विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 September 2022

युवराज्ञी येसूबाई

 

युवराज्ञी येसूबाई :
पोस्तसांभार ::अभय शरद देवरे,
सातारा
एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ? केवळ नऊ वर्षांचा संसार....तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेऊन घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.
छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणा-या सरदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील, सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुला-नातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसूबाईंची महानता लगेच लक्षात येते.
महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवाद्वितीय असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहूंराजाना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरपट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता. त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसूबाईना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली. खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्यनिष्ठेला तोड नाही.
अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला. १६८१पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे, सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मोंगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले . दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांनतर मोकळा श्वास घेतला.
अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मुगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.
१६९० ते १७१९ अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणे पिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे, सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशाकाय सामो-या गेल्या असतील ? मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.
कोणत्या मातीत जन्मलेली आणि तयार झालेली माणसे ही ? स्वराज्यासाठी तन मन धन देणे म्हणजे काय हे यांच्याकडून किती वेळा शिकायचे ? कितीही प्रयत्न केला तरी येसूबाईंइतके पराकोटीचे उच्च त्यागजीवन जगणे आपल्याला जमेल का ? राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणे हेच त्यांच्या जीवनाचे सार होते ते अंगी बाणवणे हे आपल्याला कितीसे जमेल हा प्रश्नच आहे. स्वराज्यासाठी त्यांनी केलेला आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल.
आज कैदेतून झालेल्या त्यांच्या सुटकेला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वोतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो.
अभय शरद देवरे,
सातारा

Friday 23 September 2022

महाराणी जिजाबाई संभाजीराजे भोसले




महाराणी जिजाबाई संभाजीराजे भोसले
(मृत्यू -१७ फेब्रुवारी १७७३ ) :-

महाराणी ताराबाईनंतर करवीरकर संभाजीराजांच्या पत्नी महाराणी जिजाबाई यांनी अठराव्या शतकात जी राजकीय कर्तबगारी दाखविली, तिच्यामुळेच कोल्हापूरचे राज्य टिकले.संभाजीराजे यांना आनंदीबाई, उमाबाई, सकवारबाई, जिजाबाई, सुंदराबाई, दुर्गाबाई व कुसाबाई अशा एकूण सात राण्या होत्या. त्यांपैकी जिजाबाईंशी त्यांचा १७२७ मध्ये विवाह झाला. त्या सुस्वरुप असून हुशार व चाणाक्ष होत्या. त्यामुळे त्या राज्यकारभारात जातीने लक्ष घालीत व त्यांचे राणीवसात वर्चस्व होते आणि संभाजीराजेही त्यांचे ऐकत असत,
त्यांच्या कुशल धुरीणत्वाचे पुरावे तिच्या अनेक पत्रांमधून विखुरले आहेत. २१ नोव्हेंबर १७६३ ला जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग येथील हाताचे व पायाचे ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती.छत्रपती संभाजीराजे हयात असतानाही राज्यकारभाराची धुरा बऱ्याच प्रमाणात जिजाबाईंच्या खांद्यावर होती. संभाजीराजे त्यांच्या सल्लामसलतीवर अवलंबून असत, एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर कारभाराची अनेक प्रकरणेही सोपवून देत असत. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ एक तपाचा काळ हा जिजाबाईंच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा काळ होता. आपापली सत्ताकेंद्रे अबाधित राखणे हा त्या काळाचाच धर्म म्हटला तर जिजाबाईंनी त्या धर्माचे उत्तम पालन केले, असे म्हटले पाहिजे.
संभाजींना कोणत्याच राणीपासून पुत्र-संतती झाली नाही. मरतेसमयी त्यांची राणी कुसाबाई गरोदर होती. तिला कन्या झाली. त्यामुळे जिजाबाईंनी दत्तक मुलगा घेतला. जिजाबाई व छ. संभाजींना पहिला बाजीराव आणि पुढे नानासाहेब पेशवा यांच्या मुत्सद्देगिरी व लष्करी सामर्थ्य यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, याची कल्पना होती; म्हणून त्यांनी वारणेच्या तहानंतर सबुरीचे धोरण अवलंबिले. नानासाहेब पेशव्यांनी १७४० मध्ये संभाजीं- बरोबर दोन्ही गाद्या शाहूंच्या मृत्यूनंतर एकत्र करण्याचा गुप्त करार केला होता; पण शाहूंच्या मृत्यूनंतर (१७४९) प्रत्यक्षात तो कार्यवाहीत आला नाही; तेव्हा छ. संभाजीराजांनी सातारकडे फौजा वळविल्या होत्या, पण जिजाबाईंच्या सल्ल्यावरुन त्यांनी माघार घेतली. कारण मरतेसमयी शाहू महाराजांनी नानासाहेबांना दिलेल्या दोन सनदांमुळे त्यांनी या कराराकडे दुर्लक्ष केले. शिवाय या सनदांत एक महत्त्वाची अट होती, दत्तकाच्या बाबतीत ‘ कोल्हापूरचे करु नये ’, त्यामुळे संभाजींनी १७५०-५१ दरम्यान राज्यकारभारातून लक्ष काढून घेतले असावे; कारण त्यानंतरच्या पत्रव्यवहारांत जिजाबाईंना उद्देशून लिहिलेली पत्रे अधिक आहेत. सदाशिवरावभाऊस लिहिलेल्या एका पत्रात संभाजीराजे म्हणतात, ‘ विनंती पत्री सविस्तर अर्थ लिहीत जाणे. वरकड कित्येक राणीवास वाडा चौथा याजपाशी जे सांगणे ते सांगितले आहे. सविस्तर पत्रे त्या लिहीतील, त्यावरुन कळेल ’.कोल्हापूरचे छत्रपती आणि पेशवे यांचे ताणलेले संबंध जिजाबाईंनी शर्थीने सुधारले आणि डावपेच आखीत राज्यरक्षणाचा हेतू सिद्धीला नेला .

यशवंतराव आणि बाबुराव दाभाडे




यशवंतराव आणि बाबुराव दाभाडे
त्रिंबकरावास यशवंतराव नांवाचा एक अल्पवयी मुलगा होता. वापाच्या मरणानंतर त्याला सेनापतीची वस्त्रें मिळाल्यावर त्याच्या पालकत्वाचें काम त्याची आई उमाबाई हिजकडे आले; व पिलाजी गायकवाड त्याच्या मुतालकीच्या जागी कायम झाल्यामुळें सेनापतीचें सर्व कामकाज पाहूं लागला. अत:पर पेशवे व दाभाडे यांच्यामध्यें भांडणास जागा राहूं नये म्हणून, शाहूनें गुजराथचा सर्व कारभार दाभाड्याकडे सोंपवून, त्यानें त्या प्रांताच्या वसुलाचा अर्धा हिस्सा पेशव्यांमार्फत सरकारतिजोरित भरणा करावा असें ठरविलें. इतर स्वायामध्यें मिळालेला पैसा मात्र खर्च वजा जातां राजाच्या स्वाधीन करण्यांत यावा असा करार होता ( १७३१). पण हा करार दाभाड्यांनी पुरापुरा कधीच पाळला नाही, असें असतांहि शाहूच्या पश्चात नानासाहेब पेशव्यानें अर्ध्या गुजराथच्य सनदा यशवंतरावाच्या नांवें करून दिल्या ( १७५०).
बाबूराव:— त्रिंबकरावाच्या मृत्यूनंतर सेनापतीची वस्त्रें शाहूनें यशवंतराव दाभाड्यास दिली. त्याचप्रमाणें यापुढें पेशवे आणि दाभाडे यांच्यामध्यें वितुष्ट राहूं नये म्हणून शाहूनें स्वत: दाभाड्यांच्या गांवी (तळेगांव) येऊन त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव दाभाडे यांची मातोश्री उमाबाई दाभाडे हिची घेतली; व शाहूनें तिची समजूत केली कीं, बाजीराव हा तुझाच पुत्र आहे असें समजून याला तू क्षमा कर आणि यापुढे तुझ्या पुत्रांनी व बाजीरावाने एक चित्ताने राहावे असे कर.
सातार्‍यास परत आल्यावर शाहूने यशवंतराव व बाबुराव दाभाडे व बाजीराव बल्लाळ यांस बोलून यांचेही सख्य करून दिले. यशवंतरावांच्या ठिकाणी बाबुरावांची दृढभक्ती असून शाहूने त्यांस देऊ केलेली सेनाखासखेलीची वस्त्रे त्याने प्रथम नाकारली. परंतु शाहूने अत्यंत आग्रहपूर्वक हि वस्त्रे त्यांसच देऊन शिवाय हत्ती, घोडा, शिरपेच, कंठी वैगरे देऊन त्यांचा मोठा गौरव केला. हा बाबुराव पुढे फार पराक्रमी निघाला व त्याने अनेक पराक्रमाची कृत्ये करून मोठा लौकिक संपादन केला. यशवंतराव हा दुर्व्यसनी व दुर्बळ होता. पुढे शाहूने बाबुरावास सुरतेच्या मोहिमेवर पाठविले; या प्रसंगी बाबुरावाने मोठ्या शिताफीने अगदी थोड्या सैनिकांनीशी सुरतेच्या नबाबास गाठून त्यास अटकेत ठेविले आणि त्याच्या पासून सुरतेच्या अठठावीस महालांपैकी चौदा महालांच्या व चौथाइच्या सनदा छत्रपतींच्या नावे करून घेतल्या. इतक्यात यशवंतरावही मोठे सैन्य घेऊन सुरतेस आला. हे पाहून नवाबाने तहनाम्यातील अटी ताबडतोब पुर्‍या करून दिल्या, व या उभयतां बंधुंस मौल्यवान पोशाख दिला.
यशवंतराव आणि बाबुराव यांनी परत निघतेवेळी, खुद्द सुरतेस आपला एक अंमलदार ठेऊन सुरत अठठाविषीपैकी मिळविलेल्या चौदा महालांचा व खानदेशात जो प्रांत त्यांच्या ताब्यात आला होता त्याचा नित रीतीने बंदोबस्त लावण्याची योजना केली. या सुरतेच्या पराक्रमाबद्दल शाहूने बाबुराव दाभाड्यास सोन्याचा तोडा आणि पाच लाख रुपयांची जहागीर वंशपरंपरेने करू दिली. काही महिन्यांनी गुजराथेत पुन्हा बंडाळी माजली. दाभाड्यांचे कोणी माणूस गुजराथेत नाही व सर्व अंमल मुख्यत्याराच्या मार्फत चालला आहे हि संधी पाहून जोरावरखां नबाबी नामक अमदाबादच्या मुसलमान ठाणेदाराने दाभाड्याची ठाणी हळू हळू उठविण्याची खटपट चालवली. हे समजताच यशवंतराव व बाबुराव यांस अमदाबादेच्या स्वारीवर पाठवले. या स्वारी बरोबर उमाबाई हीही होती. दाभाडे आपल्यावर येत आहेत हे पाहून जोरावरने जय्यत तयारी केली. त्याचे बहुतेक सैन्य कडव्या पठानाचे असून चांगले कवायती होते. लाधैस सुरवात होऊन दोन्हीकडील मिळून सुमारे १५०० लोक पडले. अखेर दाभाड्याचा जय होऊन जोरावरचा पूर्ण पराभव झाला. दाभाड्याच्या फौजेने अमदाबादेस आपली ठाणी बसवून सर्वत्र शांतता केली आणि गुजराथेचा सर्व बंदोबस्त आपला विश्वासू नोकर पिलाजी गायकवाड यास सांगून व खुद्द अमदाबादेस अप्पाजी गणेश यास ठेऊन ते परत आले. या पराक्रमाबद्दल खुश होऊन शाहूने सोन्याचे दोन तोडे करून उमाबाईंच्या पायात घातले व तेव्हापासून या घराण्यातील स्त्रियांस पायांत सोन्याचे तोडे घालण्याचा अधिकार परंपरेने करून दिला. हा अधिकार फक्त छत्रपतींच्या राणीचा असतो.
अहमदाबादेवरील स्वारी हे बाबुरावांच्या आयुष्यातील शेवटचेच कृत्य होय. यानंतर खानदेशातील सत्तेत काही बखेडा झाला म्हणून बाबुराव हा तिकडील बंदोबस्ताकरिता चालता झाला. एकदा त्याची स्वारी मौजे रामेश्वर देवळे येथे असता त्या मुक्कामी त्याच्यावर विषप्रयोग करण्यात येऊन त्याला ठार मारण्यात आले. बाबुरावांच्या मृत्यूनंतर दाभाडे घराण्यात नाव घेण्यासारखा कोणीही शूर पुरुष अगर मुत्सद्दी झाला नाही. यांचा वंशज सांप्रत तळेगाव येथे नांदत आहे. [दाभाडे घराण्याची हकीगत; शाहूची बखर; पेशव्याची बखर; राजवाडे खं.३.]
Regards and special thank to - Rahul Bhoite

त्रिंबकराव दाभाडे:




त्रिंबकराव दाभाडे:— खंडेरावाची मुदत संपल्यावर पुढील वर्षाच्या मे महिन्यांत त्याचा मुलगा त्रिंबकराव यास शाहूमहाराजाकडून सेनापतीची वस्त्रें मिळाली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी गुजराथच्या मोहिमेवर त्याची रवानगी झाली. इकडे बाजीराव पेशवे यांस शाहूने माळव्यांत मुलुखगिरीकरितां पाठविलें.

इ. स. १७२९ मध्यें सरबुलंदखानापासून मराठ्यांस गुजराथच्या चौथ व सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्यावर त्या प्रांताचा मोकासा दाभाड्यास देण्यांत आला, व सरदेशमुखीचा कांही अंश गोळा करण्याचें कामहि त्याकडेच सोंपविलें. परंतु बाजीरावानें गुजराथच्या कारभारांत ढवळाढवळ करावी, ही गोष्ट दाभाड्यास मुळीच न रूचून या दोन मराठा सरदारांत कायमचें वैमनस्य आलें. पुढें दोघांनीहि ही गोष्ट शाहूच्या कानांवर घालून त्याची आज्ञा विचारली. शाहूनें आज्ञा केली की, बाजीरावास माळव्याची मोहीम सांगितल्यामुळें त्यावर त्यानेंच अंमल करावा, मात्र त्रिंबकराव यानें जिंकलेल्या गुजराथेंत ढवळाढवळ करूं नये. यामुळें बाजीराव निरूत्तर झाला. परंतु दाभाड्याच्या मनांत बाजीरावाविषयी मत्सर उत्पन्न झाला असल्यानें त्यानें सैन्याची जमवाजमव करून राज्याचें रक्षण करण्याकरितां आपण जातो असा उद्देश जाहीर करून तो दक्षिणेंत निघाला. कंठाजी व रघूजी कदम बांडे, उदाजी व आनंदराव पवार, चिमणाजी मोघें, वगैरे सरदार त्यास सामील झाले व दक्षिणेंत आल्यावर निजामहि त्यांस येऊन मिळणार होता. त्रिंबकरावानें निजामाशी सख्य केल्याचें बाजीरावानें शाहूस सिद्ध करून दाखविलें. तरीहि पेशव्यानें लढाईला प्रत्य़क्ष सुरूवात होईपर्यंत दाभाड्याशी तहाचें बोलणें सुरू ठेविलें होतें. बाजीरावाजवळ दाभाड्याच्या अर्धे देखील सैन्य जमलें नसतांहि मोठमोठ्या मजला करून त्यानें दाभाड्याच्या सैन्यास गुजराथेंतच डभई व बडोदें यांच्या दरम्यान गांठलें ( १ एप्रिल १७३१), पहिल्याच हल्ल्याबरोबर त्रिंबकरावाच्या सैन्यांतील नवशिक्या सैनिकांनी पळ काढला तरी, त्रिंबकराव मोठ्या शौर्यानें लढत होता. परंतु त्याला अकस्मात् एक गोळी लागून तो ठार झाला. तेव्हां त्याची सर्व फौज पळून गेली. दाभाड्याकडील मालोजी पवार, पिलाजी गायकवाडाचा एक पुत्र वगैरे मंडळी टार होऊन उदाजी पवार व चिमणाजी मोघे हे कैद झाले. आनंदराव पवार व पिलाजी गायकवाड हे जखमी झाले, परंतु ते पळून गेले. अशा रीतीनें बाजीरावाचा जय झाला

खंडेराव दाभाडे



दाभाडे:— पुणें जिल्ह्यांत दाभाड्याचें तळेगांव म्हणून एक गांव आहे; तेथें राजाराम छत्रपतीचा सेनापति खंडेराव दाभाडे याचा वंश आहे. खंडेराव हा या गांवचा मूळचा पाटील होता.


खंडेराव दाभाडे

खंडेराव दाभाडे हे मराठा साम्राज्यात सेनापती होते.

खंडेराव दाभाडे यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.

खंडेराव दाभाडे— दाभाड्यांचा मूळपुरुष येसाजी हा तळेगाव (दाभाडे) (तालुके मावळ जिल्हा पुणे) येथील रहिवासी व मुकदम होता. दाभाडे क्षत्रिय असून यांचें गोत्र शांडिल्य व देवक कळंबाचें आहे. येसाजी हा शिवाजीमहाराजांचा हुजर्‍या होता. महाराज आग्र्यास गेले असतां येसाजीनें इकडे राजकुटुंबाची सेवा केली. येसाजीचा थोरला मुलगा खंडेराव होय. राजाराम छत्रपती हे जिंजीस जातांना येसाजीसह खंडेराव हा त्यांच्याबरोबर गेला होता. जिंजीस राजाराम यांनां संभाजी हा पुत्र झाला, तेव्हां त्यांनीं येसाजीस तळेगांव, इंदुरी, धामणें आणि उरसें हीं गांवें इनाम करून दिलीं. राजाराम हे जिंजीहून परत येत असतां मागें जनान्याच्या बंदोबस्तास येसाजी यास ठेवलें होतें. त्यानें मोठ्या युक्तीनें जनानखाना किल्ल्यांतून काढून अनेक संकटांतून पन्हाळ्यास आल्यावर येसाजी मेला. राजाराम हे जिंजीस जात असतां मोंगल मागें लागला होता. तेव्हा (खंडेरावाचा धाकटा भाऊ) शिवाजी त्याला पाठीवर घेऊन दौड मारली असता त्याची छाती फुटून व रक्ताच्या गुळण्या होऊन तो मेला होता. पन्हाळ्यास आल्यावर छत्रपतींनीं खंडेरावास सेनाधुरंधर हें पद देऊन गुजराथ व बागलाणकडे मुलुखगिरीवर पाठविलें आणि वस्त्रें व पोषाख देऊन निशाण आणि जरीपटका हवालीं केला. शिवाय जुन्नर, पुणें व हरिश्चंद्र या तीन प्रांतांची व अकोले आणि जावळें या महालांची सरपाटिलकी (दर शेंकडा २ रु.) व चाकण परगण्यांतील आणि पारनेर परगण्यांतील १६४ गांवांची सरदेशमुखी दिली. शाहुछत्रपती सुटून आल्यानंतर खंडेराव ताराबाईला सोडून त्यांनां जाऊन मिळाला. मध्यंतरी चंद्रसेनानें खंडेरावास ताराबाईकडे ओढण्याचा प्रयत्‍न केला होता. पुढें १७१७ त खंडेरावास सेनापतीचें पद शाहुछत्रपतीनें दिलें, तें पुढें त्याच्या कुटुंबांत कायम झालें. याच वेळीं दिल्लीच्या बादशहानें दख्खनचा सुभेदार हुसेनअल्ली याच्याविरुद्ध उठण्यास शाहूमहाराजांस कळविलें असतां, त्यांनी तें काम खंडेरावावर सोंपविलें. त्यानें खानदेश गुजराथवर स्वार्‍या करून हुसेनचा रस्ता अडविला, तेव्हां त्यानें झुल्फिकारबेग यास त्याच्यावर पाठविलें. खंडेरावानें त्याची सारी फौज (झुल्फिकारसुद्धां) अडचणींत गांठून कापून काढली. तेव्हां हुसेननें आपले दिवाण मोहकमसिंग व चंद्रसेन जाधव यांनां रवाना केलें. त्यांची लढाई नगरजवळ झाली व पुढें खंडेरावानें निंबाळकर व सोमवंशी यांच्या मदतीनें मोंगलांचा पुरता मोड केला. यापुढें खंडेरावानें गुजराथ काठेवाडकडे मराठी अंमल बसवावा अशा हुकूम छत्रपतींनीं त्याला केला व श्रावणमासची दक्षिणा आणि कोटिलिंगार्चन विधी सेनापतीनें करावा असें ठरविलें (१७१७) पुढें सय्यद बंधूंच्या मदतीस जी मंडळी दिल्लीस गेली तींत खंडेराव हा सेनापती म्हणून गेला होता (१७१९). दिल्लीहून परत आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांनीं जी सरंजामी पद्धत निर्माण केली, तींत खंडेरावास खानदेश देऊन गुजराथ काबीज केल्यास तीहि जहागीर देऊन टाकूं म्हणून त्याला आश्वासन दिलें. सय्यदांचा हस्तक अलमअल्ली व निजाम यांच्यांत (१७२०) बाळापूरची जी लढाई झाली, तींत सय्यदांच्या विनंतीवरून खंडेरावास लढण्यासाठीं म्हणून छत्रपतींनीं पाठविलें होतें. यानंतर फत्तेसिंग भोसल्यांच्या अधिपत्याखालीं कर्नाटकांत (१७२५-२६) झालेल्या स्वारींत खंडेराव हा हजर होता. बाळाजी विश्वनाथ व खंडेराव यांचें एकमत असे. त्यामुळें बाळाजीपंतांनीं ठरविलेल्या राज्यव्यवस्थेस अमलांत आणण्याचें लष्करी काम खंडेराव करी. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर राहून तो खानदेश, वर्‍हाड व गुजराथ या तिन्ही प्रांतावर नजर ठेवी. यापुढें तो वृद्ध झाल्यामुळें त्याचा मुलगा त्रिंबकराव मोहिमेवर निघूं लागला. खंडेरावाने वसई ते सुरतपर्यंतचे कोंकण काबीज केलें होतें. त्याच्याबद्दल `बडे सरदार, मातबर, कामकरी हुषार होते’ असा उल्लेख आहे (शाहु म. बखर). शाहूछत्रपतींची मर्जी त्याच्यावर पुष्कळ होती. तो एकदा पोटशुळानें आजारी पडला असतां महाराजांनीं त्याचा समाचार मुद्दाम घेतला होता. थोरले बाजीराव यांच्या वेळीं खंडेराव वृद्ध झाल्यानें व खुद्द श्रीमंतांनीं सेनानायकाचें काम हातीं घेतल्यानें त्याची विशेषशी हकीकत आढळत नाहीं. कदाचित खंडेराव मत्सरानें अलिप्‍त राहिला असावा. मात्र त्याबद्दल शाहुमहाराजांनीं त्याला समजुतीचीं पत्रें अनेकदां पाठविलीं होतीं. अखेर १७२९ त खंडेराव मूतखड्याच्या विकारानें मरण पावला. इतिहासप्रसिद्ध उमाबाई दाभाडे ही याची बायको होय. याला त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव असे तीन पुत्र होते. [शाहुमहाराज रोजनिशी; शाहु म. बखर; दाभाडे घराण्याचा इतिहास; मराठी रियासत. म. वि. इति. संग्रह. पेशवे दफ्तर. ले. २३].
'सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे' हे खंडेराव दाभाडे यांचे वंशज आहेत

पवार घराणे



पवार घराणे :
पेशवाईतील एक प्रसिद्ध मराठा घराणे. शिंदे व होळकर यांबरोबर पवारांनी उत्तरेत मराठी राज्याचा विस्तार केला. या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजी शिवकालात होता. त्याचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे. छत्रपती शिवाजींच्या सैन्यात तो एका तुकडीचा प्रमुख म्हणून काम करीत होता. शिवाजी—अफजलखान लढाईत त्याने भाग घेतला होता. त्याचे मुलगे बुबाजी व केरोजी. मुसलमानपूर्वकालीन धारच्या प्रसिद्ध परमार घराण्याचे आपण वंशज आहेत, अशी पवारांची भावना होती. त्यामुळे माळव्यामध्ये धारच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात आला तर बरे, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. काही पवार मंडळी माळव्यामध्ये स्वारी—शिकारीस गेल्याचे समजते. बाळाजी विश्वनाथ दिल्लीस गेला, तेव्हा केरोजी पवारही त्याजबरोबर होता .केरोजीच्या पुढील वारसांविषयी माहिती ज्ञात नाही; पण बुबाजीस मात्र काळूजी व संभाजी असे दोन मुलगे होते. त्यांविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही; परंतु काळूजीचे मुलगे तुकोजी व जिवाजी आणि संभाजीचे मुलगे उदाजी तुकोजी व रावांचा मुलगा यशवंतराव यांचे अनेक निर्देश पेशवेकालीन कागद पत्रांत आढळतात. हे चारही चुलतभाऊ सामान्यतः पेशव्यांच्या बाजूने लढले; पण कधी पेशव्यांच्या विरुद्ध बाजूनेही लढायांमध्ये भाग घेतलेले दिसतात. १७२० ते १७२९ या नऊ वर्षांच्या कालखंडात या चार भावांनी अनेक वेळा माळव्यावर स्वाऱ्‍या केल्या होत्या आणि त्यांत त्यांनी काही प्रमाणात यशही मिळविले होते, तथापि चिमाजी अप्पा हा शिंदे, होळकर व पवार यांना घेऊन १७२८ च्या शेवटी माळव्यात गेला आणि तेथील मोगल सुभेदार गिरधर बहादुर व त्याचा नातलग दया बहादुर या दोघांनाही त्याने अमझेर येथे झालेल्या घनघोर लढाईत ठार केले आणि माळवा प्रांतावर आधिपत्य मिळविले. नंतर छत्रपती, शिंदे, होळकर आणि पवार यांत माळवा वाटूनही टाकला. गुजरातेत डभई येथे झालेल्या लढाईच्या वेळी (१ एप्रिल १७३१) उदाजी, आनंदराव व मळोजी पवार हे बाजीराव पेशव्याविरूद्ध त्र्यंबकराच दाभाड्याच्या बाजूने लढले. तीत उदाजी पवार याचा पाडाव झाला व आनंदराव पवार पळून गेला; पण पुढे त्याचे पेशव्याशी सख्य झाले. उदाजी पवाराने त्यानंतर फाराशी कर्तबगारी दाखविलेली दिसत नाही. आनंदराव सर्पदंशाने मरण पावला (१७३६). त्याचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आला (१७६१). हे सर्व चालू असताना धार व त्याच्या आसपासचा सर्व प्रदेश आनंदरावास मिळाला आणि देवास व त्याच्या आसपासचा प्रदेश तुकोजी व जिवाजी या दोघांना मिळाला. तुकोजी हा देवासच्या थोरल्या पातीचा संस्थापक असून जिवाजी धाकट्या पातीचा संस्थापक बनला. देवासच्या थोरल्या पातीचे वारस विक्रमसिंह हे दत्तकनात्याने कोल्हापूर संस्थानचे अधिपती झाले (१९४७). इंग्रजी अंमलाच्या आरंभीच्या काळात पवारांनी हिंदू संस्कृतीच्या जीर्णेद्धाराचा आपल्या संस्थानांत प्रयत्न केल्याचे एका प्रकटनावरून कळते.
पहा : धार संस्थान.
संदर्भः १. ओक, शि. का., लेले, का. कृ. धार संस्थानचा इतिहास,
२.भाग, धार. १९३४. २. गुजर, मा. वि. पषार विश्वासराष घरण्याचा इतिहास व ऐतिहासिक कागद-संग्रह, पुणे, १९६०.
३, गुजर, मा. वि. संपा. संस्थान देवास धोरली पाती : पवार घराण्याच्या इतिहासाची साधने, पुणे, १९४०.

जामखंडी आणि तासगाव संस्थान




जामखंडी आणि तासगाव संस्थान

जामिखडी हे गाव कोल्हापूरपासून ११० कि.मी. अंतरावर तर तासगाव हे सध्या सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण सांगलीपासून २३ कि.मी. अंतरावर. रत्नागिरीजवळचे हरिभट यांच्या मुलांपकी ित्रबक, गोिवद आणि रामचंद्र यांनी मराठय़ांच्या सन्यात विशेष कामगिऱ्या बजावल्यामुळे पेशव्यांनी त्यांना कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांमधील प्रदेश जहागीर म्हणून इनामात दिला. हरिभट यांच्या नातवांपकी परशुराम भाऊ हे विशेष पराक्रमी निघाले. त्यांच्या जहागिरींपकी जामिखडी हा एक टापू होता. त्यांचे पुढचे वंशज गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांनी १८११ साली जामिखडीचे राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांच्याशी संरक्षण करार करून ३००० स्वारांची फौज तनात करावयास लावली. १३६० चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या संस्थानाला ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा मान दिला.
कोल्हापूरच्या पोलिटिकल एजंटाच्या देखरेखीखाली असलेल्या या संस्थानात जामिखडी, बिद्री आणि कुंदगोळ हे तालुके होते. मराठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत होते. शेतीच्या उत्कर्षांसाठी जामिखडीत जनावरांचे प्रदर्शन भरविले जाई. हातमागांचा संस्थानात प्रसार होऊन वस्त्रोद्योगाचा विस्तार झाला होता. जामिखडीच्या पटवर्धन राज्यकर्त्यांनी आपल्या प्रजेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी दरबार भरविण्याचा परिपाठ ठेवला होता. गोपाळ रामचंद्र यानंतर रामचंद्र गोपाळ, परशुराम रामचंद्र आणि शंकर परशुराम असे जामिखडी संस्थानचे पुढील राज्यकत्रे झाले. परशुराम रामचंद्र यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लष्कराचे मानद कॅप्टन म्हणून फ्रान्समध्ये महत्त्वाची कामगिरी बजाविली.
१८२० साली जामखंडी संस्थानातून तासगावचे संस्थान निराळे निघाले. गणपतराव पटवर्धन हे याचे पहिले राजे. १८४८ साली लॉर्ड डलहौसीच्या संस्थाने खालसा करण्याच्या मोहिमेत तासगाव संस्थान खालसा होऊन कंपनी सरकारच्या राज्यात सामील केले गेले.
जामिखडी संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.

भोर संस्थान : श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब पंतसचीव

 


भोर संस्थान : श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब पंतसचीव
(राज्यारोहण १९२२)

यांचा जन्म १८७८ सालीं झाला. त्यांचा सन १९०५ पर्यंतचा काळ प्रथम पुणें हायस्कूल, नंतर म्याट्रिक झाल्यावर डेक्कन कॉलेजांत पाश्चात्य शिक्षण व कायदेशिक्षण संपादन करण्यांत गेला. नंतर त्यांना संस्थानच्या कामकाजाची माहिती होण्याकरितां त्यांचे वडील रावसाहेब यांनीं त्यांनां शिरवळ तालुक्याचें अ. कलेक्टर व अ. जज्जाचे अधिकार दिले. ते अधिकार उत्तम रीतीनें चालवून त्यांनीं संस्थानच्या कामाची व लोकस्थितीची पूर्ण माहिती करून घेतली. हिंदुस्थानांत ब-याच ठिकाणीं प्रवास करून त्यांनीं आपल्या ज्ञानांत भर घातली आहे. जगांत चाललेल्या घडामोडीचें सूक्ष्म निरीक्षण करून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं गादीवर येण्यापूर्वींच आंखून ठेविलें होतें. या प्रकारचें निश्चित धोरण असल्यानें राज्यारोहणसमारंभकाळींच (ता. १८ आगष्ट १९२२) प्रजेंत झालेला असंतोष नाहींसा करण्याकरतां व नोकरांनां संतुष्ट करण्याकरितां श्रीमंत बाबासाहेबांनीं घरपट्टी, म्हैसपट्टी, लग्नटक्का, पाटदाम हे कर व शेंदूर, तपकीर, वगैरे किरकोळ जिनसावरील लायसेन्स-फी माफ केली. संस्थानांतील सर्व प्राथमिक शाळांतून मराठी चवथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण मोफत केलें. आणि जमीनसा-यांत सूट, सर्व नोकर लोकांस बोनस वगैरे देणग्या दिल्या. शिवाय सुधागड तालुक्यांत पाली येथें दवाखाना आणि भोर येथें एक वेदशाळा सुरू केली. हे युवराज असतांनाच त्यांनीं भोर येथें श्रीरामक्रीडाभुवन (प्रथमपत्नीचें स्मारक म्हणून) कै. श्री. सौ. गंगूताई पंतसचीव वाचनालय अशा दोन संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांनीं प्रातिनिधिक तत्त्वावर राज्याकारभार चालविण्याचें आपलें धोरण जाहीर करून भोरास लोकमतानुवर्ती म्युनिसिपालिटी स्थापन केली व सभाबंदीचा कायदा रद्द करून प्रजेला आपलीं गा-हाणीं मांडण्याचा मार्ग मोकळा करून दिला. नोकरांनां पगारवाढ करून पेन्शन, ग्र्याच्युटी, भत्ता, यांचें नियम केले आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांस सातारा जिल्ह्यांतील संस्थानिकांनीं आपले प्रतिनिधी म्हणून नरेंद्रमंडळाकरितां निवडून दिलें आहेत. त्याप्रमाणें ते दिल्लीस १९२४ सालीं गेले होते. जंगल व हिरडा याबद्दल रयतेची फार वर्षांची तक्रार असल्यामुळें फारेस्टचौकशीकमेटी व हिरडाचौकशी कमिटी अशा दोन कमिट्या त्यांनीं नेमिल्या आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांचें हल्लींचें द्वितीय कुटुंब सौ. लक्ष्मीबाईसाहेब या सुशिक्षित, सुशील प्रजावत्सल व स्त्रीशिक्षणाभिमानी आहेत. श्रीमंत बाबासाहेब यांनां हल्लीं प्रथम कुटुंबापासून एक व द्वितीयाकुटुंबापासून दोन असे ३ पुत्र आहेत; पहिल्या कुटुंबापासून झालेले युवराज श्री. भाऊसाहेब हे सन १९२४ सालच्या म्याट्रिक परीक्षेंत पास होऊन उच्च शिक्षणाकरितां डेक्कन कॉलेजांत शिकत आहेत.

भोर संस्थान :शंकरराव चिमणाजी उर्फ रावसाहेब (१८७१-१९२२)




भोर संस्थान :शंकरराव चिमणाजी उर्फ रावसाहेब (१८७१-१९२२)

रावसाहेबांची कारकीर्द सुमारें ५० वर्षें झाली. शंकरराव तापट, करारी, निरलस, बुद्धिमान, व नियमित रहाणीचे असे होते. त्यांचीं दोन लग्नें झालीं. त्यांनीहि अनेक सुधारणा करून संस्थानचा दर्जा वाढविला. सडका, चावड्या, धर्मशाळा, विहिरी ब-याच ठिकाणीं बांधिल्या. शिक्षणखातें निर्माण करून भोर येथें हायस्कूल स्थापन केलें, व संस्थानांत सुमारें ६० प्राथमिक शाळा सुरू केल्या, आणि भोर येथें एक मोफत दवाखाना सुरू केला. रामनवमीचा उत्सव निरंतर चालण्याकरितां रावसाहेबांनीं वार्षिक ३०,००० रूपये उत्पन्नाचे २८ गांव अलग तोडून दिलें. याप्रमाणें प्रत्येक देवस्थानची त्यांनीं स्वतंत्र व्यवस्था करून ठेविली आहे. सन १९०३ मध्यें त्यांनां ९ तोफांच्या सलामीचा मान मिळाला. व पुढें १९११ सालीं आणखी दोन तोफांच्या सलामीचा मान व हिज हायनेस ही पदवी मिळाली. दिल्लीस नरेन्द्रमंडळ स्थापन होईपर्यंत राजमंडळाची जी सभा भरत असे त्या प्रत्येक सभेस रावसाहेबांनां निमंत्रण येत असे व प्रत्येक सभेस हजर रहात असत.

रावसाहेबांची धर्मावर फार श्रद्धा असून त्यांनीं हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व तीर्थयात्रा सहकुटुंब केल्या. काश्मीर, ग्वाल्हेर, बडोदें, कोल्हापूर, म्हैसूर, हैद्राबाद, त्रावणकोर इ. मोठ्या संस्थानिकांच्या निमंत्रणावरून तेथें जाऊन शंकररावांनीं त्या संस्थानिकांचा दृढ परिचय करून घेतला. रावसाहेबांच्या पत्नी कै. श्री. सौ. जिजीसाहेब ह्यांनीं एकट्यानींच व बदरीकेदार व नारायणाची बिकट यात्रा केली. रावसाहेबास प्रथम १८७७ सालीं कन्यारत्न झालें. व दुस-याच वर्षी म्हणजे १८७८ सालीं पुत्ररत्न झालें. त्याचें नांव त्यांनीं रघुनाथराव उर्फ बाबासाहेब ठेविलें. तेच हल्लींचे संस्थानाधिपति आहेत. खर्च करण्यांत रावसाहेबांचा हात अगदीं काटकसरीचा असे. यामुळेंच त्यांनां संस्थानची आर्थिक स्थिति चांगली ठेवतां आली. रावसाहेब सर्व खात्यांतील कामें स्वतः पहात असत. या त्याच्या एकतंत्री कारभाराचा परिणाम असा झाला कीं, नोकराच्या अंगीं जबाबदारीनें काम करण्याची पात्रता उत्पन्न झाली नाहीं. त्यांच्यांत एकतंत्री कारभारामुळें उत्पन्न होणारे दोष शिरले. महायुद्धनंतर नवीन तत्त्वें, नवीन आकांक्षा उदयास येऊन नवीन वातावरण तयार झालें व त्याच्या लाटा संस्थानीं प्रजेवर आदळून जागृति उत्पन्न झालीं, यामुळें रावसाहेबांचीं अखेरचीं २।३ वर्षें फार त्रासांत गेलीं. रावसाहेबांची सर्व कारकीर्द एकतंत्री राज्यकारभारांत गेली असल्यामुळें पालटलेल्या स्थितींत प्रसंगानुरूप धोरण बदलण्याचें जें एक प्रकारचें कौशल्य लागतें तें त्यांच्या अंगीं नव्हतें. प्रजपरिषद निर्माण होऊन राज्य कारभारांत प्रजेचा हात असला पाहिजे, जुलमी कर नाहींसें झाले पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या प्रजेकडून होऊं लागल्या. प्रजेंत असंतोष माजत चालला. परंतु रावसाहेबांच्या करारी स्वभावामुळें नवीन मनूस अनुसरून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं बदललें नाहीं. यामुळें असंतोष जास्तच पसरत जाऊन रावसाहेबांनां मनस्वी त्रासहि होऊं लागला. अशा स्थितींतच स. १९२२ सालीं त्यांचें देहावसान झालें. व त्यांचे पुत्र श्रीमंत बाबासाहेब हे राज्यारूढ झालें.

भोर संस्थान :चिमणाजी रघुनाथ (१८३६-१८७१)

 


भोर संस्थान :चिमणाजी रघुनाथ (१८३६-१८७१)

हा लहान असतां, याच्या आईनें सातारकर प्रतापसिंहाच्या विरूद्ध शहाजीस (प्रतापसिंहाचा भाऊ) मदत केली होती. त्यामुळें शहाजीनें चिमणाजीस नजर वगैरे माफ केली. सातारचें राज्य बुडाल्यावर सचीव इंग्रज सरकारचे मांडलिक झाले. चिमणाजीपंतानें संस्थानची स्थिति बरची सुधारली व संस्थानचें बरेंच कर्ज फेडलें. चिमणाजीस शंकरराव नांवाचा पुत्र स. १८५४ त आला. यावेळीं औरस संतति नसेल तर संस्थानिकास दत्तक घेण्याची परवानगी नव्हती. चिमणाजीपंतानें भोर येथें स. १८६३ मध्यें रामबागच्या ओढ्यास धरण बांधून त्याचें पाणी नळानें गावांत आणलें. त्याचप्रमाणें त्यानें भांबवडीबाग, नवीन राजवाडा, त्याजवळचा बाग, नीरानदीचा मोठा घाट, शहरातील सडक इत्यादि कामें करून भोर शहरास शोभा आणिली व संस्थानांत जागजागीं नवीन इमारती बांधल्या. पोलिसखातें उभारून तालुक्याच्या ठिकाणीं मामलेदार, मुनसफ वगैरेंच्या कचे-या स्थापन केल्या. याच्या कारकीर्दींत शिक्षणकार्यास मात्र आरंभ झाला नाहीं. त्यांनीं रामनवमीच्या उत्सवाची उत्तम शिस्त लावली.

भोर संस्थान : रघुनाथ चिमणाजी (१८२७-१८३६)




भोर संस्थान : रघुनाथ चिमणाजी (१८२७-१८३६)

याच्या कारकीर्दीत सचिवाचा कोंकणांतील पसरलेला कांहीं भाग एकत्र करण्याकरिता १८३० सालीं इंग्रजांनीं सचिवाबरोबर तह करून त्यांच्या मुलुखाचा मोबदला करून दिला. याला पुत्रसंतान नव्हतें म्हणून त्यानें दत्तक घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. रघुनाथपंत अज्ञान असतां त्याचें व त्याच्या आईचें भांडण लागलें. तें सातारच्या प्रतापसिंहानें मोडून भवानीबाईस नेमणूक करून दिली. ही बाई अखेरपर्यंत सात-यास होती.

भोर संस्थान : चिमणाजी शंकर (१७९८-१८२७)



भोर संस्थान : चिमणाजी शंकर (१७९८-१८२७)

हे गादीवर आल्यावर थोड्याच दिवसांत त्यांचें व त्यांची सापत्न मातोश्री राधाबाई हिचें वैमनस्य आलें. बाईनें आप्पा निंबाळकराची मदत घेऊन त्याच्या अरबांकडून चिमणाजीस कैदेंत ठेवविलें. चिमणाजी ८।९ महिने कैदेंत होता. बाई बरीच कारस्थानी होती. तिनें पंतावर अनेक संकटें आणलीं. शेवटीं तिनें चालविलेली बंडाळी मोडून पेशव्यांनीं पंतांस कैदेंतून सोडवून बाईला (१८१५ सालीं) रोहिड किल्ल्यावर ठेविलें. तेव्हांपासून पंताचा कारभार सुरळीत चालू झाला. या वेळेपासून पेशवाईअखेर पंत पुण्यासच रहात असे. पेशवाईच्या शेवटीं प्रथम पंत हा पुण्यासच रहात असे. पेशवाईच्या शेवटीं प्रथम पंत हा रावबाजीबरोबर टेंभुर्णींपर्यंत गेला होता. परंतु पुढें एल्फिन्स्टनचा म्हणण्यावरून आपलें संस्थान कायम ठेवण्यासाठीं पंतानें रावबाजीस सोडून इंग्रजांशीं तह केला. त्यांत पंताची मोंगलाईंतील ५०।६० हजारांची साहोत्राबाब मात्र गमावली गेली. पुढें राधाबाईला दरमहा थोडीशी नेमणूक करून देण्यांत आली. ती माहुलीस जाऊन राहिली. नंतर तिनें तीर्थयात्रा केल्या. तिच्याच पैशांतून भोराजवळील विश्रामघाट (अंबाड खिंड) बांधण्यांत येऊन अन्नसत्र चालू आहे. चिमणाजीपंतास पुत्र नसल्यामुळें त्यानें दत्तक घेऊन त्याचें नांव रघुनाथ ठेविलें. चिमणाजीपंत १८२७ सालीं वारला.

भोर संस्थान : शंकरराव रघुनाथ (१७९१-१७९८)



भोर संस्थान : शंकरराव रघुनाथ (१७९१-१७९८)
याच्या कारकीर्दीत म्हणण्यासारख्या गोष्टी घडल्या नाहींत. याला पुत्रसंतान नव्हतें. हा १७९८ सालीं वारला. तेव्हां त्याचा दत्तक पुत्र चिमणाजीपंत हा गादीवर आला शंकररावाच्या अंगीं विशेष कर्तबगारी नव्हती; तो जरा भोळसट होता. त्याच्यावर देखरेख ठेवण्याकरितां नाना फडणविसांनीं बाजीराव मोरेश्वर याची योजना केली होती. हा मनुष्य हलकट व क्रूर होता. यानें शंकररावास जवळ जवळ बंदीवासांत ठेविलें होतें. त्याच्या हातून शंकररावाची सुटका महादजी शिंदे यानें केली. बाजीरावानें एकदां शंकरराव कुटुंबासह जेजूरीस असतां त्याचा घात करण्याकरितां मारेकरी पाठविले होते. शंकरराव सखारामबापू बोकीलचा जांवई होय. रामशास्त्री न्यायाधीशाची मुलगी शंकररावाची दुसरी बायको होती.

भोर संस्थान : नारो शंकर (१७०७-१७३७)




भोर संस्थान : नारो शंकर (१७०७-१७३७)

शंकराजीपंत समाधिस्थ झाल्यानंतर शाहूनें त्याचा अज्ञान पुत्र नारोपंत यास सचीवपदाचीं वस्त्रें देऊन हे संस्थान आपल्या बाजूचें करून घेतलें. नारोपंत अल्पवयी असल्यामुळें त्याची मातोश्री येसूबाई व त्याचा मुतालिक हीं दोघें राज्याकारभार चालवूं लागलीं. येसूबाई चांगली कर्ती असून तिचें आपल्या अंमलदारावर वजन होतें. न्यायाच्या कामीं ती कोणाचीहि भीडभाड धरीत नसे. नारोपंताच्या कारकीर्दीत महत्त्वाच्या राजकीय गोष्टी घडल्या नाहींत. दमाजी थोरातावर शाहूनें याला पाठविलें असतां दमाजीनें याचा पराभव करून याला बंदींत ठेवलें. त्याला पुढें बाळाजी विश्वनाथानें सोडविलें, त्याबद्दल येसूबाईनें बाळाजीस पुणें परगणा व पुरंधर किल्ला दिला. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीं असलेल्या बेलसर गांवच्या एका रामोपासक कुळकर्ण्यानें श्रीरामाच्या मूर्ती त्यास चैत्र शु. ८ च्या दिवशीं आणून दिल्या व तेव्हांपासून भोरास रामनवमीचा उत्सव सुरू झाला. नारोपंताच्या वेळीं शाहूनें साहोत्राबाब सचिवास वंशपरंपरा वतनी करून दिली.

भोर संस्थान : शंकराजी नारायण गांडेकर

 


भोर संस्थान : शंकराजी नारायण गांडेकर

इतिहास
संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या शिवरायांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. संभाजी राजाच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. राजाराम जिंजीस गेला, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजारामानें त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें शाहु दक्षिणेंत येण्यास निघाला तेव्हां ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आला व त्यानें सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).

भोर संस्थान----2

 







भोर संस्थान-

मुंबई, पुणें जिल्हा. हें संस्थान उ. अ. १८० ते १८० ४५' व पूर्व रेखांश ७३० १४' ते ७३० १५' यांत होते. संस्थानच्या राजधानीचें भोर हें शहर पुण्याच्या दक्षिणेस सुमारें ३० मैलांवर नीरा नदीच्या तीरीं वसलेलें असून सभोंवार सह्याद्रीचे फांटे आहेत ह्या गांवावरून महाड-पंढरपूर रस्ता वरंच्या घाटानें गेलेला आहे. भोर येथें नीरेस घाट आहे. राजवाडा, भोरेश्वर देवालय, रामबाग बंगला, हायस्कूल या पहाण्यासारख्या इमारती आहेत. राजवाडा भव्य व जुन्या पद्धतीनें बांधलेला आहे. हें शहर लहान पण टुमदार असून येथील हवापाणी चांगलें आहे. पुण्याचा कलेक्टर हा भोर संस्थानचा पोलिटिकल एजंट आहे. या संस्थानचा प्रदेश पुणे, सातारा व कुलाबा या तीन जिल्ह्यांत विभागलेला आहे. संस्थानचे एकंदर पांच तालुके आहेत; पैकीं विचित्रगड सातारा जिल्ह्यांत; राजगड, प्रचंडगड, व पौनमावळ हे पुणें जिल्ह्यांत; आणि पांचवा सुधागड हा कुलाबा जिल्ह्यांत आहे. सुधागडशिवाय चारी तालुक्यांचा प्रदेश घाटमाथ्यावरीलमावळांत आहे संस्थानांत एकूण ५०२ गांवें आहेत. संस्थानचें क्षे. फ. ९२५ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) १३०४१७ आहे. संस्थानचा ३/४ भाग डोंगराळ आहे. ३/४ जमीन तांबडी असून, पाण्याखालीं जमीन फार थोडी आहे. पाण्याचा पुरवठा बहुतेक विहिरींपासून होतो. घाटमाथ्यावरून निघालेल्या मोठ्या नद्या नीरा, मुठा, मुळा, वेळवंडी व गुंजवाणी ह्या आहेत. याशिवाय लहान नद्याहि आहेत. भोरापासून उत्तरेस सुमारें २ मैलांवर वेळवंडी नदीस भाटघर येथें धरणाचें मोठें काम केलेलें आहे. हें प्रथम ९० फूट उंच होतें, तें हल्लीं (१९२६) १५० फूट उंच करण्यांत येत आहे. या धरणाचें पाणी नीरा उत्तर व नीरा दक्षिण या नांवाच्या मोठाल्या कालव्यांतून फार दूरवर दुष्काळी जिल्ह्यांत नेलें आहे. या कामासाठीं संस्थाननें आपली पुष्कळशीं गांवें बुडूं दिलीं आहेत. घांटमाथ्यावर कोठें थंड, कोठें समशीतोष्ण हवा आहे व सुधागड तालुक्यांत उष्ण हवा आहे. घाटमाथ्यावर पाऊस सुमारें १० पासून १०० इंचांपर्यंत पडतो व सुधागडकडे १५० पर्यंत पडतो. घांटावर मुख्य धान्यें भात, नागली, वरी, जोंधळा व बाजरी हीं आहेत. सुधागड तालुक्यांत मुख्य पीक भाताचें आहे. जंगलांत साग, हिरडा, जांभूळ, आंबा, फणस ही मुख्य झाडें आहेत. घाटमाथ्यावर सर्वत्र रानडुकरें व थोडे वाघहि आहेत मुख्य लोकवस्ती हिंदूंची आहे. निर्गत माल भात, हिरडा व साग व आयात माल भाताशिवाय सर्व धान्यें व इतर सर्व त-हेचा माल संस्थानचें वार्षिक उत्पन्न सुमारें पांच लाखांचें आहे.
किल्ले
संस्थानांत विचित्रगड तालुक्यांत रोहिडा, राजगडांत राजगड, प्रचंडगडांत प्रचंडगड (तोरणा), पौनमावळांत तुंग व तिकोना आणि सुधागडांत भोरप व सरसगड असे एकंदर ७ किल्ले आहेत. बहुतेक किल्ले इतिहासप्रसिद्धच आहेत. राजगडाची बांधणी प्रेक्षणीय आहे. प्रचंडगड हा सर्व किल्ल्यांत उंच आहे. भोरापासून दक्षिणेस सुमारें ८ मैलांवर भोर व वाई यांच्या दरम्यान अंबाडखिंड उर्फ विश्रामघाट येथें संस्थानची धर्मशाळा, वाडा व अन्नसत्र आहे. येथील हवा पांचगणीसारखी थंड आहे. भोरच्या आग्नेय दिशेस अंबवडे येथें शंकराजी नारायण (पंतसचीव घराण्याचा मूळपुरूष) यांची समाधि आहे. राजगड तालुक्यांत बनेश्वर, विचित्रगडांत रायरेश्वर व सुधागडांत उन्हाळें हीं स्थळें पहाण्यासारखीं आहेत.

भोर संस्थान




भोर संस्थान

भोर संस्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक संस्थान होते. भोर संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या संस्थानांपैकी एक संस्थान होते.

पंतसचिव

भोर संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण हे छत्रपती राजाराम महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील सचिव होते.[१] पंतसचिव ह्या नावाने त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला.

भोरच्या पंतसचिव घराण्याच्या राज्यकर्त्यांची नावे अशी

पंतसचिव शंकराजी नारायण (कार्यकाल १६९७ - १७०७)
पंतसचिव नारो शंकर (कार्यकाल १७०७ - १७५७) - शंकरजी नारायण ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी] (कार्यकाल १७३७ - १७५७) - नारो शंकर ह्यांचा पुतण्या
पंतसचिव सदाशिवराव (कार्यकाल १७५७ - १७८७) - चिमणाजी ह्यांचे जेष्ठ पुत्र
पंतसचिव रघुनाथराव (कार्यकाल १७८७ - १७९१) - चिमणाजी ह्यांचे कनिष्ठ पुत्र
पंतसचिव शंकरराव (कार्यकाल १७९१ - १७९८) - रघुनाथराव ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी दुसरे (१७९८ - १८२७) - शंकरराव ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव रघुनाथ चिमणाजी (१८२७ - १८३७)- चिमणाजी दुसरे ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (१८३९ - १८७१) - रघुनाथराव चिमणाजी ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव शंकर चिमणाजी (१८७१ - १९२२) - चिमणाजी रघुनाथ ह्यांची चिरंजीव
पंतसचिव रघुनाथ शंकर भाऊसाहेब पंडित (१९२२ - १९५१) - शेवटचे पंतसचिव

८ मार्च १९४८ रोजी हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.

परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी

 


परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी

परशुराम त्रिंबक किन्हईकर (इ.स. १६६० - इ.स. १७१८) हे छत्रपतींचे पंतप्रतिनीधी आणि नंतरच्या औंध संस्थानाचे संस्थापक होते.
कारकीर्द

परशुरामपंत वयाच्या १४ व्या वर्षी रामचंद्रपंत अमात्यांच्या कार्यालयात विशाळगडास रुजू झाले. दप्तरीच्या आणि लष्करच्या कारभारात चोख असणाऱ्या पंतांची प्रगती झपाट्याने झाली आणि अल्पावधीतच त्यांची अमात्यांचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाली.

छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराज्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्य संपुष्टात आणण्याचा चंगच बांधला होता. अशा काळात औरंजजेबाच्या ताब्यातला पन्हाळगड पंतांनी १६९२ साली मोठ्या हिकमतीने परत जिंकून घेतला. यानंतर अमात्यांच्या मोलाच्या मार्गदर्शानाखाली पंतांनी मिरजेपासून प्रचितगडापर्यंतचा मुलूख पादाक्रांत केला. त्याबरोबरच भूदरगड आणि चंदनगडासारखे किल्लेदेखील पुन्हा स्वराज्यात आणले.

पुढे औरंगजेबाने १६९९च्या शेवटास सातारच्या किल्ल्याला वेढा घातला असता पुढचे ५ महिने पंतानी ह्या किल्यावरच्या मराठ्यांना रसद पुरवली आणि किल्ला झुंजवण्यास मोलाची मदत केली. १७०० साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने - राणी ताराबाईंनी - मुघलांविरुद्धचा लढा सुरु ठेवला तेव्हा पंतांचा त्यांना मोठाच आधार होता. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना सुभालष्कर, समशेर जंग असे किताब बहाल करण्यात आले.

सातारच्या किल्ल्याप्रमाणेच १७०२ साली पंतांनी विशाळगडदेखील तब्बल ५ महिने झुंजवला पण सरतेशेवटी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. पण ताबा पुढच्या ५ वर्षातच म्हणजे १७०७ साली मुघलांशी निकराची झुंज देऊन परत काबीज केला. त्याचबरोबर सातारा, वसंतगड, पन्हाळगड हे किल्ले परत स्वराज्यात आणले.

१८ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात परशुरामपंत सातारच्या शाहू महाराजांच्या सेवी रुजू झाले. तिथपासून कराड आणि आजूबाजूचा मुलुख हा पंतप्रतिनिधींच्याच ताब्यात होता आणि त्यांचा कारभार कराडच्या भुईकोटातून चाले.

१८१८ साली परशुरामपंतांचे निधन झाले.
पंत प्रतिनिधी

पंत प्रतिनिधी हे पद राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत निर्मीले गेले. छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ साली जिंजीला असताना प्रल्हाद निरोजी ह्यांना आपले प्रतिनिधी म्हणून नेमले. हेच पहिले प्रतिनिधी. त्यांचा कर्नाटकात मृत्यू झाल्यानंतर १६९४ साली तिमाजी रघुनाथ हणमंते ह्यांची ह्या पदी नेमणूक झाली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१ साली राणी ताराबाईंनी परशुरामपंत त्रिंबक ह्यांची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आणि त्यानंतर पंताच्या पुढच्या वंशावळीस पंतप्रतिनिधी असे संबोधले जाऊ लागले.
संदर्भ

पंत प्रतिनिधी बखर
लोकप्रभा ५ नोव्हेंबर २००४ मधील लेख

गजेंद्रगड आणि बहिरजी हिंदुराव

 


गजेंद्रगड आणि बहिरजी हिंदुराव

गजेंद्रगड- मुंबई, धारवाड जिल्हा. हें बदामीच्या पश्चिमेस २८ मैलावंर एक खेडे आहे. हें पूर्वी मुधोळच्या घोरपड्यांकडे होतें. येथें शिवरायांनी बांधलेला एक किल्ला आहे. येथील उंचगिरी नांवाचा दुसरा किल्ला १६८८ त दौलतराव घोरपडयांनी बांधला. गांवापासून ३ मैलांवर एका खोऱ्यांत यात्रा भरत असते. या खोऱ्यांत शंकराची मूर्ति आहे. लोकसंख्या (१९११) ८३०९.

येथील घोरपडयांनां हिंदुराव ही पदवी आहे. बहिरजी घोरपड्यानें शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत गजेंद्रगड व गुत्ती मिळविली. संताजी हा प्रख्यात सेनापति या बहिरजीचा भाऊ होय. संताजीला पुढें कापशी गांव इनाम मिळाल्यानें त्याचे वंशास कापशीकर नांव पडलें व बहिरजी हा गजेंद्रगडास राहिल्यानें त्याच्या वंशास गजेंद्रगडकर म्हणूं लागले. याचा वडील मुलगा हा बावीस वर्षांचा असतांनाच मुसुलमानांबरोबरच्या एका लढाईंत ठार झाला. त्याचा धाकटा भाऊ शिदोजी याला हिंदुराव ममलकतमदार जफ्तनमुल्क फत्तेजंग समशेर बहादूर सेनापति अशी पदवी होती. कोल्हापुरची देवी मुसुलमानांच्या भयामुळें मध्यंतरीं दुसरीकडे ठेविली होती, ती पुन्हां कोल्हापुरच्या राज्याची स्थिरस्थावर होतांच या शिदोजीनें स्थापिली. त्याबद्दल त्याला देवीच्या प्रधानकीचीं वस्त्रें व पांच गांवची सरदेशमुखी इनाम मिळाली. शिदोजी हा पेशव्यांनां अनुसरून वागे. याचे मुरारराव, दौलतराव व भुजंगराव असे तीन पुत्र होते. पैकी भुजंगराव हा २० व्या वर्षी लढाईंत मरण पावला. मुरारराव हा पराक्रमी होता. हा जवळ जवळ स्वतंत्र वागे; याच्या पदरीं कवायती पलटणें असल्यानें त्याचा दरारा निजाम, टिपू व इंग्रज यांस त्या प्रांतीं चांगलाच असे. हा पेशव्यांच्या तर्फेनें तिकडे बंदोबस्त ठेवी. त्यांनीं त्याला सेनापतिपद दिलें होतें. हा बहुधा गुत्तीस राही. वीस पंचवीस लाखांचा प्रांत त्यानें काबीज केला होता. अनेक कारकीर्दी त्यानें पाहिल्या होत्या. इंग्रजांसहि यानें अडचणींत मदत केली होती. मुराररावाकडे गुत्ती व दौलतरावाकडे गजेंद्रगड अशी वांटणी पेशव्यांनीं करून दिली. मुरारराव शेवटीं टिपूच्या हातीं लागले. त्यानें त्याला शेवटपर्यंत रुप्याची बेडी पायांत घालून कपालदुर्गास कैदेंत ठेविलें होते. टिपूनें गजेंद्रगडहि घेतला. पुढें हरिपंत तात्या टिपूवर चालून आले तेव्हा पेशव्यांच्या मदतीनें दौलतरावानें गजेंद्रगड हस्तगत केला. त्यावेळीं तीन लाखांचा सरंजाम किल्ल्याकडे चालत होता. परशुरामभाऊ पटवर्धन व दौलतराव यांची फार दोस्ती होती. दौलतरावहि शूर होता. निजामाशीं तह झाल्यावेळीं हरिपंततात्यांनीं दौलतरावाची पावणेतीन लक्षांची जहागीर निजामाकडे देऊन दौलतरावास पंचवीस हजारांची जहागीर खर्चास ठेविली. मध्यंतरी थोरल्या माधवरावांनी गलगलें, इंगल वगैरे ५०।६० हजारांची जहागीर यांना दिली होती. रावबाजीच्या वेळीं पुन्हा घोरपड्यांच्या जहागिरीपैकीं कांही गांवे जप्त झालीं. दौलतरावास बहिरजी म्हणून पुत्र होता. त्याचा पुत्र भुजंगराव. बहिराजी याच्या वेळी इंग्रजी झाली. त्यावेळीं गजेंद्रगड संस्थान तेरा हजारांचें होतें. [डफ; कैफियती; बिजापूर ग्याझे. राजवाडे. खं. ७, १०].

गु त्ती क र घो र प डे



गु त्ती क र घो र प डे.-

या घराण्याचा मूळ पुरूष सेनापती संताजी घोरपडयाचा भाऊ बहिरजी हिंदुराव हा होय. संताजीच्या खुनानंतर बहिरजी कनारटाकांत आला व त्यानें मौंगलांची नौकरी पत्करून, गजेंद्रगड, गुत्ती वगैरे मुलुख मिळविला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र शिदोजी हा गादीवर बसला. शिदोजीच्या मागून त्याचा पुतण्या यशवंतराव हा गुत्तीचा मालक झाला. हा पुढें मोंगलांकडून निघून पेशव्यांनां मिळाला. हा हैदराच्या स्वा-यांत नेहमी पेशव्यांतर्फे हजर असे. शिदोजीचा मुलगा प्रख्यात मुरारराव ह्यानें त्या भागांत आपलें सामर्थ्य फार वाढवून पुष्कळच प्रांत मिळविला (मुरारराव घोरपडे) पहा. हाहि गुत्तीचा कारभार पाहत असे.पुढें टिपूनें एका लढाईंत मुरारराव व यशवंतराव यांस पकडून कैदेंत ठेविलें.तेव्हां यशवंत रावाचा मुलगा मालोजी हा गुत्तीचा मालक झाला. त्यानंतर दुसरया एका लढाईंत गुत्ती टिपूनें घेऊन आपल्या राज्यास जोडली.त्यामुळें पेशव्यांनीं मालोजीस गुत्ती ऐवजीं सोंडूर (हें टिपूकडून घेऊन) ठाणें दिलें व त्याबरोबरच कंकण वाडी, बेळवती वगैरे तालुके सरंजामादाखल दिले. यानंतर सोंडूर संस्थान स्थापन होऊन त्याचा पइिला पुरूष शिवरात्र घोरपडे हा बनला. पुढें गुत्तीकर घरण्यांतील दुसरा यशवंतराय हा नाना फडणिसांनां कैदेंतून सोडविण्याच्या वेळीं पुढें आला होता. पेशवाइअखेर हा रावबाजी विरूध्द्र इंग्रजांस मिळाला. आणि त्यांच्या तर्फें पेशव्यांर्शी लढला. या त्याच्या मदतीबद्दल ज.वेलस्लीनें त्यास सदतीस हजारांची जहागीर दिली. पुढें दौलराव शिद्यांच्या दरबारींहि हा इंग्रजांतफें काम करीत असे. हा सन १८२१ सालीं पुणें येथें मरण पावला; त्यास मालोजी हा एक पुत्र होता. याचा वंश हल्लीं सोंडूर प्रांतीं नांदत आहे . ( खरे-ऐ. ले. संग्रह; डफ; बाड- कैफियती).

Thursday 22 September 2022

© शिवरायांचे चुलते शरिफजीराजे भोसले

 

( पुण्यनगरी All Edition मध्ये गाजलेला लेख ) 7/9/2022
© शिवरायांचे चुलते शरिफजीराजे भोसले
 १६२४ भातवडीचे युद्ध । शहाजीराजे यांचा पराक्रम दर्शवणारी लढाई । Bhatwadi War  | ShauryaGatha - YouTube


पोस्तसांभार :: © डॉ. सतीश कदम, 9422650044
मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याचे योगदान महत्वाचे असून आपणाला त्यातील काही ठराविक महापुरुषांचाच इतिहास माहीत असतो. मात्र या घराण्यात अनेकांनी आपल्या प्रणाची आहुती देऊन महाराष्ट्र धर्म, मराठी संस्कृति टिकवून ठेवलेली आहे. शिवरायांचे दोन्ही आजोबा मालोजीराजे व लखुजी जाधवराव, थोरले भाऊ संभाजी, चुलते शरिफजीराजे या घरच्या माणसाबरोबरच चुलत भाऊ, दोन मामा, मामांची मुले अशा जवळच्या अनेक नातलगांनी लढत लढत रणांगणावर आपले प्राण दिले. पैकी याठिकाणी शिवरायांचे चुलते शरिफजिराजेंच्या अप्रकाशित पैलूवर प्रकाश टाकणार आहोत.
भोसले घराण्यात बाबाजीराजे भोसले यांच्यापासून खर्यांअर्थाने राजकीय कारकिर्दीला सुरुवात होते. बाबाजींना मालोजी आणि विठोजी ही दोन मुले होती. विठोजीराजांना मुंगी पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, भांबोरे, वावी इत्यादि गावची जहागिरी होती. या घराण्याचा इतिहास हा स्वतंत्र विषय आहे.याठिकाणी आपणास मालोजीराजेंच्या घराण्याचा इतिहास पहायचा आहे. त्यानुसार मालोजीराजे नगरच्या निजामशाकडून लढत असताना इंदापूरच्या लढाईत मारले गेले. मालोजींना फलटणकर निंबाळकर घराण्यातील दीपाऊपासून शहाजी आणि शरिफजी ही दोन मुले झाली. शरिफजीराजेंचा जन्म इ.स. 1604 साली वेरुळ याठिकाणी झाला. दिपाबाईनी नगरच्या शहाशरीफ दर्ग्यास नवस केल्यामुळे पुत्रप्राप्ती झाल्यावरून आपल्या मुलांना शहाजी आणि शरिफजी ही नावे दिल्याचे बहुतेकांनी सांगितलेले आहे. परंतु 1327 च्या कराडच्या एका दानपत्रात शहाजी तर 1587 च्या कागदपत्रात भोसले घराण्यातच शरिफजी अशी नावे आढळून येतात. यावरून भोसले घराण्यात शहाजी आणि शरिफजी ही नावे अगोदपासूनच ठेवली जात असल्याचे दिसून येते. याशिवाय शहाशरिफ हे एकाच मुस्लिम महापुरुषाचे नाव असूनही ते दोन मुलांना स्वतंत्रपणे का देण्यात आले? तसेच शहाशरीफ यांचा जन्मच मुळी 1523 दरम्यानचा असून त्याएगोदर भोसले घराण्यात शहाजी आणि शरिफजी ही नावे प्रचलित असल्याचे दिसून येते. म्हणूनच वा. सी. बेंद्रे यांनीही एका दर्ग्यावरून ही नावे ठेवण्यात आल्याच्या कथेला असहमती दर्शविलेली आहे. अहमदनगर गावालगत शहाशरीफ नावाच्या मुस्लिम संताचा दर्गा आहे.
असो, मालोजीराजेंच्या अकाली निधनानंतर चुलता विठोजींनी शहाजी आणि शरिफजी या दोन मुलांचा सांभाळ केला. शरिफजीराजांचा विवाह शिवनेरीचे किल्लेदार घराणे विजयराज विश्वासरायांच्या कन्या दुर्गाबाई यांच्यासोबत झाला होता. शिवरायांच्या थोरल्या भावजयी संभाजीराजेंच्या पत्नी जयंतीबाईसुद्धा याच घराण्यातील होत्या. शरिफजिराजांची स्वत:ची दीड हजाराची फौज असून ते काहीकाळ मोगलांच्या सेवेत होते. पुढे शहाजीराजेंसोबत नगरच्या निजामशाहीत असताना त्यांना खानवटबरोबरच राशिन, पांडे पेडगाव, केळगाव इत्यादि ठिकाणच्या पाटीलकीपण मिळालेल्या होत्या. शरीफजीराजेंची कारकीर्द अत्यल्प असून ते आपल्या बलिदानाने अजरामर ठरले आहेत.
© त्यानुसार शके 1546, कार्तिक वद्य अमावस्या म्हणजेच 24 आक्टोबर 1624 यादिवशी मोगल आणि आदिलशाही फौजांनी एकत्रितपणे निजामशाहीवर आक्रमण करण्याकरिता नगरजवळील भातोडी गावी तलावाच्या खालच्याबाजूला मुक्काम ठोकला असता निजामशाहीचा वजीर मलिकअंबरच्या नेतृत्वाखाली शहाजी आणि शरिफजीराजेंनी भातोडी गावाच्या वरच्या बाजूस असणारा तलाव फोडून टाकल्याने शत्रूची त्रेधात्रिपट उडाली. खरतर हा गनिमी काव्याचाच एक प्रकार असून शत्रूच्या सैन्यात मोठा गोंधळ उडाला. ज्यावेळी लढाई हाताघाईवर आली त्यावेळी शरिफजीराजेंनी अतुलनीय पराक्रम गाजवत मुख्य सेनापती मुल्ला मुहम्मद लारीला ठार केले तर फर्हाादखानाचा शिरच्छेद केला. यादरम्यान लढत असताना शरिफराजेंनाही वीरमरण आले. या युद्धाला इतिहासात अनन्यसाधारण महत्व असून याला भातोडीचे युद्ध म्हणतात. यावेळी त्यांच्यासोबत लखुजी जाधवराव, विठोजीराजेंची सात मुले इत्यादि आप्तगण होते. शिवरायांचे सख्खे चुलते असलेल्या शरिफजीराजेंच्या बलिदानाने भातोडीची भूमी पावन झाली. भातोडी गाव नगरपासून 25 30 किमीवर जामखेडच्या दिशेला आहे.
शरिफजींना महादजी आणि त्रिंबकजी अशी दोन मुले होती. पैकी त्रिंबकजी हे औरंगबाजेच्या फौजेत असताना त्यांचे वास्तव्य बरेच दिवस औरंगाबाद येथे असून तेथे त्यांची मोठी हवेली होती. त्यांनीच आपले जहागिरीचे ठिकाण असलेल्या कर्जत तालुक्यातील राशिनच्या माळावर औरंगपूरपेठ वसविली होती. तीच आजची यमाईदेवीपुढील मंगळवारपेठ. या मंगळवारपेठेत त्रिंबकजींचा भला मोठा वाडा, विहीर, बारव, बगीचा होता. मराठा सरदारांच्या बहुतेक समाध्या या मंदिर परिसरात बांधण्याची चाल असल्याने व शरिफजीसह सर्वजण देविभक्त असल्याने राशिनच्या देवीमंदिरालगत शरिफजीराजे, त्यांच्या पत्नी दुर्गाबाई आणि त्रिंबकजीराजेंच्या समाध्या आहेत.या समाध्याचे बांधकाम वेरुळमधील समाध्याच्या धर्तीवर झालेले आहे. पुढे भाऊसाहेब राजे भोसलेपर्यंत या घराण्याचे वास्तव्य राशिनला राहिले. राशिनमधून हे घराणे पुढे खानवटला स्थलांतरीत झाले. त्रिंबकजीचा मुलगा व्यंकटजीला संभाजी, माणकोजी ( खानवट शाखा ), शहाजी, तुकोजी, बाबाजी आणि शरीफजी ( बेळवंडी ) अशी सहा मुले झाली. त्यांच्या जिंती, खानवट, भांबोरे, सावर्डे, वावी इत्यादी शाखा झाल्या. शरिफजीराजेंचे वारस मोगलाकडे तर शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले. शहाजीराजेंना शिवरायासारखे पुत्र लाभले म्हणून त्यांच्या घरात छत्रपतीसारखे पद मिळाले. मात्र शरिफराजेंच्या तीन वंशजांनीही पुढे कोल्हापूरचे छत्रपतीपद भूषविले. त्यानुसार खानवटशाखेतील माणकोजी हे दुसरे शिवाजी ( 1762 – 1813 ), सावर्डे शाखेतील नारायणराव हे चौथे शिवाजी (1871 – 1883 ) व चावरे शाखेतील प्रतापसिंह हे पाचवे शिवाजी नावाने करवीरचे छत्रपती झाले. यातील चौथ्या शिवाजीला दरबारी आणि इंग्रजांनी वेडा ठरवून हालहाल करून मारले. अहमदनगरला दिल्लीगेटजवळ त्यांची समाधी आहे.
एकत्रितपणे कुठेही निरंतर सत्ता नसल्याने शरिफजींचे वारसदार विविध भागात विभागले गेल्याने राशिनच्या समाधीची निगा नाही किंवा भातोडीत कुठलेही स्मारक वा समाधी नव्हती. याची उणीव भरून काढण्यासाठी भातोडीतील युवक एकत्रित येऊन भातोडीत छानशे समाधीवजा स्मारक उभे केले असून त्याची दररोज साफसफाई व पूजाअर्चा होत असते. याशिवाय दरवर्षी त्यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी करतात. भातोडी म्हणजे बाणाचा भाता असा त्याचा एक अर्थ असून आठशे वर्षापुर्वी ही एक वाडी होती. तेथे भातपुरे लिंगायत वाण्याची वस्ती होती. त्यांनी भातेश्वरनावाने लिंगाची स्थापना केल्याने गावाला भातेवाडी व पुढे भातोडी नाव पडले. गावात श्री नरसिंहाचे मंदिर आहे, त्यालाही प्राचीन इतिहास असून नवनाथापैकी बरेचजण येथे येऊन गेलेले आहेत.
© निजामशाहीत नगरजवळील भातोडी हे लष्करी ठाणे असून ते पुढेही कायम होते. निजामशाहीच्या काळात भातोडीत मोठी गढी होती. तर भातोडीतील ऐतिहासिक तलाव हा इ. स. 1565 ते 1588 च्यादरम्यान अहमदनगरच्या निजामाचा एक मंत्री सलाबतखान दूसरा याने मेहकर नदीवर बांधलेला आहे. पुढे 1892 ला इंग्रजांनी 6901 मजुरावर 50000 रुपये खर्चून याचे आधुनिकीकरण करून घेतलेले आहे. याशिवाय भातोडीजवळील वडगाव दौला गावाशेजारी कलावंतींनीचा महाल असून तेथे बुर्हाहन निजामशाहा नृत्य गायन आणि प्राण्याच्या झुंजी पाहायला येत असे. पेशव्यांच्या कालखंडात भातोडीला टांकसाळ असून त्यातून भातुडी, अंकुशी हे चलन तयार होत होते. ज्यांनी विधानसभेत नगरचे नेतृत्व केले ते प्रभाकर कोंडाजी भापकार आणि ज्यांनी लतादीदीबरोबर घन:शाम सुंदरा ही भुपाळी म्हटली ते पंडितराव नगरकर यांचा जन्मही भातोडी याचठिकाणी झालेला आहे. आज याच भातोडीत शिवरायांचे सख्खे चुलते शरिफजीराजे चिरशांती घेत आहेत.

डंकेवाले कदम आणि हाथीवाले कदम, ग्वाल्हेर

 

©डंकेवाले कदम आणि हाथीवाले कदम, ग्वाल्हेर


पोस्तसांभार :: dr. satish kadam
ग्वाल्हेरमधील शिंदे संस्थानात आंग्रे, शितोळे, जाधव, आगवाणे, कदम याप्रमाणे जवळपास चोवीसएक मराठा सरदार होते. महादजींच्यारूपाने उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला. शिंदे मुळचे सातारजवळील कण्हेरखेडचे. मुलूखगिरीच्या निमित्ताने ग्वाल्हेरला गेलेतरी कुलदैवत असो की विवाहसंबंध महाराष्ट्राची नाळ कायम ठेवत अख्खी मराठी मंडळी ग्वाल्हेरला आणून स्वराज्यवृद्धी केली. इतर सरदाराबरोबरच कदम नावाची दोन घरे शिंदेंच्या इतिहासात मोठे योगदान देऊन गेली. त्यापैकी एकाला डंकेवाले तर दुसर्यादला हत्तीवाले म्हणून ओळखले गेले. वास्तविक पाहता कदम घराण्याचा हा फार मोठा सन्मान आहे.
डंकेवाले कदमांचे मुळ पुरुष कोरेगाव तालुक्यातील साप गावचे सरदार इंद्रोजी कदम असून ते महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहुंचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी अनेक मोहिमेत भाग घेतलेला होता. पुण्यातील हुजूरपागा त्यांच्या घोडदलाची जागा असून पटवर्धन त्याची व्यवस्था पहात होते. महाराष्ट्रात सर्वात सुंदर असलेल्या सापमधील इंद्रोजींच्या गढीत तानाजी, फत्तेशिकनसह सर्व ऐतिहासिक मालिकांचे चित्रीकरण होते. इंद्रोजींचे पुढील वारसदार यादवराव आणि त्यानंतर ग्वाल्हेरमध्ये ज्यांनी इतिहास निर्माण केला ते कृष्णराव कदम हे महादजी शिंदेचे पुत्र दौलतराव आणि बायजाबाई यांचे दत्तकपुत्र महाराजा जनकोजीराव शिंदेंचे मामा असून जनकोजीरावांचे लवकर निधन झाल्याने कृष्णराव कारभारात मदत करण्यासाठी ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरच्या इतिहासात ते मामासाहेब नावाने प्रसिद्ध पावले. जनकोजींच्या पत्नीने दत्तक घेतलेले जयाजीराव अल्पवयीन असल्याने इंग्रजांनी मामासाहेबांना ग्वाल्हेरचे गव्हर्नर नेमले. अल्पवयीन वारसदार आणि इंग्रजांचा दबाव अंगावर घेत मामासाहेबांनी शिंदेची गादी मोठ्या खुबीने पुढे नेली. पुढे जयाजीरावांना मामासाहेबांची कन्या चिमणाराजे दिल्याने त्यांचे वजन आणखी वाढले. त्यांच्यातील कर्तृत्वामुळेच त्यांना नगारानौबतीचा मान आणि ‘ मुज्जफरजंग बहादूर डंकेवाले’ हा किताब दिला. मामासाहेबांची स्वारी कुठेही गेलीतर नगारानौबत म्हणजेच डंका वाजवून त्यांचे स्वागत केले जायचे. डंक्याचा मान असणारे ते शिंदेशाहीतील एकमेव सरदार असल्याने त्यांना डंकेवाले कदम म्हणून ओळखले गेले. मामासाहेब ग्वाल्हेरला असलेतरी सापगावची नाळ कायम होती. जयाजीराव कारभारावर आल्यानंतर ते सापला परत आले. तोवर या घराण्याने ग्वाल्हेरमध्ये स्वत:चे साम्राज्य उभे केले होते. त्यानंतरचे वारसदार आप्पासाहेब, यादवराव, बलभीमराव यांनी शिंदेशाहीचे सरदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले. आजही मामसाहेबांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा म्हणून ग्वाल्हेरमध्ये मामा का बझार, आप्पासाहेबांच्या नावाने आप्पागंज, 27 एकरावरील मामा का वाडा या वास्तू एवढ्या विस्तीर्ण आहेत की, त्यात आजच्या महानगर पालिकेचे पाच वार्ड मोडतात. शिवाय 50 एकरावरील कदम साहिबका बगीचा, मामासाहब का ताल म्हणजे तलाव या ठळक बाबी पहायला मिळतात. स्वातंत्र्यानंतर कृष्णराव दुसरे त्यांची तीन मुले बलभीमराव, सिद्धेश्वरराव आणि प्रद्युम्नराव यांनी त्यांचा वारसा पुढे चालविला. सापगावातील पाटील देशमुखीचे सर्व मानसन्मान आजही या कदम घराण्याकडे असून तेथील ऐतिहासिक गढीमध्ये चालणार्याा सिनेमाच्या चित्रीकरणातून करोडोची उत्पन्नप्राप्ती होते. आजचे कर्तृत्वान वारसदार संग्रामसिंह, इंद्रोजीराव आणि विरुपाक्षराव असून संग्रामसिंह ग्वाल्हेरमधील मराठा हितचिंतक सभेचे अध्यक्ष आहेत. तर इंद्रोजीराव 150 खाटाचे सुसज्य रुग्णालय तसेच मोठ्या शैक्षणिक संस्था चालवितात. त्यांनी बांधलेली पाच राममंदिरे आजही सुस्थितीत आहेत.
त्यानंतर ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानात हाथीवाले म्हणून आणखी एक कदम घराणे आपल्या कर्तृत्वाने मोठ्या नावारूपाला पोहोचले. या घराण्याचे मुळ पुरुष भगवंतराव हे असून ते फलटण तालुक्यातील गिरवीचे रहिवाशी होते. पहिल्या बाजीरावाच्या कालखंडात त्यांनी उत्तरेकडील मोहिमेत मोठा पराक्रम गाजविला. त्यावेळी बाजीरावाने त्यांना बरवाई आणि एदलाबादची जहागिरी दिली. 1761 साली झालेल्या पानीपत युद्धात भगवंतरावांनी तलवार गाजवत देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे पानिपतच्या मैदानावरील हुतात्मा स्तंभावर सेनापती भगवंतराव कदमांचे नाव कोरले गेले. त्यानंतर चिरंजीव आप्पाजीराव महादजी शिंदेकडे गेले. वडीलाप्रमाणे पराक्रमी आप्पाजीरावांनी थोड्याच दिवसात आपला ठसा उमटविला. याशिवाय महादजी शिंदेंनी गुलाम कादिरच्या विरोधात काढलेल्या मोहिमेत आप्पारावांनी विशेष कामगिरी केल्याने या घराण्याला ‘खडी ताझिम’ हा किताब दिला. खडी ताझिम म्हणजे संबंधित सरदार दरबारात आल्यानंतर सर्व दरबार्यांेनी उठून उभे राहायचे असते. याशिवाय शिंदे घराण्याकडून त्यांना हत्ती आणि पालखीचा मान मिळाला.
शिंदे संस्थांनातील कुठल्याही समारंभप्रसंगी पहिला हत्ती व्हाईसरॉयचा, दुसरा महाराजा शिंदेंचा तर तिसरा हत्ती भगवंतराव कदम घराण्याचा असायचा. त्यामुळे गिरवीकर कदमांना हाथीवाले कदम नावाने ओळखले जाऊ लागले. अगदी कागदोपत्रीसुद्धा त्यांचे नाव हाथीवाले म्हणूनच दर्ज झाले. पुढे हाथीवाले घराण्यात प्रत्येक पुरुषांनी आपली तलवार गाजविली. आप्पाजीरावांचे 1800 साली उजैन याठिकाणी निधन झाले. त्यांचे पुढील वारसदार भगवंतराव दुसरे यांनी दौलतराव शिंदे यांच्यासोबत काम केले. त्यामुळे दौलतरावांनी त्यांना मध्यप्रदेशातील बलोंने आणि निमनवासा येथील जहागिरी दिली. त्यानंतरचे वारसदार रामराव हेसुद्धा मोठे पराक्रमी निपजले. अशाच एका मोहिमेत झाशीच्या किल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यामुळे त्याठिकाणी त्यांची छत्री म्हणजे समाधी बांधण्यात आलेली आहे. त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई या मोठ्या धाडशी आणि धार्मिक वृत्तीच्या असून काशीमध्ये गंगा नदीवर भक्तांच्या सोयीसाठी त्यांनी एक घाट बांधला. त्या घाटाला ‘ कदम घाट ‘ म्हणून ओळखले जाते.
हाथीवाले कदम घराण्याने प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन उत्तर भागाला मराठ्यांचे मनगट काय असते ते दाखविले. पेशवे आणि शिंदे अशा दोघांचा स्नेह त्यांच्यावर असल्याने त्यांना राजस्थानातील चिताखेडा, मध्यप्रदेशातील निमच, महाराष्ट्रातील जळगाव, मुक्ताईनगर,एदलाबाद इत्यादि अनेक ठिकाणच्या जहागिरी दिल्या होत्या. ग्वाल्हेरमध्ये 11 एकरावर हाथीवालेंचा भव्य वाडा होता. त्यांच्या ताफ्यात नेहमी पाच हत्ती असायचे. त्यामुळे वाड्याचा दरवाजा एवढा मोठा होता की, त्यातून अंबारीसह हत्ती आतमध्ये प्रवेश करू शकत होता. या वाड्याला कदमसाब का बाडा म्हटले जाते. आज वाड्याचा काही अंश शिल्लक असून त्या परिसराला कदमसाब का बाडा नावाने ओळखतात. या वाड्यात नगारखाना, हत्तीखाना, पागा, इमामबाडा म्हणजे मुस्लिम पिराचे स्वतंत्र स्थान होते. जनकगंज भाग हाथीवाल्याच्या पूर्वजावरूनच ओळखला जातो. पुण्यात लक्ष्मणराववगैरे यांचे वंशज राहतात.
काळ बदलत राहतो तशा गरजा बदलतात. कधीकाळी शिंदेशाहीला आधार द्यायला गेलेली मंडळी दोनचार पिढ्यांनंतर परततर येऊ शकत नाही. त्यामुळे आजही ग्वाल्हेरमध्ये गेलाततर आपणास इंगळे, सुरवसे, फाळके, चव्हाण अशी अनेक मराठी नावे सापडतील. मागच्या दशकापर्यंत ग्वाल्हेरला मराठी शाळा होत्या. आता परिस्थिती बदलायला लागलीय. बहुतेकांनी महाराष्ट्रातल्या सोयरिकी करून मराठीपण जपण्याचा प्रयत्न केला. अर्थकारण बदलायला लागलं तसं पुन्हा स्थलांतर सुरू झाले. त्यामानाने डंकेवाले कदमांची परिस्थिती उत्तम आहे. मात्र हाथीवाले बहुतेक बाहेर पडले. पुरस्काररुपी आडनावाला आज वेगळ्याच नजरेने पाहिले जात असल्याने त्यांनी पुन्हा मुळचे कदम नाव स्वीकारले आहे. कदमांनी दुरदेशी वाजविलेला डंका मराठ्यांच्या मनात हत्तीचं बळ आणणारा आहे. म्हणून डंकेवाले हो या हाथीवाले, उन्हे पढनेवाले मात्र दिलवाले चाहिए. dr. satish kadam, आगामी " गाळीव इतिहास भाग 1 " या पुस्तकातून

Sunday 18 September 2022

।। गावगाड्यातील देशमुखांचे काम व त्यांचे मानपान व हक्क मिळकत.

 


।। गावगाड्यातील देशमुखांचे काम व त्यांचे मानपान व हक्क मिळकत. रयत पोसणारा व सरकार यांना जोडणारा मुळ कना. ।।
postsaambhar ::ओंकार देशमुख 
देशमुख यांचा संदर्भ अगदी मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या अगोदर पासुन आढळतो. हा देशमुख म्हणजे परगण्यातील अनेक गावांचा वतनदार. सर्वात उच्च दर्जाचे हे वतन होते. शिवकाळात जर बारा मावळच्या देशमुखांच्या इतिहासाकडे वळाले तर हे देशमुख एवढे झोंड व निडर होते कि आदिलशाहास वेळ प्रसंगी जुमानत नसत. आपल्या वतनात ते स्वतंत्र राजे असल्या सारखा कारभार करीत. आदिलशाहास मोहिमेवेळी सैन्य स्वरुपात व रसद असी दोन्ही स्वरुपात मदत करत असे. यांच्या वादात पडण्यास अदिलशाहा हि धजावत नसे. हे देशमुख अतिशय चिवट तर होतेच शिवाजी महाराजांची ज्या वेळेस १६४४ च्या सुमारास बारा मावळ ची घडी घालाय घेतली तेव्हा अगोदर हे सर्व देशमुख एकत्र केले. त्यांच्या सोबत मिळून राजकारणाचे पुढचे डाव आखले. अस्याच या मातब्बर देशमुखांची कामे, मानपान व त्यांचा हक्क यावर अधिक जाणून घेणार आहोत.
देशमुख व देशपांडे यांचा जो शेतसाऱ्यावरील हक्क होता त्यास ‘रूसूम’ म्हणत. पाटील− कुलकर्ण्यांप्रमाणेच परागण्याच्या पंचायतीत त्यांना हक्कबाबी असत. तंटे, मजहर, न्याय निवाडे यांच्यात देशमुखाची भुमिका अग्रस्थानी मानली जाई. सोबत पाटिल ही तेवढाच महत्त्वाचा अधिकारी म्हणून असे. देशमुखास पाटलाप्रमाणेच तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल वगैरे वस्तू बलुत्याप्रमाणेच त्यांनाही अधिक प्रमाणात मिळत असत. परागण्याच्या जमाबंदीचे सर्व दप्तर देशपांड्यांच्या ताब्यात असे. त्यांच्या हाताखाली ‘मोहरीर’ नावाचा एक कारकून हे काम पाही. निरनिराळ्या वहिवाटदारांचे, वतनदारीचे हक्क व जमिनीची प्रतवारी, तिचे वर्णन इ. बारीकसारीक बाबींची नोंद या हिशोबात केलेली असे. देशपांडे विविध गावांच्या कुलकर्ण्यांनी पाठविलेले सर्व हिशोब संकलित करून सर्व परगण्यांचा ताळेबंद तयार करीत असे. कोकणात व कर्नाटकात हे काम देसाई हे वतनदार करीत. कोकणातील प्रभुपणाचा हुद्दाही देसायांच्याच जोडीचा असे. काही वेळा प्रभुदेसाई असा वतन-हुद्याचा उच्चार करीत. देशपांडे-देसाई हे देशमुखाच्या हाताखालील वतनदार. देशमुखाचे पाटलाप्रमाणेच कामकाज किफायतशीर होते. पण देशमुखाची वा पाटलाची देशमुखी, पाटिलकी जप्त करण्याचा अधिकार राजाचा असे. १६५९ ला अफजलखानास मदत केल्या प्रकरणी मसूर च्या सुलतानजी जगदाळे देशमुख याची देशमुखी जप्त करुन त्याचा वसंतगडावर शिरच्छेद शिवाजी महाराजांची जाने. १६६० ला केला होता. पुढे सुलतानजी जगदाळे देशमुखाची बायको आपल्या लहाण मुलास घेऊन राजगडावर देशमुखीचे वतन मागाय आली होती, पण शिवाजी महाराजांनी ते अमानत केले. पण तिच्या मुलाच्या संगोपनाची तरतुद केली. पुढे मसूर सह काही गावांची पाटिलकी तिच्या मुलाच्या नावावर होती. देशमुख व पाटिल यांच्यात फरक म्हणजे पाटिलकीच्या वतनापेक्षा देशमुखांचे वतन मोठे होते. देशमुखांच्या कामाचा व अधिकाराचा आवाका ही मोठा होता. शिवकाळात जी महसुल व्यवस्था होती तीच अगदि थोरले छत्रपती शाहु महाराज पहिला बाजीराव पेशवा यांच्या काळा पर्यंत होती. पण दुसर्या बाजीराव पेशवे यांच्या काळात रघुनाथराव याने शिवाजी महाराजांनी सुरु केलेली महसूल पद्धत बंद करुन मुस्लिम महसूल पद्धत चालु केली असी नोंद साधनात आढळते. त्या नंतर देशमुखांच्या कामात हक्कावर थोडेफार बदल झाले. पण शिवकाळात व उत्तर काळात देशमुख म्हणजे रयतेच पालन करणारा म्हणूनच ओळखले जात. शिवाजी महाराजांनी तसी व्यवस्थाच लावली होती. ज्या वेळेस परगण्यात शत्रुचे आक्रमक होण्याची चिन्ह असत अस्या वेळेस देशमुखांना गावेच्या गावे खाली करुन त्याना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी असे. गावातील रयतेस तोशिश लागु नये याची काळजी पुरेपूर घेतली जात असे. देशमुखांना मिळणाऱ्या फायद्या बद्दल एल्फिन्स्टन लिहतो की- साधारण पणे मला असे सांगण्यात आले कि साऱ्याच्या ५% नव्हे तर उदा. जमिनीवरील शेकडा ५ एकर जमीन देशमुखांच्या मालकीची असे. आणि एकुण जमा झालेल्या रकमेतील विसावा हिस्सा विवाय वस्तु रुपाने मिळणारा लाभ इत्यादी फायदे देशमुखाचे असत. पण वि.का. राजवाडे यांनी प्रकाशित केलेल्या एका कागदात एल्फिन्स्टन चे मत खोडून काढले आहे. देशमुख हे २% महसूल घेत असत असे त्या कागदातून दिसुन येते. देशमुखांना मिळणारे हक्क व मानपान यांचा जरी ठोकळ मानेने विचार केला तरी ते खालील प्रमाणे असेल.
१) दरसदे रु. ३ द्यावयाचा शिरस्ता आहे, त्यापैकी देशपांडे १ रु. घेतील, बाकी दोन देशमुखांनी घेत जावे. २)सिरपाव सरकारातून अगोदर देशमुखांनी घ्यावा, मागाहून देशपांडे घेतील. ३) वतनी कागदावर वगैरे दस्तकत देशमुख आपले नावे करावे. देशमुखाचे बाजूस देशपांडिये दस्तकत करितील. ४) भेट देशमुख अगोदर हकीमापुढे ठेऊन (सरकारी अधिकाऱ्यापुढे) मागाहून देशपांडे याणी ठेवावी. ५) विडा सरकारचा वगैरे अगोदर देशमुख घेतील मागाहून देशपांडे याणी घ्यावा. ६) वरकड हरएक मानपान वतनसंबंधे अगोदर देशमुखांचा मागाहून देशपांडे यानी घेत जावे. ७) देशमुखीचे वतनाबाबत वाडा कसबे मजकुरी आहे तेथे इमारत बांधून नांदावे, ८) कसबे मजकूरी वगैरे हर एक गावी बाजार भरेल तेथे शेवसबजी देशमुखांनी घेत जावी. ९) इनाम जमीन जिराईत, बागाईत पूर्वीची आहे. ते देशमुखानी अनुभवीत जावी. १०) सणाची मोळी माहाराकडून दर गावास घ्यावी. ११) संक्रांतीचे तीळ व पित्राचे तूप दरगावास घेत जावे. १२) भेटी दर गावास दोन देशमुखानी व देशमुखा कडील गुमास्ता मजकूरचे कामकाजास ठेवाल त्याणी घेत जावी. १३) धनगराचे माग ज्या गावी असेल त्या गावी दरसाल चवाळे घेत जावे. १४) चांभाराकडील जोडा दर गावास दरसाल एक घेत जावा. १५) कसबे मजकूरी सायरान अवांतर, उरले सुरले हक्क, आहे तो घेत जावा. १६) शावल दावर पिदर याचे मुजावरा पासून (झाडुवले) दरसाल तबरुका बाबत रु. तीन घ्यावयाचा शिरस्ता आहे. त्यापैकी देशपांडे यांचा रु. १ बाकी दोन देशमुखानी घेत जावे. १७) भाकरी बाबत ऐवज गावगन्ना येईल तो निमे देशपांडे यास देऊन बाकी निमे तुम्ही घेत जावे. १८) कलावंत थेर भोरीप वगैरे यास त्याग (बक्षीस) अगोदर देशमुखानी मागाहून देशपांडे याणी द्यावा. १९) अवांतर हर एक कामकाजामुळे प्राप्त होईल ते तिसरा हिस्सा देशपांडे यास देऊन दोन देशमुखानी घेत जावे. २०) परगणे संबंध सरकारचे देणे वगैरे पडेल ते तिसरा हिस्सा देशपांडे व दोन हिस्से देशमुख देत जावे. येने प्रमाणे देशमुखाचे हक्क व लाजीमे होते.
संदर्भ:-
¤ शककर्ते शिवराय खंड १- शिवकथाकार विजय देशमुख,
¤ मराठ्यांचा इतिहास खंड पहिला,

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...