विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?

 


कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?
फार पूर्वीपासून सामान्य लोक आपले नांव लिहिताना स्वतःचे नांव, वडिलांचे नांव व आडनाव या क्रमात लिहितात. पूर्वी बादशहांच्या पदरी असणारे मराठा सरदार फारतर नावापुढे आपला किताब अथवा बिरुद जोडायचे. शिवाजी महाराजांचे घराणेही यास अपवाद नव्हते. महाराजांचे वडील शहाजीराजे आपल्या नावाबरोबर फर्जंद व सरलष्कर ही बिरुदे लिहायचे(?) मात्र नांव लिहिताना स्वतःचे नाव व आडनाव असाच क्रम असायचा. शिवपूर्वकालापासून सर्वच मराठा सरदार याच पद्धतीने आपली नावे पत्रव्यवहारांमध्ये लिहीत असत. उदा., पिराजीराव घाटगे सर्जेराव, दौलतराव जाधव सरनौबत इत्यादी. अशापद्धतीने सामान्य रयतेप्रमाणे व सरदार-जहागिरदारांप्रमाणे नावामध्ये आडनावाचा उल्लेख शिवराय देखील करायचे. राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत त्या पत्रांमध्ये "राजेश्री सिवाजीराजे भोसले" असा अथवा अशा सर्वसामान्य पद्धतीनेच शिवरायांचा नामोल्लेख आढळतो. मात्र १६७४ साली महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतल्यानंतर महाराज व महाराजांचे घराणे सामान्य राहिले नव्हते, शिवाजीराजे भोसले हे आता कुणी सरदारपुत्र नव्हते तर ते एक सार्वभौम अभिषिक्त राजे होते. शिवराय "छत्रपती" झाले होते. यामुळे साहजिकच आपल्या सर्वसामान्य नामाभिधानाचा त्याग करणे व नवीन नांव धारण करणे शिवरायांना क्रमप्राप्त होते, आणि म्हणूनच "राजेश्री शिवाजीराजे भोसले" या आपल्या नावाचा त्याग करुन सार्वभौम अभिषिक्त नृपतीस शोभेल असे,
"क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असे नवीन नांव महाराजांनी धारण केले. राज्याभिषेकानंतरच्या एकाही पत्रव्यवहारामध्ये महाराजांनी आपल्या नावापुढे "भोसले" हे आडनांव एकदाही जोडलेले नाही. महाराजांनी इतरांना लिहिलेल्या व इतरांनी महाराजांना लिहिलेल्या अशा सर्व पत्रांमध्ये "क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असाच उल्लेख आढळतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनंतर छत्रपतींच्या गादीवर विराजमान झालेल्या कोणत्याही छत्रपतींनी व छत्रपती घराण्यातील कोणत्याही सदस्याने आपल्या नावापुढे "भोसले" असे आडनाव लिहिलेले नाही व तसे ऐतिहासिक उल्लेखही आढळून आलेले नाहीत. छत्रपती, महाराणी व युवराजांसाठी वेगवेगळ्या बिरुदावल्या होत्या. उदाहरणासाठी अनुक्रमे :
क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति,
अखंडलक्ष्मी अलंकृत महाराणी लक्ष्मीबाई छत्रपति,
युवराज राजेश्री राजाराम छत्रपति किंवा चिरंजीव विजयीभव राजे राजाराम छत्रपति. यामध्ये कुठेही भोसले आडनावाचा उल्लेख आढळत नाही. सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीने आडनावासहीत आपले नाव लिहितात त्या पद्धतीने नाव लिहायला छत्रपती म्हणजे कोणी सर्वसामान्य नव्हेत. छत्रपती म्हणजे क्षत्रिय कुलातील सर्वोच्च आहेत, ते अभिषिक्त राज्यकर्ते आहेत, म्हणूनच त्यांचे नामाभिधानही सर्वसामान्यांपेक्षा पूर्णतः अलग आहे; ज्यामध्ये आडनावाचा उल्लेख नसतो. भोसले हा सर्वसामान्य वंश आहे तर "छत्रपती" हा एकमात्र सर्वश्रेष्ठ वंश आहे.
याचे ऐतिहासिक संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची स्वतः महाराजांची पत्रे, स्वराज्याची नाणी, छत्रपती व सरदारांच्या राजमुद्रा, सरदार मंडळींच्या पत्रातील छत्रपतींचे उल्लेख असे अनेक पुरावे आहेत.
उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व कोल्हापूरचे छत्रपती दुसरे संभाजीराजे यांनी पाडलेल्या शिवराई, होण, शंभुराई या नाण्यांवर त्यांचा उल्लेख
- श्री राजा शिवछत्रपति
- श्री राजा शंभुछत्रपति असा आहे. तसेच महाराजांच्या पदरचे सरदार - जहागीरदार यांच्या मुद्रेतही महाराजांचा उल्लेख असाच असलेला दिसतो.
- कोल्हापूरच्या सर्व छत्रपतींच्या राजमुद्रेतही छत्रपतींचे नाव असेच आढळते. उदाहरणार्थ शाहू महाराजांची राजमुद्रा. ( श्री महादेव श्री तुळजाभवानी चांद्रीलेखेव वर्धिष्णुर्जनानंदप्रदायिनी शाहू छत्रपतेर्मुद्रा शिवसूनोर्विराजते.)
सदर लेखनास पूरक म्हणून एक प्रसंग सांगणे आम्ही उचित समजतो,
राजर्षि शाहू छत्रपती महाराजांचे चिरंजीव युवराज राजाराम महाराजांचा विवाह बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या नातीशी होणार होता. या विवाहाच्या पत्रिका काढताना गायकवाडांनी राजाराम महाराजांचा नामोल्लेख "राजाराम छत्रपती" असा न करता "राजाराम भोसले" असा केला. पुढे विवाह समारंभासाठी शाहू छत्रपती महाराज व कोल्हापूरचे सहाशे लोक बडोद्यास गेले असताना त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या विशेष निमंत्रणपत्रिकेत व हुंड्याच्या कागदपत्रांतही "राजाराम भोसले" असाच उल्लेख करण्यात आला होता. गायकवाडांनी आरंभलेला छत्रपती घराण्याचा उपमर्द कोल्हापूरच्या रयतेस रुचला नाही. कोल्हापूरकरांच्या वऱ्हाडामध्ये या प्रकरणामुळे तीव्र नाराजी उमटली. शाहू महाराजांकडे सरदारांनी गायकवाडांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. अर्थात महाराजही या प्रकाराने संतप्त झाले होते मात्र ऐन विवाहप्रसंगात ठिणगी पडू नये व काही विपरीत घडून छत्रपतींच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचू नये म्हणून छत्रपतींनी या प्रकरणाचा भडका उडण्याआधीच ते दडपले. (संदर्भ- महाराष्ट्र शासन प्रकाशित राजर्षि शाहू गौरव ग्रंथ, कृ.गो. सूर्यवंशीकृत राजर्षि शाहू छत्रपती राजा व माणूस.)
कोल्हापूरच्या छत्रपतींना उद्देशून काही लोक म्हणतात की यांना (म्हणजे छत्रपतींना !) शिवरायांचे "भोसले" आडनाव लावायला लाज वाटते ! तर प्रश्न लाज वाटण्याचा अथवा अभिमान वाटण्याचा नाही ; प्रश्न आहे गौरवशाली परंपरेचा, जी दस्तुरखुद्द थोरल्या महाराजांनी सुरु केली होती आणि कोल्हापूरचे विद्यमान छत्रपति महाराज ती तितक्याच श्रद्धेने पाळतात...
आता लोकांचा प्रश्न उरतो की असे आहे तर मग सातारचे छत्रपती का आडनाव लावतात ? तर याचे उत्तर, सातारचे छत्रपती हेदेखील भोसले आडनाव लावत नव्हते. जोपर्यंत सातारची गादी स्वतंत्र होती तोपर्यंत सातारचे छत्रपती देखील आपला उल्लेख याच पद्धतीने करायचे. (उदा. क्षत्रियकुलावतंस श्रीराजा प्रतापसिंव्ह छत्रपति.) मात्र सन १८४८ साली इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करुन सातारची गादी खालसा केली तेव्हापासून सातारच्या छत्रपतींचा उल्लेख कागदोपत्री भोसले असा होऊ लागला व पुढे तेच रूढ झाले. १८४८ पूर्वी सातारच्या गादीवरही कोणत्याही छत्रपतींनी भोसले आडनाव लावल्याची अस्सल कागदपत्रे मिळत नाहीत.
Credits- Karvir Riyasat

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...