विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 24 March 2019

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ३

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ३

टाऊनहॉल मधील सभेत सेनापती संताजीराव घोरपडे गेले नव्हते मात्र त्यांचे प्रतिनिधी श्री आप्पासाहेब सरलष्कर हे या सभेचे आभारप्रदर्शक पत्र श्रीमंत आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलकर यांच्या कोल्हापूर येथील बंगल्यावर जाणेकरीता नेमलेल्या ' डेप्युटेशन ' मध्ये हजर होते .... तेथे आबासाहेब घाटगे कागलकर यांना अत्यंत सन्मानाने हे आभारप्रदर्शक पत्र देणेत आले ... त्या आभारप्रदर्शक पत्रात लिहिले होते की

" श्रीमंत राजश्री जयसिंगराव आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलचे अधिपती यांसी - कैलासवासी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अकस्मिक मृत्यूने आम्हां कोल्हापूरवासी जनांस बहुत दुःख झालें आहे . या शोचनीय गोष्टीमुळे रिकाम्या झालेल्या कोल्हापूरच्या गादीवर आपले प्रीय ज्येष्ठ चिरंजीव श्रीमंत यशवंतराव बाबासाहेब यांस दत्तक देऊन महाराजांचे गादीवर बसविण्याविषयीं इंग्लिश सरकाराने मेहेरबान होऊन अनुमोदन दिलें. अशा आनंदाच्या प्रसंगी करवीरस्थ प्रजाजन मोठ्या संतोषाने व समाधान बुद्धीने आपलें अभिवंदन करण्यासाठी आपणापाशी हजर झालों आहों . कारण या राष्ट्राच्या सुदैवाने श्रीमंत बाबासाहेब सारखा सकुलोत्पन्न आणी विद्याभ्यासशील अधिपती आम्हास प्राप्त झाला आहे . हे राजकूळ सतत राखण्याविषयीं व येथील राज्यव्यवस्था अबाधित व अविछिन्न चालविण्यासाठी इंग्रज सरकारांनी ज्या थोर राजनितीला अनुसरुन सतत वर्तन ठेविलें आहे तीबद्दल आम्ही त्यांचे कितीही उपकार मानिले तरी ते थोडेच ..." वगैरे

या सव्वीस जणांच्या ' डेप्युटेशन ' मध्ये श्रीमंत आबासाहेब सरलष्कर यांचेसहीत श्रीमंत आबासाहेब पंतप्रतिनिधी , श्रीमंत आप्पासाहेब राजोपाध्ये , श्रीमंत बाळासाहेब गायकवाड , श्रीमंत आनंदराव भोपे , श्रीमंत भाऊसाहेब इंगळे , दरबार सर्जन डॉक्टर सिंकलर, इंजिनीयर रामचंद्र तांबे , करवीर मामलेदार गोविंद तांबे , वेदशास्त्र संपन्न कांताचार्य पंडितराव , यशवंतराव अभ्यंकर वकिल , ज्ञानसागर वृत्तपत्राचे संपादक विठ्ठल मंत्री , गुजरीतील दुकानदार आबाहुसेन अल्लीभाई , सुरतराम मारवाडी वगैरे मान्यवर मंडळी होती ... या डेप्युटेशनचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यामध्ये सर्व क्षेत्रातील पारंगत असलेले मान्यवर होते ...( आजकाल कोणत्याही कमिटीमध्ये आपले ऐकणाऱ्यांचा भरणा केलेला दिसतो )

या पत्रास श्रीमंत आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलकर यांच्या वतीने त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी रावसाहेब कृष्णाजी भिकाजी गोखले यानी उत्तरादाखल पत्र दिले ....

" माझे चिरंजीव राजश्री बाबासाहेब यांस कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घेण्यास श्रीमंत मातोश्री राणीसाहेब यांनी पसंत केले यामुळे सर्व लोकांस संतोष वाटला हे पाहून मला विशेष आनंद वाटतो . दैवयोगाने कोल्हापूर संस्थानात जे निरनिराळे फेरफार झाले , त्यावेळी त्या राज्याचे अधिपत्य व एकी इंग्रज सरकारांनी मोठ्या काळजीने राखली , यास्तव तुम्ही त्यांचे आभारी आहां असे आपल्या पत्रांत दर्शविलेत ही गोष्ट फार योग्य आहे . ".... वगैरे

त्यानंतर अनेक ब्राम्हणांच्या उपस्थितीत दत्तकविधान कोणत्या मुहूर्तावर व्हावे ? याबद्दल निर्णय झाला आणी फाल्गुन वद्य पंचमी सोमवार दिनांक 17 मार्च 1884 रोजी सकाळी 7.30 वाजताचा मुहूर्त ठरविणेत आला . त्यासाठी विस हजार रुपयांचे ' सांगसन '( सँक्शन ) मंजूर करणेत आले . तसेच कार्यक्रम व्यवस्थेकरीता रुपये 1250 कोल्हापूर म्युनिसीपल कमिटीने आणी रुपये 1250 संस्थान ट्रेजरीने देण्यासाठी मंजूरी देणेत आली . या 2500 रुपयात टाऊनहॉल पुढील हॉस्पिटल समोर ( आत्ताचे CPR हॉस्पिटल ) येथे कमान उभारण्यासाठी व तेथुन पुढच्या मिरवणूक मार्गावर ' चिराखदानी ' म्हणजे तेलाचे दिवे लावणे , पन्नास मुले व पन्नास मुली यांच्याद्वारे मंगलगाणी म्हणत मिरवणूक मार्गावर पुष्पवृष्टी करणे , ध्वज उभारणे , रस्ते स्वच्छ करणे , गुढ्यातोरणे उभारणे , मिरवणूक मार्गावर असलेल्या सगळ्या घरांना बाहेरुन चुन्याचा रंग लावणे वगैरे खर्च करण्यासाठी मंजूरी देणेत आली . ( आजकाल 25000 रुपये खर्च करुन नुसता ' चुना ' लावतात )

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...