विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 July 2019

#स्वराज्य_विस्तारक_छत्रपती_शाहु_महाराज आणि #सरदार_पिलाजी_जाधवराव भाग 2

भाग 2
कोकणातील कामगिरी
कान्होजी आंग्रेचे आरमारी सत्ता हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी अनेकदा प्रयत्न केले होते. छत्रपती शाहूंच्या आदेशानुसार वेळोवेळी पिलाजींरावांनी, आंग्रॆना मदत करून त्यांचे आरमारी वर्चस्व कायम राखण्यास मदत केली. एकट्याने आंग्रेचा पाडाव करणे शक्य नाही असे कळून चुकल्यामुळे इंग्रजांनी पोर्तुगीजांची मदत घेऊन कुलाब्यावर हल्ला करण्याची योजना आखली. चौलनजीक 29 नोव्हेंबरला इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या फौजा जमल्या. एकूण 6000 पायदळ, 200 घोडेस्वार, 24 पौंडाच्या 8 तोफा, 18 पौंडाच्या 8 तोफा असा मोठा फौजफाटा त्यांच्याजवळ होता. कान्होजींनी छत्रपती शाहूंच्याकडे लष्करी मदत मागितली. शाहूंनी पिलाजीरावांना कान्होजीस मदत करण्यास धाडले.
1000 पायदळ, 1500 घोडदळ, आणि 2500 बिनीचे शिलेदार घेऊन ते अलिबागजवळ पोहचले. 20 डिसेंबर 1721 रोजी पिलाजीरावांनी छावणी करून बसलेल्या इंग्रज आणि पोर्तुगीजांवर अचानक हल्ला करून त्यांना जेरीस आणले. 24 डिसेंबरला आंग्रेच्या फौजेने किल्ल्यातून आणि पिलाजीरावांनी किल्ल्याबाहेरून एकत्र हल्ला हल्ला करून इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या संयुक्त फौजांचा पराभव केला. या दोघांपासून कुल्याब्याचे रक्षण केल्यामुळे छत्रपती शाहूंनी उत्तर कोकण,सुपे थळ आदी पिलाजीरावांना इनाम दिले.
सन 1721-22 मध्ये पोर्तुगीज सियोरे विझरेल आणि अंतोन कडदिन यांनी पिलाजीरावासोबत वरसोलीस तह केला. हा तह एक वर्ष टिकला दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांचा उपद्रव परत वाढला. त्यामुळे शाहूंनी पिलाजीरावांना त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता धाडले. 26 नोव्हेंबर 1723 रोजी पिलाजींनी चार हजार घोडेस्वार घेऊन वसई प्रांतावर चाल केली. त्यांचा हल्ला इतका अनपेक्षित होता की पोर्तुगीजांना प्रतिकारसुध्दा करता आला नाही. वसईचा गव्हर्नर त्यांच्या राजास म्हणतो, आम्हाला प्रतिकार न करताच सायवान त्यास द्यावे लागले.
त्यानंतर पिलाजींनी गोखीवे,मनोर,कसबा जिंकत पोर्तुगीजंच्या ठाणे मुलखात धडक मारली. 28 नोव्हेंबर 1723 रोजी त्यांनी पोर्तुगीज अधिकाऱ्यास पत्र समझोत्याचे पत्र पाठविले. पिलाजीराव त्यास लिहितात, जव्हार ,रामनगर आणि इतर मुलूख हा माझ्या स्वामींचा आहे (छत्रपती शाहू) म्हणून मी आलो आहे.पण मी संयम बाळगत आहे तरी माझ्याशी बोलणी करण्याकरिता तुमचा एखादा वजनदार मनुष्य पाठवावा. तसेच खंडणी न मिळाल्यास वसईचा प्रदेश जाळून काढण्याची धमकीही दिली.12 जानेवारी 1724 रोजी भिवंडी येथे पोर्तुगीज कप्तान सेल्युश आणि पिलाजींची भेट झाली.16 जानेवारी 1724 च्या पत्रात गोव्याच्या व्हाईसरॉय पोर्तुगीज राजास लिहितो, सरदार पिलाजी जाधव मोठ्या सैन्यासह उत्तरेकडील प्रदेशात घुसले आहेत त्यांच्या प्रतिकारासाठी आम्ही सर्व सैन्य उत्तरेकडे पाठविले आहेत. यावरून पिलाजींच्या वेगवान हालचालीची कल्पना येते.
छत्रपती शाहूंशी अखेरपर्यंत निष्ठावंत राहून अनेक मोहिमेत मोलाची कामगिरी करून पिलाजीरावांनी स्वराज्याचा विस्तार दिल्लीपर्यंत करण्यास महत्वाची कामगिरी बजावली. ….
📷📷📷📷📷📷📷📷📷📷
संदर्भ :
आंग्रेकालीन अष्टागर,नं 40,पृष्ठ 7
पोर्तुगीज दप्तर 3,पृष्ठ 191,192,200,215
पां.स.पिसुर्लेकरस पोर्तुगीज मराठे संबंध,पुणे 1967,पृष्ठ 143,144,148
राजवाडे खंड 6,पृष्ठ 246
जंजिऱ्याच्या सिद्दीवर शाहूची मोहिम,मुंबई 1930,पृष्ट 108
पोर्तुगीज दप्तर 3 328,329
परेरा बँग्रास,पोर्तुगीज दप्तर 3,मुंबई 1968, पृष्ठ 187.
शा.वी. आवळस्कर, अष्टोकालीन अष्टागर, अधिकारी शकावली,पुणे 1947,पृष्ठ 5
सुवर्णलता जाधवराव,रणझुंजार पिलाजी जाधवराव पत्ररूप इतिहास
सुवर्णलता जाधवराव,सरदार पिलाजी जाधवराव व्यक्ती आणि कार्ये
(पिलाजीरावांच्या अनेक मोहिमांचे वर्णन एका पोस्टमध्ये मांडणे अशक्य आहे. पुढील काळात सविस्तरपणे प्रत्येक मोहिमेची चर्चा करू)
📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷
पोस्ट साभार- दामोदर मगदुम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...