचा प्रहर चालू झाला होता . इकडे
बाजी आपल्या बांदल मावळ्यांना आपली योजना
सांगू लागले . कोण दरडीवर चढु लागलं , तर कोण
खालील दगडी गोळा करू लागले . पाच पन्नास मावळे
दरडीवर चढून मोठं मोठाले दगड गोळा करू लागले .
गोफणीसाठी लागणारे लहान दगडही जमा होऊ लागले .
काही जण खालील मोठाले दगड दोरीने वर उचलून
घेत होते . बघता बघता काही वेळातच मावळ्यांनी
मोठ्या अन लहान दगडांचे ढिगारेच्या ढिगारे जमा केले .
सगळ्यांनी सोबत आणलेल्या शेंगदाणे अन फुटाणे काम
करता करता बकाबक खाऊनही घेतले होते . जवळच ।
वाहत असलेल्या ओढ्यातील पाणी पिऊन अन विश्रांती
घेऊन मावळे ताजे तवाणे होऊ लागले अन माऱ्यासाठी
सज्ज झाले . बाजींनी सगळ्यांना आप आपल्या जागा
घेऊन शांत बसण्याची सूचना केली . सगळीकडे शांतता
पसरली होती . वातावरण अजूनही ढगाळच होते , त्यात
दाट झाड झुडपांचा परिसर असल्याने प्रकाशही कमीच
होता . आता सिद्दी मसूदचे सैन्य हळू हळू जवळ येत
असल्याचे आवाज येऊ लागले होते . बाजी , संभाजी
( राजांचे सख्खे मामा अचलोजी जाधव यांचा मुलगा ) ,
सिद्दी इब्राहिम सज्ज झाले होते . घोड्यांच्या दौडीचे अन
खिंकाळण्याचे आवाज क्षणाक्षणाला वाढू लागले होते .
सिद्दी मसूदचे पुढे आलेले पन्नास एक हशम
" दीन दीन , पकडो , मारो , काटो " म्हणत गजा खिंडीपाशी
येऊन पोहोचले होते . गजखिंडीत प्रवेश करायला काही
अंतरच बाकी असताना एवढा वेळ दबा धरून बसलेले
मावळे हातात गोफण गुंडे गोल गोल फिरवत हर हर
महादेवचा गजर करत सटासट दगडी त्यांच्यावर फेकू
लागले . एक एक हशम अचूक टिपला जात होता .
कुणाच्या टाळक्यात , कुण्याच्या चेहऱ्यावर , कुणाच्या
छताडात धडाधड येऊन दगडी बसत होती , त्यासरशी
एक एक हशम घोड्यावरून खाली कोसळत होता .
जर कोणी गोफणीच्या माऱ्यातून सुटून पुढे आलाच तर
तिरकामठा वाले मावळे त्याचा अचूक निशाणा साधत
होते . काही वेळातच तीस पस्तीस यवनांच्या फडशा
पडला होता . काही हशम जखमी होऊन , काही अर्धमेले
होऊन तर काही मृत्युमुखी होऊन पडले होते . कसेबसे
वाचलेले व मागेच थांबलेले दहा पंधरा हशम मागच्या
मागे पळून गेले . मावळ्यांनी त्या तीस पस्तीस यवनांचा
होता नव्हता सगळा माल पळवून आणला . घोडे , हत्यारे ,
अन बरच काही . घोडे मागच्या बाजूला नेऊन बांधून
ठेवले . पुन्हा गोफणीसाठी वापरलेले दगड , धनुष्याचे
तिरही गोळा केले गेले . अन पुन्हा एकदा सगळे लढाई
साठी सज्ज झाले .
या वेळी जास्त शत्रू सेना आली होती . चारशे
हशम असतील अंदाजे पण खिंडीची वाट चिंचोली
असल्याने सगळ्यांना एकाच वेळी घुसने अशक्य होते .
जस जसे सैन्य पुढे जायचे दगडांचा अन बाणांचा असा
वर्षाव व्हायचा की आदिलशाही सैन्याची त्रेधातिरपीट
होऊन जायची . बरेचशे सैन्य पुढे आले होते . त्यांची
मावळ्यांशी आमने सामने लढाई सुरू झाली . पण
मावळ्यांच्या रेट्यापुढे मसुदच्या सैनिकांचा काही निभाव
लागेना . सिद्दी मसुदही आता हट्टालाच पेटला होता .
" कैसे है ये मन्हाट्टे . . पत्थर से जंग . . जाओ . . आज कुछ
भी हो जाये , उस शिवाजी को पकडना हि है हमे । "
आणखी शंभर एक हशम खिंडीत घुसले . काही
घोड्यावर तर काही समोर ढाली धरून . जेव्हा
गोफणीचा अन बाणांचा काही उपयोग होत नव्हता ,
तेव्हा मात्र मावळे जे दरडीवर मोठं मोठाले दगड होते
ते वरून खाली फेकून द्यायचे . एवढे मोठाले दगड
एकतर अंगावर किंवा डोक्यात बसायचे . कुणाची डोकी
फुटायची तर कुणी जागेवरच जायबंदी होऊन व्हीवळत
पडायचं . सगळीकडे हल्लकल्लोळ माजायचा . त्यातूनही
जर काही सैन्य सुटून पुढे आले तर संभाजी अन सिद्दी
इब्राहिमच पथक भाले घेऊन त्यांचा समाचार घायचं . ते
| दमले कि स्वतः बाजी आघाडी घ्यायचे . बाजींनी आता
। दोन्ही हातात दांडपट्टा चढवला होता . " हर हर महादेव "
" जय भवानी " च्या गजरात त्यांचा रौद्रवतार प्रकटला
होता . एक एक हशम सपासप कापला जात होता .
एकही शत्रू पुढे जायची हिम्मत करत नव्हता . अजूनही
दोनशे गनीम खिंडीतच होते . येताना तर चारशे होतो
मागे पाहावं तर काही जखमी , काहिंचे मुडदे पडलेले
तर काही जीव वाचवून मागे पळत होते . मसूदच सैन्य
आता लढाईसाठी खिंडीत प्रवेश करू धजावेना . तरीही
सिद्दी मसूद त्यांना पिटाळून लावत होता . अचानक ,
| सिद्दी मसूद अन त्याची सेना ज्या ठिकाणी थांबली
होती , दोन्हीही बाजूने " हर हर महादेव " , " जय भवानी "
चा गजर ऐकू येऊ लागला . सिद्दी मसूद अन सैन्याला
काही कळायच्या आत दोन्ही बाजूने सटासट दगडांचा
अन बाणांचा वर्षाव होऊ लागला . कुठून बाण येतोय ,
कुठून दगड येतोय काहीच कळेना . सैन्य जखमी होऊ
लागलं . सिद्दी मसुदही आता भांबावून गेला , ' नेमकं
शिवाजीकडे किती सेना आहे ? ' त्यांची पीछेहाट होऊ
लागली . हीच संधी साधून फुलाजी अन त्यांच्या बांदल
मावळ्यांनी मोठं मोठ्याने हर हर महादेव च्या आरोळ्या
ठोकत खिंडीकडे धाव घेतली . अगोदरच खिंडीत
घुसलेले चारशे पाचशे यवनी सैन्य आता दोनशे अडीचशे
च्या आसपास शिल्लक होते , मागून येणाऱ्या अचानक
हल्ल्याने त्यांची तर बोबडीच वळली .
" या अल्ला , काफर आया , काफर आया , भागो
sssss "
फुलाजी अन त्यांच्या मावळ्यांनी मागून अन बाजींनी
समोरून उरलेल्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला .
भयंकर रणकंदन माजले . बाजी अन फुलाजीचा
रौद्रवतार पाहून मसुदच्या सैन्य समोर यायला थर थर
कापू लागले . सहा साडे सहा फूट उंच धिप्पाड देह बाजी
अन फुलाजी दोन्ही हातात गरगर दांडपट्टा फिरवत शत्रू
सैनिकांना सपासप कापत सुटले होते . अंगावर झालेल्या
वारांनी कपडे कधीच लालेलाल झाले होते , मोठाले डोळे
अन भादरलेले डोके त्यावर रुळणारी लांब शेंडी असा
अवतार झाला होता दोघांचाही .
लढता लढता जर बाजी अन फुलाजी दिसले तर मसुदचे
सैन्य , " शेतान आया . . शेतान आया . . . . भागो । " म्हणत
पळत सुटायचं .
सिद्दी मसुदही आता विचार करून वेडा व्हायची वेळ
आली होती . एवढे चार पाच हजार सैन्य असूनही केवळ
तीन चारशे लोक आपली वाट रोखून धरतात .
" क्या शेतान है ये मरहट्टे . . कैसे कैसे लोग पाल रख्खे है
इस शिवाजीने । हटनेका नाम हि नहीं ले रहे । "
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_दुसरा

पन्हाळगड ते विशाळगड
#पन्हाळा_ते_खेळणागड_निरोप :-
फुलाजीचा दरडावणीचा स्वर ऐकताच बाजीने
फुलाजीचा आलिंगन दिले अन आपसूकच त्याच्या
तोंडून , " दादा ss " शब्द बाहेर पडले अन डोळ्यांत
अश्रू दाटले . बाजीने फुलाजीचा निरोप घेतला अन
राजांची पालखी घेऊन पुढे धावू लागला . जौहरचा वेढा
पार झाला होता . सोबतीचे पाच सहाशे वीर बहिर्जीने
ठिकठिकाणी पेरून ठेवलेले नजरबाज दाखवतील त्या
दिशेने अन त्यांच्या मागे मागे उर फुटेतो खेळणा गडाच्या
दिशेने धावत होते . राजांच्या पालखीचे हशम त्याच
वेगाने आदलाबदली होत होते . मध्यरात्रीचा प्रहर सरला
होता . पहाटेचा प्रहर चालू झाला होता , अजूनही सगळे
धावतच होते . पन्हाळ्यापासून विशाळगडाचं अंतर वीस
कोसांच्या आसपास , त्यापैकी पंधरा एक कोस अंतर
पार झालं असेल कदाचित . अजूनही बरच अंतर बाकी
होतं . बाजीने सगळ्यांना थांबण्याचा इशारा केला . थोडा
वेळची विश्रांती अन लगेच पुन्हा धावायचं होतं .
पावसाची रिपरिप आता कमी झाली होती . सगळे
झाडांच्या , खोडाच्या , दगडांच्या आडोशाला विश्रांती
घेत होते . अचानक एक हेर धावत येताना पाहून बाजी
ताडकन उठून उभा राहिला .
" बाजी , निघा . मसूद खान आपल्याच दिशेने घौडदौड
करत यितुय . हजार दोन हजार हशम अस्त्याल . घाई
करा बाजी , न्हायतर घात हुईल . "
बाजीने मोठ्याने आवाज दिला , " चला रं , निघा . "
त्यासरशी राजांची पालखी उचलली गेली . अचानक
पालखी उचलल्यामुळे राजे जरा दचकलेच . पालखीचा
पडदा जरा बाजूला सारून म्हणाले ,
" बाजी , काय झालं ? "
बाजी राजांच्या पालखी जवळ येऊन म्हणाला , " राजं ,
निघावं लागल , मसूद खान यितुय मागणं . "
राजे , " हं . . म्हणजे सुगावा लागलाच तर . चला बाजी ,
लवकरात लवकर खेळणा गाठावा लागेल . "
" जी म्हाराज . "
राजांची पालखी उचलली गेली अन पुन्हा दौड चालू
झाली . राजांच्या डोक्यात विचारचक्र चालू होते .
' कोण आपण ? ? ? ?
अन कोण हि माणसं ? ? ?
राजे म्हणवून घेणारे आपण . . .
आपण कसले राजे ? ? ?
खरे राजे लोक तर हे . . .
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या घनदाट जंगलातून ,
काट्याकुट्यातून , दगडा धोंड्यातून , आपला जीव
वाचावा , आपण सुखरूप राहावं म्हणून उर फुटेतो
धावणारी हि माणसं . . . .
ना जात ना पात बघून आपल्यासाठी जीव देणारी ही
माणसं . . . .
आपला घरदार वाऱ्यावर सोडून स्वराज्यासाठी
लढणारी , झगडणारी हि माणसं . . .
शिवा . . .
फुलाजी . . .
बहिर्जी . . .
बाजी . . .
आपल्यासाठी जीवावर उदार होणारी हि माणसं . . .
हीच तर खरी राजा माणसं . . .
आपण कसले राजे . . . ?
आपण तर फक्त नावाचेच राजे . . . '
तांबडं फुटायची वेळ होऊ लागली होती . पाऊसही
पूर्णपणे थांबला होता . पहाटेचा थंडगार वारा घामाने
चिंब भिजलेल्या अंगावर विसावत होता . तेव्हढाच
काय तो शरीराला थंडावा मिळत होता . पण कुणालाच
त्याची फिकीर नव्हती . धावून धावून सगळ्यांची छाती
खाली वर धपापत होती . थोड्याच वेळात सगळे
गजाखिंडीपाशी येऊन पोहोचले होते . मसूद खान
मागावरच होता , कोणत्याही क्षणी तो आपल्याला
गाठेल अन तुंबळ लढाई जंपेल अशी परिस्थिती होती .
बाजीने थोडं बाजूला होऊन आसपासच्या झाडीचा
अन खिंडीच्या उंचच उंच दरडींचा अंदाज घेतला .
बाजीच्या मनानं एक विचार पक्का केला . दुसऱ्या क्षणी
धावणाऱ्या मावळ्यांवर नजर फिरवली अन थांबण्याचा
इशारा केला . राजांची पालखी खाली ठेवण्यात आली .
पटापट सगळे मावळे आडोसा शोधून आपलं अंग टाकून
विसावू लागले . बाजी राजांच्या पालखी जवळ आले .
राजेही पायउतार झाले .
राजे , " काय झालं बाजी , असं अचानक का थांबलात ? "
बाजी , " राजं . . मागून मसूद खान यितय , कवा बी
आपल्याला गाठलं . त्याच्याकडं दोन तीन हजार
हशम असत्याल , आधीच आपलं मावळ पळून पळून
दमल्यात , अशा परिस्थितीत त्येला आपण तोंड न्हाय
देऊ शकत . "
राजे , " बाजी . . मग आपण हि खिंड लढवू . जागा
मोक्याची आहे . "
" न्हाय राजं . . तुम्ही तीन चारशे मावळा घेऊन
खेळण्याच्या वाटनं निघा . आम्ही दोनशे मावळे हि खिंड
अडवून धरू . "
" नाही बाजी . आम्हीही इथेच थांबणार . "
" न्हाय राज , उशीर करू नगा . निघा राजं . . "
" तुम्हाला एकट्याला सोडून . . . ? ते शक्य नाही . "
राजांचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच बाजी दरडावणीचा
स्वरात म्हणाला ,
" ऐकावं राजं . . माँसाहेबांची आण हाय तुमास्नी . . हितं
वाद घालत बसाय येळ न्हाय . आन , आता कितीस अंतर
राहिलंय , चार पाच कोस फक्त . गडापातूर आपण पोहोचे
पर्यंत मसूद खानानं आपल्याला मधीच गाठलं तर लय
अवघड होऊन बसल राजं . म्हणून म्हंतुय तुम्ही फूड
निघा अन गडावं पोहोचल्याव तोफचं बार करा . म्हंजी
आम्हास्नी कळलं की तुम्ही सुखरूप पोहोचलाय ते . "
राजांचा उर भरून आला होता . राजे एकटेच बाजीला
सोडून जाण्याच्या मनस्थितीत नव्हते . कसेबसे राजे
बोलले ,
" ठीक आहे बाजी . पण लक्षात असू द्या , जसे तोफेचे
बार ऐकू येतील , आसपासच्या जंगलात पसार व्हा अन
लागलीच आम्हाला येऊन भेटा . "
" जी राजं . . आता निघावं . . येळ नका दवडू . "
राजांनी साश्रु नयनांनी बाजींना आलिंगन दिले अन
निरोप घेतला . राजांची पालखी उचलली गेली अन पुन्हा
विशाल गडाच्या दिशेने तीन साडे तीनशे मावळे धावू
लागले .
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_पहिलं :-

पन्हाळगड ते विशाळगड

#पन्हाळागड_वेढ्यातून_सुटका
धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा
आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता.
विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह
बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून
जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन
कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र
दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन
मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची
रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत
येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या
पाण्याचा बंदोबस्त केला गेला होता. पावसाळी छपऱ्या,
डेरे, जनावरे अन सामान यांचे नुकसान होऊ नये म्हणून
ठीक ठिकाणी चर खोदून पाण्याला वाट करून दिली
होती. तसेच मोठमोठाले दगड, शिळा यांचा वापर
छपऱ्या अन डेरे यांच्या खाली व्यवस्थित केला होता,
त्यामुळे पाण्याने होणारी ओलही आटोक्यात आली
होती.
स्वराज्याची दक्षिण राजधानी म्हणून ओळख असलेल्या
पन्हाळागडाला आदिलशाही फौजेच्या तीस हजारांच्या
आसपास सैनिकांचा वेढा पडून अंदाजे चार महिन्यांचा
काळ उलटून गेला असेल. पावसाळा सुरु होऊन दोन
महिने लोटले होते. पण आदिलशाही फौज तसूभरही
मागे हटायला वा वेढा ढिला सोडायला तयार नव्हती.
तशी सक्त ताकीदच या मोहिमेचे नेतृत्व असलेल्या
आदिशहाच्या मातब्बर सरदाराने सगळ्यांना दिली होती.
कामात चुकराई करणाऱ्यांची गर्दन कैक वेळा मारली
होती. त्यामुळे हर एक हशम जिवाच्या भीतीने आपलं
काम चोख बजावत होता. स्वराज्याचे सरसेनापती
असलेल्या नेताजी पालकरांनी सुद्धा कैक वेळा वेढा
फोडण्याचं काम केलं होतं. पण आदिलशहाच्या कडव्या
फौजेने त्यांचा काही निकाल लागू दिला नव्हता. गनिमी
काव्याने छुपे हल्ले होत होते, शिवाय गडावर रसद
पोहोचवण्याचे प्रयत्नही केले गेले पण त्यांनाही यश
मिळत नव्हते. आता जेमतेम अजून दोन तीन महिने गड
तग धरू शकेल एवढी रसद शिल्लक होती.
अफजल खानाप्रमाणेच आदिशाही दरबारामधे शिवाजीराजाला जिवंत पकडून आणण्याची शप्पथ
घेऊन आलेला सिद्दी जौहर, शिवाजी राजांची
पूर्ण शरणागती बस्स. एवढाच हट्ट धरून बसला
होता. राजांच्या वकीलांमार्फत चालवलेल्या तहाच्या
बोलणीतील एकाही मुद्द्यावर बोलायला वा तह
करायला सिद्दी तयार होत नव्हता. अगोदरच एवढे
दिवस एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे आणि
स्वराज्यावर उत्तरेकडून मुघलांनी उघडलेल्या
मोहिमेने राजे चिंताक्रांत झाले होते. प्रतिऔरंगजेब
म्हणून ओळखला जाणारा औरंजेबचा सख्खा मामा
शास्ताखान पुण्याजवळ चार महिन्यांपासून तळ
ठोकून होता. त्याचाही बंदोबस्त करणे आवश्यक होते.
आता लवकरात लवकर पन्हाळा सोडणे गरजेचे होते.
राजांनी वकीलामार्फत सिद्दी जौहर ला शरण जात
असल्याचे अन एक दोन दिवसात भेट घेणार असल्याचे
कळवले होते. नाईकांच्या हेरखात्यातील लोकांनी
सुद्धा सिद्दीच्या फौजेत, राजे आता लवकरच भेटणार,
सगळे गडकोट आदिलशाहीच्या हवाली करून स्वतः
शरण जाणार म्हणून अफवा पसरवल्या होत्या. चार
महिन्यांच्या अविश्रांत वेढ्याच्या कामामुळे फौजेमध्ये
सुद्धा आता निर्धास्तपणा आला होता. उद्याच शिवाजी
राजा जौहरला भेटायला येणार, अन आपण दोन
तीन दिवसांत आदिलशाही मुलखात पुन्हा जाणार या
विचारानेच जौहरची फौज वेढा सैल सोडून निवांत
नाचगाने अन मद्य घेण्यामध्ये मश्गुल झाली . शिवाय ,
नाईकांची माणसं सुद्धा फौजेत मिसळून गेली होती .
गुप्तहेरांनी आणलेल्या नव्या खबरीप्रमाणे , गडाच्या
मागच्या बाजूने आता वेढा पातळ झाला होता , तसेच
त्या बाजूला आपलीच माणसं नाईकांनी आधीच पेरून
ठेवली होती . दिवस आणि वक्त निश्चित झाला होता.
दिनांक १२ जुलै १६६० , रात्रीचा प्रहर , घटका दोन
घटकांचा वेळ झाला होता . काळाकुट्ट अंधार अन वरून
धो धो पाऊस कोसळत होता . योजनेप्रमाणे बाजी अन
फुलाजी या बांदल बंधूंनी राजांना खेळणा गडावर
सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी शिरावर घेतली
होती . त्याच बरोबर संभाजी जाधव , सिद्दी हिलाल ,
सिद्दी वाहवाह हे शूरवीरही साथीला होते . जीव गेला तरी
बेहत्तर पण राजांना मुक्कामापर्यंत पोहोचवण्याचं एकच
ध्येय आज उराशी बाळगून राजांच्या पालखी पासून
काही अंतरावर फुलाजी शंभर दिडशे कडवे बांदल
घेऊन समोर धावत होता . राजांसोबत खुद्द बाजी त्याचे
पाच सहाशे मावळे , जंगलातून वाट काढत गड उतार
होत होते . पावसाच्या जलधारांनी सारे मावळे ओलेचिंब
झालेले होते . अनवाणी पायाने काटेकुटे , खाचखळगे ,
पावसाच्या पाण्याने भरलेली डबकी अन चिखल तुडवत ते पाच सहाशे वीर आपल्या राजाला सिद्दी जौहरचा वेढा
फोडून सहीसलामत घेऊन जात होते . पन्हाळा गडाच्या
मागच्या बाजूने वेढा ज्या ठिकाणी सैल झाला होता ,
त्या दिशेने सगळे धावत होते . बहिर्जीच्या नजरबाजांनी
चोख कामगिरी बजावली होती . ज्या ठिकाणाहून राजे
मार्गक्रमण करणार तिथेच आज बहिर्जीची माणसं
पहाऱ्यावर असणार होती . जर काही दगा फटका
झालाच तर फुलाजी अन ते येणाऱ्या शत्रूला सामोरे
जाणार होते . तुटक तुटक ठिकाणी असलेल्या राहुट्या
अन डेरे दिसू लागले , तसं फुलाजीने एक वेगळ्या
प्रकारची शीळ वाजवली . समोरूनही तशाच प्रकारचा
काहीसा प्रतिसाद ऐकू आला . परिस्थिती अनुकूल
असल्याची ती खूण होती . बाजीही तोवर राजांच्या
पालखी सोबत जवळ आलाच होता .
फुलाजी , " बाजी , तु राजांना घिऊन फुडं व्हय . तवर म्या
थांबतो हितं . आन थांबू नगा कुटं बी . म्या हाय मागं . "
बाजी , " आरं दादा पर . . "
बाजीचं वाक्य अर्धवट तोडत फुलाजी म्हणाला ,
" पर न्हाय ना बिर न्हाय . गपगुमान निघा . राजांना
सहीसलामत खेळण्याव न्या . निघा sssssss . "
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...