विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 27 June 2019

#फर्जंद_शहाजी_राजे

#फर्जंद_शहाजी_राजे

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व!

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.

फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा 1603 साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. 1624). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर 1639 साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै, 1648 चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. 16 मे, 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,

* इ. स. 1625 ते 1628 - आदिलशाही
* इ. स. 1628 ते 1629 - निजामशाही
* इ. स. 1630 ते 1633 - मुघलशाही
* इ.स. 1633 ते 1636 - निजामशाही
* इ.स. 1636 पासून पुढे - आदिलशाही

रियासतकार - सरदेसाई यांच्या मतानुसार १८ मार्च १५९४ हा शहाजी महाराजांचा जन्म दिवस

अरू उत्तर दछन रछन को इत ।
साहजु है उत साहिजहाँ ।।

याचा अर्थ असा की उत्तरेकडील प्रदेशाचे रक्षण करण्यास शहाजहाँ आणि

दक्षिणेचे रक्षण करण्यास शहाजी आहे.

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...