स्वराज्याच्या महाराणी येसूबाईसाहेब व थोरले शाहू माहाराज यांचे अनन्यसाधारण महत्त्व व दूरदृष्टीचे राजकारण
post by : श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.
सन १६९० च्या दशकातील औरंगजेबाच्या प्रदिर्घ दख्खन स्वारीत त्याने संपूर्ण दक्षिण ताब्यात घेण्यासाठी जंग जंग पछाडले. स्वराज्याचा घास घेता येत नाही हे ओळखून त्याने दख्खनेतील अदिलशाही कुतुबशाही गिळली. शंभूराजांची अमानुष हत्या केल्यानंतर स्वराज्य घशात घालता येईल ही मह्त्वाकांक्षा महाराणी येसूबाईसाहेबांनी वेगळाच डाव टाकत अत्यंत दूरदृष्टीने नेस्तनाबूत केली. शिवस्नुषा व शंभूपत्नी महाराणी येसूबाईसाहेब व शंभूपुत्र शाहू राजे यांचे अनन्यसाधारण महत्त्व याच गोष्टीतून औरंगजेबाने ओळखले असावे.
स्वराज्याचे तख्त पतीनिधनानंतर रिक्त असताना व राजधानी श्रीमान रायगड पडल्यावर स्वराज्याच्या महाराणी येसूबाईसाहेब व शंभूपुत्र शाहू राजे औरंगजेबाच्या कैदेत होते. कैदेत जरी असले तरी पुढील राजकारण साध्य करण्यासाठी महाराणी येसूबाईसाहेब व शंभूपुत्र शाहू राजे यांना कोणत्याही परिस्थितीत हानी न पोहोचविता सन्मानाने वागवणे क्रमप्राप्त आहे हे पाताळयंत्री औरंगजेब हे निश्चितच जाणून होता.
याच कारणास्तव त्याने शाहू माहाराजाना राजा ही पदवी सप्तहजारी मनसब व अक्कलकोट, इंदापूर , सुपे , बारामती व नेवासा या पाच परगण्यांची जहागीर करुन दिली. तसेच एक सोन्याची तलवार , छत्रपती शिवाजी माहाराजांची भवानी व अफझलनाखाची तलवार अशी बक्षिसे दिली. औरंगजेबाने शाहूराजांना सप्तहजारी मनसब दिली व येसूबाईसाहेबांना कारभार पाहण्याचा अधिकार शिक्यासह दिला. शाहूराजे अल्पवयीन असल्यामुळे येसूबाईसाहेब सदर शिक्का वापरत असत. शिक्का औरंगजेबाच्या अमदानितील असल्याने अर्थातच तो शिक्का फारसीत आहे . “ येसूबाई इ वालिदा शाहू राजा सन अहद" मराठीतील अर्थ “शाहू राजाची आई येसूबाई वर्ष पहिले" अशा आशयाचा सदरचा शिक्का होता.
यावेळेस येसूबाईसाहेबांसोबत सोबत जोत्याजी केसरकर व मोरोपंत सबनीस ही दोन अत्यंत विश्वासू मंडळी होती. दरम्यानच्या काळात बादशहा व शाहूराजे दोघही एकमेकांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करीत असत असत असे नोंदीवरून दिसते.
औरंगजेब शाहूराजांना वारंवार भेटवस्तू देत होता असे पुढील गोष्टींवरून लक्षात येते.
बादशहाकडील भेट वस्तूंची यादी -
१} लाल माणके जडवलेला आरसा
२} पाच रत्नजडीत आंगठ्या
३} एक रत्नजडीत खंजीर
४} सोनेरी खोगीर असलेला घोडा
५} सोन्याची पंछी {एक प्रकारचा अलंकार}
यावरुन औरंगजेब कैदेत असूनह शाहूराजांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करीत होता हे स्पष्ट होतं.
छत्रपती राजाराम माहाराजांच्या निधनानंतरही औरंगजेबाच्या मराठ्यांकडून होत असलेल्या अडचणींत कोणतीही कमी झाली नव्हती. याच कारणामुळे बहुदा औरंगजेबाने शाहू राजांचा यथोचित सन्मान राखण्याचा कायम पूर्ण प्रयत्न केला असावा. कारण छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतरच्या तब्बल तीन वर्षांनी औरंगजेबाने भरविलेल्या एका दिवाणे खास ची यादी नोंद पाहीली तर ही बाब अधिक स्पष्ट होते.
दिनांक १० जुलै सन १७०३ रोजी बादशहाने दिवाणे खास भरविला होता. त्या वृत्तांतात शाहूराजांची ची मनसबदारी काय दर्जाची होती हे अखबरीतील खालील नोंदीवरुन दिसून येते.
वृत्तांताचा मराठी अनुवाद-
बादशहाने आज दिवाणे खास भरवला आणि
दिवाणे खासचा दारोगा {व्यवस्थापक } हमीदोद्दीनखान बहादूर यास बादशहाने आपल्यासमोर यादी ठेवण्यास सांगितली.
ती यादी पुढीलप्रमाणे -
१} उम्दतुलमुतक - अमीर उलूउमरा असदखान {मुख्य प्रधान}
२} बक्षीउलुमुतक - रुहुल्लाखान
३} बक्षीउलुमुतक - सदरुद्दीन मुहंमदखान
४} मतलबखान
५} हाजी मुहंमद अलिखान
६} मन्सूरखान
७} राजा शाहू
८} हमीदोद्दीन खान बहादुर
९} इनायत उल्लाखान
१०} अब्दुल रहीमखान
११} रशीदखान
१२} शादी खान
१३}वाकर खान
१४ ) मुजीम खान
चौदा जणांचा समावेश असलेल्या या दिवाणे खास च्या यादी मध्ये शाहू राजांचा क्रमांक बराच वरचा दिसून येतो. यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे शाहूराजे यासमयी बादशहाच्या कैदेत होते.
याचाच अर्थ शाहू राजांशिवाय दख्खनेतील राज्यविस्तार, अंमल किंवा जे काही असेल ते करणे औरंगजेबास शक्य नसावे. अन्यथा त्या क्रुर धर्मांधाने शाहू राजांना इतका मोठा सन्मान दिलाच नसता.
यावरूनच स्वराज्याच्या महाराणी येसूबाईसाहेब व शाहू माहाराज यांची अनन्यसाधारण योग्यता व महत्व अधोरेखित होते.
संदर्भ -
मोगल दरबाराची बातमीपत्रे
मराठा कालखंड
भारतवर्ष
ऐतिहासिक चर्चा
शाहू माहाराजांचे चरित्र
महाराणी येसूबाई
चिटणीस बखर
मराठी रियासत
मोगल मराठा संघर्ष
अनुपुराण
हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी झगडा
पेशवे दप्तर
सनदापत्रातील माहिती
मासिरे आलमगिरी
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द
आदी..
श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.
No comments:
Post a Comment