विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

मराठा स्वराज्यातील निष्ठावंत सेनानी संताजी घोरपडे धनाजी जाधव..

 मराठा स्वराज्यातील निष्ठावंत सेनानी संताजी घोरपडे धनाजी जाधव..

 लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'



मानसिक धैर्य काय असते हे शिवरायांकडून शिकावे व स्वामीनिष्ठा काय असते हे महाराजांच्या मावळ्यांकडून शिकावे..असे मराठा स्वराज्यातील निष्ठावंत सेनानी संताजी घोरपडे धनाजी जाधव...🚩
● मराठ्यांचे गनिमी युध्द तंत्र :
मोगल-मराठा संघर्षात मराठ्यांनी गनिमी तंत्राने मोगलांशी लढा दिला. “या काळात महाराष्ट्रात दारात घोडे नाही असे घर नाही व घोड्यावर बसता येत नाही असा घरात मनुष्य नाही” अशी स्थिती होती. मराठा फौजेत पायदळापेक्षा घोडदळाचाच अधिक भरणा होता. या काळात मराठ्यांना मनुष्यबळाची कधीच कमतरता भासली नाही. तर मोगलांची स्थिती या उलट होती. मोगलांच्या हालचाली मंदगतीच्या उलट मराठे हे शेकडो मैल मजला मारूनही दमत नसत. लढतलढत माघार घेण्याच्या गनिमी पध्दतीमुळे मराठा फौजेची विशेष हानी होत नसे. मोगलांना अशा मराठी सैन्याशी लढताना जीवावर उदार होऊन लढावे लागे, नसता गफलत झाली की मोगलांची ती तुकडी गारद होत असे मोगलांशी लढताना मराठ्यांनी छत्रपती शिवरायांचीच युध्दनीति अंमलात आणली..
मराठ्यांनी बादशाही सैन्याला क्षणाचीही विश्रांती मिळू दिली नाही. मराठ्यांनी न चुकता ही पध्दत चालू ठेवली. दक्षिणेत मराठ्यांचे दोन शूर सरदार सेनापती धनाजी जाधव व सेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या गनिमी लढायांनी मोगलांचे भारी नुकसान केले. मोगलांना आपला शत्रु नेमका कोठे आहे हे न समजल्याने त्यांच्यात मोठा गोंधळ उडाला..
● याबाबत जदुनाथ सरकार म्हणतात :
“मराठ्यांमधील सामान्य प्रमुख व केंद्रीय प्रमुख/केंद्रीय सत्ता यांच्यामध्ये भेद न राहिल्यामुळे औरंगजेबाला फार कठीण समस्यांना सामोरे जावे लागले व त्या समस्या कित्येक पटीत वाढल्या. कारण प्रत्येक छोटा मराठा सरदार हा त्याच्या स्वतःच्याच मनाने मोगलांना दिसेल त्या ठिकाणी लुबाडीत होता. यावेळेस मराठे हे एक लहानसा गट म्हणून नव्हते तर दक्षिणेतील एक प्रभावी शक्ती म्हणून वावरत होते. ते सगळी कडे पसरलेले असल्यामुळे दक्षिण विभाग हा वाऱ्यासारखा अतिशय निसरडा झाला होता. दिल्ली तख्ताच्या शत्रुनी सगळीकडे धुमाकूळ घातला होता. त्यांनी लोकांची शांती भंग केली व रोजच्या प्रशासनाला अडथळे आणले होते. ते दक्षिणेत, माळव्यात, गोंडवनात आणि बुंदेलखंडात वावरत होते. बादशाही फौजा ह्या सगळीकडे संपूर्ण शक्तीनिशी उपस्थित राहू शकत नव्हत्या म्हणून प्रत्येक विभागात त्यांची पिछेहाट झाली..
गनिमीकावा हे मराठा लष्कराचे वैशिष्ट्य मानावे लागेल..! अचानक छापा घालावा, शत्रुची माणसे कापावी, शत्रु सावध होण्यापूर्वीच पळून जावे, शत्रुची ठाणी व रसदी माराव्यात, मुलुख जाळून टाकावा, ही या गनिमीकाव्याची वैशिष्ट्ये आहेत. मलिक अंबरला गनिमीकाव्याचा जनक मानले जाते. त्या पध्दतीचा योग्य वापर छत्रपती शिवरायांनी करून स्वराज्य उभारले. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात तर स्वराज्य टिकवून मराठ्यांत नवचैतन्य निर्मिती करिता संताजी घोरपडे व धनाजी जाधवांसारख्यांनी गनिमी युध्द तंत्राचा पुरेपुर उपयोग करून घेतला. छत्रपती राजारामकालीन गनिमी काव्याचे श्रेष्ठ योध्दे म्हणून संताजी व धनाजी जाधवांना श्रेय द्यावे लागेल. संताजी धनाजी जवळ नेहमी २०/२० हजारापेक्षा कमी सैन्य कधीच नसल्याचे मत खाफीखानाने मांडले आहे..
शेख निजाम, सर्जाखाना वरील हल्ले व खटाव परिसरातील संताजी धनाजींच्या लढाया म्हणजे त्यांच्या गनिमी युध्द पध्दतीची उत्तम उदाहरणे होत. जुल्फिकारखानासारख्या मातब्बर मोगल सेनानीस आपल्या पाठीमागे पळवत ठेवून त्यास मेटाकुटीस आणले ते धनाजी जाधवांनीच...!
● सेनापती संताजी धनाजींच्या गनिमीकाव्याने मोगलांना कशी दहशत बसविली त्याचे वर्णन अतिशय समर्पक शब्दात करताना मल्हार रामराव चिटणीस म्हणतो :
“...मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पानी न पीत त्यांस मोगली लोकांनी म्हणावे जे, पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय..? रात्री दिवसा कोणीकडून येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आठही प्रहर भय बाळगीत. पातशाहासी बहूत आश्चर्य जाहले की, मराठा फौज ही बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलून नेतो तसा घाला घालावा, शिपाईगिरीची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे, खाण्यापिण्याचा दरकार (गरज) बाळगीत नाहीत, पाऊस, ऊन, थंडी व अंधारी काही न पहाता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटणी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे..? एक्या मुलकांत फौज आली म्हणौन त्यांजवर (फौजेची) रवानगी करावी, तो दुसरेकडे जाऊन ठाणी घेतात, मुलुख मारितात. हे आदमी नव्हत, भुतखाना आहे..”
अफाट मोगली सामर्थ्याशी लढताना संताजी धनाजींनी गनिमी तंत्राचा अवलंब करून त्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. म्हणूनच ते गनिमकाव्याचे श्रेष्ठ योध्दे ठरतात. छत्रपती शिवरायांनी मराठ्यांना घालून दिलेले आदर्श मराठ्यांनी जोपर्यंत पाळले, त्यांचे तंतोतंत पालन केले, तोपर्यंत मराठे यशोशिखरावर विराजमान होते. संताजी धनाजी योद्धे तर खुद्द शिवरायांच्या तालमीत वाढले होते. शिवतत्त्वांचा त्यांना विसर पडणे शक्यच नव्हते. म्हणूनच त्यांच्या पराक्रमाची दखल त्यांच्या शत्रुपक्षातील इतिहासकारांनाही घ्यावीच लागली..
――――――――――――
🎨 Shivverse Meta 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...