विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 25 June 2019

आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे... भाग 2


आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 2
इंडोनेशिया....
यवद्वीप -
जसं कंबुज देशाबद्दल, तसंच यव द्वीपाबद्द्ल. यवद्वीप म्हणजे जावा. आजच्या इंडोनेशियाचा एक भाग. कोणे एके काळी संपूर्ण हिंदू असलेला. अगदी रामायणात आणि ब्रम्हपुराणात उल्लेख असलेलं हे यवद्वीप. येथेही भारतीय नेमके केंव्हापासून आले, याचा निश्चित इतिहास उपलब्ध नाही. मात्र काही हजार वर्षांपासून येथे हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे हे निश्चित. जावा च्या लोकांची ही मान्यता आहे की ‘आजिशक’ ह्या भारतातून आलेल्या #पराक्रमी योद्ध्याने तेथील राक्षस देवतेच्या राजाला मारून, सामर्थ्यशाली राजवंश निर्माण केला.
सुमात्रा -
जसे जावा, तसेच सुमात्रा. प्राचीन काळात #सुवर्णभूमि किंवा सुवर्णद्वीप म्हणून प्रसिध्द असलेला भाग. आजचं इंडोनेशियातलं सर्वात मोठं बेट. या बेटावर साधारण सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत हिंदूंचे ‘श्रीविजय साम्राज्य’ होते. अत्यंत वैभवशाली आणि संपन्न असलेल्या ह्या साम्राज्याबद्दल आधुनिक जगाला सन १९२० पर्यंत काहीच माहिती नव्हती, हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. १९२० मधे एका फ्रेंच संशोधकाने ह्या साम्राज्याची माहिती लोकांसमोर आणली. त्यानंतर मात्र ह्या साम्राज्याकडे लोकांचं लक्ष गेलं आणि बऱ्याच माध्यमातून माहिती समोर येऊ लागली.
इत्सिंग नावाचा चिनी बौध्द प्रवासी, #बौध्द धर्माचं अध्ययन करण्यासाठी सातव्या शतकात (इसवी सन ६७१ मधे) भारतातल्या नालंदा येथे जायला निघाला. मात्र तिथे अध्ययन करायचं असेल तर संस्कृत भाषा आवश्यक आहे ही माहिती त्याला होती. म्हणून तो चीनच्या ‘ग्वांझावू’ प्रांतातून निघून #श्रीविजय येथे थांबला आणि संस्कृत मधे पारंगत झाला. आपल्या एकूण २५ वर्षांच्या प्रवासात, इत्सिंग ने ६ ते ७ वर्ष श्रीविजय साम्राज्यात काढली. या साम्राज्याबद्दल इत्सिंग ने बरंच लिहून ठेवलंय.
श्रीविजय साम्राज्याच्या काळातच त्रिमूर्ति प्रमबनन(‘परब्रम्ह’ चा अपभ्रंश) हे भव्य #हिंदू_मंदिर, जावा बेटावर इसवी सन ८५० मधे उभे राहिले. #दुर्गादेवी#गणपती आणि अगस्त्य ऋषींच्या त्रीमूर्ती चे हे मंदिर अत्यंत भव्य असून आजही तिथे व्यवस्थित उपासना चालते..!
जगातील सर्वात जास्त #मुस्लीम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आजही अत्यंत अभिमानाने आपल्या हिंदू खुणा मिरवतोय. याचं ‘दीपांतर’ (समुद्रापलीकडला भारत) हे नाव आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. यांच्या नोटांवर(स्थानिक चलनांवर) श्री गणेशाचे चित्र असते. यांच्या विमानसेवेचे नाव ‘गरुडा एयरवेज’ आहे. ते बँकेला कोषागार म्हणू शकतात आणि त्यांच्या ‘बहासा इंडोनेशिया’ या अधिकृत भाषेत सत्तर टक्के संस्कृत शब्द येतात. इंडोनेशियाचे राष्ट्रीय बोधवाक्य ‘भिन्नेका तुंगल इका’ (विविधतेत एकता) हे आहे.
इंडोनेशियातलं बाली द्वीप हे निसर्ग सौदर्यानं नटलेलं विख्यात पर्यटन स्थळ आहे. आजही बाली ची ९०% लोकसंख्या हिंदू आहे आणि हिंदू आचार - विचारांवरच जगतेय. बालीत आढळलेला पहिला हिंदू शिलालेख #ब्राम्ही लिपीत आहे आणि तो इसवी सनाच्या १५० वर्षांपूर्वीचा आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...