विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 21 February 2019

कोंडाजी फर्जंद

#कोंडाजी फर्जंद

मोहीम सांगितली की ती फत्ते व्हायची! मग यशाचा तुरा मिरवायला खोवायचा कोणाच्या डोक्यात? तर ज्याने फत्ते केली त्याच्याच ना! सोन्याचे कडे हाती घालायचे! कोणाच्या -तर, जो जिंकून आलाय् त्याच्या! पण, महाराजांना तशी संधी कोणीच दिली नाही! मोहीम फत्ते करणारे मोहिमेवरून परतलेच नाहीत!! गेले ते गेलेच गेले!! बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड पावन केली. परत आलेच नाहीत. महाराजांनी स्वत:च्या हाताने बाजींच्या चितेस अग्नी दिला. बाजी नव्हते हातात सोन्याचे कडे घालून घ्यायला. दुसरा देशपांडा तसाच धारातीर्थी पतन पावला. त्याचे शिर धडा वेगळे झाले पण, शरीर लढतच राहिले. हा आवेग होता! दिलेरखानाने त्याला लाच देऊन पाहिली होती; तेव्हा मुरारबाजी संतापाने लाल झाला! हा खान महाराजांची माणसे फितवायचा प्रयत्न करतो म्हणजे काय!! मुरारबाजी देशपांड्यांच्या हाती महाराजांना कडे चढवायचे होते. पण, ‘‘धनी जोहार अमुचा घ्यावा’’ म्हणून पुरंदरावरले तीनशे रामोशांचे सैन्य या देशपांड्यास घेऊन गडावर गेले. तिथेच अग्नी दिला. कडे राहिले; हातात घालायचे! कुटुंबकबिल्यास सोन्याचे कडे देऊन गौरव थोडाच होणार होता; ते तर सांत्वन होते! या झाल्या देशपांड्यांच्या हकिकती! पण, मालुसर्‍यांचा तान्ह्या सगळ्या सिंहांचा सिंह; ‘‘लेकराच्या लग्नाचे ते काय! हा काय; गेलोच आणि फत्ते करून आलोच!’’ कॉन्फिडन्सने तान्हाजीराव कोंढाण्यावरती गेले. किल्ला सर झाला पण ते गेले. धारातीर्थी शयन पावले!! सिंहांचा राजा गेला! अन् अशा एक-ना-अनेक; किती तरी गोष्टी आहेत. बेधडकपणे जटिल मोहीम यशस्वीपणे पार पाडून सुखरूप जिवंत परत येऊन दाखवायला ते शिवाजी महाराज थोडीच होते!! --हे आपण आज म्हणतो. पण, तेव्हा महाराजांना वाटले की, मोहिमेवर धाडण्यापूर्वीच हाती सोन्याचे कडे घालावे!
अरे, देवा! हा काय अघोरीपणा! तर, मोहीम सांगायची म्हणजे डेथ वॉरंटच जारी करण्यासारखे झाले!! सांगा मोहीम की मेलाच सहकारी!! कोंडाजी फर्जंदाच्या हाती महाराजांनी मोहिमेच्या आधीच कडे घातले! कोंडाजीसही कळले. आता आपण मेल्यात जमा म्हणून महाराज आपल्या हाती सोन्याचे कडे घालताहेत. हसला तो. कसासाच हसला. कसनुसा हसला!!
पन्हाळा घ्यायचा? घेतला जाईल, याची गॅरंटी काहीच नाही. पन्हाळा घ्यायच्या वेळी खुद्द महाराजांना तो जमला नाही. ‘‘समयास पावला नाही’’ म्हणून सरसेनापती नेताजी पालकरास महाराजांनी तडकाफडकी डिसमिसच करून टाकले त्यावेळी! नेताजी म्हणजे प्रतिशिवाजीच! त्याची हकालपट्टी. सर्वोच्च पदावरून! तीन हजार नेले होते. पैकी एक हजार मावळे या पन्हाळ्याशी झुंजताना मारले गेले. पळून जावे लागले महाराजांना सुसाट! पन्हाळगड ते विशाळगड हे पलायन दुसर्‍यांदा झाले होते. पहिल्याने सिद्दी जौहाराच्या वेढ्यातून महाराज सहाशे मावळ्याांनिशी निसटले होते. तेव्हा पन्हाळ्याच्या वीरांना सुखाचा श्‍वास घेता यावा म्हणून महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीस देऊन टाकला होता आणि आपल्या करारी कडव्या मावळ्यांची सुटका करवून घेतली होती. पन्हाळा असा सुखासुखी सुखावणारा किल्ला नाही; किंबहुना रडवणाराच आहे.
‘तेव्हा’पासून हा पन्हाळा पारतंत्र्यात होता. तो नसण्याचा सल चित्तांत होताच. कोणास भिडेस पाडावे पन्हाळ्याच्या! महाराजांना प्रश्‍नच होता. ते कोणताही ‘मोहरा’ गमवावयास तयार नव्हते. पण, पन्हाळा तर हवाच होता. पन्हाळ्याशिवाय चोखटपणे दक्षिणेचे रक्षण करता येणे मुष्कील होते. पन्हाळा म्हणजे तसल्ली होती! दिलासा होता इतर किल्ल्यांना!
कोंडाजी फर्जंद मुजर्‍याला आला. त्याच्या ध्यानात आले की, महाराज टेन्शनमध्ये आहेत. विचारात आहेत. कोंड्याला सांगायला काहीच हरकत नव्हती. तो थोडाच होता जाणार. किती कठीण मोहीम होती पन्हाळ्याची! तर हे राव म्हणाले, ‘‘हात्तेच्या, महाराज! येवढेच ना! मी जातो न् गड सर करून आणतो की, आपल्या स्वराज्याच्या कदमांत!!’’
‘‘कोंढ्या, तू!! अन् पन्हाळा घेतो म्हणतोस!!’’
‘‘जी, महाराज! आपल्या चित्तीच्या मुळाशी असलेलं दुखणं काढणं ह्येच तर आपल्या मावळ्यांचं काम!!’’
‘‘किती लागतील, सोबत? पाचशे पुरे होतील?’’
‘‘कसापायी येवढे?’’
‘‘तीनशे?
‘‘आं! येवढंच म्हंता तर द्या पन्नाससाठ! --येवढे बी नगत!!’’
कोंडाजी फर्जंद साठ मावळ्याांनिशी निघणार अन् पन्हाळा सर करणार. एवढी हास्यास्पद गोष्ट त्यावेळी तरी दुसरी नव्हती! डोळे टिचले नाहीत, पण महाराजांना भरून आले असले पाहिजे! त्यांनी आपल्या हातातले सोन्याचे एक रत्नजडित कडे काढले अन् कोंढ्याच्या हातात घातले! कोंडाजीने संकोच करून पाहिला. पण, त्यास उमगले. महाराज आपल्याला अखेरचा निरोप देत आहेत!! कडे घालून घेतले आणि कसनुसा हसला.
मी कॉलेजात असताना पहिला पोवाडा लिहिला तोच कोंढाजीचा!--
‘‘शिवराय मूर्त धैर्याची| कीर्त प्रतापाची| शर्थ शौर्याची|
जिवाचे जीव सौंगडी त्यास |३ जीऽजीऽजीऽऽऽऽ॥
आरं पन सवंगडी कसे?
कसे?-- कोंडाजी सारखे!!
कोंडाजी फर्जंद रणमर्द| दुष्मना सर्द| करी घनगर्द|
युद्ध पन्हाळ्यास|
घेतले फक्त साठ सैन्यास!!
फते केली अस्मानी खास जीऽजीऽजीऽऽऽ॥
--बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या जाणता राजा या मराठी नाटकात हा पोवाडा माझ्या नामनिर्देशासह घातला आहे! प्रतापराव गुजरांवरील ध्वनिफितीतही पहिली कहाणी रचली ती कोंडाजीचीच! पुढे हिंदी जाणता राजाची सगळी गाणी मजकडून लिहवून घेतली!
‘‘बाजुबंद चुभे बाजु में
नथनि बाल में...
...मेरी मैना तू आऽऽ
मेरी रानी तू आऽऽ
जान ए जान आ आजा ऽऽ’’
--हिंदी जाणता राजात मी लावणी रचली ती, किल्ल्यावरल्या रंगरलियांत कोंडाजी सामील होऊन गनिमी कावा खेळतो त्याची!
हा बहाद्दर असा की त्याने ते सोन्याचे कडे तर आपल्या अंगावरून उतरून ठेवलेच; पण, सोन्याची एकवीस फुले स्वतंत्रपणे तयार करून घेतली होती; आपल्या कमाईतून! का? नातवाच्या अंगावर मायच्या हाताने उधळायला? तर, मुळीच नाही! पन्हाळा सर केल्यावर महाराज व्हिजिट करतील... महाराज गडावर अश्‍ववेगाने शिरताच द्वारावरल्या कोंढ्याने त्यांच्या अंगावर ती सोन्याची फुले उधळलीच!!
ते सोन्याचे कडे हातात घालण्याचे नव्हतेच मुळी. शोकेसमध्ये ऑनर अवॉर्ड म्हणून ठेवण्याचे होते. स्वरायाच्या दुर्घट मोहिमेवर निघाले की स्वातंत्र्यवीर मरतातच असे नाही. जगतातही!!
--हो! कोंढाजीने अत्यंत अवघड पन्हाळा, पूर्ण कडा चढून, लीलया घेतला. तो मेला नाही म्हणून कोणाला तो माहीत नाही. मेला असता तर त्याचे डिंडिम वाजले असते!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...