विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 21 February 2019

युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम

युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम -

शिवरायांनी शके १५७७ पौष महिन्यात जावळी जिंकली.हाती लागतील तेवढे मोरे कापले.चंद्रराव,हणमंतराव,बाजीराव,कृष्णराव या मोरे बंधूंना मारण्यात आले.
पुढेमागे जावळीत गडबड होऊ नये म्हणून खबरदारी साठी जावळीच्या वरच्या अंगाला असलेल्या 'ढोपर्या ' डोंगरावर किल्ला बांधला,प्रतापगड ऎसे नाव दिले.
नंतर जुन्नर आणि नगर कडे शिवरायांनी मोर्चा वळवला,बरीच धुमाळी झाली पण फारसे यश लाभले नाही.
या भागात युवराज औरंगजेबाने नौसीर खान नावाचा सुभेदार ठेवला होता तसेच बंदोबस्तहि चोख होता त्यामुळे माघार घेऊन तहाची बोलणी करावी लागली.रघुनाथ बल्लाळ यांच्या हस्ते औरंगजेबाला पत्र पाठवले त्याचे उत्तर असे आले.
"तुमच्या पेश्जीच्या गोष्टी विसराव्याजोग्या नाहीत, तथापि तुम्ही तुमच्या कृतकृत्यांचा पश्चाताप केला असे समजोन पूर्वकृत्य मनात आणत नाही "
असे सांगून ५०० घोडेस्वार देत बादशाही नोकरीत आमंत्रित करत शिवरायांना ऑफर लेटर देऊन तो लगबगीने (शहाजहान आजारी असल्याने) उत्तरेस गेला .तरीसुद्धा जाताजाता त्याने मीर जुमला(शाही सरदार) व अली आदिलशाहास तंबी दिली कि "शिवाजीवर लक्ष ठेवा,तुमचे किल्ले त्याने बळकाविले आहेत ते सोडवा अथवा तुम्हास त्याच्या नोकरीची अपेक्षा असेल तर त्यास दक्षिणेस पाठवा".
बादशहाची करडी नजर राहू नये म्हणून शिवरायांनी १६५९ जून मध्ये औरंगजेब गादीवर बसला तेव्हा सोनोपन्तांबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण प्रसंगी पाठवली त्यास उत्तर म्हणोन उंची पोशाख आणि उत्तर पाठवले.
औरंगजेबाने दिलेली तंबी आदिलशहाने बरीच मनावर घेतली कारण बरेच सरदार दरबारात शिवरायांविषयी कागाळ्या करत यात अफझल आघाडीवर होता,वाई प्रांत आणि आसपासचा मुलुख सर्वात जास्त शिवरायांकडून प्रभावित होता...येथील वतनदार राजांच्या बाजूने फिरले त्यामुळे महसूल नीट येत नव्हता,तसेच राजांच्या सैन्याचा वारंवार त्रास होत असे.वळवाचा पाउस येतो तशी शिवाजीची माणसे येतात आणि जातात हाती कोणी लागत नाही त्यामुळे हे काम पत्करण्यास कोणीही तयार नव्हते.वाईचा सुभेदार म्हणून हि कामगिरी अफझलखानच्याच माथ्यावर आली तो कबूल हि झाला. मोहिमेला जाण्यापूर्वी तो आपल्या कोणी अवलिया फकिराला भेटायला गेला होता तेथे फकिराने त्यास अनिष्ट होईल असे सांगितले म्हणतात.
स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये.
या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंवभोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर (भोसले बखर मध्ये खान भिमतीरी होता असा उल्लेख आहे, खानाने तुळजाभवानी ची मूर्ती जात्यात भरडली,पांडुरंगाची मूर्ती फोडली असे बखरकार सांगतात परंतु त्यास तत्कालीन पुरावे नाहीत)
अफझलखान हा १२-१५ वर्षे वाई चा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक पुरावा जोडला आहे.नरसोभट बिन रंगभट चीत्राऊ यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली !
युद्धानंतर कारागीर तुळजापूर ला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि भवानीची मूर्तीला अपाय झाला नसावा.
शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शीळींमकरांचा तंटा शिवाजीने सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजीच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला.
तसेच मंबाजी भोसले ला खानाने ओढला तर बाबाजी भोसले ला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले.अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजीने त्यांस कडून शपथा घेतल्या !
या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे. दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले !
कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले !
जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्हो च्या कडून निरोप पाठवला.
"आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत"
खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला.
खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला.
जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले
यावर महाराजांनी धूर्त उत्तर देत कळविले "तुमचा व खानाचा घरोबा आहे,तरी तुम्ही जावे अथवा पुत्रास पाठवावे,नीट कौलभाक घ्यावी...दगा होईल असे होऊ देऊ नये "
महाराजांवर विश्वास दाखवत जेध्यांनी शपथक्रिया आणि कौलफर्मान राजांना मागितले,कौल घेऊन जेधे आपल्या ५ मुलांसह राजगडी आले.
तेथेही राजांनी सुचविले "बादशाही हुकुम मोडून तुम्ही येईन राहिलेत,वतन आणि जीवास अपय होईल तिकडेच जाणे" ...राजांच्या शब्दातील खोच लक्षात येऊन
जेध्यांनी आपल्या वतनावर पाणी सोडले.
जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले.
नेतोजी पालकर यांना जावळी घाटमाथ्यावर व्यवस्था लावून दिली.
अशी दोहो बाजूस तयारी चालू असता, कृष्णाजी भास्कर पत्र घेऊन शिवाजीकडे आला...पत्राचा मतलब असा होता "सरकारातून मला तुमच्यावर मोहिमेसाठी धाडले आहे, परंतु तुमचा व माझं घरोबा लक्षात घेऊन तुमच्या सर्व कृत्यांची माफी विजापूर दरबारातून करून घेईन, तुम्ही म्हणाल तसं तुमचा बंदोबस्त लावेन, शहाजीराजांपेक्षा मोठा मरातब होईल "
पत्रातला छद्मीपणा राजांना कळला,त्यांनी कृष्णाजी भास्करास एक दिवस गडावर ठेऊन घेतले चांगली सरबराई केली.दुसर्या दिवशी जाताना बरोबर पंताजी गोपीनाथ (बोकील वकील) यांस पाठविले.
"खानाचे चित्त आमच्या बर्यावर आहे कि वाईटावर आहे याचा कसून शोध घ्या " असे बजावले व खानास निरोप धाडला "आपण जावळीला यावे...आमच्या मनात कपट नाही "
बोकीलांनी खानची एकांतात भेट घेतली "राजा कचदिल आहे,वाई ला येऊन भेट घेण्यास भितो " असे सांगून त्यास जावळी येण्यास राजी केले.भेट संपल्यावर बोकीलांनी खानाच्या लोकांस लाच-लुचपत देऊन खानाचा ठाव घेतला असता कळले कि खानाच्या मनात फार्मानाप्रमाणे काहीही करून शिवाजींस ठार मारणे आहे.पंतांनी लगोलग हि गोष्ट राजांना कळविली.
जिजाऊ मा साहेबांनी सुद्धा युद्धापूर्वी "मुसलमान बेईमान, खान राखीना तुम्हाला " असे बजावले होते.
अफझल खानाच्या गोटात राजांच्या हेरांचा सूळसुळाट होता,कोणी विश्वासराव नावाचा हेर रोज फकिराचा वेश घेऊन खानाच्या गोटात फिरत असे आणि ती खबर दरबारी पोचवत असे.
मजल दरमजल करत खान पार मुक्कामी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ला आला लगोलग राजांस त्याने भेटीचे वेळ आणि स्थळ ठरविण्यासाठी वकील पाठवला.
बुरुजाखालील माची भेटीचे ठिकाण ठरविले,शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ तळेकर (कि मळेकर?) यांस सांगितले,
येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत.
सदर - तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. देरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.देर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. (१९२० सालापर्यंत चौथरा अस्तित्वात होता).
तयारी - सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,"चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या | बार होताच हुश्शार व्हावे " अशी ताकीद राजांनी दिली .
बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली
व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीम्कारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले.
"जाऊ जाणे येऊ नेणे ! अशी गत रदबदल्याची झाली " (चक्रव्युहात स्वताच अडकला)
त्या दिवशी ( मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी) ला सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली.
दुपारी दोनप्रहर सुमारास राजे सदरेस जायला निघाले- अंगात चिलखत वर जरीची कुडती,अस्तनीत नवटाकी पट्टा घातला.भवानी आईचे स्मरण केले.
मातोश्री जिजाउस भेटून जर दगाफटका झाला तर उमाजीस * राज्य द्यावे असा मानस केला.(उमाजी - शिवरायांचा वडिलभाऊ संभाजी यांचा पुत्र)
त्यावर जिजाउ साहेबांनी " काही वाकडे पडल्यास गर्दी जमवून शत्रूस बुडवावे राज्य रक्षावे" असा सल्ला दिला, जवळ जमलेल्या सर्व मातब्बरास नावाजून राजे म्हणतात "तुम्ही सर्व शूर-पराक्रमी आहा,आमची मदार तुमचेवरच,सर्वांनी शर्थ करावी राज्य तुमचेच आहे" .
इकडे खान दीड हजार बंदूकवाले घेऊन सदरेस निघाला त्याला असा येताना पाहून बोकीलांनी त्यास अडवले आणि "एव्हडा जमाव कशाला, राजा धाशात खाईल,वापस जाईल " असे सांगून सगळे हशम हटविले.
खान,कृष्णाजी भास्कर,सैद बंडा , कमलशा मुर्शेद आणि दोन हुद्देकारी सशस्त्र एवडेच सदरेपाशी आले. सैद बंडा ला सुद्धा बोकीलांना सांगून दूर करविले तो जाऊन सदरेबाहेर थांबला.खानाच्या पालखीचे ३२ भोई बाहेर थांबले .
इथे राजे जिऊ महाला आणि संभाजी कावजी सोबत सदरेपाशी आले.
(जीवा महाला - याचे पूर्ण नाव जीवा महाला सकपाळ जातीने न्हावी याच्या वंशजांना कोंडिवली गावी काही जमीन इनाम आहे.
संभाजी कावजी - याचे पूर्ण नाव संभाजी कावजी कोन्धालकर, धोम धरणापाशी कमळगडाजवळ पायाथ्यास यांचे गाव आहे , युद्धानंतर राजांकडे याने शिरवळ वा वाई च्या देशमुखीची आशा धरली त्यास नकार दिल्याने तो नंतर च्या काळात शास्ताखानास मिळाला )
प्रत्यक्ष भेट - उंच बळकट शरीराचा खान शामियान्यात आला खानासमवेत कृष्णाजी पंत व विठ्ठलपंत मरठेकर होते,तर महाराजानसोबत पंताजी बोकील होते.
खानाने कृष्णाजीला 'हाच शिवाजी काय' अशी पूस केली ,तसेच राजांनी बोकीलांना 'हाच खान काय ' विचारले.आगत स्वागत ओळख करून देण्यात आली.
दोघेही सामोरे गेले भेटीसाठी उभे ठाकले, खानाने शिवरायांची हि इतिहासप्रसिद्ध गळाभेट घेतली,तत्क्षणी खानाने राजांची मुंडी कवटाळून काखेखाली धरली ,राजीयास घेरी आल्यासारखे झाले.
खानाचे कमरेस भली मोठी जमदाड होती तिचे म्यान टाकून खानाने जमदाड राजांच्या कुशीस चालवली,आत चिलखत असल्याने खरखर आवाज झाला,वर अंगास लागला नाही.
वार झाल्याचे लक्षात येताच राजांनी चपळाईने पूर्ण बळ एकवटून बिचवा खानाचे पोटी मारला.एकांगी करून तडाख्याचा वार केला
(एकांगी - बगले कडून बाजूला सरून दुसर्या बाजूने जोर लावणे)
या तडाख्यामुळे खानाची आतडी बाहेर आली ,खान पंतास 'दगा केला दगा केला' म्हणू लागला.तेवढ्यात महाराजांनी खानवर दुसर्या हाताने पट्ट्याने वार केला त्यात खानाचे दोन भाग होऊन खान पडला.
कृष्णाजी पंताने फिरंग काढून राजांवर वार टाकला पण तो बसला नाही,तेव्हा कृष्णाजी पंताने भोयास आत बोलाविले,त्यानी खानास गोळा करून पालखीत भरला व पालखी पळवू लागले.या गोंधळात सैद बंडा आत आला आणि त्याने पट्ट्या चा वार राजांवर टाकला,तो अडवून राजांनी उलट पट्ट्याचा वार बंडा वर केला. तो चुकवून पुन्हा पट्ट्याचा वार करण्यास सैद बंडा ने जवळीक केली तसा जीवा महालाने पुढे सरसावत फिरांगीने बंडा चा हात कापला. तसच जीवा आणि संभाजी कावजी शामियान्याबाहेर गेले आणि खानाची पालखी घेऊन पळणाऱ्या भोयांचे पाय कापले,तसा तो डोलारा खाली कोसळला आणि कावजीने खानाला पालखीतून बाहेर काढत त्याचे मस्तक कापले.
इकडे शामियानात झालेल्या धुमाळीने पंताजी बोकीलांवर सुद्धा काही वार झाले,तर कृष्णाजीला राजांनी त्याच्या लष्करात बातमी सांगण्यास सोडून दिले,गड उतरताना झालेल्या कचाकचीच्या लढाईत त्यास अपय होऊन तो मारला गेलं असावा असे काही इतिहासकार सांगतात.
(बर्च्याच ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यातच मारला गेल्याची नोंद आहे )
खान पडल्यापडल्या गडावरच्या मराठ्यांनी तोफेला बत्ती दिली.तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, बाजी सर्जेरावाने जीवाची शर्थ केली.
कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही.
सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले.
"कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते.
'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार
पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझुल्या चा पोरगा फाझल जीव वाचवायला कोयनाकाठाने कऱ्हाड च्या दिशेने पळत सुटला असता खंडोजी खोपड्याच्या हाती लागला,परंतु फाझल खानाने पैशाचे आमिष दाखविताच लोभापायी त्याने फाझल ला सोडून दिले, हि बातमी गडावर कळताक्षणी राजांनी खन्डोजीस धरून आणविला आणि त्याचे डोके उडवले.
कापड ,हत्यारे, वाई ला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला.
राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले.
पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले,
रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले.
पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला.
देवीच्या समोरील बाजूस डोंगराचे टोक होते तिथे खानाचे मुंडके पुरल्याचे सांगण्यात येते, नंतर भोवती बुरुज उभारला 'अब्दुल्ला(अफझल) बुरुज ' , शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.
(उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले,
खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले.
सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते.
वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही.
खानाचा वधच केला जाणे गरजेचे होते. )
प्रतापगडावर मोठा सोहळा केला,सगळे आनंदून गेले, भवानी आईची कृपा झाली समजून राजांनी चांगले कारागीर बोलावून त्यास तुळजापूर ला पाठविले
आणि मूर्तीचे तसेच ध्यान करून तशीच मूर्ती गंडकी शिळा आणून प्रतापगडावर घडविली.राजेश्री मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या पत्नी च्या हस्ते मूर्ती बसविली.
(देवीस रायगडात २ आणि सातार्यात ११ गाव इनाम होते, पेशवा कडूनही एक २०० व एक ३०० अशी मिळून पाचशे रु ची साडीचोळी सालीना होती,औरंगजेबाच्या आक्रमणा वेळी काही वर्षे मूर्ती काढून दुसरीकडे हलविण्यात आलेली, नंतर ती पुन्हा आणून बसविली गेली)
जिजाउंचा आनंद गगनात मावेना त्यांनी अनेक धर्म केले,दान केले. आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले.
अज्ञानदास शाहिराने हाती डफ आणि तुणतुणे घेऊन हे पादशाही सरदाराचे भांडण आणि शिवाजी सर्जाचे दलभंजन खड्या आवाजात गायले !
"शिवाजी सर्जानं इनाम घोडा बक्षीस दिला | शेरभर सोन्याचा तोडा हातात घातीला "
खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात धरणीकंप झाला ,बडी बेगम शोक करू लागली
तर औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडून नंतर मोठी खंडणी घेऊन बिनकपड्याचे सोडून दिले होते !
अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले,मराठा सैन्याने कोकणात राजापूर तर घाटावर पन्हाळा,विशालगडा पर्यंत धडका मारल्या !
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती
अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती !
जय भवानी ,जय शिवाजी !

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...