विनोद जाधव एक संग्राहक

Monday 22 April 2019

शाहाजीराजे आणि आरमारी शाह्यांचे संबंध....

शाहाजीराजे आणि आरमारी शाह्यांचे संबंध........
============================

मोघल आणि आदिलशहा यांनी अनेक आक्रमणे करून निजामशाही संपवत आणली असताना इ.स. १६३३ मध्ये पेमगिरी किल्यावर शाहाजीराजांनी निजामशाही घराण्यातील मुर्तुजा नावाच्या १० वर्षांच्या मुलास आपल्या मांडीवर बसवून स्वतः निजामशाहीची सूत्रे हाती घेतली. निजामशाहीतील अनेक जुन्या मराठा सरदारांना एकत्र करून निजामशाही पुनरुज्जीवित केली. खरे पाहता ही "स्वतंत्र मराठा साम्राज्याची सुरुवात"च होती.

या काळात सह्याद्रीच्या पूर्वेला लागून उत्तरेस गोदावरीच्या खोऱ्यापासून दक्षिणेस नीरेच्या खोऱ्यापर्यंत आणि कोकणात उत्तरेस कल्याणपासून ते दक्षिणेस चौलापर्यंत शाहाजीराजांची सत्ता होती.

त्यांची कोकण किनारपट्टीवरील अत्यंत महत्वाच्या अशा "कल्याण" व "चौल" प्रांतांवर देखील सत्ता होती. येथील प्रबळ अशा पोर्तुगीजांशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते.

पुढे शाहाजीराजे आदिलशाहीत रुजू झाल्यानंतर, इ.स. १६३७ ते १६४० या काळात आदिलशाही सरदार रनदौलाखानाच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारतात काढलेल्या मोहिमांमध्ये शाहाजीराजांनी फार मोठा पराक्रम गाजविला.
याचे 'शिवभारत' मध्ये सुरेख वर्णन केलेले आहे, "बिंदूंपुरचा राजा वीरभद्र, वृषपट्टणचा राजा केंगनायक, कावेरीपट्टणचा जगदेव, श्रीरंगपट्टणचा कंठीरव, तंजावरचा विजयराघव, तंजीचा वेंकटनायक, मदुरेचा त्रिमलनायक, पिलगोंड्याचा वेंकटप्पा, विजयनगरचा श्रीरंगराज, हंसकुटचा तम्मगौडा यांना व इतरही राजांना शाहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणून सेनापती रनदौलाखानास संतुष्ट केले."

दक्षिण भारतातील या राजांची सत्ता समुद्रकिनारपट्टीवर होती. पुढेही अशा शाह्यांशी शाहाजीराजांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यामुळेच पुढे दक्षिण भारतातील या प्रांतांमध्ये मराठ्यांची सत्ता निर्माण होऊ शकली.

अशा 'फर्जंद' 'सरलष्कर' 'महाबाहू' शाहाजीराजांचा १६ मार्च हा जन्मदिन. शाहाजीराजे यांनी केलेल्या मर्दुमकीमुळे तत्कालीन भारतीय राजकारणात शाहाजीराजांचे फार मोठे नावलौकिक होते. मराठ्यांच्या साम्राज्याच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या या थोर महापुरुषास त्रिवार वंदन......

- अनिकेत यादव

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...