विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

मोहीते-चव्हाण घराण्याचा 'हंबीरराव' किताब

मोहीते-चव्हाण घराण्याचा 'हंबीरराव' किताब
मोहीत्यांना 'हंबीरराव' हा किताब शिवाजी महाराजांनी दिला अशी सामान्य समजूत आहे आणि त्यास 'सभासद बखरी'त आधारही सापडतो. -
"आणि सरनोबतीस माणूस पाहता हसाजी मोहीते म्हणून पागेमध्ये जुमला होता. बरा , शहाणा, मर्दाना, सबुरीचा चौकस शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास 'हंबीरराव' नांव किताबती देऊन सरनोबती सांगितली."
पण 'हंबीरराव' हा किताब ह्या घराण्याला खुप पूर्वीपासून होता हे बागलाणच्या मोहीते घराण्याकडे मिळालेल्या फार्सी कागदांवरुन सिद्ध होत आहे.
बखरींपेक्षा विश्वसनिय माहिती अस्सल कागदपत्रांमधुन मिळत असते.
१२ एप्रिल १६३८ व २९ जून १६३९ रोजी शाहजहान व औरंगजेब यांनी भिकूजी मोहीतेंना पाठवलेल्या संयुक्त फर्मानात ते भिकूजींच्या नावापुढे हंबीरराव हा किताब लावतात. (संदर्भ - ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड २ , लेखांक २ व ७ )
'हंबीरराव' हा किताब मोहीते घराण्यास कोणत्या साली मिळाला , हे निश्चित ठाऊक नाही. पण हे शहाजहानच्या काळात मिळाले हे उपरोक्त संदर्भातील कागदपत्रांवरुन कळते.
या शिवाय वरील विधानास 'कविंद्र परमानंदकृत श्रीशिवभारत' हाही एक आधार आहे.
शके १५४६ म्हणजेच इ.स.१६२४ मध्ये
भातवडी येथे झालेल्या 'मुघल-आदिलशाही विरुद्ध निजामशाही' या लढाईत निजामशाही तर्फे लढणाऱ्या योध्द्यांत ' हंबीरराव चव्हाण' (मोहीत्यांचे आधीचे आडनाव चव्हाण असेही होते.) हे नाव आलेले आहे. --
चाहुबाणेय हम्मीरराजेन विजितद्विषा ।
(शत्रुजेता हंबीरराव चव्हाण) [शिभा. अध्याय ४, श्लोक १३]
तथा हम्मीरराजाद्यैर्महावीरैः प्रयापिभीः।
क्षुरप्रचक्रनिस्त्रिंशकुन्तपट्टिशपाणिभीः ।।
(...त्याचप्रमाणे हंबीरराव व इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण चक्रे तरवारी भाले पट्टे घेऊन मोगलांच्या सैन्याची कत्तल उडवली.)
[शिभा. अध्याय ४, श्लोक ५०]
ह्यावरुन हा निष्कर्ष निघतो की, मोहीत्यांस हंबीरराव हा किताब शिवाजी महाराजांनी दिला नसून , तो पुर्वीपासून मोहीत्यांकडे होता.
- ग.ह.खरे

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...