विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

छत्रपती शिवाजी महाराज -१९

 


छत्रपती शिवाजी महाराज -१९
-----------------------------
आरमार - शिवाजी महाराजांची दूरदृष्टी.
शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगांच्या आधाराने मजबूत होते. परंतु समुद्रावरून येऊन पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच आणि सिद्दी डोईजड झालेले होते. यांना शह द्यायचा तर आपले स्वतःचे मजबूत आरमार उभे करणे आवश्यक होते. तसेच प्रजेला निव्वळ पावसावर अवलंबून शेतीवर निर्भर न राहता व्यापार वाढला पाहिजे म्हणून समुद्रावर आपला अधिकार असणे आवश्यक आहे.
त्या काळात पोर्तुगीज चक्क समुद्रावरून जाणाऱ्या - येणाऱ्या जहाजांना परवाने घ्यायला लावत असत. अन्यथा त्यांची जहाज आणि माल जप्त करीत असत. तसेच समुद्रीचाचे समुद्रावरून येऊन किनारपट्टीच्या भागात लूट करून जात असत. 636 आणि 660 मध्ये अरबस्तानातून आलेल्या चाच्यांनी ठाण्याची लूट केली होती. सन पंधराशे तीस व 1540 मध्ये पोर्तुगीजांनी कल्याण आणि आगाशी येथे लूट करून जाळपोळ केली होती. आता तर जंजिऱ्याच्या सिद्दीची मनमानी थांबविण्यासाठी आरमार असणे आवश्यक होते.
म्हणून शिवरायांनी 1658 साली कल्याण भिवंडी जिंकून घेतल्यानंतर आपले आरमारी तळ उभे करून आणि आहेत त्यांची डागडुजी करून स्वतःच्या जहाजांची निर्मिती सुरू करून लढाऊ व व्यापारी जहाजे बांधली आणि सागरी किल्ले ही बांधले. या किल्ल्यांना बाहेर आणि आत असे दोन भाग असून आतील बालेकिल्ला आणि त्याच्या सभोवताली सैन्याच्या निवास व्यवस्थेची व कार्यालयीन इमारती, शस्त्रागार, पाण्याच्या टाक्या व विहिरी असत.
विजयदुर्ग- वाघोटन नदीच्या खाडीतून वर आलेला एक उत्तम सागरी किल्ला असून तो एक राजवाडा ही होता. त्याला तीन स्तरीय चिलखती तटबंदी असून तीन बाजूला पाणी आणि जमिनीपासून संपूर्ण टेकडीचे भोवताली खंदक आहे. शिवाजी राजांनी 27 बुरुज बांधून शिलकती तटबंदी बांधली व आत मोठ्या इमारती ही बांधल्या.
रत्नागिरी - बंदराच्या उत्तरेला किल्ल्यांची मालिका असून शिवाजी महाराजांनी एक नवीन भक्कम भिंत बांधली आणि महत्त्वाच्या ठिकाणी दोन संरक्षक बुरुज बांधले.
मालवणचा किल्ला - सिंधुदुर्ग - सुरतेच्या पहिल्या लुटीचा उपयोग प्रामुख्याने सिंधुदुर्ग उभारणीसाठी महाराजांनी केला. 25 नोव्हेंबर 1674 सली बांधकामास सुरुवात केलेल्या गडाच्या भिंती बारा फूट जाड असून तीस फूट उंचीचे आहेत व 32 बुरुज बांधले आहेत. या किल्ल्यावरच्या मंदिरात महाराजांची दगडी मूर्ती असून परमेश्वरी अवतार समजून तिची पूजा केली जाते. तिथे जाण्यासाठी मार्ग अतिशय बिकट असून चिंचोळा आणि खडकाळ आहे.
याहून लहान गढी वजा बेटाला पांडवगड म्हणतात. तिथे शिवाजी महाराजांचा जहाज बांधणी कारखाना होता असे सांगितले जाते.
जयगड ही विजयदुर्ग सारखाच आहे. जयगडला दुहेरी तटबंदी असून शिवाजी महाराजांनी त्यात विहिरी आणि निवासी इमारती ही बांधले आहेत.
तर देवगडातून एक सुरक्षित मार्ग खोल पाण्याच्या बंदरात उघडतो.
काठीयावाड आणि कोकण किनारपट्टीवर तज्ञ खलाशी आणि उत्तम जहाजे बांधणारे कारागिरही आहेत. खलाशी प्रामुख्याने खारवा, कोळी आणि भडेला जमातीचे असत. वाघेर आणि मीयांना या जमाती प्राधान्याने चाचेगिरी करीत असत. खारवाजमातीमध्ये रजपूत कोळी व मुस्लिम लोक असत. बसेन आणि आगाशी जहाज बांधणी पोर्तुगालच्या कलेच्या तोडीस तोड होती आणि ही जहाज युरोप पर्यंतचा प्रवास करीत असत.
मराठा आरमाराच्या युद्धनौका किनारी प्रदेशातील समुद्रात लढाई करण्यासाठी प्रामुख्याने बांधलेल्या होत्या. व्यापारी जहाजांना संरक्षण पुरवणे शत्रूच्या व्यापारी जहाजावर किंवा लढाऊ जहाजावर आक्रमण करणे आणि जहाजाच्या डोलकाठ्या मोडून जहाजात फिरून युद्ध करून ते जहाज पकडणे इतपतच काम ही जहाजे करीत असत.
ही जहाजे प्रामुख्याने दोन प्रकारात होती. गुराबावर तोफा असत आणि वल्ह्ल्याने चालवल्या जाणाऱ्या नावा शत्रूच्या जहाजांच्या दोन काठ्या तोडून जहाजावर चढून मालाची लूट करत.
शिवाजी राजांकडे तोफ गोळे तयार करण्याचा कारखाना तसेच उत्तम प्रतीचा दारूगोळा तयार करणारे कारखानेही नव्हते. हा संपूर्ण शस्त्रसाठा ते युरोपियन व्यापाऱ्यांकडून खरेदी करत असत.
शिवाजी महाराजांच्या व्यापारी आणि वाहतुकीच्या जहाजांमध्ये मचवा, शिबाड- तारंब- तारंड आणि पगार हे प्रकार होते.
मचवा- हे मोठे मालवाहू जहाज असून एक ते तीन टन क्षमतेचे आहे.
शिबाड - हे दोन शिडांचे परंतु डेक नसलेले, तोफा असलेले वेगवान फटिमार व्यापारी जहाज होय.
पगार - सुसज्ज आरामशीरपणे जाणारे चांगल्या प्रकारे तयार केलेला मचवा मुख्यत्वे रसद पुरवठ्यासाठी वापरला जाई.
जंजिऱ्याचा सिद्दी - हा मराठा स्वराज्याचा पश्चिम किनारपट्टीवरील बलाढ्य शत्रू होय. पंधराव्या शतकात या ऍबिसिनियन लोकांची वसाहत झाली. जंजिऱ्याच्या पूर्वेला अर्ध्या मैलावर राजपुरी हे गाव आणि खाडीच्या किनाऱ्यावर दंडा किल्ला होता. या भागाला दंडा राजपुरी असे म्हणत. सिद्दीने अहमदनगरच्या आदिलशहाच्या सत्तेखाली सुरुवातीला काम केले आणि नंतर स्वतःला स्वतंत्र घोषित केले. सोळाशे 36 च्या तहानुसार विजापूरला पश्चिम किनारपट्टी मिळाली. बरीच वर्षे संघर्ष केल्यानंतर सिद्दी शरण आला. मग तडजोड म्हणून आदिलशहाने त्याला प्रमुख प्रतिनिधी आणि आपला वजीर म्हणून नियुक्त केले व नागोठणे ते बाणकोट पर्यंत प्रदेश दिला.
सिद्दी उत्तम लढवय्ये आणि प्रशासक होते. त्यांच्याकडे आरमारी जहाजांचा मोठा तांडा असून आधी विजापूर आणि नंतर मुघल आरमार प्रमुख म्हणून मान्यता मिळाली होती. पश्चिम किनारपट्टीवर त्याला आव्हान देणारी कुठलीही सत्ता नव्हती.
दिलीप गायकवाड.
१८-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...