औरंगजेब : असंख्य विसंगतींनी भरलेले एक गहनगूढ व्यक्तिमत्त्व
मराठ्यांशिवाय औरंगझेबाचा आणि औरंगजेबाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. याच सगळ्यासाठी आपला शत्रू तरी किती बलाढ्य होता हे जाणून घ्यायलाच हवे.औरंगजेब… हे नाव कानांवर आलं कि फारसा कुणालाही आनंद होत नाही कारण, औरंगझेब म्हणजे आपल्याला आठवतो मराठ्यांचा शत्रू, दृष्ट, कपटी आणि शंभुराजांना जीवे मारणारा एक मुघल सम्राट. औरंगझेबाबद्दल फारशी कुणी माहिती करून घेत नाही पण आज आपण हेच बदलणार आहोत, आज आपण चक्क औरंगजेबाविषयी जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न असेल कि का बरं औरंगझेबाची माहिती घेणे इतके आवश्यक आहे ? मंडळी, आपले शिवराय किती मोठे होते, शिवरायांचा आणि मराठ्यांचा लढा किती मोठा व अवघड होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांचा शत्रू औरंगजेब किती बलाढ्य होता हे जाणून घेणे गरजेचे आहे.
शिवाजी महाराज, मराठे आणि औरंगझेब हे एकमेकांत गुंतलेले आहेत; मराठ्यांशिवाय औरंगझेबाचा आणि औरंगजेबाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. याच सगळ्यासाठी आपला शत्रू तरी किती बलाढ्य होता हे जाणून घ्यायलाच हवे. आज पाहूया औरंगजेबाकडे, मराठ्यांचा शत्रू म्हणून नाही पण, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून आणि पाहूया कसे होते त्याचे आयुष्य.
औरंगजेबाचा जन्म २४ ऑक्टोबर १६१८ रोजी, गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील दाहोद/दोहाद या गावी झाला. औरंगजेब पूर्ण ८९ वर्षांचे लांबलचक आयुष्य जगून शेवटी २० फेब्रुवारी १७०७ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील भिंगार गावी मरण पावला. मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज महल यांचा तिसरा मुलगा म्हणजे औरंगझेब होय. शाहजहान बादशाहला एकूण ६ अपत्ये आणि यापैकी, पहिला आहे ‘दारा शुको’, ‘शुजा’ आहे दुसरा, ‘औरंगजेब’ तिसरा आणि चौथा मुलगा मुरादबक्ष आणि याशिवाय शाहजहानला २ मुली होत्या, त्यांची नावे जहानआरा आणि गौहरआरा अशी आहेत.
औरंगजेबाचे व्यक्तिमत्त्व
औरंगजेब हे व्यक्तिमत्त्व म्हणजे अतिशय किचकट असे आहे. एकाच व्यक्तीमध्ये अनेक स्वभावाच्या छटा आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच औरंगजेबाचा अभ्यास करणे किंवा त्याबद्दल जाणून घेणे अतिशय रंजक आहे. औरंगझेब फार शांत होता, तो गरजेचे तेवढेच बोलत असे, फारशी बडबड करणे त्याच्या स्वभावात नव्हते. अगदी लहानपणापासून तो गंभीर आणि बऱ्याच विचारांत गुंतलेला असे. लहानपणापासूनच औरंगजेब प्रेमाला, मायेला पोरका झाला होता. त्याच्या आई-वडिलांचे प्रेम त्याला फारसे मिळाले नाही आणि यात अधिक भर म्हणजे तो सात वर्षांचा असतांना त्याच्या आजोबांनी (जहांगीर) त्याला नजरकैदेत ठेवले.परंतु कपटीपणा, हत्या, लबाडी वगैरे गोष्टी त्याला सोडणे जमलेच नाही आणि या आपल्या पापांसाठी अल्लाह आपल्याला काय शिक्षा करेल हा विचार सारखा त्याच्या मनात असे. मुस्लिम धर्मग्रंथ कुराण आणि मुस्लिमांचे काही नियम-कायदे सांगणारे हदीस हे औरंगझेबाला तोंडपाठ होते आणि त्याने स्वतः कुराणच्या २ प्रति लिहून मक्का आणि मदिना येथे नजर केल्या होत्या. औरंगझेबाचे पर्शियन, हिंदुस्थानी आणि अरबी भाषांवर प्रभुत्व होते. लहानपणापासूनच तो अनेक धर्मगुरुंशी धार्मिक चर्चा करीत असे. एकंदरीतच औरंगजेब अतिशय बुद्धिवान होता हे दिसून येते. औरंगजेब अतिशय कडक आणि शिस्तप्रिय व्यक्ती होता. आपल्या एका इशाऱ्यावर आपले काम झाले पाहिजे असा कडक वचक त्याचा दरबारावर होता.
औरंगजेबाच्या काही शौर्यकथा
औरंगझेब लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धीचा होता, सोबतच तो धूर्त, हुशार आणि धाडसी होता. इतिहासात त्याच्या शौर्याचे आणि धाडसाचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी हत्तीशी दिलेली झुंज त्याच्या बालवयातील धाडसाची जाणीव करून देते. औरंगजेब साधारण १४ वर्षांचा असतांनाची हि गोष्ट आहे. बादशाह शहाजहानसाठी हत्तीची झुंज भरविण्यात आली होती आणि हि झुंज पाहण्यासाठी सर्वांसोबत औरंगजेब आणि त्याचे तीनही भाऊ एकत्र मैदानात घोडे घेऊन जवळ उभे होते. हत्तीची झुंज जसजशी रंगू लागली तसे हे भाऊ ते पाहण्याच्या नादात जवळ जाऊ लागले आणि हत्तींच्या झुंजीत एका हत्तीने दुसऱ्या हत्तीला हुलकावुन लावले आणि त्या पिसाळलेल्या हत्तीच्या नजरेत आला तो म्हणजे औरंगजेब.हा हत्ती आक्रोशाने औरंगजेबाकडे धावत येऊ लागला. अशात घोड्यावरून औरंगझे सहज पळू शकत होता परंतु, त्याने आपल्या शक्तीने घोडा आहे त्याच जागी अडवून ठेवला आणि घोड्यावरून भाला हत्तीच्या दिशेने फेकून मारला आणि मग हत्ती अजूनच खवळला आणि त्याने सोंडेच्या एका प्रहारात घोड्याला जमीनदोस्त केला पण घोड्यावरून पडून देखील औरंगझेब उठला. हातात तलवार घेऊन तोच हत्तीकडे धावला आणि तलवारीने हत्तीच्या सोंडेवर सपासप वार केले. हि सगळी झटापट चालू असतांना औरंगझेबाचे भाऊ आणि इतर मंडळींनी येऊन हत्तीला आवर घातला. हा प्रसंग साधा वाटत असला तरी प्रत्यक्ष अनुभव घेणे तोसुद्धा वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे खरंच हिम्मतीचे काम आहे.
त्याच्या आजूबाजूने वेगाने सुटणाऱ्या बाण, तोफगोळे व भाल्यांची देखील त्याला परवा नव्हती इतका मग्न होऊन तो नमाज पडत होता. आपल्याला विजय मिळणारच आहे अशा आत्मविश्वासात औरंगझेबाला नमाज पडतांना पाहून त्याचा शत्रू अझीझ खान विचारात पडला आणि अशा माणसाशी शत्रुत्व आपल्याला महागात पडेल हे त्याला कळून चुकले आणि त्याने युद्ध थांबवून तह करण्याचा मार्ग निवडला.
सत्ता व राजकारण
औरंगजेबाने वयाच्या १६ व्या वर्षी सैन्यात प्रवेश केला. तिथे लक्षणीय कामगिरी करून मग त्याची नेमणूक १६५२ साली दक्खनच्या सुभेदार पदी झाली. औरंगाबाद व गुजरातच्या मधला पट्टा बागलाण म्हणून ओळखला जाई, हा बागलाण प्रदेश व तेथील ९ पैकी ७ किल्ले औरंगजेबाने ताब्यात घेतले. गुजरात प्रांतावर त्याची नेमणूक झाली असता तेथील महसूल औरंगजेबाने वाढविण्यात यश मिळविले. यानंतर, सिंध वगैरे प्रांतावर देखील त्याची नेमणूक झाली. पुढे काही वर्षे सुरळीत कारभार चालू असतांना शहाजहान अत्यंत आजारी पडला, यावेळी औरंगझेब दक्खनचा सुभेदार होता. आता दिल्लीची सत्ता हस्तगत करण्यासाठी औरंगजेबाने गोड बोलून, कपट करून आपल्या सगळ्या भावंडाना ठार केले आणि स्वतः ५ जुन १६५९ रोजी सत्तेवर आला.औरंगजेब – एक नजर
औरंगजेब समजणे तसे विचित्र व अवघड आहे. वसंत कानेटकर आपल्या पुस्तकात औरंगजेबाचा उल्लेख करतांना म्हणतात “मोघलांत औरंगजेबाइतका बुद्धिमान, हुशार पण मूर्ख, कर्तबगार पण लबाड व कपटी, धर्मवेडा, विश्वासघातकी, खोटारडा, काव्यप्रेमी पण कलाद्वेष्टा, मठ्ठ पण मुत्सद्दी, प्रेमळ पण दुष्ट, सफाईने पाप करणारा पण ईश्वराला भिणारा, पुत्र, पिता व भावंडांचा छळ करणारा, साध्या राहणीचा पण इतरांच्या पीडेत आनंद मानणारा, जिद्दी, हट्टी पण भित्रा, स्वार्थी आणि जिहादासाठी सिद्ध असणारा असा दुसरा बादशहा निर्माण झाला नाही”. या वाक्यावरून औरंगझेब किती वेगळे व्यक्तिमत्त्व होते हे लक्षात येते.औरंगझेब स्वभावाने विलासी, रंगेल वगैरे नव्हता, तसा तो सद्वर्तनी होता. स्त्रियांच्या बाबतीत त्याने स्वतःच्या बायका सोडून कोणाशीही गैरसंबंध ठेवले नाहीत. स्त्रियांवर कधी त्याने अत्याचार केले नाहीत. बहादूरगडाच्या किल्लेदाराने संभाजी महाराजांच्या एका नाटकशाळेवर बलात्कार केला हे औरंगझेबाच्या कानी आल्याबरोबर त्याचे हातपाय तोडण्याची सजा औरंगजेबानी सुनावली होती.
साकी मुस्तैद खान याने लिहिलेल्या ‘मासिरी अलामगिरी’ मध्ये तो औरंगजेबाबद्दल सांगतो कि, “विद्वान, नीतिमान अशा आदर्श मनुष्यात जे गुण आवश्यक आहेत ते सर्व दैवी संपदेने युक्त असलेल्या बादशहात एकवटलेले होते. समजू लागण्याच्या वयापासून, बादशहाने धर्मविहित गोष्टी कोणत्या आणि निषिद्ध कोणत्या, याची पूर्ण माहिती करून घेतली होती. त्याचा इंद्रियनिग्रह दांडगा होता, धर्माने परवानगी दिलेल्या सुखाचाच तो उपभोग घेई. आपल्या विवाहित स्त्रियांना सोडून त्याने इतर स्त्रियांशी कधीही व्यवहार केला नाही.
धर्माने निषिद्ध मानलेली वस्त्रे बादशहा कधीही वापरत नसे. त्याने सोन्या-चांदीची पात्रे (भांडी) कधीही वापरली नाहीत. त्याच्या बैठकीत चहाड्या, चुगल्या, हेवेदावे इत्यादींनी युक्त असलेले अभद्र शब्द कधीही उच्चारले जात नसत. बादशहाच्या दरबारात कुणाही दाद मागणाऱ्यांना मज्जाव नसे. दिवसातून दोन-तीन वेळा तो न्यायालयात उभा राहून न्यायदान करीत असे.”
No comments:
Post a Comment