विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 29 May 2022

तारीख – ए – आलमगीर

 

श्रीशिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर शंभूछत्रपतींच्या वाढत्या आक्रमतेचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः औरंगजेब अजमेरहून २२ मार्च १६८१ रोजी दक्षिणेकडे निघाला. ८ सप्टें. १६८२ रोजी तो खडकीत औरंगाबादेत आणि १३ नोव्हेंबर १६८३ रोजी तो नगरला (अहमदनगर) आला, आता मराठ्यांविरुद्ध त्याने खरी मोहीम सुरू केली. छत्रपती संभाजी महाराजांना पकडणे, त्यांना हालहाल करून तुळापूर येथे ठार मारणे, इतिकदखानाने राजधानी रायगड जिंकून छत्रपती शंभूपत्नी महाराणी येसूबाई आणि युवराज शिवाजी (पुढे नामांतर शाहू) यांना ताब्यात घेऊन कैदेत ठेवणे, छत्रपती राजाराम महाराजांना सोबत जिंजीपर्यंत केलेला लढा, पुढे छत्रपती राजाराम महाराज यांचा सिंहगडावर अकाली मृत्यू हे सारं होऊनही औरंगजेबाला मराठ्यांचा पूर्ण पराभव करता आला नाही. विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या दोन दख्खनी पातशाह्या बुडवून हिंदुस्थानचा अधिपती होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

रणरागिणी ताराऊंच्या रूपानं उभं राहिलेलं कडवं आव्हान काही आलमगिराला मोडून माढता आलं नाही. हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण पंतसचीव, धनाजी जाधव, संताजी घोरपडे अशा अद्वितीय सेनाधुरंधरांपुढे कसलेल्या मोगली सेनापतींना हात टेकायला लागले. १६८१ ते १७०७ म्हणजे तब्बल पाव शतकापेक्षा जास्त काळ दिल्लीपती औरंगजेबाला मराठ्यांनी खेळवत ठेवलं. हताश झालेला आलमगीर अखेर २० जानेवारी १७०६ रोजी नगरला मुक्कामास आला. तेव्हा त्याचं वय ९० वर्षे होते. १ वर्ष, १ महिना इथं त्याचा मुक्काम होता. २० फेब्रुवारी १७०७ म्हणजे २८ जिल्हाद हिजरी सन १११८ रोजी या महत्त्वाकांक्षी बादशहाचा ९१ व्या वर्षी अहमदनगर येथे अंत झाला.

त्याच्या इच्छेनुसार त्याचे शव खुल्ताबाद येथे शेख झैनुद्दीनच्या कबरीशेजारी खुल्या अस्मानाखाली दफनवण्यात आले. त्याआधी त्याची आतडी आदी अवयव काढून ते त्याच्या मृत्युस्थानीच अहमदनगर येथे पुरले. नगरमध्ये आलमगीर वस्तीत असणाऱ्या तटबंदीयुक्त प्राकारात मध्यभागी मोठ्या चौथऱ्यावर असणारी कबर ही औरंगजेबाच्या पुरलेल्या अवयवावरील कबर आहे. त्याच ठिकाणी त्याला शेवटची आंघोळही घालण्यात आली होती.या प्राकारात पश्चिमेस एक मशीद,मशिदीसमोर पाण्याचा हौद आणि पूर्वेस हुजरा म्हणजे रहाण्याची जागा आणि वायव्य भागात एक विहीर आहे. सध्या या प्राकारात मदरसा आहे. औरंगजेबाच्या या कबरीच्या व्यवस्थेसाठी सरकारातून १५४० रुपयांची वार्षिक नेमणूक आहे. या स्थानाची व्यवस्था दर्गा आलमगीर बादशहा-नागरदेवळे, तालुका अहमदनगर' या क्रमांक ७ ने रजिस्टर झालेल्या पब्लिक ट्रस्टकडे आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे औरंगजेबाचं साध चित्रही इथे लावण्यात आलेलं नाही. औरंगजेबाच्या हस्ताक्षरातील कुराणाची प्रत आणि आणखीही काही ग्रंथ येथे आहेत.

दर्गा आलमगीराचा

भिंगारच्या पूर्वेस, नगरपासून ४-५ कि.मी. अंतरावर औरंगजेबाचे मृत्युस्थान आहे. श्रीशिवछत्रपतींच्या अकाली मृत्यूनंतर गादीवर आलेल्या शंभूछत्रपतींच्या काळात आलमगीर बादशहा दक्षिणेत उतरला. संभाजीराजांना संगमेश्वरात पकडून बहादूरगडावर त्यांचे डोळे काढले. तुळापूरला ठार मारले (पुढे त्यांच्यावर वढू येथे अग्निसंस्कार झाले) पण मराठी दौलत संपली नाही. इथल्या गवताच्या पात्यांना भाले फुटले. राणी येसूबाई अन् बाल शिवाजी (पुढे औरंगजेबाने नाव ठेवले शाहू) यांना रायगड जिंकून त्याचा इस्लामगड करून कैदेत टाकले. पण शिवपुत्र छत्रपती राजारामाचे रूपाने मराठी अस्मिता शिल्लक राहिली. छत्रपती राजाराम महाराजांचे पश्चात शंकराजी नारायण सचिव, रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधव, संताजी घोरपडे आदीनी महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीपती औरंगजेबाची कुतरओढ केली. दक्षिण जिंकायला आलेल्या औरंगजेबाला फक्त गोवळकोंडगाची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही या दक्षिणी मुस्लीम राज्यांचीच इतिश्री करता आली. हिंदवी स्वराज्य नाहीसे करता आले नाही.

थकला, भागलेला, हताश झालेला हा मोगल बादशहा शेवटी वयाच्या ९१ व्या वर्षी २० फेब्रुवारी १७०७ रोजी नगरच्या परिसरात मरण पावला. औरंगाबादजवळ जरी खुल्लाबादेस त्याच्या विश्रांतीचे अंतिमस्थळ असले, तरी त्याचा मृत्यू मात्र नगरला झाला, त्याच्या शवाला स्नान घालून, त्याच्या पोटातील आतडी काढून घेऊन नगरजवळच्या मृत्युस्थानी पुरून तेथेही त्याची कबर उभारली आहे.

तब्बल २४ वर्षे मराठ्यांशी लढाया करूनही या आलमगीराला (जगज्जेता ही पदवी घेणाऱ्या) मराठ्यांची स्वातंत्र्य आकांक्षा काही समूळ नष्ट करता आली नाही. श्रीशिवछत्रपतींनी लावलेल्या हिंदवी स्वराज्यातून मराठ्यांचे हिंदुस्थानभर साम्राज्य निर्माण झाले. दिल्लीच्या मोगल बादशाहीचे धिंडवडे निघाले हतबल, मोगल राजे प्रभावहीन बनले. मराठ्याची उत्कर्षाची सुरवात नगरमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झाली. म्हणून हे स्थळ महत्त्वाचे आहे.

संदर्भ: इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर लिखित ‘सहली एका दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या…’

Friday 27 May 2022

आज्ञापत्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि काशी विश्वनाथ मंदीर

 


आज्ञापत्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि काशी विश्वनाथ मंदीर :
आज्ञापत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच नीती. आज्ञापत्र हे रामचंद्र नीलकंठ अमात्य यांनी छत्रपती शिवराय यांच्या मृत्यूनंतर सुमारे ३५ वर्षांनी लिहिले. पंत अमात्य घराणे यांनी भोसले घराण्याच्या सुमारे चार पिढ्या पहिल्या होत्या आणि त्यांची सेवाही केली होती. या मुळे राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या रामचंद्र पंत अमात्य यांनी कोल्हापूरकर छत्रपती संभाजी राजे यांच्या हुकुमावरून आज्ञापत्राचे लेखन केले.
आज्ञापत्राबाबत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा अभिप्राय वाचण्यासारखा आहे. पोतदार म्हणतात,
"हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषा आणि मराठी राजकीय वाङ्मयाचे एक अपूर्व लेणे आहे. अथ पासून ते इथपर्यंत हा चिमुकला ग्रंथ हजार वेळा वाचला तरी तृप्ती होत नाही. प्रत्येक वाचनाला याला काही नवीन अर्थ प्राप्त होतो. नवीन सौंदर्य अढळून येते. रामचंद्र निळकंठांची ही नीती म्हणजे ऐतिहासीक वाङ्मयातील एक अमूल्य रत्न आहे. श्री शिवछत्रपतींसारखा कर्ता आणि पंतांसारखा एक अनुभवी वक्ता तेथे परिपाक कसा उतरेल, त्याला तोड नाही."
याच आज्ञापत्रात शिवछत्रपतींचे काशी विश्वेश्वर सोडवण्याचे ध्येय स्पष्ट नमूद केले आहे. रामचंद्र पंत अमात्य लिहितात,
"श्रीकृपे अचिरकालेच मुख्य शत्रूचा पराभव करून दिल्ली, आगरा, लाहोर, ढाका, बंगाल आदिकरून संपुर्ण तत्संबंधी देशदुर्ग हस्तवश्य करून श्रीवाराणसीस जाऊन स्वामी विश्वेश्वर स्थापना करीत, तावत्काळपर्यत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्री मत्सकलतिर्थीकतीर्थ श्रीन्मातुश्री राहिली आहेत."
संदर्भ :- रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र

नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं त्रिंबकेश्वराचं मंदिर

 




नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं त्रिंबकेश्वराचं मंदिर
बारा ज्योतिरलिंग मंदिरं ही भारतातली महत्वाची तीर्थक्षेत्रं आहेत. परंतु मध्ययुगीन काळात ह्यापैकी अनेक मंदिरांचा विध्वंस झाला होता. सोमनाथ, त्रिंबकेश्वर, महाकाळेश्वर, विश्वेश्वर अशी अनेक शिवालये पाडली गेली. काही ठिकाणी मशिदी उभारल्या गेल्या. नाशिक जवळचं त्रिंबकेश्वर मंदिर हे ह्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. औरंगझेबाने त्रिंबकेश्वराचं मूळ मंदिर पाडून त्याजागी मस्जिद बांधली होती. परंतु १७५५ साली नानासाहेब पेशव्यानीं ही मशिद पाडून ह्याजागी भव्य मंदिर उभारलं. नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वरला पाऊणे दोन किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा अर्पण केला व ह्या तीर्थक्षेत्राची व्यवस्था लाऊन दिली. ह्या मंदिराच्या उभारणीमुळे मराठ्यांना एक नवीन उमेद मिळाली व पुढे अनेक मंदिरांची पुनर्बांधणी झाली.
संदर्भ:
1. पेशवे, श्रीराम साठे
2. पेशव्यांची बखर
3. धडफळे यादी
4. भा.इ.सं.मं. वार्षिक इतिवृत्त
- आशुतोष पोतनीस

#काशीविश्वेश्वराची_गोष्ट

 


#काशीविश्वेश्वराची_गोष्ट
९ एप्रिल १६६९, सूर्यग्रहण होते त्या दिवशी. काशी येथे ग्रहणकाळात गंगेत स्नान करण्यासाठी आणि काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. अचानक काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. लोकांच्या किंकाळ्या उठू लागल्या. चारही बाजूंनी मुघली फौजेचे आक्रमण झाले. "बुतशिकन" आणि "गाझी" म्हणवणारे काशी विश्वेश्वराच्या मंदिरात घुसले. बारा ज्योर्तीलिंगांपैकी एक अत्यंत पवित्र धर्मस्थळ. मंदिरावर घणाचे घाव पडू लागले. मंदिरातील मूर्ती फुटू लागल्या. काशी विश्वेश्वराचा भंग झाला, कळस खाली आला मंदिर पूर्ण उध्वस्त झाले. त्या ठिकाणी मशीद उभारण्याचा हुकूम झाला. दिल्लीत बसलेला औरंगजेब नावाचा राहू हिंदू धर्माच्या सूर्याला ग्रासायला दिवसेंदिवस मोठा आ वासू लागला.
पाठोपाठ सोमनाथाचे मंदिर फुटले महादेवाचे दुसरे ज्योतिर्लिंग. इथेही मशीद उभी राहिली. काठेवाडातील पाठशाळा, मठ, आश्रम बंद झाले. धर्मपीठ बंद केले. होळी - दिवाळी वगैरे सण शहराबाहेर साजरी करण्याचा हुकूम पूर्ण मुघली राज्यात सुटला. तुमचे सण तुम्ही तुमच्या घरात साजरे करू शकत नाही.
औरंगजेबाने मोठमोठी मंदिरे उध्वस्त करायचा फतवा काढला. मथुरेत श्रीकेशवराजाचे प्रचंड मंदिर होते प्रचंड म्हणजे किती मोठे असावे? तर या मंदिराचे सोन्याने मढवलेले कळस आग्र्याहून दिसत ... आग्रा मथुरा हे अंतर चाळीस मैलांचे आहे. यावरून ते मंदिर किती भव्य दिव्य असेल? हे मंदिर बुंदेला राजा नरसिंहदेवाने तब्बल तेहतीस लाख रुपये खर्चून बांधले होते. १६७० च्या रमजानमध्ये हे मंदिर पाडायचा हुकूम सुटला. अब्दुन नबीखानाने मंदिर लुटले आणि मग जमीनदोस्त केले. केशवदेवाला उखडून आग्र्याला नेले आणि जहाँआराने बांधलेल्या मशिदीच्या पायाखाली पुरले. इतका राग का? तर दारा शुकोह याने त्या मंदिराला नवीन कठडे अर्पण केले होते. ही कृती इस्लामच्या विरुद्ध होती. मग मथुरेचे नाव इस्लामाबाद असे ठेवले.
औरंगजेबाने असदखानाला फर्मान पाठवले की मदीनापूर ते कटक या पट्ट्यात गेल्या दहा बारा वर्षात जितकी मंदिरे नव्याने बांधली ती पडून टाक. शेकडो मंदिरे उध्वस्त झाली. ढाक्यातील यशो-माधव मंदिर तोडण्याचा हुकूम बजावला गेला. राजपुतन्यातील खंडेला आणि सानुला परिसरातील मंदिरे दाराबखानाने फोडली. खान-इ-जहान याने जोधपूरजवळील एक भव्य मंदीर तोडून तिथल्या मूर्ती आणि जवाहिर बादशहासमोर ठेवले. जवाहिर खजिन्यात घेऊन त्या मूर्ती जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली गाडल्या.
उदयपूरवर केलेल्या स्वारीत उदयसागर तलावाशेजारील तीन भव्य मंदीरे फोडली. उदयपूर परिसरातील १७२ लहान मोठी मंदिरे पाडल्याचे हसन अली खानाचे एक पत्र उपलब्ध आहे. पाठोपाठ चित्तोड मधील ६३ मंदिरे जमीनदोस्त करावी असा हुकूम औरंगजेबाने सोडला. हुकुमाची तालीम झाली.
ही यादी केवळ १६८० पर्यंतची आहे. अजून अशी किती मंदिरे सांगू?? औरंगजेबाने कुठल्याश्या चार मंदिरांना कशी देणगी दिली होती म्हणून कागद फडकविणारी थोर सेक्युलर लोकं या शेकडो उध्वस्त मंदिराच्याबाबत कधी बोलणार?
"तीर्थक्षेत्रे मोडीली। ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली।
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला॥"
पण मग ही मंदिरे पाडली तेव्हा काहीच प्रतिकार झाला नाही का? तर काही ठसठशीत उदाहरणे मिळतात. शाही हुकूमानुसार सोरोनमधले सीताराम मंदिर फोडले व तिथल्या पुजाऱ्यांची मुंडकी मारली. आता वजीरखानाने गाडा बेग याला ४०० सैनिकांसह उज्जैन भोवती मंदिरे होती ती पाडायला पाठवले. पण तिथल्या एका जमीनदाराने आपल्या लहानश्या तुकडीसह तिखट प्रतिकार करून गाडा बेग याला त्याच्या १२१ सैनिकांसह ७२ हुरांजवळ पाठवून दिले.
केशवदेवाचे मंदिर पडणारा अब्दुन नबीखान तीन चार महिन्यांनी आग्र्याच्या आजूबाजूला हिंदूंकडून जबरदस्तीने जकात वसूल करायला गेला असताना तिलपतमधील गोकला नावाच्या एका जाट नेत्याने बंड पुकारले आणि अब्दुन नबीखानाला ठार केले. बाजूचा सदबादचा परगणा लुटला पार आग्र्याच्या परिसरात येऊन लुटालूट सुरू केली. अखेर हसनअली खानाने तोफखाना नेऊन जाटांवर आक्रमण केले. तब्बल बावीस हजार जाट गोकलाच्या अधिपत्याखाली लढाईला जमले. जोहार करण्याआधी कित्येक जाटांनी आपल्यानंतर मुघलांनी अब्रू लुटू नये म्हणून आपल्या बायकामुलांना स्वहस्ते ठार केले आणि मग ते तोफखान्यावर तुटून पडले हजारो जाट लाही भाजली जावी तसे भाजले गेले त्यांनी पाच हजार मुघल मारले. गोकला जिवंत हाती सापडला. त्याचा एक एक अवयव तोडून हाल-हाल करून ठार मारले.
दिल्लीच्या ईशान्येस ७५ मैलांवरील नरनौलजवळ सतानामी लोकांनी उठाव केला. ५००० सतानामी लोकांनी बादशाही सैन्याची लांडगेतोड सुरू केली. बादशाही फौज सर्वत्र मार खाऊ लागली. प्रतिशोध म्हणून नारनौलमधील बऱ्याच मशिदी पाडल्या.
विश्वेश्वराच्या विध्वंसाने दुखवलेले एक तपोराशी पंडित काशीहुन उठून दख्खनेत आले. उभ्या भारतात हिंदूंचा त्राता कोण? हिंदूंची ढाल कोण? तुर्कांचा काळ कोण? त्यांना एकच सिंहपुरुष दिसला - "या नावास छत्रसिंहासन हवे! म्हणजे जसा सभेत शिशुपाल नष्ट झाला तद्वत सगळेच गप्प होतील!" रायगडावर त्यांनी श्री शिवछत्रपतींना राज्याभिषेक केला. औरंगजेबाच्या छाताडावर हिंदूंचे सिंहासन उभे केले.
"बुडाला औरंग्या पापी। आनंदवनभुवनी।।"
पुढचा दैदीप्यमान इतिहास मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध आपण जाणतोच. मराठ्यांनी एक एक करत अटक ते कटक जम बसवला. या काळात काशी, मथुरा आणि अयोध्या सोडविण्याबद्दल नानासाहेब पेशव्यांची पानिपताआधीची काही पत्रं वाचण्यासारखी आहेत. पुढे मल्हारराव, अहिल्याबाई होळकर किंवा महादजी शिंदे यांनी ही स्थळे सोडविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या मनात शतकानुशतकांच्या कत्तलीची इतकी भीती बसली होती की स्थानिकांनी मराठ्यांना मशिद पाडून मंदिर उभे करू दिले नाही. तुम्ही आत्ता आहात उद्या तुम्ही निघून गेलात की दुआबात बसलेले पठाण इथे येऊन सैतान लाजेल असा नंगानाच करतील. नादिरशहाने वृंदावनात वडाच्या पारंब्यांना माणसे आणि गायीची शेकडो मुंडकी कशी लटकवली होती ते अनुभवले होते. मग लोकांच्या हट्टापुढे नाईलाजाने मशिदीच्या पलीकडे नवीन मंदिर बांधले पण मशिदीसमोरचा उध्वस्त न करता आलेला तो सात-आठ फुटी नंदी? तो मात्र आपल्या विश्वेश्वराची वाट बघत तिथेच भक्कम मांड ठोकून बसला कदाचित त्याची साधना आता फळाला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
- सौरभ वैशंपायन
=====
संदर्भ -
१) Short history of Aurangzeb - Sir Jadunath Sarkar
२) Storia do Mogor - Niccolao Manucci
३) The Emperor Who Never Was - Supriya Gandhi
४) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
५) शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
६) मुसलमानी रियासत (खंड २) - रियासतकार सरदेसाई
७) औरंगजेब: शक्यता आणि शोकांतिका - रवींद्र गोडबोले

आमचे हिंदूंत गगनाइतकी गोष्ट जाली असता उच्चार न करावा..

 


आमचे हिंदूंत गगनाइतकी गोष्ट जाली असता उच्चार न करावा..
___________________________________________
मराठ्यांच्या एकंदरीत मानसिकतेवर टाकणारं एक महत्वाचं पत्रं इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी इतिहाससंग्रहाच्या ऑक्टोबर १९०८च्या अंकात प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रं महत्वाचं का आहे? पुढे त्याबद्दलच सांगतो आहे..
इ.स.१७९२ मध्ये महादजी शिंदे दक्षिणेत आले आणि त्यांनी पुढे आपले दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांचा लग्नसोहळा उरकून घेतला. या लग्नसोहळ्याला नाना फडणवीस गेले असताना महादजीबावा आणि नाना या दोघांमध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण बोलणी झाली. या सगळ्या घटनेचा वृत्तांत नाना फडणवीसांनी पुढे पुण्यात आल्यावर हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांना लिहून कळवला. गोविंदराव काळ्यांना ही बातमी ऐकूनच इतका आनंद झाला की त्यांनी नाना फडणवीसांना उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात मराठ्यांच्या एकंदरच मानसिकतेबद्दल, शौर्याबद्दल आणि उदारतेबद्दल भरभरून लिहिलं. असो, फार वेळ न काढता आधी मूळ पत्रं देतो आणि मग पत्राचा आजच्या भाषेतील सारांश:
"विनंती ऐशी जे - राजश्री पाटीलबावा जामगावास आलियावर, तुकोजी शिंदे यांचे नातू, दौलतराव शिंदे, वय बारा वर्षांचे, त्यांच्या लग्नाचा निश्चय करून, श्रीमंतांस व मंडळींस अक्षद द्यावयाकरिता फडणीसास पाठवले. त्यांनी श्रीमंतांस व सर्व मंडळीस अक्षद दिली. सरकारांतून राजश्री गोविंदराव बाजीबराबर अहेर पाठविला. आम्ही आपला अहेर वेदमूर्ती राजश्री गोविंदभात यांजबरोबर पाठविला. त्यांसी व बावांसी निखालसतेचे बोलणे जाले. त्यात निखालसता बहुत पाहिली. नंतर मागाहून राजश्री आबा चिटणीस पुढे आले. त्यांसी बोलणे होऊन, परस्परे निखालसतेचा विध राजश्री हरिपंततात्यासुद्धा जाला. नंतर भेटीचा समारंभ जाला. कोणे गोष्टीचा संशय राहिला नाही. तुम्हांस कालविण्याकरिता लिहिले म्हणोन आज्ञा. ऐशियास पत्रं पावतीच रोमांच उभे राहून अति संतोष जाला. याचा विस्तार पत्री किती लिहू? सीमा असे. यावरून ग्रंथांचे ग्रंथ मनात आले. ते लिहिल्याने बहुचकपणा दिसतो. दिसो, परंतु जे मनात आले त्यातून किंचित अमर्याद करून लिहितो. एक एक रक्कम मनात आणून दीर्घ दृष्टीने तोलून पाहिल्यास खरे आहे असेच निघेल. ते काय? तपशील - अटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्रपावेतो हिंदूंचे स्थान ! तुरकस्थान नव्हे ! हे आपली हद्द पांडवांपासोन विक्रमाजित पावेतो. त्यांनी राखून उपभोग केला. त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले. यवनांचे प्राबल्य जाले. चकत्यांनी हस्तनापूरचे पद घेतले. शेवटी अलामगिराचे कारकीर्दीस यज्ञोपवीतास साडेतीन रुपये जेजया बसून ओले अन्न विकावे, सर्वांनी घ्यावे, हे नौबत गुजरली. त्या दिवसांत कैलासवासी शिवाजीराजे शककर्ते व धर्मराखते निघाले. त्यांनी किंचित कोन्यात धर्मसंरक्षण केले. पुढे कैलासवासी नानासाहेब भाऊसाहेब प्रचंडप्रतापसूर्य असे जाले, की असे कधी जाले नाही. अमुक ब्राह्मणांनी राज्य केले असे शास्त्री पुराणी वर्णन नाही. परशुराम अवतारी काय असेल ते असो. त्या गोष्टी यांस, शिंदे होळकर दोन बाजू होऊन प्राप्त जाल्या. हल्ली श्रीमंतांचे पुण्यप्रतापेंकडून व राजश्री पाटीलबावांचे बुद्धी व तरवारेच्या पराक्रमेकडून सर्व घरास आले. परंतु जाले कसे? प्राप्त जाले तेणेकरून सुलभता वाटली. अगर, मुसलमान कोणी असे, तरी मोठे मोठे तवारीखनामे जाले असते. यवनांच्या जातीत तिळाइतकी चांगली गोष्ट जाल्यास गगनाबराबर करून शोभवावी; आमचे हिंदूंत गगनाइतकी जाली असता उच्चार न करावा हे चाल आहे. असो. अलभ्य गोष्टी घडल्या. उग्याच दौलती पुसत घरास आल्या. यांचे संरक्षण करणे परम कठीण ! दोस्त दुश्मन फार. यवनांचे मनात की काफरशाई जाली, हे बोलतात. लेकिन ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थानात शिरे उचलली, त्यांची शिरे पाटीलबावांनी फोडली. कोणाच्याही मनात हे वाहाडलें, ते शेवटास जाऊ नये. यास्तव, नाना स्वरूपे व युक्तिकडून नाश करावे यैसे आहेत. न लाभाव्य त्या गोष्टी लाभल्या. त्यांचा बंदोबस्त शकाकर्त्याप्रमाणे होऊन उपभोग घ्यावे हे पुढेच आहे. कोठे पुण्याईत उणे पडेल आणि काय दृष्ट लागेल न कळे. जाल्या गोष्टी यात केवळ मुलुख, राज्य प्राप्त, इतकेच नाही, तरी वेदशास्त्ररक्षण, धर्मसंस्थापन, गोब्राह्मणप्रतिपालन, सार्वभौमत्व हाती लागणे, कीर्ती व यश यांचे नागरे वाजणे, इतक्या गोष्टी आहेत. हे किमया सांभाळणे हक्क आपला व पाटीलबावांचा ! यात वेत्यास पडला की दोस्त दुश्मन मजबूद. संशय दूर जाले, हे अति चांगले ! अति चांगले ! याउपरी हे जमाव व फौजा लाहोरच्या मैदानात असाव्या, यांचे मनसबे दौडावे. वेत्यास पडावे, तमाशे पाहावे, असे जन जे आहेत ते उशापायथ्यास लागून आहेत. चैन नव्हते. आता आपण लिहिल्यावरून स्वस्थ जाले. जितके लिहिले इतक्याचे उगेच मनन व्हावे. खरे की लटके हे समजावे. रवाना, छ ११ जिल्काद हे विनंती".
वरील पत्रात, विनंती ऐशी जे नंतर "राजश्री पाटीलबावा जामगांवास आलियावर" पासून ते "तुम्हांस कळवावयाकरीत लिहिले" पर्यंतचा मजकूर हा आधीच्या नाना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रातील आहे. पूर्वी एखाद्या पत्रात, नेमक्या कोणत्या पत्राला आपण उत्तर देत आहोत हे समजण्यासाठी आधीचे पत्र उद्धृत करण्याची पद्धत असे. नाना फडणवीसांनी घडलेला वृत्तांत कथन केला आहे, तो आणखी सोपा करून सांगण्याची फारशी आवश्यकता नाही. यानंतर "ऐशियास पत्रं पावताच रोमांच उभे राहून.." पासूनच पुढील मजकूर गोविंदराव काळ्यांचा आहे.
नाना फडणवीसांचं हे पत्रं वाचताच गोविंदराव काळ्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले ! याचं कारण, महादजी कित्येक वर्षे दक्षिणेत आले नव्हते, आणि सालबाईच्या तहानंतर नाना-महादजींमध्ये वितुष्ट आल्याच्या अनेक खबरा उठत होत्या. या दोघांमध्ये काही वाद निश्चित होते, पण शेवटी उत्तर पेशवाईत राज्य सांभाळणारे हे दोघे कर्तृत्ववान पुरुष, कुठे ताणायचं, कुठे सांभाळून घ्यायचं हे दोघांनाही माहित होतं. वकील-इ-मुतालिकीच्या प्रकरणात महादजींविषयी काही काळ साऱ्यांना संशय आला होता, पण मधल्या लोकांचे हे उपद्व्याप असल्याचं नंतर नानांच्याही लक्षात आलं. पुढे महादजी चार वर्षांनी स्वतः दक्षिणेत आले आणि या लग्नाच्या सुमारास नाना-महादजी बसून बोलणी झाली त्यात सारे संशय दूर झाले. यामुळेच गोविंदराव काळ्यांना अत्यंत आनंद झाला. गोविंदराव म्हणतात, "माझ्या आनंदाला पारावार नाहीये, इतकं की ग्रंथच्या ग्रंथ लिहून होतील. हे सगळं लिहिलं तर भोचकपणा करतोय असं वाटेल. पण असो, जे मनात आलं तेवढं तरी लिहितो. मी जे काही लिहितोय ते नीट पाहिल्यास खरंच आहे असं तुमच्याही लक्षात येईल. काय? त्याचा तपशील असा". असं म्हणून गोविंदरावांनी मुख्य मुद्द्याला हात घातला आहे.
गोविंदराव लिहितात, "अटक नदीपासून तिच्या अलीकडे, दक्षिण समुद्रापर्यंत (म्हणजे सिंधुसागर-हिंदी महासागरापर्यंत) सगळं आहे ते हिंदूंचं स्थान, प्रदेश. हे तुर्कस्थान म्हणजे यवनभूमी नव्हे. ही आपली हद्द अगदी पांडवांपासून ते विक्रमादित्यापावेतो चालत आली आहे. त्यांनी राखून या भूमीचा उपयोग केला, त्यानंतर मात्र इतर राज्यकर्ते नादान निघाले आणि सर्वत्र यवनांचं प्राबल्य झालं. चकत्यांनी (मुघलांनी) हस्तिनापूर घेतलं. शेवटी आलमगीराच्या म्हणजे औरंगजेबाच्या कारकिर्दीत दर यज्ञोपवीतास साडेतीन रुपये जिझिया कर लावण्यात आला. म्हणजे प्रति ब्राह्मणास साडेतीन रुपये जिझिया. ओले अन्न विकावे (याचा नेमका अर्थ काही समजत नाही, बहुदा मांस असावं), सगळ्यांनी घ्यावं अशी नौबत आली. या दिवसांत केवळ कैलासवासी शिवाजी महाराज शककर्ते आणि धर्म संरक्षण करणारे निघाले. त्यांनी एका कोपऱ्यात (वर जो अटकेपासून दक्षिणेपर्यंतचा प्रदेश दिला आहे त्याच्या तुलनेत), म्हणजे दख्खनच्या काही भागात धर्मसंरक्षण केलं. पुढे, कैलासवासी नानासाहेब आणि सदाशिवरावभाऊ हे प्रचंडप्रतापसूर्य असे झाले की त्यांच्यासारखे तेच. शास्त्रपुराणात कधी ब्राह्मणांनी राजय केल्याचं वर्णन नाही, परशुराम अवतारीच जे काही झालं असेल ते. पण ते या दोघांना होऊन, शिंदे होळकर हे जणू काही दोन बाजू, म्हणजे डावे उजवे हातच झाले. हल्ली श्रीमंतांच्या पुण्यप्रतापाने आणि राजश्री पाटीलबावांच्या बुद्धी आणि तलवारीच्या पराक्रमाने सगळं काही प्राप्त झालं. पण हे कसं झालं? झाल्यामुळे सुलभता वाटली खरी". (अर्थात याला प्रचंड कष्ट पडले, आणि पाटीलबावांनी ते सोसले असा याचा अर्थ).
गोविंदराव काळे पुढे लिहितात, "पाटीलबावांच्या जागी कोणी मुसलमान असता तर मोठं मोठे तवारिखनामे झाले असते. म्हणजेच पराक्रमाच्या लांबच्या लांब बखर लिहिल्या गेल्या असत्या. यवनांच्या जातीत तिळाइतकी गोष्ट झाली तरी अगदी काही आभाळाएवढं झालं आहे असं दाखवावं, आणि आमच्याकडे हिंदूंमध्ये मात्र आभाळाएवढी झाली तरी त्याचा फारसा उच्चार न करण्याची चाल आहे, अर्थात, आम्ही इतके साधे आहोत की उगाच कौतुकात रमणं आमच्या रक्तातच नाही. असो, फार मोठ्या गोष्टी घडल्या, मोठ्या दौलती म्हणजे मोठमोठे प्रांत स्वराज्यात आले. या सगळ्याच संरक्षण करणं मात्र महा कठीण आहे. आपल्याला शत्रू-मित्र फार आहेत. यवनांच्या मनात ही खदखद फार आहे की ही आता 'काफरशाही' म्हणजे हिंदूंचं राज्य झालं आहे. पण, ज्यांनी ज्यांनी आपल्याविरुद्ध हिंदुस्थानात डोकी वर काढली त्या त्या सर्वांची डोकी पाटीलबावांनी फोडली. कोणाच्याही मनात आमच्याविषयी किल्मिष आलं असता ते शेवटास जाऊ नये हाच हेतू, यामुळेच शत्रूही नाना युक्त्या करून आपल्या नाशावर टपून बसले आहेत. ज्या न लाभाव्य त्या गोष्टीही लाभल्या, त्यामुळे याचा उपयोग आता शककर्त्यांप्रमाणे, म्हणजे शिवछत्रपती महाराजांप्रमाणे करून उपभोग घ्यावा हे उत्तम. उगाच कुठे पुण्यात उणे पडेल, कुठे दृष्ट लागेल हे समजणार नाही. या ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या सामान्य नाहीत, केवळ मुलुख आणि राज्य प्राप्त झालं एवढ्याच नाहीत. यात 'वेदशास्त्रसंरक्षण, धर्मस्थापना, गोब्राह्मणप्रतिपालन, सार्वभौमत्व, यशकीर्ती' इत्यादी अनेक गोष्टी आहेत. हे आता योग्यपणे सांभाळणं हा आपला (नानांचा) आणि पाटीलबावांचा (महादजीचा) हक्क म्हणजेच जबाबदारी आहे. यात व्यत्यास आला, म्हणजेच यात ढिलाई आली तर शत्रूचाच फायदा आहे. आपल्या दोघांमधले संशय दूर झाले हे अति चांगलं झालं. याउपरी या फौज आता अगदी लाहोरच्या मैदानातही उतरावाव्यात, अर्थात तो प्रांत पुन्हा आपल्याकडे घेण्याची वेळ आता योग्य आहे. असं झाल्याने उशापायथ्यास बसलेले जे जे वाईटावर टपले आहेत ते निपचित पडून राहतील. मला इतकी वर्ष चैन नव्हतं, आता आपण सविस्तर लिहिल्यावरून स्वस्थ वाटतं आहे. कळावे".
या संबंध पत्रात मला आवडलेली एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे "आमच्या लोकांमध्ये कितीही प्रचंड कौतुकास्पद गोष्ट घडली तरी आम्ही विनयशीलपणे फारसं कौतुक करून घेत नाही, आणि त्यांच्याकडे अगदी तिळाएवढं घडलं तरी आभाळाएवढं काही काम केलं आहे असं सांगतात" ही होय. जाता जाता सहज एक गम्मत सांगतो, कोकणच्या स्वारीत बाजीरावांविषयी आणि चिमाजीअप्पांविषयी अंतर्गत शत्रूंनी छत्रपती शाहू महाराजांचे कान भरले. महाराज भर दरबारात भडकले आणि महादोबा पुरंदऱ्यांना बोलले. पुढे महाराजांना हवं तसंच काम चिमाजीअप्पांनी कोकणात करून दाखवलं. महाराजांना खात्री पटली की हे दोघे भाऊ उगाच बोलत नाहीत, कामं मनाप्रमाणे करून दाखवतात. तरीही सहज महाराजांनी पेशव्यांचे मुतालिक महादोबा पुरंदरे यांना बोलावून विचारलं, "सदरेवर आम्ही इतक्या इरेच्या गोष्टी बोललो, अगदी लागेल असं बोललो, तरीही त्यावर तुम्ही काहीच कसं म्हणाला नाहीत?" यावर महादोबा पुरंदऱ्यांनी अतिशय थंडपणे उत्तर दिलं, "वरकडाचा कारभार महाराजांपासी बोलावे फार आणि करावे थोडे; आणि आमच्या खावंदांचा (पेशव्यांचा) दंडक, करावे फार आणि बोलावे थोडे हे पहिल्यापासून महाराजांस विदित आहे", म्हणजेच इतर लोक लहानशी गोष्ट करून मोठ्या फुशारक्या मारतात आणि आमचे खावंद (पेशवे बंधू) हे प्रचंड गोष्टी करतात पण त्याचा गाजावाजा मात्र करत नाहीत". हे पत्रं पेशवे दप्तरातून निवडलेले कागद खंड ३, लेखांक १३५ म्हणून सरदेसाईंनी प्रसिद्ध केलं आहे.
असो. एकंदरीतच असे होते मराठे !
- © कौस्तुभ कस्तुरे
स्रोत: इतिहाससंग्रह, पुस्तक १ ले, अंक ३ रा, ऑक्टोबर १९०८, ऐतिहासिक टिपणे लेखक १३

७ कमेंट्स



बनारस आणि मराठे !

 


बनारस आणि मराठे !
दिल्ली हादरवून सोडल्यानंतर उत्तर भारतात मराठ्यांची चांगलीच जरब बसली होती. मध्य भारतात एक प्रमुख शक्ती केंद्र म्हणून मराठा साम्राज्य उदयास आला होता. आधुनिक बनारस ही मराठ्यांचीच देण आहे. बनारस हे शहर अनेकदा आक्रमकांकडून तोडलं गेलं आणि पुनर्स्थापित केलं गेलं. मात्र बनारसला त्याचं हिंदू स्वरूप आणि त्याच्या प्राचीन संस्कृतीची ओळख मराठ्यांनीच मिळवून दिली. १७-१८व्या शतकातील काही काळ काशी किंवा बनारस मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होता. याठिकाणी सिंधिया (शिंदे), होळकर, भोसले आणि पेशवा कुटुंबियांच्या सरदारांनी, राजांनी बनारसच्या गंगा घाटांचा निर्मिती आणि इतर घाटांचा जीर्णोद्धार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच याठिकाणी अनेक मंदिरं आणि धर्मशाळासुद्धा मराठ्यांनी बांधल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशी स्थित गागा भटांनीच केला होता. तसेच आग्राच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर महाराज काही दिवस काशीमध्ये वास्तव्यास होते, असाही उल्लेख आढळतो.
नागपूरच्या शाही मराठा घराण्याने येथील दरभंगा घाटाची निर्मिती केली होती. या घाटावर १८व्या शतकातील मराठा वास्तुकलेचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहू शकता. तसेच येथील सिंधिया घाट, बाजीराव घाट, राजा ग्वालीयर घाट, मणिकर्णिका घाट, राजा घाट, अहिल्या घाट इ. घाट मराठ्यांनीच बांधले आहेत. गंगा घाटांवरील सर्वात प्रसिद्ध घाटांपैकी एक असलेला दशाश्वमेध घाटसुद्धा पेशवा नानासाहेब यांच्या आदेशानुसार सदाशिव नाईक या मराठा सरदाराने १७३५ मध्ये बांधले. नारायण भट पैठणकर नावाचे पंडित काशीमध्ये होते, त्यांनी याठिकाणी दुर्गा घाट, ब्रह्म घाट, विलोचन घाट हे तीन घाट बांधले होते. मुंशी घाट हा नागपूरच्या भोसले घराण्याचे अर्थमंत्री श्रीधर नारायण मुंशी यांनी १८१२ ते १९२४ दरम्यान बांधला होता. १९व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा राणी बायजाबाई सिंधिया (शिंदे) यांनी गाय घाट आणि सिंधिया घाट बांधून घेतला.
बनारसला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं खरं श्रेय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जातं. औरंगजेबाने बाटवलेलं काशी विश्वनाथ मंदिर अहिल्याबाईंनी पुनर्स्थापित केलं, तसेच अनेक मोडकळीस आलेल्या घाटांचा जीर्णोद्धारही केला, अनेक मंदिरे बांधली. पंचगंगा घाटावर असलेला दीपस्तंभदेखील अहिल्याबाईंनी बांधला आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे येथील एका घाटाला अहिल्या घाट असे नाव दिलं गेलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजेच मणिकर्णिका तांबे यांचा जन्मदेखील बनारसचाच आहे.
मराठ्यांनी कधीही बनारसवर थेट राज्य करण्याचं ठरवलं नाही. त्यांनी काशी, अयोध्या, मथुरा असे अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र आक्रमाकांकडून वाचवण्यासाठीच लढा दिला. मध्य भारत मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आल्यानंतर या क्षेत्रांवर हल्ला करण्याची धमक कोणामध्येही उरली नाही!
जयोस्तु मराठा!🚩
- सागर जाधव

काशीविश्वेश्वर आणि ज्ञानवापी

 


काशीविश्वेश्वर आणि ज्ञानवापी
--------------------------------------------
गेल्या जवळपास काही महिन्यांपासून ज्ञानवापीचं नाव चर्चेत आहे, आणि नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळे ते प्रामुख्याने पुढे आलं आहे. वाराणसीत असलेल्या मूळ काशीविश्वेश्वराची ही जागा, ती मोंगल अमदानीत बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली असं काहीसं हे प्रकरण. अर्थात, या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे हे बऱ्याच मराठी लोकांना माहीत नसेल. म्हणूनच, एकंदरीतच ही ज्ञानवापीच्या वादाची गोष्ट काय आहे ते थोडक्यात पाहू.
काशीचा विश्वेश्वर म्हणजे हिंदुधर्मीयांचं अतिशय मानाचं श्रद्धास्थान. काशीचा जुन्यातला जुना उल्लेख स्कंद पुराणांतर्गत असलेल्या शंभर अध्यायाच्या काशीखंडात येतो. स्कंद पुराणाचा लेखनकाल निश्चित करता येत नसला तरीही तो गुप्तांच्या कारकिर्दीच्या आधीच असल्याचं दिसून येतं. गुप्त कालखंडात मात्र काशीविश्वेश्वराचं रूप अतिशय भव्य आणि उत्तुंग होतं असं तत्कालीन वर्णनावरून दिसून येतं. ह्युएन त्संग नावाचा एक चिनी प्रवासी याच कालखंडात भारताच्या दौऱ्यावर असताना त्याने वाराणसीबद्दल काही नोंदी केल्या आहेत. तो लिहितो, "राजधानी (काशी) हे एक दाट लोकवस्तीचं शहर आहे. इथे कुटुंबे खूप श्रीमंत आहेत. लोकांचा स्वभाव मृदू आणि माणुसकी असलेला आहे. इथल्या लोकांना ज्ञानार्जनासाठी खूप दान दिले जातं". ह्युएन त्संगने विश्वेश्वराचं मंदिर किती भव्य आहे त्याबद्दलही काही नोंदी केल्या आहेत.
गुप्तकाल हा मध्ययुगीन भारतातला हिंदुत्वाचा एक सुवर्णकाळ मानला जातो. गुप्तांची राजवट संपली तरी धर्माचा प्रभाव कळसाला पोहोचला असतानाच, पश्चिमेकडून, सिंध प्रांतावर बिन कासीमच्या निमित्ताने पहिलं परकीय आक्रमण झालं आणि हळूहळू या सगळ्या धार्मिक परंपरेवर काळ्याकुट्ट ढगांचं सावट येऊ लागलं. दरम्यानच्या काळात काशीच्या विश्वेश्वरावर दोनदा हल्ले झाले. पहिला हल्ला झाला तो बारावं शतक संपत असतानाच. दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या मुहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने कनौजचा सारा प्रांत जिंकून घेतला, आणि याच गोंधळात विश्वेश्वराच्या मंदिराला तोशीस लागली. जवळपास हजार एक मंदिरं फुटली, तिथे मशिदी उभ्या राहिल्या वाराणसी हे हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने तिथे गाझी सैन्याने काय धुमाकूळ घातला हे घोरीच्या दरबारातल्या हसन निझामी याने लिहिलेल्या 'ताज-उल-मासिर' मध्ये वाचायला मिळत. याचा अनुवाद एलियट आणि डॉसनच्या दुसऱ्या खंडात वाचायला मिळेल. पुढे पन्नास एक वर्षानंतर अल्तमशच्या कारकिर्दीत एका व्यापाऱ्याने हे मंदिर पुन्हा पूर्ववत केलं. या सगळ्याला दोनशे वर्ष उलटतात न उलटतात तोच लोधीच्या कारकिर्दीत पुन्हा विश्वेश्वरावर धाड आली, आणि मंदिर उध्वस्त होऊन तिथे मशीद उभी राहिली, आणि पुढची जवळपास शंभर-सव्वाशे वर्षे हि मशीद अशीच उभी होती. इथून काशीविश्वेश्वराशी महाराष्ट्राचा थेट संबंध सुरु होतो.
लोधी राजवटीत नष्ट झालेलं मंदिर पुन्हा उभारण्याचा निश्चय केला तो एका प्रकांड पंडिताने, एका मराठी धर्मपंडिताने. नारायण भट्ट हे त्यांचं नाव. भट्ट ऐकून चकित झालात ना? हो, तुमचा अंदाज बरोबर आहे. हे नारायण भट्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणाऱ्या गंगा भट्टांचे पणजोबा. मूळचे पैठणचे असलेले हे भट्ट काशीत तेव्हापासून स्थायिक झाले आणि पुढे गागाभट्ट काशीहून महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रात आले. ती कथा पुढे येईलच. नारायण भट्टांनी उभं केलेलं हे मंदिर कसं होतं याबद्दल आपल्याकडे उल्लेख आहेत. पीटर मंडी नावाचा एक ब्रिटिश फॅक्टर सतराव्या शतकात भारतात आला असताना त्याने आपल्या फिरस्तीत काशीविषयी नोंद केली आहे. दि. ४ सप्टेंबर १६३२ रोजी मंडी वाराणसीत पोहोचला. त्याने वाराणसीविषयीसुद्धा लिहिलं आहे, पण खासकरून तो काशीविश्वेश्वराच्या मंदिराबद्दल लिहितो, "वाराणसीत अनेक मंदिरे आहेत, पण त्यातला मुख्य मंदिराला "काशीविश्व" (Cassibessuua) म्हणतात, जे महादेवाचं मंदिर आहे. मी त्या मंदिरात गेलो. त्याच्या मध्यभागी एक दगड असून त्याचा आकार काहीसा (मध्यभागी फुगीर असलेल्या, आणि बाजूनी गोलाकार पसरलेल्या) हॅट सारखा होता. हा दगड खडबडीत, काहीसा धातूंनी वेष्टित असून त्यावर लोक गंगेच्या पाण्याची, फुलांची, तांदुळाची आणि लोण्याची वगैरे वृष्टी करत होते. या सगळ्याच एक जणू काही मिश्रण होऊन ते (दगडावरून) ओघळत होतं. यासोबतच असलेले ब्राह्मण काहीतरी अगम्य भाषेत वाचत आणि बोलत होते. या साऱ्याच्या वर एक किनखापीचा तंबू उभारलेला असून तिथेच अनेक दिवे लावलेले होते". हे वर्णन वाचताना मंडीने काढलेलं तत्कालीन काशीविश्वेश्वराचं रेखाचित्रं सुद्धा पाहिल्यास अंदाज येईल.
नारायण भट्टांनी उभारलेलं हे काशीविश्वेश्वराचं मंदिरही जेमतेम सव्वाशे वर्ष उभं होतं. कारण मुघल सत्ता कळसाला पोहोचली असतानाच सम्राट औरंगजेबाचं धर्मवेड अचानक उफाळून आलं, आणि त्याने जणू काही हिंदुस्थानातील मंदिरं जमीनदोस्त करण्याचा सपाटाच लावला. औरंगजेबाची ही धर्मांधता काही नव्याने उफाळून आलेली नव्हती. पूर्वी, इ.स. १६४४ मध्ये गुजरातचा सुभेदार असताना औरंगजेबाने अह्मदाबादमधील चिंतामणीचे देवालय त्यात गायची कत्तल करून बाटवलं, आणि त्या मंदिराचं रूपांतर एका मशिदीत केलं. नंतर त्याने त्या प्रांतातली सारी मंदिरं पाडून टाकली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने ओरिसा प्रांतात गेल्या दहा बारा वर्षात बांधलेलं एकूण एक मंदिर पाडून टाकण्याचा हुकूम सोडला होता. मासिर-ए-अलामगिरीत स्पष्ट नमूद केलं आहे की (दि. ९ एप्रिल १६६९ रोजी) औरंगजेबाने एक फतवा काढला की, "काफ़िरांचि सर्व देवालये पाडून टाकण्यात यावी आणि काफरांच्या धार्मिक चालीरीती आणि शिकवणूक यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्यात यावा". या हुकुमाची अंमलबजावणी करायला तत्परतेने सुरुवात झाली. पुढच्या चार महिन्यांतच काशीविश्वेश्वरावर गाझी चालून गेले आणि ऑगस्ट १६६९ मध्ये काशीविश्वेश्वर भंगला. नेमकं मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला ही कुणकुण आधीच लागल्याने त्याने विश्वेश्वराचं शिवलिंग मंदिरातून आधीच बाहेर काढून शेजारीच असलेल्या विहिरीत सोडलं. याच सुमारास काशीतील बिंदुमाधव, मथुरेतील केशवराय वगैरे कितर मंदिरेही धर्मवेड्या गाझिंच्या आक्रमणाला बळी पडली. औरंगजेबाची ही सगळी फर्मानं आणि फतवे 'द रिलिजिअस पॉलीसी ऑफ द मुघल एम्पेरर्स' या श्री राम शर्मा यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहेत, अभ्यासूंनी ती नक्की पाहावीत. आपल्याकडे जेधे शकावलीत उल्लेख आहे, "शके १५९१ सौम्यनाम संवत्सरे, भाद्रपदमासी औरंगजेबानी कासीस उपद्रव केला. देवालये पाडिली". एकंदरीत औरंगजेबाने काशीविश्वेश्वराचं मंदिर पाडलं. पुढे हे मंदिर पूर्ण नष्ट करण्याऐवजी त्याच्या उरल्यासुरल्या भागाचा उपयोग करून तिथे मशीद उभारण्यात आली, ज्या मंदिराचे अवशेष आजही पाहायला मिळतात. विश्वेश्वराचं शिवलिंग हे शेजारच्याच विहिरीत होतं. ही विहीर म्हणजे जणू काही गंगेचाच एक झरा होता. ज्ञानाची विहीर, ज्ञानवापी!
काशीचा विश्वेश्वर मुक्त करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा नक्कीच असणार, पण ती थेट कुठेही नमूद केलेली मला आढळली नाही. पण शिवछत्रपती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य असलेल्या, पुढच्या काळात औरंगजेबाला त्राही करून सोडणाऱ्या मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य यांनी कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजांसाठी एक ग्रंथ निर्माण केला. सर्वसाधारणपणे त्याला 'आज्ञापत्र' म्हटलं जातं. या आज्ञापत्रात अनेक ठिकाणच्या उल्लेखांवरून महाराजांची इच्छाही काशीविश्वेश्वर मुक्त करण्याची असावी असं स्पष्ट दिसतं. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी "यवनाक्रान्त राज्य आक्रमावे, अवनीमंडळ निर्यावनी करावे हा निगूढ चित्ताप्राय प्रकट करून, पूर्व, पश्चिम, दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल जाहली होती त्यावरी सेनासमुदाय प्रेरून मारून काढिले" असं म्हटलं आहे. यापुढे अमात्यांनी एक कर्तव्य म्हणून "श्री वाराणसीस जाऊन स्वामी (छत्रपती) विश्वेश्वर स्थापना करीत; तावत्काळपर्यंत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्रीमत्सकलतीर्थौकतीर्थ श्रीमन्मातुश्री राहिली आहेत" असं म्हटलं आहे. ज्यावरून अगदी १७१५-१६ मध्ये सुद्धा रामचंद्रपंत अमात्य जर हे म्हणत आहेत तर ज्यांच्या कारकिर्दीत काशीविश्वेश्वर भंगला त्या शिवाजी महाराजांना त्याची पुनर्स्थापना करायची नसल्यासच नवल.
थोरल्या बाजीराव पेशव्यांना देखील काशीविश्वेश्वराची पुनर्स्थापना करायची असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. बाजीराव गेल्यावर चिमाजीअप्पांनी एका पत्रात म्हटलंय, "रायाचीही बुध रयत प्रतिपाळणास पूर्ण, देवब्राह्मणांची स्थापना करून, काश्यादिक महास्थळी विश्वेश्वराच्या जीर्णोद्धार करावयास निरत होऊन त्याच मार्गेकरून रयत नांदविली. विश्वेश्वराचे स्थापना करावी हे आर्त होतीच". हे पत्रं हिंगणे दफ्तरात प्रसिद्ध झालं आहे. या पत्रात अप्पा पुढे म्हणतात की रायांची अपूर्ण राहिलेली ही इच्छा पूर्ण करायला आता त्यांचा पुत्र गादीवर आला आहे. बाजीरावांचा पुत्र म्हणजेच थोरले नानासाहेब पेशवे. नानासाहेबांच्या इतर पत्रांमधून सतत काशी आपल्याकडे यावी हेच राजकारण दिसून येतं. नानासाहेबांची काव्येतिहास संग्रहात आणि पेशवे दप्तरात प्रसिद्ध झालेली पत्रे अभ्यासूंनी जरूर पाहावीत.
इ.स. १७४२ मध्ये नानासाहेबांनी काशी जिंकून घेण्यासाठी पावलं उचलली होती. यासंबंधी पेशवे शकवलीत इत्यंभूत वर्णन केलं आहे. दि. २७ जानेवारी १७४३ रोजी पेशवे फौजेसह प्रयागला स्नानासाठी आले. तिथून पुढे दि. ९ फेब्रुवारी १७४३ रोजी नानासाहेबांचा मुक्काम काशीच्या दक्षिण तीरावर रामपुरा इथे झाला. या शकावलीत स्पष्ट उल्लेख आहे, "श्रीमंतांच्या मनात काशीक्षेत्र हस्तगत करावे म्हणून आल्यावर स्वारीच्या ढाला काशीकडे फिरविल्या". यावेळेस काशीचा अधिकारी सफदरजंग हा असून त्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याची बोबडी वळली. त्याने भरभर काशीतल्या नारायण दीक्षित पाटणकर आणि तर साऱ्या ब्राह्मणांना बोलावून सरळसरळ धमकी दिली की, "पेशवा काशी घ्यायला येतोय त्याला माघारी फिरवा. नाहीतर तुम्हा साऱ्यांना मुसलमान करीन". झालं. हे दीक्षित आणि इतर ब्राह्मण घाबरून उघडेबोडके होऊन, जिथे नानासाहेबांचा मुक्काम होता तिथे, गंगेच्या दक्षिण तीरावर ऐन रात्री आले. श्रीमंतांना ही गोष्ट समजली तेव्हा ते डेऱ्याबाहेर येऊन विचारू लागले की, "दीक्षित उघडेबोडके होऊन का आले?" दीक्षितांनी सारा घडला प्रकार नानासाहेबांना सांगितला. यावेळेस काशी घेणे हा मुख्य हेतू नसून बंगालात जाऊन अलिवर्दिची भेट आणि तिथे व्यवस्था लावणे हा मुख्य हेतू होता, त्यामुळे नानासाहेबांनी आपला काशी घेण्याचा बेत तूर्तास रहित केला. याचं कारण म्हणजे, केवळ काशी घेऊन चालणार नव्हतं, आजूबाजूचा प्रदेशही निर्धोक करणं गरजेचं होतं. न जाणो जर नानासाहेबांची पाठ वळताच आजूबाजूच्या लोकांनी आणि सफदरजंगाने पुन्हा गडबड केली असती तर काशीत पुन्हा कत्तली झाल्या असत्या. नानासाहेबांनी यातून वेगळीच तोड काढली जी त्यांच्या पुढच्या आयुष्यातील पत्रांवरून दिसून येते. हाच सफदरजंग पुढे वजिरी मिळाली तेव्हा नानासाहेबांचा अक्षरशः चाहता बनत चालला. बादशाहीचं रक्षण केवळ मराठेच करू शकतात असं म्हणून यानेच प्रसिद्ध अहमदिया करार करून दिला. असो, मुख्य मुद्दा हा की १७४३ मध्येही काशी आपल्याकडे येण्याचं आणि विश्वेश्वर स्थापन होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आणखी एका उल्लेखानुसार, मल्हारराव होळकरांना नानासाहेबांनी काशी घ्यायला पाठवलं होतं. होळकरांच्या कागदांत यासंबंधी असलेला उल्लेख असा, "मल्हारजीने छावणी अंतर्वेदीत केली. त्यांचे चित्तात की, मशीद, विश्वेश्वराचे ज्ञानवापीजवळील, ते पाडून देवालय करावे. परंतु द्राविडी ब्राह्मण चिंता करितात की हे मशीद प्रसिद्ध आहे. यवन प्रबळ या प्रांती विशेष आहे. यावर मशीद पाडू लागतील तेव्हा सर्व ब्राह्मण मिळतील आणि श्रीमंतांस विनंतीपत्र पाठवतील".
माधवरावांनी मृत्यूसमयी नऊ कलमी यादी केली होती ज्यात "काशी व प्रयाग ही स्थळे सरकारात यावी असा तीर्थरुपांचा हेतू होता" असं म्हटलं आहे. थोडक्यात, माधवरावांच्या आयुष्यातही त्यांचं हे स्वप्नं पूर्ण झालं नाही.
नानासाहेब आणि मल्हारराव होळकर यांचं हे स्वप्न पुढे अहिल्याबाई होळकरांनी अंशतः पूर्ण केलं. काशी सुरुवातीला पूर्णतः अयोध्येच्या नवाबाकडे असल्याने तो काशीचा ताबा मराठ्यांना द्यायला कधीच तयार नव्हता. पानिपतनंतर बादशाहने काशी इंग्रजांना देऊन टाकल्याने पुढच्या काळात किमान ज्ञानवापी पाडता येत नसली तरी काशीत विश्वेश्वर पुन्हा उभा राहावा यासाठी अहिल्याबाईंनी प्रयत्न सुरु केले. इ.स. १७८५ च्या सुमारास काशीविश्वेश्वराचे मंदिर, ज्ञानवापी आणि मशिदीला लागून दक्षिणेला पुन्हा नव्याने बांधण्यात आले. इथे नव्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली असं दिसतं. महेश्वर दरबारची बातमीपत्रे मध्ये अहिल्याबाईंच्या या कामाचे त्रोटक उल्लेख सापडतात. इ.स. १७८९ मध्ये नाना फडणवीसांनी महादजी शिंद्यांना कळवलं होतं की, "श्रीकाशीत विश्वेश्वराचे देवालय, हजार वर्षांचे सर्वांस ठाऊक आहे. त्यास अलीकडे पातशाहीत कोणी काय समजावून मशीद केली. त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन, पूर्ववत देवालय व देवस्थापना व्हावी हे हिंदुधर्मास योग्य आहे. ह्या काळी पातशहाजवळ उद्योग केल्यास होईल असं आहे. त्यास, असम झालं पाहिजे की पुन्हा कोणाचा त्यावर दावा राहता कामा नये. पूर्वापार असलेला मजकूर पातशाहाला समजावून पुढे कधीच कोणाकडूनही उपद्रव होणार नाही असं पत्रं त्याच्याकडून घ्यावं. सांप्रत काशीत इंग्रजांचा अंमल आहे, ते कोणाच्याही धर्माला अडथळा करत नाहीत. त्यांच्याशी आपल्याला सहज बोलता येईल. विश्वेश्वराच्या ठिकाणी वस्ती कोणाची असल्यास त्यांना त्याचा मोबदला दिला जाईल, पण पातशाहाची परवानगी निर्वेधपणे झाली पाहिजे. मथुरा, वृंदावन ही स्थळे देखील सरकारात असावीत". पण दुर्दैवाने पुढे पाटीलबावांकडून यावर फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्या प्रदेशात अजूनही मोठ्या प्रमाणावर असलेल्या मुस्लिम सरदारांच्या दबावामुळे महादजींना यावर तात्काळ काही हालचाली करता येत नव्हत्या. याही वेळेस ते काम अर्धवट राहिलं.
अहिल्याबाईंनी काशीत अनेक धार्मिक कामे केली. ज्यात मणिकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट वगैरे घाटांचे पुनर्निर्माण, गंगामूर्ती व इतर लहानसहान मंदिरे, धर्मशाळा, चौथरे वगैरे बांधण्यात आले. थोरल्या बाजीरावांच्या काळात, १७३५ पासून काशीत घाट बांधण्याचा प्रारंभ झाला. बाबूजी नाईक बारामतीकरांचे वडील सदाशिव नाईक यांनी बाजीरावांना पाठवलेली पत्रे आज उपलब्ध झाली आहेत. तिथपासून सुरुवात होऊन अहिल्याबाईंच्या कारकीर्दीपर्यंत ही धार्मिक कार्ये मराठ्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली.
एकंदरीत, अशी आहे मूळ काशीतील मूळ विश्वेश्वर, त्याची एकदा नव्हे तर तीनदा झालेली मशीद; आणि शेजारच्याच 'ज्ञानवापी'ची गोष्ट.
© कौस्तुभ कस्तुरे
बदलापूर
-------------------------------------

बाजीरावांची रजपूताना मोहीम - सन १७३५-३६

 



बाजीरावांची रजपूताना मोहीम - सन १७३५-३६
अठराव्या शतकात मराठ्यांबरोबर अनेक सत्तांचा उदय झाला. यात जाट , रोहिले , इंग्रजांबरोबर डच , पोर्तुगीजही होते. पण या काळात एका नावाचा डंका आणि दरारा उभ्या हिंदुस्थानात होता. आणि ते नाव म्हणजे बाजीराव बल्लाळ उर्फ थोरले बाजीराव.
सन १७२८ साली पालखेडला निजामाला धूळ चारल्यानंतर मराठ्यांची मैत्री सर्वांना हवीहवीशी वाटू लागली. यावर कळस म्हणजे चिमाजी अप्पांनी १७२८ साली आमझेराला गिरिधरबहादूर तर १७३३-३४ साली सिद्दीसातला नामोहरम केले. यामुळे बाजीराव आणि चिमाजींची दहशत उभी राहिली. मुघल दरबारात पडलेले दोन तट , अंतर्गत राजकारण अशा अनेक गोष्टींमुळे बाजीरावांशी समोरासमोर बोलावे असे सवाई जयसिंह यांना वाटत होते. शिवाय जयसिंह हे मराठ्यांना अनुकूल असल्याकारणाने त्यांनी बाजीरावांना सपत्नीक रजपूताण्यात येण्याचे आमंत्रण दिले. यावेळी पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई काशि यात्रेस गेल्या होत्या. त्यामुळे मुघलांविरुद्ध कोणताही मोहीम न काढता बाजीराव रजपूताण्यात गेले. यावेळी नानासाहेब सोबत असावे. तर राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर , आनंदराव पवार , बाजीभिवराव रेठरेकर इत्यादी मंडळी सोबत होती. तर आपल्यामागे दरबारात काही कटकारस्थान होऊ नये म्हणून चिमाजी अप्पा , अंबाजीपंत पुरंदरे यांना मागे ठेवले होते. रजपूताण्यात जाण्याचे आणखी एक प्रयोजन असे की सर्व रजपूतांना मुघलांविरुद्ध एक करणे. जयपूर , उदयपूर , अजमेर सारखी संस्थांने एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यरित्या कुरघोडी करत असत , यांना एक करण्यासाठी राव गेले होते. ०८ ऑक्टोबर १७३५ रोजी बाजीराव पुण्याहून निघाले. उदयपूरच्या जवळ चंपाबाग होती. या बागेत राणा जगतसिंहाने एक मोठा मंडप उभा केला होता. जणू या मंडपाला दरबाराचे रुप आले होते. बाजीराव उदयपूर जवळ आले असे समजताच जगतसिंह स्वतः समोर गेले. नंतर राणा बाजीरावांना सिंहासनाच्या चौथऱ्यावर घेऊन गेला. मंडपात दोन सुवर्णासने एका शेजारी एक मांडण्यात आली होती. तर खाली पाय ठेवायला चांदीचे चौरंग होते. राणाने बाजीरावांना सिंहासनावर बसण्याची विनंती केली. सारा दरबार पहात होता. बाजीराव तडक खाली ठेवलेल्या चांदीच्या चौरंगावर जाऊन बसले. थोडावेळ राणा आणि सगळा दरबार गडबडला. लगेच राणाने त्यांना वर सिंहासनावर बसण्याची विनंती केली. यावेळी बाजीराव म्हणाले " राणाजी ही गादी तुमच्या महाराजांची , राणा प्रतापांची आहे. मी सातारकर छत्रपती शाहू महाराजांचा पेशवा आहे म्हणजे सेवकच आहे. या गादीवर बसण्याची माझी योग्यता नाही " ( पेशवाई ) ही घटना घडत असताना तिथे जयपूर नरेश सवाई जयसिंह यांना दिवाण अयामल देखील उपस्थित होता. त्याने ही सर्व हकीकत जयसिंहाला सांगितली. जगतसिंहाने बाजीरावांचा उत्तम सत्कार केला. यानंतर बाजीराव जयपूर ला निघाले. जगतसिंहाने जो थाटमाट केला तोच जयसिंहाने केला. त्यानेही मंडप उभारुन दोन सुवर्णासनं एक शेजारी एक असे ठेवले. सर्व थाटामाटात पाहून बाजीराव जे समाजाचे ते समजले. जयसिंह हात धरून बाजीरावांना सोन्याच्या सिंहासनापाशी घेऊन आला. क्षणाचाही विचार न करता बाजीराव सुवर्णासनावर जाऊन बसले. सारी सभा हादरली. थोडा धीर धरून नम्रपणे जयसिंहाने याचे कारण विचारले तेव्हा बाजीराव म्हणाले " राणाजी , आपल्याला हे माहिती आहे की उदयपूरची गादी राणा प्रतापांची आहे. सम्राट अकबराच्या अमिषाला भुलून , लाचार होऊन आपलं राज्य अन् आपल्या बहिणी हे सर्व त्याने मोगलांच्या घशात कधीही घातलं नाही. त्यामुळेच अखिल हिंदूंना महाराणाप्रतापसिंह आणि त्यांचे सिंहासन सदैव शिरोवंद्य आहे. याउलट आपले पितामह मिर्झाराजे जयसिंह यांनी काय केले. ? " ( पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे ) बाजीरावांचे ते परखड शब्द सर्वांनी निमूटपणे ऐकले. शेवटी जयसिंहाचा पाहुणचार घेऊन आणि काही गुप्त करार करून बाजीराव मे १७३६ साली काशिबाईंसोबत पुण्यात येण्यास निघाले. वाटेत रावरखेड येथे पेशव्यांचा मोठा वाडा होता. त्या वाळवंटात काशिबाईंनी श्री शिवशंकराचे मंदिर बांधण्यासाठी आज्ञा केली. हेच ते प्रख्यात रामेश्वर महादेव मंदिर. मे अखेरीस बाजीराव पुण्यात परतले
निशांत कापसे
संदर्भ -
१) मराठी रियासत ( थोरले बाजीराव ) - गो.स.सरदेसाई
२) पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे
३) The Era Of BajiRao - Uday Kulkarni
बाजीराव आणि शाहू महाराजांची मुद्रा
( साभार - पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे - राफ्टर पब्लिकेशन )
फोटो परवानगी शिवाय कोणीही शेअर करू नये

ऐतिहासिक पंढरपूर

 


ऐतिहासिक पंढरपूर
पंढरपूर हे दक्षिण भारतातील प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे देवस्थान वेरूळचे जगदविख्यात कैलास लेणे निर्माण होणेपूर्वीचे आहे, भागवत धर्माचे आद्यपीठ, संताचे माहेर व दक्षिण काशी असे संबोधले जाते. पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्व स्कंदपुराणात वर्णन केले आहे. मान्यखेटचे राष्ट्रकूट यांचेपैकीच सोलापूरचे राष्ट्रकूट घराणे होते. त्यातील अविधेयक नामक राजाने आपल्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षी जयद्विढ्ढ नावाचा भार्गव गोत्रज ब्राम्हणास शंभु महादेवाच्या डोंगराच्या पूर्वेस असणारी आणेवारी, चाळ, कंदक, दुग्धपल्ली यासह पांडुरंगपल्ली (पंढरपूर) हे गांव दान दिले. पांडुरंगाचे देवालय पल्लीत होते. म्हणून तिचे नांव पांडुरंगपल्ली पडले आहे, असे हे पांडुरंगपल्ली गांव म्हणजे पंढरपूर होय.
इ.स.83 मध्ये या क्षेत्रास शालिवाहनाने पंढरपूर हे नांव दिल्याचा व इ. स. 516 च्या राष्ट्रकूट घराण्यातील अविधेय राजाने दिलेल्या ताम्रपटातही त्याचा उल्लेख आहे. या पुरातन मंदिराचा शके 1225 च्या सुमारास चक्रवर्ती राजा रामचंद्र देवराय यांनी त्यांचे प्रधान हेमाद्री पडित यांचेकडून देवळाचा विस्तार केल्याचे दिसून येते. आदिलशाही राजवटीमध्ये सन 1659 मध्ये खासा अफजलखान शिवरायावर मोहिम काढून वाईकडे जात असताना त्यांने पंढरपूर क्षेत्रास उपसर्ग केल्याची नोंद आहे श्री क्षेत्र पंढरपूर हे तीर्थ क्षेत्र पवित्र अशा चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे. हिरे आणि माणिक यांनी जडवलेला लफ्फा हा हार दत्ताजी शिंदे, ग्वाल्हेरचे सरदार यांनी देवास दिलेला आहे. रत्ने, मोती, हिरे व सोन्याचे तारेने गुंफलेला शिरपेच हा अलंकार अहल्याबाई होळकर यांनी दिलेला आहे. अतिमौल्यवान रत्ने वापरून बनविलेला मोत्याचा कंठा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानी अर्पण केलेला आहे. पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरामध्ये वेगवेगळ्या भाविकांनी वेळोवळी कामे करून दिलेली आहेत. रखुमाजी अनंत पिंगळे यांनी कृष्णाजी मुरार यांच्या हस्ते इ.स.1618 मध्ये महाद्वार बांधलेचा उल्लेख आहे. मुख्यमंदिराचा सोळखांबी मंडप दौंडकर यांनी बांधलेला असून या मंडपाच्या दक्षिणेकडील भाग मैनाबाई आनंदराव पवार यांनी बांधलेचा उल्लेख आहे. भोरच्या पंत सचिवांनी देवळाचे शिखर बांधलेचा उल्लेख आहे. पहिल्या बाजीरावापासून सर्वजण पंढरपूरच्या देवदर्शनास येत. पहिला बाजीराव पेशवा यांनी पंढरपूरला अनेकदा मुक्काम केल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. दुसर्या बाजीराव पेशव्यांनी सुद्धा पंढरपूरला अनेकदा मुक्काम केलेचा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो.
पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदेसरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणी साहेब यांनी बांधलेले आहे. स्वातंत्र्यानंतर साने गुरूजींच्या पुढाकाराने श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर सर्वधर्म व सर्व जातीच्या लोकांना खुले करून देण्यात आले. सन 1973 मध्ये श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर शासनाने ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 चा कायदा केला. सन 1985 पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे व्यवस्थापन शासननियुक्त समितीकडून केले जात आहे. सन 2009 मध्ये पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने पंढरपूर विकास प्राधिकरण स्थापन केलेले आहे.
- गजानन माऊली पावडे

मल्हारराव होळकर. कारकीर्द : दि.16 मार्च 1693 ते दि. 20 मे 1766


मल्हारराव होळकर.
कारकीर्द : दि.16 मार्च 1693 ते दि. 20 मे 1766
मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबात झाला . त्यांचे वडिल खंडोजी वीरकर चौगुला यांचा अशाच भटकंतीत बारामती तालुक्यातील होळ गावी मुक्काम पडला होता .तिथे दि.16 मार्च 1693 रोजी मल्हाररावांचा जन्म झाला . मल्हारराव लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला . भाउबंदांचा जाच वाढू लागला म्हणून त्यांनी मातोश्रींसमवेत सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला . होळ गावातील वास्तव्य संपले पण होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले .
मल्हारराव आपल्या पराक्रमाने कसलीही घराणेशाहीची परंपरा नसताना , स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचा मुख्य आधारस्तंभ बनले . ते एक धोरणी मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते . मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे ते पहिले सुभेदार होते . मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मल्हाररावांचा फार मोठा वाटा होता . श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती . अंगी गुण असले , वीरश्री असली तर एखादा सामान्य धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले .
दाभाड्यांचे एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या टोळीतून मल्हाररावांनी आपली कारकीर्द सुरू केली . शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली . आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना इ.स.1729 च्या सुमारास माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली .
मामांची मुलगी गौतमी हिच्याबरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला . त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले . उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती .राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत मल्हारराव माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते . उत्तर हिंदुस्तानामधील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता . इ.स.1733 मध्ये माणकोजी शिंदे यांची कन्याअहिल्याबरोबर पुत्र खंडेरावांचा विवाह लावून देण्यात आला . दि.17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यातून सोडलेला तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले . अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या असता मल्हाररावांना त्यांचा विचार बदलण्यात यश आले . पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या . इ.स.1758 मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले . यात मल्हाररावांचा मोठा वाटा होता . मात्र मोगल सरदार नजीबच्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या , आणि त्याला मोकळे सोडून दिले . याच नजीबने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले . रणांगणात मराठ्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला .
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र हौते . उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला होता . मोगल बादशहाचे सर्व सरदार या दोघांना टरकून असायचे . अब्दालीच्या तीन स्वाऱ्यांनंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील असा विश्वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता . त्याने कनोज येथे होळकर शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला होता . ( दि.27 मार्च 1752 )
जयाजी शिंदेंचा बिजोसिंगाने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे होळकरात वैमनस्य निर्माण झाले होते . मराठी साम्राज्याच्या हितासाठी होळकरांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला . बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना मल्हाररावांनी तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले होते .
पानिपतच्या युद्धापूर्वी दि.13 मार्च 1760 रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरूवात केली होती . पण ते जुळून आले नाही . दि.14 जानेवारी 1761 रोजी पानपतावर मराठ्यांची शिकस्त झाली .
पराभवाचे शल्य मनात बोचत असतानाच त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमीबाई यांचे दि. 29 सप्टेंबर 1761 रोजी निधन झाले . त्यामुळे ते आणखीनच खचले . अहिल्याबाईंची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा त्यांच्याशी सल्ला मसलत करीत असत स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्याबाईंना पार पाडाव्या लागत .
पानिपतनंतर मराठेशाहीची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यात मल्हाररावांनी माधवराव पेशव्यांबरोबर पुढाकार घेतला .अशाच एका मौहिमेवर असताना दि.20 मे 1766 रोजी अलमदूर येथे मल्हाररावांना मृत्यूने गाठले . आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या .पेशव्यांच्या घरात त्यांना वडिलकीचा मान होता .
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य , निष्ठेने वाढवण्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती . मराठी साम्राज्य वाढवण्याच्या कामी मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढवल्या .
आज स्मृतीदिनी शूर सुभेदार मल्हाररावांना त्रिवार मानाचा मुजरा !
✍️मुकुंद कुलकर्णी.

 

Tuesday 24 May 2022

'भाऊचा धक्का'

 


'भाऊचा धक्का'
पोस्तसांभार :: राजेंद्र म्हात्रे
मुंबईत जलवाहतुकीसाठी 'भाऊचा धक्का' बांधणारा भाऊ कोण? ते टोपण नाव आहे की नावाचा झालेला अपभ्रंश?
एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा 158 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर.
गेल्या दीड शतकाहूनही अधिक काळ या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असतात.
पण यातील बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की या धक्क्याला भाऊचा धक्का का म्हणतात? कोण हे भाऊ? त
‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू, या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार….
स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा….
ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी.
त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळून त्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला.
त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.
स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला.
कॅप्टन रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली.
या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला भाऊ हे नाव पडले ते कायमचे!
कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले.
मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले.
मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून करनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती.
तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.
कोकणच्या जलवाहतुकीसाठी आजतागायत वापरात असलेला ‘भाऊचा धक्का!’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक!
रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्या अधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. 1862 साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची.
मग मोठय़ा हिंदकळणाऱ्या होडय़ांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे.
गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याच पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले
आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला.
कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे.
सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपापर्यंत भाऊच्या धक्क्य़ाला उसंत नसेच.
या काळात भाऊच्या धक्क्य़ाचा अवतार. रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर दिसणारा असा, बेंगरुळ….
बोट धक्क्य़ाला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्या हमालांचा जथ्था..
एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन ‘..आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर’ अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्य़ाला समांतर आणीत असे.
बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्य़ावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्य़ाला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठडय़ावरून हनुमानउडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.
कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपडय़ात, केव्हा एकदा जमिनीवर पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. उलट्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकट्या आणि आंबा-फणसाची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.
एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो,
‘मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा!’
नमोस्तुते !

Monday 23 May 2022

महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे -'नागपूरकर भोसले' भाग ३

 महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे -'नागपूरकर भोसले'

भाग ३

पोस्तसांभार :: सतीश राजगुरे

 

रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक

(चित्रस्रोत: विकिपीडिया)

विदर्भाचे आद्य इतिहासकार कै.यादव माधव काळे म्हणतात-

मराठी साम्राज्यात अगर हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांच्या ताब्यात यावेळेस एवढ्या मोठ्या विस्ताराचा प्रदेश नव्हता. "रघुजी भोसल्यांच्या अंगी पहिला रघुजी अगर महादजी शिंद्यांप्रमाणे धडाडी, पराक्रम, बुद्धिबळ व संघटन चातुर्य असते तर तो संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत प्रबळ असा संस्थानिक झाला असता व हिंदुस्थानच्या राजकारणात त्याचा शब्द निर्णायक ठरला असता!"

सामान्यपणे मध्य भारतातील तत्कालीन विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातील जबलपूर, शिवनी, गढा-मंडला, छपरा, रेवा, सिरगुजा, होशंगाबाद, बैतुल हा प्रमुख भूभाग, छत्तीसगडमधील रायपूर, रतनपूर व ओरिसा-कटक हे प्रांत नागपूरकर भोसल्यांच्या नियंत्रणाखाली होते. जो रेसिडेंटच्या माध्यमातून हळूहळू ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली जाऊन पुढे ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला.

संदर्भ/माहितीस्रोत:

नागपूर राज्याचा अर्वाचीन इतिहास-डॉ. श.गो.कोलारकर, गो.मा.पुरंदरे, विकासपीडिया, विकिपीडिया

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...