विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 July 2019

#तंजावराचा_तोतया

post by:©सुधांशू सुधीर कविमंडन

मराठ्यांच्या इतिहासांत तोतया प्रकरण काही नवे नाही. पानिपतानंतर उद्भवलेले सदाशिवराव भाऊसाहेब व शिंदे यांचे तोतये सर्वच अभ्यासकांना ठावूक असावेत. परंतु, असाच एक तोतया तंजावरास श्रीमंत शाहजी महाराजांचे पुत्र एकोजीराजांच्या घराण्यातही अकस्मात् प्रकटला होता, हे कदाचित् आपल्याला ठावूक नसेल, त्याचाच हा इतिहास.
तंजावरनरेश एकोजीराजांना तिन पुत्र, शाहजीराजे(दुसरे), शरफोजी राजे व तुकोजी राजे. दुर्दैवाने दीर्घकाल म्हणावे असे जीवन यांच्यापैकी कुणालाच लाभले नाही. पैकी शाहजीराजे सन १७१२ साली निपुत्रीकच निवर्तले. त्यांच्यापश्चात् त्यांचे जागी त्यांचे द्वितिय क्रमांकाचें बंधू शरभोजीराजे यांना प्रतिष्ठीत करण्यांत आले. या कालांत शाहजीराजांचे सर्वांत धाकटे बंधू तुकोजीराजे हे महादेवपट्टणांत कारभार पाहत असून; त्यांना एकोजीराजे (द्वितिय) हे पुत्रही झाले. परंतु; शरभोजीराजे देखिल या वेळेपावेतो निपुत्रीकच होते. शरभोजीराजांना दोन राण्या होत्या.
आणि नेहमीप्रमाणें गृहनाट्य घडू लागलेच! दुसर्या राणीच्या ज्यांचे नांव अपरूपबाईसाहेब होते, परिचितांनी तिचे कान भरावयास प्रारंभ केला. 'तुकोजीराजांना पुत्र झाला, तुम्ही अजून निपुत्रीकच; पुढे तुमच्या माघारी सत्ता तुकोजीच्या हाती गेली तर त्याचाच वंश राज्य करेल' वगैरे संशयपिशाच्चाचा राणीसाहेबांच्या मनांत प्रवेश झाला व त्यांनी एक वेगळीच खेळी खेळली.
अपरूपबाईराणीसाहेबांनी आपण गरोदर असल्याचे सोंग घेतले, व नऊ मासांनी पुत्र देखिल झाला बरं का! आता पुत्र कसा झाला? तर तंजावराच्या किल्ल्यांतच एक कुप्पी नामक रजक स्त्री राहत होती. तिचा पुत्र गुप्तपणे आपल्या मांडीवर घेवून त्यास 'सवाई शाहजी' व 'सुकोजी' ही अभिधानें देवून बाईसाहेबांनी राज्यास वारस मिळाला असे जाहीर केले. या गोष्टीचा मागमूस खुद्द शरफोजीराजांना देखिल नव्हता! मग काय, आनन्दच!
पण, नशीब घात करते ते असाच! या सर्व कटाचा सुगावा तुकोजीराजांना लागताच, ते तडक तंजावरास येवून वडिल बंधूंच्या कानाशी लागले. सर्व गोष्टींचा पुराव्यांनिशी उलगडा होताच; शरफोजी राजांनी तत्काळ त्या मुलाचा त्याग केला व काही ठिकाणी त्याला मृत्युदंडही दिला असे आहे. (काही संदर्भांत अपरूपराणीचाही त्याग केला असे म्हटले आहे). आणि पुनश्च राज्यकारभारात गढून गेले.
सन १७२८ साली शरफोजीराजेही पुत्रहीनच निवर्तले, त्यांच्या सह त्यांच्या दोन राण्या सती गेल्या (अपरूपबाई सोडून). आणि सत्तासुत्रे तुकोजीराजांच्या हाती आली.
काही दिवसांनी जरा स्थिरस्थावर होत नाही तोच एक कट्टू नांवाचा इसम तंजावराच्या आसमंतांत प्रकटला. याचें म्हणणें असे होते की मीच तो सवाई शाहजी किंवा सुकोजी आहे! बालपणीं मी कसाबसा सुटलो व जीवानीशी वाचून आता परत आलो आहे. मीच खरा सुकोजी व राज्य माझे वगैरे तोतया करतो तसल्या सर्व वल्गना त्याने सुरू केल्या. या तोतयाचा पुढे काय निर्णय झाला हे समजत नाही, परंतु तंजावरकरांची शाखा ही अतिचाणाक्ष व पारखी शाहजीराजांची (शिवरायांचे, एकोजीराजांचे तीर्थरूप) असल्याने व पुढील इतिहासात या कट्टुराजाचा काहीही उल्लेेख येत नसल्याने त्याचा योग्य तो बंदोबस्त केलाच असावा असे खात्रीनें म्हणता येते.
तर असे हे तोतया सवाई शाहजी महाराज! या तोतयागिरीची प्रकरणे सोडवताना राज्यकर्त्यांचा बहुमूल्य वेळ खर्ची जात असे व त्यामूळे राज्यही त्रस्त होत असे. श्रीमंत थोरल्या माधवराव पेशव्यांनी भाऊसाहेबांच्या तोतयाची जी चौकशी केली तींतही असाच मोलाचा वेळ खर्ची पडला होता.
©सुधांशू सुधीर कविमंडन
*संदर्भ*
१. बृहदीश्वराचा शिलालेख अथवा श्रीमद् भोसलेवंशचरित्रम्
२. तंजावरचे मराठे राजे- वि.स.वाकसकर
छायाचित्र: तंजावरचा राजवाडा व कलादालन, स्रोत: गुगल इमेजेस.
कृपया प्रस्तुत लेख लेखकाचें नांवासहच शेअर करण्यांत यावा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...