विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 14 May 2024

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

 


सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा
शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले
मिरजेवरही केली होती स्वारी
मानसिंगराव कुमठेकर
मिरज
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगली जिल्ह्याशी घनिष्ठ संबंध होते. जिल्हयातील भुपाळगड, मच्छींद्रगड आणि प्रचितगड हे तीन किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. मिरजेच्या किल्ल्याला शिवरायांनी घातलेला वेढा हा इतिहासप्रसिध्द आहे. शहाजीराजांचाही सांगली जिल्ह्याशी संबंध होता. शहाजीराजांकडे शिराळा परगणा हा मोकासा होता. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा आदिलशहाकडे होता. तो ताब्यात घेण्यासाठी शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वारंवार प्रयत्न केल्याचे आढळून येते. छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी मिरजेत जतन करून ठेवण्यात आली होती. शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढ्यांचे सांगली जिल्ह्याशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संबंध आले होते. या संबंधाबाबत मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर अभ्यास करीत असून, त्यावर एक छोटेखानी पुस्तिका लवकरच प्रसिध्द होत आहे.
शाहजीराजांकडे शिराळा परगणा
शहाजीराजे हे आदिलशहाकडे असताना त्यांना सांगली जिल्ह्यातील शिराळा परगणा हा मोकासा म्हणून मिळाला होता. त्याची अनेक कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावरुन शहाजीराजांच्या ताब्यात सध्याच्या शिराळा तालुक्यातील अनेक गावे असल्याचे स्पष्ट होते. शहाजीराजांचा सांगली जिह्याशी असलेला हा संबंध छत्रपती शिवरायांनी वृध्दींगत केल्याचे दिसते.
शिवरायांच्या ताब्यात सांगलीतील किल्ले
छत्रपती शिवरायांनी सांगली जिह्यातील मच्छींद्रगड, प्रचितगड आणि भुपाळगड हे किल्ले जिंकून स्वराज्यात आणले. या किल्ल्यांवर झालेल्या तत्कालीन लढायांची वर्णने उपलब्ध आहेत. सांगली जिह्याच्या बहुतांशी भागावर आदिलशहाची सत्ता असली तरी या तीन किल्ल्यांच्या सहाय्याने या भागात आदिलशाही सत्तेशी टक्कर देणे शिवरायांना शक्य झाले.
शिवरायांची मिरज स्वारी
या तीन किल्ल्याबरोबरच मिरज येथील प्रसिध्द असा भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांनी केलेली स्वारी ही इतिहास प्रसिध्द आहे. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे इ.स.1660 मध्ये मिरजेत आले होते. 1659 च्या नोव्हेंबर महिन्यात अफजखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज आणि नेताजी पालकरांच्या फौजा विजापूरची अदिलशाही पादाक्रांत करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी वाईपासून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावे जिंकून घेतली. शिवचरित्राचे अस्सल साधन मानले गेलेल्या ‘शिवभारता’ मध्ये या गावांची नावे दिली आहेत. यामध्ये सध्याच्या कराड, वाळवा, तासगांव आणि मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेने ही गावे अगदी सहज जिंकली. त्यानंतर कर्नाटक सीमेलगत असलेल्या मिरजेतील भुईकोट किल्ल्यावर शिवरायांच्या फौजेने धडक मारली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. पण, तो ताब्यात येईना. शिवाजी महाराजांच्या या मिरज स्वारीचे वर्णन तत्कालीन डच अधिकाऱ्यांनी पाच मे 1660 रोजी वेंगुर्ल्याहून पाठविलेल्या एका डच भाषेतील पत्रात केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचाही पदस्पर्श
सांगली जिल्ह्याशी शहाजी महाराजांपासून सुरू झालेला छत्रपती घराण्याचा संबंध उत्तरोत्तर दृढ होत गेला. शिवाजी महाराजांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचेही सांगली जिह्याशी संबंध असल्याच्या नोंदी आहेत. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना शिराळामार्गे नेण्यात आल्याचे सांगितले जाते. जिल्हय़ातील भुपाळगडच्या स्वारीतही छत्रपती संभाजी महाराज सहभागी होते. या काळात सांगली जिल्हय़ाचा बहुतांशी भाग हा मुघलांच्या ताब्यात होता. तो स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी या काळात वारंवार लढाया झाल्याचे दिसते.
छत्रपती राजाराम महाराजांनी दिली इनामे
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महारांजाच्या काळात जिल्हय़ाचा काही भाग स्वराज्यात सामील झाला. त्यासाठी संताजी घोरपडे, धनाजी जाधव या सरदारांनी मोठे परिश्रम घेतले. संताजीच्या या कामगिरीबद्दल छापती राजाराम महाराजांनी त्यांना सन 1692 मध्ये मिरज मामल्यातील 22 कर्यातींचे देशमुखी वतन इनाम दिले. सन 1694 मध्ये राजाराम महाराजांनी सांगली जिल्हय़ातील ब्रम्हनाळ हे गाव आनंदमूर्तींना रघुनाथस्वामींच्या वृंदावनाच्या नैवैद्य नंदादीपाबद्दल इनाम दिले होते.
छत्रपती शाहूंनी जिल्हा स्वराज्यात आणला
छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (सातारा) यांनी तर संपूर्ण सांगली जिल्हा हा स्वराज्यात सामील करुन घेतला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सांगलीचा बहुतांशी भाग हा मुघलांच्या ताब्यात होता. मिरजेचा बलाढय़ भुईकोट किल्ल्यावर मुघल किल्लेदार दिलेलखान ठाण मांडून बसला होता. आसपासच्या प्रदेशही त्याच्याच ताब्यात होता. त्यामुळे सातारच्या शाहू महाराजांनी सन 1739 साली मिरजेवर स्वारी करून हा परिसर आणि संपूर्ण जिल्हा पहिल्यांदा स्वराज्यात आणला.
चार पिढय़ांचे जिल्ह्याशी संबंध
शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढय़ांचे कोणत्या ना कोणत्या कारणांनी सांगली जिल्हय़ाशी संबंध आले आहेत. छत्रपती घराण्यातील या प्रसिध्द व्यक्तिच्या सांगली जिह्याशी असलेल्या या संबंधावर आधारीत साधार पुस्तिका मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर हे लवकरच प्रसिध्द करणार आहेत.
छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी मिरजेत
छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी आणि दौत मिरजेत होती. या लेखणीची 80 वर्षांपूर्वीची दोन अस्सल छायाचित्रे आणि त्यासंबंधी माहिती देणारी कागदपत्रे मिरज येथील इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडे आहेत. त्यापैकी एक छायाचित्र मिरजेतील छायाचित्रकार रणधीर मोरे यांचे आजोबा हरिभाऊ मोरे यांच्या संग्रहात आहे. यामध्ये एक रत्नजडीत दौत आणि लेखणी ठेवण्याचे कलमदान आहे.
तर, दुसरे छायाचित्र सन 1935 मध्ये तत्कालीन मिरज संस्थानचे अधिपती गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांच्या कन्या लक्ष्मीबाई मुजुमदार यांनी संकलीत केलेल्या ’मिरज अल्बम’ मध्ये आहे. यामध्ये या रत्नजडीत लेखणीची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे ’ही लेखणी मिरज येथील वासुदेव नाईक नरगुंदे यांनी सातारा येथील लिलावात विकत घेतली. ती श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांनी नरगुंदे यांच्याकडून विकत घेतली. ती स्वराज्यसंस्थापकांच्या स्मरणार्थ जतन करून ठेवण्यात आली आहे. शिवरायांच्या या लेखणीची माहिती देणाऱ्या सन 1948 मधील आणखी एक कागदात मिरज संस्थानातील मौल्यवान वस्तूंची यादी देताना ’सातारा राजघराण्यातून आणलेली दौत आणि लेखणी’ असा उल्लेख केला आहे.
वाळव्यात शिवरायांचा मुक्काम
वाळव्यातील उमराणी घराण्यात मिळालेल्या ऐतिहासिक टिपणात शिवराय वाळव्यात आल्याची नोंद आहे. शिवरायांनी अफजखानानास मारल्यानंतर मार्गशीर्ष वद्य 7 रोजी पन्हाळा किल्ला घेतला. त्यानंतर ‘शाजिचा लेके पातशाय अस्ता सिंहस्त बृहस्पति आला होता पुष्य शुध चतुर्दशी 14 शनिवारी वाळव्यास शिवाजी भोसला’ असा उल्लेख आहे. म्हणजेच शिवाजी महाराज हे 17 डिसेंबर 1659 रोजी वाळवे गावी आले होते, याचा हा अस्सल पुरावा आहे.
शिवरायांच्या पदस्पर्शाने वाळव्याची भूमी पावन झाली आहे.
© मानसिंगराव कुमठेकर
9405066065

कोल्हापुरकरांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारे, भोसले कुलोत्पन्न चिमासाहेब महाराज

 कोल्हापुरकरांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारे, भोसले कुलोत्पन्न चिमासाहेब महाराज 

लेखन :खलिल शेख


आज कोल्हापुरकरांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारे, भोसले कुलोत्पन्न चिमासाहेब महाराज यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने माझा पुर्वी लिहीलेला लेख आपल्या ग्रुपवर परत शेअर करतो आहे.
इसवी सन १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध किंवा बंड म्हटले की आपल्या नजरे समोर अनेक नावे येतात त्यात प्रामुख्याने झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुर शहा जफर, मंगल पांडे यांची नावे येतात आणि आपल्याला इतिहासात ह्या स्वातंत्र्य बंडा बद्दल बरेच शिकवल जातं. परंतु त्या इतिहासात एका व्यक्तिविशेषाचे नाव सहसा करून येत नाही ते म्हणजे छत्रपति शिवरायांचे वंशज असलेले आणि करवीरकर गादी चे वारसदार महाराज बुवासाहेब यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी ८ जानेवारी १८३१ रोजी जन्म झालेले शाहू उर्फ चिमासाहेब महाराज. आज त्यांचा स्मृतिदिन त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती देत आहे त्या वेळी कोल्हापूरच्या गादीवर चिमासाहेब महाराजांचे थोरले सावत्र बंधू शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज होते चिमासाहेब हे अत्यंत तेजस्वी तडफदार आणि करारी वृत्तीचे होते. त्याकाळी कोल्हापूर शहराला संपूर्ण तटबंदी होती सहा वेशी ४८ बुरुज आणि संपूर्ण शहरा भोवती मोठा खंदक होता आणि सर्व बुरुजा वरती शहराच्या सुरक्षा करिता तोफा सज्ज ठेवलेल्या असत. इंग्रजांचे राज्य असल्यामुळे कोल्हापुरात इंग्रजांची सेना ठाण मांडून बसलेली असायची. कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण भारतात इंग्रजां विरुद्ध असंतोष पसरलेला होता. ज्या वेळी चिमासाहेब तेरा वर्षाचे होते तेव्हा १८४४ मध्ये कोल्हापुरात पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड येथील गडक-यांनी एकाच वेळी इंग्रजां विरुद्ध बंड पुकारले होते. परंतु इंग्रजां समोर त्यांची ताकद अपुरी पडल्याने इंग्रजांनी ते बंड मोडून काढले. यानंतर इंग्रजांनी बंड करणाऱ्यां वर केलेले अत्याचार पाहून चिमा साहेबांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष खदखदू लागला मग त्यांनी आपल्या आसपास समविचारी लोकांचा संग्रह जमा करण्यास सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने फिरंगोजी शिंदे, रामजी शिरसाट, रामसिंग परदेशी, हंबीरराव आणि दौलतराव मोहिते अशी मंडळी होती मग चिमाजी साहेबांनी अशा लोकांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठावाची जय्यत तयारी केली. शिवाय छत्रपतींचे "रेड रिसाला" नावाचे लष्कर आणि इंग्रज सरकारची कोल्हापूर मधील सत्ताविसावी फलटण ज्यामध्ये मराठा शिपाई भरपूर होते त्यामध्ये फितूरी घडवून आणली. ज्यावेळी इकडे उत्तरेमध्ये इंग्रजांविरुद्ध उठावाला सुरुवात झाली, त्याच वेळी चिमाजी साहेबांचा एक सहकारी रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वा खाली इंग्रजांच्या २७ व्या पलटणिने १८ जुलै १८५७ रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठावाला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच इंग्रजी शिपायांना ठार केले आणि इंग्रजांचा खजिना लुटला त्यामध्ये त्यांना सुमारे ४० ते ५० हजार रुपयांची रक्कम मिळाली. इंग्रजांनी लगेच बाहेरून म्हणजे बेळगाव आणि रत्नागिरी येथून आपल्या मोठ्या फौजा बोलून घेतल्या आणि रामजी शिरसाट आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना पकडून, काहींना फाशी दिली तर काहींना गोळ्या घातल्या. कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी इंग्रजांविरुद्ध चकमकी घडत होत्या इंग्रजांच्या मोठ्या फौजे पुढे बंडखोर शिपायांचा प्रतिकार कमी पडू लागला. इंग्रजही मागचा पुढचा विचार न करता धडाधड गोळ्या घालत होते. यातच १० ऑगस्ट रोजी लेफ्टनंट केर साहेबाच्या सैन्याने घाटातील राधाकृष्ण मंदिरात लपून बसलेल्या उठावातील ४० शिपायांना घेराव घातला आणि त्यांना ठार केले. तरीसुद्धा कोल्हापूरातील उठाव काही शांत होत नव्हता. शेवटी मुंबईहून चतुर चालाक आणि धूर्त कर्नल जेकब ला कोल्हापुरात पाठवण्यात आले. जेकबने अतिशय निष्ठुर पणे हा उठाव मोडून काढला १८ ऑगस्ट रोजी आठ जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं! दोन जणांना फाशी देण्यात आली! आणि अकरा जणांना जाहीर रित्या गोळ्या घालण्यात आल्या!! हळूहळू बंड शमत होते. परंतु प्रश्न असा होता की ह्या उठावा मागे कोण आहे? कोणी शिपायांना फूस लावली? इंग्रजांविरुद्ध लोकांना कोणी फितवले? कर्नल जेकब ची चौकशी चालू होती त्यातच पुन्हा सहा डिसेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा बंड झाले! त्यावेळी सुद्धा चार जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आले तर ३२ जणांना गोळ्या घालण्यात आल्या. एवढे होऊनही उठावा मागचा सूत्रधार कोण आहे हे कळत नव्हते. कर्नल जेकब चौकशीसाठी राजवाड्यात जात येत होता. महाराज बाबासाहेबां बरोबर त्याच्या बैठका होत होत्या. चौकशी चालू होती त्यावेळी तिथे उपस्थित असणारे चिमासाहेब हे सर्व शांत चित्ताने ऐकत होते, पाहत होते. धुर्त आणि लबाड जेकबने चिमा साहेबांच्या देहबोली वरुन आणि त्याच्या नजरे वरुन ओळखले कि उठावाचा सूत्रधार हाच तरुण तेजस्वी तडफदार मराठा राजा आहे! त्यावेळी जेकब राजवाड्यातुन गुपचूप निघून गेला परंतु दुसर्या दिवशी त्याने चीमा साहेबांना आपल्या कचेरीत बोलून घेतले ही बातमी कोल्हापूरकरांना समजताच सगळे नागरिक रस्त्यावर उतरले ती परिस्थिती पाहून जेकबने तात्काळ चौकशी थांबून चिमा साहेबांना परत जाण्यास सांगितले. त्यावेळी संपूर्ण कोल्हापूरच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. चिमासाहेब परत गेल्यावर, दिवस मावळल्या नंतर संपूर्ण शांतता असते वेळी अत्यंत गुप्तपणे रात्री चिमा साहेबांना चौकशीचे निमित्त करुन परत बोलावण्यात आले आणि अटक करण्यात आली आणि चिमा साहेबांची कोल्हापुरातली लोकप्रियता पाहून त्याच रात्री आधी वाघाटणे बंदरातून मुंबई आणि मुंबईहून पुढे कराचीला नेण्यात आले १२ मे १८५८ रोजी चिमा साहेब कराचीला पोहोचले आणि उठावाला चीमा साहेबांचे पाठबळ आणि फुस असण्याचा आरोप करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. आणि कराचीमध्ये त्यांना अकरा वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याच ठिकाणी कैदेत असताना १५ मे १८६९ रोजी चिमा साहेबांच दुःखद निधन झालं लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्यानंतर काही वर्षांनी तेथील स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. त्या नंतर १६ डिसेंबर १८९६ ला राजर्षी शाहु महाराजांनी तेथे जाऊन समाधिचे दर्शन घेतले. आणि शाहु उर्फ चिमासाहेबाचा स्मृति दिन साजरा करण्यास सुरवात केली. जो फाळणी होई पर्यंत साजरा केला जात होता. आता ती समाधि अस्तित्वात आहे का नाही याचा शोध घ्यावा लागेल. अश्या ह्या छत्रपति शिवरायांचे वंशज असलेल्या, आपल्या पुर्वजां प्रमाणे मातृभूमि साठी प्राणार्पण करणा-या छत्रपति चिमासाहेबांना त्यांच्या स्मृति दिनी मानाचा मुजरा.
काही संदर्भ आणि आधार घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास आपल्या प्रतिक्रियेची अपेक्षा आणि चुकत असल्यास मार्गदर्शनाची अपेक्षा आहे- जय शिवराय,

Monday 13 May 2024

मराठा आरमार आणि आरमारी इतिहास ।।

 


मराठा आरमार आणि आरमारी इतिहास ।।
● छत्रपती शिवरायांनी समुद्राची बाजू सुरक्षित करण्याच्या हेतूने आरमाराची स्थापना केली होती. समुद्रावर बलशाली असलेल्या सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून एक स्वतंत्र राज्यांग निर्माण केले. पण मराठ्यांच्या इतिहासात हे एकच आरमार होते असे नाही. मराठ्यांच्या वेगवेगळ्या आरमारांचा घेतलेला हा धावता आढावा :
◆ स्वराज्याचे आरमार :
१६५७ साली महाराजांनी आदिलशाही कडून चेउल ते माहुली पर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. या प्रांतात पेन, पनवेल, कल्याण, व भिवंडी सारखी समृद्ध बंदरे होती. याच बंदरांमध्ये सर्वप्रथम आरमार बांधण्याची सुरुवात झाली. १६५९ च्या एका पोर्तुगीज पत्रात इथे २० गलबते बांधत असल्याचा उल्लेख मिळतो. पुढे १६६० च्या दशकात विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, हि नाविक तळे तयार झाली. १६७९ आणि ८० मध्ये क्रमाने जलदुर्ग खांदेरी आणि कुलाबा बांधले गेले. विजयदुर्ग येथे ५७ नौका असल्याचे एका समकालीन प्रवाशीच्या वर्णनामध्ये उल्लेख आहे..
शिवाजी महाराजांच्याकाळी या संपूर्ण आरमाराची दोन सुभ्यात विभागणी केली गेलेली होती. प्रत्येक सुभ्यात २०० लहान मोठ्या नौका व त्यांच्यावर एक सुभेदार, म्हणजेच ऍडमिरल. महाराजांच्या काळातील दर्यासारंग, मायनाक भंडारी व दौलतखान हे सुभेदार आपल्याला ज्ञात आहेत. संभाजी महाराजांनी आरमाराची पुनर्रचना केलेली दिसते. त्यांच्या काळात आरमारात पाच सुभे होते, व प्रत्येक सुभ्यात ५ मोठी गुराबे व १५ गलबते होती. तसेच त्यांनी सरसुभेदार, ग्रँड ऍडमिरल, हे नवीन पद निर्माण करून त्यांच्या हाताखाली पाचही सुभे दिले. गोविंदजी जाधव, सिदोजी गुजर, व कान्होजी आंग्रे हे क्रमाने छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती महाराणी ताराबाईसाहेब यांचे सरसुभेदार होते..
◆ आंग्रेंचे आरमार :
वरील उल्लेख केल्याप्रमाणे कान्होजी आंग्रे हे ताराबाईसाहेब यांच्या काळात आरमाराचे सरसुभेदार होते. त्यांनी अतुलनीय पराक्रम करून १७००-१७०७ च्या काळात मोगलांपासून कोकण किनारपट्टीचे रक्षण केले. कान्होजी आंग्रे यांचे निधन १७२९ साली झाले. या २९ वर्षांच्या कारकिर्दीत इंग्रज, डच, पोर्तुगीज, यांचे एकूण पाच मोठे हल्ले त्यांनी परतवून लावले. आज आपण 'ऍडमिरल' या शब्दासाठी 'सरखेल' हा समानार्थी रूपाने वापरतो, याचे श्रेय फक्त आणि फक्त कान्होजी आंग्रेंना जाते. कान्होजींना ६ पुत्र होते. सेखोजी, संभाजी, मानाजी, येसाजी, धोंडजी व तुळाजी. कान्होजींनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी यांनी आरमाराचा कारभार सांभाळला. यांचा मृत्यू १७३३ साली झाला. पण आपल्या अल्प कारकिर्दीत त्यांनी सिद्दी कडून कोकणचा बराच भाग सोडवून घेतला होता..
सेखोजी नंतर त्यांचे धाकटे बंधू संभाजी सरखेल झाले. पण संभाजी आणि मानाजी मध्ये बेबनाव झाला. प्रकरण तलवारी उपसण्यापर्यंत गेले. अशावेळी, बाजीराव पेशव्यांनी मध्यस्थी करून आरमार आणि सरंजामचे दोन भाग केले. पहिला भाग संभाजीस देऊन त्यांना विजयदुर्ग येथे 'सरखेल' पदवी सोबत स्थापित केले. व मानाजीस 'वजारत -म-आब' हि नवीन पदवी देऊन कुलाब्यास स्थापित केले. अशाप्रकारे आंग्र्यांच्या आरमाराची विभागणी झाली..
● विजयदुर्ग सन १८५५-१८६२.
अ) विजयदुर्गाचे आरमार :
संभाजी आंग्रेंनी विजयदुर्गाच्या आरमाराची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज या त्रिकुटांना त्राही त्राही करून सोडले होते. १७३५ साली त्यांनी इंग्रजांचे 'डर्बी' हे जहाज समुद्रावर पकडले होते. या जहाजा वरील संपत्ती इतकी होती, ईस्ट इंडिया कंपनीला न भूतो न भविष्यती असा तोटा सहन करावा लागला होता. १७३८ साली डचांनी आजच्या जकार्ता येथून भले मोठे आरमार पाठवून विजयदुर्गवर हल्ला केला होता. पण या हल्ल्याला सुद्धा त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेचं परतवून लावले. वसई मोहिमेदरम्यान गोव्याकडील समुद्री किनारा संभाजी आंग्रे सांभाळत होते. संभाजी आंग्रे हे १७४२ साली वारले. त्यांच्यानंतर सरखेल पदवी तुळाजी आंग्रेंना मिळाली. यांनीसुद्धा आपल्या वडील भाऊंप्रमाणे विजयदुर्ग ते कोचीचा पूर्ण किनारा आपल्या दराऱ्या खाली आणला होता..
तुळाजी जरी पराक्रमी असले, तरी ते राजकारणी नव्हते. त्यांचे शेजारच्या मराठी संस्थांनांसोबत वाकडे होते. पंतप्रतिनिधी, वाडीचे सावंत, इतकेच नव्हे तर खुद्द कोल्हापूर छत्रपती सुद्धा त्यांच्यावर नाराज होते. मानाजी सोबतची भाऊबंदकी हि तुळाजीला वारसा हक्कासोबतच मिळाली होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचा फायदा मात्र इंग्रजांना झाला. त्यांना फक्त एकच संधी पाहिजे होती तुळाजीला नष्ट करण्याची आणि ती त्यांना मिळाली. १७५४ साली इंग्रज आणि पेशव्यांमध्ये तुळाजी आंग्रे विरुद्ध युद्ध करण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे दुसऱ्याच वर्षी त्यांनी एकत्र मिळून सुवर्णदुर्ग जिंकून घेतले. पुढच्या मोहिमेसाठी खास इंग्लंडहून आलेली भीमकाय जहाजे वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. १७५६ साली इंग्रज कंपनी, रॉयल नेव्ही व पेशव्याचे आरमार या त्रिकुटांनी विजयदुर्ग जिंकून घेतले. विजयदुर्गच्या आरमाराला युद्धात आग लागली व ते नष्ट झाले. तुळाजी आंग्रे कैद झाला. विजयदुर्गाचा हा शेवटचा सरखेल. मानाजींनी सरखेल पदवीसाठी फार प्रयत्न केले. पण ते मिळण्याआधीच ते १७५९ साली निधन झाले. त्यामुळे त्यांचे पुत्र रघुजी आंग्रे यांना सरखेल व वजारत-म-आब या दोन्ही पदव्या मिळाल्या..
● कोलाबा सन १८५५ - १८६२.
ब). कुलाबा आरमार :
कुलाब्याचे आरमार मानाजी आंग्रेंच्या हिश्यास आले. याचे त्यांनी अक्षरशः सोने केले. समुद्रावर पोर्तुगीज व सिद्दींना पछाडून सोडले. चिमाजी आप्पांच्या प्रसिद्ध वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांचे महत्वाचे उरणचे बेट यांनीच जिंकले होते. वसईला समुद्रमार्गे रसद न पोहोचू दिल्यामुळे वसईच्या सैनिकांची अन्न व दारुगोळ्यासाठी मारामार सुरु झाली. वसई विजयामागची हि पार्श्वभूमी बऱ्याच जणांना माहित नाही..
मानाजी आंग्रे १७५९ साली निधन झाले, त्यांच्या नंतर रघुजी आंग्रे सरखेल व वजारत-म-आब झाले. दोन्ही पितापुत्रांनी आजच्या रायगड जिल्ह्याला भरभराटी आणली. रघुजींचा काळ हा शांतिकाळ असल्यामुळे आपल्याला जास्त लढायांचे उल्लेख मिळत नाहीत. रघुजी १७९३ साली वारले आणि राज्यात अंधाधुंद माजली. १७९३ ते १८१४ काळात, दुसरे मानाजी आंग्रे, जयसिंह आंग्रे, बाबुराव आंग्रे, काशीबाई आंग्रे व परत दुसरे मानाजी आंग्रे असे सरखेल झाले. राज्यातील यादवी व मुलखीं व्यवस्थेवर दुर्लक्ष यामुळे राज्य व आरमार लयास गेले. शेवटी १८४० साली दुसरे कान्होजी आंग्रे, जे एक वर्षाचे सुद्धा नव्हते, यांच्या निधनानंतर कुलाबा संस्थान संपुष्टात आले. १८१८ नंतर कुलाब्याचे आरमार लष्करी स्वरूपाचे न राहून फौजदारी स्वरूपाचे झाले होते. एकाप्रकारे त्याकाळचे कोस्ट गार्ड. याच भूमिकेत अजून काही दशके निघाली. १८४० किंवा ४१ साली आंग्रयांचे राज्य इंग्रजांनी गिळंकृत करून आरमार नष्ट केले..
● पेशव्यांचे आरमार : वसई सन १७८०.
अ) सुभा वसई :
वसईची मोहीम हि १७३७-३९ पर्यंत चालली. या मोहिमेच्या सुरुवातीलाच अर्नाळा गाव आणि बेट मराठ्यांच्या हाती लागले. साहजिकच या बेटाचे आरमारी महत्व चिमाजी आप्पांच्या नजरेत आले. त्यांनी त्याच वर्षी बाजीराव बेळोसे यांना तिथे किल्ला बांधायला सांगितला आणि सुभे आरमार स्थापन केले. १७३७ साली वसई जिंकल्यावर हा सुभा वसई येथे स्थलांतरित केला गेला. बाजीराव नंतर त्यांचे पुत्र त्रिंबकजी, व त्यानंतर नारो त्रिंबक हे सुभेदार झाले. त्या तिघांमध्ये नारो त्रिंबक हे सर्वात जास्त खटपटी होते. सुरत ते सावंतवाडी यांनी बऱ्याच स्वाऱ्या केल्या. इंग्रजांनी विजयदुर्ग पेशव्यानां परत केल्यावर तिथे एक नवीन आरमार उभारण्यात आले. या नवीन आरमाराची सुभेदारी काही काळ नारो त्रिंबकपाशी होती. वसई सुभा अंदाजे १७३७-१८१८ पर्यंत होता..
ब) सुभा विजयदुर्ग :
वर सांगितल्याप्रमाणे विजयदुर्ग येथे नवीन सुभा १७५९ पेशव्यांनी उभारला होता. या नवीन सुभ्याचे सुभेदार पद वसई आरमाराचे सुभेदार नारो त्रिंबक यांना देण्यात आले. १७६२/६३ च्या जवळपास रुद्राजी धुळप यांना विजयदुर्गची सुभेदारी देण्यात आली. हे रुद्राजी तुळाजी आंग्रेंचे आरमारी सुभेदार होते. यानंतर विजयदुर्गची सुभेदारी धुळप घराण्यात राहिली. रुद्राजी नंतर त्यांचे पुत्र आनंदराव, आणि पौत्र जानोजी यांच्याकडे सुभेदारी आली. यात आनंदराव हे सर्वात पराक्रमी होते. १७८३ साली त्यांनी रत्नागिरीजवळ टिपू सुलतानवर स्वारी करायला जाणाऱ्या इंग्रजी आरमाराला जप्त केले. या लढाईमुळे इंग्रजांमध्ये मराठा आरमाराची पुन्हा भीती भरली. हे आरमार १८१८ पर्यंत अस्तीत्वात होते. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धाच्या अखेरीस विजयदुर्ग इंग्रजांनी घेतला आणि या आरमाराचा अस्त झाला..
● सिंधुदुर्ग, करवीर छत्रपतींचे आरमार :
सिंधुदुर्ग आरमार किंवा मालवण आरमार सुद्धा म्हणत. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी याची मुहूर्तमेढ केलेली असल्या मुळे आणि हे आरमार कायम छत्रपतींच्याच ताब्यात राहिल्या मुळे या आरमाराला ऐतिहासिक महत्व आहे..
१७३१ साली वारणेचा तह झाला. या तहामध्ये मराठेशाहीची अधिकृत वाटणी झाली. सातारा व कोल्हापूर अशा दोन गाद्या झाल्या. या तहान्वये, विजयदुर्गच्या दक्षिणेकडील पुर्ण प्रांत कोल्हापूरकरांना मिळाला. सिंधुदुर्गचे आरमार जरी आंग्रेंच्या तोडीचे नसले तरी ते पोर्तुगीजांना खूप त्रासदायक होते. गोव्याच्या दक्षिणेस 'केप राम' पर्यंत हे टेहळणी करीता जात होते. १७६५ साली इंग्रजांनी सिंधुदुर्ग किल्ला जिंकला. पण महाराणी जिजाबाई यांनी राजकारण करून पैसे देऊन तो सोडवून घेतला. १८१२ साली इंग्रजांसोबत झालेल्या करारानुसार सिंधुदुर्गचे आरमार खालसा करण्यात आले..
● तेरेखोलची खाडी, सावंतवाडीचे आरमार :
सावंतांनी आपले आरमार कधी स्थापित केले हे सध्या सांगणे अवघड आहे. यांच्या आरमाराचा सर्वात जुना उल्लेख छत्रपती संभाजीराजे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील आहे. सावंत यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या राजांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. कधी छत्रपती शिवाजी महाराज तर कधी औरंगजेब, कधी करवीर छत्रपती, तर कधी पोर्तुगीज. तेरेखोलची खाडी हे सावंतांचे आरमारी तळ होते. इथे एकाच वेळी १० मोठ्या गुराबा नांगरून राहू शकत होते. संस्थानाच्या आकाराच्या मानाने सावंतांचे आरमार बरेच मोठे होते..
● बडोद्याच्या गायकवाडांचे आरमार :
यांचा उल्लेख ''बंदर बिलिमोडा सुभा आरमार' असा पाहायला मिळतो. दामाजी गायकवाड हे गुजरातचे सरंजामदार होते आणि त्यांनी आणि पेशव्यानी सरकार सुरतचे महसूल आपापल्यात वाटून घेतले होते. जमिनीवरील जकात व इतर कर हे पेशव्यांचे तर समुद्रावरील दस्तक व कौल गायकवाडांचे. तब्बल ५० लहान मोठ्या नौकांनी सज्ज असलेले हे आरमार मोगल, इंग्रज व डच जहाजांवर हल्ला करून त्यांच्या कडून खंडणी वसूल करीत असे. यांच्या आरमारातील अप्पाजी पंडित आणि जयराम अप्पाजी यांची विशेष ख्याती होती. आंग्रेंप्रमाणे यांचे आरमार सुद्धा पुढे फक्त कोस्ट गार्ड स्वरूपाचे राहिले. १८७५ पर्यंत बिलिमोडा सुभा आरमाराचा उल्लेख सापडतो..
तर थोडक्यात ही मराठ्यांनी उभारलेली वेगवेगळी आरमारे. शिवछत्रपतींनी आपल्या दूरदृष्टीने आरमाराची स्थापना केलीच पण त्यांच्या शिष्यांनी सुद्धा त्याचे अनुकरण केलेले आहे. “जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवस्यमेव करावे..” ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती त्यांनी सत्य करून दाखवली. ब्रिटिशांचे राज्य मुंबई ऐवजी बंगाल येथून का सुरु झाले याचे प्रमुख कारण होते आपले आरमार आणि तत्याने दिलेला यशस्वी सागरी लढा...!
――――――――――――
🎨 शांताराम सावंत 👌🏼♥️🔥

Sunday 12 May 2024

संभाजी कावजी यांची समाधि

 




संभाजी कावजी यांची समाधि
शिवरायांनी केलेली मदत जावळीचा चंद्रराव यशवंतराव मोरे विसरला होता.त्याने स्वराज्यावर स्वाऱ्या केल्या आणि महाराजांना ''येता जावळी जाता गोवळी'' असे उद्धटपणाचे पत्र पाठवले. मोऱ्यांच्या अशा वागण्याचा महाराजांना खूप राग आला आणि महाराजांनी जावळी घेण्याचा निश्चय केला.या मोहिमेसाठी महाराजांनी काही सरदारांची निवड केली.त्यातच एक इतिहासाचा पानावर कधीच नसलेला यौद्धा संभाजी कावजी कोंढाळकर.
जावळीच्या जंगलात महाराजांचे सरदार फौजेसह आत घुसले.त्या जंगलात घुसने म्हणजे साक्षात यमाला आव्हान देणे होते.मोऱ्यांकडे हणमंतराव मोरे म्हणून एक सरदार होता.कसलेल्या आणि पिळदार शरीराचा आणि हत्ती एवढ्या ताकदीचा. चंद्ररावाचा तो नातलग होता.महाराजांनी जवळीवर हल्ला केला.एक भयंकर कालवा उठला कापकाप सुरु झाली.जावळीच्या खोऱ्यात नुसत्या किंकाळ्या नि आरोळ्या ऐकू येत होत्या महाराजांच्या माणसांनी जावळी कोंडली.
मोऱ्यावर चौफेर हल्ला झाला.मोरे मंडळी हिमतीने लढत होती.समोर हणमंतराव मोरे होता तो काही मागे हटत नव्हता. संभाजी कावजीने त्याला पाहिले. दोघात जबरदस्त चकमक झाली.अन संभाजीने हणमंतरावाला ठार केले.मोऱ्यांच्या बलाढ्य सरदार पडला...
संभाजी कावजी कोंढाळकर : अफझलखानाचे शिर कापणाऱ्या संभाजी कावजी कोंढाळकरांची समाधी चिखलावडे (ता. भोर) या गावी आहे. कोंढाळकर यांचे मुळ गाव चिखलावडे आहे.

Friday 10 May 2024

१० मे १८१८ एक अपरिचीत दिनविशेष “रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम

 


१० मे १८१८ एक अपरिचीत दिनविशेष “रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम”...🚩
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला वरून सूर्याची उन्हाळी आग, खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन गडावरही आगच आग.. रायगड होरपळून गेला..
शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला.. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची प्रॉथर गडात आला तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले ब्रह्मावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली असे काही ठिकाणी उल्लेख आढळतात..
रायगडावर उरली फक्त राख सारे वाडे, राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज..
पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती..
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची..

Thursday 9 May 2024

सूर्यराव सुर्वे

 

२९ एप्रिल १६६१...
स्वराज्याची धामधूम तळकोकणात सुरु झाली वास्तविक विजापूरकरांच्या मालकीचा हा प्रदेश परंतु जर्जर झालेल्या विजापूर दरबारात एकाही बडा सरदार येथे स्वराज्याविरुद्ध लढण्याच्या तोडीचा नव्हता अखेर शृंगारपूरच्या सुर्वे या मांडलीकासचं राजांचा बंदोबस्त करण्यास सांगितले महाराज राजापूर मुक्कामी असतना सूर्यरावास आदिलशाहचा हा निरोप मिळाला याचवेळी संगमेश्वरी तान्हाजी मालुसरेंच्या पायदळाला महाराजांनी रस्तेदुरुस्तीच्या कामासाठी ठेवलेले होते. या सैन्यावर सूर्याजीरावच्या पायदळाने अकस्मात हल्ला केला सुर्वे यांचे सैन्य तसे बरेचं त्यात आकस्मात हल्ला या गोष्टीमुळे मराठे पहिल्यांदा गोंधळले त्यातच मराठी सरदार पिलाजी निळकंठराव सरनाईक घाबरून मैदान सोडून पळून जाऊ लागले असता खुद्द तान्हाजी मालुसरेंनी त्यांना पकडून एका दगडाला बांधून ठेवले आणि स्वतः शत्रूवर तुटून पडले.., या गोष्टीमुळे इतर मावळ्यांमध्ये सुधा कमालीचा चेव चढला आणि शर्थीने लढाई सुरू झाली..
रात्रभर लढाई सुरूच होती नंतर सूर्याजीरावांचे सैन्य माघार घेऊ लागले आणि अखेर अवसान गळून शत्रूसैन्याने पळ काढला राजापूरहून माघारी आल्यावर राजांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी तान्हाजींचा यथोचित सत्कार केला परंतु सुर्यरावाचा हिसाब चुकता करण्याचे राहिलेच..तेव्हा थेट पुढे

सूर्यराव सुर्वेवर म्हणजे शृंगारपुरावर स्वारी निघाली..
महाराजांची स्वारी अकस्मात व गुप्तपणे आलेली होती त्यामुळे सूर्यरावास युद्धार्थ सैन्य गोळा करायलाही अवकाश मिळाला नाही हेरांकरवी जेव्हा त्याला महाराज शृंगारपुरा नजीक आल्याचे समजले तेव्हा तो खिन्न होऊन बसला अखेर काहीच मार्ग नसल्याने आत्मरक्षणार्थ तो पळून गेला वास्तविक सह्याद्रीचे पाठबळ दुर्गम आरण्य यांच्या पाठबळा वर वास्तविक सूर्यराव या प्रांती शिरजोर होताच परंतु सह्याद्रीने आसरा दिला तो केवळ एकच वाघास त्यामुळे पळून जाण्याखेरीज सुर्यारावाकडे दुसरा मार्गच नव्हता राजांच्या पालखीने शृंगारपूरच्या झाडीत प्रवेश केला मावळ्यांनी शृंगारपूर व्यापले होतेच महाराज सुर्यारावाच्या वाड्यात शिरले समोर असलेले सूर्यरावाचे सिंहासन राजांनी लाथ घालून ठोकरून लावले प्रभावळी प्रांताची सुभेदारी त्र्यंबक भास्कर यांच्याकडे सोपविली शृंगारपूर जवळील एक गड ताब्यात घेऊन त्यास नाव ठेवले “प्राचीतगड”...🚩
शृंगारपूर स्वराज्यात दाखल झाले ती तिथ होती श्रीनृपशालिवाहन शके १५८३ प्लव नाम संवत्सराची वैखाश शु. ११ म्हणजे सोमवार दिनांक २९ एप्रिल १६६१...
: आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची.
―――――――――――――

मोगल सैन्यास सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधवांची खूप दहशत भीती होती.

 


मोगल सैन्यास सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधवांची खूप दहशत भीती होती..🚩
मराठ्यांचे कर्नाटकावर निर्विवाद वर्चस्व :
कर्नाटकातील कांचीपूरमचा मोगल सुभेदार अली मर्दानखान होता. तो जिंजीला रसद पुरवून मार्गाचे रक्षण करीत होता. संताजी घोरपडेने त्याला कैद केले, त्यांची नोंद जेधे शकावलीत मिळते. या शिवाय भीमसेन सक्सेना या लढाईची माहिती देतो. संताजीने खानास कैद करून त्याच्याकडून मोठी खंडणी घेऊन त्यास सोडून दिले. अशा प्रकारे मराठा फौजांमुळे जुल्फिकार खानाची ताराबंळ उडाली. मोगल सेनानीवरील संताजी व धनाजीच्या नेत्रदिपक विजयानंतर मराठ्यांनी ताबडतोब हैद्राबाद, कर्नाटक, कडाप्पा व कांजीवरम प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करून केशव रमन्ना याची मराठा सुभेदार म्हणून नेमणूक करून त्याच्या हाताखाली एक हजार घोडदळ व चार हजार पायदळ जानेवारी १६९३ मध्ये ठेवले. याचाच अर्थ संताजी व धनाजी जाधवांनी कृष्णेच्या दक्षिणेकडील सर्व कर्नाटकी प्रदेश छत्रपती राजारामराजेंच्या नावे मराठा राज्यात सामील केला व तसा जाहीरनामा काढला..
मराठ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने त्यांनी मोगलांच्या कर्नाटक व मद्रास परिसरातील हालचालींना पायबंद केला, त्यांचे दळणवळण बंद पाडले व रसद थांबविली. अशा प्रकारे जिंजीला वेढा देण्याऱ्या मोगलांनाच धनाजी जाधवांच्या सैन्याने वेढल्याचे दिसते, या वेळेसच्या मराठ्यांच्या विजयाचे वर्णन मार्टिन पुढील प्रमाणे करतो :
“भाले व तलवारी ही मराठ्यांची शस्त्रे आहेत. त्यांच्यात काही धनुर्धारी असून ते संख्येने कमी आहेत. या बाबतीत मोगल हे मराठ्यांपेक्षा सरस आहेत. ते नेमबाजीत श्रेष्ठ आहेत कारण त्यांच्याकडे धनुर्धारी जास्त संख्येने आहेत. त्यामुळे मराठे हे मोगलांपुढे जाण्यास धजावत नाहीत. युध्दात मोगल हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे मराठ्यांना वाटत होते. ३/४ हजार मराठ्यांसमोर एक हजार मोगल कधीच माघार घेणार नाहीत..”
“परंतु मराठे हे गनिमीकाव्यात मोगलांपेक्षा सरस आहेत. मराठे हे मोगलांपेक्षा शारिरिक कष्टाच्या कामात श्रेष्ठ आहेत. ते वैयक्तिक ऐषारामाची पर्वा करीत नाहीत. ते आपल्या सोबत जास्त सामान बाळगीत नाहीत आणि लहान सहान गोष्टीने देखील त्यांचे समाधान होते..”
तर खाफीखानाच्या मते, मराठ्यांकडे जवळपास १५ ते २० हजार घोडदळ होते. संताजी त्यांचा प्रमुख सरदार होता. कित्येक श्रीमंत शहरे लुटणे व प्रसिध्द सेनापतींवर हल्ला करण्यासाठी तो प्रसिध्द होता. जे कोणी रणांगणावर त्याच्या समोर येत असत त्यांना खालील तीनपैकी एक परिणाम भोगावा लागत असे :
१. एक तर ते ठार मारले जात,
२. जखमी किंवा कैद होत, आणि
३. शेवटी त्यांचा पराभव होत असे.
.
मोगल सैन्यास संताजी व धनाजींची खूप दहशत भीती होती. ह्या मराठा सरदारांपैकी एखादा जरी आपल्या प्रदेशात आला तरी शूर मोगल सरदारांची देखील भीतीने गाळण उडत असे. त्यामुळे कोणताही प्रसिध्द मोगल सरदार संताजी धनाजीशी सामना द्यायचे क्वचितच धाडस करीत असे..
――――――――――
🎨 Ram Deshmukh 👌🏼♥️🔥

४ मे १६४९ “महाराजा छत्रसाल बुंदेला”.

 


४ मे १६४९ “महाराजा छत्रसाल बुंदेला”...🙏🚩
शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं उत्तरेत स्वतंत्र राज्य स्थापन करणाऱ्या महावीर महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा आज जन्मदिन...
शिवछत्रपतींची प्रेरणा आजही बुंदेलखंडी जनता विसरलेली नाही आज ही छत्रसाल यांच्या समाधीवरचं कवन या गुरुशिष्यांची यशोगाथा दृग्गोचर करत आहे...
मोगलांना कडवी झुंज देणारा मध्यभारतातील एक झुंजार योद्धा एकेकाळी जेव्हा छत्रसाल मोगलांच्या हैवानी अक्रमणाने त्रस्त होऊन छत्रपती शिवरायांच्या आसऱ्याला आले होते तेव्हा शिवरायांनी त्यांना शरण देऊन त्यांच्यात मोगलांशी लढा देण्याची प्रेरणा निर्माण केली व स्वतंत्र बुंदेला राज्य प्रस्थापीत करण्याची एक उर्मी जागृत केली तसेच राजकारणाचे (औरंगजेब विरोधाचे) पाठही दिले पुढे जाऊन ह्याच छत्रसाल बुंदेलांनी शिवरायांनी अखून दिलेल्या मार्गाने मोगलांना पळता भुई थोडी करत स्वताचे बुंदेलखंड राज्य निर्माण केले हे सर्व होत असताना छत्रसाल बुंदेलांना छत्रपती शिवरायांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराचा हयातभर कधीच विसर पडला नाही आपला पुत्र जगतराजला ह्या उपकाराची कायम जाण रहावी म्हणून छत्रसाल बुंदेलांनी उतरत्या वयात त्याला एक पत्र लिहीले ते असे...,
“औरंगजेब बादशहाने पचास बरस राज करो बनके बखत मै सिवाजी के पास पुना को गये खबर नही आए हम कोन साल मे गए तीस पैतीस बरस गई..ई सिवाजी के पास हम बहुत दिन रहे विद्या सीखी बान चलावे वगैरा जो हम वहासे आए सो बादशाहसे हमने बैर ठाण लिया”...
थोडक्यात मी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांकडे बरेच दिवस राहीलो त्यांच्याकडून अनेक विद्या तसेच धनुष्यबाण चालवायला शिकलो व तिथून परत आल्यावरच माझ्यात मोगलाशी उभे वैर धरण्याचे धारिष्ट्य निर्माण झाले...
शिवाजीराजे पीछे हुवा बुंदेला बलवान,
प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान ।।
――――――――――――
🎨 दिनेश काची सर ♥️🔥

इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीरजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा “नागोजी जेधे”..

 


इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीरजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा “नागोजी जेधे”...🚩
किल्ले कोप्पळची लढाई १६७७ कर्नाटकात, नागोजी जेधे घोड्यावर बसून मियाँवर हत्तीवरून हल्ला..
● जेधे शकावली व सभासद बखर या युद्धाचे वर्णन करतात :
महाराजांच्या दक्षिण दिग्विजय दरम्यान सरलष्कर हंबीराव मोहिते यांच्यावर बिजापुरच्या पश्चिमेकडिल पठाणंची फळी गारद करण्याची जबाबदारी महाराजांनी सोपविली होती. येलबुर्ग्याला हंबीरावांनवर पठाणाची प्रचंड फ़ौज चालून आली.अब्दुलरहीमखान मियान स्वतः आघाडीच्या हत्तीवर बसून या फौजेचे नेतृत्त्व करीत होता..
दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवरायांनी पहिला जिंकलेला किल्ला कोप्पळचा..! अब्दुररहिमान आणि हुसेनखान मियाना या हे आदिलशाही सैनाधीकारी किल्ल्यावर आणि सभोवतालच्या प्रदेशावर हुकुमत गाजवीत होते. तेव्हा महाराजांनी हंबिरराव मोहिते यांना कोप्पळकडे पाठवले व ते पुढे भागानगरकडे निघाले. हंबिरराव कोप्पळच्या जवळ येलबर्गा गावाजवळ असताना त्यांना हुसैनखानचे सैन्य त्यांच्या दिशेने येताना दिसले. त्यांनी लगेच स्वतःच्या सैन्याच्या फळ्या तयार केल्या व पठाणांच्या सैन्याला तोंड द्यायला तयार झाले. सर्जेराव जेधे, त्यांचा मुलगा नागोजी जेधे, धनाजी जाधव हे हंबीररावांच्या सैन्यात होते. त्यांनी आपापल्या जागा घेतल्या व काही क्षणातच पठाणी सैन्य त्यांच्यावर येऊन आदळले. हुसैनखानला वाटले होते की त्याची पठाणी फौज मराठ्यांच्या सैन्याची फळी मोडून आरपार जाईल. पण तसे काही झाले नाही. एखाद्या भिंतीवर आदळेल तशी पठाणांची फौज मराठ्यांवर धडकली..
पण या पठाणाच्या सेना सागराला पाहून मराठे किंचित सुद्धा घाबरले नाहीत, उलट युद्ध गर्जना करीत ते शत्रुवर तुटून पडले मराठ्यांचा आवेश असा कही होता की पठानांच्या देहाचे लचके तोडित ते पुढे सरकू लागले हा आवेश पाहून पठाण आवाक झाले आणि ते जीव मुठीत धरून पळू लागले खानाने सुद्धा आपला हत्ती रणांगणातून बाहेर काडला. खान पळतो आहे हे पाहताच नागोजी जेधेने (कान्होजी जेधे यांचा नातू) आपला घोडा त्याच्या हत्ती समोर आडवा घातला आणि आपला भाला खानाच्या दिशेने फेकला. पण खान त्यातून बचावला आणि लगेच त्याने बाण नागोजीच्या दिशेने सोडला. तो बाण नागोजी जेधेंच्या डोक्यात घुसला आणि ते रणांगणात कोसळले पण तोपर्यंत धनाजी जाधव यांनी खानाला वेढले होते..
खान कैद झाला, पठाणांची पार वाताहात झाली, त्यांचे अनेक घोड़े, हत्ती, आणि द्रव्य मराठ्यांचा हाती लागले. पण नागोजी जेधे हे या युद्धात कामी आले होते सर्जेराव जेधे यांना पुत्रशोक झाला पण त्यांनी माघार घेतली नाही आणि पुढच्या मोहिमेसाठी ते हंबीरावांबरोबर निघून गेले. ही वार्ता कारी गावात समजताच नागोजींच्या पत्नी सती गेल्या. मराठ्यांना काही हत्ती, दोन हजार घोडे व इतर सामग्री हाती लागली..
――――――――――――
🎨 शांताराम सावंत 👌🏼♥️🔥

सरसेनापती संताजी घोरपडेंची खानदेशावर स्वारी

 


सरसेनापती संताजी घोरपडेंची खानदेशावर स्वारी..🚩
बुऱ्हाणपूरच्या मोगल सुभेदारास बांगड्यांचा आहेर..
उत्तर कर्नाटकातून संताजींनी आपल्या फौजेसह थेट औरंगाबाद(छ.संभाजीनगर)च्या दिशेने कूच केले. यावेळी संताजीं जवळ वीस हजार घोडदळाची जंगी फौज होती. औरंगाबाद(छ.संभाजीनगर)च्या प्रदेशात त्याने धुमाकूळ माजवून ठिकठिकाणी लूट केली आणि शत्रूच्या फौजा येण्यापूर्वीच आणखी उत्तरेकडे खानदेशातील धरणगावाकडे कूच केले (जानेवारी १६९५). लवकरच तो धरणगावाहून तापीच्या तीरावरील बुऱ्हाणपूर या सुप्रसिद्ध शहरावर चालून गेला..
उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या महामार्गावरील बुऱ्हाणपूर हे मोगलांचे महत्त्वाचे लष्करी ठिकाण होते. मराठे इतक्या अंतर्गत प्रदेशात घुसतील, असे तेथील अंमलदारांना वाटत नव्हते; पण कोसळलेल्या संकटास सामोरे जाण्यावाचून त्यांना अन्य पर्याय नव्हता. संताजींनी बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराकडून चौथाईची मागणी केली; पण अशी मागणी मान्य करणे म्हणजे मोगलांची मोठी नामुष्की होती. मोगली सुभेदाराने चौथाई देण्याऐवजी संताजींशी मुकाबला करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यानिशी संताजीशी लढण्यासाठी शहराबाहेर आला; पण संताजीं समोर त्याचा टिकाव लागला नाही. त्याच्या फौजेचा संताजींनी तत्काळ धुव्वा उडविला. शहराच्या रक्षणासाठी असलेल्या फौजेची अशी वाताहत झाल्यानंतर शहर संताजींच्या ताब्यात आले. संपूर्ण शहराची लूट करण्यात आली. मराठ्यांच्या हाती अमाप पैसा व जवाहर (Money and Jewels) पडले. बुऱ्हाणपूर लुटले गेल्याची बातमी कानावर पडताच बादशहाच्या तळपायाची आग मस्तकास गेली..
● बुऱ्हाणपूरचा पराभव हा सुभेदाराचा नादानपणा आहे, असे त्यास वाटले. तेव्हा अशा नादान सुभेदाराची जाहीर बेइज्जत करण्याच्या उद्देशाने बादशहाने त्याच्याकडे 'बांगड्यांचा आहेर' पाठविल्याचे सुरतकर इंग्रज लिहितात :
"He (the Emperor) hath sent him (the Governor of Burhanpur) some of those rings women wear on their arms for he had more men in the field than Santoo (Santaji).. "
बादशहाने बुऱ्हाणपूरच्या गव्हर्नराकडे बायका हातात घालतात तशा कडी (बांगड्या) पाठवून दिल्या आहेत. कारण संताजीच्या सैन्यापेक्षा अधिक सैन्य त्याच्याजवळ होते. (असे असूनही त्याचा पराभव झाला होता). याच वेळी बादशहाने गाजिउद्दीन खान बहादूर या आपल्या सरदारास खानदेशात जाऊन संताजीस शिक्षा करण्याचा हुकूम फर्माविला; पण गाजिउद्दीन खान देशात जाईपर्यंत मराठे पसार झाले होते..
● सरसेनापती संताजी घोरपडेंच्या स्वारीने सुरतेत घबराट :
बुऱ्हाणपुराहून सुरतेवर हल्ला करून तिची लूट करण्याची संताजींची योजना होती. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नगरी दोन वेळा लुटून (वसुल) अगणित संपत्ती स्वराज्याच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात आणली होती. त्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी संताजी बुऱ्हाणपूर, सुरत यासारखी नगरे लुटीत होता. संताजींच्या या संभाव्य स्वारीच्या वार्ता सुरतेच्या वेशीवर धडकताच सुरतकरांमध्ये मोठी घबराट पैदा झाली. जो तो आपली धनसंपत्ती सुरक्षित जागी कशी राहील, यासाठी धडपडू लागला..
● युरोपियन वखारवाल्यांनी आपल्या वखारींच्या संरक्षणाची जय्यत तयारी सुरू केली. २० फेब्रुवारी १६९५ रोजी सुरतकर इंग्रज वखारवाले मुंबईकर इंग्रजांना लिहितात :
"(We) have been busy in making the best preparations we could for defence of the factory against Rama Rajah's troops; which have been daily expected by the town people, who are in great hurry, consternation and fright thereupon. They are burrying and securing what they can underground and packing up the rest to be gone on the news of approach (of the Marathas). The Governour hath wrote to Surjeet Cawne (Surjeetkhan) Subha of this province, for more soldiers and to the King (Aurangzeb) likewise.."
(छत्रपती राजाराम महाराजांच्या (मराठ्यांच्या) सैन्याच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून आमच्या वखारीच्या संरक्षणाच्या जय्यत तयारीत आम्ही गुंतलो आहोत. मराठे केव्हाही येतील, अशी सुरतकरांना भीती वाटत असल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. शक्य तेवढी संपत्ती ते जमिनीत गाडून ठेवीत आहेत. मराठे आले की राहिलेले सामान सुमान घेऊन पळ काढायचा असे त्यांनी ठरविले आहे. ठाणेदाराने सुरतेच्या संरक्षणासाठी सैन्याची कुमक पाठविण्यात प्रांताच्या सुभेदारास व बादशहास लिहिले आहे..) याचवेळी आपणाकडे वखारीच्या संरक्षणासाठी जादा तोफा व दारूगोळा पाठवावा, अशी सुरतकर इंग्रजांनी मुंबईकरांकडे विनंती धाडली होती. त्याप्रमाणे मुंबईकरांनी तोफा व दारू गोळ्याची कुमक पाठवूनही दिली. (२८ फेब्रुवारी) पण सुरतकरांच्या सुदैवाने संताजींनी सुरतेवरील आपल्या स्वारीचा बेत बदलला. सुरतेऐवजी नंदुरबार या शहरावर ते घसरले..
● सरसेनापती संताजी घोरपडेंची स्वरारी नंदुरबार शहरास वेढा :
बुऱ्हाणपूर ते सुरत या मार्गावरील नंदुरबार हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. संताजींनी या शहरास वेढा देऊन तेथील फौजदाराकडे चौथाईची मागणी केली. त्याने संताजींची मागणी धुडकावून देऊन शहराच्या संरक्षणाची कडेकोट तयारी चालविली. नवी सैन्यभरती करून त्याने त्यांना शहराच्या संरक्षणाच्या कामगिरीवर नेमले. नंदुरबार संकटात असल्याचे पाहून अहमदाबादेचा सुभेदार सुरजितखान याने एक हजाराचे सैन्य मदतीस पाठविले. आसमंतातील इतर ठाणेदारांनीही कुमक पाठविली. अशा प्रकारे बाहेरून कुमक येताच नंदुरबारच्या फौजदाराने शहराबाहेर पडून मराठ्यांशी सलाबतपूर येथे लढाई दिली. पण फार वेळ रणांगणावर न थांबता तो नंदुरबारकडे लगेच परतला. मराठ्यांनी शहराच्या तटबंदीवर हल्ला चढविला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही..
मराठे काही काल शहराजवळ छावणी करून राहिले. शहरास वेढा देऊन त्यास जेर करावे इतका वेळ त्यांच्या जवळ नव्हता. अन्नधान्य व पाणी यांची टंचाई त्यांना जाणवत होती. अशा परिस्थितीत नंदुरबारला वेढा देणे शहाणपणाचे नाही, हे उमजून ते आसमंतातील मुलूख लुटण्यासाठी पसार झाले. मराठ्यांच्या लष्करी तुकड्यांनी नंदुरबारच्या संताजींच्या नेतृत्वाखाली साताऱ्याकडे परतीच्या प्रवासाचा रस्ता धरला. (मार्च १६९५)..
सरसेनापती संताजी घोरपडे अशा प्रकारे खानदेशात धुमाकूळ घालीत असता शंकराजी नारायण व हणमंतराव निंबाळकर या मराठा सेनानींच्या फौजा (नाशिक बागलाण) भागात मोहीम करीत होत्या. मोगलांचा प्रसिद्ध सरदार मातबरखान हा त्यांचा प्रतिकार करीत होता..
――――――――――――

● किल्ले सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे यांचा उदय :

 

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हर्णे बंदर. ह्याच हर्णे गावाजवळ सागरी किल्ला “सुवर्णदुर्ग”.....🚩
सुवर्णदुर्ग किल्ल्याची निर्मिती बहामनी राजाने केल्याचे सांगितले जात दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या बंदराचे महत्त्व ओळखून आपले आरमार या ठिकाणी वसवले व किल्ल्यांचीही मजबुती केली सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे..

● किल्ले सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे यांचा उदय :
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सुवर्णदुर्ग वर अचलोजी मोहिते नावाचे किल्लेदार होते. इसवी सन १६८८ मध्ये भर समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यास सिद्दीने वेढा घातला. सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूने आरमार व जमिनीच्या बाजूने सैन्याची भलीमोठी फळी उभारून सिद्दीने सुवर्णदुर्गाची नाकेबंदी केली. सिद्दीने राजकारण करून सुवर्णदुर्गाच्या किल्लेदारालाच आपल्या बाजूने वळवून घेतले. किल्लेदार फितुर होऊन सुवर्णदुर्ग सिद्दीच्या ताब्यात देणार आहे ही गोष्ट किल्ल्यातील कान्होजी आंग्रे नावाच्या तरूणाला मान्य नव्हती. त्याने रातोरात सुवर्णदुर्गावरील आपल्या इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदारालाच कैद करून गडाचा ताबा आपल्याकडे घेतला. यानंतर कान्होजींनी सरळ किल्ल्याबाहेर पडून सिद्दीवर हल्ला चढवला. दुर्दैवाने तो फसला आणि कान्होजी आंग्रे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह सिद्दीच्या कैदेत सापडले. परंतु कान्होजींनी सिद्दीच्या कैदेतून शिताफीने आपली सुटका करून परत सुवर्णदुर्ग गाठला. गडावर येताच कान्होजी पुन्हा नव्या जोमाने किल्ला लढवत राहिले. मराठ्यांच्या या चिवट लढ्यामुळे अखेर सिद्दीला माघार घेऊन वेढा उठवावा लागला. कान्होजींच्या या पराक्रमाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली..
पुढे हेच कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे सरखेल बनले..
――――――――――――

८ मे १६९६ सरसेनापती संताजी घोरपडे आपल्या फौजेनिशी राजधानी जिंजीत दाखल

 


८ मे १६९६ सरसेनापती संताजी घोरपडे आपल्या फौजेनिशी राजधानी जिंजीत दाखल...🚩
मोगल इतिहासकार खाफिखान सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या खालील वर्णनातून दिसून येते..
“समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजींची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजींशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजींच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे..”
युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत..
संदर्भ : मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध लेखक डाॅ.जयसिंगराव पवार.
――――――――――――
🎨 Ram Deshmukh 👌🏼♥️🔥

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...