विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 29 May 2022

तारीख – ए – आलमगीर

 

श्रीशिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर शंभूछत्रपतींच्या वाढत्या आक्रमतेचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः औरंगजेब अजमेरहून २२ मार्च १६८१ रोजी दक्षिणेकडे निघाला. ८ सप्टें. १६८२ रोजी तो खडकीत औरंगाबादेत आणि १३ नोव्हेंबर १६८३ रोजी तो नगरला (अहमदनगर) आला, आता मराठ्यांविरुद्ध त्याने खरी मोहीम सुरू केली. छत्रपती संभाजी महाराजांना पकडणे, त्यांना हालहाल करून तुळापूर येथे ठार मारणे, इतिकदखानाने राजधानी रायगड जिंकून छत्रपती शंभूपत्नी महाराणी येसूबाई आणि युवराज शिवाजी (पुढे नामांतर शाहू) यांना ताब्यात घेऊन कैदेत ठेवणे, छत्रपती राजाराम महाराजांना सोबत जिंजीपर्यंत केलेला लढा, पुढे छत्रपती राजाराम महाराज यांचा सिंहगडावर अकाली मृत्यू हे सारं होऊनही औरंगजेबाला मराठ्यांचा पूर्ण पराभव करता आला नाही. विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या दोन दख्खनी पातशाह्या बुडवून हिंदुस्थानचा अधिपती होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

रणरागिणी ताराऊंच्या रूपानं उभं राहिलेलं कडवं आव्हान काही आलमगिराला मोडून माढता आलं नाही. हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण पंतसचीव, धनाजी जाधव, संताजी घोरपडे अशा अद्वितीय सेनाधुरंधरांपुढे कसलेल्या मोगली सेनापतींना हात टेकायला लागले. १६८१ ते १७०७ म्हणजे तब्बल पाव शतकापेक्षा जास्त काळ दिल्लीपती औरंगजेबाला मराठ्यांनी खेळवत ठेवलं. हताश झालेला आलमगीर अखेर २० जानेवारी १७०६ रोजी नगरला मुक्कामास आला. तेव्हा त्याचं वय ९० वर्षे होते. १ वर्ष, १ महिना इथं त्याचा मुक्काम होता. २० फेब्रुवारी १७०७ म्हणजे २८ जिल्हाद हिजरी सन १११८ रोजी या महत्त्वाकांक्षी बादशहाचा ९१ व्या वर्षी अहमदनगर येथे अंत झाला.

त्याच्या इच्छेनुसार त्याचे शव खुल्ताबाद येथे शेख झैनुद्दीनच्या कबरीशेजारी खुल्या अस्मानाखाली दफनवण्यात आले. त्याआधी त्याची आतडी आदी अवयव काढून ते त्याच्या मृत्युस्थानीच अहमदनगर येथे पुरले. नगरमध्ये आलमगीर वस्तीत असणाऱ्या तटबंदीयुक्त प्राकारात मध्यभागी मोठ्या चौथऱ्यावर असणारी कबर ही औरंगजेबाच्या पुरलेल्या अवयवावरील कबर आहे. त्याच ठिकाणी त्याला शेवटची आंघोळही घालण्यात आली होती.या प्राकारात पश्चिमेस एक मशीद,मशिदीसमोर पाण्याचा हौद आणि पूर्वेस हुजरा म्हणजे रहाण्याची जागा आणि वायव्य भागात एक विहीर आहे. सध्या या प्राकारात मदरसा आहे. औरंगजेबाच्या या कबरीच्या व्यवस्थेसाठी सरकारातून १५४० रुपयांची वार्षिक नेमणूक आहे. या स्थानाची व्यवस्था दर्गा आलमगीर बादशहा-नागरदेवळे, तालुका अहमदनगर' या क्रमांक ७ ने रजिस्टर झालेल्या पब्लिक ट्रस्टकडे आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे औरंगजेबाचं साध चित्रही इथे लावण्यात आलेलं नाही. औरंगजेबाच्या हस्ताक्षरातील कुराणाची प्रत आणि आणखीही काही ग्रंथ येथे आहेत.

दर्गा आलमगीराचा

भिंगारच्या पूर्वेस, नगरपासून ४-५ कि.मी. अंतरावर औरंगजेबाचे मृत्युस्थान आहे. श्रीशिवछत्रपतींच्या अकाली मृत्यूनंतर गादीवर आलेल्या शंभूछत्रपतींच्या काळात आलमगीर बादशहा दक्षिणेत उतरला. संभाजीराजांना संगमेश्वरात पकडून बहादूरगडावर त्यांचे डोळे काढले. तुळापूरला ठार मारले (पुढे त्यांच्यावर वढू येथे अग्निसंस्कार झाले) पण मराठी दौलत संपली नाही. इथल्या गवताच्या पात्यांना भाले फुटले. राणी येसूबाई अन् बाल शिवाजी (पुढे औरंगजेबाने नाव ठेवले शाहू) यांना रायगड जिंकून त्याचा इस्लामगड करून कैदेत टाकले. पण शिवपुत्र छत्रपती राजारामाचे रूपाने मराठी अस्मिता शिल्लक राहिली. छत्रपती राजाराम महाराजांचे पश्चात शंकराजी नारायण सचिव, रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधव, संताजी घोरपडे आदीनी महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीपती औरंगजेबाची कुतरओढ केली. दक्षिण जिंकायला आलेल्या औरंगजेबाला फक्त गोवळकोंडगाची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही या दक्षिणी मुस्लीम राज्यांचीच इतिश्री करता आली. हिंदवी स्वराज्य नाहीसे करता आले नाही.

थकला, भागलेला, हताश झालेला हा मोगल बादशहा शेवटी वयाच्या ९१ व्या वर्षी २० फेब्रुवारी १७०७ रोजी नगरच्या परिसरात मरण पावला. औरंगाबादजवळ जरी खुल्लाबादेस त्याच्या विश्रांतीचे अंतिमस्थळ असले, तरी त्याचा मृत्यू मात्र नगरला झाला, त्याच्या शवाला स्नान घालून, त्याच्या पोटातील आतडी काढून घेऊन नगरजवळच्या मृत्युस्थानी पुरून तेथेही त्याची कबर उभारली आहे.

तब्बल २४ वर्षे मराठ्यांशी लढाया करूनही या आलमगीराला (जगज्जेता ही पदवी घेणाऱ्या) मराठ्यांची स्वातंत्र्य आकांक्षा काही समूळ नष्ट करता आली नाही. श्रीशिवछत्रपतींनी लावलेल्या हिंदवी स्वराज्यातून मराठ्यांचे हिंदुस्थानभर साम्राज्य निर्माण झाले. दिल्लीच्या मोगल बादशाहीचे धिंडवडे निघाले हतबल, मोगल राजे प्रभावहीन बनले. मराठ्याची उत्कर्षाची सुरवात नगरमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झाली. म्हणून हे स्थळ महत्त्वाचे आहे.

संदर्भ: इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर लिखित ‘सहली एका दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या…’

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...